Tuesday, August 17, 2010

१ टक्क्यातल्यांची गोष्ट

सगळं काही सुरळीत असताना आपलं काम होणार नाही याची एखाद टक्का शंका असते. अशा एक टक्क्यांमध्ये माझा नंबर फ़ार पुर्वीपासूनच लागला आहे असं मला बर्‍याचदा वाटतं..त्याची आणखी एक चुणूक दोनेक आठवड्यापुर्वी एका कामासाठीच्या दौर्‍यासाठी बाहेरगावी गेले तिथे पुन्हा एकदा मिळाली.
तसं मी घरुनच पूर्ण काम करायचा घोशा लावला होता; फ़क्त १ टक्का परिस्थितीत त्यांना मला प्रत्यक्ष भेटावं लागणार होतं आणि (अर्थातच मी ती एक टक्कावाली असल्यानं) तसं झालंही. त्याप्रमाणे पोर्टलॅंडहून पश्चिमेकडे म्हणजे न्युयॉर्क किंवा कनेक्टिकट अशा पर्यायाने मला जायचं होतं. एकतर ही वारी बरीच आयत्यावेळी असल्याने खूप सारी (चांगली पर्यायाची) विमानं बुक तरी होती किंवा त्यांचे भाव भारताच्या तिकीटापेक्षा जास्त दिसत होते.मग तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणून एअरपोर्ट ट्रॅफ़िकमधुन सुटका व्हावी म्हणून मी स्वतःच नवीन यॉर्कातले दोन्ही विमानतळ वगळले आणि हार्टफ़र्डची तिकीटं काढली. जाताना रात्रीचं म्हणजे रेड-आयचा एकच पर्याय होता पण परत येताना कुठे उडी मारुन यायचं ते थोडं माझ्यावर होतं. माझ्या जुन्या गावचा म्हणजे फ़िलाडेल्फ़ियाचाही पर्याय त्यात होता पण मला उगाच भावुक व्हायला होईल का असा विचार करुन मी जसं आलं तसंच (म्हणजे लहानपणी आई-बाबा शाळेला जाताना कडेकडेने जा अशा काही सुचना देतात थोडासा तसाच मध्यमवर्गीय विचार करुन) शार्लेटच्या पर्यायावर टिचकी मारली.

निघतानाच कुठं माशी शिंकली माहित नाही.मला निदान पाचेक तास शांत झोपायला मिळावं म्हणून मी १५ डॉलर जास्तीचे भरुन लेग-स्पेसवाली खिडकी घेतली आणि बाजुलाच एक सहा-सात वर्षांचा (अतिक्युरिअस...(चिकित्सकपेक्षा भा.पो. वाटतंय म्हणून)) मुलगा आणि त्याचा काळा बाबा माझे सहकारी होते. विमान उडेपर्यंत त्याच्या हजारो शंकानी माझी चांगलीच करमणूक केली. अगदी आपली निळी बॅग कुठे ठेवतातपासून काय काय प्रश्न होते त्याचे. त्याचा बाबा मात्र अगदी शांत चित्ताने त्याचं शंकानिरसन करत होता.आता हा दमून लवकर झोपणार ही माझी शंका अगदी खरी ठरली; पण दुर्दैवाने त्याने थोड्या वेळाने लवंडण्यासाठी चुकीचा खांदा (अर्थातच माझा) निवडला..त्यामुळे मला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असं काहीसं झाली आणि अर्थातच माझ्या झोपेचं खोबरं व्हायला सुरुवात झाली.त्यात मला एकदा जाग आली की पुन्हा लगेच झोपही येत नाही. केव्हातरी रात्री त्याच्या बाबाच्या लक्षात आलं आणि माझा खांदा मुक्त झाला पण तोवर उतरायची वेळ झाली होती.तरी बहुधा झोपेचा पगडा बराच असावा त्यामुळे शार्लेट मुक्कामाच्या छोट्या फ़्लाइटमध्ये मी जमेल तितकी झोप काढून घेतली.
विमानतळ ते कामाचं ठिकाण डोक्यावरुन पाणी म्हणजे दिडेक तासाचं अंतर होतं.इतकं ड्राइव्ह कोण करणार आणि तेही अर्धवट झोपेत म्हणून सरळ कॅब केली होती. तोही वेळेवर आला आणि आम्ही निघालो. तो मला म्हणाला बरं झालं न्युयॉर्कला नाही गेलीस ते. That city never sleeps so you would have hit the traffic any time you land. थोडक्यात काय तर आता वेळेत हॉटेलवर आणि मग दुपारची मिटिंग असा मी विचार करत होते.पण तीच ती एक टक्क्याची कथा..नेमकं एका ठिकाणी अपघातामुळे मुंगीच्या पावलाने गाड्या सुरु होत्या आणि आम्ही अडकलो. बिचारा ड्रायव्हर मला म्हणतही होता इथं कधी ट्रॅफ़िक होत नाही. मग त्याने हायवेवरुन गाडी काढून थोडं लोकल रस्त्याने पुन्हा हायवेवर आणलं पण तरी दीडचे सव्वा-दोन तास झालेच. चला नमनाला इतकं पुरे...
कामाबद्द्ल तर काय बोलायची सोय नाही.दिवसभर जर मिटिंग एके मिटिंग केलं तर खरं काम पुन्हा हॉटेलवर आल्यावर करायचं हे बहुधा अंडरस्टुड होतं. त्यात माझं नशीब म्हणजे ज्याच्या जागी मी गेले होते तो हे काम सोडून दोन आठवड्यापुर्वीच गेला होता त्यामुळे कसला आगापिछा न कळता लागलेल्या (किंवा दुसर्‍याने लावलेल्या) आगीवर पाणी शिंपडण्याचं काम माझं..काय बोलणार..पण खरं तर त्यासाठीच आपण असतो. म्हणजे नाहीतर कोण एवढे लाड करणार नाही का? असो..
शेवटी (एकदाचा) परतीचा दिवस उडाला आणि उगाच उशीर नको म्हणून ११:४५ ची कॅब केली. फ़क्त ते मला घ्यायला यायच्या ऐवजी मला त्यांच्या पिक-अपच्या ठिकाणी जायचं होतं. माझा एक सहकारी मला सोडणार होता. पण तो वेगळ्या मिटिंगमध्ये, मी कोणा वेगळ्याबरोबर काम करतेय या भानगडीत निघतानाच उशीर झाला; तरी फ़ोनवरुन कॅबला थांबायला सांगितल्यामुळे निदान तिथे काही गफ़लत झाली नाही. आणि यावेळी चक्क नेहमीच्या वेळेपेक्षा गाडी दहा-मिन्टं लवकरच पोहोचली. सेक्युरिटीलाही काही रांग नव्हती. आता फ़क्त तासभरात विमानात चढलं की झालं. मग शार्लेटचा हॉल्टतर तासभराचा होता. म्हणजे गेटपाशी पोहोचेपर्यंतच बोर्डिंगची वेळ झाली असेल आणि मग तिथुन पाचेक तासात पोर्टलॅंड साधा सोपा हिशेब. कुठेही शिंकणार्‍या माशीचा शिरकाव नाही, असा विचार करत मी दुपारच्या जेवणाची सोय केली. खरंच विमानतळावरचं जेवण जास्तीत जास्त ठिकाणी इतकं टुकार असतं नं..हा विमानतळही नावापुरता इंटरनॅशनल बाकी सगळा थंडा कारभार होता. त्यातल्या त्यात एक मेक्सिकन पर्याय होता तिथुन एक बरीटो उचलुन मी शांतपणे पोटपुजा केली.
बोर्डींगही वेळेवर सुरु झालं.बाजुच्या सहप्रवाशीणीबरोबर हाय-हॅलो झालं. कप्तानाने उगाच आपल्या आगमनाची नांदी दिली..थोडा एकतर्फ़ी संवाद केला, हवाईसुंदरी एक्सिट रो इ. सुचना द्यायला उभी राहिली आणि कप्तानाच्या आवाजाने तिला थांबावं लागलं..ही एकाच नाही तर पुढे शिंकणार्‍या हजारो माशांची नांदी होती. कप्तानाच्या मते शार्लेटला जोरदार पाऊस, वीज इ. मुळे आपल्याला टेक-ऑफ़साठी थोडा वेळ थांबावं लागणार आहे. पुन्हा पंधरा मिनिटांनी पुन्हा तेच. साधारण अर्धा तासांनी शार्लेटचा पाऊस थांबायची बातमी आली. पण टेक-ऑफ़चा सिग्नल मिळणार तितक्यात आमच्याकडे वरुणराजांनी बरसायला सुरुवात केली. निघताना चांगला गॉगल घालावा लागेल इतकं ऊन असणार्‍या ठिकाणी हा अंधारुन आलं आणि माझ्यासारख्यांची दयामाया न करता ढग बरसू लागले.आम्ही अर्थातच विमानातच बंदिस्त झालो. थोड्या वेळाने आम्हाला आणखी दिड तास उडायची संधी नसल्याने बाहेर पडायची परवानगी मिळाली.
एवढ्या वेळात वेळेचं गणितही काही कळत नव्हतं. बाहेर पडावं की न पडावं या विचारात मी तशीच बसून राहिले. नवर्‍याला कल्पना दिली.तोही बिचारा आठवडाभर मी नाही म्हणून मुलाला एकटं सांभाळून कंटाळला होता त्यात ही भर.शेवटी वीसेक मिनिटांनी माझी पेटली की जर मला ते फ़िलाडेल्फ़ियाचं कनेक्शन दिलं तर निदान माझी कनेक्टिंग फ़्लाइट मला मिळू शकेल. म्हणून मी बाहेर गेले आणि काउंटरच्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहिले तोच आमच्याच फ़्लाइटला सिन्गल मिळाला आणि पुन्हा एकदा पळापळ.मीही त्या लोकलाटेबरोबर आत गेले. आणि पावणे-तीन ऐवजी साधारण साडे-चारच्या दरम्यान आम्ही उडालो.

आता प्रश्न होता तो म्हणजे मला माझी शार्लेटची कनेक्टिंग फ़्लाइट मिळेल का? हवाईसुंदरीकडे जरा मस्का लावुन पाहिला की बाई मला जरा पुढे बसायला दे म्हणजे उतरताना मी पळत माझी फ़्लाइट पकडेन. पण पुढे म्हणजे फ़र्स्टक्लास हाच पर्याय होता बाकी सगळ्या जागा भरल्याच होत्या. शिवाय तिचं म्हणणं एक शक्यता शार्लेटला आधीच गोंधळ झाला आहे म्हणजे तुझी फ़्लाइट तिथेचही असेल आणि दुसरं म्हणजे माझ्याच बोटीतले बाकी प्रवासी आहेत त्यामुळे ती फ़क्त हे विमान शार्लेटला पोहोचल्यावरच काय ते करु शकेल.
मग काय झालं पुढे माझं आणि त्यातल्या त्या एक टक्क्यावाल्या बर्‍याचशा गोष्टींचं????

13 comments:

 1. तरीच गेल्या आठवड्यापासून तू गायब हायेस... पोचलीस ना नीट घरी... लवकर लिही गं बाई.. मला अस वाटतंय तू अजून तिकडे विमानतळावरच आहेस आणि तिकडून लाइव्ह ब्लॉगिंग करते आहेस... :)

  ReplyDelete
 2. विमानात अडकून राहणं हे म्हणजे कैदेत राहण्यासारखच. जागेवरून उठायचं नाही. मागून पाणी सुद्धा मिळणार नाही. मी एकदा न्यू जर्सी मध्ये सहा तास विमानात अडकलो होतो. बर्फ पडत असल्याने विमान सुटत नव्हते. जेव्हा उडायची परवानगी मिळाली, तेव्हा विमान टेक ऑफ घ्यायला धावपट्टीवर पुढे गेले आणि पायलट म्हणतो की त्याचे कामाचे तास भरले आणि त्याला आता उडायला परवानगी नाही. तेव्हा परत विमान रद्द झाले आहे. एवढ्या वेळात कदाचित मी गाडी ने नौर्थ कॅरोलिना ला पोचलो असतो.

  ReplyDelete
 3. दौडा दौडा भागा भागा सा...!!!
  इंतज़ार कब तक हम करेंगे भला...!!!
  आज मौसम बेइमान है बडा...!!!
  कुछ तो बाकी है....???

  :)

  ReplyDelete
 4. सगळ्या १ टक्क्यावाल्यांना मर्फीचे नियम लागू होतात म्हणे ;)

  ReplyDelete
 5. हा हा रोहन कसलं लाइव्ह ब्लॉगिंग..पण खरंच त्या प्रवासात इतका वेळ होता की ऑफ़िसच्या लॅपटॉपवर बरहा असतं तर बरं झालं असतं असं वाटलं होतं...बर्‍याच पोश्टा निदान टायपून ठेवता आल्या असत्या....पोहोचलेय मी नीट भाग दोन टाकलाय तेव्हा पाहशीलच तू...

  ReplyDelete
 6. हा हा रोहन कसलं लाइव्ह ब्लॉगिंग..पण खरंच त्या प्रवासात इतका वेळ होता की ऑफ़िसच्या लॅपटॉपवर बरहा असतं तर बरं झालं असतं असं वाटलं होतं...बर्‍याच पोश्टा निदान टायपून ठेवता आल्या असत्या....पोहोचलेय मी नीट भाग दोन टाकलाय तेव्हा पाहशीलच तू...

  ReplyDelete
 7. निरंजन, न्यु-जर्सी आणि थंडीत विमानात अडकणं सॉलिड कॉम्बो आहे...फ़क्त आम्हाला उठायला परवानगी होती. मी मध्ये जाऊन एकदा पाणी पण घेऊन आले पण घोळ तो घोळच.

  ReplyDelete
 8. देवा इंतजार खतम..भाग दोन टाकला आहे...दौडत ते होतो मन फ़क्त आमचं भागत (आणि शरीर दमत) होतं असं आता वाटतंय...:)

  ReplyDelete
 9. हेरंब मर्फ़ीला मी मुद्दामच मध्ये पाडला नाही...त्याचं तंत्र आणखी वेगळं..पण जाऊदे हे आहे तेच थोडकं झालंय...:)

  ReplyDelete
 10. म्हणजे शेवटी घरून काम हे फक्त कागदावरच राहीलं म्हणायचं की.... तेही प्रथमच आरुषला सोडून जायचं... :(
  अगं, शेवटी पोचलीस कधी???

  ReplyDelete
 11. अगं मी पोहोचलेय पण तूच मध्ये गायब झालीस...:) कागदावर बर्‍याच गोष्टी असतात गं आणि प्रत्यक्षात वेगळं...:)

  ReplyDelete
 12. आयला..
  डेडलीच अनुभव! :)

  ReplyDelete
 13. व्हय व्हय बाबा....यकदम वैतागवाडी...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.