Saturday, December 5, 2015

है कोई बेचनेवाला?

कुठल्याशा अनामिक चिंतेने मन बेचैन राहतं आणि झुंजूमुंजू व्हायच्या आतच जाग येते. माझ्या शांत झोपलेल्या मुलांचा मला अशावेळी हेवा वाटतो. शिवाय आज शनिवार म्हणजे शाळेसाठी जेवढ्या लवकर उठावं लागतं तेवढ्या लवकर उठायची गरज नाही. मलाही कामाच्या दिवशीची, कामावर जायच्या आधी निस्तरून जायच्या कामाची रांग मागे नाही. तर अशीही अवेळी येणारी जाग,तीही झोपायची मुभा असायच्या रामप्रहरी.

कालच खिडक्या पुसून घेतल्यात. हे काम करणारीने जाताना सगळ्याच खिडक्यांची आवरणे पुन्हा झाकली नाहीत (मला वाटतं ज्या प्रकारे blinds हा प्रकार चालतो त्यांना आवरणच म्हणावं) तसं मुलं ज्या खोलीत जास्त करून खेळतात तिचा उपयोग पाहता तिने इथे झाकाझाक नाही केली हे चांगलच; म्हणजे मला ते उघडण्यासाठीचा आवाज इतक्या पहाटे करायला नको. तिथून मला समोरचा चिब भिजलेला रस्ता दिसतोय. दोन दिवस तो तसाच दिसेल. आताही जाणवत नाही पण एक दोन थेंबांची पिरपिर सुरु असेल. म्हणजे सूर्यदर्शन नाही, म्हणजे हे मळभाची चादर आणखी एक थर वाढवणार.
खिडकीतून मोकळा रस्ता पाहता मैलभर लांब असलेला, सदैव वाहता हायवे जास्त स्पष्ट जाणवायला लागतो. जोरात जाणाऱ्या गाड्यांचे आवाज मला या पहाटेच्या पारी समुद्राच्या गाजेसारखे भासतात. पण मी बरेच आधीपासून लख्ख जागी असल्यामुळे बहुतेक, उगाच कुठल्याही दिवास्वप्नात जायचं सुखही मिळवू पाहत नाही. माझ्या मायदेशातली शनिवारची एक पुरवणी पण माझी खिडकीपाशी यायच्या आधीच वाचून झाली आहे.
बाहेरच्या थंडीची थोडी जाणीव खिडकीपाशी उभं असताना मला होते. मला आठवतं, काही वर्षांपूर्वी असं मळभ वगैरे आलं की झक्कपैकी काहीतरी लिहायला सुचायचं. मग लिहिता लिहिता आधीची मरगळ जायची. आताही काहीबाही सुचत असतं, फक्त वेळच्या वेळी उतरवलं जात नाही आणि मग दिवस पुढे सरला की तो विषयच डोक्यातून जातो. पुन्हा ते मनात तसचं उतरेल याची काही शाश्वती नाही. सिद्धहस्त लेखकांच्या बाबतीत जसा "रायटर्स ब्लॉक" म्हणून एक प्रसिद्ध शब्द आहे, तसा थोडा कमी ठाशीव, माझ्यासारख्या हौशी, छंद म्हणून किंवा व्यक्त व्हायचं म्हणून लिहिणाऱ्या लोकासाठी कोणता बरं शब्द असेल?
तर आज हे समुद्राची गाज वगैरे आठवलं तेव्हाच विचार केला एक दिवसाची तरी दैनंदिनी लिहावी. योगायोगाने मागच्या दोनेक वर्षांत जशा नोकऱ्या बदलल्या तशी तिथे वापरलेल्या वह्या माझ्या एक छोटेखानी, घरगुती ऑफिसमध्ये केव्ह्याच्या माझी वाट पाहताहेत. त्या पूर्ण वापरल्याशिवाय मी रिसायकलमध्ये टाकणार नाही, हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त ठाऊक आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.
खूप दिवसांनी मी इतकं सलग स्वहस्ते लिहिते, म्हणजे हातात पेन धरून, हे माझं मलाच जाणवतंय. म्हणजे सुरुवात त्या अस्वस्थतेने झाली तरी जसजसं हे स्वैर मनोगत कागदावर उतरतंय तसतसं थोडं आभाळ स्वच्छ होतंय. ती गाज आता अंधुक होतेय आणि त्यात परनळीतून ठिबकणाऱ्या थेंबांचा आणि कुठे कुठे पाखरं बोलू लागायचा आवाज मिसळतोय.
मला वाटत नाही हे पूर्वीच्या अनुभवांइतकं स्वच्छ उतरलंय, पण या इतक्या लवकर उठण्याचा फायदा म्हणून मी बहुतेक आताच हे टाईप आणि पोस्टही करेन.
अनुभवांचे काही पदर मरगळ आणतात तर काही प्रसन्न कवडशासारखे दिसत राहतात. शेवटी हे एकमेकांत बांधलेले असतात. काही विशिष्ट काळात येणाऱ्या चांगल्या आणि वाईट अनुभवांचे पदर एकावर एक पांघरले जातात आणि नकळत त्यांची एक दुलई तयार होते. त्यातले फक्त चांगले वेगळे काढून त्याची एकच लक्षात राहणारी आणि मुख्य त्या इतर पदरांचा पूर्ण विसर पाडणारी एक दुलई असं एक फायनल प्रॉडक्ट बनवायला मला आवडेल. अर्थात माझ्या मी स्विकारलेल्या दोषांना पाहता ते विसरणं मला जमेल का याची जरा शंकाच आहे. पण मला हवंय असं प्रॉडक्ट. है कोई बेचनेवाला?
-अपर्णा,
५/११/२०१५ PST ५:३० a.m. 

3 comments:

  1. Hi Aparna
    I am pratik puri. I read your blog and liked it. I am also a writer and happen to work in Dailyhunt news and e-book mobile application. Dailyhunt releases news and e-books in 12 Indian languages. I would like to contact you regarding publishing your blog matter on our app. I look after the Marathi language. I would like to publish your blog content on our app for free or paid. In Marathi we have a readership of over 50 lakh people. We would be pleased to have you work with us. Please contact me for further details at pratik.puri@verse.in so that I can give you details of the proposal. Thank you!

    ReplyDelete
  2. मोठ्या लेखकांचा तो writer's block ... तसा ब्लॉगर्सचा असतो त्याला "blogger's rock" म्हणायचं ग ;)

    ReplyDelete
    Replies
    1. "Blogger's Rock" है शाब्बास. तूच गौरी, तूच गं :)

      हा दगड हलवायला हवा. फक्त कधीकधी जाम भारी असतो आणि कधी हलका वाटला तरी तो असतो. हे हे हे :)

      आभार्स :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.