Monday, November 14, 2011

स्पर्श

आज चौदा नोव्हेंबर...बालदिनाच्या निमित्ताने मोठ्या वाचकांसाठी ही एक लघुकथा.कुणाच्याही प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग घडू नये हीच अपेक्षा.


_______________________________________________________________________
’आता कुठे बारा वर्षांची तर होतेय.इतकी काय घाई आहे तिला मोबाईल घेऊन द्यायची?’

’अगं, पण जग कुठे चाललंय पाहतेस नं? शिवाय आपल्या आय.टी मधल्या नोकर्‍या.किती बिझी असतो आपणही? ही कुठे अडकली, मुंबईत काय झालं तर निदान संपर्कात तर राहता येईल न?’

’अरे पण तिचं वय?’

’वय-बिय काही नाही.बदलते वक्त के साथ बदलो असं लग्नाआधी कोण म्हणायचं?’ हे संभाषण आता आपलं सासुबाईंपासून वेगळा संसार थाटण्याकडे वळणार असं दिसताच शीतलने आवरंतं घेतलं..’बरं
बघूया', असं समीरला म्हणताना तिला एकदम सानियाचं बाळरुप आठवलं.

खरं तर लग्न झाल्या झाल्या दोघांच्या घरच्या सल्ल्याला न जुमानता चांगली पाच वर्षे थांबून मग जेव्हा मूल व्हायचा निर्णय घेतला तेव्हा निर्सगाने आणखी दोन वर्षे त्यांना थांबायला लावलं त्यावेळीच सगळं सोडून घरी बसायचं असं शीतलने ठरवलं होतं.पण जेव्हा तेव्हा आपल्या लॅपटॉपपुढे बसायची सवय म्हणा किंवा आधीच मोठं कर्ज काढून घर घेतल्याचा खर्चाचा बोजा आता एक बाळ घरात आल्यावर आणखी वाढणार म्हणून म्हणा, बाळंतपणाची रजा थोडी थोडी करुन नऊ महिने वाढवून शेवटी सानियाला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला गेलाच.

कामावरचा ’तो’ दिवस शीतलला पाळणाघरात वारंवार केलेल्या फ़ोनखेरीज आणखी काही केल्याचं आठवतही नसेल. हळूहळू जसजसे महिने उलटत गेले तसं शीतलपेक्षा सानियालाच पाळणाघराची सवय झाली. तिथल्या काकी खरंच खूप जीव लावायचा. तरीही घरी परत आल्यावर मात्र आई आई करणार्‍या सानियाशी खेळताना, तिचा अभ्यास घेताना शीतलचा दिवसभराचा शीण कुठे पळून गेला तेच कळायचं नाही.समीरही जमेल तेव्हा लवकर ऑफ़िसातून येऊन माय-लेकींबरोबर वेळ द्यायचा. महिन्यातले इयर एंडिंगचे दिवस सोडले तर इतर दिवशी त्याला ते जमायचंही. एक मनाला लागलेली थोडी टोचणी सोडली तर सगळं काही नियमीतपणे सुरु होतं.

सानियाच्या जन्माआधी टीम-मेंबर म्हणून काम करणार्‍या शीतलच्या ऑफ़िसमधल्या जबाबदा‍र्‍याही आता वाढायला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून इतरांना मदत करायचा तिचा गुण हेरुन टीम-लीडचं काम तर तिच्याकडे आलं होतंच. हळूहळू जास्तीत जास्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे टास्क्स तिच्याकडे यायला लागले होते. मनातून ती या प्रगतीबद्द्ल सुखावत होती आणि एकीकडे कामाच्या जागचा संध्याकाळचा एक-एक तास वाढत होता.

समीरचंही काही वेगळं विश्व नव्हतं.तोही ऑफ़िशीयली प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळाल्यापासून
 घरी आल्यावरही कुठच्या दुसर्‍या देशातल्या वेळेप्रमाणे कॉन्फ़रन्स कॉल्स, सकाळी लवकर उठून घरुनच प्रेझेंटेशनची तयारी या आणि अशा न संपणार्‍या कारणांमुळे कायम कामाला जुंपला गेलेला असे. त्याला एक काय ती रविवारची सकाळ थोडी-फ़ार मिळायची त्यात अख्खा आठवड्याचं साचलेलं ऐकायचं की राहिलेली झोप पुरी करायची या द्विधा मनस्थितीत समोरच्याने बोललेलं कळायचं तरी का देव जाणे. नुस्तं हम्म, अच्छा, असं का यातले सुचतील ते शब्द टाकून तो मोकळा व्हायचा.

शीतल आणि समीर असे कामात आकंठ बुडल्याने,संध्याकाळी सानियाबरोबर वेळ द्यायचा म्हणून स्वयंपाक-पाणी करणार्‍या रखमाला आता मी येईपर्यंत थांबशील का म्हणून विचारलं गेलं. तिला घरचे पाश नव्हते आणि सानियाही तशी काही उपद्रवी कार्टी नव्हती म्हणून बाईंची अडचण समजून  ती समजुतीने थांबायची. घरात असेपर्यंत जमेल ती कामं उरकत बाईंना आल्या आल्या काही करायला लागू
नये म्हणून हात चालवायची. बाई आपल्याला नोकरांसारखं वागवत नाहीत ही भावना तर होतीच.

पण कुठेतरी काहीतरी कमी जाणवायला लागली होती. आई घरी उशीरा येते हे आतापर्यंत सानियाच्या अंगवळणी पडलं होतं. त्यामुळे शाळेतून  घरी आल्यावर आपला अभ्यास करुन ती सरळ टि.व्ही. नाहीतर गेम्समध्ये रमायला लागली.आतापर्यंत शाळेतला पहिला नंबर तिने सोडला नव्हता म्हणून तिच्या अभ्यास सोडून इतर गोष्टींवर घरातले तिला कुणी आधीपासूनच काही बोलत नसत. आई आली की, ’
सानू  बेटा, चल पटकन जेऊया’, असं म्हणताच ताडकन उठून तिच्याबरोबर जेवायला यायची आणि नेमकं त्याचवेळी आईच्याही नंतर थांबलेल्या कुणा कलिगचा ऑफ़िसमधून  फ़ोन आला की तिचं ते कंटाळवाणं बोलणं ऐकत जेवून  उठून गेलं तरी आईला पत्ताच नसायचा. मग नंतर तर तिने सरळ रखमाला मला खूप भूक लागलीय असं सांगून आधी जेवायला सुरुवात केली. शीतलला वाटलं आपण लेट येतो म्हणून पोर कशाला उपाशी ठेवा. तिने रोज आल्यावर सानू नीट जेवलीय याची चौकशी करायला सुरुवात केली.

समीरला खरं तर आपल्याला अनेक शंका विचारुन माहिती करुन घेणार्‍या लेकीबरोबर रात्री काहीतरी गोड खात बाल्कनीत बसून गप्पा मारायला खूप आवडायचं.पण त्याच्या कामाचं रुटीन पाहून सानियानेच बाल्कनीत बसायचा त्यांचा शिरस्ता मोडून टाकला. ती सरळ आपल्या पांघरुणात शिरुन आवडीचं पुस्तक वाचत बसे. आजकाल या पुस्तकांतील पात्रांशीच तिच्या काल्पनिक गप्पा रंगत. आणि ती तन्मयतेने वाचतेय असं आपल्या मनाचं समाधान करुन समीर पुन्हा आपलं लॅपटॉपमध्ये डोकं घाले. रात्रीची जेवणं होताना आणि जेवणं झाल्यावर या तिघांच्या किलबिलीने इतरवेळी गजबजणारं घर आताशा पिलं उडाली की रिकामी झालेल्या घरट्याप्रमाणे शांत होऊन गेलं. रखमाची ’निघते बाई’ हे अंतिम वाक्य.

असं असलं तरी रात्री झोपताना एकमेकांशी बोलण्याची सवय शीतल आणि समीरमध्ये कायम होती. दोघं एकाच क्षेत्रातली असल्याने आपण खूप बोलू शकतो हे त्यांना वाटे आणि त्यात काही चूक नव्हतं. फ़क्त आपण आजकाल फ़क्त एकमेकांच्या डेड-लाइन्स, ऑफ़िस पॉलिटिक्स, अप्रेजल,टेक्नॉलॉजी याच विषयांवर बोलतो हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसत. अर्धाएक तास किंवा काहीवेळा त्यापेक्षा कमी वेळ बोलता बोलता एकजण हूं हूं करत झोपला की दुसराही झोपून जाई आणि मग सकाळची तारेवर कसरत करता करता काल आपण काही बोललो होतो याची आठवणही येणार नाही इतक्या चपळाईने दिवसाची कामं त्या दोघांचा कब्जा घेई.गाण्याच्या क्लाससाठी निघून गेलेली सानु दोघांच्या दृष्टीने काहीतरी शिकतेय, आपण तिच्यासाठी म्हणून हा सगळा रामरगाडा चालवतोय. ती पुढे जावी हेच आपल्या मनात आहे म्हणून स्वतःची समजुत मनातल्या मनात कधीतरी काढली जाई इतकंच.

त्यातंच सानियाचा बारावा वाढदिवस आला. नेमका रविवार असल्याने यावेळी तिच्यासाठी सुटी काढली नाही याचा सल नव्हता.

’सानिया, चल पार्टीसाठी चायना गार्डनमध्ये जाऊया. येताना फ़्लोट खाऊया. यावेळी तुझ्यासाठी मस्त ब्रॅंडेड जीन्स घ्यायची अगदी तुझ्या आवडीच्या स्टाइलसकट’, बोलताना खूप एक्साइट झालेल्या समीरला सानियाचा थंड चेहरा पाहून, कागदावर छान दिसलेल्या प्रोजेक्ट प्लानला टिम-मेंबरनी डेड लाइनची तारीख पाहून  दिलेला प्रतिसाद आठवला. आता थोडं टीम स्पिरीट वर आणलं पाहिजे...’गाइज, ऑन अवर लास्ट असाइनमेंट विथ द सेम क्लायंट....’ मनात आलेल्या वाक्याने  तो दचकलाच...बापरे...’ओके बेटा, बरं मग तू सांग. काय करायचं यावेळी..मस्त रविवार पण आहे..बोल.’ ’बाबा, मला सेलफ़ोन हवाय. वर्गात सगळ्यांकडे आहे..’ तिला काही उत्तर द्यायच्या आत शीतलला आपल्याला विचारायला हवं हे लक्षात घेऊन समीर शब्दांची जुळवाजुळव करत बसला. अर्थात अप्रेजलला टीम-मेंबरना हाताळायची सवय झालेल्या समीरला सानियाला पार्टीसाठी पटवणं फ़ार कठीण नव्हतं.टोलवाटोलवी हा प्रोजेक्ट मॅनेजरचा गूण घरच्या प्रोजेक्ट्ससाठी पण कामाला येतो हे त्याला माहितही होतं.

शेवटी पार्टी करुन, फ़्लोट खाऊन परत येताना चौपाटीवर फ़िरुन घरी येईपर्यंत सानिया गाडीत झोपूनही गेली होती. त्यानंतर मग रात्री शीतलबरोबर वरचा संवाद रंगला होता.

खरं म्हणजे आता सेलफ़ोनला वयाची अट आणि आर्थिक अडचण ही दोन्ही कारणं राहिली नाहीत हे शीतललाही कळत होतं पण तरी शाळेपासून लेकीच्या हातात तो यावा असं तिला मनापासून वाटत नव्हतं..पण कसंतरी करुन समीरने तिला पटवलंच...हो म्हणायच्या ऐवजी "प्रोजेक्ट मॅनेजर कुठला" असं ती त्याला म्हणाली तेव्हा तोच जास्त हसला होता. बाकी काही नाही पण अचानक संपर्क साधायला सेलफ़ोन हवा या एकाच कारणावर दोघांचं एकमत झालं होतं.शिवाय तू संध्याकाळी लवकर येत नाहीस त्यावेळी एखादा गमतीशीर मेसेज पाठवून तिचा मूड बनवू शकशील, तुमचं कम्युनिकेशन वाढेल, आई-मुलींमध्ये कसं मैत्रीचं नातं हवं, असली मुलामा देणारी कारणंही समीरने दिली होतीच.

सेलफ़ोन आल्यामुळे सानियाला घरात संध्याकाळी एकटं असतानाचा वेळ आता थोडा बरा जायला लागला.शिवाय आईपण सारखे सारखे मेसेजेस करायची.बाबाही कधीकधी तिचा जुना काढलेला फ़ोटो किंवा एखाद्या पुस्तकातलं छान वाक्य पाठवायचा.आई-बाबांशी पुन्हा एकदा मैत्री वाढत होती.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेत मैत्रीणींमध्ये उगीच थोडा खाली गेलेला तिचा भाव पुन्हा एकदा जैसे थे वर आला होता.आता कसं सगळ्यांशी टेक्नॉलॉजीने बोलता येऊ लागलं.आधी तसंही घरचा फ़ोन होता पण आता टाइमपास एसेमेस..शुभेच्छा सगळं मोबाइलवर. आणि मधल्या सुट्टीत त्याबद्दलची चर्चा. शाळेत अर्थात फ़ोन वापरायला बंदी होती. पण व्हायब्रेटमोडमध्ये असलं की कुणाला कळतंय.

आताच दिवाळीची सुट्टी संपली होती आणि शाळेच्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरु झाली होती.बाईंनी सुरेल आवाज असलेल्या सानियाला गायनात निवडलं होतं. त्यासाठी रोज शाळा सुटल्यावर एक तास सराव असे. तीन राउंडमधून एकामागे एक बाद होणारे स्पर्धक पाहून सानियाला थोडं टेंशन आलं होतं. पण तिसर्‍या राउंडला जे तीन विद्यार्थी उरले त्यात सानियाचा नंबर होता. आई-बाबाला ही बातमी तिने 
शाळेतूनच एसेमेस करुन दिली. आई-बाबांचं जवळजवळ लगेच "कॉन्गो सानू" आलं आणि तिला हसू आलं.आता आई-बाबा इथे हवे होते असं तिला वाटलं. पण आज घरी गेल्यावर बोलू असा विचार करुन ती मैत्रीणींच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. त्या शुक्रवारी नेमकं रिलीजमुळे बाबाला ऑफ़िसमध्येच राहावं लागलं आणि आईलाही एका कलिगला लवकर घरी जायचं होतं म्हणून नेहमीपेक्षा उशीर होणार होता.

आई-बाबा सारखे तिला चिअर-अप करणारे मेसेज पाठवत होते आणि तितकीच सानिया अस्वस्थ होत होती. खरं तर इतकी आनंदाची बातमी असूनही तिला जेवावंसं पण वाटत नव्हतं. रखमाला बेबीचं काहीतरी बिनसलंय कळत होतं पण काय करायचं हे न सुचल्याने ती आपली कामं आवरत होती. कंटाळून सानिया आपल्या रुममध्ये जाऊन पडली आणि शीतल घरात शिरली. ’आज बेबीचं चित्त ठिकाणावर नाही’ हे रखमाचं वाक्य तिच्या डोक्यात शिरलं पण आठवडाभरच्या कामाच्या कटकटीने दमलेल्या तिला हा विषय सुरु करायचा नव्हता. शिवाय आज समीरही येणार नव्हता. सानियाच्या दरवाज्याचं दार थोडं ढकलुन पाहिलं तर ती बिछान्यावर झोपलेली दिसली म्हणून तिला उगाच उठवायलाही तिला जीवावर आलं. गाण्याच्या क्लाससाठी सकाळी उठायचं असतं रोज... झोपूदे...असं मनातल्या मनात म्हणून तिनं आपलं पान घेतलं. चार घास घशाखाली गेल्यावर झोपेने तिचाही ताबा घेतला.

समीरचा शनिवारही ऑफ़िसमध्ये जाणार होता म्हणून सानियाला तिचे शनिवारचे सगळे क्लासेस इ.ला न्यायची जबाबदारी शीतलवरच होती. त्या सगळ्या गडबडीत गाण्याच्या स्पर्धेचा विषय राहूनच गेला. रविवारी सकाळी समीर आल्यानंतर मग खास मटणाचा बेत आणि मग लगेच येणार्‍या सोमवारची तयारी करणार्‍या आपल्या आई-बाबांकडे पाहुन त्यांच्याशी काही बोलायचा सानियाचा मूड गेला.पुढच्या शुक्रवारी संध्याकाळच्या कार्यक्रमात तिचं गाणं होतं. हा आठवडा तयारीसाठीचा शेवटचा आठवडा होता.

खरं तर गाणं हा सानियाचा प्राण होता.गाणं आवडतं म्हणून कारेकरबाईंच्या सकाळच्या बॅचला जायचा शिरस्ता तिने आजतागायत कधीच मोडला नव्हता. बाईंबरोबर "सा" लावला की कसं प्रसन्न वाटे. वेगवगळे राग समजावून सांगायची त्यांची हातोटी तिला फ़ार आवडे. त्यांनी शिकवलेल्या सुरांचा पगडा इतका जबरदस्त असे की संध्याकाळी पुन्हा घरी रियाजाला बस म्हणून सांगायला कुणी नसे तरी तिची ती तानपुरा लावुन बसे आणि सकाळची उजळणी करी.

हा आठवडा मात्र ती सकाळी घराबाहेर पडे पण बाईंकडे जायच्या ऐवजी एका बागेत जाऊन नुस्ती बसुन राही आणि आई-बाबा कामावर जायच्या वेळेच्या हिशेबाने ते गेले की घरी परते. संध्याकाळी सरावासाठी पण ती थांबत नसे. बाईंनी याबद्दल विचारलं तर माझ्या गाण्याच्या बाई माझी स्पेशल प्रॅक्टिस घेताहेत म्हणुन चक्क थाप मारली होती.

"hey how is practice " शेवटी गुरुवारी आईचा एसेमेस आला तेव्हा निदान तिला हे माहित आहे असं वाटुन सानियाला थोडं बरं वाटलं. बाबाने तर अख्खा आठवड्यात तिचं गाणं या विषयावर चकार शब्द काढला नव्हता.

"ya ok" बसं आईला इतकंच रिप्लाय करुन सानिया मात्र सेलवर चक्क एक गेम खेळत बसली.

शेवटी शुक्रवार उजाडला. आज संध्याकाळी आई-बाबा आपला कार्यक्रम पाहायला य़ेणार नाहीत याची तिला जवळजवळ खात्रीच होती.गायचाही तिचा बिल्कुल मूड नव्हता.

"Sanu, I am into middle of a work problem" असा आईचा दुपारी आलेला संदेश पाहून सानियाचा उरलासुरला उत्साहही गळाला होता.

पूर्ण आठवडा मूड ठीक नसलेल्या आपल्या मैत्रीणीचं आज काहीतरी जास्त बिनसलंय हे तिच्याबरोबर शाळेत कायम असणार्‍या अर्चनानं ताडलं होतं.पण तरी तिला सरळ विचारुन तिला वाईट वाटावं असंही तिला वाटत नव्हतं. शिवाय वाढदिवसाच्या गिफ़्टचा विषय निघाला होता तेव्हा पटकन सानिया म्हणाली होती तेही तिच्या लक्षात होतं..."मोबाइल न घेऊन सांगतात कुणाला? त्यांना माझ्याशी बोलायला वेळ कुठे आहे?" हे असं याआधी कधी ती आपल्या आई-बाबांबद्द्ल बोलली नव्हती. त्यामुळे उगाच जखमेवर मीठ नको म्हणून ती दुसर्‍याच कुठल्या विषयावर आणि कार्यक्रमांबद्दल तिच्याबरोबर बोलुन तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती.

सानियाला मात्र आजुबाजुला बाकीचे पालक पाहुन कसंतरी व्हायला लागलं. शेवटी तिने आईला सरळ बाथरुममध्ये जाऊन फ़ोन लावला तर नुसती रिंग वाजत राहिली. सानियाचे डोळे पाण्याने भरले. तरी तिने घाईघाईत "aai, where are you?" असा मेसेजही करून ठेवला. कॉल आणि मेसेज दोन्हींपैकी एकाचं तरी उत्तर येईल म्हणून थोडावेळ बाथरुममध्येच ती थांबली.

अखेर पाच-दहा मिनिटांनी अर्चनाच्या हाकेने तिला फ़ोन बॅगमध्ये ठेऊन बाहेर यावंच लागलं. गाण्यासाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांनी स्टेजमागे यावे असा इशारा माइकवरुन देण्यात आला होता. अर्चनाला सानियाचा पडलेला चेहरा पाहवेना. काय करायचं तेही कळत नव्हतं.

आता निर्धाराने स्टेजमागे जायचंच नाही असा निर्णय घेऊन सानिया गर्दीत जायला लागली. इतका वेळ आपल्या बरोबर असलेली सानिया कुठे दिसत नाही म्हणून अर्चनाने थोडंफ़ार शोधलं पण ती दिसतच नाही हे पाहून शेवटचा पर्याय म्हणून गाण्याच्या बाईंनाच सांगायला ती सरळ शिक्षक उभे होते तिथं गेली. बाईंना खरं म्हणजे जास्त काही सांगावं लागलंच नाही. सानियाचा मूड जसा तिच्या प्रिय मैत्रीणीने ओळखला होता तसंच आपल्या लाडक्या विद्यार्थीनीचं काय चाललंय हे बाईंच्याही नजरेत आलं होतं. म्हणून जास्त चर्चा न करता त्यांनी हॉलमध्ये सानियाला शोधलंच. "चल, मी तिला समजावते", असं म्हणून बाईंनी सानियाला शोधून स्टेजमागे नेलंही.

बाईंबरोबर खोटं बोलायची ही पहिलीच वेळ. सानियाला तर रडूच कोसळलं. बाईही कावर्‍या-बावर्‍या झाल्या.तिला एका खुर्चीत बसवून कुणाला तरी पाणी आणायला त्यांनी पाठवलं आणि शब्दांची जुळवाजुळव करु लागल्या.सानियाचं इतके दिवसाचं साचलेपण तिच्या नाका-डोळ्यावाटे सतत वाहू लागलं. नाकाचा शेंडा लाल, कानाच्या पाळ्या लाल, आणि सारखी मुसमुसणार्‍या तिला बाईंना पाहावत नव्हतं. इवल्याशा वयात किती हा कोंडमारा असं त्यांच्या मनात येतंय तोच सानियाची आई शीतल अर्चनाबरोबर धावत धावत तिथे आली.

आईला बघून सानिया आईकडे झेपावली.तिचे पटापटा मुके घेत आईच्याही डोळ्यांना धारा लागल्या. तिला घट्ट जवळ घेत आजूबाजूच्यांची पर्वा न करता शीतलने चक्क सानियाची काही न विचारता माफ़ी मागितली. बाईं सानियाला शोधायला गेल्या तेव्हा अर्चनाने सानियाच्या आईला पुन्हा फ़ोन लावला होता आणि परिस्थितीची कल्पना दिली होती.

'पिलू, आईने तुझ्याकडे किती दिवस पाहिलंच नाही नं? इतके दिवस फ़क्त एसेमेसवरुनच तुझी खबरबात घेत राहिले आणि तुला प्रत्यक्ष जवळ घ्यायला मात्र मला वेळच मिळाला नाही नं? एकदाही घरी तुझं गाणं गाऊन घेतलं नाही...इतकं छान स्पर्धेत गाणारं माझं पिलू पण माझ्यासाठी मात्र मागच्या बाकावर उभं करुन ठेवलेल्या मुलासारखं मी तुला शिक्षा दिली...माफ़ कर गं मला राणी प्लीज...."

आईला अचानक पाहून  आणि त्याहीपेक्षा गेले कित्येक दिवस हरवलेला तिचा स्पर्श मिळताच सर्व काही मिळाल्यासारखे वाटणार्‍या सानियाला स्पर्धेआधीच पदक जिंकल्याचा आनंद झाला होता.अजूनही तिचे डोळे भरुन येत होते पण ते आपल्या आईला कन्फ़ेस करताना पाहून.

या सर्व ताणाताणीत या स्पर्धेत जरी तिची चुरशी झाली नाही तरी यापुढच्या प्रत्येक वाटचालीत तिची आई तिच्याबरोबर प्रत्यक्ष असणार होती हे समाधान खूप होतं आणि अति कामाने यंत्र झालेल्या शीतल आणि समीरसाठी मात्र नियतीने काही कठोर घडण्याच्या आत घेतलेल्या छोट्या परीक्षेतच शंभर टक्क्यांनी उत्तीर्ण व्हायचं होतं....एका छोट्या यंत्रापेक्षा स्पर्शाची ताकत त्यांना या प्रसंगातून पुरेपूर
कळली होती.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आई आणि टीन-एज मुली याबद्दल एक लेख वाचला होता. त्यात ज्यांचे आईबरोबर प्रत्यक्ष संपर्क आहेत आणि ज्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरायचं प्रमाण जास्त आहे या दोन्ही गटांमधलं परीक्षांमधलं यश याबद्दलचे आकडे दिले होते. त्यातली तफ़ावत पाहून त्यातल्या मुद्द्यांच्या आधारे हा विषय कथारुपाने मांडायचा हा एक प्रयत्न...दिवाळी अंकामधल्या प्रतिक्रियांनी खूप छान वाटतंय. ब्लॉग वाचकांनाही ही कथा आवडेल अशी आशा आहे.....



पूर्वप्रसिद्धी - मोगरा फ़ुलला दिवाळी अंक २०११

Saturday, November 5, 2011

एक ओला दिवस

आठवडाभराच्या पावसाने खरं म्हणजे पाऊस या शब्दाचाच कंटाळा येतोय. पण तरी शनिवारच्या सकाळी रात्रभर बरसून दमलेला पाऊस थांबतो आणि हवा मस्त कुंद होते. पाऊस नसतो पण तरी दिवस कालच्या पावसामुळे ओलाच वाटतो. अशावेळी बाहेर छोटा वॉक करायला मला फ़ार आवडतं. थोडा थंड पण तरी फ़ार शहारणार नाही असा वारा वाहात असतो आणि उजवीकडून खाली जाणार्‍या वळणावरुन तो केसांना मागे टाकत पुढे जात असतो. हा वारा क्षणार्धात मला बोरीवलीच्या नॅशनल पार्कच्या गेटशी पोहोचवतो.

आठवडाभर सकाळी उठायचा कंटाळा केला तरी रविवारी सकाळी साडे-सातला गेटवरची हाळी आली की सहालाच जाग येई आणि खिडकीतून पाहिलं की रात्री झालेल्या पावसाच्या आठवणींनी उगवलेली सकाळ दिसे.ही सकाळ माझ्यासाठी तेव्हा खूप खास असे.ज्यांच्याबरोबर मी जंगल वाचायला शिकले, पक्षी ओळखायला शिकले त्यांना माझ्यासाठी थांबायला लागु नये म्हणून मी नेहमी वेळेच्या आधीच पोहोचे. त्यावेळी रेग्युलरली इरेग्युलर असणारी मंडळी आमच्यातही होतीच. पण तरी एकदा गेटवर पोहोचलं की थांबायला लागलं तरी चाले मला.

आता थोड्याच वेळात एकदा का आत गेलो की सिलोंडा किंवा कान्हेरी कुठेही जायचं ठरलं तरी आपणासाठी काही तरी खास असणार आहे याची जाणीव बहुदा माझा पेंशंस वाढवायला मदत करत असावी.

असे किती शनिवार किंवा रविवार याआधी आले होते जेव्हा गेटवर भेटून मग आत दिशा न ठरवता आम्ही भटकलो होतो.त्यातही पावसाळ्यात तर आधी पाहिलेल्या जागा हिरवाई वाढल्यामुळे वेगळ्या वाटायच्या. एकदा का डावीकडच्या नदीतली डॅबचिक, मूर हेन, खंड्या, बगळे ही यादी संपली की कधी कधी चिटपाखरुही दिसायचं नाही.पण शोधायचं ते वेड काही कमी होत नव्हतं. पुढच्या वेळी जास्त प्रयत्न करुयात असं वाटायचं. कधी अचानक एखादी मिक्स हंटिंग पार्टी दिसे आणि मटका लागल्याचा आनंद होई. मग ग्रुपमध्ये असणारा एक्सपर्ट सॅकचे बंद जास्त टाईट करत माझ्यासारख्या नवख्यांना साग्रसंगीत माहिती पुरवी. माहितीचा हा खजिना असाच आपल्यासमोर यावा असं वाटण्याचे ते दिवस.

पावसामुळे आलेला थंडावा आणि बाजुला वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज हे खूप मायावी आहे. अशा वातावरणात जो फ़िरला आहे त्याला माझं म्हणणं नक्की पटेल. आपण त्या तंद्रीत नक्की किती चाललो हे पायांनाही जाणवत नाही. दमणूक म्हणजे काय रे भाऊ हे पार घरी पोहोचल्याशिवाय कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आठवणींनी केलेला कब्जा वर्षानुवर्षांसाठी तसाच राहतो.

अगदी आजचा ओला दिवस मिळाला आणि मी चालायला सुरुवात केली तेव्हा तोच वारा तसाच वाहातोय आणि जणु काही मी नॅशनल पार्कच्या गेटवरुन त्या कुंद वातावरणात चालायला सुरुवात करते. मनात हाच विचार की आज काय दिसणार बरं? मी चालतेय यांत्रिकपणे आणि ते वळण, ती उतरण संपल्यासंपल्या जणु काही माझ्यासाठीच केशरी शालु नेसलेला एक मेपल माझ्यासमोर येतो आणि तंद्री भंग पावते. भानावर यायलाही वेळच लागतो कारण मन पूर्ण मागे अडकलं असतं.

अरेच्च्या,फ़ॉल सुरु झाला नाही? मागच्या वर्षी नाही म्हटलं तरी बाळ पाउलांमुळे या साजशृंगाराकडे अम्मळ लक्ष गेलंच नव्हतं पण यावेळी मात्र इथे सुरु झालेली रंगपंचमी लक्ष वेधुन घेतेय. जायला हवं एकदा सिनिक ड्राइव्हला. कसे असतील बरं नॉर्थ-वेस्टमधले रंग?? आजुबाजुला तर उधळण भराला आलीय. कुठे पूर्ण पिवळा बहर तर कुठे लालम लाल पण जास्त मोहवुन घेतं ते आत्ताच रंगायला सुरु केलेले शेंदरी मेपल.


सृष्टीने हळदीकुंकवाची शिंपडण करावी तसे हे हिरव्यात उगवलेले थोडे फ़िकट शेंदरी रंगातले मेपल. अगदी एकांडा उभा असला तरी लक्ष वेधुन घेतो आणि अख्खी रांग असली तर पाहायलाच नको.
सध्या नेहमी ये-जा होते त्या जवळजवळ सगळ्याच रस्त्यावर रंगांची मस्त उधळण सुरु झालीय.काही ठिकाणी नव्या वस्त्या करताना बहुदा एकाच वेळी अशी झाडं लावली जातात त्यामुळे ती सारी एकाच वेळी रंगात येतात..तिथे जणु काही सृष्टी साजशृंगार करुन सजणाची वाट पाहात असते आणि पाऊसही तिला भेटायला आतुरतेने येतो. आता हळुहळु जास्त वेळ अंधार असण्याचे दिवस येताहेत पण त्याआधी रंगांची मजा घ्यायचे हे दिवस. पावसाने हैराण केलं तरी जमेच्या खात्यात रंगांकडे पाहिलं की मस्त वाटतं.

वारा मला नेऊ पाहात होता माझ्या नॅशनल पार्कात पण हे सृष्टीचे रंग मला नादात राहुनही भानावर यायला मदत करताहेत.कधीतरी वर्तमानातही जगायला हवं नाही या ओल्या दिवसाच्या निमित्ताने.......:)

Saturday, October 29, 2011

मोरोक्कोला जायाचं जायाचं

मागची चकए चष्टगो ज्यांनी आवर्जुन वाचलीय (किंवा आता इथे लिहिलंय तर ज्यांनी नसेल वाचली ते पण बापडे वाचतील) ते म्हणत असतील जीवाचं कॅलिफ़ोर्निया करता करता जीवावर बेतलं आणि मंडळी डायरेक्ट मोरोक्कोच्या गप्पा करायला पण लागली..नाही काही भटकंती प्लान नाही. इन फ़ॅक्ट आता कोणी हरवु नये म्हणून सगळी मिळुन ग्रोसरीला पण एकत्र बाहेर जात नाहीत..ही पोस्ट आहे ती बरेच दिवस डोक्यात असलेल्या पण या ना त्या कारणाने राहुन गेलेल्या खादाडीची.
(म्हणजे खादाडी झालीय पण लिहायचं राहिलंय हो...)

बाहेर खायला जायचं तर चेन रेस्टॉरन्टाऐवजी काही पर्याय आहे का ते आम्ही नेहमी पाहतो. अशा पाहणीत मिळालेलं हे एक मोरक्कन पद्धतीचं रेस्टॉरन्ट. तसं साधारण वीसेक हजार लोकवस्तीच्या आमच्या या गावाचं एक छोटं डाउनटाउन आहे, जिथे थोडं फ़ार खरेदी आणि खाणं करायची सोय आहे. पण त्यात असलेले पर्याय इथे असणारे नेहमीचे फ़ास्ट फ़ूड किंवा इतर चेन म्हणून खरं तर सुरुवातीला कुठे गेलोच नाही. मग आमच्याच गावच्या डाउनटाउन्च्या थोडं एक अलिकडचं वळण घेतलं तर असलेल्या एका छोट्या स्ट्रीप मॉलमध्ये नीट लक्षातही येणार नाही अशा पद्धतीने असलेली एका बोर्डाने बरेच दिवस लक्ष वेधुन घेतलं होतं.त्यात मोरक्कन असं कधी आधी खाल्लं नव्हतं.


कुठल्यातरी शुक्रवारी जेवण करायचा जाम कंटाळा आला आहे या कारणास्तव आणि केव्हापासून इथे जायचंय म्हणून दार-ए-सलामच्या दारात उभे ठाकलो..अरे हो वरच्या नमनात नेमकं नाव सांगायचं राहिलंच...पाहिलं, खायच्या गप्पा करायला घेतल्या की हे असं होतं..असो. तर आत शिरल्या शिरल्याच खास मोरोक्कोहुन आणलेलं फ़र्निचर आणि आतली सजावट आपसूक लक्ष वेधुन घेते.

दारात आल्या आल्या मालकाचं मोठं हसुन ’हाउ आर यु’ आणि जागा असेल त्याप्रमाणे स्थानापन्न झालं की थोड्याच वेळात आपल्यासाठी एका छोट्या प्लेटमध्ये थोड्या हमसबरोबर गरम पिटा ब्रेडचे छोटे त्रिकोणी तुकडे आपलं स्वागत करतात. ते खाता मेन्यु कार्ड पाहायचं. मला नव्या पद्धतीच्या खाण्याच्यावेळी ऑर्डर करताना खाद्यपदार्थाचं थोडं वर्णन केलं असेल तर आवडतं. इथलं डिनर मेन्यु तसं आहे. त्यामुळे "तजिनी"ने माझी उत्सुकता चाळवली. खरं तर ’तजिनी’ हे ज्या कोनाकृती झाकण असलेल्या मातीच्या भांड्यात ती (चिकन किंवा जे काही मांस असेल ते) स्लो कुक केलं जातं त्या भांड्याचं नाव आहे.





इथे बाकीच्या लोकांनी मागवलेल्या तजिनी सर्व्ह केल्या जात असताना ते भांडं प्रत्यक्षात पाहुनही जरा हे आपण मागवावं असं वाटलंच. त्यात इथे नेहमीच्या चिकनऐवजी कॉर्निश हेनचा पर्याय होता. बाजुला भाज्यांचे पर्यायही होते आणि एक फ़ळाची साईड. एकाच डिशमध्ये गार होऊ असं वाटत होतं. माझ्या नवर्‍याला बाहेर कुठे मिळत असेल तर लॅंब शॅंक खायला आवडतात त्यामुळे त्याने ते खायचं ठरवलं.

तजिनी बरोबर काही मुरवलेल्या भाज्या एका ट्रे मध्ये छान सजवुन देतात. या मोरक्कन पद्धतीने मुरवलेल्या किंवा खारवलेल्या चवीच्या तोंडीलावणं म्हणून छान लागतात.विशेष करुन यातलं गाजर मस्त लागतं.आतापर्यंत बाहेर खालेल्ल्या चिकनमधली फ़ार मसालेदार नसली तरी अतिशय चविष्ट चिकन म्हणून मी हिला वरच्या क्रमांकावर नक्कीच ठेवेन आणि स्लो कुकमुळे ती खाताना खूप मुलायम लागते. कधी संपते कळतच नाही. जोडीला पिटा ब्रेड होताच. नवरोबाच्या मते लॅंब शॅंकचं मीट फ़ोर्कने लगेच सुटुन येत होतं. जास्त तिखट खाणार्‍या खवय्यांसाठी तिथल्या शेफ़ची एक खास तिखट काळसर हिरवी चटणी बाजुला मागवता येते चकटफ़ु. आमचं खाऊन ती उरली की पार्सलमध्ये घरी पण येते.



इतकं सगळं खाउन पोट टम्म फ़ुगलं तरी डेझर्टमेन्युवरचा बदाम, ऑरेंज इसेंसवाला बकलावा साद घालत होता. इथली शेफ़ लाडाने त्याच्याबरोबर व्हॅनिला आइस्र्किम आणि एका चॉकोलेट सॉसची नक्षी काढुन सर्व्ह करते की पोटात आपोआपच जागा तयार होते. आणि हे सगळं खाल्लं की मग जायच्या आधी हातावर खास मोरोक्कोच्या इसेंसचा आपल्याकडे चांदीची अत्तर फ़वारण्याची झारी असते तशाप्रकारच्या झारीतून हातावर रोझ इसेंस मारलं की हाताला खूप छान वास येतो. माझ्या मुलाने तर त्याला ते दोन-तीनदा लावायला लावलं. आपल्याकडचा फ़िंगर बाऊल इथे कुठे दिसत नाही तर निदान याठिकाणी हा इसेंसचा पर्याय आम्हाला आवडला आणि मालकाने सांगितल्याप्रमाणे हा खास मोरोक्कोहुन मागवला आहे.



ही आमची पहिली-वहिली ट्रिप इतकी छान झाली की आम्ही नंतर खूप वेळा गेलो हे सांगणे नलगे. त्यामुळे आता त्यांची शेफ़ आणि मालक आम्हाला चांगलेच ओळखायलाही लागलेत की मागच्यावेळी लॅंब शॅकला शिजायला वेळ लागतो म्हणून आधी फ़ोन करुन सांगितलंत तर मी आधी करायला ठेवेन म्हणून मालकाने खास आवर्जुन सांगितलंही. म्हणजे मी लॅंब खात नाही त्यामुळे माझा पण वेळ वाचतो हे लक्षात आलं का त्याच्या माहित नाही पण सोयीचं होतं.

नंतर एक दोनदा लंच पण ट्राय केला. लंच मेन्यु अगदी आटोपशीर आहे. तजिनी वगैरे नाहीच फ़क्त कबाब, गायरो, सॅंडविच हेच पर्याय आहेत. कबाब भात किंवा कुसकुस सॅलडबरोबर घेता येतात आणि हवं असल्यास त्यात जादा पिटा ब्रेड मागवता येतो. कबाबची चव साधारण आपल्याकडे मिळणार्‍या रेशमी कबाब सारखी आहे पण त्याच्याबरोबर तहिनी सॉस असतो. आणि कुसकुस सॅलड थंड असल्याने काहीवेळा कमी आवडण्याची शक्यता आहे. नेमकं मागच्या लंचच्या वेळी आम्ही बकलावा घ्यायचा म्हटलं तर मागच्याच टेबलावर शेवटचा बकलावा विसावला होता. श्या! पहिल्यांदीच आम्हाला पूर्ण ऑर्डर एकाचवेळी न द्यायचा पश्चाताप झाला. त्यामुळे आता पुन्हा एकदा सगळं साग्रसंगीत जेवायला मोरोक्कोला आपलं ते दार-ए-सलामला जायला हवंय...





तळटीप: आत्ताच दिवाळीचं गोड-धोड खाऊन सुस्तावलेल्या जिव्हांना ही चमचमीत खाद्यमेजवानी नक्की आवडेल या अपेक्षेने निषेधाचे बोर्ड स्विकारण्यात येत आहेत....:)

Thursday, October 27, 2011

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा


गेले काही दिवस स्वत:ला सांगतेय कर ग बाई काही तरी सोय कर यावेळच्या पोस्टची...थोडी वेगळी...पण उहुं...काही डोकच चालत नाही....शुभेच्छा तर द्यायच्या आहेत...यावेळी खरं   तर दसरा झाल्या झाल्याच सासरहून निघालेला फराळ वेळेत आलाय (अर्ध्याहून अधिक संपलाय) ...सगळं आहे फक्त चिवडा मी करणार आहे..म्हणजे केला आहे...कधी नव्हे ते नवरा घरी कंदील करायचं म्हणतोय...पण तोही आज उद्या करून अगदी पाहिलं अभ्यंगस्नान झाल्या झाल्या संध्याकाळ पर्यंत कंदील लटकलाही... बाहेर एक छापील रांगोळी पण काढली...काल खूप पणत्या लावल्या आणि मग एकदाचं डोकं चाललं...
दिवाळीसाठी काय वेगळं पाहिजे अजून...दिवाळीची तयारी, फराळ, आणि यावर्षी वेगळं म्हणजे मी काही न लिहिल्यामुळे बहुदा ब्लॉगवर मागच्या दिवाळीची वर आलेली पोस्ट...हाय टाईम मा.म.......:)


ही दीपावली सर्वांना सुख समाधान आणि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...


Friday, October 14, 2011

जंबो,मिकी, वन रुकी, कॅलिफ़ोर्निया.....वॅ वॅ वॅ...

आई-बाबा समल हाये समल हाये म्हनुन किती दिवस सांगतात की आपन कॅलिफ़ोर्नियाला जायचं..मला पन ज्यायचं..कॅलिफ़ोर्नियाला जंबोमध्ये जाताता....मला जंबोमध्ये बशायचं..जंबो हॅंगलमध्ये हाये...


किती सकाली उथवलं आईने..ते पन आम्हाला घ्यायला टॅक्सीवाला आला..मला तिथेच उजुन थोला वेल ज्योपायच्यं होतं पन आईने उचललं...जंबो मस्त उलतो पन माज्ये डोले मित्ले वात्तं...

आता दुस्ल्या जंबोमध्ये बशायचं..पन मला पन ती चाकावाली बॅग पायजे बाबा.....बाबा मी तुजा फ़ेंद नाहीये मी आईचा फ़ेंद हाये..ती मला बॅग पकलायला देते....

नाई, हे कॅलिफ़ोर्निया नाहिये...आई आनि बाबा कशाला हसतात? त्यांना माइतेका कॅलिफ़ोर्नियाला वन उकी असते... ती ती लायटनिंग मक्वीन आनि मेटल...ते कुथे हायेत?? ही तर दुसली गाली आनि हॉतेल हाये...

बाबा, तो बघ मिकी....तो मला जवल नको...मला मिनीबलोबल पन फ़ोतो नको...

बाबा मला डम्बोमध्ये बशायचं...बाबा आता आपन ज्यायचं?? कदी येनार नंबर....आई तू पन ये....लुशांकला आजीकले नको.....

मजा आली...मला उजुन बशायचं....आपन हॉतेलमध्ये ज्यायचं का?

बाबा मला पन तुज्याबलोबल ब्लेक फ़ास्टला यायचं....मला वॉफ़ल पायजे....

आई, ती बग वन उकी आनि मेटल पन हाये........बाबा हो आपन कॅलिफ़ोर्नियाला आलो....:) बाबा मला मक्वीनच्या आतमध्ये बशायचं....लेडियेतल स्प्लिंग कुथाय....मग बाबा आपन पलत यायच्यं??



आई मला या गालीत नको....ते आपल्याला कुथे नेनार? हॉलिवुल कशाला? आई स्टाल वॉक कशाला कलायचा?

मला ही पापा नको मला वलन भात पायजे...बाबा, आई म्हंते ती आईस्क्लिम गेनार...तुला पन पायजे का? आईने मला चॉकोलेतचं दिलं.. ते फ़क्त माझ्यासाथी...बाबा आनि आई उजुन दुकानात काय कलतात..मी आजोबांकडे जातो...आजोबा कुथे....मला दिशत नाहीत ते...पुले हायेत का? कुथे गेले सगले??? पार्किंग लॉतमध्ये आमची गाली कुथे?? आई कुथे?? मला आई पाहिजे??? वॅ..........वॅ..............

ही बाई कोन?? ती मला पलत दुकानात कशाला नेते?? वॅ...........वॅ..............

’आलुष, आलुष’ आई ओलत्तेय....ती माजी आई हाये...मला दिशली..तिच्याबलोबल तो पोलीसमामा काय कत्तो???त्या बाईकडे आई पन ललते आनि मी पन....ती बाई थुप चांगली होती आई ललत ललत बाबाला सांगते...आजी आनि आजोबापन आईला काय काय सांगत असतात....आता आई मला न सांगता उचलुनच ल्हाते...तो द्रायव्हल काय तरी घलं दाखवतो पन ही लोकं कत्ती घेऊन बसलीत....आज रातली पिजा खायचा का बाबा?

बाबा पलत कशाला जायचं....पलत जंबो येनाल? आपल्याला घ्यायला? मला मिकीचा बलुन जंबोमध्ये न्यायचा होता..पन ते जंबोमध्ये बलुनला नेत न्हाइत....बाबा आपन कॅलिफ़ोर्नियालाच लाहुया का??

Monday, October 10, 2011

आंखो में जल रहा है क्यों....

कोई ये कैसे बताये के वो तनहा क्यों हैं..

वो जो अपना था, वो किसी और का क्यों हैं..

यही दुनिया है तो फ़िर ऐसि ये दुनिया क्यों हैं..

यही होता है तो आखिर यही होता क्यों हैं.....



भावनांचा कल्लोळ व्ह्यायचं एक वय असतं आणि त्या वयात ते सगळं नीट समजतही नसतं...अशा वेळी एक मित्र लागतो....या भावनांना वाट करून द्यायला आणि त्याच वेळी तो सारा कल्लोळ शांत करायला...माझा आणि माझ्या सारख्या अनेक मित्र मैत्रिणीचा त्याच्यापेक्षा वयाने बराच मोठा असलेला मित्र.....त्याला एकेरीने हाक मारायची सवलत आम्हाला त्याच्या गाण्यांनी दिली....लोक त्या गाण्यांना गझल म्हणतात आमच्यासाठी मात्र तो आणि त्याची गाणी म्हणजे एक मोठाच आधार ....भावनांना वाट करून द्यायला...त्या समजून घ्यायला...

तू अपने दिल की जवां धडकनों को गीन के बता

मेरी तरह तेरा दिल बेकरार है के नहीं........

हे ऐकलं की वाटतं आपल्यासारखंच कासावीस कुणीतरी होतंय...त्याच्या गाण्यातलं मार्दव, आवाजातला तलमपणा आपल्यालाही हळवं करतो...

"क्या गम है जिस को छिपा रहे हो", असं त्याने म्हटलं की आपण खोटं हसुन आणून साजरे केलेले क्षण आठवतात....आपल्याला मानसिक आधार द्यायला त्याची गाणी पुरेशी असतात म्हटलं तर वावगं ठरु नये..तसंही विश्वासाने सगळं सर्वांना सांगायलाच हवं का?

"जिंदगी धूप तुम घना छाया" आणि "जग ने छिना मुझसे मुझे जो भी लगा प्यारा" हे सांगायला तोच हवा.....

....त्यासाठी आपण प्रेमातच पडायला हवं असं नाही..त्या अडनिड्या वयात काय आवडेल आणि ते आपल्यापासुन हिरावेल काही निश्चित नसतं..पण त्या भावनेला या मित्राच्या शब्दाने दिलेला आधार मात्र सच्चा असतो....

पण मग अचानक " जानेवालों के लिए दिल नहीं तोडा करते...वक्त की शाख से लम्हें नहीं जोडा करते..." असं का बरं म्हटलं त्याने.....माहित नाही हे लम्हे जोडना वगैरे होतं का?? पण आजची बातमी वाचुन माझं मात्र एक फ़ार फ़ार जुना मित्र, नेहमी भावनिक बळ द्यायला ज्याचा आवाज ऐकायची सवय होती तो गेला..शरीराने...त्याच्या गाण्याचा आधार इथेच तसाच ठेऊन.......त्याच्यासाठी हळवं व्ह्यायलाही त्याचेच शब्द लागतात....डोळ्यांना धार लागलीय हे लिहितानाही...

"आखों मे जल रहा है क्यों बुझता नहीं धुआं...

उठता तो है घटासा पर बरसता नहीं धुआं......."

आजकाल माझ्या मुलांना खेळताना पाहताना त्याच्या सहधर्मचारिणीबरोबरचं एक गाणं कायम मनात वाजायचं...

"ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो

भले छीनलो मुझसे मेरी जवानी

मगर मुझको लौटादो बचपन का सावन

वो कागज की कश्ती वो बारीश का पानी.........."


मित्रा, कसं काय जमतं रे तुला वयाच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे साथ द्यायला...खरंच सांगते, मला नाही वाटत माझ्या या मित्राला मी भूतकाळात संबोधणार आहे...कारण मला खात्री आहे त्याच्या गाण्यांनी जितका माझ्या भूतकाळाला आधार दिला, तितकाच तो माझ्या वर्तमानाला आहे आणि भविष्यालाही राहील.......आणि माझ्यासारखेच त्याचे अनेक मित्र-मैत्रीणी हे नक्कीच मान्य करतील.....

Tuesday, October 4, 2011

भोर


बाजूच्या बिल्डींगमध्ये तळाला राहणाऱ्या एका जोडप्याकडे एक काळाभोर कुत्रा आहे...काळाभोर म्हणजे इतका भोर की एक पांढरा केस निघाला तरी पैसा वापस...म्हणायला आम्ही त्या जोडप्याशी तोंडभरून हसतो. त्या दिवशी चक्क दोघं (फॉर चेंज कुत्र्याविना) रोज गार्डनमध्ये गेलो होतो तिथं  हातात हात घालून दिसले. 'मध्ये मध्ये कुत्र्याशिवाय पण फिरत जा ...एकत्र , हातात हात घालून छान दिसता' असं सांगावसं पण वाटलं होतं पण  तेव्हा सरळ  "मौसम" (पिक्चर नाही..आपल वेदर) या  विषयावर  चर्चा  केली..आणि त्यात त्याने आजचा (म्हणजे  ते भेटले तो ) शेवटचा चांगला दिवस म्हणून बातमीपण दिली त्यामुळे गुलाब पाहून बाहेर पडलो होतो तो चांगला झालेला मूड पण अंधारला...
अंधाराला तो असा की आता ही पोस्ट लिहेपर्यंत अंधारूनच आहे...(मनात नाही बाहेर...खर खर...) त्याचे दुष्परिणाम आजकाल लगेच सर्दी आणि खोकल्याच्या रूपाने बाहेरही पडतात...पण तरी आज जरा हिय्या करून थोड बर वाटावं म्हणून जिममधल्या यंत्रांना व्यायाम द्यायचं ठरवत होते...आधी इतकी मोठी दरी झालीय की एक एक गात्र जागं करेपर्यंत बराच वेळ गेला...शेवटी एकदाचे शूज बाहेर काढले तोच तो काळभोर..त्याला नुस्त "भोर" म्हटलं तर बर...
खिडकीतून खाली पाहिलं तर भोर मोकाट दिसला...आणि त्याच्या दोन मिंट मागे मालक  हातात पट्टा घेऊन....भोरला मी जाम टरकून आहे आणि हे त्याच्या मालकाला स्वच्छ सांगितलंही आहे..आणि त्याला मान देऊन मी कधी काळी दिसले तर तो भोरला लगेच पट्ट्यात टाकतोही..(आणि मनात या भागूबाईला भरपूर हसतही असेल..हसो...हसतील त्याचे दात दिसतील..)
खर म्हणजे ऑफिशीयली  आमच्याकडे कुत्रा पट्टा काढून फिरवायला बंदी आहे पण कधी कधी काही लोक अशी कुत्र्याच्या आसपास असताना सोडतात त्यांना...(आणि आमच्यासारख्यांना टरकवतात ) 
आता  भोर समोर आहे तरी यावेळी खाली उतरा, पळापळी..त्याच्या मालकाला त्याला बांधायला लावा इतकी सगळी डोकेफोडी करण्यापेक्षा मी सरळ पुन्हा सगळ्या गात्रांना स्लीप मोडमध्ये टाकून (खर ती आधीच गेली होती वाटतं)  तो वेळ एक ब्लॉग पोस्ट टायपून वेळेचा सदुपयोग करतेय...काही नाही तर थोडा बोटांचा व्यायाम...:)