Wednesday, November 24, 2010

निक्काल

निकाल या शब्दात न दिसणारी हवा किंवा न दिसलेला देव याप्रमाणे न दिसणारा "वाद्ग्रस्त" हा शब्द असलाच पाहिजे का असा प्रश्न का पडतो माहित नाही....पण पडतो किंवा निकाल लागल्यावर वाद होतात हे मात्र नक्की....मग ब्लॉगजगताने तरी अपवाद का मानावा मी म्हणते...

मुळात त्या दिवशी मेल, बझ सुरु करायच्या आतच सगळा खेळ आटोपला होता. म्हणजे सगळ्या चर्चा, अभिनंदनाची आदान प्रदान इ.इ. आवरून लोक झोपायच्या तयारीला लागले होते किंवा पार्ट्या तरी करत होते....आता मी जगाच्या जवळ जवळ शेवटी दिवस उगवणाऱ्या भागात राहणार म्हणजे अजून काय अपेक्षापण नव्हती तरी पण वरवर कोण कोण ओळखीचे आहेत हे पहिल्यावर आयोजकांचे पत्र वाचावे म्हणून जरा ती attachment उघडली आणि त्यातच नाव, त्याचं -हस्व, दीर्घ यांच्या चुका, कुणाच्या ब्लॉगची शेंडी कुणाला हे सगळं पाहून म्हटलं, आहे बाबा, वादाची सुरुवातच इथे आहे......... म्हणजे या वर्षी जिथे मराठीचे खून पडलेत तिथे जास्तीत जास्त पदकं नक्कीच गेली असणार....जास्तीत जास्त शब्दावरून आठवलं, अरे केव्हाची यादी पाहते... चहा गार झाला सकाळचा, मुलाची बाथरूम ट्रीपपण (बाबाच्या कृपेने) झाली तरी संपेचना.....शेवटी एकदाची गोळाबेरीज पहिली तर ६ + ३० = ३६ बापरे....छत्तीसचा आकडा म्हणजे तर यकदम लकी लंबर .....(माझा नाही हे वेगळ सांगायला नको आकडेबहाद्दरांना)

परीक्षकांच्या मते लंबरात आले ब्लॉग पहिले आणि बरेच विचार एकदम आले....म्हणजे, म्हटल जाहिरातीची कला जर इतक्या चांगली जमली तर चकटफू ब्लॉगवर चकटफू वेळ का घालवला असता राव?? मस्त जास्तीचे डॉलर नसते छापले???  जातीचीच राजकारण, शब्दांची वाफ दवडून करायची तर मग ब्लॉग सोडून दुसरं काही केलं असतं की....आणि दोन-तीन महिने पोष्टा टाकायच्या नव्हत्या का?? असले अचाट प्रश्न यकदम पडले....म्हटलं, देवा वाचवलस बाबा या रांगेत माझ्यासारख्याला न टाकून.....

खालची लंबर लाईन पहिली तर माझे बरेच लाडके वरच्या रांगेत जाऊ शकणारे लाडके ब्लॉग पाहून पुन्हा भरून आलं...उत्तेजना म्हणजे एक प्रकारची सांत्वना असा काही एक सूचक अर्थ काल एका बझवर पहिला तेव्हा लगेच उमगलं की खरच सांत्वनेची गरजतर या ब्लॉगना जास्त आहे कारण सातत्याने चांगलं आणि दर्जेदार लिहून जर त्यांचा लंबर ३० जणाच्या शेपटात असेल तर देवा पुन्हा एकदा वाचवलस बघ...

आता हे सगळं प्रकरण म्हणजे कोल्हयाला द्राक्षे आंबट असं बर्याच जणांना वाटेल....पण खर ते तस नाही..... हे एक वैचारिक मंथन आहे या निकालापासून काय घ्यावं यासाठी....कारण निकालामध्ये जसं मेरीट यादी, त्याखालची पास आणि मग नापास अशी लोकं असतात तशीच इथेही आहेत....आपण मुळात ब्लॉग का लिहितो याचा आपल्यासाठी विचार केला तरीही या निकालाने कुणाला काही फरक पडायला नको...कारण यात यादीत असणारे आणि नसणारे दोघही तितकेच confused आहेत..त्यांना आपण इथे का आणि का नाही हा प्रश्न एकाचवेळी पडलाय...(मटका लागलेले काही अपवाद वगळता)

ही एक स्पर्धा आहे ज्याचे नियम आपल्याला ठाऊक नाहीत...निदान दोन निकाल जरी कुणी नीट पहिले तरी हा परीक्षकांच्या मर्जीचा थोडा फार खेळ आहे हेही कळेल....आपण ब्लॉग कधी परीक्षकाला गृहीत धरून लिहिलेला नसतो....निदान परीक्षेच्या पेपरमध्ये तरी आपल्याला नियम, परीक्षक याची थोडीफार कल्पना असते पण हे ब्लॉग प्रकरण थोडं वेगळं आहे....त्यामुळे आता या निकालाने आपण खर तर कुठलाच निष्कर्ष काढायला नको...म्हणजे हिमेश रेशमिया जेव्हा हिट चित्रपट म्हणून त्याच्या कुठल्या चित्रपटाच नाव देतो तेव्हा आपण कधी तो पाहणार असतो का?? तसंच काहीसं....:)

आपल्या आपल्या ब्लॉगचा एक प्रेक्षकवर्ग असतो, आहे परीक्षक हा फक्त त्या घडीपुरता आपला एक तात्पुरता वाचक असतो...शिवाय तो कुठली पोस्ट वाचेल वाचणार नाही हे एक न उलगडणार कोडं......प्रत्येक ब्लॉगसाठी खरा वाचकवर्ग वेगळा आहे आणि राहील...आणि तो वाढत असतो ही जमेची बाजू गृहीत धरून आपण त्यांच्यासाठी लिहावं.....उगाच ऑस्कर नाही मिळाल म्हणून श्वास हा काही आपला लाडका सिनेमा लगेच नावडता होत नाही आणि जय हो ला बक्षीस मिळाल तरी ए आर, जावेद म्हटलं की मला त्यांची जय हो सोडूनच सगळी गाणी आठवणार....

त्यामुळे हा निकाल असा का लागला ...अमुक ह्या लम्बरावर का आणि तमुक इथे का नाही त्यापेक्षा आपल्या आपल्या ब्लॉगवर चित्ती असावे समाधान या न्यायाने खर तर जास्त नेटाने लिहावे हे जास्त महत्वाचे....ब्लॉगने आपल्याला काय दिलं यात बक्षीस दिलं हे खूप खालच्या क्रमांकावर असलेलंच बर...मागच्या वर्षीच्या उत्तेजन नामावळीतले बरेचसे सुस्कारे सोडलेले ब्लॉग पाहिलं तर हे नक्कीच पटेल....

तरीही ज्यांना बक्षीस मिळालेच आहे त्यांना कुठेही कमी लेखण्याचा हेतू यामागे नाही....पण दहावी बारावीचा निकाल लागला की नंतर एखाद्या पुरवणीत नापासांसाठीसुधा एक सदर येत न तितकीच किंमत या पोस्टला आहे....बारावीवरून आठवलं जेव्हा बारावीला पण आकडे मला लागणारे नव्हते (म्हजे मेडिकलच्या लायनीत जायला...) तेव्हा माझे बाबा दादर स्टेशन वर माझे भरून आलेले डोळे न पुसता म्हणले होते अग अपर्णा आपल्या पिढीत अजून कुणीच डॉक्टर झाल नाहीय आणि तसा प्रयत्न करणारी पण तूच पहिली आहेस तर मग लगेच कस सगळं मनासारखं होईल? त्यासाठी पिढीच अंतर जाव लागेल.....

तसंच आहे हे आपण काही कसलेले लेखकू नाहीत (निदान मी तरी) शिवाय यातलेही सगळेच काल लिहायला सुरुवात केली आणि आज बक्षीस घेतलीत असही नाहीये...तेव्हा आपल्याला पुलाखालून थोडं पाणी वाहून जावं द्व्याव लागेल..प्रत्येकाचे पूल निराळे...बास इतकंच....:)

10 comments:

  1. अपर्णा, एक्का झटक्क्यात सगळळयांन निक्कालात काढलंस तू तर !!!

    पण खरंच बरेच निर्णय वादग्रस्त आहेत.. स्पर्धेचे निकष काय होते हे जोवर संयोजक जाहीर करत नाहीत तोवर त्यांना टीकेचा सामना हा करावाच लागणार.. इल्लाज नाही ;)

    ReplyDelete
  2. अपर्णा,
    "ब्लॉगने आपल्याला काय दिलं ह्यात बक्षीस दिलं हे खूप खालच्या क्रमांकावर असलेलं बरं" हे तंतोतंत पटलं.
    मला तरी असं वाटतं कि ह्या विषयावर चर्चा न होणं हेच बरं. बरेचसे लिहिणारे स्पर्धा म्हणून नक्कीच लिहित नाहीत. परीक्षकांना आवडलेले ब्लॉग्स बक्षीसपात्र झाले, बाकीचे नाही. ह्या बाबतीत पुलंच्या असा मी आसामी मधल्या कीर्तनकारचे तत्त्वज्ञान मला आवडते: "राजहंसाचे चालणे जागी झालीया शहाणे म्हणून काय कवणे चालूच नये काय?" :)

    ReplyDelete
  3. अपर्णा,
    हे खरंच की आपलं खरं पारितोषिक म्हणजे आपल्या वाचकांचं प्रेम आणि त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. स्पर्धा म्हणजे नेहमीच चान्सेसचाही खेळ असतोच.

    ReplyDelete
  4. स्वत:साठी आणि आपला ब्लॉग नेहमी वाचणारयांसाठी आपण असच लिहत राहायच...-तुझ्यासारखाच एक नापास मुलगा

    ReplyDelete
  5. खरं आहे. काही ब्लॉग्जवर बरेच दिवस काही पोस्ट झालेलं नाहीये. लेखनातल्या सातत्याचा अभाव आहे; तरीही असे ब्लॉग्ज पुरस्कारांच्या यादीत आहेत. सगळ्यांत धक्कादायक म्हणजे जातीद्वेषाने बरबटलेल्या, काही विवक्षित जातींविरुद्ध आपल्या मतांची गरळ ओकणार्‍या छिद्रान्वेषी माणसांनाही विजेत्यांच्या यादीत समाविष्ट केलं गेलं आहे.... Sickening!

    ReplyDelete
  6. खरं आहे. काही ब्लॉग्जवर बरेच दिवस काही पोस्ट झालेलं नाहीये. लेखनातल्या सातत्याचा अभाव आहे; तरीही असे ब्लॉग्ज पुरस्कारांच्या यादीत आहेत. सगळ्यांत धक्कादायक म्हणजे जातीद्वेषाने बरबटलेल्या, काही विवक्षित जातींविरुद्ध आपल्या मतांची गरळ ओकणार्‍या छिद्रान्वेषी माणसांनाही विजेत्यांच्या यादीत समाविष्ट केलं गेलं आहे.... Sickening!

    ReplyDelete
  7. अपर्णा, मागच्या वर्षीच्या स्पर्धेनंतर मी ठरवलं होतं, यापुढे कुठल्याही स्पर्धेला ब्लॉग पाठवायचा नाही म्हणून. कारण ब्लॉग स्पर्धेला पाठवला, म्हणजे तो आपल्यापुरता राहात नाही. नकळत इतर ब्लॉगशी तुलना, आपल्याला लिहायचंय ते लिहिण्याऐवजी ज्याला जास्त प्रतिक्रिया मिळतील असं लिहिणं हे सगळं नकळत सुरू होतं मझ्या बाबतीत तरी. या वर्षीचे निकाल बघितल्यावर तर वाटलं, फार चांगलं केलं यात भाग नाही घेतला ते.

    अग ब्लॉग आपण आपल्यासाठी लिहितो... त्याला बक्षीस मिळालं, तर कदाचित त्यामुळे थोडे नवे वाचक मिळतील, अजून कुणाशी सूर जुळू शकतील. बक्षीस नाही मिळालं तरी हे होईलच, ना? थोडा जास्त वेळ लागेल कदाचित, एवढंच. महेंद्रकाकांच्या ब्लॉगला एक लाख व्हिजिटर मिळाले ते कुठल्या स्पर्धेमुळे नाहीत - त्यांच्या लेखनाच्या दर्जामुळे आणि सातत्यामुळे.

    ‘स्टार माझा’च्या निराशाजनक निकालामुळे वाईट काय झालं, तर मराठी ब्लॉगजगताबाहेरच्या लोकांना ‘प्रातिनिधिक’ म्हणून एक चुकीचं चित्र बघायला मिळालं.

    ReplyDelete
  8. गौरीच्या प्रतिक्रियेतलं शेवटचं वाक्य म्हणजे सार आहे सगळ्याचा. अतिशय परफेक्ट !!

    ReplyDelete
  9. खर तर ब्लोग आपण आपल्या समाधानासाठी लिहतो. ज्या वाचकांना आवडतॊ ते तस कळवतात.

    स्पर्धा म्हणल की निकाल आलाच व तो सगळ्याना पटेल अस नाही.तेंव्हा आपल्य़ा समाधानासाठी आपण लिहित राहवयाचे.

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.