Tuesday, April 15, 2014

कहानी में ट्विस्ट

माझ्या घरात दोन माकडं आहेत. ती घरामध्ये धांगडधिंगा घालत असतात आणि माझ्या डोक्याला काही न काही तरी खुराक लावून देत असतात. ती एकमेकांशी आणि आम्हा दोघांशी भांडतात,मज्जा करतात आणि काही वेळा शाळेतल्या त्यांच्या इतर मित्रांना त्रास देतात. तो त्रास आटोक्यात असेल तर ठीक पण नेहमीचं झालं की मग त्यांची टीचर एखादी नोट पाठवते. हे "लवलेटर" घरात आलं की त्या संध्याकाळी मग मी स्वतःशी विचार करते की आता यांना थोडा आवर घालायचं कसं शिकवायचं. मागे मोठं माकड हरवलं होतं ती गोष्ट तुम्ही वाचली आहे का? इकडेच आहे ती. त्यावेळी मी त्याला त्याच्या आवडत्या थॉमस इंजिनाची एक गोष्ट रचून सांगितली होती. त्यामुळे आता त्याला माझा फोन क्रमांक माहित आहे. म्हणजे त्याने पुन्हा हरवू नये पण अशी चुकामूक झालीच तर तो निदान आपला पत्ता कळवू शकेल. तेव्हा ती गोष्ट ब्लॉगवर टाकायची होती पण आज उद्या करता राहूनच गेली. 

सध्या लहान माकड फॉर्मात आलयं आणि वेळ आली आहे त्याच्यासाठी अशी एक गोष्ट तयार करायची तर ही त्या गोष्टीची गोष्ट. 

खर पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला सर्वांनाच चांगली माहित आहे. माकड, उंदीर आणि मांजर तिघं मिळून खीर बनवतात आणि मांजरीताई एकटीच सगळी खीर संपवते. मग ती "मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी" म्हणताना बुडून जाते. माझ्या सुरुवातीच्या गोष्टीत मी मांजरीला बुडू दिलं नव्हतं कारण मित्र एकमेकांना मदत करतात आणि मित्रांकडे एकमेकांना वाचवायचा उपाय असतो असा काही नवा संदेश मला मुलांना द्यावासा वाटला. (शिवाय मारून टाकणे aka violence चा बागुलबुवा होताच) मग मागचे काही महिने ही गोष्ट आमची लाडकी झाली. जेवणात एक घास जास्ती खाणे किंवा नकळत नावडत्या भाज्या घशाखाली उतरवणे अशी कामं या गोष्टीने बिनबोभाट होऊ लागली. 

परवा या गोष्टीमध्ये सांगताना सुरुवातीलाच असं ठरलं की आज मांजर खीर नुसतीच राखत बसणार, अजिबात खाणार नाही. मग माकड आणि उंदीर गेले आंघोळ करायला आणि मांजर बसली आपली राखत. तेवढ्यात तिथे एक मोठ्ठा हत्ती आला (हत्ती मोठ्ठाच असतो पण माझं छोटं माकड, "हो? एवदा मोथा?" म्हणतं ते पाहण्यासाठी आणि एक घास घशात घालण्यासाठी असे बझवर्ड्स वापरणं जरुरीचं आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच) 

हत्ती म्हणाला," मांजरी ताई, मांजरी ताई मला खीर खायची आहे". मांजर म्हणाली, " अरे पण उंदीर आणि माकड आंघोळीला गेले आहेत तोपर्यंत कुणीच खीर खाणार नाही. मी बसलेय राखण करत. तुला दुसरं काही काम असेल तर ते करून ये." हत्तीने विचार केला या तिघांनी मिळून खीर केली आहे आणि ते ती आपल्याला पण देणार आहेत मग आपण ती फुकट घायची का? (इथे आमची घरची तल्लीन झालेली माकडं मान हलवून नाही वगैरे म्हणताहेत) तो जंगलात गेला आणि त्याला तिथे एक मोठं आंब्याचं झाड दिसलं (इकडे नेहमी न मिळणारे आंबे हे आमच्या घरातल्या तमाम माकडांचं अतिशय आवडतं फळ आहे विशेष नमूद करायला हवं) त्याने चौघांसाठी चार आंबे त्याच्या सोंडेने काढून घेतले आणि तो परत मांजरी खीर राखत बसली होती तिथे आला. 

तितक्यात माकड आणि उंदीर त्यांची आंघोळ आटपून आले आणि त्यांनी मांजरीसोबत हत्तीला पाहिलं. त्यांना पाहून मांजरी म्हणाली, "हे बघा आज आपल्याबरोबर कोण आलं आहे खीर खायला?" हत्ती म्हणाला," मी मांजरीकडे खीर मागितली तेव्हा ती मला म्हणाली की ती तुमच्यासाठी थांबली आहे. मला अशी शेयर करणारी मित्रमंडळी खूप आवडतात म्हणून मी पण तुमच्यासाठी एक गम्मत आणली आहे". असं म्हणून हत्तीने सगळ्यांना एक एक आंबा दिला. मग त्या चौघांनी मिळून खीर आणि आंबे असे दोन दोन डेझर्टस खाल्ले. 

मी - गोष्ट ?
दोन्ही माकडं - संपली… 
मी - मग आपल्याला आज नवीन काय कळलं?
मोठं माकड - नवीन फ्रेंड्स बरोबर शेयल कलायचं. 
मी - मस्त. आणि मित्रांबरोबर बोलताना ओरडून बोलायचं नाही. जर मांजरी सुरुवातीला हत्तीला ओरडून बोलली असती तर कदाचित हत्तीने तिला सोंडेने फेकून दिलं असतं आणि सगळी खीर खाल्ली असती पण मांजरी त्याच्याबरोबर चांगलं बोलली आणि म्हणून त्यांचा काय फायदा झाला? 
मोठं माकड - त्यांना दोन दोन डेझर्टस मिळाले. 
मी - म्हणून मित्रांबरोबर मग ते शाळेत असो शेजारी असो कुठेही असो कसं वागायचं?
लहान माकड - चांगलं वागायचं. 

चांगलं वागायचा हा धडा कितपत चालतो ते लवकरच कळेल. तोवर आम्ही माकड, उंदीर, मांजर आणि हत्ती अशी आमची नवीन गोष्ट वेळ पडेल तशी सांगत राहणार. कधी कधी कहानी  में ट्विस्ट फॉर्म्युला चालतो कधी नाही. देखते है यह कहानी कितना रंग लाती है? 

8 comments:

 1. वा! उत्तम बोधकथा सांगितलीस मुलांना. पारंपारिक कथाच सांगायला हव्या असं कुठे म्हटलंय. तुझ्या कल्पनाशक्तीला बराच वाव मिळतोय. बरं वाटलं. अशाच नवीन नवीन बोधकथा येऊ देत आणखी.

  ReplyDelete
  Replies
  1. आभार कांचन. खरं म्हणजे मुलच बोध देतात आणि नवीन कथा तयार होते. ;)
   ही त्यातलीच. मध्ये आणखी काही होत्या आता लक्षात नाहीएत, पण इथून पुढे या कथा लिहून ठेवायचं लक्षात ठेवलं पाहिजे. विचार कर ही माकडं मोठी होतील तेव्हा त्यांना ही गम्मत सांगताना काय धमाल येईल न ? :)

   Delete
 2. आमच्याकडे बूडबूड घागरीचे हे वर्जन आहे. बाकी कहानी मधला ट्विस्ट आवडला. आमच्या घरी पण सध्या आंबा फ्लेवर डेझर्ट अगदी चपखलपणे चालून जाईल ;-)

  ReplyDelete
  Replies
  1. आभार सिद्धार्थ. तुझं वर्जन दाखवीन मुलांना. हे आम्हाला टेबलवर एकत्र बसून जेवताना सुचतं (किंवा सुचावं लागतं असं म्हणूया) मीच ७ ते ६ घराबाहेर असते त्यामुळे येणारं गिल्टी फिलिंग म्हण हवं तर. वेळ मिळेल तेव्हा धडे देते झालं :)
   आता आंब्याचा सीजन आहे तर लागे हातो आमच्यातर्फे गोष्ट वाटून खाऊया :) (आमरस तुम्हीच देणार आहात)

   Delete
 3. 'अपर्णानिती - एकशे एक कोलाज कथा' :D

  ReplyDelete
  Replies
  1. हम्म कळतात बरं कुजकी बोलणी ;) :D

   Delete
 4. उगाच काहीही...कल्पनाशक्ति शून्य

  ReplyDelete
  Replies
  1. कुणीसं म्हटलं आहे की शून्यातून विश्व निर्माण झालं आहे. शक्यता आहे की त्यावेळी ३ आणि ५ वय असणाऱ्या मुलांचा कल्पनाशक्तीला हे भावलं असेल पण म्हणून ती कल्पनाशक्ती तिथेच गोठेल का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर शोधायला फार बालमानशास्त्र शिकायला नको. :)

   आभार संदीप आणि आपलं या ब्लॉगवर स्वागत.

   Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.