Monday, December 20, 2010

दत्तजयंती

परदेशात आल्यावर जेव्हा इथे हॉलिडे टाइम आणि हॅपी हॉलिडेचा उठसूठ गजर सुरु होतो त्यावेळी खरंच दया येते इथल्या लोकांची. तो नोव्हेंबरमध्ये आलेला ’थॅंक्सगिव्हिंग’ नामक घरगुती जेवणाचा कार्यक्रम आणि त्याच्या दुसर्‍या दिवशीचा खरेदीचा धुमाकूळ आटपला की वेध लागतात ते नाताळचे. म्हणजे नक्की काय? तर घर सजावट, ख्रिसमस ट्री आणि कुठेकुठे रंगणारे ख्रिसमस कॅरोलचे कार्यक्रम..पण तरी हे सगळं घोटाळतं ते ख्रिसमस या एकाच सणाच्या भोवती. त्यानंतर पाहिलं तर अगदी हाताच्या बोटावर मोजणारे इथले सण, अद्यापही त्यांना उत्सव म्हणायचं जीवावर येतं.. असो..या पार्श्वभूमीवर यांच्या ख्रिसमसच्याच आसपास येणारी दत्तजयंती केवळ तेवढ्यासाठी आठवते असं नाही.


माझं लहानपण वसईतल्या एका छोट्या गावात गेल्याने दत्तजयंतीचाही उत्सव पाहायचं आणि तिथे असेपर्यंत जवळजवळ दरवर्षी तो साजरा करायचं भाग्य मला लाभलंय़. वसई पश्चिमेला "गिरीज" नावाचं एक छोटं गाव आहे, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र "निर्मळ"च्या जवळ. तिथे पर्वतीपेक्षा कदाचित थोडी कमी उंचीची असेल एक टेकडी आहे, "हिराडोंगरी" तिचं नाव. दरवर्षी इथे असणार्‍या दत्ताच्या देवळात दत्तजयंती साजरी होते आणि त्यानिमित्ताने देवळाच्या आसपास एक छोटी जत्रा पण भरते (किंवा तेव्हातरी भरायची...मला साधारण ९५ नंतरचं विशेष माहित नाही)

वसईतील आसपासच्या गावातील बरीच लोकं न चुकता या यात्रेला जायचे आणि त्यात माझे आई-बाबाही होते. माझी आई तशी भाविक आहे..देव खरंच आपल्याला मदत करतो वगैरे गोष्टींवर तिची भाबडी श्रद्धा आजही आहे. मी गमतीत म्हणते की गुरुवारची लक्ष्मीव्रताची पोथी तू वाचायचीस पण लक्ष्मीने मात्र आम्हाला तुझ्यापेक्षा साथ दिलीय...अर्थात तिने ही सर्व भक्ती तिच्या मुलांसाठीच केली असणार याची खात्री आहे मला...असो..

तर आम्ही प्रत्येक दत्तजयंतीला गिरीजला जायचो. बरेचदा पायीच जायचो. त्याचं कारण माझ्या बाबांना चालायला आवडतं हे जरी असलं तरी मुख्य त्यावेळी जरी एस.टी.महामंडळाने जादा बसेस सोडल्या तरी आमच्या स्टॉपला येईपर्यंत थांबायचं त्राण त्यांच्यात नसायचं म्हणून मग निदान जाताना तरी ’वन टु, वन टु’च करावं लागे. ते लवकर अंधार पडायचे दिवस आणि आमच्याबरोबर चालणारे इतर लोकही असायचे शिवाय बाबांच्या गप्पा त्यामुळे तो अर्धा-पाऊण तास कळायचाही नाही कसा जायचा ते. डोंगरीची चढणही अगदी फ़ार नाही आणि पायर्‍या आहेत. त्यामुळे मग रांगेत पोहोचायचो तेच केव्हा केव्हा पायर्‍या संपत आलेल्या असायच्या त्यावेळी.

या दर्शनातलं मला आठवतं ते म्हणजे बहुधा हे देऊळ आणि डोंगरी कुणा तरी पाटलांच्या मालकीची आहे आणि त्यांचा राजू म्हणून एक मुलगा माझ्या बाबांचा विद्यार्थी देव्हार्‍यात असे. आम्ही दिसलो की तो आम्हाला थोडा जास्त भाव देई. मूर्तीसमोर रेंगाळणं आणि हक्काचा नारळ "गुरुजी घ्या ना" म्हणून बाबांना तो देई. ते वय(आणि काळ) असं होतं की अशावेळी माझे बाबा सगळ्यांचे "गुरुजी" असल्याचा मला खूप अभिमान वाटे (खरं तर तो आजही वाटतो जेव्हा हे त्यांचे विद्यार्थी अचानक कुठे भेटतात आणि आवर्जुन हाक मारतात त्या त्या वेळी).

दर्शन झालं की मग हवं तसं त्या छोट्या जत्रेत फ़िरायची मोकळीक असे, अर्थात आई-बाबांबरोबरच.. त्यावेळच्या त्या जत्रा म्हणजे आणि त्यातूनही ही डोंगरीवर असल्याने मोठे पाळणे इ. नसत पण ती गोल गोल घोडे घेऊन फ़िरणारी आणि चार-पाच लाकडी पिंजरेसदृश्य पाळणे उभ्याने गोल गोल फ़िरतात म्हणजे तो पाळणेवाला हातानेच ते फ़िरत असतो ते असत आणि मला हे प्रकार विशेष आवडायचे नाहीत त्यामुळे त्यातली लोकांची मजा पाहाणे हेच होई. बाकी छोटी छोटी दुकानं मात्र बरीच असत. हातातल्या रबरी नळी कम दोर्‍याने वरखाली करणारे पाण्याने भरलेले फ़ुगे, आपटीबार (हा एक मस्त प्रकार नंतर काही आठवडे आम्हाला एकमेकांच्या पायाखाली अचानक फ़ोडून दचकवायला कामी येई) एखादं भातुकलीतलं खेळणं अशी खेळण्यांची छुटकू-मुटकू खरेदी होई.

अशा जत्रांमधुन रिंग फ़ेकणे हाही एक त्यावेळचा लोकप्रिय खेळ होता. तो माझे बाबा आणि दादा खेळत. फ़क्त एकदाच आम्हाला त्यात साबण आणि आगपेटीचं बॉक्स लागलं होतं हे आठवतं आणि तो आनंद मग आम्ही थोडी जादा मिठाई घेऊन साजराही केला होता जसं काही साबण आणि ते बॉक्स म्हणजे काय मौल्यवान वस्तू असाव्यात. बंदुकांनी फ़ुगे फ़ोडणे या स्टॉलवरही गर्दी असे आणि बाबा-दादा तिथेही वेळ घालवत.

खायच्या गोष्टींपैकी एक म्हणजे खजूर आणि दुसरं उकडलेले शेंगोडे आणि शेंगा हे घेतलं म्हणजे घेतलंच पाहिजे या कॅटेगरीतलं. पैकी खजूर आई बहुधा ते थंडीचे दिवस असायचे म्हणून घ्यायची पण मला वाटायचं ते फ़क्त इथेच विकायला येतात.

पण त्याहीपेक्षा माझ्या लहानपणी उकडलेले शेंगोडे हा प्रकार फ़क्त अशा देवाच्या जत्रेतच विकायला परवानगी असावी अशीच माझी समजूत होती.त्याचं काय व्हायचं आधी निर्मळची जत्रा असायची आणि मग वसईतल्या आसपासच्या चर्चेसचे सण म्हणजे एक स्पेशल रविवार जेव्हा तिथेही त्या गावचा उत्सव असे. माझ्या शाळेतल्या ख्रिश्चन मैत्रीणी तिथेही बोलवायच्या त्यामुळे तिथे आणि मग या दत्तजयंतीच्या यात्रेत अशाच ठिकाणी तो उकडलेले शेंगोडेवाला मी पाहायचे त्यामुळे वसईतल्या जत्रा म्हटलं की शेंगोडा माझ्या जीभेवर रूळायला लागतो. नंतर जरी इतर ठिकाणी किंवा भय्याकडूनही शेंगोडे घेतले गेले तरीही निव्वळ तिथले ते शेंगोडे खायला मला या सगळ्या जत्रांमध्ये पुन्हा तसंच जायला आवडेल.

आता ही पायपीट करुन दमलेलो आम्ही जर नेमकंच गिरीजमधलं कुणी ओळखीचं भेटलं तर त्यांच्या घरी दोन मिनिटांसाठी जावं लागे कारण हा त्यांच्या गावातला उत्सव म्हणून त्यांनी अगदी आपण सणाला जसे थोडं खायचं स्पेशल वगैरे केलेलं असतं तसंच केलेलं असे आणि त्यांचा मान मोडायचा नसतो असंही आई म्हणायची. सगळं आटपून किर्र अंधारात मग तिथूनच सुटणारी यात्रा स्पेशल बस पकडून घरी येईपर्यंत जत्रेतल्या आठवणी डोक्यात घोळत असत.

इतकी भाबडेपणे साजरी केलेली दत्तजयंती नेमकी कधी सुटली ते आठवत नाही. पण जवळजवळ विस्मरणात गेलेला हा सण अमेरिकेत आल्यावरही साजरा करायला मिळायला तो आमचा मित्र मंदार जोगळेकराच्या कृपेने. त्याच्या कोकणातल्या गावीही हा उत्सव साजरा होतो आणि त्याच्या मुलांना कळावा म्हणून त्याने त्याच्या घरी सुरु केला होता. मंदारच्या धीरगंभीर आवाजातल्या ॐकाराने सुरु होई. त्याच्या घरी एकत्र म्हटलेल्या आरत्या, जेवण आणि गाण्याचा एखादा कार्यक्रम याने माझ्या काही दत्तजयंत्या आणखी स्पेशल झाल्या.

आता पुन्हा एकदा दत्तजयंतीची पोकळीच आहे पण या आठवणी मात्र मला जेव्हा केव्हा मी माझ्या मुलाला दत्तजयंतीसाठी योग आला तर वर उल्लेखलेल्या मंदिरात घेऊन जाईन त्यावेळेपर्यंत निदान दिलासा देतील याची खात्री आहे. आणि खरं सांगायचं तर ही म्हणजे २०१० ची दत्तजयंती सुद्धा खासच आहे. पण त्याबद्द्ल लवकरच लिहेन त्या क्षणाचीही आठवण झाली की......:)

Wednesday, December 8, 2010

एका (फ़ूड) ब्लॉगरची यशोगाथा....

ब्लॉगिंगच्या विश्वात आलं आणि कुठेही दुसरा ब्लॉगर दिसला की का कुणास ठाऊक ’माझिया जातीचा’ मिळाल्यासारखं होतं. ’फ़ूड नेटवर्क’च्या ’नेक्स्ट फ़ूड नेटवर्क स्टार’ मध्ये जेव्हा आरतीच्या नावाखाली फ़ूड ब्लॉगर असं लिहिलेलं दिसलं तेव्हा तिला मी पाठिंबा देणार हे लगेचच लक्षात आलं; म्हणजे एकतर ब्लॉगर आणि त्यातही भारतीय वंशाची म्हणजे दुधात साखर.

आता या विषयावर पुढे लिहिण्याच्या आधी मला थोडं फ़ूड नेटवर्कबद्द्ल लिहून जरासं (किंवा नेहमीप्रमाणे दोन-तीन घडे) नमनाचं तेल घालणं अत्यावश्यक आहे. खाणं हा आपला अगदी आवडता प्रांत आहे हे नक्की केव्हा लक्षात आलं माहित नाही. पण आठवतं तेव्हापासून आपल्या भारतीय दूरचित्रवाणीवर ’खाना खजाना’ पाहणं हा एक आवडता छंद होता. त्यातली खरं सांगायचं एकही प्रकार मी करुन पाहिला नाही; पण त्यातली नावं लक्षात ठेऊन तसलं काही कुठल्या रेस्टॉरन्टमध्ये दिसलं की मनसोक्त हादडणं हे बरीक केलं. त्यानंतरही दावत का काय नावानं एक खास हैद्राबादी खाण्याचा शो रविवारी असायचा तेही आवडीने पाहिलं. एकंदरित कुणाला खाणं करताना पाहणं हे आवडतं इतपत कळलं. आणि त्याचा फ़ायदा असा की नवं काही खाऊन पाहायचं असेल तर साधारण आपल्याला काय आवडेल हेही लक्षात आले.

त्यानंतर जेव्हा अमेरिकेत आले आणि सुरुवातीला इथलं सोशल सर्कल कमी आणि नोकरीही नव्हती त्याकाळी रिकाम्या डोक्याला काही काम म्हणून इथल्या टी.व्ही.ची चॅनल्स धुंडाळायला सुरुवात केली.सध्याच्या घडीला जरी मला इथल्या कार्यक्रमांचीही थोडी-फ़ार सवय झाली असती तरी तेव्हा काही म्हणता काही आवडायचं नाही. अशातच एकदा फ़ूड-नेटवर्क सुरु केलं. साधारण अर्धा तासाचा एक या क्रमाने सतत सुरु असलेल्या कार्यक्रमांमधली विविधता पाहता या चॅनलला मी कधी ’हुक’ झाले कळलंच नाही. फ़क्त ’कुकिंग शो’ इतपत कार्यक्रम असतील असं जर कुणाला वाटलं असेल तर ते सपशेल चुकीचं आहे. खाणं बनवणं हे अर्थातच अविभाज्य अंग आहे पण खाण्याशी संबंधीत इतर कितीतरी गोष्टी जसं एखाद्या गावची स्पेशालिटी असलेल्या खाण्याची माहिती असलेला कार्यक्रम, ४० डॉलरमध्ये एका शहरात एक दिवसाचं तिन्ही-त्रिकाळ खाणं, एखादी विशिष्ट पाककृती बनवण्यासाठी लागणार्‍या सामुग्रीपासून ते भांड्या-कुंड्यापर्यंतच्या गोष्टींची तांत्रिक माहिती पुरवताना ती पाककृती करणं, अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांचं खाद्यवैशिष्ट्य जपणार एखादा उत्सव वा स्पर्धेची माहिती असे अनेकविध कार्यक्रमांनी भरलेलं हे चॅनल आहे.अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशात खाण्याची विविधता, सणां-वारांनिमित्ते केले जाणारे खाद्यप्रकार हे सर्व पाहता हे असं चॅनल आपल्याकडेच सुरु करावं असं मला सारखं वाटायचं. (मला फ़क्त वाटणार पण संजीव कपुरने त्या दृष्टीने सुरुवात केली आहे असं ऐकतेय..’ढापली बघ माझी आयडिया’ इतकंच म्हणू शकते मी) तर असं हे माझं लाडकं फ़ूड नेटवर्क. मागे म्हटल्याप्रमाणे जसं मायदेशातल्या कार्यक्रमामधलं मी काही स्वतः नाही बनवलं तसंच इथंही फ़क्त बाहेर खाताना काय खावं (किंवा खूपदा काय खाऊ नये) यासाठी इथे पाहिलेले विदेशी खाद्यकृती उपयोगी पडतात शिवाय आपल्या देशी पाककृतींना जेव्हा सगळाच देशी माल मिळत नाही तेव्हा पाट्या टाकायलाही इथे पाहिलेल्या माहितीचा उपयोग होतो.

या पार्श्वभूमीवर जेव्हा ’नेक्स्ट फ़ूडनेटवर्क स्टार’ही स्पर्धा भरवण्यात आली तेव्हा सारखं वाटायचं की यांना कुणीतरी थोडं भारतीय खाणंही खिलवलं पाहिजे. मागच्या की त्याच्या मागच्या सिझनमध्ये एक भारतीय महिला होतीही. पण ती फ़ार काळ टिकू शकेल असं सुरुवातीलाच वाटलं नाही. यावेळी मात्र चुलबुल्या (किंवा अगदी नेटका शब्द बबली) आरतीला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातली चमक काही वेगळं सांगुन गेली. अगदी पहिल्या भागातच हीचं पाणी वेगळं आहे हे जाणवलं. आणखी भरीस भर म्हणजे तिची ओळख एक फ़ूड ब्लॉगर म्हणून करुन दिल्याने तर तिच्या या उडीचं कौतुकच वाटलं.त्यानंतर प्रत्येक भागात तिलाच सपोर्ट करत राहिलो.

या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय जन्माच्या आणि दुबईत वाढलेल्या आरतीचा ब्लॉग पाहिला आणि ती आपल्यासारखीच एक सर्वसाधारण ब्लॉगर आहे हे लक्षात आलं. तिच्या ब्लॉगवर तिचे यु ट्युबवरचे आरती पार्टी नावाने तिने घरच्या स्वयंपाकघरात बनवलेल्या खाद्यपदार्थांचे व्हिडिओ आहेत आणि बर्‍याच लोकांना त्यामुळे भारतीय पदार्थांची माहिती आवडल्याचं कळतं...शिवाय तिच्या लिहिलेल्या पाककृत्यांनाही तिच्या आईकडच्या किंवा इतर काही छोट्या छोट्या कहाण्या आहेत ज्या ती अतिशय रसभरीत वर्णन करुन मांडते त्यामुळे तिचे पदार्थ, त्यांची नाव, कृती हे सगळं नेहमीसारखं साहित्य आणि कृतींमध्ये अडकलेल्या पाककृतींपेक्षा, वाचताना आणि पाहताना तिच्या जगात आपल्याला घेऊन जातात. माझ्यासारखे प्रेक्षक, सगळेच पदार्थ तयार करणारे नसले तरी अशा कृती लक्षात नक्कीच राहतात आणि कुठेतरी त्यातला काही भाग आपल्या एखाद्या पाककृतीला वेगळा टच द्यायला नक्कीच मदत होते. तिला पदार्थ करताना पाहाणं हाही एक वेगळा अनुभव असतो. तिचं हास्य आणि एकंदरित लाघवी बोलणं तिला पाहत राहायला नक्कीच भाग पाडतं...बाकी नेहमीच्या घरगुती गोष्टी म्हणजे तिच्या कलाकार नवर्‍याची चित्रफ़ीत किंवा एखाद्या ट्रीपचा उल्लेख असं नेहमीचं मॅटरही आहेच..एवढंच नाही तर ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर घरी केबल नसल्यामुळे सध्या we’ll be watching an episode with a different set of cable-having friends! हे तितक्याच साधेपणाने ती जूनमधल्या एका पोस्टमध्ये लिहून जाते. सध्या तिच्या मेलबॉक्समध्ये १३०० मेल आणि साधारण ५९० कॉमेन्ट्स आहेत आणि सगळ्याच लोकांकडून तिला तुफ़ान कौतुक मिळतंय ही एका ब्लॉगरसाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे.


दहा आठवडे चालणार्‍या या स्पर्धेत वेगवेगळ्या प्रकारे स्पर्धकांकडून पाककृती बनवुन घेण्यात येतात.पदार्थांची चव हा मुख्य भाग असला तरी इतर अनेक बाबींवर त्यांचा कस लागतो. आयत्यावेळी देण्यात आलेले मुख्य पदार्थ, एखाद्या थीमप्रमाणे पदार्थ बनवणे म्हणजे जसं बाटलीबंद प्रकार बनवायचा झाल्यास तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्रॅंडसाठी काय बनवाल, मोठ्या पार्टीसाठी दोन स्पर्धकांनी एकत्र खाणं बनवणं किंवा एक दिवस दोघांनी मिळून फ़ूड ट्रक मॅनेज करणं, असं बरचसं काही यावेळी विविध भागात होतं. प्रत्येक भागात निदान एकतरी कॅमेर्‍यासमोर विशिष्ट वेळात एका पदार्थाचं सादरीकरण हेही फ़ार महत्वाचं.कारण शेवटी अंतिम फ़ेरीच्या विजेत्याला फ़ूड नेटवर्कवर स्वतःचा शो मिळणार, तेव्हा त्या व्यक्तीचा कॅमेरासेन्स कसा आहे हे कळणं फ़ार महत्वाचं. शेवटचा भाग म्हणजे अंतिम फ़ेरीला तर एका सेलेब्रिटी शेफ़च्या हाताखाली एक संपुर्ण भागच रेकॉर्ड करणं. हे वाचतानाच थोडं अवघड वाटतं तर प्रत्यक्षात ते सगळं दडपण आणि शेफ़ असणारे इतर स्पर्धक यांच्यावर मात करायची म्हणजे खरंच अंगात खाद्यवेडंच हवं.

आरतीला जेव्हा जेव्हा कॅमेर्‍यासमोर पाहिलं तेव्हा तेव्हा का कुणास ठाऊक हिच्यात हे उपजतच आहे असं नेहमी वाटलं. अपवाद फ़क्त एकाच भागाचा जेव्हा तिला एक मिनिटांत त्या पदार्थाबद्द्ल बोलताना खूप गोंधळायला झालं होतं. पण ती कसर तिने त्याच भागातल्या उरलेल्या पाककृती चविष्टपणे करुन मात केली. प्रत्येक भागात एक त्या भागासाठी विजेता असे आणि त्यातही ती बरेचदा सरस ठरली.

तरीही अंतिम भाग हा थोडा रिस्की असतो कारण त्यात आपली खरं तर स्वतःशीच स्पर्धा असते. कारण दुसरा काय करतो, कुठला मुख्य पदार्थ असल्या गोष्टींशी काही घेणं-देणं नसतं. त्यात तुम्ही कुठला पदार्थ निवडता आणि त्यामागची कथा सांगत तो कशा प्रकारे सादर करताना कॅमेर्‍याला कशा प्रकारे सामोरे जाता, वेळेत पदार्थ बनवता तसंच प्रेक्षक जो या पदार्थाची चव पाहणार नाही त्यालाही कशा प्रकारे उत्तेजित करता हे महत्वाचं. आरतीने यात चक्क पिझ्झा बनवला होता आणि तेही त्याला एक भारतीय टच देऊन. एकंदरितच तिच्या पाककृतींची नावं आणि त्यामागची पार्श्वभूमी यामुळे कार्यक्रमात इतकी रंगत येते की तिला ते बोलताना आणि पदार्थ करताना पाहाणं हा एक छान अनुभव असतो. तिच्या या हसतमुख, विनोदी आणि बोलबोलता एखादी जादा माहिती देण्याच्या पद्धतीमुळे शेवटी तीच वरचढ ठरली आणि एका फ़ूड ब्लॉगरने फ़क्त एक स्पर्धाच नाहीतर अमेरिकेच्या फ़ूड नेटवर्कवर आपल्या हक्काची एक जागाही मिळवली.


मला वाटतं ब्लॉगिंग करणार्‍या प्रत्येकानेच कौतुक करावं अशीच ही घटना आहे. ही पोस्ट लिहितानाच आरतीचा ’आरती पार्टी’चा पहिला भाग सुरु आहे आणि प्रथमच फ़ूड नेटवर्कवर आपला अस्सल देशी स्वयंपाकघरी मस्ट असलेला स्टीलचा हळद-मसाल्याचा डब्बा दिसतोय...हे पाहताना मी वाट पाहातेय आपल्या एखाद्या मराठी फ़ूड ब्लॉगरला अशाच प्रकारे स्वतःचा शोची तयारी करताना पाहण्याची.

ता.क. ही पोस्ट दीपज्योतीच्या २०१० अंकासाठी लिहिली होती. ब्लॉगवर पुन्हा प्रकाशीत करतेय.

Monday, December 6, 2010

गाणी आणि आठवणी ७ - सप्तसुर

सारखं जुन्याच गाण्यांनी मन रिझवायचे दिवस सुदैवाने कमी झाले आहेत आणि त्याला कारण आहेत सारे नव्या दमाचे मराठी संगीतकार आणि गायक कलावंत. असंच एकदा ’मराठी बाणा’ पाहायला दिनानाथला गेलो होतो तेव्हा मध्यंतरात लालबागच्या एका विक्रेत्यांचा मराठी सीडीजचा स्टॉल होता. त्यात हपापलेली खरेदी झाली हे वेगळं सांगायला नको आणि त्यातच हाती लागला दोन सीडीजचा हा टवटवीत अल्बम "सप्तसुर"...Generation Next....


मुख्यपृष्ठावर ओळखीचे चेहरे आणि आत पहिलंच ’मन उधाण वार्‍याचे’ हे तेव्हा एकमेव ओळखीचं गाणं पाहून आणि ऐकुया नंतर निवांत असा विचार करुन घेतलेला संच. परदेशात नाइलाज म्हणून गाणी डालो केली जातात पण जेव्हा संधी मिळते तेव्हा संग्रहासाठी मी शक्यतो आवडीच्या गाण्यांना विकत घेतेच.तसंच थोडंसं...

परत परदेशी आल्यावर गाणी अर्थातच ऐकली गेली. पण खर्‍या अर्थानं पारायणं झाली ती बरोबर मागच्या वर्षी ओरेगावात आलो तेव्हा. अरे हो! वर्ष झालं नाही या नोव्हेंबराखेर? नवी जागा आणि नेमका इथल्या भाषेतला "हॉलिडे सिझन".आल्याआल्या कुठली जागा आवडायला आणि इतका ३००० मैलाचा प्रवास, सामान लावणं इ. दगदगीमुळे फ़िरतीचं प्लानिंग करण्याचं त्राण अर्थातच नव्हतं. त्यावेळी मग एखाद्या दुपारी जेवणं झाली की गाडी काढून थोडंफ़ार गुगलून आसपासचा परिसर धुंडाळताना नेमका हाच संच गाडीत असल्यामुळे सारखा ऐकला गेला आणि या गाण्यांशी वेगळं नातं जुळलं गेलं.

त्यात आणखी एक योगायोग म्हणजे यातली जास्तीत जास्त गाणी पावसाची आहेत आणि इथे नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे संततधार (आणि तुरळक बर्फ़) मोसम. त्यामुळे वैशालीच्या आवाजातलं "भुईवर आली सर, सर श्रावणाची" ऐकलं की आम्ही इथल्या एका सिनिक ड्राइव्हला जातोय आणि पाऊस पडल्यामुळे खाली आलेले ढग पाहताना घरी आलेला कंटाळा विसरतोय हेच दृष्य कोरलं गेलंय. तर अवधूतच्या संगीत आणि आवाजातलं "पावसा येरे पावसा" आणि "थेंबभर तुझे मन" थोडं रॉकच्या शैलीत असलं तरी एकदा थंडी असतानाही थोडं ऊन होतं म्हणून गेलेल्या कॅनन बीचवर उधाणलेल्या सागराची आठवण करुन देतो. "स्पर्श" हेही अवधूत आणि वैशालीच्या आवाजतलंच आणखी एक रॉक धर्तीतलच पण एकंदरित आपण "फ़्रेश" म्हणतो तसं गाणं ऐकताना मला इथला पाऊस आठवतो. खरं तर यातल्या जवळजवळ सगळ्याच गाण्यांना मी माझ्या इथल्या सुरुवातीच्या थंडी-पावसाचे दिवसांच्या आठवणींशी जोडू शकते.


सगळीच गाणी रॉक स्टाइल आहेत असं नाही आहे. सुरुवात "मन उधाण वार्‍याचे" हे सगळ्यांनाच माहित असलेलं गाणं आणि नंतर साधना सरगम यांच्या आवाजातलं "रंग रंग रंगा ग" हे एकदम झोपाळ्यावर टाळ्या घेत म्हटल्यासारखं, मन ताजंतवानं करणार्‍या गाण्यांनी होते आणि मध्ये पुन्हा मूड बदलुन पावसाची किंवा संगीतकार अशोक पत्की यांचं "राधा ही बावरी"चाही समावेश या अल्बममध्ये आहे. पावसाच्या गाण्याबरोबरच अचानक बासरीसारखं गोड श्रेया घोषालच्या आवाजातलं "हरि हा माझा प्राण विसावा" हे गाणं माझं अत्यंत आवडीचं गाणं झालंय. तिचंच आणखी एक "अजुन तरळते" हेही कृष्णावरचं गीतही सुरेख झालंय.या दोघांचं संगीत "मिलिंद जोशी" यांचं आहे.

हे सगळं इतक्या सविस्तर सांगण्याचा उद्देश म्हणजे जास्त काही माहिती नसताना एखादी सिडी उचलली जाते, ती सुरुवातीला सहज म्हणून ऐकली जाते आणि मग एका विशिष्ट वातावरणाशी तिचा मेळ जुळतो तेव्हा त्यातली सारीच गाणी कशी लाडकी होतात याचं माझ्यासाठी उत्तम उदाहरण माझ्यासाठी हा संच आहे. ही गाणी ऐकली नसती तर कदाचित माझे सुरुवातीचे ते दिवस खूप कंटाळवाणे झाले असते, तो पाऊसही नकोसा झाला असता.

परदेशातली विशेषतः अमेरिकेतली कुठली नवी जागा ज्यांनी हिवाळ्यात पहिल्यांदी पाहिली आहे त्यांना मला काय म्हणायचंय ते नक्की कळेल.अशावेळी अशी फ़्रेश गाणी दिल्याबद्दल मी "सागरिका"चे आभारच मानले पाहिजेत...आणि त्या अनाम विक्रेत्याचे ज्याने त्यादिवशी खूप छान छान मराठी सीडीज तिथे आणण्याचं काम केलं..नाहीतर त्या फ़ेरीत हवी ती मराठी गाणी कुठे विकत घ्यायची हा एक यक्षप्रश्नच झाला होता. (आणि अद्यापही आहे...है क्या कोई मुझे राह दिखानेवाला?)

आता पुन्हा एकदा तोच पाऊस सुरु झालाय आणि त्याच सीडी मी पुन्हा आठवणीने गाडीत ऐकायला सुरुवात केली आहे. फ़रक इतकाच की आता ती गाणी माझ्या तोंडावर कडव्यांसकट आहेत.

Friday, December 3, 2010

बाहुली गं तू.........

बाहुली आणि मुलगी यांचं एक वेगळं भावविश्व, नातं असतं..दोघी वयाप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका जगतात...मर्जी अर्थातच मुलीची.पण आपलं सारं ऐकणारी,कधी खेळातली बबडी, मग थोडं मोठं झाली की विद्यार्थी, मैत्रीण असं वयानुसार बदलत जाणार हे एक वेगळं जग. मला बाहुल्या आवडतात हे मला मी बरीच मोठी झाल्यावर कळलं का असं मला काहीवेळा वाटतं. म्हणजे लहानपणी मला हवीतशी डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली मिळणार नाही हे माहित होतं त्यामुळे मी नक्कीच खट्टू झाले नाही. तसंच मावशीकडे तिच्या मुलीला कुणीतरी परदेशातल्या मित्राने दिलेली, भुर्‍या केसांची आणि नुस्तं डोळे उघडमीट करणारी नाही तर चक्क तोंडातलं पॅसिफ़ायर काढल्यावर रडणारी बाहुली पाहिली की तिचा हेवा वाटला तरी ते तेवढ्यापुरतंच होतं. त्यानंतर जेव्हा माझ्या भाचीला सुंदर बाहुलीबरोबर पाहिलं होतं आणि खरं तर तोवर मी नोकरीला वगैरे लागले होते तरी त्यावेळी पुन्हा एकदा बाहुली या प्रकरणाच्या प्रेमात मी पडले होते..एखाद्या खर्‍या व्यक्तीबरोबर बोलावं, वागावं तसे बाहुलीबरोबरचे तिचे संवाद ऐकणं हाही एक मस्त अनुभव होता.त्यानंतर मी जेव्हा बंगळुरुला गेले होते तेव्हा "कावेरी"मध्ये सात-आठ लाकडी छोट्या बाहुल्यांचा एक सेट घेऊन ऑफ़िसमधल्या मैत्रीणींना द्यायलाही सुचलं होतं.


अमेरिकन गर्ल दुकान

हे सगळं खरं तर वैवाहीक आयुष्यात आल्यावर सुरुवातीला तरी विसरायला हरकत नव्हती. पण २००४ मध्ये एक दोनदा नव्हे तर बरेचदा न्यु-यॉर्कला वकिलातीच्या कामासाठी जावं लागलं; त्यावेळी एकटीने भटकताना एक दुकान गवसल्यामुळे पुन्हा एकदा बाहुली प्रकरण माझ्यामागं लागलंच..

काही कामानिमित्त नवर्‍याला युरोप वकिलातीत जवळजवळ संपुर्ण दिवस बसायला लागलं आणि मला तो दिवस एकटीने न्यु-यॉर्क शहर भटकायची संधी मिळाली..खरं तर ही एकदाच नाही बर्‍याचदा मिळाली आणि प्रत्येकवेळी मी वेगवेगळा भाग पालथा घालुन त्या संधीचं सोनं केलंय.पण यावेळी जरा बाहुलीयोग नशीबात होता असं दिसतंय.

मिळून सार्‍याजणी
न्यु यॉर्क हे एकतर माझं लाडकं शहर, माझ्या लाडक्या मुंबईची आठवण (तुलना नाही) करुन देणारं. जिथे अमेरिकेत इतरत्र न दिसणारी माणसांची वर्दळ, रस्त्यावर खाऊच्या आणि छोट्या-मोठ्या खरेदीच्या घासाघीस करायची संधी देणार्‍या गाड्या असं सारं असतं. तिथं माझ्यातल्या मुंबईकरणीला एकटीनं फ़िरण्यात गम्मत न वाटली तर नवलच. यावेळी मी पेनस्टेशनला उतरल्यावर सिटीत शिरण्याच्या आधीच एक छोटं शहर भटकंतीचं पुस्तक होतं ते घेऊन ठेवलं होतं....

विविध रुपातली ’गर्ल’
त्यात कुठेतरी "अमेरिकन गर्ल" असा एका दुकानाचा उल्लेख होता आणि त्याबद्दलचं वर्णन पाहुन मला आतमध्ये हे दुकान कसं असेल याची उत्कंठा होतीच...त्यानुसार माझी पावलं मी मॅनहॅटनच्या अगदी मुख्य विभागात पाचव्या ऍव्हेन्यु आणि एकोणपन्नासाव्या रस्त्याच्या दिशेने पावलं वळवलीच. दुकान उघडायला थोडावेळ होता पण बर्‍याच मायलेकींच्या जोड्या तिथे घुटमळताना दिसत होत्या त्यानुसार आपली निवड चुकली नाही याची खात्री मला आधीच होत होती..थोडावेळ इथे तिथे भटकुन पुन्हा मी दुकानात आले तोवर ये-जा (खरं तर जा नव्हतीच नुस्ती येच होती सकाळी) सुरु झाली होती...आणि मीही आत काय असेल याची कल्पना करत आतमध्ये गेले..



मालिकेत झळकलेली पहिली ’गर्ल’
 थोडी मोठी बाहुली असणार हे अपेक्षित होतं पण तिचं ते हुबेहुब मुलीचं वाटावं असं रुपडं पाहुन मी तर तिच्या प्रेमातच पडले..तिला अनेक रुपात सजवलेलं एक मोठं कपाट स्वागतालाच होतं तिथेच तिला पाहताना बराच वेळ गेला. ही अमेरिकन गर्ल, केली, साध्या शब्दात सांगायचं तर एक ब्रॅन्डेड बाहुली. ही आणि हिच्या अशाच सख्या..त्यात अमेरिकेतल्या टिव्हि शोवर पहिल्यांदा झळकणारी सॅमान्था, माझ्याकडे आता असलेली कर्स्टन आणि अशा बर्‍याच मैत्रीणी आहेत. हे तीन मजली दुकान म्हणजे या बाहुल्यांचा इतिहास (अमेरिकेत इतिहास या शब्दाची व्याख्या वर्तमान अशीही असावी असं माझं मत पक्कं करणारं आणखी एक स्थान..असो...) आहे. हे या बाहुल्यांचं संग्रहालय आहे तसंच तिच्यासाठी वन स्टॉप शॉप म्हणावं अशी जागाही.


केशकर्तनालयात


तळमजल्यावर जवळजवळ सगळ्याच अमेरिकन गर्लचं कलेक्शन, वेगवेगळे कपडे आणि इतर ऍक्सेसरीज घेतलेलं तिचं रुपडं, तिच्या खोल्या, वस्तुंसकटचं तिचं वावरणं याचं दालन आहे...ते सर्व हरखून पाहताना आपण वेळेचं गणित कधीच विसरुन जातो. इतकं तिच्या प्रेमात पडायला होतं की एक घ्यावी का असा खट्याळ विचारही मनात येतो पण १२० डॉलर पाहुन विस्फ़ारलेले डोळे तो खट्याळपणा अर्थातच विसरायला भाग पाडतात...

मग पहिल्या माळ्यावर चक्क या बाहुलीसाठी एक हॉस्पिटल आहे..त्यांची इमर्जन्सी सर्विसपण आहे म्हणे...एखादीच्या (इतक्या महागड्या) बाहुलीला जर काही दुखापत झाली तर मग हॉस्पिटल हवंच नाही का? म्हणजे आणखी थोडे पैसे खर्च करुन का होईना पण परत तिच्याशी खेळता तरी येईल. इथल्या डॉक्टरशी बोलायला हवं होतं पण आणखी एक मजला होता त्यामुळे सरळ पुढे गेले.

एकसारख्या मायलेकी

तिथे तर चक्क बाहुलीसाठी सलान म्हणजे आपल्या भाषेत केशकर्तनालय आणि एकंदरित ब्युटिपार्लरही होतं..तिथे बाहुलीला बसवायला छोटीशी न्हाव्याच्या दुकानात असते तशी वर-खाली होणारी खुर्ची आणि बर्‍याचशा स्पेशालिस्ट होत्या...लोकं इथे येत असतील का असा प्रश्नच पडायला नको..गोर्‍या गोर्‍या छोट्या अमेरिकन मुलींची त्यांची त्यांची बाहुली घेऊन रांग लागली होती. कुणाला तिची हेअरस्टाइल बदलुन हवी होती, कुणाला तिचे केस थोडे कमी करायला हवे होते...काहींना चक्क तिची आणि स्वतःची हेअरस्टाइल मॅच करायची होती..हम्म... ’बडे बडे देश में छोटी छोटी बाते’ मी याची देही पाहात होते...

बाहुलीची किंमत एकदा पाहिल्यावर कुठल्याच दुसर्‍या किमती काढायच्या मी भानगडीत पडले नाही. इथे बाहुलीसाठी केसाच्या पिना, मॅचिंग पर्सेस अशा बर्‍याच गोष्टी विकायला होत्या तसंच छोटे आणि मोठे एकसारखे दिसणारे ड्रेसही होते..ती सोय होती तुमची बाहुली आणि तुम्ही एकसारखं दिसण्यासाठी केलेली सोय...माझ्या नशिबाने तशी एक जोडी मला तिथेच दिसली. मग तिच्या आईला विचारुन मी त्या दोघींचा एक फ़ोटोही काढला.


इतक्या सोयी आहेत मग एक छान शेजघर नको?
 बाहुली प्रस्थ कमी पडलं म्हणून की काय इथे एक ऍन्जेलिना नावाची उंदीराच्या कुटुंबालाही ब्रॅन्डेड केलेलं दिसलं..त्याचं इटुकलं घर, त्यातल्या खर्‍याच वाटणार्‍या इटुकल्या घरगुती गोष्टी पाहुन मला तर एक क्षण इथल्या अमेरिकेत वाढणार्‍या मुलींचा हेवाच वाटला...

बघता बघता दोनेक तासही सहज गेले असतील...जेवायची वेळ झाली होती हे पोटात ओरडणार्‍या बाहुल्या आपलं कावळे सांगत होते पण तरी पाय निघत नव्हता..मग शेवटी हो-ना करता मी एक छोटी बाहुली आठवण म्हणून घेतलीच..कर्स्टन नावाची...आमच्या लग्नाच्या मासिक वाढदिवसातला कुठला तरी वाढदिवस तेव्हा नुकताच होऊन गेला होता. हे खेळणं मी त्याचं गिफ़्ट अशा नावाने चिकटवुन नवर्‍याला तेव्हा फ़ोनवर पटवलं होतं...माझी एक सवय आहे मी स्वतः माझ्या मर्जीने काहीही खरेदी करु शकत असले तरी थोडावेळ हो-ना मध्ये त्याचं डोकं खाल्याशिवाय बहुतेक मला करमत नसावं किंवा त्या खरेदीला हे आपण एकत्र ठरवून घेतलंय असं गोंडस नाव त्यामुळे देता असं असंही असेल..असो....

कर्स्टन

या अमेरिकन गर्लनंतर मात्र महागडी कुठलीही बाहुली मी घेतली नाही....बाहुली घेतली तरी तिला घेऊन खेळत बसण्याचे दिवस केव्हाच संपलेत किंवा ते आले तरी होते का असंही वाटावं इतक्या दूर ते गेलेत....पण छोट्या छोट्या बर्‍याच बाहुल्या मी अधेमधे घेतल्या...इथे मिळणार्‍या पाठीला सपोर्ट लावुन उब्या केलेल्या किंवा बसवता येणारी एक कलेक्टिबलमधली बाहुली पण सॅव्हानाच्या ट्रिपमध्ये घेतली...मला वाटतं अमेरिकन गर्ल या दुकानात मांडलेल्या त्या वेगवेगळ्या रुपातल्या बाहुलीने माझ्या मनातही बाहुल्यांसाठी एक घर केलं असावं....फ़िलीमधल्या घरी माझ्या प्रत्येक खिडकीवर एक एक बाहुली होती..त्यावेळी आमच्याकडे घरी आलेल्या कुणीतरी मला म्हटलेलं आठवतं इतक्या बाहुल्या आहेत तुझ्याकडे पुढच्यावेळी तुला काय गिफ़्ट द्यायचं ते बरोबर लक्षात येईल...ओरेगावातही जपुन सार्‍या बाहुल्या आणून त्यांनाही नव्या जागा शोधुन दिल्या...

आज बर्‍याच दिवसानंतर मित्राच्या मुलीला पहिल्या वाढदिवसासाठी भेटवस्तु पाठवायला बाहुल्या आणि असंच टिपिकल मुलींच्या वस्तू शोधताना पुन्हा एकदा हरखलेय आणि लक्षात आलंय की माझ्या कर्स्टनच्या केसांची मुलानं वाट लावलीय...तिला काय आता त्या सलानमध्ये नाही नेणार पण कदाचित ही पोस्ट संपल्यावर ते ठीक करुन तिला कुठेतरी जरा वर ठेऊन देईन....मुलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी आणि अर्थातच माझी एक मलाच माहित नसलेली आवड आठवणीत आणून देण्यासाठी.

Tuesday, November 30, 2010

जिप्सीचा चायनीज मार्ग

आजकाल काय होतं कळत नाही पण बहुधा हा इथल्या थंडी, पाऊस आणि बहुदा जरा जास्तच लवकर आलेल्या बर्फ़ाचा परिणाम असावा असं वाटतं पण सारखं चायनीज खायला हवंय आणि तेही आपलं भारतीय चायनीज असंच..ते इथे तसंही मिळणार नाहीच. अर्थातच आपल्या चवीचं चायनीज खायला मी मुंबईत आले की आवर्जुन कुठे न कुठे जाते. अगदी पहिल्यांदी मी चायनीज खाल्लं होतं ते दादरला चायना गार्डनमध्ये आणि खरं सांगते एकतर त्यांचं सूप पिऊनच माझं पोट भरलं होतं आणि त्यात अमेरिकन चॉप्सी हे प्रकरण मला अजिबात झेपलं नव्हतं...नशीब एक राइस पण मागवला होता. पण तरीही नंतर कधीतरी ती गोडी लागलीच..आणि इतकं झालं तरीही कधीही जिप्सीच्या आत जाऊन चायनीज खाल्लं नव्हतं..मी आणि माझी मैत्रीण नेहमी जिप्सी कॉर्नरमध्येच काहीतरी चटरमटर खाऊन आपल्या बाहेर यायचो.नाहीतर नेब्युलामध्येही जायचो.पण जिप्सीच्या आत कधीच गेलो नाही.


यावेळी मात्र जिप्सीच्या आत जायचा योग होता. एक म्हणजे आम्ही थोडं द्राविडी प्राणायाम करुन आलो होतो...झालं काय की थोडं मुंबईदर्शन करावं म्हणून सिद्धीविनायकापासुन सुरुवात करुन मग वरळी, गेटवे असं फ़िरलो आणि संध्याकाळ झाली तेव्हा मला अचानकपणे दिल्ली दरबार कुठं ते आठवेचना. बरं मे महिना म्हणजे घामाच्या धारा वाहायला लागल्या होत्या..कुणाला विचारायचं नाही हा एक अलिखित नियम करुन बसलेला माझा नवरा सरळ एक कुलकॅब करुन दादरला जाऊया आणि मस्तपैकी खाऊया म्हटल्यामुळे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी फ़क्त कुलकॅबवाला भैय्या आहे हे पाहिल्यावर आधी एसी सुरु आहे नं इतकं विचारुन घेतलं...मजा म्हणजे त्या कुलकॅबने गाडी वळवली आणि दिल्ली दरबारचा बोर्ड मला दिसला..म्हणजे जिसे ढुंढा गली गली प्रकरणासारखंच होतं पण आता काही उतरणं शक्य नव्हतं...

मग आलो ते सरळ जिप्सी आणि आत थंड हवेत बसायचं म्हणून आपसुकच आत गेलो.आमच्या मुलाला तिथे काय तेजी आली होती कळत नाही पण लेकाने आम्हाला वैताग आणण्याचे सगळे प्रकार त्यादिवशी करुन झाले. पण आमचा वेटर मात्र फ़ारच चांगला होता. ज्या टेबलवर आम्ही बसलो होतो योगायोगाने ते आत्ताच निर्वतलेले माझे लाडके चंद्रलेखाचे मोहन वाघ यांच्या आठवणीसाठी होतं. आम्ही आधी सुप मागवायचं ठरवलं पण नेमकं गुरुवार होता आणि मी शाकाहारी होते त्यामुळे त्याने आणि मी वेगवेगळी सुपं डिशेस मागवली. वेटरने आमची गडबड ओळखली बहुधा म्हणून त्याने आम्हाला मुख्य जेवण मागवताना हाफ़ डिश (म्हणजे हाफ़ राइस इ.) पण मागवता येईल हे सुचवलं...आणि एकदम मला मी कुठून आलेय (काय गं अलिबागहून आलीस का? मधलं) असं झालं..म्हणजे याआधी हे इतकं सराइत होतं नं तरी मी आता अगदी विसरुनच गेले होते की असे हाफ़ ऑप्शन्सपण असतात म्हणून.

असो..एकदा ती चायनीज चव तोंडाला लागली की समोर आलेलं खाणं कसं चटाचट संपतं हे काही वेगळं सांगायला नको.आत्ता नुस्ते फ़ोटो पाहिले तरी जीव जातोय मग म्हटलं की एकट्यानेच कशाला हा छळ सहन करा? ब्लॉगवरही टाकुया. त्यादिवशी लक्षात आलं की जिप्सीचं चायनीज छान आहे आणि मुख्य त्यांचं (किंवा त्यादिवशीच्या आमच्या वाढपीचं) अगत्य भारी आहे. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाण्याचे पर्यायही आहेत. माझ्या नवर्‍याने मेन्यु पाहून अर्थातच मी भारतात आल्यावर तरी कुठलेच वार पाळणार नाही असं जाहिर केलं पण मी मात्र गुरुवार पाळला. एकदम केव्हातरी लेकाला डायव्हर्जन थिअरम (हम्म इस बात पे थोडा डिटेल डालना चाहिए पण आज फ़क्त खा खा होतेय सो...फ़िस कभी) म्हणून फ़ोटो काढताना लक्षात आलं त्यावेळी काढलेले फ़ोटो आहेत त्यावरुन आठवतेय की आम्ही काय काय खाल्लं होतं..सुपाचे तर फ़ोटोही दिसत नाहीत.

पण खरं सांगु का जसं आवडत्या व्यक्तीच्या फ़क्त आठवणीवर जगणं कठीण आहे, तसंच आवडत्या खादाडीच्या फ़क्त आठवणींवर जगणंही खूप कठीण आहे..सध्या प्रत्यक्ष अनुभवतेय. त्यामुळे या चटकदार पोस्टचा शेवट वेगळ्या अर्थाने जीवाला चटका लावतोय...

Thursday, November 25, 2010

तो, ती आणि (त्यांना पाहणारा) तो

शुक्रवारची सकाळ....आठवड्यातील शेवटचा का होईना पण कामाचा दिवस. तो जरा लवकर उठून आवरतोय. शेजघरात ’तो’ आणि ती अद्याप साखरझोपेत आहेत.

तिच्याकडे पाहताना तो सुखावतो. ’अशी शांत झोपलेली शेवटी केव्हा पाहिली होती बरं?? किती घाईचं झालंय आयुष्य?’ सकाळी उठून भराभर आवरुन ’त्या’ला घेऊन पळायचं ते मावळतीला ’त्या’ला घेऊन उगवणार. तिला कधी पाहणार! खरं तर काल ती पण जरा उशीराच झोपली होती. ऑफ़िसचं काही काम करत बसली होती. तेही ’त्या’ला झोपवायचं काम झाल्यावर.

तिचे थोडेसे विस्कटून कपाळावर आलेले केस, शांत झोपलेला चेहरा पाहताना हळुहळु जवळ जाऊन पुर्वी उठवायचो तसं काही करायला हवं.......त्याच्या मनात हा विचार येतो तितक्यात ’तो’ झोपेतच हसतो. नुसतं ओठ विलगुन नाही तर थोडसं खदखदा.

’किती वाजले? बापरे सव्वा आठ! उठवायचं का दोघांना एकदमच? ती तशीही उठेल पण ’त्या’ची झोप मोडायला फ़ार जीवावर येतंय. रात्री झोपतानाचा दंगा....आधी सगळ्या गाड्या,ट्र्क, विमानं यांना स्वतःच्या बिछान्यात झोपवून नंतर स्वारी तिच्या कुशीत दमदाटी केल्यावर झोपलीय. असा शांत, जागा असताना क्वचितच असतो नाही? हम्म........काय करणार आपल्या ऑफ़िसच्या रुटीनला तोही जुंपला गेलाय. किती वाटलं त्याला घट्ट जवळ घेऊन झोपावं तरी शुक्रवारी ते शक्य नाही. उद्या नक्की.."त्या"च्या भाषेत ’उद्या तुत्ती’.........’

इतक्यात तिलाच जाग येते. त्याच्याकडे बघता बघता घड्याळाकडे पाहात ती पुटपुटते. ’उठवलं नाहीस?’ तिचं ऐकलं न ऐकलं करुन नकळत तो म्हणतो ’छान झोपली होतीस’ ती प्रसन्न हसते. या एका वाक्याने तीही भूतकाळात पोहोचते आणि सकाळी त्याने उगाच ’गुड मॉर्निंग’ म्हणण्यापेक्षा जास्त छान वाटतंय अगदी पूर्वीच्या फ़क्त दोघांच्या सकाळींमध्ये पोहोचवणारं असा विचार करते.

’तो आता कसा हसला ऐकलंस?’

’अरे नाही रे..’

दोघांचं लक्ष शांत झोपलेल्या ’त्या’च्याकडे जातं आणि दिवसाच्या रहाटगाडग्याला जुंपण्यासाठी त्याला कुणी उठवायचं अशा प्रश्नार्थक नजरेने ते एकमेकांकडे पाहतात. पण इतका वेळ त्या दोघांना पाहणार्‍या त्याने आजच्यासाठी थोडं जास्त ठरवलं असतं. ’त्या’ला हळुहळु उठवत आज सर्वांसाठी ऑम्लेटचा नाश्ता बनवण्यासाठी तो सज्ज होतो..................तिला फ़क्त उठून, स्वतःचं आवरुन न्याहारीला बसायचं असतं.



तळटीप....अशा बर्‍याच सकाळी, दुपारी, संध्याकाळी मला न मागता मिळतात. त्यासाठी नेहमीच माझं स्टेटस नोकरी करणारी होते असंही नाहीये किंवा उगाच "हे तुझं काम हे माझं" असले वाद मध्ये न येताच ते आपसूक समोर आलंय...या परदेशात मी जास्त काय अपेक्षा करु? याला माझीच नजर लागु नये म्हणून ही तळटीपेची तीट लावतेय. काहीवेळा ’तो’ त्या गाठी वर का बांधतो याची उत्तर मिळायला अवधी द्यावाच लागतो. पण नंतर कळतं की "त्या"ची निवड चुकली नाहीए...

जवळच्या व्यक्तींबद्द्ल लिहिताना मी नेहमीच अडखळते.....पण नेमकं काय सांगायचंय हे फ़क्त ’माझिया मना’ला इतकं हळवं होताना माहितेय....

Wednesday, November 24, 2010

निक्काल

निकाल या शब्दात न दिसणारी हवा किंवा न दिसलेला देव याप्रमाणे न दिसणारा "वाद्ग्रस्त" हा शब्द असलाच पाहिजे का असा प्रश्न का पडतो माहित नाही....पण पडतो किंवा निकाल लागल्यावर वाद होतात हे मात्र नक्की....मग ब्लॉगजगताने तरी अपवाद का मानावा मी म्हणते...

मुळात त्या दिवशी मेल, बझ सुरु करायच्या आतच सगळा खेळ आटोपला होता. म्हणजे सगळ्या चर्चा, अभिनंदनाची आदान प्रदान इ.इ. आवरून लोक झोपायच्या तयारीला लागले होते किंवा पार्ट्या तरी करत होते....आता मी जगाच्या जवळ जवळ शेवटी दिवस उगवणाऱ्या भागात राहणार म्हणजे अजून काय अपेक्षापण नव्हती तरी पण वरवर कोण कोण ओळखीचे आहेत हे पहिल्यावर आयोजकांचे पत्र वाचावे म्हणून जरा ती attachment उघडली आणि त्यातच नाव, त्याचं -हस्व, दीर्घ यांच्या चुका, कुणाच्या ब्लॉगची शेंडी कुणाला हे सगळं पाहून म्हटलं, आहे बाबा, वादाची सुरुवातच इथे आहे......... म्हणजे या वर्षी जिथे मराठीचे खून पडलेत तिथे जास्तीत जास्त पदकं नक्कीच गेली असणार....जास्तीत जास्त शब्दावरून आठवलं, अरे केव्हाची यादी पाहते... चहा गार झाला सकाळचा, मुलाची बाथरूम ट्रीपपण (बाबाच्या कृपेने) झाली तरी संपेचना.....शेवटी एकदाची गोळाबेरीज पहिली तर ६ + ३० = ३६ बापरे....छत्तीसचा आकडा म्हणजे तर यकदम लकी लंबर .....(माझा नाही हे वेगळ सांगायला नको आकडेबहाद्दरांना)

परीक्षकांच्या मते लंबरात आले ब्लॉग पहिले आणि बरेच विचार एकदम आले....म्हणजे, म्हटल जाहिरातीची कला जर इतक्या चांगली जमली तर चकटफू ब्लॉगवर चकटफू वेळ का घालवला असता राव?? मस्त जास्तीचे डॉलर नसते छापले???  जातीचीच राजकारण, शब्दांची वाफ दवडून करायची तर मग ब्लॉग सोडून दुसरं काही केलं असतं की....आणि दोन-तीन महिने पोष्टा टाकायच्या नव्हत्या का?? असले अचाट प्रश्न यकदम पडले....म्हटलं, देवा वाचवलस बाबा या रांगेत माझ्यासारख्याला न टाकून.....

खालची लंबर लाईन पहिली तर माझे बरेच लाडके वरच्या रांगेत जाऊ शकणारे लाडके ब्लॉग पाहून पुन्हा भरून आलं...उत्तेजना म्हणजे एक प्रकारची सांत्वना असा काही एक सूचक अर्थ काल एका बझवर पहिला तेव्हा लगेच उमगलं की खरच सांत्वनेची गरजतर या ब्लॉगना जास्त आहे कारण सातत्याने चांगलं आणि दर्जेदार लिहून जर त्यांचा लंबर ३० जणाच्या शेपटात असेल तर देवा पुन्हा एकदा वाचवलस बघ...

आता हे सगळं प्रकरण म्हणजे कोल्हयाला द्राक्षे आंबट असं बर्याच जणांना वाटेल....पण खर ते तस नाही..... हे एक वैचारिक मंथन आहे या निकालापासून काय घ्यावं यासाठी....कारण निकालामध्ये जसं मेरीट यादी, त्याखालची पास आणि मग नापास अशी लोकं असतात तशीच इथेही आहेत....आपण मुळात ब्लॉग का लिहितो याचा आपल्यासाठी विचार केला तरीही या निकालाने कुणाला काही फरक पडायला नको...कारण यात यादीत असणारे आणि नसणारे दोघही तितकेच confused आहेत..त्यांना आपण इथे का आणि का नाही हा प्रश्न एकाचवेळी पडलाय...(मटका लागलेले काही अपवाद वगळता)

ही एक स्पर्धा आहे ज्याचे नियम आपल्याला ठाऊक नाहीत...निदान दोन निकाल जरी कुणी नीट पहिले तरी हा परीक्षकांच्या मर्जीचा थोडा फार खेळ आहे हेही कळेल....आपण ब्लॉग कधी परीक्षकाला गृहीत धरून लिहिलेला नसतो....निदान परीक्षेच्या पेपरमध्ये तरी आपल्याला नियम, परीक्षक याची थोडीफार कल्पना असते पण हे ब्लॉग प्रकरण थोडं वेगळं आहे....त्यामुळे आता या निकालाने आपण खर तर कुठलाच निष्कर्ष काढायला नको...म्हणजे हिमेश रेशमिया जेव्हा हिट चित्रपट म्हणून त्याच्या कुठल्या चित्रपटाच नाव देतो तेव्हा आपण कधी तो पाहणार असतो का?? तसंच काहीसं....:)

आपल्या आपल्या ब्लॉगचा एक प्रेक्षकवर्ग असतो, आहे परीक्षक हा फक्त त्या घडीपुरता आपला एक तात्पुरता वाचक असतो...शिवाय तो कुठली पोस्ट वाचेल वाचणार नाही हे एक न उलगडणार कोडं......प्रत्येक ब्लॉगसाठी खरा वाचकवर्ग वेगळा आहे आणि राहील...आणि तो वाढत असतो ही जमेची बाजू गृहीत धरून आपण त्यांच्यासाठी लिहावं.....उगाच ऑस्कर नाही मिळाल म्हणून श्वास हा काही आपला लाडका सिनेमा लगेच नावडता होत नाही आणि जय हो ला बक्षीस मिळाल तरी ए आर, जावेद म्हटलं की मला त्यांची जय हो सोडूनच सगळी गाणी आठवणार....

त्यामुळे हा निकाल असा का लागला ...अमुक ह्या लम्बरावर का आणि तमुक इथे का नाही त्यापेक्षा आपल्या आपल्या ब्लॉगवर चित्ती असावे समाधान या न्यायाने खर तर जास्त नेटाने लिहावे हे जास्त महत्वाचे....ब्लॉगने आपल्याला काय दिलं यात बक्षीस दिलं हे खूप खालच्या क्रमांकावर असलेलंच बर...मागच्या वर्षीच्या उत्तेजन नामावळीतले बरेचसे सुस्कारे सोडलेले ब्लॉग पाहिलं तर हे नक्कीच पटेल....

तरीही ज्यांना बक्षीस मिळालेच आहे त्यांना कुठेही कमी लेखण्याचा हेतू यामागे नाही....पण दहावी बारावीचा निकाल लागला की नंतर एखाद्या पुरवणीत नापासांसाठीसुधा एक सदर येत न तितकीच किंमत या पोस्टला आहे....बारावीवरून आठवलं जेव्हा बारावीला पण आकडे मला लागणारे नव्हते (म्हजे मेडिकलच्या लायनीत जायला...) तेव्हा माझे बाबा दादर स्टेशन वर माझे भरून आलेले डोळे न पुसता म्हणले होते अग अपर्णा आपल्या पिढीत अजून कुणीच डॉक्टर झाल नाहीय आणि तसा प्रयत्न करणारी पण तूच पहिली आहेस तर मग लगेच कस सगळं मनासारखं होईल? त्यासाठी पिढीच अंतर जाव लागेल.....

तसंच आहे हे आपण काही कसलेले लेखकू नाहीत (निदान मी तरी) शिवाय यातलेही सगळेच काल लिहायला सुरुवात केली आणि आज बक्षीस घेतलीत असही नाहीये...तेव्हा आपल्याला पुलाखालून थोडं पाणी वाहून जावं द्व्याव लागेल..प्रत्येकाचे पूल निराळे...बास इतकंच....:)

Saturday, November 20, 2010

काही वेगळ्या पी.एच.डी.

अमेरिकेत आल्यानंतर जसजशी इथे पुर्वी आलेल्या लोकांशी विशेष करुन मराठी लोकांबरोबर ओळखी व्हायला लागल्या तसं लक्षात आलं की ही बरीच लोकं इथे पहिल्यांदी पदव्युत्तर शिक्षणासाठी आले आणि मग नंतर पी.एच.डी करुन त्यांनी आपली शैक्षणिक, पर्यायाने आर्थिक भरभराट केली आहे...खरे (म्हणजे वैद्यकीय शाखेवाले) आणि हे असे भारतीय वंशाचे डॉ. अमेरिकेत इतके आहेत की सरळ नोकरीसाठी येणार्‍या आमच्यासारख्या लोकांबद्द्ल खूपदा त्यांना वेगळं कुतुहल असतं..अर्थात तो काळ निराळा आता निराळं आणि मुख्य तो विषयही नाही लेखाचा..पण सारांश पी.एच.डी हा शब्द जास्तीत जास्त वेळा मी मायदेशापेक्षा इथेच ऐकला...आणि लवकरच आपण वेगळ्या प्रकारे त्याला सामोरं जाऊ हेही लक्षात आलं..

म्हणजे काही नाही हो, अभ्यास हा इथे इतका पाचवीला पुजला आहे नं की अगदी एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरला गेलं तरी जो तो कुठच्याही आयलमध्ये आपल्याला हव्या त्या प्रॉडक्टच्या कप्प्यासमोर दोन्ही हातात प्रत्येकी एक, पार्टनर असेल त्याच्या हातातली दोन आणि मान वाकडी करुन समोरच्या फ़ळीवरची काही अशी बॉक्सेस वाचुन त्याचा आपल्याला हव्या त्या दृष्टीने अभ्यास केल्याशिवाय त्यातलं हवं ते एक बॉक्स आपल्या शॉपिंग कार्टमध्ये टाकुच शकत नाही...म्हणजे साधं सिरियलचं उदा. घेतलं तर त्यात आधी कुठला ब्रॅण्ड, मग होल ग्रेन की फ़ोर्टीफ़ाईड, त्यात प्रथिन जास्त की कार्ब कमीवालं हवं, लो सोडियम, कुठची व्हिटामिन्स, बरं हे सगळं सारखं असेल की मग बदामवाले, नुस्ते की मनुके घातलेले किती ते पर्याय..बरं सिरियलचं जाऊदे पण आपला रोजचा खाण्यातला ब्रेड घ्यायचा तर मायदेशात एक पाववाल्याकडचा आणि दुकानदार तो देईल तो हा अनुभव असणारे आम्ही एक अख्खा रो ब्रेडसाठी म्हटल्यावर कुठला आपल्याला आवडेल त्याचा अभ्यास करणं आलंच (इतकं करुन आजपर्यंत बटाटेवड्याशी लगीन लावावं तो पाव मिळत नाही ही खंत आहेच..असो..उगा खादाडी टॉपिक नको सारखे)...पुन्हा इतक्या तर्‍हा आहेतच तर मग बदल हवा म्हणून त्या आयलला गेलो की तेच आधी सांगितलं तसं हे वाच ते वाच त्यामुळेच म्हटलं तसं अभ्यास काही चुकत नाही...

साधारण दोन-तीन महिने एकच दुकान, बराचसा अभ्यास आणि जे काही ट्राय करु त्याप्रमाणे जर आपण मग आपल्याला हवं ते एका मिनिटांत फ़ळीवरुन काढुन घेऊ शकलो की समजायचं या विषयावरची आपली पी.एच.डी. झाली.या पी.एच.डी.मध्ये अभ्यासण्यासारखे बरेच विषय आय मीन आयल आहेत त्यामुळे हे काम तसं वाचताना वाटतं तितक्या लवकर पुर्ण होत नाही बरं..शिवाय नेमकं तुम्ही शॉर्टलिस्ट केलेलं प्रॉडक्ट आयुष्यातुन आपलं ते फ़ळीवरुन कायमचं उठलं की मग एक मिनी पी.एच.डी. करा आणि नवं काहीतरी शॉर्टलिस्ट करा...त्यामुळे अपग्रेड, आवडी-निवडी, बदल झालंच तर घरात बाळ नामक एक नवा प्राणी आला की मग त्यांचे प्रॉडक्ट या ना त्या कारणाने हे प्रॉड्क्ट पी.एच.डी. प्रोजेक्ट अखंड सुरु राहतं आणि त्याला ग्रॅण्ट वगैरे मिळाली नाही असंही कधी होत नाही.

बाहेर काही मागवायचं असेल अगदी गेलाबाजार कॉफ़ी तरी तेच...सुरुवातीला आधीच अगम्य नावाचे ते अनेक कॉफ़ी पर्याय, त्यातुन त्यातल्या त्यात काही निवडावं की ऑर्डर घेणारी विचारणार छोटी, मध्यम की मोठी, मग दुध कुठल्या प्रकारचं होल, फ़ॅट फ़्री की याच्या मधलं, साखर की शुगर फ़्री, आणखी काही हवं की "Thats all for today??"..तिला म्हणाव घसा सुकला एवढ्यातच, त्यापेक्षा कुठे आहे तुझं कॉफ़ीचं मशिन मीच बनवुन घेईन...पण चालायचं अजुन साताठ वेळा आलं की सराईतासारखं रांगेत उभे राहुन आपण आपला कप घेणारच....कारण काय?? अहो झाली नं पी.एच.डी.करुन या विषयातली सुद्धा...

आणखी एक म्हणजे या देशात आलो की आपण हळूहळू खायचे इथले पर्याय स्विकारलेले असतात आणि मग या ना त्या कारणाने वाढणारं वजन (इथे येऊन वजन कमी झालेलं माझ्या माहितीत तरी कुणी नाही..एखादा फ़ारच काळजीवाहु असेल तर एकवेळ त्याचं वाढणार नाही पण कमी??चान्सेस कमी...) तर हे वजन एकदा का दिसु लागलं की मग काही पाहायला नकोच...आणि त्यात इथल्या खायच्या वस्तुंवर त्यात काय आहे पासुन ते उष्मांक, कार्ब, प्रोटीन, व्हिटॅमिन सगळं इत्थंभूत छापलेलं असतं त्यामुळे नेटवर जायचं आणि आपल्याला कसं खाल्लं पाहिजे हे एकदा पाहिलं की झालं...मी ही पी.एच.डी. दोनदा केली आहे...एकदा माझं वजन बर्‍यापैकी वाढलंय हे मायदेश दौर्‍यात प्रत्येकाने सांगितल्यावर...(काय आहे इथे असल्यावर ते कळतच नाही.कारण इथं big and tall आसपास दिसत असतात म्हणजे आपण तुलनात्मक बारीकच..) मग परत आल्यावर मुख्य म्हणजे व्यायाम (भारतात कधी जिमचं तोंड नाव काही पाहिलं नव्हतं) आणि आहार मग फ़ॅट फ़्री, लो फ़ॅट, लो ग्लायसेमिक इंडेक्स्ड बापरे सगळं एकसो एक.....पण फ़ायदा झाला...वजनही कमी झालं आणि एक पी.एचडी पदरात पडली...पण हाय मुलाच्या वेळी पुन्हा आईने दिलेल्या सकस आहारामुळे अगदी पुर्वीइतकं नाही पण बर्‍यापैकी वजन वाढलंच...पण आधीची पी.एच.डी. होती. त्यामुळे पुन्हा तोच अभ्यास कामी आला. निव्वळ "वजन कमी करणे" या विषयावर पी.एच.डी. केलेल्या कित्येक व्यक्ती मला माहित आहेत...इतका जिव्हाळ्याचा विषय आहे हा.

आजार हाही एक जरा हळवा प्रकार आहे...कुठलाही छोटा-मोठा आजार किंवा आजारसदृष्य परिस्थिती आली की इथले डॉक्टर्स, नर्स तुम्हाला त्याची भरमसाट (आणि काहीवेळा नको इतकी) माहिती देतात. शिवाय नेट आहेच...पहिल्यांदी जेव्हा कोलेस्टेरॉलविषय ऐकलं तेव्हा पुन्हा एकदा नव्या पी.एच.डी.चं दान पदरात पडलं..आधीची वजनाविषयीच्या पुर्व पी.एच.डी.मध्ये सॅच्युरेटेड फ़ॅट्स आणि कंपनीची भर पडली आणि अगदी वारसाहक्काने आलेलं कोलेस्टेरॉल सांभाळायला काय काय केलं पाहिजे याच्या चर्चा घरच्यांशीसुद्धा करायला लागले..म्हणजे अगदी त्यांची डॉक्टर झाले म्हणा न...

त्यानंतरचा सांसारिक आयुष्यातला मोठा टप्पा म्हणजे मुल होणं...ही जरा नेव्हरएंडिग प्रकारातली पी.एच.डी. आहे. पण ते कळतं तरी आपण करत राहतो..एक म्हणजे आता मूल होणार कळलं की मग प्रत्येक महिन्यागणिक त्याची प्रगती याविषयी डॉक्टर, नर्स, इंश्युरन्स कंपनी झालंच तर हजारो प्रॉडक्ट्स आपल्या गळ्यात मारणार्‍या कंपन्या यांच्याकडून इतक्या काही माहितीचा मारा होतो की बास रे बास..आपण कधी त्यात अडकतो आणि ते सर्व वाचुन (थोडक्यात अभ्यास करुन) आपलं दोघांचं मिळून (जमलं तर) एक मत बनवतो आणि तर्क करतो ते कळतंच नाही.साधं व्हिटामीनच्या गोळ्या मग त्यात ते अमुक महिन्यांमधे ओमेगा थ्री घेतलं तर कसं चांगलं, आमच्याच कंपनीची गोळी कशी चांगली, झालंच तर लहान मुलांचं फ़र्निचर, कपडे त्याला लागणारे दुधाच्या फ़ॉर्मुल्याचे असंख्य प्रकार या सर्व माहितीचा भडीमार नऊ महिन्यात आपली या विषयावरची माहिती पी.एच.डीच्या पुढच्या लेव्हला नेऊन सोडते. आणि प्रत्यक्ष मूल घरात आल्यावर तर कहर असतो...आपली डबल डॉक्टरेट त्याच्या वर्षागणीक होत असते..आपणही नकळत आपल्या मागे असणार्‍या आपल्या मित्रमैत्रीणींना कधी सल्ले द्यायला लागतो कळतही नाही.

थोडक्यात सांगायचं तर दरवर्षी काही नं काही तरी नवीन आपल्या मागे येतं..कधी आजार, कधी वजन वाढतं, कधी फ़िरतीची नोकरी, कधी एखादी साप्ताहीक सुटी काही नं काही तरी आखणी करायची असते आणि आपण त्यात्यावेळी नकळत अभ्यास करुन नवनव्या पी.एच.डी. पदरात पाडत असतो...

शांत डोक्याने या घेतलेल्या पी.एच.डी आठवते,तेव्हा वाटतं शाळा-कॉलेजमध्ये असं एखादाच विषय घेऊन त्याचा सखोल अभ्यास करण्याचा पेशन्स दाखवला असता तर आपणही ते सुरुवातीला खरे पी.एच.डी.धारक म्हटले त्या रांगेत असतो नाही?? पण नकोच ते....आपल्या या हव्या तेव्हा घ्या आणि सोडा प्रकारातल्या पी.एच.डी.च बर्‍या माझ्यासारख्या आरंभशुराला...

Saturday, November 13, 2010

आई, मला गोष्ट सांग ना....

’आई, मला गोष्ट सांग ना’ हे मी माझ्या आईला कधी सांगायला सुरुवात केली माहित नाही. आईला माहित असेल कदाचित तरी एकंदरित वाचनाचा छंद बर्‍याच आधीपासुन आहे हे खरं.पण तरी पुस्तकांचा नाद माझ्या मुलाला थोडा लवकरच लागला असं मला नेहमी वाटतं...म्हणजे गादीच्या कोपर्‍यात पडलेलं पुस्तक मी नावावरुन शोधत असताना त्यानं मला थोडंसं रांगता असण्याच्या काळात आणून दिल्याचं मला आजही आठवतं आणि त्याचं संपुर्ण श्रेय लहान मुलांसाठीच्या पुस्तकांना आणि इथल्या लायब्ररीमध्ये होणार्‍या स्टोरी टाइम या कार्यक्रमाला जातं.
अमेरिकेत मिळणारी लहान मुलांसाठीची पुस्तकं पाहिली तर दणकट पुठ्ठ्याची बांधणी, त्यातली मोठ्ठाली चित्र आणि अर्थातच लहानग्यांना रस वाटेल अशी सोपी भाषा व कथा.सारं कसं जुळून आलंय.लहान मुलंच काय मोठी माणसंही प्रेमात पडतील. निदान मी तरी पडलेय बुवा...मला काय सगळ्याच कथा नवीन...एक वाचायला सुरुवात केली की युवराज दुसरं पुस्तक स्वतःच घेऊन येतात, काही वेळा तर वन्स मोअर पण असतो, काही पुस्तकं तर मुलांना (आणि अर्थातच आईला) पाठ होतात की एखाद्या दिवशी नाही सापडलं तर सरळ साभिनय म्हणूनही दाखवलं जातं...
यावेळच्या मायदेश दौर्‍यात अशा प्रकारची मराठी पुस्तकं शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही बा...मला काही तसं मिळालं नाही...लहान मुलांची पुस्तकं पण मोठ्यांनीच वाचावी असा शब्दांचा टाइप आणि मोजकीच चित्रं...ही पुस्तकं वाचताना मुलं इतक्या पटकन शब्द अर्थासकट शिकतात की त्यांना वेगळं समजवावं लागत नाही. या पार्श्वभूमीवर पाश्च्यात्यांचं नक्कीच कौतुक करावं असं वाटतं..अर्थात त्यांच्या किंमतीही तशाच असतात पण सगळीच काही विकत घ्यावी लागत नाहीत त्यासाठी आमचं चकटफ़ू वाचनालय कामी येतं की.
वानगीदाखल खालची चलतफ़ीत पाहिलीत तर तुमचं माझं मत एकच होऊन जाईल...खरं म्हणजे एकच पुस्तक वाचायचं म्हणून बसले, रेकॉर्डिंग करायचं बाबाच्या मनात आलं तर चिरंजीवांनी दुसरं कधी आणून आम्ही तेही वाचायला लागलो ते कळलंच नाही. ही दोन्ही पुस्तकं त्याची वय वर्षे दोनमधली लाडकी आहेत हे वेगळं सांगायला नको आणि हे पुस्तक वाचतानाचा आमचा दोघांचा संवादही थोडी-फ़ार मजा नक्कीच आणेल...नशीब त्याला ’आई, मला गोष्ट सांग ना’ हे वाक्य अजून म्हणता येत नाही ते नाहीतर नक्कीच माझ्यामागे भूणभूण वाढली असती....



यावेळच्या बालदिनासाठी ब्लॉगवाचक आणि त्यांच्या घरातील छोटे कंपनीसाठी माझिया मनाकडून ही छोटीशी भेट....बालदिन जिंदाबाद....

Saturday, November 6, 2010

मनस्मरणीचे मणी


वर्तमानपत्र किंवा इतर कुठेही गद्य वाचून एखाद्या लेखक/लेखिकेच्या प्रेमात पडणं हे मी नक्की केव्हा सुरु केलं माहित नाही.पण अशाच एका वर्तमानपत्रातल्या सदरातले लेख वाचून फ़ार पुर्वीच मी डॉ. शरदिनी डहाणूकर या लेखिकेच्या प्रेमात पडले. आणि त्यातच कधीतरी आईला तिच्या एका वाढदिवसाला त्यांची काही पुस्तकं भेट म्हणून दिली. अर्थात घरातच असल्याने मीही ती वाचली पण नंतर विसरली गेले हेही खरंच. मागच्यावेळी आई येताना त्यातली एक-दोन माझ्यासाठी घेऊन आली. आधी मला वाटलं की तिने असं का करावं पण त्यातलं ’मनस्मरणीचे मणी’ हे पुस्तक मी आताशा पुन्हा एकदा वाचायला घेतलं आणि खरं तर एक नवी मैत्रीण मला मिळवून दिल्याबद्द्ल मी मनातल्या मनात आईला दुवाच दिला.


डॉ. शरदिनी डहाणूकर काही वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत शिकागोमध्ये राहिल्या आणि मग परत भारतात परत गेल्या. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी पुन्हा बहुधा कॉन्फ़रन्सेसच्या निमित्ताने काही दिवसांसाठी त्यांची अमेरिकावारी झालेली दिसतेय. शिवाय जगात इतरत्रही बर्‍याच ठिकाणी त्यांची एकटीने किंवा एखाद्या ग्रुपबरोबर भ्रमंती झाली आहे. या सर्व प्रवासात त्यांना जाणवलेल्या काही प्रवृत्ती, मानवी मनाचे हिंदोळे, त्यांना उलगडणारी निसर्गाची रुपं या सर्वांचं एकत्रित वर्णन, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, मनाच्या पेटीत असेच जपलेले...सुटे सुटे....एका सुत्रात न ओवलेले तरीही सप्तरंग फ़ाकणारे....

ललित, प्रवास, व्यक्तिचित्रण यापैकी कुठल्याही साच्यात न बसणारं पण तरीही कुठलाही लेख वाचला की लेखिकेच्या जगात घेऊन जाणारं एक छोटेखानी सुंदर पुस्तक.

माझ्यासाठी यात साम्याचे धागे भरपूर आहेत म्हणुनही कदाचित यावेळी मी हे पुस्तक खर्‍या अर्थाने वाचतेय.तिचं आणि माझं अमेरिकेतलं पहिलंवहिलं एअरपोर्ट शिकागोमधलं ओहेर...एकेकाळी जगातलं सर्वात जास्त व्यस्त आणि सध्या अमेरिकेतलं...पुस्तकातली शिकागोची हाडं गोठवणारी थंडी, लेक शोअर ड्राइव्ह (आम्ही दोघंही याला राणीचा नेकलेस म्हणायचो) , सिअर्स टॉवर हे उल्लेख मला माझ्यासाठीचे वाटतात. त्यानंतर मग तिच्या ट्रीप्समधले आणि इतरत्र होणारे नॉर्थ इस्टचे उल्लेख तर आणि जवळीचे. या सर्वात जास्त जवळची वाटते ती तिच्या काही लेखांमधुन भेटणारी मुंबई. तिचं माहेर आणि सासरही दक्षिण मुंबईत. त्या सगळ्या भागाचं पुर्वीपासून असलेलं आकर्षण आजही आहेच.

त्यानंतरचा समान धागा म्हणजे इथे कायमसाठी राहिलेल्या भारतीयांचे मानसिक प्रश्न, कुचंबणा आणि त्यांच्या पुढच्या पिढीची मानसिकता यावर अधून मधून टाकलेला प्रकाश. इथे ओळख झालेल्या अशा मंडळींची आयुष्य थोड्याफ़ार जवळीने आम्हीही पाहतोय त्यामुळे "घरोघरी मातीच्या" हेही पटतं आणि आपण यात अडकायचं का हा विचार करायला लागलेल्या मनाला दिशा मिळते.तिला परदेशात मिळालेल्या मैत्रीणी तर मला इथल्या माझ्या मैत्रीणीच की काय असंच वाटतं...म्हणजे किती गं आपलं सगळं सारखं म्हणण्याइतक्या....

जगातल्या इतर देशांचे उल्लेखही वाचनीय आहेत आणि कुठेही या सर्वांची एकमेकांशी तुलना न करता आठवणीत घेऊन जाण्याची शरदिनीची पद्धत मला खूपच आवडते. तिच्या माझ्या वयातलं अंतर आणि लेखक-वाचक असं नातं न राहता एक एक लेख पुढं जाताना मी तिची मैत्रीणचं होऊन जाते.आता आपल्यात ती नसली नाहीतर तिची पत्रमैत्रीण तरी व्हायचा मी नक्कीच प्रयत्न केला असता.

भाषेचा एक वेगळा लहेजा, अलंकारिकता, उपमा हे सारे दागिने सांभाळतानाही मूळ लेखाला मानाच्या पैठणीचं रुप कसं देता येतं निदान हे पाहायला तरी एकदा वाचायलाच हवं हे पुस्तक.

यातली आवडलेली वाक्यं,घटना,व्यक्तींचे संदर्भ यातलं बरंच काही लिहावसं वाटतं पण त्याऐवजी यातल्या पहिल्याच लेखाचं अभिवाचन "दीपज्योती" या दिवाळी अंकासाठी मी केलंय. मला वाटतं हे एक प्रकरण बाकीच्या लेखांबद्द्ल बरंच काही सांगुन जाईल.देवकाकांनी माझ्याकडून हे अभिवाचन जे मी आधी जालवाणीसाठी केलं होतं पण तिथं ते चाललं नसत म्हणून विसरले होते तरी त्याची आठवण करुन देऊन पुन्हा करवून घेतल्याबद्द्ल त्यांचेही आभार.

Tuesday, November 2, 2010

दिन दिन दिवाळी

अरे बघता बघता आलीच की दिवाळी...तसं म्हटलं तर आमच्या ओरेगावात दिवाळी म्हणजे आनंद (पत्रे नाही. तो आला होता मागे अमेरिकेत पण ओरेगावात नाही आला) असतो नुसता. देवळं वगैरे आहेत पण आमच्या फिलीची मजा नाही. अर्थात इथल्या माउंट हूडची मजा काही और आहे हे मात्र खरं. लॉंग ड्राईव्हवर जाताना उजवीकडे हा असा माउंट हूड आणि रेडिओवर 'रिमझिम गिरे सावन'.. वा क्या बात है. सोबत कांद्याची भजी मिळाली की झालीच मग खरीखुरी दिवाळी. असो.




काय म्हणता वाचल्यासारखं वाटतंय?? हो म्हणजे वटवटराव आपलं तोंड बंद ठेवणार नाहीत हे माहित होतं मला, पण इतकं सांगुन सवरुनही शेवटी फ़राळाचं ताट आणि एक छोटासा संदेश विसरलाच म्हणून मग पुन्हा एकदा स्वतःकडे श्रेय लाटून मीही सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतेच कशी...आणि त्याने म्हटल्याप्रमाणे नमनाचं तेल वाहायला लागायच्या आतच पळते....:)

यावर्षीचा फ़राळ आईने अगदी मला वेळेवर पोहोचेल असा पाठवला. त्यामुळे मी स्वतः काहीही करणार नाहीये हे सु.वा.सांगणे नको...तसंही सासरहूनही फ़राळ निघालाय आणि तोही पोहोचेलच..
 
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

Thursday, October 28, 2010

गाणी आणि आठवणी ६ - नवलाख तळपती दीप विजेचे येथ

आभाळ भरुन आलंय...आता हे खरं तर नेहमीच असं राहणार माहित आहे पण तरी का कोण जाणे प्रत्येकवेळी ते असंच उदास करुन ठेवतं...अगदी उठुन खोलीत थोडा प्रकाश करावा असंही वाटत नाही...आणखी काही दिवसांनी तर घड्याळ मागे केलं की मग संध्याकाळही लवकर भेटायला येणार आणि तीही जास्ती करुन सूर्याची लाली न ल्यायता..भरुन आलेल्या दिवसांत अख्खा दिवस म्हणजे जणू एक मोठी संध्याकाळच..संध्याकाळी होणारी संध्याकाळ घेऊन येणार तो काळोख......फ़ोर सिझनचं खूळ नॉर्थ-इस्टला असताना बरं होतं का असं इथे वेस्टातला पाऊस सुरु झाला की हमखास वाटतं.
खरं तर पाऊस, पावसाळा मला फ़ार आवडतो...की आवडायचा? या पावसाला मुख्य त्या पहिल्या पावसाचा मातीचा वेडा करणारा मृदगंध नाही. शिवाय कडाडणार्‍या थंडीत तो पडणार म्हणून भिजायचं सुखही नाही. एकवेळ छत्री-रेनकोट नसेल तर चालेल पण चार किलो कपडे,स्वेटर, कोट, हातमोजे हे सर्व घालुन पावसाला हाय कसं म्हणायचं...त्याऐवजी उरल्या-सुरल्या तोंडाला बोचणारी थंडी नकोशी होऊन गाडी नाहीतर घराच्या हिटरमध्ये धावायची लगबग. पावसाचे बाकी सगळे चोचले पुरवता आले नाही तरी नशिबाने बाहेर पाऊस पडत असताना लागणार्‍या आल्याच्या चहाची चव तीच आहे हा काय तो आशेचा किरण.
घरुन काम करायचं एक बरं असतं...कुठेही बसता येतं...थोडंफ़ार बाहेरच्या पावसाला पाहताही येतं आणि मुख्य म्हणजे आपल्याला हवा तसा चहा करुन त्या छोट्या क्षणाची मजा एकटीने का होईना पण घेता येते. प्रत्यक्ष कामाच्या जागच्या डिप-डिपपेक्षा बरंच बरं....अशी थोडंसं अंधारलेल्या पावसाळी वातावरणात या चहाब्रेकमध्ये स्वयंपाकघरात आले की मला दिसते मीच सकाळी लावलेल्या दिव्याची अजुन जळणारी वात....न कळत माझ्या कानात सी. रामचंद्रांच्या संगीत आणि आवाजातले कुसुमाग्रजांचे शब्द रुंजी घालतात

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात

या गाण्याला एक विशिष्ट आठवण नाही पण मला कुठच्या तरी शांत जागी हे गाणं पोहोचवतं आणि सगळं आर्त वाटतं...प्रत्येकवेळी ते ठिकाण बदलतं...काही जुन्या आठवणीही रुंजी घालत असतात...
मामाकडे मधल्या अंधार्‍या खोलीत आजीच्या पलंगाच्या वरती असणारी आणि खरं तर आजी लावेल तेव्हाच तेवणारी वात ही मुख्य आठवण.एवढ्या मोठ्या घरात माझ्या लाडक्या मामाच्याच वाट्याला घराची अंधारी बाजु का यावी असं त्यावयातही वाटणारी मी. दुसरी आठवण मी सहावीत असताना मावशी गेल्यावर त्या बारा दिवसात सकाळी पांघरुणातूनच दिसणारा रोज तिच्या फ़ोटोपुढे तेवणारा दिवा, पोटच्या पोरीचं हे असं स्वतःच्या समोर निघुन जाणं पाहताना अश्रु आटलेली आजी आणि रोज तितकीच हमसुन दुःख करणारी आई....सगळं त्या वातीच्या साक्षीने...हे सगळं आठवणीतुनही लवकर सरावं म्हणून प्रयत्न करणारी मी.....का हे असं पावसाचं मला एकटीला भेटणं हळवं करतं माहित नाही....
मी कुठल्या तरी कडव्यात माझ्यासाठी दुसरी वाट शोधते,
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट

अमेरिकेतल्या फ़्रायडे हार्बर नाहीतर हवाईच्या बेटावर ती श्रीमंती घरं पाहायला गेलेलं माझं मन दुसर्‍याच क्षणी मायदेशातल्या माझ्या लहानपणी बाबा नदीत दगड फ़ेकुन तो जाता जाता अनेकवेळा दिसायचा तसंच फ़ेकताना तिथे जाऊन पोहोचतं..श्या किती वर्षं झाली नदीवर जाऊन...नाहीतर लहानपणी सुट्या आणि आमची सूर्यानदी हे समीकरण होतं..बाहेरचा आधी उदास करणारा पाऊस आता नसतोच...मी पुन्हा एकदा गुणगुणते
बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग

एकटेपणातला पाऊस पुन्हा एकदा माझ्याबरोबर येतो आणि मी मुकाटपणे "चल, आता सवयीचे होऊया" असं म्हणून त्याचा हात घट्ट पकडून सोबत करु लागते.....मनात ते गुणगुणणं तसंच असतं....." परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातिल मंद दिव्याची वात".......

Friday, October 22, 2010

मर्फीचा फेरा

तसंही मर्फीमहाराज मध्ये मध्ये छोट्या फेऱ्या आमच्याकडे मारत असतात...आणि जास्त प्रेम उतू गेल तर मग मोठा दौरा असतो...मागे ती तेवीस तास उसात चक्कर मारली होती तोही त्यांचाच पराक्रम होता...यावेळी मात्र हा अख्खा आठवडा त्याचा मुक्काम माझ्याकडे आहे असं दिसतंय...मर्फी महाराज म्हणजे तेच ते मर्फीचा नियम वाले....


म्हणजे आता या (पर)देशात खर तर इतक्या एकट्या आया(single moms) आहेत की एक आठवडा जर माझा नवरा कुठे कामासाठी बाहेर गेला म्हणून काही माझ्यावर आकाश कोसळत नाही...राहू मी आणि माझा मुलगा असा एक आशादायक विचार त्याला मागच्या रविवारी airport ला सोडताना केला होता...पण अह्म्म्म...म्हणजे मुलगा बाबाला टाटा करेपर्यंत काही बोलला नाही मग मात्र जस आमच्या गाडीने airport सोडलं तसं हा एकदम मागे कार सीटमध्ये हैदोसच घालायला लागला...पहिले त्याला बाबा हवा होता, मग विमान आणि मग चक्क air show ....ऐला कशाला मागे त्याला तो air show दाखवला असं झालं मला..बरं म्हणजे हा गोंधळ तसा थोडा अपेक्षित होता पण बाकी आठवडा चांगला जाईल अशी मला अशा होती....

तसा बऱ्यापैकी ठीकठाक आठवडा कागदावर तरी होता; म्हणजे मंगळवारी मुलाच्या पाळणाघरातर्फे एक pumpkin patch भेट होती म्हणून पालकांनी मुलांना drive करायचा होत...ही तशी दुपारनंतर होती. त्यामुळे ऑफिसच काम आटपून जमू शकणार होतं...आणि येईपर्यंत संध्याकाळ म्हणजे मुलाची पण करमणूक...गुरुवारी मला एक डॉक्टरची appointment होती आणि मग शुक्रवारी तर आमचा बाबा घरी येणार म्हणजे त्या दिवशी फक्त सकाळी लेकरू शाळेत गेलं की झाली duty...किती सोप्पा दृष्टीकोण होता माझा आणि आशावादीही.पण मर्फीबाबांची कृपा होती किंवा त्यांचा आशीर्वाद नेहमीच असतो म्हणा पुढचे दिवस बाबांच्या (कामासाठी गेलेल्या आणि या नव्या पाहुण्या मर्फ़ीबाबांच्याही) कृपेने बरेच काही नवे सिक्वेन्सेस माझी परिक्षा पाहणार होते...

सोमवार तसा पहिला दिवस, नव्याची नवलाई म्हणून बरा गेला. जास्त काही नाही म्हणजे पाळणाघरात सोडतानाची रडारड आणि मुख्य म्हणजे संध्याकाळी निघताना पण लॉबीमध्ये चल मासे पाहायचे आहेत असले छोटे मोठे हट्ट इ.इ. करमणुकी होत्या; पण जेवायच्या वेळी बाबा वेबकॅमवर दिसल्यामुळे जेवण कस आटपलं कळलं नाही....मंगळवारी pumpkin patch भेट म्हणून मी खुश, तर नेमकं मागच्या आठवड्यापासून टेस्टिंगसाठी गेलेल्या एका कामातली कुलगंडी बाहेर काढायला त्या tester ला मंगळवारचाच मुहूर्त मिळाला. बरं ते fix करण्यासाठी ज्या सहकाऱ्याच सहकार्य अपेक्षित होत त्याची बायको गेले कित्येक दिवस आज होईल मग होईल करता करता मंगळवारीच बाळंत झाली. त्यामुळे तो पूर्ण दिवस गायब आणि त्याचा सेल पण बंद.....

च्यामारी आता client ला सरळ तर सांगू शकत नाही की तो नाही आहे म्हणून जास्त प्रगती नाही आणि मला मुलाला घेऊन बाहेर जायचं आहे....बाप रे मिटिंगमध्ये इतकी सांभाळासांभाळी करताना तारांबळ उडाली...कसं तरी करून एक दुसरीच चूक शोधली (if you can’t convince, confuse catergory वाली) आणि आणखी कुणाच्या तरी माथी मारून pumpkin patch भेटीसाठी एकदाची बाहेर पडले....काय सुंदर दिवस होता! तशी आता थंडी सुरु झालीय तरी सूर्यदेव प्रसन्न झाल्यामुळे जाकीटपण घालायला नको. मस्त मजा करताना पण मनात कामाचे विचार होतेच....तिथे पण सगळं झाल्यावर मुलाला परत घरीच यायचं नव्हतं, मग पुन्हा त्याला कसंबस चुचकारून (पक्षी: चॉकलेटची लाच देऊन..) आणलं आणि संध्याकाळी(पण) बाबाला वेळ नव्हता (तो म्हणतो की त्याला तिथे एक जास्तीच सेशन होत....) तरी थोडा वेळ वेबवर दाखवला आणि लवकर मुलाला झोपवून पुन्हा ऑफिसचं काम करणार होते पण कारट कसलं झोपतंय...शेवटी नाद सोडून झोपून गेले आणि पुन्हा बुधवारी काम, घर अशी मारामारी करत बसले...

बरेच दिवस मी ज्या प्रोडक्टवर काम करते त्यातल्या एका प्रश्नासाठी मूळ कंपनीला कळवलं होतं, त्यांच्या जर्मनीमधल्या एका इंजिनियरला गुरुवारी सक्काळसक्काळी मला फोन करायला सवड झाली आणि त्याला ते रिमोटली दाखवून माझं मशीन त्याच्या ताब्यात दिलं....तोच तो मुलगी झालेला सहकारी थोडा वेळ काम करण्यासाठी आला. त्यामुळे त्याच्याशी कामाच्या चर्चा करताना आणखी एक दोन वेगळ्या गुंत्यात गुंतले...त्या जर्मनबाबाला मग सरळ कटवलं, कारण माझं मशीन माझ्या माउसवर परत नाचवायचं होत.....मंगळवारची गुंत (श्शी कसला शब्द आहे नं?? छोटे केस असल्यामुळे फारसा प्रयोग होत नाही माझ्याकडे...) तशीच होती.....ते नवे गुंते सोडवताना माझ्या डॉक्टर appointment ची reminder आली....उप्स आता काय??पण अर्थात ते मी जाणारच होते...आणि तिथे मला तसंही पावणे चारला पोहोचायचं होतं म्हणजे client कडचा इस्ट कोस्ट मधला दिवस संपला होता...त्यामुळे हे गुंता प्रकरण मी आल्यावर पाहिलं तरी चाललं असतं...

डॉक्टरकडे मला डोक्यावरून पाणी म्हणजे एक तास लागला आणि प्रवास साधारण विसेक मिनिटे diriving तरी मी आरामात सवापाचच्या आसपास घरी आले असते आणि मुलाचं पाळणाघर सहा वाजेपर्यंत चालू असतं म्हणजे त्याला येता येताही उचलता आलं असतं...तरी सकाळी काय मनात आलं तर मी त्याच्या बाईंना सांगून ठेवलं होतं की संध्याकाळी जर उशीर झाला तर बघ म्हणून...आणि बाबा घरी नसल्याचं तिला तसंही माहित होतंच...पण उशीर व्हायची शक्यता कागदावर तरी कमीच वाटत होती...

डॉक कडे जवळ जवळ वेळेवर पोहोचले आणि चक्क वेळेवर आतही गेले. पण नर्सबाई vitals घेऊन गेल्या तरी मुख्य डॉचा पत्ताच नाही....पाणी मागवून ते संपवलं ...त्या छोट्या खोलीत ठेवलेली स्पॅनिष सोडून सगळी मासिकं चालून झाली तरी ही बया काही उगवेना....बरं आल्यावर मुख्य काम पाचेक मिनटात झालं होतं तरी आमच्या गप्पा सुरूच...गप्पा म्हणजे प्रश्नोतरांचा तास..इतर वेळी मला अशी वैद्यकीय माहिती ऐकायला फार आवडते...(अरे मागच्या पोस्टमध्ये झाल की सांगून ते डागदर व्हायचं) पण आज जरा कसंतरी होत होतं. पण तरी घड्याळात अजून पाच वाजले नव्हते. त्यामुळे आपण त्या वीस मिनटाच्या मोजणीत बसत होतो....शेवटी एकदाची तिथून ५.१० ला सुटका झाली आणि मग मात्र मी धन्नो (आमची कुमारी कॅमरी) ला "चल धन्नो" म्हणून दामटले...

बाहेर पडल्यावर मुख्य रस्त्यावरून पहिले लोकल हायवे क्र. २१७ आणि मग interstate ५ हा माझा रस्ता होता. पण हाय....२१७ वर जायलाच ही गर्दी....मी आधीच्या सिग्नललाच पाहिलं आणि सरळ उजवीकडच्या लेन मधून कट मारून ramp वर जायची दुसरी लेन होती तिथे झेप घेतली. म्हणजे निदान दहा तरी गाड्यांना मी चकवलं आणि तेही कुठलाही नियम न मोडता...या आनंदात पुढे पाहिलं तर खरा ramp सिग्नल तुफान भरलेला होता...एक एक गाडी सिग्नल दोनतीन वेळा हिरवा झाल्यानंतरच पुढे जात होती...माझी घालमेल सुरु झाली आणि सारख घड्याळाकडे लक्ष....कारण ही अमेरिकेतली पाळणाघर मुलांना घरी नेण्यास उशीर झाला तर विशिष्ट वेळानंतर तुमची वाट न पाहता ते प्रकरण पोलिसांकडे देऊ शकतात...(किंवा देतात...) त्यामुळे कसंबसं एकदा २१७ वर आले आणि त्या मुंगीच्या पावलाने सरकणाऱ्या गाड्यांना चकवून एक लेन बदलून सर्वात बाहेरच्या लेनला गाडी आणली...ही रांग त्यातल्या त्यात पुढे तरी सरकत होती...हे करताना समोरची ऑडी जवळ जवळ चिकटणारच होती माझ्या गाडीला पण संभाळलं....या लेन मध्ये यायचा इतरही काही गाड्यांचा प्रयत्न सुरु होता पण अगदी बम्पर तो बम्पर असल्यामुळे सर्वांचीच डाळ शिजत नव्हती...माझी शिजली पण कसा काय माहित एक मोठा ट्रकोबा (उर्फ ट्रकर) माझ्यापासून दोन गाड्या सोडून घुसलाच आणि झालं इतका वेळ निदान आमची पावलं कासवाच्या गतीने पुढे चालली होती त्यांची एकदम गोगलगायच झाली.. ५५ MPH च्या लिमिटला आपण २० वर म्हणजे अपमान घोर अपमान.....या ट्रकोबाला इथे कुणी यायला सांगितलं होत??

आता मात्र पाच पंचवीस व्हायला आले आणि हे ट्राफिक किती वेळ असाच असेल काही काळत नव्हत म्हणून मी शेवटी पटापट फोनाफोनी करायला सुरुवात केली....एकदम लक्षात आल की या सप्टेंबरपासून मुलाचा वर्ग बदलला आहे आणि त्याचा नवा नम्बरच सेलमध्ये नाहीये...श्या...काय निर्लज्ज आई आहे मी.....मग बाबा, आपलं नवऱ्याला फोन लावला. त्याच म्हणणं बहुतेक पोचशील पण तरी शेजारणीला विचारून ठेव...मजा म्हणजे त्याने दिलेला नंबरही दुसऱ्याच वर्गाचा होता(म्हणजे तोही माझ्यासारखाच). पण तिथल्या बाईने मला बरोबर क्रमांकही दिला आणि मग एकदाची त्या बाईना तशी कल्पना दिली...ती काय हो, आभार, बरं झालं फ़ोन केला इ.इ. पोपटपंची वाक्य बोलली...शेजारीण मात्र त्याला तिथे आणायला तयार होती. पण तरी तिला म्हटलं एकदा I5 वर पोहोचले की वेळेचा जास्त अंदाज येईल मग परत फोन करते...

इथे ट्रकोबामुळे आमच्यापेक्षा दुसऱ्या रांगा पुढे पुढे जात होत्या. म्हणून ऑडीची पाठ सोडून मी परत उजवीकडे घुसले....तर इथे एक लेन समाप्त होत होती त्यामुळे उजवीकडच्या मंडळींचं यांना आपले म्हणा सुरु झालं होतं पर्यायाने तो ट्र्कोबाची लेन पुन्हा आपली पुढे आणि मी मागेच....कसंतरी पुन्हा डावं उजव करत हायवे ५ गाठला आणि घड्याळात पाहिलं ५:५० म्हणजे साधारण पोहोचू शकणार होते. कारण इथे सगळ्या लेन झपाझप जात होत्या....मग पुन्हा एकदा शेजारणीला कळवलं...मागच्या फेब्रुवारीत जेव्हा ही नवीन गाडी घेतली तेव्हा मी कशाला उगाच V6 वर पैसे घालवतोयस असं नवऱ्याला सांगत होते. पण आज ५ नंबरच्या हायवेवर अगदी तुफान पळवत शेवटी एकदाची आमची exit गाठली.तरी नशीब मी आधी जुनी कुमारी घेणार होते; पण नवऱ्याने कालच सांगितलं होत की हीच ने, शिवाय कार सीट यातच आहे त्यामुळे...असो...तर एकदाची V6 पॉवर कामाला आली आणि ६ ला एक मिनिट कमी असताना पाळणाघरात पोहोचले....हुश्श...

आल्यावर परत जेवण, मुलाची अंघोळ इतकी दमले की बास...त्यातून बाबा आज हॉटेलवर परत आला नव्हता...काय करतोयस विचारायचं त्राण माझ्यातही नव्हतं..जाऊदे उद्या परत येतोय म्हणून बाप लेकाना फोनवरच बोलू दिलं आणि मुलाला वेबकॅम हवाच होता म्हणून चक्क कॅमेऱ्याच software सुरु करून तो स्वत:ला त्यात पाहत आणि हसत बसाल तितक्या वेळात त्याला खाऊ घातलं, थोडं फार इतर मनोरंजन केलं आणि एकदाचा गुरुवार संपवला....त्यातल्या त्यात एक म्हणजे मी निघताना client कडची power थोड्या वेळासाठी गेली होती त्यामुळे मला काही तिथल्या सिस्टीमना कनेक्ट करून काम करायला हव होत ते कनेक्शन सुरु नव्हतं आणि ती लोक घरी गेल्यामुळे मला दुसऱ्याच दिवशी सगळं सुरु करता आल असता...

असो ...आज शेवटचा (आय मीन single mom duty चा शेवटचा) दिवस....आज सकाळी जरा लवकर काम सुरु केलंय.काल रात्री त्या पॉवर प्रकरणांमुळे काही सिस्टिम्स नव्हत्या..एका मिटिंगच्या आधी थोडे update बनवायचे होते....मुलगाही उशिरा उठला. त्याला सोडून एकदाची कामाची गाडी थोडी फार रुळावर आणली.....आता फक्त संध्याकाळी airport ला जायचं आहे आणि नेमकं पाउस संध्याकाळी सांगताहेत...बघूया, आमचा बाबा आला की मर्फीबाबा मुक्काम हलवतात का?? अर्थातच त्यांचा दुसरा फ़ेरा आमच्यावर येईपर्यंत तरी.....तुर्तास ही पाचा दिवसांची कहाणी साडे-चारव्या दिवशी संपवते....
आज कोजागिरीच्या चांदण्या रात्री तुम्ही ही पोस्ट वाचत असल्यास शुभेच्छा....फ़िर मिलेंगे....

Tuesday, October 12, 2010

जाना था जपान....

’तुला कोण व्हायचंय’ हा प्रश्न सगळी मोठ्ठी माणसं लहान मुलांना का विचारतात हे मला ज्या वयापासुन वाटतं ते आता काही दिवसांनी कदाचित मीच हा प्रश्न माझ्या लेकाला विचारेन या वयात आले तरी पडलेला गहन प्रश्न आहे...वयानुसार तो अधीकच गहन होत चाललाय ही गोष्ट वेगळी...


लहानपणी माझे बाबा मला ’गोरी’ म्हणायचे. आम्हा भावंडांत कदाचित त्यातल्या त्यात उजळ असल्याने असेल किंवा कुठे बाहेर जाताना मला समोर उभं करुन पावडर लावण्याचं काम त्यांचं असायचं म्हणूनही असेल पण हे ’गोरी’ ’गोरी’ ऐकुन सगळ्यात प्रथम मला एअर होस्टेस व्हावं असं वाटायचं..त्यासाठी काय करावं लागतं याची कल्पना त्यावेळी येणं शक्यच नव्हतं पण त्या दिसायला सुंदर असतात आणि त्यावेळी सुंदर दिसण्याची हौस हे त्यापाठचं आणखी एक कारण असावं..मग नंतर कुणीतरी हवाईसुंदरीच्या कामाचं साधारण स्वरुप सांगितल्यानंतर मात्र सुंदर दिसायची ही हौस लगेचच मावळली.घरी शेंडेफ़ळ असल्याने काम करायची वेळ तशी कमी वेळा यायची. त्यामुळे हे विमानात बसलेल्या सगळ्या प्रवाशांची उठबस माझ्यासाठी खूपच काम असणार होतं आणि तशी कामं करायच्या बाबतीत मी आळशीच आहे...

लहानपणी परळच्या मावशीकडे किंवा मामाकडे जायच्या निमित्ताने रेल्वेचा प्रवास बर्‍यापैकी व्हायचा. त्यात अन्साउनमेंट नावाचा प्रकार तेव्हा लोक जरा लक्ष देऊन ऐकायचे. मला वाटतं सगळीकडे इंडिकेटर्स नसायची किंवा असलं तरी दादरचं विशेष करुन मला आठवतं तीन नंबरच्या फ़लाटावरचं इंडिकेटर मागच्या चर्चगेटकडच्या डब्यांसाठी अजिबात सोय़ीचं नव्हतं. सोडा-वॉटरच्या काचांचा चष्मा करून लावला तरी दिसलं नसतं. तर त्या काळात जेव्हा ’प्लॅटफ़ॉर्म नं दो पर आनेवाली गाडी चर्चगेट के लिए तेज गाडी है..ये गाडी दादर से बंबई सेंट्रल तेज जाएगी’ असं ऐकायला यायचं त्यावेळी वेस्टर्न रेल्वेला आपल्या आवाजातली घोषणा व्हायला हवी असं उगाच वाटायचं..आणि मग मावसभावंडांबरोबर खेळताना गच्चीतल्या खोट्या खोट्या प्लॅटफ़ॉर्मवर येणार्‍या गाड्यांची अन्साउन्सर व्हायला मला फ़ार आवडायचं....पण खरे अन्साउन्सर कसे दिसतात हे कुणालाच कधीच दिसत नाहीत त्यामुळे आपल्याला मैत्रीणींमध्ये वट नाही मारता येणार म्हणून हे स्वप्नही लवकरच बारगळलं...शिवाय नंतर माझ्या एका मावसभावाने मला सांगितलं की हे आवाज एकदा रेकॉर्ड करतात आणि सारखे सारखे वाजवतात त्यामुळे न मिळताच माझी ही नोकरी गेली...अजुनही इप्रसारणवर जरी बोलायला मिळायलं तरी चालेल असं मी जेव्हा ऐकते तेव्हा विचार करतेच...(आहे का कुणी इप्रसारणवालं इथं)

मध्ये असाही काळ आला की कोण व्हायचं यापेक्षा कोण व्हायचं नाही हेच जास्त ठरवलं जायचं..उदा. आई-बाबा शिक्षक असतानाही शिक्षक अजीबात व्हायचं नाही किंवा फ़रसाणवाला झालं तर मग स्वतःच्याच दुकानातलं सारखं सारखं खाऊन कसं चालेल म्हणून फ़रसाणवाला नको..किंवा वडेवाला झालं तर सारखं वडे तळत राहावं लागेल मग खाणार कधी असं नको तिथं डोकं चालायला लागलं...घरी दादा-ताईंबरोबर माझं कधी काळी शब्दाला शब्द सुरु झालं की ’तू वकिल हो’ हा बाबांचा सल्लाही मी कधीच मनावर घेतला नाही. विमान चालवायचं माझं स्वप्न मात्र त्याला खूप पैसे लागतात हे पहिल्या फ़टक्यातच(पवनहंसला CPL ची चौकशी केली होती..सात लाख...डोळेच फ़िरले...) कळल्यामुळे मात्र तिथेच विरलं....

त्यानंतर मात्र जसं जसं अक्कल नावाचा प्रकार वाढायला लागला तेव्हा आपल्याला खरंच कुणीतरी व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं. अर्थात याबद्दल जिच्याशी मी खर्रीखुर्री चर्चा करु शकणार होते ती माझी मावसबहीण शिल्पा नावाचं एकमेव व्यक्तिमत्व होतं..मला का कुणास ठाऊक डॉक्टर व्हावं असं प्रचंड वाटायचं आणि हे तिच्याकडे जेव्हा मी सांगितलं तेव्हा तिला इंजिनियर व्हायचं (का ते तिलाही माहित नव्हतं) फ़क्त हा आमच्यावेळी इंजिनियर आणि डॉक्टर एवढं दोनच होऊन मग मोठ्ठं होता येतं अशा प्रकारच्या काळातल्या आजुबाजुच्या गोष्टींचा परिणाम असावा असंही वाटतं....आता इंजिनियर आणि डॉक्टर ही स्वप्न आमच्या दोघींत वाटुन घेतल्याने थोडं सोपं झालं होतं...

अर्थात वाटणं आणि एखादी गोष्ट ..त्यातल्या त्यात शैक्षणिक, प्रत्यक्षात येणं यात जमीन-अस्मानाचा फ़रक होता. आमच्या दोघींच्याही बाबतीत तर जे व्हायचं ते व्हा पण फ़्री सीट आणि मुंबईतल्या मुंबईत असं कंपल्सरी होतं..म्हणजे कुठलंही प्रायव्हेट कॉलेज, होस्टेल असले लाड आमच्या आर्थिक आवाक्यातले नव्हतेच...दहावीला चांगले मार्क मिळाले तरी बारावीला पीसीबीच्या त्रिकुटाने घात केला आणि माझं घोडं डिप्लोमा मार्गे डिग्रीला जाऊन इंजिनियरिंगच्या गंगेत न्हालं..तर मुंबईत इंजिनियरिंगला नाही पण त्यावेळी कळव्याला निघालेल्या मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळाल्याने माझी मावसबहीण डॉक्टर झाली आणि त्यानंतर सायनला तिने पदव्युत्तर शिक्षणही घेतलं...आता मागे वळून जेव्हा ’तू इंजिनियर, मी डॉक्टर’ हे सोप्पं समीकरण मांडलेल्या आम्ही आठवतो तेव्हा खरंच वाटतं की आमच्या दोघींच्या बाबतीत ’तुम्ही कोण होणार?’ हे म्हणजे जाना था जापान पहुंच गए चीन असं काहीसं झालं...

Friday, October 8, 2010

The Lucky Dog

" नेमेचि येतो" मध्ये मोडणारे इथले (बोटावर मोजता येण्याइतके) लंबे विकांत. म्हणजे खरं तर महिनोनमहिने आधी फ़िरायचं वेळापत्रक (कामाच्या वेळापत्रकाप्रमाणेच(??)) बनवलं पाहिजे पण इथे महिने काय? आठवड्यावर सुट्टी आली तरी आम्ही आपले झोपलेलोच...काही नाही नेहमीचंच घरची आणि ऑफ़िसची कामं (किंवा या सर्वांत बिजी असण्याचा बहाणा) पण मग बुधवार पर्यंत गाडी आली की "श्या! तीन दिवस काय घरी बसायचं?" म्हणून मग आधी जागा, मग तिथली आमची वाट पाहणारी हॉटेलं धुंडाळा..यातुन सुवर्णमध्य साधुन एखादं ठिकाण एकदाचं नक्की केलं की मग अक्षरशः घोड्यावर बसायचं..
म्हणजे शुक्रवारी चारला ड्राइव्हला सुरुवात करु म्हणत साडे-तीन पर्यंत कसं-बसं ऑफ़िसचं काम आटपलं आणि मग तहानलाडू, भूकलाडू, बाकी सामान बॅगामध्ये कोंबायचं..लिस्ट-बिस्ट कुठली? जे काही डोक्यात असेल ते घेऊन एकदाचं पाच पर्यंत निघालं म्हणजे यकदम टायमावर समजायचं; असाच हाही लॉंग विकेंड आमच्या अशाच आयत्या वेळच्या प्लानिंग(???) प्रमाणे सॅन-युआन बेटांवर जाण्यासाठी शुक्रवारी रात्री निघालो.
आधी ठरवलं होतं की त्या चारपैकी एका बेटावर राहायचं आणि मग तिथे भटकंती, व्हेल वॉचिंग इ. करुया पण....म्हणजे अर्थातच बुधवारी विचारलं तर शुक्रवार-शनिवार रात्रीची हॉटेल जवळजवळ बुक्डचं होती आणि जी होती त्यांचे भाव अक्षरशः गगनाला भिडले होते...म्हणजे त्याच पैशात आम्ही (अर्थातच वेळेत ठरवलं असतं तर) छानपैकी कॅलिला पण जाऊ शकलो असतो..
मग त्यातल्या त्यात बरा पर्याय म्हणजे अल्याड राहायचं आणि सकाळी फ़ेरीने बेटावर जाऊन भटकंती करायची. हेही वाईट नव्हतं म्हणा...तसंही फ़ेरीमध्ये आपली गाडी घेऊन जाता येतं आणि ती साधारण तासभराची आहे....पुर्वी फ़ेरी बुकिंगची सोय होती पण आता ती सरकारतर्फ़े चालवली जाते आणि first come first serve तत्वावर..तेही आमच्या पथ्यावरच होतं म्हणा नाहीतर ते बुकिंग नसतं मिळालं तरी सगळंच मुसळ केरात.
मजल दरमजल करत तो पाचेक तासाचा रस्ता काटून हॉटेल मुक्कामी शुक्रवारी रात्री साडे-दहा, पावणे अकराच्या आसपास पोहोचलो. नशिबाने पोरगं गाडीतच झोपलं होतं. पण दुसर्‍या दिवशी एक्झ्यॅक्टली काय करायचं ते नीट ठरवलं नसल्याने आधी हॉटेललाच नेट लावुन थोडा अभ्यास केला आणि चार पैकी त्यातल्या त्यात प्रगत फ़्रायडे हार्बरला जायचं ठरवलं.ती फ़ेरी होती एकदम सहाच्या दरम्यान नाहीतर नऊ आणि मग तडक साडे-अकराची. म्हणजे नवाची पकडली तर पूर्ण दिवस फ़िरता येईल असा विचार करुन एकदाची पाठ टेकली.
आदल्या दिवशीचा काम आणि प्रवासाचा शीण असल्यामुळे अर्थातच साताच्या गजराला अगदी लगेच उठणं झालं नाही आणि मुख्य एका दोन वर्षांच्या मुलाची आन्हिक उरकेपर्यंत अर्थातच जवळ जवळ आठ चाळीस झालेच.(पोरं असली की ब्लेमिंग सेशनला काही प्रॉब्लेमच येत नाही, नाही?? नवरा-बायकोमधले वाद कमी करण्याचा दुवा जणू) "जाऊदे गं, अजुन डायरेक्शन नाही पाहिले आपण नंतरचीच पकडूया" या नवरोबाच्या म्हणण्याकडे जास्त लक्ष न देता त्याला म्हटलं रिसेप्शनिस्टकडून चार ओळी खरडून घे...ट्राय करुया..नशीबाने तसं फ़ेरीचं अंतर हॉटेलपासून जवळ होतं पण तरी तिथेही रांग असू शकते आणि तेही लॉंग विकेंड असल्यामुळे अम्मळ जास्तही असेल असला काही विचार करायला आम्हाला वेळ नव्हताच...
आने दो भई...

शेवटचं वळण घेऊन तिकिटाच्या खिडकीत आम्ही गेलो तेव्हा मी गाडीतल्या घड्याळात पाहिलं तर नऊला अक्षरशः एक मिनिट बाकी होतं.तिथे चारेक वेगवेगळ्या फ़ेरींसाठी अनेक रांगां होत्या आणि त्यातल्या बर्‍यापैकी गच्च दिसत होत्या. त्यातली एक रांग तिने आम्हाला सांगितली ज्यात आम्ही त्यात तिसरे बिसरे असू आणि त्यांची अनाउन्समेन्ट ऐकायला आली "final call for Friday Harbour" हळूच काचेतून मागे पाहिलं तर आमच्या मागे कुण्णीच नव्हतं आणि त्यांचा माणूस राहिलेल्या गाड्यांना मार्गदर्शन करत आम्हाला थोडा वेळ थांबवुन आत सोडलं.आत शिरल्यावर लक्षात आलं की त्या साधारण शंभरेक गाड्यांची कपॅसिटी असणार्‍या फ़ेरीमधली आमची शेवटची गाडी होती..थोडं मागे घेऊन त्याने आमच्या गाडीला मागे सपोर्ट लावले आणि आमचं घोडं गंगेत आपलं ते बोटीत न्हालं....

समोरच्या रांगेत उभी आमची धन्नो...आणि आमचा नंबर शेवटचा...धप्पाक...
आम्ही आत येत असताना डावीकडे नंतरच्या फ़ेरीसाठी गाडी न घेता जाणार्‍या प्रवाशांसाठीची रांग होती त्यातला एक माणूस आमच्या गाडीकडे पाहताना "The Lucky Dog" म्हणाला होता त्याचा अर्थ मला आम्ही गाडी पार्क करुन उतरताच सुटणार्‍या बोटीच्या भोंग्याचा आवाज ऐकला तेव्हा लगेच कळला....आमच्या पुढची गाडी निदान तासेकभर आधी नंबर लावुन उभी असेल आणि आम्ही मस्त आयत्यावेळी येऊन शेवटची का होईना सीट पकडून एकदाचे त्यांच्याच बरोबरीने बोटीवर येऊ शकलो...मजा म्हणजे बाहेर सोडताना ते ही मधली रांग पहिले सोडतात त्यामुळे बाहेर पडताना पण थोडेफ़ार लकीच....
या ट्रिपमध्ये एकंदरितच बर्‍याच वेळा आम्ही असे लकी ठरलो पण त्याबद्द्ल फ़िर कभी....सध्या गाडीचा आणि बोट सुटल्यावर खेचल्या जाणार्‍या पाण्याच्या फ़ोटोकडे पाहात तो lucky dog क्षण एवढंच पुरे.
हुश्श...एकदाची ट्रीप सुरु झाली ब्वा..

Sunday, October 3, 2010

उन्हाळा सरतोय पण आपल्या खाद्य आठवणी मागे ठेऊन

सप्टेंबर हा महिना हवामानाच्या बाबतीत तसा बोनस असतो. म्हणजे, पहिल्या विकांताला एकदा का इथला लेबर डे संपला की उन्हाळा तसा संपलेला असतो, पण लगेच काही थंडी आलेली नसते. पण ऑक्टोबरची तशी काही खात्री देता येत नाही..त्यामुळे थंडीची तयारी करायला सुरुवात होते...म्हणजे तेच ते आपलं कपडे वगैरे झालंच तर हा...उन्हाळ्यात बाहेर काढलेली ग्रील असेल तर तिला कोरडं करुन अंगडं टाकुन ठेवुन द्या. अरे हो ग्रीलवरुन आठवलं, आमच्या फ़िलीच्या घराला मागच्या बाजुच्या ओट्यावर आधीपासुन बसवलेलं ग्रील होतं..त्याला गॅसचं कनेक्शनही होतं, त्यामुळे उन्हाळाभर आम्ही काही न काही भाजुन खात असायचो..मला आवडतं पण शिवाय एक दिवस नेहमीच्या भाजी-पोळी जेवणापासुन सुट्टी असाही स्वार्थ त्यात साधला जातो.पण आता ओरेगावात हे चोचले कसे पुरवायचे किंवा एखादं छोटं ग्रील घेऊया का असा विचार सुरु होताच. ही समस्या आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पुलवरचं मोठं एकदम शेफ़ ग्रील पाहिलं आणि सुटली...


आता थोडं गार वातावरण सुरु होतंय तर त्यांनीही ते ग्रील बंद करुन ठेवलंय...आणि मला आठवतेय असंच माझ्या शेजारणीबरोबर केलेला ग्रील बेत...तिला एकदा तंदुरीची चव मला चाखवायची होती तर तिला मला सोकाय सामन आणि तोही एका विशिष्ट प्रकारच्या लाकडावर कसा भाजतात ते दाखवायचं होतं..बाकीच्या भाज्या अशाच जे काही त्यादिवशी आणलं होतं ते ग्रीलवर पडत गेलं...म्हणजे अक्षरशः ग्रीलभर झालं असं म्हटलं तर जास्त बरोबर ठरेल...आणि एकेक करुन पोटात कसं गेलं ते कळलंही नाही


खरं तर जास्त काही लिहीण्यापेक्षा मला वाटतं फ़ोटोच काय ते सांगतील. शिवाय मागे फ़ार्मविलेची पोस्ट वाचुन जर या भाज्यांचं तुम्ही काय करता असा कुणाला प्रश्न पडला असेल तर ती शंकाही मिटेल कसं???

मग यंज्वाय...जाता जाता....आपल्याकडे ऑक्टोबरच्या उन्हाळ्यात हा मेन्यु कसा लागेल हे कुणी ट्राय करुन पाहणार असेल तर नक्की कळवा.
आमचा साधा मेन्यु...मका,बटाटा,झुकिनी,तंदुरी तंगडी आणि सोकाय (sockeye) सामन

चीज भरलेली मिरची माझी खासियत

बल्लवाने फ़क्त मध्ये मध्ये पलटी मारली की झालं
इतकं सारं ग्रील होतंय मग तोंडी लावायला एक छोटा पिझा नको का?
झालं! ताटात एकदा का थोडं थोडं आलं की कॅमेर्‍याची आठवण कुणाला?

Thursday, September 30, 2010

कामगार जीवनातील एक दिवस

ही दिनचर्या वाचण्यापूर्वी इथे अपेक्षित असलेला कामगार म्हणजे आधुनिक जगतात संगणक नामे यंत्रावर संपूर्णपणे किंवा दिवसाच्या कामाच्या तासातले निदान ८०% तास संगणकावर काम करतो अशी व्याख्या आहे याची कृ नो घ्या.


सकाळी सकाळी शक्यतो कंपनीच्या बसने हा कामगार कामावर आला की आधी वंदू तुज प्रमाणे संगणक सुरु करतो. उगाच चला म्हणून उंदीर मामांनाही हाय करतो आणि आजूबाजूच्या इतर कामगार मित्रांकडे नजर टाकतो...ओझरती नजर आपल्या साहेब या विशेष श्रेणीतल्या कामागाराकडेही गेलेली असते पण तो तसे अजिबात दाखवत नाही. त्या झलक नजरेमधून सर्वप्रथम साहेब आहेत का आणि असल्यास त्यांचा मूड या दोन्हीच्या निरीक्षणामधून आपला उर्वरित दिनक्रम आखायला त्याला मदत होते. आता मायबाप कंपनी सरकारच्या कृपेने त्याचा गणपती बाप्पा सुरु झालं असेल तर तो चेहऱ्यावर कामाने पछाडलेपणाचा एक भाव आणून आपली गरम,जी, थोबाड्पुस्तिका अशी अनेक मेल अकौंट उघडून त्यामध्ये ताझी खबर काय आहे त्यानुसार या..........हु म्हणून कामाला म्हणजेच त्या मेलना उत्तर, त्यातली काही तत्परतेने इतर कामगार आणि मित्रमंडळीच्या अकौंटला पाठवणे अशी अति महत्वाची काम करतो. मधेच त्याला आपल्याला एक आउट लूक किवा लोटस नोट नावाचा अकौंट पण आहे याची आठवण येते आणि तो तेही उघडतो...आदल्या दिवशी काय दिवे लावले आहेत त्यानुसार ही मेल बॉक्स भरलेली किवा ओसंडून वाहणारी अश्या कुठल्यातरी एका प्रकारची असते...
आता इतका पसारा निस्तरायचा म्हणजे पोटात ब्रेकफास्टचे दोन कण गेले पाहिजेत अस अर्थातच त्याच्या पोटातले उंदीरमामा सांगत असतात. त्यांनी नाही सांगितले तर त्याच्या संगणकावर सुरु करताच इतर कामगारजनाशी त्वरित संपर्क साधणारी तीच वेळ, दूत अशी software त्यांच्या खिडक्यामधून तोच संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवण्याच काम करून दमल्या असतात...

तो हीच वेळ योग्य समजून उठतो तोवर आजूबाजूच्या कामगार खुर्च्याही सरकवण्याचे आणि सारेच कॅन्टीन नामे मुक्कामाच्या ठिकाणी निघाल्याचे सूर आसपास घुमतात आणि पाचेक मिनटात मजल्यावर नीरव शांतता पसरते. कॅन्टीन मधली रांग, काय घ्यायचं किवा नाही याबद्दलची चर्चा, आपल्याला हवं ते टेबल (याची व्याख्या कामगार ग्रुप प्रमाणे निराळी असते...ट्रेनी किवा नवीन लोक शक्यतो सकाळी सकाळी पाहत राहता येईल अशी हिरवळ जिथून दिसेल ती जागा पसंत करतात... काय आहे हिरवळ पाहिलेली डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते असे एकमत आहे) तर सांगायचा मुद्दा म्हणजे सकाळी साडेआठ नावाच्या सुमारास आलेला कामगार वर्ग अश्या प्रकारे साडेदहा वाजेपर्यंत पोटपूजा आणि वर उल्लेखलेली कामे (??) करून पुन्हा एकदा आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होतो...

जेवणात जस मीठ महत्वाचं तसच रोजच्या कामात एक किवा दोन मिटींगा या हव्यातच...त्यातलीच एखादी असल्यामुळे कामाने त्रस्त बिचारा कामगार मग system वर लॉगिन करून काही पाहण्याचा विचार रद्द करून मिटिंग रूम मध्ये जातो...त्याला बोलायचं नसतच ऐकायच की नाही हेही तोच ठरवतो.. वायरलेस connection असेल तर त्याला ते न ऐकता आपण खूप बीजी असल्याचा आव आणता येतो नसेल तर शून्यात नजर लावून तो एक तास कशी बशी कळ काढतो... ते शून्यात नजर उगाच साहेबाला आपण कामाचा चिंतन करतोय अस भासवायला पण मनात मात्र इतक्यात आवडत्या क्यूबमधून आलेला संदेश नाही तर दुसर्या कंपनी मधल्या "तिने' किवा "त्याने" पाठवलेली मेल नाहीतर मग सकाळी हिरवळीवर दिसलेलं नव पाखरू असे अनेक थोर विचार मनात रुंजी घालत असतात...

हा मिटिंगचा अक्खा एक तास आणि वर आणखी अर्धा तास डोक्यावरून पाणी चाळीसेक मिंट दुसरी फुटकळ काम करणे नाहीतर mom उर्फ मीटिंगची मिंट बनवणे किवा पुन्हा पुन्हा वाचणे या कार्यात काढेपर्यंत जेवणाची वेळ होतेच..पुन्हा मग सकाळी सांगितलेली पिंगपिंगी, रांग (यावेळी जरा मोठी) हिरवळीची जागा हे सोपस्कार होतात आणि मग मात्र हक्काचा लंच टायमाचा तास बडवायला मंडळी जरा चक्कर मारायला बाहेर जातात...कुणी पान सुपारीवाल असेल तर त्याची सोय नाही तर चिंगम चॉकलेटसारख्या कारणाने पुन्हा एकदा इतर कंपनी मधली हिरवळ पाहणेही होते...झालंच तर किती काम आहे (??) या नावावाखाली साहेबाला किवा client ला शिव्या घालण्याचं पवित्र कार्यही याच वेळात होऊन जात.

हे होईस्तो दुपारचा एक वगैरे वाजलेला असतो. मग मात्र आपल्या कामगाराला परिस्थितीची जाणीव होते...बरीच कामाची मेल, इशू लॉग इ गोष्टी वाट पाहत असतात..तो मान खाली घालून मुकाट्याने कामाला सुरुवात (दुपारी बर का??) करतो...त्यातही जर दुपारी मिटिंग असेल तर मग तिथे जाऊन उघड्या डोळ्याने झोप काढणे याखेरीज अन्य काही करणे त्याच्या हातात नसतेच. मिटिंग मधून बाहेर आल्यावर आपल्या कामाच्या software मध्ये आतापर्यंत लॉगिन केले नसल्यास करून पाच सहा खिडक्या उघडून कामाची वातावरण निर्मिती करणे त्याला भाग पडते. अर्थात मध्ये मध्ये होणारी पिंगपिंगी....सवयीचा परिणाम म्हणून पुन्हा पुन्हा आपल्या कामाव्यतिरिक्त मेल पाहणे, बझ करणे, इथली डाक तिथे पाठवणे...भावी किवा सद्य पार्टनर (असला तर) त्यांच्याशी sms , फोन, chat यासाधनांपैकी उतरत्या भाजणीने संपर्कात राहणे हेही कामगाराला करावच लागत...पाळणाघरात मुल बिल असेल तर मग बघायलाच नको आणखी एक संपर्क जागेची वाढ.. असो तर अशी ही काम करून थकलेल्या जीवाला थोडा श्रमपरिहार हा हवाच....शिवाय भारतीय कॅन्टीन असेल तर मग पाहायलाच नको....समोसा, वडे, चहा-कॉफी असे संमिश्र वास सुटलेले असतील तर जागेवर बसण अशक्यच...सगळा ग्रुप तय्यार असेल तर पुन्हा एक कॅन्टीन चक्कर नाहीतर निदान स्वत:च्या जागेवर काहीतरी खायचा मागवून शेजारच्या कुबातल्या मित्र-मैत्रिणीबरोबर आजचा दिवस कसला बोअर आहे किवा तो अमक्या तमक्याचा मेल पाहिलास का? (खुपदा ही चर्चा एखाद्या fwd मेलबद्दल असते हे सांगणे न लगे)

शेवटी एकदाचे चार सवाचार वाजतात आणि निर्ढावलेला कामगार असेल तर तो साडे पाच किवा सहाची पहिली कंपनी बस असते त्याने सटकायच्या दृष्टीने काम आवव्राच्या तयारीला लागतो...जितका अनुभव जास्त तितके हे काम जास्त लवकर आणि डोक्याला फार ताप न देता होते....खुपदा तर बरेचसे काम आदल्या किवा त्याच दिवसाच्या मेलना चतुरपणे उत्तर दिले की होऊन जाते....हुशार लोक यालाच आपल्या डोक्यावरचा काम दुसर्याच्या डोक्यावर घालणे असही म्हणतात पण खर ते तसही नाही त्याला in order to achieve ठिस, why dont we do it ......way असा साज चढवून ते 'वी' म्हणजे 'समोरचा' इतकं केलं तरी गोड बोलून काम होतं....अगदी तसं शक्य नसेल तर to proceed further I need following information from you म्हणून एक जमेल तशी मोठी लिस्ट बनवून समोरच्याच्या गळ्यात मारली की दुसऱ्या दिवसापर्यंत आपण तसेही proceed होणार नसतो मग अर्थात घराकडे proceed व्ह्यायला आपण मोकळे होतो...आणि मुख्य अश्या एक दोन तरी मेल ची कॉपी साहेब नावाच्या प्राण्याच्या पोस्टबॉक्समध्ये पडेल याची खबरदारी घ्यावी. म्हणजे लेकरू किती काम करतय असा वाटून तोही आपल्या बाजूचा...आणखी एक मुद्दा म्हणजे अश्या मेल्स गाशा गुंडाळून झाल्यावरच पाठवाव्या म्हणजे समोरचा गाफील राहून उत्तर देईपर्यंत आपण त्या साडेपाचच्या बसने दोन-तीन सिग्नल्स तरी गाठलेले असतात आणि आणखी एक दिवस सत्कारणी लावून आपण पगाराच्या दिवसाची वाट पाहायला मोकळे झालेलो असतो...



अर्थात नेहमीच इतका सरळ धोपट दिनक्रम मिळणार नसतो. कधी तरी तो डेड लाईन नावाचा राक्षस पुढे होऊन उभा ठाकतोच. आणि इतर वेळी 'काय काम करतो की नाही हा' असे वाटणारा आपला कामगार अंगात शंभर हत्तीच बळ आणून नाईट (आणि अर्थातच डे पण) मारून झटपट काम उरकून client च्या गळ्यात मारून टाकतो...हा एक दोन किडे त्यात राहतात पण पुढच्या काम मिळायची हीच बेगमी समजून साहेबही त्याला शक्यतो रागे भरत नाही...

काय आहे, कामं करण हा खरा कामगाराच्या हातचा मळ आहे पण उगाच वेळेच्या आधीच ते संपवण्याची पण गरज नसते. त्यामुळे 'वारा तशी पाठ' या न्यायाने काम होत राहतात....पण वरच्या दिनचर्येत सांगितलेली कामं रोजच्या रोज केलेलीच बरी अशा प्रकारात मोडतात. अनुभवाने हे प्रत्येक कामगाराला (त्यातल्यात त्यात IT मधल्या) कळत आणि मग कामाचं ओझं न राहता it was just another day म्हणून त्याच कामाच्या जागी पुन्हा एकदा येण्यास तो सज्ज होतो.