Wednesday, July 20, 2011

दर्द से मेरा..............


असं म्हणतात, नदीचं  मूळ आणि ऋषीचं  कुळ शोधू नये...यामागे काही वेगळा अर्थ असावा का असं कधी कधी उगाच वाटतं आणि मग एखादी प्रचंड हादरा देणारी घटना घडून जाते...कधी आपण त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार असतो कधी दुरून..पण तगमग तीच...दूर असलं की जास्त विचार,जास्त काळजी आणि शरम पण...त्यानंतर आणखी एकदा पुन्हा तशीच घटना घडते आणि मग आपण मागे मागे जातो ...प्रत्येक वेळचे संदर्भ शोधायचा  प्रयत्न करतो...घडलेल्या घटनेचे घाव ताजे असतील तर ही मागे जायची तगमग आणखी वाढते...
सुरुवात होते ती आत्ता ताज्या असलेल्या घटनेचे दुरून पाहिलेले रूप..बापरे इतकं सारं घडून गेलं आणि मी काय करत होते...
तो अख्खा दिवस कामात लक्ष लागत नाही, आपले माहितीतले सगळे ठीक आहेत न आणि अशाच चौकश्या...आणि नाहीत ओळखीचे पण म्हणून काय झालं त्यांचंही एक कुटुंब आहे, आयुष्य आहे, इच्छा सगळं सगळं आहे.......चौकटी मोडताहेत...त्याचं दु:ख दाटून येतंय....आठवडा होतोय.......आणि सगळं जवळ जवळ तसच...विस्कळीत....पुन्हा कधीही काहीही होणार हे माहित असलं तरी न थांबलेलं...न बदलेलं....

लताचा दर्दभरा स्वर उगाच या वातावरण दाटून राहिला आहे असं वाटत राहतं...  

                                     दर्द से मेरा दामन भर दे या अल्ला...
                                     फिर चाहे दिवाना कर दे या अल्ला..

मग पुन्हा आधीची वेळ, लख्ख आठवणीतली........मागच्या वेळी तर अगदी समोरच सगळं घडलं....आपण काय करू शकलो??? काहीच नाही....त्याआधी... पुन्हा दूर...जवळचा मित्र ती गाडी चुकल्यामुळे वाचला....आपण काय करू शकणार आहोत??? काहीच नाही...हे विचार आहेत की छळ सुरु आहे मनाचा स्वत:शी....लताचा सूर एक आर्त मागणी करतो आणि हा छळ वाढतो...

                                    मैने तुझसे चांद सितारे कब मांगे 
                                    रोशन दिल बेदार नजर दे या अल्ला...

त्याआधीची वेळ पहिलीच होती अशी स्वत: तिथे नसण्याची....लताच्या सुराची बेचैनी जास्त वाढते.....

                                    सूरजसी एक चीज तो हम सब देख चुके
                                     सचमुच की अब कोई सहर दे या अल्ला...

त्याआधी जायचं तर एक मोठीच मालिका.....एक दोन ठिकाणी स्वत:ही असू शकलो असतो.....नव्हतो म्हणूनचा निश्वास नाही पण हे असं मागे मागे जाणं आता झेपत नाहीये....धाप लागतेय.....गुदमरायला होतंय.....शेवटी कुणाचाही असला तरी जीवच तो ....तो जायची वेळ अशा प्रकारे का यावी त्यांच्यावर....
                                 
नदीचं मूळ, ऋषीचं  कुळ नकोच शोधायला....हे सगळं का सुरु झालं???नकोय काही कारणं....थांबवा हे सगळं...आसमंत भारून ठेवलेला लताचा स्वर आता ठाम वाटतोय...


                                    या धरती के जख्मो पर मरहम रख दे 
                                    या मेरा दिल पथ्थर कर दे या अल्ला.................................................
10 comments:

 1. शेवटच्या वाक्यांवरून तुझ्या मनातील घुसमट कळतेय ...भापो ....
  >>पुन्हा कधीही काहीही होणार हे माहित असलं तरी न थांबलेलं...न बदलेलं....

  कितीही काही झाल तरी ते नाही थांबणार ,एक अगतिकता एक लाचारी आहे त्याच्या मागे... :(

  ReplyDelete
 2. सुंदर म्हणू शकणार नाही पण आर्तता, वेदना व्यवस्थित पोचतेय.. सगळ्यांची हीच अवस्था आहे !!! :(((

  ReplyDelete
 3. ही जीवघेणी घालमेल, विषण्णता अजून किती वेळा... का?का? कधी तरी थांबेल का हा सूडप्रवास?उत्तरे कोणाकडेच नाहीत... :(:(:(

  लताचे सूर, आर्तता खोल खोल उतरतेय...

  ReplyDelete
 4. अपर्णा! पोस्ट अगदी आत, अगदी आत पोचतेय! सामान्य माणसाला हकनाक मरावं लागतंय!:( याला जबाबदार असणार्‍यांबद्दल प्रचंड चीड मनात
  साठून आहे! आपण गुलाम झालो आहोत!
  http://vinayak-pandit.blogspot.com/2008/12/we-are-hostages.html

  ReplyDelete
 5. श्री ताई काही प्रश्नांची उत्तरच काय ग प्रश्नही पडायचा हक्क आहे का असं वाटतंय...:(

  ReplyDelete
 6. विनायकजी, ब्लॉगवर स्वागत.

  >> सामान्य माणसाला हकनाक मरावं लागतंय

  अगदी ...(

  ReplyDelete
 7. अपर्णा, पुन्हा एकदा अप्रतिम लिखाणाला सलाम... आणि सोबतचं गाणंसुद्धा फारच आर्त आणि इंटेन्स!

  ReplyDelete
 8. आवर्जून लिहिल्याबद्दल आभारी सारंग..
  खरं श्रेय त्या गीताला आणि त्या आवाजातील दर्दाला आहेत रे...मी फक्त निमित्त असेन..

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.