Wednesday, May 13, 2009

आजोबांच्या गोळ्या

खरं सांगायचं तर मी स्वतः माझे सख्खे आजोबा पाहिलेही नाहीत त्यामुळे आमच्याशी कडक शिस्तीत वागणारे माझे बाबा माझ्या भाचे कंपनीचे खूप लाड करताना पाहते तेव्हा मला नेहमी वाटतं की आजोबा प्रकार काय असतो आपल्याला खरंच कळत नाही. त्यादिवशी औट घटकेसाठी का होईना एक आजोबा भेटले आणि पटलं की गोरा असो का भारतीय, पैलतीर दिसू लागलेल्या माणसाच्या ओठी प्रेमाचीच भाषा येणार...
मुळात अमेरिकन माणसे स्वतःत रमणारी. अशी दिसली की तोंडभर हा......य़ करतील पण हाय पुढे जास्त इंटरेस्ट असेलच असे नाही. माझी एक मैत्रीण म्हणते की एक प्रकारे ती तुम्हाला सांगताहेत की we are trying to be friendly ...doesn't mean we are freinds... असो. नमनालाच घडाभर तेल नको.
या कम्युनिटीत नव्याने राहायला आलो तेव्हा एकदा WFH म्हणजे वर्क फ़्रॉम होम करताना खिडकीतून बाहेरच्या साइड वॉकवर कुणीतरी हळुहळु चालताना दिसलं. पाहिलं तर काठी घेऊन एक वयाने सत्तर-ऐंशीच्या घरातले एक गृहस्थ आपला मॉर्निंग वॉक घेताना दिसले. एकंदरितच माणसे कमी दिसतात म्हणुन सहज नजरेला चाळा म्हणून मी बसल्या जागेवरुन उगाच अंदाज बांधत बसले. हे एकटेच राहात असतील मग यांची घराबाहेरची कामे कोण करत असेल आणि काय आणि काय...असो. संध्याकाळी घरात पण त्यांचा विषय काढत बसले.
अशी माणसं दिसली की मला उगाच गलबलुन येतं. मग काही दिवसांनी नवरा उशीरा कामावर जाताना या दोघांची समोरासमोर गाठ पडली आणि त्यांच्याशी हातमिळवुन आलेला माझा नवरा "अगं, तू त्या आजोबांबद्द्ल बोलत होतीस ना ते भेटले होते. त्यांचा हात काय कडक आहे माहितेय?" मितभाषी लोकांचं बरं असतं ते कुण्याच्या जास्त चौकशा करत नाहीत, त्यामुळे त्यांना बरेच प्रश्न पडतच नसावेत. हा मला यापेक्षा जास्त माहिती देणार नाही हे माहित असल्यामुळे मी अजून जास्त छेडले नाही. पण त्या हाताबद्द्लच्या कॉमेन्ट्वरुन मात्र मला पु.लं.च्या पेस्तनकाकांची आठवण झाली. असो.
नंतर बरेच महिने आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात व्यस्त. अधुन-मधुन बाहेर चालताना कुणी आहेस वाटलं तर स्पीडवरुन मला कळे की काठी घेउन मॉर्निंग वॉक चाललाय....मी जवळ जवळ विसरुनही गेले होते की मी मध्ये काही दिवस अमेरिकेत एकटे राहणाऱ्याचा इतका विचारपण करत होते ते.
आज ब-याच दिवसांनी सकाळी मी माझ्या छोकऱ्याला बाबागाडीत बसवुन फ़िरायला म्हणुन बाहेर काढले आणि समोरुन पाहिलं तर साइड वॉकवरुन काठीचा थोडा आधार घेत, चालीचा तोच तो ओळखीचा वेग...आज मात्र जरा यांच्याशी बोलुयातच म्हणून आमचा वेग थोडा कमी केला आणि मग एक मोठ्ठं हॅलो... आजोबांनी माझ्याकडे आणि बाळाकडे जवळ जवळ एकत्रच पाहिलं आणि सर्वात प्रथम बाळाची चौकशी केली. त्यांना माझे इंग्लिशचे उच्चार (accent) आवडल्याचं कळलं. मला आपलं तेवढंच बरं वाटलं.
जुन्या लोकांना भारतीय लोक पटकन ओळखु येत नसावेत बहुधा...त्यांनी मला विचारले की मी कुठली आहे. पुढच्या प्रश्न काय असेल त्याची साधारण कल्पना आली मला कारण आतापर्यंत भेटलेल्या जवळजवळ प्रत्येक गोऱ्याने हा प्रश्न सम पॉइंट ऑफ़ टाईम केला आहे. तो प्रश्न म्हणजे इथे तुला आवडतं का? याचं माझं प्रामाणिक उत्तर "हो आणि नाही" आहे. हो चं कारण कुणी विचारत नसतं पण नाहीचं कारण आमचे दोघांचे पालक, बहिण-भावंड इथे नाहीत. हेच उत्तर मी याही वेळी दिलं...आता आजोबांची कळी खुलली. ते मला स्वतःहुन आपली माहिती द्यायला लागले.
यांना तीन मुलगे पण ते तिघं आमच्या भागापासून निदान दोन तासांच्या(म्हणजे आपल्या मुंबईपासुन पुण्यापेक्षा जास्त) अंतरावर राहतात त्यामुळे हे इथे एकटेच. मी अजुन काही विचारायच्या आत ते स्वतःहुन म्हणाले मला मुलगी नाही ना....मी पण माझी जुनी जखम मोकळी केली की आम्हाला पण मुलगी होईल तर बरं असं वाटायच पण....यावरची आजोबांची प्रतिक्रिया फ़ारच बोलकी होती...अगदी आपल्या इथल्या कुठल्याही बापासारखी..."a son is a son untill he gets his wife and a daughter is a daughter for the rest of her life" ते नुस्तं सांगून थांबले नाहीत तर त्याचा शब्दशः अर्थ स्पष्ट करुन सांगितला. मला इतकं भरुन आलं..काय बोलु?? मी म्हटलं अहो मला आपलीच समजा आणि मी काही मदत करु शकले तर नक्की सांगा.
त्यांनी माझ्याबरोबर थोड्या इथल्या गप्पा केल्या. ते ब्याण्णव वर्षांचे आहेत हे मला खरंच वाटत नव्हते. ते म्हणाले मी कधीही दारू प्यालो नाही आणि बायकांच्या मागे लागलो नाही. फ़क्त माझ्या मित्रांबरोबर मी खूप मैदानी खेळ खेळलो आहे. मला वाटलं काय देश आणि संस्कृती घेऊन बसतो आपण. शेवटी मूळ प्रश्न आणि त्यांची उत्तरे सगळीकडे सारखीच नाही का?
थोड्या वेळाने आपल्या खिशातुन आजोबांनी एक छोटी प्लॅस्टिकची पिशवी काढली, त्यात आपल्या इथल्या लिमलेटसारख्या गोळ्या होत्या. ते म्हणाले मी चालतो तेव्हा माझी एक शेजारीण जी इतर वेळी मला सारखी मदत करते ती जर दिसली तर तिला मी ह्या गोळ्या देतो. आज मी त्या तुला देणार आहे. आणि तू त्या सर्व एकदम खाउ नकोस. यांची चव नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. मी आभार मानून त्या घेता घेता त्यांना विचारु पाहात होते की मी तुम्हाला काय देऊ पण ते म्हणाले I like the fact that you accepted this....मला कळेचना आणि खरं माहित नाही त्यांनी असं का म्हटलं...अशा छोट्या प्रसंगात का कुणास ठाऊक मला वाटतं हाच आपल्या आणि त्यांच्या कल्चरल डिफ़रन्सचा भाग असावा...असो..
नंतर उरला वेळ लेकाला फ़ेरफ़टका मारताना मी मनातून हाच विचार करतेय की मला आजोबा असते तर त्यांनी मला आताही अशाच खूप दिवस पुरणा-या गोळ्या दिल्या असत्या आणि बरोबर त्या लगेच संपवू नको ही सुचना.
माहित नाही पुन्हा आमची भेट कधी होईल. पण यावेळी मला माझ्याजवळ या आजोबांसाठी काहीतरी ठेवायचे आहे. काय बरं ठेऊ??

8 comments:

 1. छान जमलाय लेख. पैलतीराची चाहुल लागलेल्या व्यक्तीचे वर्णन छान दिसतेय.

  ReplyDelete
 2. कातडीचा रंग कुठलाही असला, तरी मनाचा स्वभाव सारखाच असतो. प्रत्येकाला पैल तिराची चाहुल लागली की एकटॆपणा जाणवतोच.
  छान जमलाय लेख..

  ReplyDelete
 3. छान!


  एक दुरुस्ती, सुचवू का....
  -या ऐवजी र्‍या

  पहा : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1


  जर आपल्याला रस असेल तर कृपया या कम्युनिटीमधे सामील व्हा.

  ReplyDelete
 4. धन्यवाद प्रशांत. या ब्लॉगच्या निमित्ताने मराठी टाइप करायला शिकतेय. आपली सुचना अतिशय मोलाची.

  ReplyDelete
 5. छान आहे लेख. एकदम भावस्पर्शी. :-)

  ReplyDelete
 6. संकेत धन्यवाद. आज खूप सारे कमेन्ट्स एकदम टाकलेस...खरंच छान वाटलं...:)

  ReplyDelete
 7. उद्या संध्याकाळी ब्लॉग उघडून बघ. आणखीही बर्‍याच प्रतिक्रिया दिसतील. कारण सगळ्या पोष्टी वाचायच्या म्हणजे एक पूर्ण दिवस जाईलच ना माझा... :-)

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.