कालच काही राहिलेलं सामान इथे-तिथे करताना एक अत्तराची रिकामी बाटली हाताला लागली..मला अशा रिकाम्या बाटल्या जमवायचा सोस आहे असं नाही पण का कोण जाणे त्यांच्यातल्या सुवासाची आठवण म्हणून टाकवतही नाहीत मग कुठे क्लोजेट्च्या कोपर्यात नाहीतर एखाद्या बॅगेच्या तळाशी अशी एक एक बाटली ठेवली जाते...कधीतरी नेमकंच तो कप्पा, जागा समोर आली, हलवाहलवी झाली की तिथे ठेवलेली बाटली आपल्या अस्तित्वाने तिच्या वैभवाच्या काळाची आठवण देऊन जाते..
अत्तराची आवड तशी माझ्या आई-बाबा दोघांना आहे पण तरी अगदी लहानपणी अत्तर म्हणजे फ़क्त कुणाच्या लग्नाला जायचं असलं की कपडे घातल्यावर उडवायचं हे जास्त ठळकपणे आठवतं...त्यावेळी अर्थात मॉल्स मध्ये दिसणारी महागडी अत्तरं उर्फ़ परफ़्युम्स, डिओज हे सगळं अवतरलं नव्हतं..त्यामुळे आई-बाबा,छोकरा, छोकरी सगळेच सरसकट घरात असलेली एकमेव अत्तराची बाटली वापरत..आणि त्याने सगळेच एकाच वासाचं वलय घेऊन त्या लगीनघरी पोहोचले तरी कुणालाही त्यात काही वावगं वाटत नसे....
त्यावेळी अत्तर नेहमी नवनव्या बाटल्यांमध्ये घरात येत असंही नसे...पुष्कळदा जुन्या बाटलीत अत्तर रिफ़िल करुन देणारे असत ते स्वस्तही पडत असावं..शिवाय लगे हातो रियुजचं प्रिंसिपलही नकळत वापरलं जाई (हे अर्थात आता गो ग्रीनच्या जमान्यात असल्याने सुचतंय)...आमच्याकडे एक शेजारच्यांचा नातेवाईक होता तो हे काम कुठूनतरी नेहमी करुन आणून देत असे..त्यामुळे ते काका आले की आई नेहमी आपल्याकडची रिकामी अत्तराची बाटली तुझ्या खेळण्यांमध्ये आहे का ते मला लगेचच पाहायला लावी..पण काही काही वेळा ती बाटली नेमकीच मिळत नसे..त्यामुळे मग जर फ़ारच वाटलं तर त्याला त्याच्याच बाटलीत अत्तर भरुन आणायला आई सांगे..त्यावेळी तो थोडे पैसे जास्त घेई असं वाटतं..
माझ्या आठवणीत त्यावेळचं चार्ली हे एकमेव अत्तराचं नाव. आमच्याकडे चार्लीची एक रिकामी बाटली नेहमीच पाहिलेली मला आठवते..आणि ते वर म्हटलेले काका काय कुठल्याही बाटलीत अत्तर आणत आणि हा घ्या तुमचा चार्ली...कधी कधी वास वेगळाही वाटे पण चालायचं हो आता कंपनी मध्ये मध्ये वेगळा लॉट पाठवते असलं काहीही उत्तरही मिळायचं...पण तरी अत्तराची रिकामी बाटली आवर्जुन ठेवली जायची आणि मुख्य म्हणजे एक बाटली काहीवेळा वर्षभरपण चालायची..अजुन एखादं घेऊया असली चंगळ करावीशीपण वाटली नाही..
चार्लीनं बरीच वर्ष राज्य केलं पण ब्रुट-बिट पण आले नंतर..तरी मुलींचं आणि मुलांचं अत्तर वेगळं असतं किंवा असावं हे कळायला फ़ारच वर्षे जावी लागली..मला अजुनही ब्रुट म्हटलं की माझ्या दादरच्या मैत्रीणीचं संतुरच्या गल्लीतलं घर आणि खूप भिजुन घरी पोहोचलो आम्ही गरम पाण्याने अंघोळ झाल्यावर तिने आवर्जुन लावायला दिलेला ब्रुटचा तिचा हात आठवतो...आमच्या दोघींचा खूप आवडता ब्रॅंड होता तो.तो लावुन तिच्या स्कुटी आणि एम-एटीवर सगळी मुंबई अगदी बी.सी.एल.पर्यंतही जाऊन आलो..निव्वळ त्या अत्तराच्या साक्षीने..
मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा पहिल्या पगारात बाबांना अत्तर घ्यावसं वाटलं कारण आता इतक्या वर्षानंतर बाबांना अत्तर सगळ्यात जास्त आवडतं हेही लक्षात आलं.अजुनही बाबांना काय घ्यायचं तर अत्तर हे समीकरण माझ्या डोक्यात पक्कं बसलंय..
जेव्हा पुरुष आणि स्त्रीयांची अत्तरं वेगळी असतात हे कळायला लागलं तेव्हा सगळ्यात वाईट वाटलं कारण त्यामुळे ब्रुट आता लावता येणार नव्हता..त्याबद्दल एक लाडिक तक्रार मी एका मित्रापाशी केली त्यावेळी त्याने मला अत्तराचं भन्नाट लॉजिक नॅशनल पार्कवरुन बोरिवली स्टेशनला चालत येताना सांगितलं होतं. तो म्हणाला सोप्पं आहे अगं तुला ब्रुट आवडु देत नं..फ़क्त तू तो तुझ्या खास मित्राला दे आणि मग that's how you smell it... असो..आता तेवढं धैर्य असेल तर..जाउदे...लग्नानंतर वापरेन ही युक्ती हे मनातलं त्याला न कळता मी मात्र त्याच्या लॉजिकला (आणि अर्थातच इतकं साधं लॉजिक माहित नसलेल्या माझ्या डोक्याला) दाद दिली...

आता तर काय प्रत्येकजण अत्तराच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक होतोय...शॉपर्स स्टॉप मध्ये इथल्या मेसिजसारखे परफ़्युम सॅंपल घेऊन पुतळ्यासारखे उभे असणारी मुलं-मुली आणि चार आकडी अत्तरांच्या बाटल्या घेणारे लोक हे दृष्य खूपच कॉमन झालंय. पुर्वीची आवड आता खतपाणी मिळाल्यामुळे तर्हेतर्हेची अत्तरं माझ्याही कपाटात निवांत पडून आहेत..पण तरी स्पेनच्या ट्रिपच्यावेळी पॅरिस एअरपोर्टवरून नवर्याने आणलेल्या बरबरीला अजुनही इवलु इवलुसं करुन जपतेय...त्यावेळी मला माझा अमेरिकेतला विसा ट्रान्स्फ़र मोडला असल्यामुळे जायला मिळालं नव्हतं पण त्याने अगदी आठवणीत ठेऊन माझ्यासाठी आणलेलं ते गिफ़्ट आहे...त्यातले शेवटचे थेंब कदाचित त्यात तसेच राहतील असंही वाटतं किंवा नुस्त्या बाटल्यातरी...
पण आजची अत्तराची बाटली भेटली, ती होती ती कुणा एका थॅंक्सगिव्हिंगच्या सेलला सियर्समध्ये उगाच २०% डिस्कॉंन्ट होता म्हणून..खरं तर त्यांच्याकडे ओपन सॅम्पलही नव्हतं आणि त्या सेल शॉपिंगच्या गडबडीत बाटली आवडली म्हणून घेतलेलं ते अत्तर. नंतर खरंचही आवडलं आणि मनसोक्त वापरलंही..त्याचा वास मला माझ्या शिकागोजवळच्या नेपरविलमधल्या ऑफ़िसमध्ये घेऊन जातो..मला ते ऑफ़िस का कोण जाणे कधीच आवडलं नाही पण तिथे भेटलेल्या दोन भारतीय मुलींनी मात्र या अत्तराचं नाव आवर्जुन विचारलं होतं आणि मग अत्तरांसाठी नावाजलेला ब्रॅंड नसल्याने मला उगाच अवघडल्यासारखं झालं होतं...आज त्याच त्या जुन्या अदिदासच्या बाटलीने मला मात्र लहानपणीच्या सर्व जणांत एक ते आताच्या एकाकडे अनेक अत्तरांच्या बाटलींच्या राज्यात झकासपणे फ़िरवुन आणलं...