सध्या मुंबईत पडलेल्या किंवा न पडलेल्या पण पावसाळ्याच्या गप्पा सुरु आहेत. कधीतरी मोठा पूर येणार म्हणून शाळांना आधीच सुट्टी पण दिली आहे असेही एका मैत्रीणीने मेल मध्ये लिहीलय या पार्श्वभूमीवर मला नकळत पावसाळी चपलेची आठवण झाली. किती वर्ष झाली पावसाळी चपला घेऊन. इथे पावसाळा असा ऋतु नाही त्यामुळे पाऊस कधीही पडणार पण आपल्यासारखा नाही. मग पार्किंग लॉट ते मुक्कामाचं ठिकाण एवढं चालायला कुठलंही पादत्राण चालतं. असो. तर काय सांगत होते? पावसाळी चपल.
पावसाळा या माझ्या लाडक्या ऋतुमध्ये माझा छळ करणारी माझी पक्की वैरीण म्हणजे पावसाळी चप्पल. प्रत्येक वर्षीची ही रड होती. बाबा मजेने म्हणायचे पण, "काय अपर्णा या वर्षी पावसाळ्याच्या चपलेचं काय करणारेस?" मी मात्र हा छळवाद आता सुरु झाला म्हणून मनातल्या मनात दहा आकडे मोजत बसायची. आतापर्यंत वाट्याला आलेल्या प्रत्येक पावसाळी चपलेने मला त्रास दिला आहे. ज्या कुणी ऑल सिझन नामक प्रकार शोधलाय त्याला माझ्या इतके दुवा कुणी दिले नसतील. पण एक दोन ऑल सिझन चपलांनीही मला थोडा फ़ार दणका दिलाय.
माध्यमिकला शाळा बदलली तेव्हा अगदी नव्या फ़ॅशनचे म्हणून काळे, समोरच्या भागाला जाळी असणारे आणि मागून पुर्ण बंद असे बुट आणलेले बूट मला आठवतात. माझी ताई त्याला पाववाल्याचे बुट असं म्हणायची. पुर्वी तो सायकलवर खारी, पाव वगैरे विकायला यायचा त्याचे बारा महिने तसेच पुढुन जाळी नसून बंद असणारे बुट असायचे. शाळेच्या पहिल्या दिवशी पाऊस नसताना घालुन गेले आणि घरी येईस्तो करंगळीवर एक टमटमीत कातडीचा फ़ुगा आला होता. बाबा म्हणाले परत एकदा घालून दाखव आणि त्यांच्या मते मी जरा लुज फ़िटिंग घ्यायला हवं होतं. तर आईचं म्हणणं घालुन घालुन नीट होईल. काही नाही करंगळीवर एक पट्टी लावुन थोडे दिवस सरळ तसेच वापर. आपल्याकडे रिटर्न पॉलिसी नाही ना. म्हणजे माझ्यासारखा ग्राहक मिळाला तर ती रद्दच होईल कारण माझी प्रत्येक चप्पल परत दुकानात जाईल. असो.
त्यानंतरच्या वर्षी बुट प्रकार अर्थातच बंद झाला. आणि फ़ॉर अ चेंज साधी चप्पल घेतली. तसं बरं चाललं होतं पण या चपलांचा जो समोरचा भाग असतो ना म्हणजे साधारण पावलाच्या मध्यभागी येईल तिथे हळुहळु लाली चढू लागली आणि हुळहुळ चालु झाली. शिवाय शाळेच्या स्कर्टवरच चिखलाचं नक्षीकाम उतरवायला आईला खास काम होतं. म्हणजे आईलाही त्रास.
त्यानंतर मात्र एक वर्ष गमबुट घ्यावे (अजुन असतात का नाही देव जाणॆ) असं मलाच (मनातल्या मनात) वाटत होतं. पण आमच्या शाळेत सगळ्या मुली चपला, सॅंडल अशी मुलींची पादत्राणं घालत असल्यामुळे आपल्याला चिडवतील म्हणून मी त्याबद्द्ल चकार शब्द काढला नाही.
त्यानंतर कधीही माझ्या पावसाळी चपला खरेदीला बाबा आधीच दुकानदाराला हिच्यासाठी न लागणार्या चपला द्या असं फ़र्मान सोडत. जसं काय दुकानदार सांगणारच आहे की बाळ या नको घेऊस, तुला लागतील. असो. मग जमाना सॅंडलचा आला आणि हा प्रकारही बघुया म्हणून घेतला गेला. मला आठवतं बाटाची ही डिझाईन काळी आणि मरुन रंगात होती. समोरच्या भागातून अंगठा आणि करंगळी थोडेसे दिसतील आणि वरुन एकमेकांवरुन जाणारे पट्टे मागे जाऊन बंदाच्या जागी वेटोळा होईल असं काहीसं क्रिसक्रॉस. फ़ार छान दिसतात असंही नाही पण याचं मटेरियल एकदम लवचिक. दुकानदार आणि आम्ही सर्व जरा जास्त आशावादी होतो. आणि खरंच सांगते या सॅंडलने मला अजिबात त्रास दिला नाही. पुढच्या वर्षी हीच पुन्हा बाजारात येईल की नाही या भितीने मी पावसाळा संपल्यावर व्यवस्थित माळ्यावर ठेवुन दिली. आणि त्यानंतर तीन पावसाळे मी तोच जोड न दुखणार्या पावलाने वापरला. बाटावाल्यांना माझ्या सारख्या लोकांचा फ़िडबॅक मिळाला होता की काय माहित नाही पण बरीच वर्ष ती सॅंडल बाजारात होती. आणि मुख्य म्हणजे खुप पायात ती दिसे पण दुसर्या दुखर्या धोंडी गळ्यात मारुन घेण्यापेक्षा मी सरळ सत्यवानासारखी सात जन्म तोच पती असल्यासारखी नवी घेतली तरी तीच या प्रकारे वापरली. म्हणजे नंतर नंतर मला स्वतःलाच वाटायचे आपल्याला ओळखणार्या व्यक्तींना दर पावसाळ्यात आपण वर्षानुवर्ष एकच चप्पल वापरतोय की काय असं वाटेल.
आणि फ़ायनली एक दिवस ताई मला भर उन्हाळ्यात म्हणाली," बघ मी पार्ल्यात घेतल्यात; या नव्या सॅंडल ऑल सिझन आहेत". माझा पहिला प्रश्न म्हणजे पावसाळ्यात पण चालतील? "अगं, ऑल म्हणजे ऑल"..ग्रेट!...त्यावर्षी एकदाची दुसरी चपल माझ्या पावसाळी आयुष्यात आली. मध्ये कधीतरी फ़्लोट्स नावाने जे काही बाजारात आलं तेही चालुन गेलं. विशेष करुन पावसाळी सहलींसाठी.
आता सध्या पावसाळी काय फ़ॅशन आहेत माहीत नाही. आणि हो आता सर्व खरेदी आपलं शॉपिंग मॉल मध्ये होत असेल ना म्हणजे निवडी एकदम मॉलामॉल असतील. पण हा धागा खास जुन्या त्रासदायक नाहीतर सवयीने पावलांना आपलं म्हणणार्या त्या सर्व पावसाळी चपलांसाठी...
.सगळ्यांच्या बाबतीत अगदी हेच घडतं.. मस्त आहे लिहिलेलं.
ReplyDeleteअगं आपण एकाच जातकुळीच्या.... आमची आई नेहमी म्हणते हीला सोन्याची चप्पल दिली तरी लागेल आणि मोरपिसांची दिली तरी लागेल. मी पुरेपूर तुझे दु:ख समजू शकते. मीही तेच बाटाचे सॆंडल्स अनेक वर्षे वापरत होते. सिटी कंपनीचे सॆंडल्स वापरून बघ. मला नाही लागले....कदाचित तुलाही.....:)
ReplyDeleteधन्यवाद महेन्द्र काका आणि भानस...आता जेव्हा भारतात कायमचे जाऊ तेव्हा ते सिटी कंपनीचे पण पाहीन वापरुन. अमेरिकेत लेदर घातले तरी चालते. पाऊस असला तरी त्या प्रकारचा प्रवास ई. नसतो ना...
ReplyDeleteआजकाल चपला लागताच नाहीत. त्यावर बरंच संशोधन झाल्याचं दिसतंय. ऑल सीझन चपलांमुळे पावसाळ्यात चप्पल खरेदी करण्याचा प्रश्नच येत नाही आणि पाऊस गायब झाल्याने वर्षभर कुठलीही चप्पल चालून जाते.
ReplyDeleteअच्छा ही नवीन माहिती आहे आणि पावसाळी चप्पलवाल्यांच्या पोटावर पाय..धन्यवाद योगेश.
ReplyDeleteशेम टु शेम!
ReplyDeleteमला आजही नविन चप्पल, सॅंडल, बुट कहिहि घे, हमखास लागतातच अगदी कॅटवॉकचे सुद्धा. त्यामुळे मी अगदी जीवावर आलं तरच चप्पल बदलते नाहीतर शिवुन सुद्धा वापरते. नवरा जाम चिडतो कधि कधि या भिकार्याच्या चपला नको हा घालुस प्लीज असे बोलतो :)
सोनाली फ़ॉर चेंज देश बदलल्यामुळे माझ्या चपलांचा अनुभव चांगला होतोय आणि त्यामुळे नव्या पादत्राणांमध्ये भर पडतेय (आता हे काय असं जाहिर सांगु नये चाकुपुराणासारखं...पण)....तरी मुंबईतल्या दमट हवेत पुन्हा चपला लागतील हे भ्या हायेच...
ReplyDeleteहा हा .. सहीये चपलाख्यान.. मजा आली..
ReplyDeleteआणि हो तुझ्या पोस्ट मध्ये अनवधानाने, अजाणतेपणे आलेला माझा उल्लेख बघून मजा वाटली :)
हेरंब, चपलाख्यान शब्द छान आहे....:)
ReplyDeleteआणि अरे उल्लेख येणारच शेवटी great minds....