Tuesday, April 28, 2009

भातुकलीचा संसार

त्या दिवशी ताईकडे मुंबईला फ़ोन केला. अपेक्षेप्रमाणे माझ्या दहा वर्षाच्या भाचीचा उत्साही आवाज. पण आज नेहमीपेक्षा काही वेगळाच टॉपिक आणि सांगताना नेहमीपेक्षा जास्तच घाई. तिला मी माझ्या पेटनेमने हाक मारायला शिकवले आहे. (बाकी साऱ्यांच्या विरोधाला जास्त न जुमानता!) "अपु, आम्ही नं रविवारी भातुकलीचं प्रदर्शन पाहायला गेलो होतो. तिथे अगदी सग्गळ्या वस्तु खेळण्यांच्या होत्या. तिथल्या जात्यावर ना आम्ही दळुन पण पाहिलं. खूSSSSप मज्जा आली. मी जरा जास्त वेळ खेळत होते ना तर प्रदर्शनवाल्यांनी मला विचारलं की झाला का तुमचा स्वयंपाक करुन (इथे स्वतःचं खी..खी) मग त्यांनी सांगितलं आमचा झालाय. तुम्हाला हवाय का? आणि नंतर त्यांनी आम्हाला छोटा लाडु दिला....." यानंतर फ़ोनवर पहिले भाचीशी आणि नंतर बहिणीशी याच विषयावर गप्पा रंगल्या.
लोकसत्ताच्या विवामध्ये "भातुकलीतल्याच्या खेळामधले राजा आणिक राणी" वाचुन खरं तर खूप उत्सुकता निर्माण झाली होती. ज्यांनी हा लेख वाचला नसेल त्य़ानी जरुर वाचावा. फ़ोटोमध्येतरी हे करंदीकर दांम्पत्य आजी आजोबांच्या वयात असावे असे वाटते आणि हे आजी-आजोबा उर्फ़ राजा-राणी मस्तपैकी साधारण १२०० ते १५०० भातुकलींची खेळणी संग्रही ठेऊन आहेत. काय छान!! याच खेळण्यांचं रसिकांसाठी विनामुल्य प्रदर्शन इतक्यात मुंबैत भरवलं गेलं. खरच कौतुक आहे नं इतका मोठा संग्रह स्वखर्चाने करुन लोकांसाठी प्रदर्शन भरवायचे. केवळ आपली संस्कृती काळाच्या ओघात लुप्त होऊ नये म्हणुन.

माझ्या लहानपणी मी खरी भातुकली कधी खेळले नाही आणि ती खेळणी परवडण्यासारखी नव्हती हा एक कळीचा मुद्दा असला तरी प्लास्टिकच्या (स्वस्त) खेळ्ण्याचं आक्रमण नाकारण्यासारखं नव्हतं. त्यामुळे प्लास्टिकच्या ताट-वाट्या, कुकर, गॅस यात खोटा खोटा स्वयंपाकच खुपदा असे. कधी कधी त्यात चणे, शेंगदाणे, कुरमुरे यासारख्या वस्तुही असत. तास-दोन तास कसे जात कळतही नसे. आमच्या लहानपणी तो गाडीवर चिनी मातीच्या वस्तु घेऊन फ़ेरीवाला येई त्याच्याकडे तसाच लहान टी सेट असे. तो मात्र माझ्याकडे नेहमी होता. मला अजुनही आठवतं माझ्या चौथ्या वाढदिवसाला माझ्या एका मावशीने मला स्टीलचा खेळण्याचा छोटा सेट दिला होता. त्यात छोटी दोन ताटे, चार वाट्या आणि एक हंडा असं होतं. मी तो खेळ कध्धीच हरवला नाही. माझी वर उल्लेख केलेली भाची पण त्याने खेळली आहे.

पुर्वी स्वयंपाकघरात असे तसा एक छोटा स्टीलचा रॅक आणि त्यात कपापासुन ताटापर्यंत सर्व स्टीलची व्यवस्थित लावलेली भांडी असा सेट मी सहावी किंवा सातवीत असताना एका दुकानात काचेच्या बाहेरुन पाहिला होता आणि बाहेरूनच त्याची "नव्वद" रुपये किंमत पाहुन बाबांना विचारण्याचा मोह लगेच आवरला होता. माझी छोटी बाहुली पण पाच-सहा रुपयांची असेल. म्हणजे नव्वद ही किंमत आपल्यासाठी मोठी आहे इतकं नक्की कळत होतं. त्यावेळी मी ठरवलं होतं की आपल्या मुलीसाठी नक्की असा रॅक घ्यायचा. यावेळी मुंबई मुक्कामात योगायोगाने माझ्या भाचीने तिची नवी भातुकली म्हणुन जवळजवळ तस्साच खेळ मला दाखवला. ताईने तिला इतक्यातच घेतला होता. फ़क्त रॅक लाकडाचा होता. मग काय आम्ही दोघी आणि माझा सहा महिन्याचा मुलगा एकटेच असताना मस्त खेळलो. माझी जुनी इच्छा पुर्ण होते म्हणून मी खुश आणि लाडक्या अपुबरोबर खराखुरा बाबु खेळायला मिळतो ही डब्बल खुशी आमच्या अदितीला.
खरं तर हा लेख कधीच पोस्ट करायचा होता कारण हे प्रदर्शन एप्रिलच्या मध्यावर झालं होतं पण फ़ोटोसाठी खास थांबले होते. आणि जाता-जाता माझ्यातली लहान मुलगी मध्ये कधीतरी बंड करुन उठते ना तेव्हा अशा काही खरेद्या मी करते त्याबद्द्ल. आम्ही कॅलिफ़ोर्नियाला एका सिनिक ड्राईव्हसाठी चाललो होतो आणि मध्ये लांबवर पसरलेल्या शेतांच्या भागात एक लोकल टाइम पास दुकान होतं तिथं उगाच थांबलो (माझा नवरा अशा दुकानदारांना सपोर्ट म्हणुन असे स्टॉप्स घेतो) त्या दुकानात हट्ट करुन हा टी-सेट घेतला त्याचाही फ़ोटो देतेय. म्हटलं मुलगी झाली तर कामाला येईल (आणि नाही झाली तरीही)

आज भातुकली प्रदर्शनाच्या निमित्ताने वय वर्ष चार ते आतापर्यंत असा मस्त फ़ेरफ़कटा कसा झाला कळलंच नाही. मला तर वाटतं माझ्यासारखा भातुकलीमध्ये रमणारा मोठा स्त्रीवर्ग आहेत. त्यातल्या काही लकी ज्यांना स्वतःला मुलगी आहे त्या आपल्या मुलींच्या निमित्ताने खेळुनही घेतात. सगळ्यात कौतुक ह्या करंदीकर काका-काकुंच. मलाही आवडेल यांच्याही भातुकलीबरोबर खेळायला. कधी योग येतो पाहायचं. आणि याच निमित्ताने मी अजुनपर्यंत म्हणजे मला एक मुल होईपर्यंत भातुकलीमध्ये रमते हे आता मी मोठ्या अभिमानाने सांगु शकते तर.

तळटिप: ताईकडुन फ़ोटो येईपर्यंत थांबल्यामुळे प्रदर्शन संपल्यानंतर ब-याच दिवसांनी हा लेख मायाजालावर टाकत आहे.

4 comments:

  1. मस्त...अगदी लहानपण आठवलं...आणि तु हे फोटो टाकुन तर लेखाची व्हॅल्यु खुपच वाढवली आहेस.....

    तन्वी

    ReplyDelete
  2. फ़ोटोसाठी स्पेशल आभार माझ्या ताईचे. तू माझी भातुकली तुझ्या लेकीला दाखव ती माझ्याकडे यायला तयार होईल.

    ReplyDelete
  3. हे प्रदर्शन मी पण पाहिलं होतं नाशिकला . तिथे त्र्यंबक रोडवर एक हॉटेल आहे (पाटलाचा वाडा ) संस्कृती नावाचे. तिथे गेलं की अगदी लहान पण आठवतं. आज हे फोटॊ पाहिले अन ते आठवलं. छान झालंय लेख.

    ReplyDelete
  4. मला या विषयावर एखादी तरी male representative comment हवी होती. तीही मिळाली...धन्यवाद...मी पाटलाच्या वाड्याला भेट द्यायचा नक्की प्रयत्न करेन....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.