Thursday, May 26, 2011

सवय

अशीच एक कामाची दुपार..थोडी निवांत,थोडी डोकं खाणारी....कॉन्फ़ कॉल सुरु असताना उजवीकडच्या खिडकीतून आपसूक बाहेर पाहिलं जातं. इथुन दिसणारा पार्किंग लॉट खरं तर सकाळीच जवळजवळ रिकामी होतो आणि नंतर वर्दळ सुरु होते ती पुन्हा चारच्या नंतर..या कामाच्या दुपारी कधीतरी दिसणार ते अपार्टमेंटच्या ऑफ़िसमधल्या कुणी त्यांच्या गोल्फ़ कार्टमधुन आलं तर नाहीतर एखादा कुरिअरचा ट्रक क्वचित एखादी कुत्रा घेऊन चालणारी व्यक्ती.

त्यादिवशी अशीच गोल्फ़ कार्ट थांबली आणि आमच्या अपार्टमेन्ट ऑफ़िसमध्ये काम करणारी, सदा हसतमुख असणारी, ठेंगणी ठुसकी आणि नेहमी उंच चपला घालुन(ही) झपाट्याने चालणारी सिंडी दिसली.

आजही नेहमीच्याच घाईत. बहुधा एखाद्या अपार्टमेंटमध्ये नोटीस द्यायला जात असावी. कार्ट पार्क करुन हातात लिफ़ाफ़ा घेऊन झपाझप दोन पावलं टाकली असतील तितक्यात अचानक थांबली. काय झालं बरं असा मी विचार करतेय तोच खाली वाकुन काहीतरी उचलताना दिसली. काहीतरी पडलेलं होतं बहुधा कुणी खट्याळ मुलानं गाडीतून उतरता उतरता टाकलेलं चिप्सचं आवरण. शांतपणे उचलुन ते कार्टमध्ये टाकलं आणि स्वारी पुढे आपल्या कामाला गेली.

खरं तर रोज सकाळी हा सगळा भाग एक कामगार जे काही छोटं मोठं पडलेलं असेल ते उचलुन आणखी चकाचक करुन जातो आणि दुसर्‍या दिवशीही येणार असतो. म्हणजे हा कचरा उचलणं ना तिच्या कामाचा भाग ना तिची जबाबदारी. पण आता दिसला आहे कचरा तर उद्या तो उचलणारा उद्या येईल म्हणून कशाला वाट पहा हा तिचा विचार मला बाकी खूप भावला.

सध्या घरात ’क्लिन-अप टाइम’ इ.इ.ची शिकवण द्यायचा प्रयत्न करतोय आणि खुपदा स्वतःही खूप काम असलं तर शेवटी आवरायचा कंटाळा येतो त्या पार्श्वभुमीवर आपण ज्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्ससाठी काम करतो ते स्वच्छ दिसावं म्हणून कचरा नियमितपणे उचलायची सिंडीची सवय मला मात्र फ़ार लक्षात राहिली.

10 comments:

  1. एखाद्या सध्या कामातून सहजपणे मेसेज दिला जाऊ शकतो हे सिंडी ने दाखवून दिले आहे... माझ्या बाबतीत असा एक किस्सा झालेला मी लिह्नेन कधीतरी... :)

    ReplyDelete
  2. अपर्णा,
    गेल्याच आठवड्यात माझ्या ६ वर्षाच्या मुलीने बागेतला कचरा उचलून कचरापेटीत टाकला. मला खूप आश्चर्य आणि कौतुक वाटलं. खेळण्यात मग्न असूनही तिला ते सुचलं. मी फक्त तिच्याबरोबर जाऊन बाकड्यावर बसले होते पण आजूबाजूचा कचरा उचलून टाकावा असं माझ्या मनातही आलं नाही याची खूप शरम वाटली. मला वाटतं हा एक मुलभूत फरक आहे जो आपण कुठे वाढलेलो असतो त्यावरुन आपल्या वागण्यात भिनलेला असतो.

    ReplyDelete
  3. अपर्णा,

    किती छोटी पण किती मस्त सवय !!! आपण सगळ्यांनीच सिंडीप्रमाणे अशा चांगल्या छोट्या छोट्या सवयी लावून घेतल्या तर खरंच किती छान होईल ना ??

    ReplyDelete
  4. भारतात आपला स्वतःचा कचरा जरी कचरापेटीत टाकला तर खूप स्वच्छता होईल.. :(

    ReplyDelete
  5. खरंय रोहन...तू केव्हा लिहितोस ते सांग आता...वाचायला नक्की आवडेल....

    ReplyDelete
  6. @मोसम, ब्लॉगवर स्वागत..आपल्या मुलीच्या उदा.वरुन तसंच वाटतं.वैयक्तिक स्वच्छतेचा जितका आग्रह धरला जातो तितकाच सार्वजनिक स्वच्छतेचाही धरला पाहिजे आणि आपल्या मुलांना लहानपणापास्नंच ही सवय लावायला हवी...

    ReplyDelete
  7. हो रे हेरंब..मला स्वतःलाही अशा काही चांगल्या सवयी लावून घ्यायला हव्यात...

    ReplyDelete
  8. आनंद, काही महिन्यांपुर्वी मी सिंडीला पाहिलं होतं आणि ते असंच बोलताना आईला सांगितलं त्यावेळी तिने अगदी हेच मला सांगितलं....

    ReplyDelete
  9. कु्ठलीही गोष्ट जेव्हां आपसुक/उत्सुफुर्तपणे आपण/कोणीही करत तेव्हां ती नकळत घडलेली सहज कृती असते. त्यामुळे तीचे श्रम जाणवत नाहीत किंवा आपण काही केले असेही वाटत नाही. मात्र काही चांगल्या सवयी ( ज्या आपल्यात असाव्यात असे आपल्याला तळमळीने वाटते ) त्या आपण अंगी नक्कीच रुजवू शकतो. शिवाय," हे मी का करू " हा प्रश्नच पडणे बंद होईल त्यादिवशी सिंडी सर्वत्र सापडेल. :)

    ReplyDelete
  10. >>" हे मी का करू " हा प्रश्नच पडणे बंद होईल त्यादिवशी सिंडी सर्वत्र सापडेल. :)

    अगदी पटेश श्री ताई... :)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.