Wednesday, January 22, 2014

गाणी आणि आठवणी १५ - दिल में जागी धडकन ऐसे

उदय आणि मी कॉलेजमध्ये असताना तो माझा मित्र वगैरे नव्हता. म्हणजे असायचं काही काम नव्हतं. पण त्याचा एक मित्र माझा अतिशय चांगला मित्र आहे, त्यामुळे ते कॉमन मैत्री वगैरे का काय म्हणतात तसं असावं. मग यथावकाश कामाला लागल्यावर त्या कॉमन मित्रामुळे आमचे निदान मुंबईत असेपर्यंत contacts राहिले. आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात स्वतःची गाडी असण्याचा मान उदयकडे. म्हणजे तशी सगळी जण सेटल होतहोती पण गाडी घ्यावी हे बहुतेक फक्त उदयच्याच डोक्यात पहिले आलं असावं. कदाचित त्याचा भाऊ actor आहे त्याची थोडी बॉलीवूड पार्श्वभूमी त्याला कारण असू शकेल. मला आठवतं कॉलेजमध्ये हा त्याने घातलेल्या कुठल्या कुठल्या कपड्यांचे ब्रान्ड सांगत असे. आणि प्रत्येकवेळी त्याचं  एक पालुपद असे की "एकदम ओरिजिनल है" म्हणून. आम्हाला काय कळतंय ओरिजिनल काय आणि फेक काय. खरं तर आता आठवलं की मज्जा वाटते. आता खरं काही प्रसिद्ध brand बरोबर काम वगैरे पण करून झालं तरी त्या दिवसातली गम्मत वेगळीच. बालपणीचा काळ सुखाचा टाईप. 

हम्म तर काय सांगत होते? आमची मैत्री. तर मग कामाला लागल्यावर आमच्या त्या कॉमन मित्रामुळे पुन्हा उदयबरोबर पुन्हा कधीकधी भेट होत असे. ही दोघं आणि आमचा एक कामावर भेटलेला आणखी एक मित्र अशी एक त्रयी होती. ही लोकं प्रत्येक शनिवारी दुपारी त्या आठवड्यात लागलेल्या सिनेमाला जात आणि नाही आवडला की सरळ बाहेर येत. आता कुठला चित्रपट आठवत नाही पण त्यातून ते पाच मिनिटात बाहेर आले होते. आणि तो त्यांचा रेकॉर्ड होता. त्यादिवशी नेमकी मी माझं ऑफिस सुटल्यावर त्यांना अंधेरीला भेटून मग आम्ही जेवायला गेलो असताना यांचे असे चित्रपट पाहताना बाहेर यायचे रेकॉर्ड याविषयीच्या परिसंवादाची मी मूक (किंवा खर नुसती हा हा करून मोठ्याने हसणारी) श्रोती होते. यातून दुर्बुद्धी सुचून मी पुढच्यावेळी नाटकाला जाऊया म्हणून या त्रयीला सांगून पायावर धोंडा मारून घेतला होता. 

नाटकाची पहिल्या रांगेची तिकिटं काढली आणि याचं दहाव्या मिनिटापासून "चला", "उठुया", "बोअरिंग होतंय", सुरु झालं. नाटक सोसोच होतं पण तरी असं पहिल्या रांगेतून उठून कलावंतांच्या मेहनतीचा जाहीर अपमान करणं मला पटत नव्हतं त्यामुळे मी एकटीच बसणार म्हणून सगळे कसेबसे थांबले मग मध्यंतरात उठलो तोपर्यंत "मी तुला आज ट्रेनने जायच्या त्रासाऐवजी घरी सोडतो" म्हणून त्याने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेऊन झालं होतं. आणि तेव्हा मी वसईला राहत होते. मग शेवटी ही लोकं मला सोडायला आणि मला विसरून माझ्याच बाबांशीच खूप वेळ गप्पा मारून परत गेली. 

तर अगदी घट्ट नाही पण तेव्हा आमची चांगली मैत्री होती. एकमेकांचे घरगुती प्रश्न सांगण्याइतपत. आमच्या आणखी एका मित्राचा मी थोडा सिरीयसली विचार करावा वगैरे सांगण्याइतपत. आम्ही मध्ये काही महिने एकाचवेळी मुंबईत सिप्झमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं त्यावेळी संध्याकाळी वेळेवर निघणार असू तर त्याच्या गाडीने तो मला बोरिवलीला सोडत असे. कंपनीच्या बसपेक्षा थोडा वेळ वाचत असे पण त्याच्याबरोबर फुल टाईमपास गप्पा होत. एकदा समोरच्या माणसाने काहीतरी चूक केली तर हा पुढच्या सिग्नलला गाड्या थांबल्या तेव्हा  हा तरातरा आपल्या गाडीतून उतरून समोरच्याला चांगला झापून आला होता. आणि वरून त्याची "भा"राखडी मी ऐकली की काय म्हणून मला, "अशावेळी कान बंद करत जा" हा सल्ला देऊनही पार.   

एकदा मी खूप वाईट मूडमध्ये होते. काय झालं होतं मला आठवत नाही, कॉर्पोरेट जगतातला एखादा पोलिटिकली वाईट दिवस असावा. बहुतेक मी नीट बोलत किंवा ऐकत नसेन त्यामुळे त्याला ते जाणवलं असावं. अचानक तो म्हणाला तू सुनिधीचं हे गाणं ऐकलंय का? आणि त्यादिवशी बोरीवली येईपर्यंत आम्ही ते गाणं ऐकून एकंदरीत सुनिधी या विषयावर गप्पा मारल्या होत्या. 

हे गाणं ज्या लयीत स्वरबद्ध केलयं त्यात गाण्यात म्हट्ल्याप्रमाणेच एक जादू आहे. कधीही ऐकलं तरी डोलायला लावणारंतसं पाहिलं तर त्याच्या त्या "ओरिजिनल"च्या आवडीत त्याच्याकडे नेहमी चांगल्या सीडी असत. गप्पा मारत असलो तरी त्याचं गाण्याकडे (अर्थात driving कडे) लक्ष असे. यान्नी आणि मला त्याकाळी माहित नसलेले विशेष करून बाहेरच्या देशातले काही कलाकार त्याच्याबरोबर बरेचदा ऐकले तरीही सुनिधीचं "दिले में जागी" ऐकलं की मला उदय आठवतो. 

आता आमच्या वाटा खुपच वेगळ्या झाल्यात. जसं मी वर म्हटलं की त्याने गाडी लवकर घेतली तसचं आमच्या त्या सगळ्या मित्रमंडळात लग्न, मुल हेही बहुतेक त्याचंच लवकर झालंय. मागे तो इस्टकोस्टला आल्याचं कुणीतरी कळवलं आणि नेमकं आमचं packing सुरु झालं होतं. पण मला खात्री आहे की आम्ही पुन्हा कधीही भेटलो तर नक्की तासभर तरी गप्पा मारू आणि तेच या अशा मैत्रीकडून अपेक्षित असतं. 



सुनिधीचा स्वर, निदा फाजली यांचे शब्द आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम. एम. क्रीम (खरं ते Keervani आहे)  या संगीतकाराची कामगिरी, या त्रयीची कमाल या गाण्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवते. यातील एकाने जरी थोडं डावंउजवं केलं असतं तर हे गाणं कोलमडू शकलं असतं. पण तसं ते झालं नाही. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूर,शब्दाच्या लयीत आपण पाच मिनिटं झुलत राहतो आणि हे दोन तीन वेळा ऐकलं की त्यादिवशीचा आपला जर खराब झालेला मूड असेल तर तेही विसरून जातो. मला हा अनुभव जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते तेव्हा तेव्हा येतो आणि मग आपसूक उदय आणि त्यादिवशीची संध्याकाळ आठवते. पुन्हा मी सिप्झच्या घामेजल्या ट्राफिकमध्ये त्याच्या गाडीतला एसी, गाणी आणि गप्पांमध्ये हरवते. ही पोस्ट  या साऱ्या आठवणी जागवण्यासाठी.
 

Tuesday, January 14, 2014

एक छोटं खाद्यवर्तुळ पूर्ण होतंय….

आपले मराठी सण जवळ आले की मला मज्जा वाटते. म्हणजे त्यावेळी ब्लॉगचे स्टॅट पाहिले की कुणीतरी त्या त्या सणाची जूनी पोस्ट वाचून गेलेलं असतं. मी पण ती पोस्ट पुन्हा वाचते आणि शक्य असेल तेव्हा अर्थात यंदाच्या सणाच्या तयारीला लागते. आपल्याकडे सणांना तोटा नाही. आपलं मनोधैर्य का काय म्हणतात ते नेहमी उंच ठेवायचं असेल तर अशा छोट्या मोठ्या सणांना पर्याय नाही. 

मागचे काही वर्षे जेव्हा आम्ही इस्टकोस्टला होतो तेव्हा आसपासची एक दोन मराठी मंडळ आपले सण आवर्जून साजरे करायची परंपरा कायम ठेवत आमचं मनोधैर्य मध्येमध्ये उंच व्हायला बळ देत. नॉर्थवेस्टला आल्यावर मात्र मराठी मंडळ हे प्रकरण फारसं अंगी लागलं नाही. कदाचित अजून मुलं लहान आहेत, तिकडे असलेल्या जुन्या ग्रुप्समध्ये जाउन घुसायचं वगैरे मुदलात अंगात नाही, पुन्हा ते ठिकाणही थोडं लांब वगैरे असण हे सगळं जे काही असेल त्याने आमच्या मुलांना आपले सण कसे समजवायचे असे प्रश्न यायला लागले आणि मग ठरवलं की यंदा आपलं आपण करायचं. जिथे ते इतरांबरोबर वाटता येईल तिकडे तेही करावं आणि नसेल तर निदान आपली चार डोकी तरी खुश झाली पाहिजेत. 

मागच्या वेळी जानेवारीत मुंबईत असल्याने निदान संक्रांत तर व्यवस्थित साजरी झाली. आमच्यात, "सणाला काय?" या प्रश्नाचा स्पष्ट उद्देश, "खायला स्पेशल काय?" असा असल्याने परत येताना चांगल्या डझनभर गूळपोळ्या घेऊन आलो आणि चवीचवीने खाल्ल्या. 

त्यानंतर होळीला आयुष्यात पहिल्यांदाच पुरणाची पोळी बनवली. ती माझ्या अंदाजापेक्षा बरीच पोळीसदृश्य लागलीदेखील. 


श्रीखंड हा एक पदार्थ जास्त गुंतागुंतीचा नसल्याने आणि दही लावायचं काम आउटसोर्स केल्याने पाडव्याची चिंता नव्हती. 

उकडीच्या मोदकाचं आठवणीने आणलेलं आणि घरातल्या घरात हरवू नये (आणि अर्थात खराब होऊ नये) म्हणून फ्रीजमध्ये ठेवलेल्या पीठाने गणेश चतुर्थीला चक्क एकवीस मोदक करता आले आणि ते ज्या वेगाने करू त्याच्या प्रचंड जास्त पटीने संपलेही. 



दिवाळीला सगळा फराळ करणार होते, पण यंदा आमच्या दोघांच्याही घरून बरेच आधी फराळाचे डब्बे आले. त्यात चकलीने थोडा घोटाळा केला होता त्यामुळे नेहमीच्या हुकुमी चिवड्याबरोबर चकली करायचा प्रयोग केला आणि तुफान यशस्वी झाला. आता पुन्हा एकदा आम्ही संक्रांतीच्या उंबरठ्यावर उभे राहिलो. 




करू करू आणि इकडे चिकीचा गूळ मिळत नसल्याने होणार नाही होणार नाही हे माहित असतानाही प्रयत्न म्हणून तिळगूळ बनवून पहिला अगदी समदे नाहीत पण सात आठ लाडू झाले आणि मग चुरा जिंदाबाद म्हणून राहिलो. 

या सगळ्याचा उल्लेख काही वेळा मागच्या वर्षीच्या पोस्ट्समध्ये किंवा ब्लॉगच्या फेसबुक पानावर नुसता फोटो टाकून केला आहे.
माझी स्वतःची स्वयंपाकघरातली एकंदरीत प्रगती, रस इ.इ. पाहता मला स्वतःला हे एक सणांच्या निमित्ताने पूर्ण केलेलं खाद्यवर्तुळ पाहताना समाधान वाटतंय. अजून बरेच खास आपले मराठी पदार्थ आहेत ते कधी जमेल तसं करून पाहिन.घरात खायची आवड सर्वांना असणं हे आमच्या घरात वेगवेगळ्या पाककृती स्वतः करून पाहण्यामागचं मुख्य कारण आहे.नेहमी सगळं मी एकटी करत असते असं नाही. कारण शेवटी आम्ही दोघ या भागातले शिकाऊ उमेदवार आहोत. ज्याला जे जमतं तो ते करून पाहतो. शिवाय एखादा वेगळा पदार्थ करताना काय किंवा नेहमीची न्याहारी बनवताना काय, माझी मुलं आसपास असतात. पैकी आरुष आता जरा "हेल्पर जॉब" करायचा आहे या उत्साहात असतो. म्हणून त्यालाही काहीबाही दिलं जातं. त्याचे हजार प्रश्न, त्या गप्पांतून होणाऱ्या गमती जमती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पदार्थ सगळ्यात पहिले चाखताना त्याने दिलेली पसंतीची पावती या सगळ्यावर एक वेगळी किंवा प्रत्येक कृतीमागे एक पोस्ट लिहिता येईल. 

महत्वाचं हे आहे की आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ त्या त्या सणांच्या निमित्ताने आपण स्वतः बनवण्याची प्रोसेस एन्जॉय करणे. आमचं खाद्यवर्तुळ आम्ही हळूहळू पूर्ण करतोय आणि आपण? 

अरे हो मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. सूर्याचं हे संक्रमण आपण सर्वांना लाभदायी होवो हीच सदिच्छा. 

Tuesday, December 31, 2013

आणखी एक आढावा....


ब्लॉग लिहायचे काही फायदे असतात म्हणजे जुन्या नोंदी वाचताना त्यावेळी आपल्याला काय वाटलं होतं किंवा अच्छा तेव्हा असं  असं  झालं होतं हे सगळं आठवतं. चांगले प्रसंग असतील तर पुन्हा छान वाटत आणि वाईट असतील तर त्यातून काही शिकता येईल का किंवा आता काही बदललं  आहे का याचा आढावा घेत येतो. मी तस प्रत्येक वर्षी नियमित ब्लॉग  लिहिणं किंवा निदान वर्षाच्या शेवटी छोटा आढावा घेणं असं केलं नाही पण केलं तर पुढच्या वर्षी वाचायला मजा येते असं  एकदम वाटलं. मागच्या वर्षी एवढ्याला आमचं विमान मुंबईत पोचून आम्ही जुने व्ह्यायच्या तयारीत होतो. काश! यावर्षी पण तेच करू शकलो असतो. असो मुद्दा तो नाही. निदान यंदाचं काय ते तरी थोडक्यात पाहायला हवं. पुढच्या किंवा त्यापुढच्या काही वर्षी हे सगळं वाचताना कस वाटेल?
 
तर वर्ष सुरु झालं आमच्या मुंबईत. मी खरं तर साल बदलतं, म्हणून जे काही महत्व दिलं जातं तेवढी एक गोष्ट सोडली तर कधीच या दिवसाच्या निमित्ताने शक्यतो वेगळं काही करत नाही.  एकदा शिकागोच्या नेवीपियरला हाडं गोठवणाऱ्या थंडीत फायरवर्कसाठी गेलो होतो; मी गाडीतून उतरलेपण नाही. उगाच दातखीळ बसवायची माझी तरी इच्छा नव्हती. पूर्वी थोडे फार बरे कार्यक्रम असायचे म्हणून टीव्ही पहिला जायचा तेही नवद्दीच्या दशकात. वर्षे सरली तसं या दिवसाबद्दल काही वाटेनासं झालं हे कळलंही नाही. मागच्या वर्षी देशात असताना देखील. तेव्हा तर मी अमळ लवकर झोपले कारण अजून जेट lag गेला नव्हता.
 
बरोबर तीन दिवसांनी बाबांबरोबर त्यांच्या हृदयविकाराचा त्यांच्याबरोबर सामना करण्यासाठी ताईबरोबर रहेजाला होतो. आजारांची आता मला तशी भीती वाटत नाही. मागची काही वर्षे स्वतःचे विकार स्वबळावर झेलतोय म्हणून आल्या परिस्थितीला तोंड द्यावं इतकं नियतीने शिकवलं बहुतेक. बाबा घरी येउन त्याचं रुटीन जुळवण्यासाठी आईला मदत करताना कोण आपलं आणि कोण तोंडदेखलं आपलं  हेही कळलं. चालायचंच. फक्त  यावेळी हे आई-बाबांना पण कळलं असं वाटतंय.
 
मग उरलासुराला वेळ काही खूप जवळच्या आणि काही तोंडदेखलं जवळच्या लोकांना भेटण्यात गेला आणि मग परत आलो ते खर तर इतरवेळची शांतता वगैरे काही न जाणवता. त्याचं मुख्य कारण आम्ही नव्या घरात सामान नुसतं सोडून गेलो होतो, ते सगळं लावायचं ठेवलं होतं. देशात वेळ नसल्यामुळे तशी काही विशेष खरेदी वगैरे झाली नव्हती पण आहे हेच इतकं पसरलं गेलं की मग एक एक खोली लावणे करता करता वसंत ऋतू कसा आला कळलंदेखील नाही. काही फ्रेम्स अजून बासनात पडून आहेत हे ही पोस्ट लिहिताना उगीच खुपतंय.
 
काही वेळा बदल सुखावतात, काही वेळा ते आपल्या असण्याची जाणीव तीव्र करून जातात. मागच्या गाडीच्या ब्रेक लावण्याच्या क्षणाची उसंत माझ्या गाडीला आणि मला जायबंदी करून गेली आणि उन्हाळ्याच्या प्लानिंगमध्ये फक्त फ़िसिओथेरीपी आणि व्यायाम याची भर पडली. ते उरकतेय आणि मुलाचा शालेय प्रवेश त्याच्या गमती जमतीची वाट पाहताना तो एक दिवस कोपर मोडून आला आणि मग फॉल-कलर मध्ये ही भर पडली. मध्ये मध्ये छोट्याच्या तक्रारी, नवऱ्याच्या  तब्येतीच्या कुरबुरी हे सगळं मीठ-मिरी सारखं पेरणीला होतच, पण आता आम्ही निर्ढावलो होतो.
 
मग मुलाचं प्लास्टर निघालं आणि अक्षरश: चार दिवसात प्लान करून वेगसला चार दिवसांसाठी जाऊन आलो. अजिबात गरम नाही आणि रात्री खूप जास्त थंडही  नाही, मागच्या आणि या ऑक्टोबरमधल्या वेगसच्या ट्रीप मला दोन्हीवेळा आवडल्या. काही तक्रार नाही. आताही एकंदरीत इकडच्या सणासुदीच्या दिवसाच्या निमिताने होणार्या काही मित्रमंडळीच्या भेटी. थोडं जवळपास बदल म्हणून जाउन येणं सुरु आहे. थंडीचा कडाका अगदी thanksgiving पासूनच जाणवतोय. दुसऱ्या  राज्यात भाची राहते; तीही मध्ये एकदा नवीन घर पाहायला आली. तिच्यानिमित्ताने pacific कोस्टला धावती भेट देऊन आलो. त्यानंतर पुन्हा एकदा वेळ काढून गेलो त्यावेळी लाटांचा जोर जरा जास्त होता. ती गाज कॅमेराच्या फोनमध्ये बंदिस्त आहे. कधी पुन्हा हे ऐकत बसलं  की  समुद्राचा आवाज मला अगदी पार देवगड आणि मालवणला घेऊन जातो. निसर्ग आपल्याला अंतर्मुख करतो हे खरेच. तो आपले आपल्याशी असलेले नाते स्पष्ट करतो. कधी तरी नुसतं हा आवाज ऐकत समुद्रकिनार्यावर जावं. खूप शांत वाटतं.
 
उद्या हेही साल बदलेल आणि कदाचित आणखी काही बदल आमच्यासाठी घेऊन येईल. बरेचदा अगदी एखादा कटू प्रसंगही  मी चांगल्या मनाने स्वीकारते; कारण त्यामुळे असे प्रसंग हाताळण्याची आपली ताकद तर आपल्याला कळतेच पण समोरच्याच्या मनात माझ्याबद्दल काय भलं किंवा बुरं आहे हेही स्पष्ट होतं. काही वेळा निंदकाचं  घर अगदी शेजारीच असतं मग ते लवकर कळलं म्हणून नियतीचे आभार मानणे  आणि अशांसाठी आपली दारं  बंद करणे हे करायचं देखील कळतं. या वर्षात वर म्हटलेल्या काही प्रसंगी ते शिकणं झालं आणि तीच या बाकीच्या थोड्याफार कठीण प्रसंगातली जमेची बाजू  म्हणायची.

थोडक्यात सांगायचं तर आपली लढाई सुरु असतेच, प्रसंग बदलत असतात, बदलत नसतात ती आपल्याला साथ देणारी आपली जवळची माणसं. माझ्याकडे अशी माझी म्हटलेली माणसं माझ्यासाठी आहेत हे या वर्षाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलं. हाच या लढाईमधला "माझिया मनाचा" विजय आहे आणि कदाचित हा आढावा म्हणूनच यावर्षी घेतला गेलाय. 

२०१४ साठी आपणा सर्वाना अनेक शुभेच्छा.
 


Friday, December 27, 2013

विंटर वंडरलँड

हिवाळा आला की  थंडी आणि सोबतीला लवकर काळोख पडणारे दिवस येणार हे  नेहमीचंच. यावर्षी त्याला जोड मिळाली जरा लवकर पडलेल्या बर्फाची. आणि अशा थंडीत येणाऱ्या नाताळच्या पार्श्वभूमीवर बच्चेकंपनीच्या मनोरंजनासाठी डाऊनटाऊनच्या जवळ असणाऱ्या विंटर वंडरलँडला जायचा प्लान ठरला. 

खर म्हणजे मागची दोन वर्षे जायचं होतं, पण प्रत्येक वर्षी काही न काही निमित्त होऊन आमची तयारी होईपर्यंत वंडरलँड पुन्हा नॉर्थ पोलला गेलेली असे. यावेळी मात्र आम्ही अगदी रिमांइडर वगैरे लावून वेळेत गेलो. स्वागताला मिट्ट काळोखातून चमकणारा "विंटर वंडरलँड" लिहिलेला दिव्यांचा फलक आणि प्रत्येकाला कॅन्डी केन देणारा स्वयंसेवक.   


त्यानंतर जसं जसं पुढे गेलो तसं एक वेगळंच विश्व दिव्यांच्या माळांनी आमच्यापुढे उभं राहिलं. काळोखात धावणारी सांताची गाडी काय आणि दुधाचे हंडे  ओतणाऱ्या बायका काय. 
आमच्या या छोट्या सफरीमधली काही क्षणचित्रे 


















Sunday, November 17, 2013

ये सचमुच न मिलेगी दोबारा

ओरेगनमधला टिपिकल हिवाळी विकांत म्हणजे बाहेर सूर्य नाही, आदल्या दिवशी रात्री पडून गेलेल्या पावसामुळे आलेली थोडी जास्त थंडी आणि अशात अवेळी झोपलेली मुलं. अशावेळी काही तरी स्वतःचं पाहुया म्हणून पुन्हा एकदा जिंदगी न मिलेगी दोबारा सुरु करतोय. 

प्रथम पहिला तेव्हाही  आवडला होता पण दुसऱ्यांदा पाहताना थोडा जास्त मुरतोय. विशेष करून इम्रान अख्तरने त्याच्या वडिलांच्या कवितांचं त्याच्या आवाजात केलेलं सोनं. हा चित्रपट पाहताना आपण कुणाबरोबर पाहतोय वगैरे असं होत नाही. 

पिघले नीलम सा बेहता ये समा
नीली नीली सी खामोशिया 



घेऊन जातो तो आपल्याला कुठेतरी "बस एक तुम हो यहां" म्हणत असा कुठला तरी क्षण ज्याने जगायला उभारी दिली, असा कुठला तरी खास मित्र/मैत्रीण जिने त्यावेळी आपल्याला सावरलं. तू हे करू शकतेस म्हणून आपल्याला उठायला मदत केली, कुठलाही संबंध नसताना गुरूप्रमाणे पाठीवर दिलेले हात आणि त्या हाताच्या बळाने मग तशी जवळपास स्वतःची लढाई एकटीनेच लढलेले ते आणि आताचेही दिवस. बरोबर म्हणतोय न तो "अपने होने पे मुझको यकीन आ गया  
एक बात है  होटों तक है जो आयी नहीं
बस आंखो से है जानती
तुमसे कभी मुझसे कभी
कुछ लफ्ज है वो मांगती 

तो पाठीवर पडलेला गुरूचा हात कधीतरी मैत्रीमध्ये बदलला कळलं नाही.  त्याला वयाची बंधन नव्हती. तेव्हा कुठेतरी माझ्या कॉलेजमधले मार्क याविषयी चिंता करणाऱ्या मला, "तुझ्याकडे त्या मार्कांपेक्षा खूप चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे भरपूर कष्ट करायची तयारी", हे सांगून मग माझ्याकडे आलेल्या पहिल्या संधीचं कौतुक त्यांच्या नजीकच्या लोकांकडे करून मला दिलेला आशीर्वाद. मग माझा मार्ग दूरचा पण तरी संबंध तेच. माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांबरोबर माझा आवडीचा black forest त्यांच्या ऑफिसच्या मुलाबरोबर आठवणीने पाठवायचे ते दिवस. खर तर मी त्याला नेहमी "सर" म्हटलं तरी ९९ मध्ये मी त्यांच्या कंपनीमध्ये केलेलं एक प्रोजेक्टच्या वेळचे दिवस सोडले तर आमच्या इतरवेळच्या भेटी म्हणजे निव्वळ मैत्री. ते नाव दिलं नाही दिलं तरी त्यात अंतर आलं नाही.

जब जब दर्द का बादल छाया
जब गम का साया लहराया
जब आंसु पलकों तक आया
जब ये तनहा दिल घबराया
हम ने दिल को ये समझाया
दिल आखिर तू क्यों रोता है

माझ्या प्रत्येक मायदेशवारीत एकदा मी आले आहे हा फोन केला की माझा फोन  नंबर घेऊन जवळ जवळ रोज फोन करून माझी खुशाली घेणारा माझा हा मित्र. यावेळी मी भेटायला गेले तेव्हा नेमकं आणखी एक काम होतं.
"एकटी रिक्षाने कशाला जातेस? आता मुलं गेली की ऑफिस बंद करून मी येतो न तुला सोडायला. फक्त त्र्याऐशी होताहेत आता मला बघ गाडीमध्ये पोटातलं पाणीपण हलणार नाही."
"खरंच? माझे सत्तरीतले बाबापण मला आता थकल्यासारखे वाटतात. राहूदेत तुम्ही मी खरंच जाईन"
"अगं थांब गं. गणेश, आज तू कुलूप लावशील?  मी जरा  हिला स्टेशनला घेऊन जातो."

गाडीमध्ये अखंड बडबड, माझी, माझ्या नवऱ्याची, मुलांची चौकशी. मला कधी कधी अशी माणसं माझ्या आयुष्यात आली याचा हेवा वाटतो. म्हणजे बघा न एक साधं इंजिनियरिंगचं प्रोजेक्ट करणाऱ्या मुलीला एका मिडसाइज टेलीकॉम कंपनीच्या मालकाने इतकं महत्व का द्यावं?
त्यादिवशीच माझं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं कारण लागणारे सर्व कागद मी धांदरटपणे आणलेच नव्हते. मग पुन्हा ते पूर्ण करायची जबाबदारी घ्यायची  तयारी. का ही इतकी निस्वार्थी माणसं जीव लावतात?  त्यांच्याकडे आधीच इतकं आहे की  ठरवलं तरी मी काही करायची गरज नाही.
"सर नको तुम्ही. हे नाही झालं तरी चालेल. उगाच तुम्हाला माझ्यामुळे उशीर."
या ठिकाणी माझ्या शालेय जीवनातल्या खूप आठवणी आहेत. त्या रस्त्यांची वळणं मला माझ्या बालपणात घेऊन जातात. कस कळलं त्याला? गाडी उलट वळवायचं सोडून चल आज थोडं पुढे जाऊन येऊ म्हणून माझा मूक होकार गृहीत धरून आम्ही रस्त्याने पुढे जातोय. नवे बदल माझ्या लक्षात येतील न येतील म्हणून ते मला दाखवले जातात. मध्ये कुठेतरी त्यांच्या आवडत्या pattice वाल्याकडे खायला घाल, घरच्यांसाठी खाऊ आणि मग पुन्हा परत.
का करावसं वाटलं असेल त्याला हे सगळं? आमच्या त्या लॉंग ड्राइव्हला का मला त्याच्याही आयुष्यातले काही जुने प्रश्न, त्यासाठी त्याने केलेल्या तडजोडी मला सांगणं ?
"तू आजकाल परत गेलीस की तुझ्या मुलांमध्ये इतकी बिझी होतेस की  पूर्वीसारखे आपले फोन होत नाहीत, नाही?"
"तसं नाही वेस्ट कोस्ट म्हणजे जगाच्या मागे आहे त्यामुळे वेळेची सांगड घालायचं तंत्र जुळत नाही."
"ह्म्म. थांब मी स्टेशनजवळ गाडी घेतो."
"नको हा नवा उड्डाणपूल चांगला बांधलाय. मी इथून चालत जाईन. या वळणावरून तुम्हालापण बरं पडेल."
मी परत  आल्यावर आम्ही पुन्हा फेब्रुवारीत बोललो. मध्ये माझ्याकडे लक्ष प्रश्न आले आणि हे निवळलं की  फोन करू म्हणून मध्ये इतके महिने निघून गेले.
देवाघरून माझ्यासाठी खास आलेलं आणखी एक माणूस देव घेऊन गेला. त्याच्या माझ्यातला दुवा मीच होते. मला कोण कळवणार की तो गेला म्हणून?
ये जो गहरे सन्नाटे है
वक़्त ने सबको ही  बाटे है
थोडा गम है सबका किस्सा
थोडी धूप है सब का हिस्सा
आंख तेरी बेकार ही नम  है
हर पल एक नया मौसम है
क्यु तू  ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यु रोता है 
एक स्वप्न म्हणून सुरु केलेल्या त्याच्या कंपनीचं कुलूप वयाच्या त्र्याऐशीव्या वर्षी देखील सकाळी साडेसातला स्वतःच उघडणारा हा माझा मित्र. आता मुलगा बाकीचे सगळे व्यवहार पाहतो पण ही factory हेच माझ सगळं काही आहे, माझे वर्षानुवर्ष साथ देणारे कामगार मला रोज पाहतात आणि त्यांना काही हवं नको असेल तर मीच ते बघू शकतो मुलाला तितका वेळ नसेल म्हणून रोज ऑफिसला येणारा माझा मित्र. या माझ्या मित्राला मी रडलेलं  चालेल का? याचा विचार मी करतेय. म्हणजे आईच्याच शब्दात सांगायचं तर ही  वेळ कुणालाच चुकली नाही, चुकणार नाही हे आपल्याला माहित आहे. वय झाल्यावर तर ते अपरिहार्य आहे. आपण रडत बसलेलं  आपल्या आवडत्या माणसाला आवडेल का याचा पण विचार केला पाहिजे. 

मी पुन्हा त्या जिंदगी न मिलेगी दोबाराकडे लक्ष देते… प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या वाटेने आलेला एकच विचार असतो 


दिलों  मे  तुम अपनी बेताबीयां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
नजर मे ख्वाबों की बिजलीया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
जो अपनी आंखो में हैरानिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम 





Thursday, November 14, 2013

त्यांचाही बालदिन

माझ्याकडे अगदी मी शाळेत असल्यापासून लहान मुलांचा ओढा जास्त आहे. शेजारची बाळं आमच्या घरी सतरंजीवर टाकून त्यांच्याशी बोबडं बोलत खेळायला मला मजा वाटे. मग मी दहा वर्षांची असताना मला एक मावसबहीण झाली. मी स्वतः  माझ्या घरात शेंडेफळ असल्याने हे हक्काचं लहान भावंड मिळाल्याचा आनंद मी मनसोक्त घेतला. ती मावशी पण तशी जवळच्या गावात राहत असल्याने तेव्हा जास्तीत जास्त शनिवारी दुपारी शाळा सुटली  की चार आण्याचं हाफ तिकीट काढून जायचं आणि रविवारी दुपारी परत निघायचं असा एक पायंडाच पाडला होता. 


मग माझ्या भाचेकंपनी बरोबर ती चार साडेचार वर्षांची असेपर्यंत माझं लग्नही व्ह्यायचं होतं तोवर खूप मजा करून घेतली. आताही ती मला नावाने हाक मारतात म्हणून मावशी आत्यापेक्षा आमचं नातं जास्त जवळचं आहे. माझी मुलं त्यामानाने माझ्या रागाची देखील धनी होतात. म्हणजे आता हे लिहिताना मला असं लक्षात आलं की मला आवडलेल्या, मी खेळलेल्या इतर मुलांवर मी शक्यतो ओरडणे, रागवणे हे प्रकार सहसा केले नाहीत पण दिवसभरात एकदाही मी माझ्या मुलांवर रागावले नाही अस शक्यतो झालं नाही. असो खर मला आजच्या बालदिनी हे सगळं लिहायचंदेखील नव्हतं. 

गेले काही दिवस फिलिपिन्समधल्या टायफूनच्या बातम्या आपण वाचतोय. त्यासंदर्भात आज एक विस्तृत ईपत्र एच आरतर्फे आलं. त्यात तिकडच्या मुलांचा उल्लेख होता. त्यांचे जवळचे नातेवाईक हरवलेत, त्यांच्या शाळादेखील असून नसल्यागत झाल्यात आणि हे सर्व ज्या वयात त्यांना सामोरं जायला लागतंय म्हणजे खर तर नियतीने केलेला अन्यायच म्हणायला हवं. 
अर्थात निसर्गापुढे माणूस खुजाच. पण आजच्या बालदिनाच्या निमित्ताने आपण अशा काही मुलांना त्यांच्या उर्वरित भविष्याची तरतूद म्हणून काय करायला हव यासाठी त्या मेल मध्ये एक साईट होती तिची लिंक आहे  savethechildren.org
तुम्हाला आणखी काही साईट्स माहित असतील तर तर त्या नक्की कळवा. आजच्या बालदिनी आपण जसा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तसाच याही मुलांचा करुया. 

आणि हो बालदिन म्हटलं म्हणजे आपल्या मुलांबरोबरची मजा तर घायलाच हवी. तुम्ही काय केलतं माहित नाही आम्ही आमच्या १४ च्या रात्री तिकडे आमच्या देशातला आमचा क्रिकेटचा देव, याच्या घरात जायला आम्हाला संधी मिळाली, ज्याला मागच्या रणजीमध्ये वानखेडेला पाहायला आम्हाला संधी मिळाली आणि आज तो त्याचा शेवटचा सामना खेळतोय , त्या सामन्यातली त्याची खेळी आमच्या मुलांबरोबर एन्जॉय केली. आमच्या बच्चेकंपनीने त्याचे पन्नास होताना केलेला जल्लोष. या लिटील मास्टरला माझ्या घरचे लिटील मास्टर्सपण खूप मिस करणार. 
बालदिनाच्या शुभेच्छा. 



Sunday, November 10, 2013

दिवाळी २०१३

एक एक वर्ष येतं जेव्हा प्रत्येक ठिकाणी युद्धभूमीसारखी कामं मागे लागतात. सध्या तरी मी फक्त दिवाळीबद्दल म्हणतेय हो.
या वर्षी माझ्या नव्या घरातली पहिली दिवाळी. खर तर आता पर्यंत निदान सातेक घरं बदलली. मग दिवाळीला ते घर चांगलं कस दिसेल याची तयारी देखील प्रत्येक ठिकाणच्या निदान पहिल्या दिवाळीला तरी  होते. त्यात आमच्या चाळणीत क्रिएटिव्हिटीचे एक दोन खडेही न आल्याने किती काही केलं तरी शेवटी फार उजेड पडणार नाही हे साधारण माहित असतं. यंदा तर आठवडाभर तीन वेळा बिघडलेला कंदील मार्गी लावेस्तो दिवाळीच्या शुक्रवारची मध्यरात्र उलटली. आणि तरी तो संपूर्ण विभाग बेटर हाफच्या ताब्यात आहे.
 
यंदा वर्षभर मित्रमंडळ घरी बोलावता आलं नाही म्हणून दुसरया दिवशी संध्याकाळी डझनभर पोरं, त्यांचे पालक आणि काही नवीन लग्न झालेले असा बराच उरक होता. कामांची यादी वाढत जात होती. तरी या वर्षी दोन्ही घरच्या आई मंडळींनी फराळ वेळेवर पोचावा म्हणून एक आठवडा आधीच पाठवला होता. पण मग त्यातले काही पदार्थ थोडे फार मोडले वगैरे तर ते आपणच खाऊ आणि पाहुण्यासाठी थोडं तरी फराळाचं कराव म्हणून ते मागे होतच.
 
दरवर्षी आणि वर्षातून मध्ये मध्ये मी चिवडा करते त्यामुळे ती कामगिरी आधीच फत्ते करून ठेवली होती. पण यावेळेस सासूबाईंनी येता येता एक मुगडाळीची चकली करायला दाखवून प्रेमाने सोऱ्या दिला होता. त्याच्या आठवण झाली आणि मग चकल्या करायचं ठरवलं.
 
मी आजतागायत माझ्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगात हा प्रयोग खरं तर विविध कारणांनी टाळत होते पण यंदा माहित नाही का पण मुलांना आवडतात आणि आजीच्या चकल्या प्रवासात तुटल्या म्हटल्यावर माझ्यातली आई जर जास्तच जोरात जागी झाली. आणि मग त्या असंख्य टिपा आठवत चकलीची पहिली batch केली. आपल्या चिमुकल्या दातांनी कुडुम कुडुम करत ती मोडून खाणाऱ्या माझ्या पिलांना खाताना पाहून मग  त्यांच्या घरी येणाऱ्या मित्रमंडळीसाठी पण थोड्या करूया असं माझं मीच ठरवलं. आणि मग त्या मंद आचेवर तळणाऱ्या चकल्यानी माझ्या दोन रात्री चकलीमय झाल्या. अर्थात ही कढई पुढच्या gasवर आली म्हटल्यावर असंख्य काम back burner वर गेली हे वेगळं सांगायला नकोच.
 
असो तर अगदी शेवटच्या घटकेपर्यंत घरच्या दिवाळीवर हात फिरवता फिरवता ब्लॉग बिचारा वाट पाहात राहिला. पण असं म्हटलंय न की देवदिवाळी पर्यंत शुभेच्छा दिल्या तरी चालतात म्हणून मी माझ्या सर्व प्रकट अप्रकट ब्लॉगवाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते.
आणि आमच्या घराचा थोडा फार फराळ ठेवला आहे तुमचा इतक्यात संपला असेलच तेव्हा हा थोडा फराळ गोड मानून घ्याल अशी आशा.
 
ही दिवाळी आपण सर्वाना सुखसमाधानाची जावो आणि हे नवीन वर्ष आपणासाठी चागंल्या गोष्टी घेऊन येवो हीच कामना.