ठिकाण होतं बीएमएम २०१५ मध्ये आयोजीत केलेली लेखनकार्यशाळा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपादक आणि लेखक मंडळींकडून शिकायला मिळायची, त्यांना ऐकायची संधी होती. ती कशी सोडायची? ही पोस्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं स्वतःलाच लक्षात राहावं म्हणून केलेला प्रपंच.
"लमाल" हा एक एलए स्थित ग्रुप लिखाणाच्या निमित्ताने एकत्र भेटतो त्याबद्द्ल थोडी माहिती सांगतानाच कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात ग्रंथालीच्या लतिका भानुशाली आणि मॅजेस्टिकचे अतुल कोठावळे यांच्याबरोबर मायबोलीचे अजय गल्लेवाले आणि नंदन होडावडेकर सहभागी झाले होते.
लतिका भानुशाली यांनी कमीत कमी वेळात प्रकाशन व्यवसाय, एखादं पुस्तक प्रकाशीत करताना केले जाणारे संस्कार आणि त्याचं मार्केटिंग यावर घेतले जाणारे कष्ट यावर प्रकाश टाकला. त्यांच्यामुळे व्यवसायाचं गणित नाही म्हणणार पण प्राथमिक मेहनत आणि ती प्रोसेस याबद्दल आधी माहित नसलेली माहिती मिळाली. म्हणजे कुठलंही लेखन जेव्हा पसंत केलं जातं त्यानंतर त्यावर सुरुवात, मध्य आणि शेवट यातल्या लेखनावर काही संस्कार जसं कुठे कमी लिहिलं असेल तर त्याचा विस्तार आणि याउलट काही ठिकाणी थोडा आटोपशीरपणा आणावा लागतो. इतरही काही संपादकीय संस्कार करून हे लेखन वाचकांपर्यंत पोहोचावं म्हणून साधारण वर्षभर ते पुस्तक गाजवत ठेवायचं काम प्रकाशनसंस्था करते. त्यानंतर त्या त्या पुस्तकाला स्वबळावर उभं राहायचं, तर ते काम त्या लेखकावर आणि त्याच्या सशक्त लेखनावर असतं. आपलं पुस्तक पुढची वीसेक वर्षे लोकांच्या आठवणीत राहील का ही जबाबदारी एक प्रकारे लेखकावर जास्त असल्याने आपलं लिखाण त्या ताकदीचं आहे का? हे त्या त्या लेखकाने तपासून पहावे असा एक मुद्दा जाता जाता त्यांनी मांडला. साधारण त्यांना अनुमोदन देणारे विचार कोठावळे यांचेही होते.
"मायबोली" ही मराठी साईट् कशी सुरु झाली त्याबद्दल थोडक्यात मजेशीरपणे सांगून अजय यांनी सध्या वेगवेगळ्या मराठी साईट्स, ब्लॉग्स इथे मराठी लेखन वेगवेगळ्या प्रकारे केलं जातयं याबद्दल समाधान व्यक्त केले. इथे एक दोन प्रश्नांच्या उत्तरांच्या चर्चेत कुठेतरी लेखन सशक्त व्हावं किंवा त्याचा दर्जा वगैरेचा उहापोह होतानाच अजय यांनी अतिशय उपयुक्त मुद्दा मांडला, तो म्हणजे यात कुठे हे असचं लिहिलं गेलं पाहिजे वगैरे झालं तर मग नवनिमिर्ती कशी होणार? थोडक्यात आपल्याला भावतं तेही लिहावं.
यानंतरचं सत्र होतं ते जितेंद्र जोशी आणि चिन्मय मांडलेकर या दोघांचं "लिहावे नेटके" याबद्दल. सगळ्यात पहिले म्हणजे ही दोघं खूप मोकळं, जितेंद्रच्या शब्दात अघळपघळ बोलले. प्रेक्षकांना गुंतवून ठेवायची कला या दोघांमध्ये आहे आणि शिवाय यांचं वाचन (आणि लिखाणही) चांगलं आहे हे जाणवत होतं. सुरुवातीलाच जितेंद्रने चिन्मयकडे पाहून,"अरे मोठी मोठी प्रकाशक मंडळी समोर बसलीत आणि आपण काय बोलायचं? पुन्हा आपलं काही प्रकाशीत झालं नाहीये. ते होणार असेल तरी होणार नाही" असं म्हणून मोठाच हशा पिकवला.
लिहिण्यासाठी खूप वाचलं पाहिजे यावर जितेंद्रचं म्हणणं होतं की, "उत्तम प्रतीचं दूध देण्यासाठी गायीला दूध प्यावं लागत नाही तर चाराच खावा लागतो"; त्यावर चिन्मयचं उत्तर होतं, " उत्तम प्रतीचा चारा खाल्ला तरच उत्तम प्रतीचं दूध येईल." लिहिणाऱ्या नवोदित माझ्यासारख्या लोकांचं दडपण दूर करताना जितु म्हणाला "अरे लिहा रे. तुकारामांनी गाथा लिहिली ती नदीतून वर आली आणि आपण अजून वाचतो. आपलं लिखाण कुठे वर यायला लिहितोय आपण? हवं तर शाईने लिहा म्हणजे बुडालं तर विरघळून जाईल." चिन्मयने लिखाण ही येताजाता करण्यासारखी गोष्ट नसून त्यासाठी एक बैठक लागते आणि एका जागी शांतपणे बसून लिखाण करावं आणि त्याचबरोबर आपलं लिहिलेलं आपल्याला आवडतं का हे सर्वात आधी तपासून घ्यावं हा मोलाचा सल्ला दिला. तर एक कोपरखळ्या मारत हसत हसत समजवणारा आणि दुसरा आपल्याला वास्तवाचं भान देत स्वनुभावातून शिकवणारं असं हे सत्र संपताना बरचं काही शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाचं हे की अशा प्रकारचं स्वान्तसुखाय लिखाण सुरु ठेवायचं की नाही याबद्दल गेले वर्षभर एक द्वंद्वं सुरु होतं ते कुठेतरी थांबलं.
इतका सुंदर कार्यक्रम बीएमएममध्ये उपलब्ध करून दिल्याबद्दल संबंधीत समितीचे आभार.
अरे वा मस्तच, छान झालेला दिसतोय कार्यक्रम. मी जितेंद्र जोशीची Campus पासून फ्यान आहे. चिन्मय मांडलेकरची जरा कमी, त्याने मालिकांसाठी लिहिलेल्या पटकथा-संवादांमध्ये 'तू माझी मदत करशील का' वगैरे अशी मराठी असते, पण प्रतिभावान आहे तो. :)
ReplyDeleteआभार इंद्रधनू :) कार्यक्रम मस्तच झाला. वरती थोडक्यातच लिहिलं आहे पण इतर बरचं शिकायला मिळालं. चिन्मयला कार्यक्रमानंतर मालिकांमध्ये पाणी घातलं जातं त्याबद्दल विचारलं होतं तेव्हा मालिकांचं गणित थोडं वेगळं असतं असं सांगितलं होतं. कार्यक्रमात त्याने उल्लेख केला होता तो म्हणजे "असंभव" मधले आजोबा कधीच त्यांच्या मराठी संभाषणात इंग्रजीचा वापर करत नसत पण त्यांना इंग्रजी येतं हे त्यांनी फक्त एकदा नातवाशी बोलताना दाखवलं. बाकी सगळीकडे त्याचं मराठी कटाक्षाने सांभाळलं. असो. तिकडे असे कार्यक्रम होतात का? असतील आणि जमत असेल तर नक्की जा :)
Deleteइकडेही होतात, पण शक्यतो शनिवार रविवार सोडून, दुपारी हापिसाच्या वेळेत :(
Deleteपण शक्य असेल तेव्हा नक्कीच जाईन... :-)
kyaa baat hai. kharach ahe. lihinyapeksha kasa lihaycha ya bhiititach mansa ardhi hotat.
ReplyDeleteअगदी अगदी अपूर्व. आभार :)
Deletemastach!!
ReplyDeleteआभार पल्लवी :)
DeleteMasta. Lihaave kase yaache jitake shikshan ghyave titke thode aste
ReplyDeleteते तर आहेच मंदार. आपण आपल्या अनुभवातूनही शिकत असतो तेव्हा लेखन थांबवू नये हाही एक बोध आहे. :)
Delete