Tuesday, October 4, 2011

भोर


बाजूच्या बिल्डींगमध्ये तळाला राहणाऱ्या एका जोडप्याकडे एक काळाभोर कुत्रा आहे...काळाभोर म्हणजे इतका भोर की एक पांढरा केस निघाला तरी पैसा वापस...म्हणायला आम्ही त्या जोडप्याशी तोंडभरून हसतो. त्या दिवशी चक्क दोघं (फॉर चेंज कुत्र्याविना) रोज गार्डनमध्ये गेलो होतो तिथं  हातात हात घालून दिसले. 'मध्ये मध्ये कुत्र्याशिवाय पण फिरत जा ...एकत्र , हातात हात घालून छान दिसता' असं सांगावसं पण वाटलं होतं पण  तेव्हा सरळ  "मौसम" (पिक्चर नाही..आपल वेदर) या  विषयावर  चर्चा  केली..आणि त्यात त्याने आजचा (म्हणजे  ते भेटले तो ) शेवटचा चांगला दिवस म्हणून बातमीपण दिली त्यामुळे गुलाब पाहून बाहेर पडलो होतो तो चांगला झालेला मूड पण अंधारला...
अंधाराला तो असा की आता ही पोस्ट लिहेपर्यंत अंधारूनच आहे...(मनात नाही बाहेर...खर खर...) त्याचे दुष्परिणाम आजकाल लगेच सर्दी आणि खोकल्याच्या रूपाने बाहेरही पडतात...पण तरी आज जरा हिय्या करून थोड बर वाटावं म्हणून जिममधल्या यंत्रांना व्यायाम द्यायचं ठरवत होते...आधी इतकी मोठी दरी झालीय की एक एक गात्र जागं करेपर्यंत बराच वेळ गेला...शेवटी एकदाचे शूज बाहेर काढले तोच तो काळभोर..त्याला नुस्त "भोर" म्हटलं तर बर...
खिडकीतून खाली पाहिलं तर भोर मोकाट दिसला...आणि त्याच्या दोन मिंट मागे मालक  हातात पट्टा घेऊन....भोरला मी जाम टरकून आहे आणि हे त्याच्या मालकाला स्वच्छ सांगितलंही आहे..आणि त्याला मान देऊन मी कधी काळी दिसले तर तो भोरला लगेच पट्ट्यात टाकतोही..(आणि मनात या भागूबाईला भरपूर हसतही असेल..हसो...हसतील त्याचे दात दिसतील..)
खर म्हणजे ऑफिशीयली  आमच्याकडे कुत्रा पट्टा काढून फिरवायला बंदी आहे पण कधी कधी काही लोक अशी कुत्र्याच्या आसपास असताना सोडतात त्यांना...(आणि आमच्यासारख्यांना टरकवतात ) 
आता  भोर समोर आहे तरी यावेळी खाली उतरा, पळापळी..त्याच्या मालकाला त्याला बांधायला लावा इतकी सगळी डोकेफोडी करण्यापेक्षा मी सरळ पुन्हा सगळ्या गात्रांना स्लीप मोडमध्ये टाकून (खर ती आधीच गेली होती वाटतं)  तो वेळ एक ब्लॉग पोस्ट टायपून वेळेचा सदुपयोग करतेय...काही नाही तर थोडा बोटांचा व्यायाम...:)

Wednesday, September 21, 2011

गाणी आणि आठवणी १० - सखी मंद झाल्या तारका

सप्टेंबर २००६ मधला एक विकांत....नुकतंच घर घेतलं होतं आणि माझ्या मैत्रीण कम्पुमधल्या आम्ही चौघी एकाच देशात होतो..त्यातली एक तर फक्त तीन महिन्यासाठी होती...दुसरी तळ्यात मळ्यात आणि बाकी आम्ही दोघी तशा थोड्या आधीपासून अमेरिकेत होतोच.......मध्ये २००३ पासून एकमेकींचा संपर्क फक्त मेल आणि कधी तरी फोनवर होता...त्यातल्या एकीच लग्न झालं होतं पण अजून तिचा नवरा प्रत्यक्ष भेटला नव्हतं...त्यातल्या त्यात मी फिली, एक डीसी आणि दुसऱ्या दोघी नवीन योर्कात असल्यामुळे मी मध्यस्थी म्हणून एक विकांत भेटूया असं ठरलं ...
कुणाचे ५० % ,कुणाचे आणखी किती करता सगळ्या १००% वर आल्या आणि त्या सप्टेंबरमध्ये भेटलो...एकच रात्र होती...त्यात जीवाची फिली करून रात्री दमून आल्यावर पण त्या वर उल्लेख केलेल्या मैत्रिणीच्या नवऱ्याला जाम उत्साह होता म्हणून त्यानेच केलेल्या कॉफीचे कप घेऊन मस्त बैठक मांडून गप्पाची मैफल रंगवली...
लग्न झाल्यानंतरचे दिवस, त्यातले प्रत्येकाचे प्रश्न, एक ना दोन किती तरी विषय...आम्हा सर्वात तो नवखा आहे असं अजिबात वाटलं नाही...आणि मग कुठली मराठी मंडळी जमली की विषय गाण्याकडे वळतोच तसं आमचही झालं..

आपलीच लोक म्हटल्यावर प्रत्येकानेच सूर लावले...त्या दिवशी खूप सुंदर सुंदर मराठी आणि फक्त मराठीच गाणी आम्ही आठवली ...जमतील ती गायली आणि मग अचानक त्याने मला बाबुजींच त्याचं सर्वात आवडतं गाणं घेऊया का म्हणून विचारलं...ते गीत होत "सखी मंद झाल्या तारका....."

हे गाणं माहित तर होतच, पण त्या दिवशी गाताना त्याची सगळी कडवी माझ्या पूर्ण लक्षात आहेत असं अचानक मलाच साक्षात्कार झाला.त्याला पण आश्चर्य वाटलं...त्या दिवशी फक्त सुरुवात केली की लगेच शब्द पुढे यायचे...खरच ती रात्र खूप वेगळी होती...ती दादही...त्यासाठी आपला आवाज उच्च कोटीचा असायला हवा असं काही नाही...बस ती एक मेहफिल असते जी जमून जाते...
त्या निमित्ताने एखादं गाणं आपल्याला नव्याने भेटतं तसंच झालं..यात खूप काही आलापी नाहीत पण तरी "आता तरी येशील का?" हा प्रश्न खूप व्याकुळपणे विचारला आहे असं वाटतं...पहिल्या तीन कडव्यात थोडी पार्श्वभूमी तयार करून मग शेवटच्या कडव्याला "बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी...पण सांग तू येशील का?" हे सूर चढतात तेव्हा त्या सखीचा हेवाच वाटतो....
खरं म्हणजे हेच काय बाबूजींच्या कुठल्याही गाण्याबद्दल काही बोलावे असं निदान माझं तरी काही कर्तृत्व नाही पण तरी या गाण्याची आठवण लिहावीशी वाटते ती त्या दिवशी सूर जुळलेल्या आम्हांसाठी..
काय योगायोग आहे माहित नाही...त्या दिवशी आय पॉडमधल्या मराठी फोल्डरमध्ये randomly ऐकताना नेमक हेच गाणं लागलं आणि चटकन तीच रात्र आठवली...ते ऐकताना मनात आलं या सप्टेंबरमध्ये पाच वर्ष होतील....
आता पाहिलं तर आम्ही पुन्हा एकदा वेगवेगळ्या देशात आहोत...त्या नंतर ती आणि तिचा नवरा आम्ही फक्त एकदा भेटलो..पुन्हा कधीच न भेटण्यासाठी...एक नातं न बोलता विरून गेलं...बाकीच्या मैत्रिणीही पुन्हा एकदा मेलामेलीत आल्या...माहित आहे मला आम्ही पुन्हा कधीच एकत्र भेटणार नाही....त्याला कारणंही वेगवेगळी असणार आहेत...पण नसलो भेटणार तरी एक गाणं आहे माझ्याकडे जे मला त्या नितांत सुंदर विकांताची, आणि एकत्र गायलेल्या गाण्याची सुंदर आठवण नेहमीच सोबतीला देणार आहे.......

Monday, September 5, 2011

पुन्हा एकदा हूड हूड

ओरेगावात प्रथम आल्यावर मारे कौतुके माउंट हूड माउंट हूड म्हंटल आणि मग जिथून तिथून तो दिसतो म्हणून ब्लॉगवर लिहायचं राहिलं...पण त्याला विसरले नाहीये..मागच्या दीड वर्षात त्यानंतर खरं तर तो बऱ्याचदा दिसला..इथे आसपासच्या फिरतीच्या बऱ्याच जागा आता पायाखालून गेल्या आहेत...प्रत्येक वेळी नवी जागा मिळाली की असं वाटतं इथून जास्त छान दिसतो मग काढा फोटो आणि नाही काढला तर पुन्हा आहेच की 'परत येऊ रे एक दिवस'..



फक्त आता थोडी (माझ्या मुळात गोल असणाऱ्या) भूगोलात आणखी भर पडलीय ती म्हणजे अश्या प्रकारे जवळजवळ वर्षभर बर्फ असणारा इथे फक्त हूडच नाही तर त्याचे अजून चार मित्र आहेत...पैकी तीन मित्र आमच्या शेजारच्या म्हणजे वॉशिंग्टन राज्यात आहेत पण या दोन राज्यात मुख्य कोलंबिया नदीने घातलेल्या डिव्हायडरमुळे ते ओरेगावाच्या पोर्टलॅंड शहरातूनही तितक्यात जवळ असल्यासारखे दर्शन देतात. हे मित्र म्हणजे माउंट सेंट हेलेन्स, माउंट रेनीअर, माउंट अडाम्स आणि माउंट जेफरसन. पैकी माउंट हेलेन्स आणि हूड पोर्टलॅंड शहरात जा ये करायच्या मुख्य रस्त्यावरून प्रसन्न दिवशी नक्की दिसतात..

माउंट हेलेन्स तसं बाजूच्या वॉशिंग्टन राज्यात येतो आणि याबाबतीत खास सांगण्यासारखं म्हणजे या बऱ्यापैकी जागृत असलेला ज्वालामुखी आहे. १८४० आणि १८५० नंतर मे १९८० ला याचा सर्वात शेवटचा उद्रेक होऊन त्याची राख पोर्टलॅंड शहरावर पसरली होती. अगदी आतापर्यंत म्हणजे २००८ पर्यंतही याच्या तोंडाशी काही ना काही हालचाल सुरु असलेली नोंद केली गेली आहे..


माउंट रेनीअरहाही वॉशिंग्टन राज्यात असलेला तिथला सर्वात उंच १४००० फुटापेक्षा जास्त उंच आणि जास्त प्रमाणात ग्लेशिअल बर्फ असलेला आणि International Association of Volcanology and Chemistry of the Earth's Interior च्या पहिल्या सोळा डेंजरस डोंगराच्या यादीत असलेला पर्वत..अतिशय क्लिअर दिवस असतो तेव्हा पोर्टलॅंड तसंच जवळंच (पाच तास ड्राइव्ह) असणार्‍या कॅनडातील व्हॅन्कुव्हरहूनही दिसतो..


माउंट अडाम्स हाही असाच जागृत ज्वालामुखीवाला पर्वत. मुळात अनेकदा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेले अनेक कोनाकृती आकार बाजूने दिसत असेल तरी विमानातून दिसताना थोडा फार रेनीअर सारखं वाटणारा कारण त्याचा वरचा भाग सपाट असल्यासारखा दिसतो. सल्फर असल्याच्या आशेने खाणीसाठी याचा वापर होईल का म्हणून इथे एक ट्रेल करून थोड फार उत्खनन करण्यात आलेला या भागातला हा एकमेव डोंगर आहे.










 













माउंट जेफरसन हा अमेरिकेच्या माझी राष्ट्राधक्ष्याच्या नावाने असलेला ओरेगावातलाच उंचीने क्रमांक दोनचा बर्फाच्छादित पर्वत ज्यावर खरं जास्त संशोधन झालं नाहीये पण यावरचा ज्वालामुखी अगदी अलीकडे १९७४ मध्ये जागृत झाला होता. आम्ही कधी इथे सागरकिनारी गेलो आणि येताना कोरव्हालीस म्हणून एक गाव आहे त्यामार्गे आले की हूड आणि जेफ़रसन भावाभावासारखे दिसत राहतात..












 











मागच्या वर्षात कोलंबिया नदीकाठच्या नितांत सुंदर रस्ता(scenice by way) फ़िरयला नेहमी जायचो तिथे एका information center मध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे शेरार्ड व्ह्यू पॉइन्ट केला त्यावेळी अचानक स्वर्ग गवसल्याप्रमाणे हे पाची मित्र एकाच ठिकाणी पाह्यला मिळाले...सगळ्यात प्रथम गेलो होतो ते मागच्या फॉलमध्ये...जायचा रस्ता म्हणजे आणखी एक डोंगर (लार्च माउंटन) आहे. वळणं वळणं घेत एका बाजूला चिनारची उंच झाडे आपल्या उंचीला येत पाहत वर गेलो की पहिले तर हूडहुडीच भरते..

मग गाडी खाली लावून आणखी एक पाव मैल दमछाक करून चढल की एका चौथर्‍याला फ़ेन्सिंग करुन ज्या दिशेला जो डोंगर दिसणार तिथे त्याच्या माहितीचे दगडी फ़लक आहेत. जर स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस असेल तर वर चढल्या चढल्या डोळ्यात भरतो तो माउंट हुड आणि दृष्टी वळवावी तसे त्याचे इतर भाऊबंदही टप्प्यात येतात. या ठिकाणी आणखी एक खास लक्षात येणारी गोष्ट म्हणजे इथे असलेली निरव शांतता.काही न बोलता फ़क्त हे डोंगर आणि त्याखालचं पाइनचं गर्द अरण्य डोळ्यात, मनात साठवुन घ्यावं.





इथुन खाली उतरताना निसर्गाच्या समृद्धीला जसा सलाम करावासा वाटतो तसंच कौतुक करायला हवं थॉमस शेरार्ड या फ़ॉरेस्ट सुपरवायजरचं , ज्याने असे काही पॉइंन्ट्स सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्याचं प्लानिंग केलंय...

Tuesday, August 30, 2011

एका रेसिपीची गोष्ट

मुदलात ’फ़कस्त एक खादाडी’ इतकं महत्व असलेल्या या गोष्टीचा इतका बाउ (किंवा पोस्ट) करण्याइतकं काय झालं हे कळण्यासाठी मला ही गोष्ट सांगण्याआधी थोडं जरा या पोस्टसाठी कारण असलेल्या काही पात्रांचा परिचय करुन देणं आवश्यक आहे.(जमल्यास असतील तिथे लिंकापण द्यायचा प्रयत्न करेन पण नाहीच दिल्यात तर शिव्या पडू नयेत म्हणून एक कंस आधीच देऊन ठेवतेय...)

१. माझी आई - जिच्या वाढदिवसासाठी म्हणून मी हे खास स्वतः काहीतरी नवीन पदार्थ करण्याचं मनावर घेतलं (नाहीतर आई इथे असताना आमचं डिपार्टमेंट खाणार्‍यांचं)

२. श्रीताई - हो तीच ती सरदेसाईंच्या ब्लॉगवर इमाने इतबारे रेसिप्यांचं गाजर टाकुन लांब राहून आमच्यासारख्यांच्या निषेधाची मजा लुटणारी माझी मैत्रीण आणि त्यातुन अगदी अलिकडेच टाकलेली ही पोस्ट..(खरं म्हणजे पात्र म्हणून तिची पोस्टच देणार होते पण मग तिला निषेध करायची ही पोस्टसंधी वाया गेली असती नं...:D)

३ सुहास - हो तोच तो झेल्यांचा..रात्रपाळीमुळे रात्री आणि नेहमीप्रमाणे दिवसा असं चरत राहुन मग वर त्याच्या ब्लॉगवर ते टाकुन आम्हाला जळवण्याची खोड असलेला कार्टा..आता हा कारणीभूत, कारण काल नेमका एक बझ मी टाकला होता त्यावर याने खादाडी पोस्टेची फ़र्माईश करुन नवी खादाडी करायचा किडा डोक्यात सोडून दिला.

४. ऋषांक - धाकटं पिलु वय ९ महिने फ़क्त. ज्याचं आगमन या ब्लॉगवर जाहिररित्या आधीच झालंय. पण मुदलात वरच्या सर्व कारणांपेक्षा याने मला शनिवारच्या पहाटे साडे-पाच पासून उठवल्यामुळे "वेळ नसतो" ऐवजी ’बापरे साडे सातच वाजलेत काय करु?’ मुळे मी ती रेशिपी फ़ायनली करायला घेतली आणि मग ही पोस्ट लिहायला मला पुराव्या (वाचा: फ़ोटु) सकट कारण मिळालं...

आणि लाश्ट बट नॉट द लिश्ट...

५. फ़ॉलोअर्स उर्फ़ नेहमीचे यशस्वी वाचक - काल एकदम लक्षात आलं की सव्वाशे फ़ॉलोअर्स झाले आहेत.मग त्यांना ब्लॉगवरच एक छोटी ट्रिट देऊन जाहिर आभारप्रदर्शन का करु नयेत..म्हणून हे सगळं ब्लॉगवर मांडायचं कारण म्हणजे योगायोगाचा कहर आणि अर्थात मायबाप वाचकांचे आभार मानायची संधी हे आता वेगळं सांगायला नको.



हां तर कुठे आपण होतो ती रेसिपी...वाचली आणि अर्थातच वेगळी असल्यामुळे आवडली..नेहमीप्रमाणे करायलाच हवी (अशा खरं म्हणजे बर्‍याच खादाड्या आहेत लिस्टवर पण...) अशी मनातल्या मनात नोंद करुन ठेवली. अर्थात आईचा वाढदिवस आज असल्याचं लक्षात आलं आणि त्यातही श्रावणी शनिवार म्हणजे तिच्यासाठी काही करायचं तर ते शुद्ध शाकाहारी (नशीब तरी यंदा सगळे उपास नाही करत आहे ते...नाहीतर वादिलाच उपास...) म्हणून विचारचक्र सुरु होती पण तरी काही फ़िक्स होत नव्हतं. शेवटी केक आणि तोही शाकाहारी म्हणून फ़ायनल केलं आणि लढाईला आपलं ते श्रीताईचं डोकं खायला सुरुवात केली. ती पण बिचारी माझ्या फ़ाल्तुतल्या फ़ाल्तु शंकापण अगदी सविस्तर उत्तरं देत होती...म्हणजे याविषयी मी केलेल्या एक मेलचं तिचं खाली डकवलेलं उत्तर पाहिलं तर कळेल.

एका नॉर्मल साईज वाटीला ( आपली मायदेशातली वाटी घेणारेस की इथला छोटा काचेचा बाऊल? ) फ्राय पॅन मिडियम साईज चा घे. छोटा ऑमलेट पॅन लहान पडेल. माझ्याकडेही कॉईलच आहे ना... सो पाच वर ठेव सुरवातीला ... ( मिडियम हाय वर ) आणि सातआठ मिनिटे झाकण ठेव. नंतर झाकण काढून टाक कारण झाकणाचे पाणी पडत राहील म्हणून. केक कॉईलवर ठेवून इकडे तिकडे जाऊ नकोस. पटकन लागू शकतो. हा केक फार झटकन होतो सो समोरच थांब. कडा सुटू लागलेल्या तुला दिसतील आणि वासही सुटेल मग पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेव म्हणजे मधला भाग पक्का शिजेल. ओलसर ( मॉईस्ट ) राहायला हवा पण पिठाचा ओलेपणा अजिबात नको. जनरली केक साईडने पटकन शिजतो आणि मधे ओला राहतो म्हणून पुन्हा एकदा झाकण ठेव. टुथपिकने टोचून पाहा मधला भाग कोरडी निघाली तर झाला. लगेच कॉईलवरून उतरवून थंड व्हायला ठेव. गार झाल्याशिवाय कापू नकोस. काही अडले तर विचार.
माझा पॅन १० इंच व्यासवाला आहे.


आता ही मेल आणि तिची पोस्ट इतकं दोन खिडक्यांमध्ये सुरु करुन मी (वर म्हटल्याप्रमाणे लेकाने लवकर उठल्यामुळे साडे सातलाच) केक करायला बसले खरं तर उभे राहिले म्हणणं जास्त चांगलं ठरेल. म्हणजे आधीच अपार्टमेंटची स्वयंपाकघरं इतकी बेतशीर असतात की त्या मोठ्या स्पार्टेकच्या लाद्या असतात तशा आडव्या तीन आणि उभ्या साडेचार म्हणजे डोक्यावरुन पाणी. त्यात आमच्या किचनमध्ये मुलाला आयत्यावेळी उच्चासनावर बसवलं की आपली कामं होतात म्हणून ठेवलेली हाय चेअर म्हणजे एकदा स्वयंपाकाला सुरुवात केली की शेवटपर्यंत उभंच..अगदीच लक्षात आलं तर ती हाय चेअर बसायला घेतली जाते पण अशी नवी निगुतीची रेसिपी असली की कुठं बसायला सुचतंय..असो..



तर नशीबाने लागणारं साहित्य सगळं सोपं आणि नेहमी घरी असतंच पैकी होतं त्यामुळे ते घेतलं. पण तरी तिचं १० इंच म्हणजे नक्की कुठला या प्रश्नाने का कुणास ठाऊक पण डोकं खाल्लं..म्हणजे लहान झाला तर केक उतु जाईल आणि मोठा झाला तर त्याची मारवाडी लोकं करतात तशी रोटली होईल ही भिती म्हणून गुगलुन पाहिलं तर त्यांच्या इमेजेसने इतकं काही कळत नव्हतं..मेले पॅनच्या उलट्या बाजुला दुनियाभरचं काय काय छापलं असतं तसं फ़क्त किती इंच टंकायला काय होतं देव जाणे हा एक जावईशोधही लावला पण तरी पाचेक मिन्टं माथाफ़ोडी करुन माझ्याकडच्या तीन पॅनपैकी मधला निवडला. श्रीताईनेही तस मिडीयम म्हटलं होतं ते पहिल्यांदीच डोळे उघडे ठेऊन वाचुन त्याप्रमाणे का नाही केलं पण माहित नाही बहुतेक सुटीच्या दिवशी खूप लवकर उठावं लागलं की डोकं जरा जास्त चालतं आणि काय?

चला पॅनचा प्रश्न मिटला, रवा,साखर आणि दही भिजवण्यासाठी डोकं कितीही चालवलं तरी काही वेगळं करण्यासारखं नसतं म्हणून नशीब.



त्यानंतर खरं तर चांगला अर्धा तास माझ्याकडे होता. त्यात थोडी ऋषांकची कामं केली आणि आणखी एकदा रेसिपी तिच्या मेलमधल्या सुचना नजरेखालुन घातल्या...म्हणजे आता काय फ़क्त सगळ्या पायर्‍या पाठ व्हायच्या बाकी आहेत इतकं सगळं माहित झालं होतं आणि मी उरलेल्या गोष्टी करायला घेतल्या. इतक्या सकाळी रेसिपी करते म्हणून श्रीताईला अजिबात फ़ोन करायचा नाही हे अगदी पक्कं केलं होतं. झालं एकदा केक पॅनमध्ये गेला आणि गॅस सुरु करुन मी पुन्हा तिच्या पत्रात डोकं घातलं अच्छा समोरच थांब म्हणून घड्याळही पाहिलं आणि पाच मिनिटांनि झाकण ठेवेन म्हणून तेही हातात घेतलं.

झाकण ठेवताना का कुणास ठाऊक थोडा गोंधळ झाल्यासारखा झाला..आणि मी पुन्हा एकदा रेसिपीकडे वळले.बापरे....खतरनाक....लागली वाट....अगदी रन्स काढताना दोघा खेळाडूंना एकाच बाजुला जावं लागतं तेव्हा पुन्हा सुलट बाजुला आउट होण्यासाठी धावणार्‍या खेळाडूला कसं वाटत असेल अगदी तस्संच....म्हणजे झालं असं की रेसिपी म्हणते एक लोखंडी तवा ठेवा आणि त्यावर केकचा पॅन..मी पत्र आणि रेसिपी वाचण्याच्या नादात त्या लोखंडी तव्याला पूर्ण विसरलेच होते..इन फ़ॅक्ट सुरुवातीला जेव्हा मी तिच्या पोस्टवर वाचलं होतं तेव्हा निव्वळ माझ्याकडे असलेल्या लोखंडी तव्याला निदान त्यासाठी तरी वापरता येईल म्हणूनही या रेसिपीला याददाशमध्ये ठेवलं होतं पण तिने मला नेमका त्याचवेळी दगा दिला आणि झालं आता काय म्हणजे उरलेल्या वेळासाठी तवा ठेऊ की या रेसिपीमध्ये डायरेक्ट तवा ठेवला तरी कॉइलचा गॅस असल्याकारणास्तव होते म्हणून नवा शोध लावु या द्विधा मनस्थितीत निव्वळ आईच्या वादिच्या दिवशी प्रयोग नको म्हणून शेवटी रेसिपीच्या मालकिणीलाच विचारण्यासाठी फ़ोन लावला. आणि अक्षरशः दोन मिन्टं पण नाही तिचा जास्त वेळ घेऊन तिची पण झोपमोड नको म्हणून विचारलं, ’मी तवा लावायला विसरले नाहीच लावला तर काय?’ बहुधा उडालीच तिची झोप ’अगं जळून जाईल’ ओके ओके लावते मी आता म्हणून ठेवलाच फ़ोन आणि लगोलग तवा लावला आणि आधी झाकण उघडून केकची सद्यस्थिती पाहिली. तसा फ़ार वाईट दिसत नव्हता म्हणजे तिने तिच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे कडा सुटायला लागल्या होत्या पण रंग जरा करपट दिसायला लागला होता..



आता म्हणजे अक्षरशः आलीया भोगासी वृत्तीने मी पाचेक मिन्टात चेक करेन (किंवा तसंही कुणी उठलं नाही आहे तर परस्पर विल्हेवाट लावेन )असा विचार करुन शेवटी बसले एकदाची...पण रेसिपीच्या मालकिणीला कुठे झोप लागायला..त्यातुन हा केक मी आईला सरप्राईज म्हणून करतेय तर तिला माझी काळजी असणारच..पाचव्या मिन्टाला माझा फ़ोन परत वाजला.

"लावलास का तवा"

"हो गं..पण आता हा झाला कसं कळणार? म्हणजे तुझ्याइतकं केशर नसेल घातलं मी बहुधा..ते मिश्रण होतं तसंच दिसतंय़.."

आता माझं सगळं वाचन सपाट झालंय हे तिलाही कळलं असेल..

"तू टुथपिक घातलीस का?"

"अरे हो राहिलीच...अगं सगळीकडून नीट बाहेर येतेय...आणि वीसेक मिन्टं झाली ना गं..."

"बापरे वीस मिन्टं...तू पहिले तो गॅस बंद कर"

"पण तसंही लोखंडी तवा नंतर तापला असेल नं...मग?? बंद करुन तसाच ठेवु का?"

"अं...ह्म्म....चालेल तसं..पण तू गॅस बंद कर..आणि आता थंड होईपर्यंत बिल्कुल हात लावु नकोस.."

ही अल्मोस्ट धमकीच असणार...."ह्म्म"

"आणि कळव मला कसा झाला ते"

"ओके बाय"...

असो शेवटी हळुहळू घरातली मंडळी उठली...आईला खरंच सरप्राइज होतं....मध्येच तिने कसलातरी वास येतो म्हणून विचारलं...तेव्हा फ़क्त चांगला की वाईट असं विचारुन मी आपलं थोडं चाचपुन घेतलं...पण तिने चांगला सांगितल्यामुळे हुश्श...आता थंडही झाला होता आणि पॅनमधुन सुळकन बाहेरही आला (क्रेडीट गोज टू सुरुवातीचं दणादण गॅसवरचं शिजवणं असं मला वाटतं..) पण आता ही पोस्ट लिहेपर्यंत केकचा कणही उरला नाहीये...एक वेगळा पदार्थ म्हणून सगळ्यांनी आवडीने खाल्लाय.फ़क्त रव्याचा केक मी कधीच केला नाहीये त्यामुळे तो तसा मैद्यासारखा लुसलुशीत नसतो हे थोडं सांगावं लागलं...पण ओव्हरऑल आजची सकाळ धमाल होती...

तसंही निव्वळ आयतं कोण देणार आपल्याला, म्हणून स्वयंपाकघरात प्रयोग करणारे आम्ही दोघं काहीना काही नवे अनुभव (वाचा:शोध) घेतंच असतो..पण आजची गोष्ट मात्र जरा हटके..शिवाय बॅटिंगला मी एकटीच...त्यामुळे लिहुन ठेवावीशी वाटली...

आज सव्वाशे फ़ॉलोअर्स आणि ही पोस्ट वाचणारे नवे-जुने वाचक यासाठी हे फ़ायनल प्रॉडक्ट...आभार....



तळटीप: ही गोष्ट खरं म्हणजे मी ज्यादिवशी हा बझवर सुसंवाद झाला त्यानंतर लगेच म्हणजे २० ऑगस्टला लिहीली होती. पण नेमकं त्याच्या दुसर्‍या दिवशी आम्ही फ़िरायला जाणार म्हणून कधी नव्हे ते वेळेवर कॅमेरा क्लिन करताना बेटर हाफ़ने फ़ोटो उडवले आणि खादाडीची गोष्ट फ़ोटुविना टाकवेना म्हणून थोडं थांबुन आज टाकली आहे...यंज्व्याय...

Saturday, August 6, 2011

मैत्रीचं नातं....

कॉलेजमध्ये असताना बरं असतं, नातेवाईकांची भूणभूण मागे लागली की मग मैत्री हे कसं सगळ्यात सर्वश्रेष्ठ नातं आहे...we can choose our friends इ. गोंडस वाक्यांनी आपण ते अधिक गोजिरं करतो पण खरंच आहे का तसं हे तपासण्याची वेळ केव्हा नं केव्हातरी याही नात्यात येतेच आणि मग महत्वाचं कुठलं रक्ताचं की मैत्रीचं? हा प्रश्न थोडं खिन्न करुन जातो.

मागे माझी एक मैत्रीण अमेरिकेतल्याच तिच्या कामाच्या जागी थंडी, जास्त माणसं नाहीत या आणि अशा अनेक कारणांनी कंटाळली होती. मग मी तिला म्हटले सुट्टी किंवा घरुन कामाचा पर्याय असेल तर माझ्या घरी ये आठवडाभर. आरुषचा जन्म व्हायच्या आधीचा शेवटचा महिना होता म्हणून मीही घरीच होते. मलाही सोबत आणि तिलाही चेंज..अर्थात अगदी आयत्यावेळी नेमकं तिला कामावरुन सुटता आलं नाही आणि ही भेट शेवटी कायमसाठी राहिली. जरी त्यावेळी त्या प्रोजेक्टचा ताबा तिच्याकडे होता तरी तिला कसं निसटता आलं नाही हा प्रश्न मला पडला होता पण मी माझ्याच मनाला समजावलं की तुला सोबतीपेक्षा तिची नोकरी जास्त महत्वाची आहे.

नंतर पुलाखालून थोडं-फ़ार पाणी वाहून गेलं. कंटाळून ती परत मायदेशीपण गेली आणि आता एक दिवस ती पुन्हा इथे एक महिन्यासाठी येतेय असा संदेश आला. तेही कामासाठी नाही तर भाच्याला पाहण्यासाठी मस्त एक महिन्याची सुट्टी काढून.मला पुन्हा एकदा आनंद झाला.म्हटलं आता यावेळी एखाद-दोन दिवसाची धावती भेट इथेही दे. मी तसंही घरून काम करते. अर्थात हे होणार नाही हे मला चांगलंच माहित होतं आणि त्याचं कारण म्हणजे खरं तर मी तिच्या स्थळापासून बरीच दूर आहे आणि इतक्या अवास्तव अपेक्षा मी ठेवल्याही नसत्या.पण...तरी हा पण आहेच...निदान एक फ़ोन इतकी साधी अपेक्षा मात्र मी ठेवून बसले होते...आणि मग जेव्हा तितकाही वेळ तिला मिळाला नाही असं दिसायला लागलं तेव्हा न राहवून मीच फ़ोन केला. मला वाटतं तोवर तिला परत जायलाही एक-दोन दिवस उरले असावेत. का कुणास ठाऊक न कळत मी माझ्या मनात साचलेलं थोडंफ़ार बोलुन गेले. आम्ही चांगल्या मैत्रीणी आहोत त्यामुळे तिनेही मला फ़ोनवरतरी उलट काही झापलं नाही. आमच्या मैत्रीलाही या संवादामुळे कुठलाही धक्का पोहोचला नाहीये. पण एक मात्र खरं मी पुन्हा त्या सुरुवातीच्या we cannot choose our relatives च्या लुपमध्ये गेलेय.

मायदेशात गेलं तर हे अनुभव नेहमीचेच असतात. मागे इथे माझ्या नवर्‍याची एक मैत्रीण आली होती. जवळ म्हटलं तरी दीड तासाचं ड्राइव्ह. पण आम्ही अगदी जाऊन तिला आणलं. नेमकं मुलाचा पहिला वाढदिवस त्यामुळे खूप गडबड होती पण तिला वेळ दिला. त्यात फ़क्त परत जाताना स्वतः जायच्या ऐवजी पार्टीतलं कुणी तिच्याच भागात जात होतं त्यांच्याबरोबर पाठवलं तर तिच्या चेहर्‍यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. आणि त्यानंतर आम्ही गेलो तेव्हा मात्र बाईसाहेबांना भेटायला यायला मुंबईतल्या मुंबईत आमचा मुक्काम सेंट्रल-वेस्टर्न असा वेगळ्या लाइनीवर होता तर जड गेलं आणि नंतरच्या मायदेश दौर्‍यात तर स्वतःहून फ़ोन करायचंही सौजन्य नाही. काय म्हणायचं या मैत्रीला?

खूप उलट-सुलट विचार केला की वाटतं, कितीही नाही म्हटलं तरी रक्ताचं नातं म्हणून ज्या काही adjustments केल्या जातात त्या सगळया मैत्रीसाठी किती जणं करतील? अगदी मला स्वतःला इथे खूप कंटाळा येतो म्हणून माझ्याकडे मी जर कुणाला राहायला बोलावलं तर तो येईल? की त्यांच्या सख्ख्या भाऊ-बहिणीकडे ही परिस्थिती असेल त्यासाठी सगळ्या कामाच्या आणि घरगुती adjustments करुन जाईल?? उत्तर स्पष्ट आहे. मग का आपण असं उगाच म्हणतो की मैत्रीचं नातं वेगळंच म्हणून? वेगळं म्हणजे जिथे अपेक्षा जरी नाही ठेवल्या तरी त्यांची पूर्ती करण्यासाठीची तशी गरज नसते असं काहीसं आहे का?

अर्थात सगळीकडेच असं नसतं..म्हणजे वर म्हटलेले प्रसंग आहेत तसेच त्याच्याच विरोधी घडलेल्या घटनाही आहेत..तरीही जितकी जास्त लगबग रक्ताच्या नात्यांसाठी केली जाते तितकं लक्ष काहीवेळा मैत्रीकडे दिलं जातं का? किंबहुना हा आपला मित्र/मैत्रीण आहे म्हणजे नातेवाईकांसारखं तो काही आपल्यावर रागावणार नाही असं थोडं taken for granted मत बरेचदा असतं..आपणही मैत्रीमध्ये तेवढं माफ़ करतो आणि विसरुन पुन्हा मैत्री जोडतो कारण मैत्री ही नेहमी हवीहवीशी असते.

नवनवीन मित्र-मैत्रीणी जोडले जातात. माझ्याकडून ते सर्व माझ्या संपर्कात राहतील असे प्रयत्न मी नेहमीच करते..आता तर इमेल, सोशल नेटवर्किंग साइट्स, नेट, चॅट यासर्वांमुळे संपर्क करणेही सुलभ झालंय. पण तरी कुठेतरी जर कम्युनिकेशन गॅप आली की मग अंतर पडू लागलं की मग ते नातं पुन्हा जोडणं कठीण होतं; तसं होऊ न देणं याचा आपण नेहमीच प्रयत्न करावा असं आजच्या या आंतरराष्ट्रीय मैत्री दिनी स्वतःलाच सांगावंस वाटतं..

लहानपणी एकदा शाळा बदल,मग घर बदल आणि त्यानंतर कॉलेजमध्येही बारावीतलं कुणी माझ्याबरोबर असं नव्हतं. त्यामुळे नाही म्हटलं तरी "लंगोटीयार" का काय म्हणतात ते मला नाहीत. पण तरी आतापर्यंतच्या वाटचालीत भेटलेल्या मैत्रीचा मोठा गोतावळा आहे..हा ब्लॉग सुरु केल्यानंतर ब्लॉगमुळेही बरेच नवे मित्र-मैत्रीणी मिळाले...वेगवेगळ्या वेळी भेटलेल्या या सर्वांचं मोल माझ्यासाठी खूप आहे. त्या त्या काळासाठी त्यांचं माझ्याबरोबर असणं महत्त्वाचं आहे.अशा सर्व मित्र-मैत्रीणींना मैत्री-दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....

HAPPY FRIENDSHIP DAY !!!

Wednesday, July 20, 2011

दर्द से मेरा..............


असं म्हणतात, नदीचं  मूळ आणि ऋषीचं  कुळ शोधू नये...यामागे काही वेगळा अर्थ असावा का असं कधी कधी उगाच वाटतं आणि मग एखादी प्रचंड हादरा देणारी घटना घडून जाते...कधी आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असतो कधी दुरून..पण तगमग तीच...दूर असलं की जास्त विचार,जास्त काळजी आणि शरम पण...त्यानंतर आणखी एकदा पुन्हा तशीच घटना घडते आणि मग आपण मागे मागे जातो ...प्रत्येक वेळचे संदर्भ शोधायचा  प्रयत्न करतो...घडलेल्या घटनेचे घाव ताजे असतील तर ही मागे जायची तगमग आणखी वाढते...
सुरुवात होते ती आत्ता ताज्या असलेल्या घटनेचे दुरून पाहिलेले रूप..बापरे इतकं सारं घडून गेलं आणि मी काय करत होते...
तो अख्खा दिवस कामात लक्ष लागत नाही, आपले माहितीतले सगळे ठीक आहेत न आणि अशाच चौकश्या...आणि नाहीत ओळखीचे पण म्हणून काय झालं त्यांचंही एक कुटुंब आहे, आयुष्य आहे, इच्छा सगळं सगळं आहे.......चौकटी मोडताहेत...त्याचं दु:ख दाटून येतंय....आठवडा होतोय.......आणि सगळं जवळ जवळ तसच...विस्कळीत....पुन्हा कधीही काहीही होणार हे माहित असलं तरी न थांबलेलं...न बदलेलं....

लताचा दर्दभरा स्वर उगाच या वातावरण दाटून राहिला आहे असं वाटत राहतं...  

                                     दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला...
                                     फिर चाहे दिवाना कर दे या अल्ला..

मग पुन्हा आधीची वेळ, लख्ख आठवणीतली........मागच्या वेळी तर अगदी समोरच सगळं घडलं....आपण काय करू शकलो??? काहीच नाही....त्याआधी... पुन्हा दूर...जवळचा मित्र ती गाडी चुकल्यामुळे वाचला....आपण काय करू शकणार आहोत??? काहीच नाही...हे विचार आहेत की छळ सुरु आहे मनाचा स्वत:शी....लताचा सूर एक आर्त मागणी करतो आणि हा छळ वाढतो...

                                    मैने तुझसे चांद सितारे कब मांगे 
                                    रोशन दिल बेदार नजर दे या अल्ला...

त्याआधीची वेळ पहिलीच होती अशी स्वत: तिथे नसण्याची....लताच्या सुराची बेचैनी जास्त वाढते.....

                                    सूरजसी एक चीज तो हम सब देख चुके
                                     सचमुच की अब कोई सहर दे या अल्ला...

त्याआधी जायचं तर एक मोठीच मालिका.....एक दोन ठिकाणी स्वत:ही असू शकलो असतो.....नव्हतो म्हणूनचा निश्वास नाही पण हे असं मागे मागे जाणं आता झेपत नाहीये....धाप लागतेय.....गुदमरायला होतंय.....शेवटी कुणाचाही असला तरी जीवच तो ....तो जायची वेळ अशा प्रकारे का यावी त्यांच्यावर....
                                 
नदीचं मूळ, ऋषीचं  कुळ नकोच शोधायला....हे सगळं का सुरु झालं???नकोय काही कारणं....थांबवा हे सगळं...आसमंत भारून ठेवलेला लताचा स्वर आता ठाम वाटतोय...


                                    या धरती के जख्मो पर मरहम रख दे 
                                    या मेरा दिल पथ्थर कर दे या अल्ला.................................................




Friday, July 8, 2011

वाळूच्या नंदनवनी...

फिरायची आवड दोघांनाही....मिळत नाही तो वेळ....सारखं कामं एके कामं करून कुठे जायचं याच प्लान्निंग पण करता येऊ नये असं झालं की खरं तर आणखी खट्टू व्हायला होतं... पण एखादा दिवस असाही यावा, जास्त नाही फक्त राहायची सोय करावी आणि मग ठरवूया काय पहायचं ते....तसच निघालो यावेळच्या उसातल्या स्वातंत्र्यदिनी उसाटायला..बरोबर दोन छोटी मुलं आणि आईला पण गाडी (कधीकधी ) लागते म्हणून फार लांब नाही फार जवळ नाही...pacific कोस्टात...स्पेसीफिकली सांगायचं तर ओरेगावच्या दक्षिण किनारी...(आयला उसात भटकंती केल्यापासून दिशा, मैल एकंदरीत भूगोल आणि इतर बरेच गोल गोल असलेले विषय पण हातासरशी वेगळे व्हायला लागलेत..)

'फ्लोरेंस" दक्षिण किनारपट्टीतला नितांत सुंदर गाव....तसं पाहायला गेलं तर सगळ्या pacific नॉर्थ वेस्टला निसर्गाने भरभरून दिलेलं सौंदर्य आहे...आता पर्यंत ज्या ज्या वेळी इथे भटकलोय प्रत्येकवेळी नवा मोती हाताला लागतो...हा अथांग किनारा आणि त्याच्या प्रत्येक गावी दिसणारं प्रशांत महासागराचं लोभसवाणं रूप..अहाहा....बाकी काही नाही पण इथल्या निसर्गाच्या जाम प्रेमात आहे मी...माझ्या उसातल्या आतापर्यंतच्या वास्तव्यातलं सगळ्यात सुंदर राज्य हेच आहे....निसर्गाने खूप दिलंय आणि तुलनेने नवी वस्ती असल्याने ते बऱ्यापैकी जपलंही गेलं आहे...कुठे जायचं तर कुठेही हे उत्तर जास्त समर्पक ठरेल इतकी विविधता आहे...
यावेळी फ्लोरेंसला यायचं मुख्य कारण शांतपणे घराबाहेर कुठेतरी आराम करणे हे असलं तरी कुठल्याही नव्या जागी गेल्यवर तिथली स्पेशालिटी काय आहे म्हणून थोडा फार शोध होतोच..तसच हॉटेलच्या रूममधल्या माहिती पुस्तिका पाहिल्यावर sand दुनेस च प्रकरण हाताशी लागलं..हॉटेलपासून फार लांबही जायचं नव्हतं म्हणून सकाळी आरामात निघालो आणि पोराटोरांना घेऊन फिरण्याजोगी बगीराईड होती ती करायचं ठरलं...बगी कसली मोठा बगोबाच होता तो आणि त्याचे टायर चक्क विमानाचे होते..आणि तिथे आणखी बरीच ATV मध्ये मोडणारी वाहने दिसत होती...आता उत्कंठा वाढू लागली...

आमच्या चालक कम गाईड बॉबने स्वागताचे दोन शब्द बोलून थोडीफार माहिती दिली..ती ऐकताना समोर गाडीने वळण घेतल आणि हळू हळू वाळू दिसायला लागली...पुढे काय बर असेल....

अबब केवढी ही वाळू....आणि त्यावरून झपाझप जाणारी आमची बगी...

बॉबने सांगितल्याप्रमाणे ही वाळू ग्लेशियर वितळले तेव्हा त्याबरोबर आलीय आणि जगातली (अमरिकेत असं वाचलं तरी चालेल कदाचित...कारण जग या शब्दाची अमेरिकेतली व्याख्या थोडी वेगळी आहे न..) सगळ्यात बारीक वाळू हीच आहे...
त्याच्या मते लाखो वर्षे सूर्य, वारा आणि ओरेगावातला स्पेशल पाऊस यांचा परिणाम म्हणून इतकी बारीक वाळू इतर कुठेही आढळत नाही...
प्रशांत महासागराला समांतर साधारण चाळीसेक मैल पसरलेले हे वाळूचे डोंगर काही काही ठिकाणी समुद्रसपाटीपासून  साडे चारशे ते पाचशे फुटापर्यंत उंच आहेत...त्याने आमची गाडी अशा काही डोंगरावरून घसरवली तेव्हा आम्हाला पण ते जाणवलच...आरुषने तर भोकाड पसरून मला शाळेत (वाचा पाळणाघरात ) जायचं म्हणून सांगितल...(भीक नको पण कुत्रा आवर ते हेच का असं त्यावेळी पण माझ्या मनात चमकून गेलं) 


या पूर्ण परिसरात वरच्या फोटोमध्ये दिसतात तशी बरीच तळी आहेत (किती ते आता विसरलेय) आणि समुद्राच्या इतक्या जवळ असूनही यातलं पाणी गोड आहे....(कारण तेच ग्लेशियरच पाणी अशी बॉबची टिपण्णी) 




आता हे असं वाळूचं नंदनवन मिळाल्यावर लोकांनी खेळ मांडला नाही तर नवलच नाही का? वरचा फोटो सरळ आहे ती गाडी वर चढतेय फक्त...




या आणि अशा प्रकारच्या खेळांचा थरार अनुभवायचा असेल तर जायलाच हवे...


आणि जर स्वतः चालवणार नसलं तर ही वरच्या फोटोमधली पिवळी गड्डी आहेच...आमच्या बगोबापेक्षा ही जास्त जोरात जाते त्यामुळे आणखी थरार...
हाच आमचा बगोबा..टायर पाहिलेत किती मोठ्ठाले आहेत ते.....


आणि हा वरचा फोटो म्हणजे ग्रांड फिनाले का काय म्हणता येईल ते..ही बगोबा ट्रीप झाल्यानंतर याच भागच आम्ही विमानातून दर्शन घेतलं...त्यात दिसतंय मैलोन मैल पसरलेलं वाळूचं नंदनवन आणि त्यात धमाल मस्ती करणारी माणसांची बेटं...