Tuesday, October 12, 2010

जाना था जपान....

’तुला कोण व्हायचंय’ हा प्रश्न सगळी मोठ्ठी माणसं लहान मुलांना का विचारतात हे मला ज्या वयापासुन वाटतं ते आता काही दिवसांनी कदाचित मीच हा प्रश्न माझ्या लेकाला विचारेन या वयात आले तरी पडलेला गहन प्रश्न आहे...वयानुसार तो अधीकच गहन होत चाललाय ही गोष्ट वेगळी...


लहानपणी माझे बाबा मला ’गोरी’ म्हणायचे. आम्हा भावंडांत कदाचित त्यातल्या त्यात उजळ असल्याने असेल किंवा कुठे बाहेर जाताना मला समोर उभं करुन पावडर लावण्याचं काम त्यांचं असायचं म्हणूनही असेल पण हे ’गोरी’ ’गोरी’ ऐकुन सगळ्यात प्रथम मला एअर होस्टेस व्हावं असं वाटायचं..त्यासाठी काय करावं लागतं याची कल्पना त्यावेळी येणं शक्यच नव्हतं पण त्या दिसायला सुंदर असतात आणि त्यावेळी सुंदर दिसण्याची हौस हे त्यापाठचं आणखी एक कारण असावं..मग नंतर कुणीतरी हवाईसुंदरीच्या कामाचं साधारण स्वरुप सांगितल्यानंतर मात्र सुंदर दिसायची ही हौस लगेचच मावळली.घरी शेंडेफ़ळ असल्याने काम करायची वेळ तशी कमी वेळा यायची. त्यामुळे हे विमानात बसलेल्या सगळ्या प्रवाशांची उठबस माझ्यासाठी खूपच काम असणार होतं आणि तशी कामं करायच्या बाबतीत मी आळशीच आहे...

लहानपणी परळच्या मावशीकडे किंवा मामाकडे जायच्या निमित्ताने रेल्वेचा प्रवास बर्‍यापैकी व्हायचा. त्यात अन्साउनमेंट नावाचा प्रकार तेव्हा लोक जरा लक्ष देऊन ऐकायचे. मला वाटतं सगळीकडे इंडिकेटर्स नसायची किंवा असलं तरी दादरचं विशेष करुन मला आठवतं तीन नंबरच्या फ़लाटावरचं इंडिकेटर मागच्या चर्चगेटकडच्या डब्यांसाठी अजिबात सोय़ीचं नव्हतं. सोडा-वॉटरच्या काचांचा चष्मा करून लावला तरी दिसलं नसतं. तर त्या काळात जेव्हा ’प्लॅटफ़ॉर्म नं दो पर आनेवाली गाडी चर्चगेट के लिए तेज गाडी है..ये गाडी दादर से बंबई सेंट्रल तेज जाएगी’ असं ऐकायला यायचं त्यावेळी वेस्टर्न रेल्वेला आपल्या आवाजातली घोषणा व्हायला हवी असं उगाच वाटायचं..आणि मग मावसभावंडांबरोबर खेळताना गच्चीतल्या खोट्या खोट्या प्लॅटफ़ॉर्मवर येणार्‍या गाड्यांची अन्साउन्सर व्हायला मला फ़ार आवडायचं....पण खरे अन्साउन्सर कसे दिसतात हे कुणालाच कधीच दिसत नाहीत त्यामुळे आपल्याला मैत्रीणींमध्ये वट नाही मारता येणार म्हणून हे स्वप्नही लवकरच बारगळलं...शिवाय नंतर माझ्या एका मावसभावाने मला सांगितलं की हे आवाज एकदा रेकॉर्ड करतात आणि सारखे सारखे वाजवतात त्यामुळे न मिळताच माझी ही नोकरी गेली...अजुनही इप्रसारणवर जरी बोलायला मिळायलं तरी चालेल असं मी जेव्हा ऐकते तेव्हा विचार करतेच...(आहे का कुणी इप्रसारणवालं इथं)

मध्ये असाही काळ आला की कोण व्हायचं यापेक्षा कोण व्हायचं नाही हेच जास्त ठरवलं जायचं..उदा. आई-बाबा शिक्षक असतानाही शिक्षक अजीबात व्हायचं नाही किंवा फ़रसाणवाला झालं तर मग स्वतःच्याच दुकानातलं सारखं सारखं खाऊन कसं चालेल म्हणून फ़रसाणवाला नको..किंवा वडेवाला झालं तर सारखं वडे तळत राहावं लागेल मग खाणार कधी असं नको तिथं डोकं चालायला लागलं...घरी दादा-ताईंबरोबर माझं कधी काळी शब्दाला शब्द सुरु झालं की ’तू वकिल हो’ हा बाबांचा सल्लाही मी कधीच मनावर घेतला नाही. विमान चालवायचं माझं स्वप्न मात्र त्याला खूप पैसे लागतात हे पहिल्या फ़टक्यातच(पवनहंसला CPL ची चौकशी केली होती..सात लाख...डोळेच फ़िरले...) कळल्यामुळे मात्र तिथेच विरलं....

त्यानंतर मात्र जसं जसं अक्कल नावाचा प्रकार वाढायला लागला तेव्हा आपल्याला खरंच कुणीतरी व्हायला पाहिजे असं वाटायला लागलं. अर्थात याबद्दल जिच्याशी मी खर्रीखुर्री चर्चा करु शकणार होते ती माझी मावसबहीण शिल्पा नावाचं एकमेव व्यक्तिमत्व होतं..मला का कुणास ठाऊक डॉक्टर व्हावं असं प्रचंड वाटायचं आणि हे तिच्याकडे जेव्हा मी सांगितलं तेव्हा तिला इंजिनियर व्हायचं (का ते तिलाही माहित नव्हतं) फ़क्त हा आमच्यावेळी इंजिनियर आणि डॉक्टर एवढं दोनच होऊन मग मोठ्ठं होता येतं अशा प्रकारच्या काळातल्या आजुबाजुच्या गोष्टींचा परिणाम असावा असंही वाटतं....आता इंजिनियर आणि डॉक्टर ही स्वप्न आमच्या दोघींत वाटुन घेतल्याने थोडं सोपं झालं होतं...

अर्थात वाटणं आणि एखादी गोष्ट ..त्यातल्या त्यात शैक्षणिक, प्रत्यक्षात येणं यात जमीन-अस्मानाचा फ़रक होता. आमच्या दोघींच्याही बाबतीत तर जे व्हायचं ते व्हा पण फ़्री सीट आणि मुंबईतल्या मुंबईत असं कंपल्सरी होतं..म्हणजे कुठलंही प्रायव्हेट कॉलेज, होस्टेल असले लाड आमच्या आर्थिक आवाक्यातले नव्हतेच...दहावीला चांगले मार्क मिळाले तरी बारावीला पीसीबीच्या त्रिकुटाने घात केला आणि माझं घोडं डिप्लोमा मार्गे डिग्रीला जाऊन इंजिनियरिंगच्या गंगेत न्हालं..तर मुंबईत इंजिनियरिंगला नाही पण त्यावेळी कळव्याला निघालेल्या मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलला ऍडमिशन मिळाल्याने माझी मावसबहीण डॉक्टर झाली आणि त्यानंतर सायनला तिने पदव्युत्तर शिक्षणही घेतलं...आता मागे वळून जेव्हा ’तू इंजिनियर, मी डॉक्टर’ हे सोप्पं समीकरण मांडलेल्या आम्ही आठवतो तेव्हा खरंच वाटतं की आमच्या दोघींच्या बाबतीत ’तुम्ही कोण होणार?’ हे म्हणजे जाना था जापान पहुंच गए चीन असं काहीसं झालं...

30 comments:

  1. हा हा मस्त...लहानपणी पेपरमधल्या बातम्या वाचून वाटायच आपण पोलीस व्हाव आणि अरुण गवळीला पकडाव (त्या काळी सॉलिड दहशत होती त्याची) पण आता त्याच गवळीच्या निवडणुकीच्या बातम्या ऐकून फक्त चॅनेल बदलतोय :)

    ReplyDelete
  2. अगदी जिव्हाळ्याचा विषय. लहानपणापासून अनेकदा लोकं आपल्याला "तू कोण होणार?" आणि आपण स्वत: स्वताला "आपण काय व्हायचं?" हे अनेकदा विचारतो. मी देखील लहानपणी स्वता:ला अनेक कर्तुत्ववान ठिकाणी ठेवून पाहिलं पण त्यापैकी कोणत्याही नोकरीत मे महिना आणि दिवाळीला महिनाभर सुट्टी नसल्याने नोकरी हा प्रकार लहानपणीच माझ्या मनातून उतरला.

    बाकी एअर इंडियाच्या हवाई सुंदर्‍या बघेपर्यंत हवाई सुंदर्‍या दिसायला सुंदर असतात असा माझा देखील समज होता. :D

    ReplyDelete
  3. हा प्रश्न मला सातवीत असताना इंग्लिश च्या मॅडमनी विचारला होता. मी म्हणालो ईंजिनीअर :) त्यावेळेस ईंजिनीअर म्हणजे रेल्वेचे ईंजिन चालवत असणार अशी समज होती. ईजिनीअर बनून खुप वर्षे झालीत आता, पण अजून डब्यातच प्रवास करतोय :(

    ReplyDelete
  4. कालप्रवाहात पतित निराधार ओंडक्यांप्रमाणे दिशाहीन वहनानंतर आपण कुठल्या तीरावर पोचू ह्याचा अदमास बांधणं मर्त्य मानवासाठी अशक्य! :P
    ओव्हरडोस!!! :D

    ReplyDelete
  5. हा चीनचा व्हाया जपान प्रवास मस्त वाटला वाचायला.
    खरच लहानपणीचे एकेक किस्से आठवले की खूप हसायला येते. थोड्याफार फरकाने असेच आहेत माझे लहानपणीचे अनुभव.
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  6. सही, खूप छान !!

    मजा आला !!

    ReplyDelete
  7. >>> 'तुला कोण व्हायचंय'?
    लहानपणीचा अगदी आवडीचा पण कळायला लागल्यावर वैताग आणणारा प्रश्न.
    (बाकी यासारखे प्रत्येक टप्प्यावर असे वैताग आणणारे प्रश्न आहेत. ते काय संपत नाहीत)

    लहानपणी ठरवलेल्या गोष्टी आर्थिक आवाक्याबाहेरच्या आहेत हे कळल्यावर फ्री सीट इंजिनियरिंग हा एकच पर्याय शिल्लक होता.

    बाकी माझी गाडीपण डिप्लोमा मार्गे डिग्री करून मार्गे लागलेली आहे.(बारावीला घात झाल्याने)

    ReplyDelete
  8. स्वताची कुवत सिद्ध करण्यात वेळ गेल्याने या प्रश्र्नाचे उत्तर देण्याची वेळ माझ्यावर आली नाही.

    ReplyDelete
  9. आमच्या लहानपणी आमच्या आई, मावशी, ताई इ . `बायकांच्या लेडीज' डब्यातून प्रवास करायच्या. व लहान वय असलेमुळे त्याचे बरोबर प्रवास करणे क्रमप्राप्त असायचे.
    तेंव्हा `पुरुषांच्या लेडीज' डब्यातून प्रवास करायचा लहानपणीचा हट्ट आजतागायत पुरा होऊ शकला नाही. :'( हा हा हा ....!

    bhashecha ogh v vishay rangvun sangnyachi shaili aavdli. while roaming landed at ur blog. now inntend to keep on landing. hope am not offending.

    ReplyDelete
  10. i think u wished to go to japan and landed at burma ..... and not china...! right?

    ReplyDelete
  11. खरच रे सुहास कसं असतं नाही लहानपणी?? आणि आपण मोठे होतो तोवर ते संदर्भ किती बदलतात.....

    ReplyDelete
  12. सिद्धार्थ, हा खरंच एक जिव्हाळ्याचा विषय आहे. खर तर ते मे आणि दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी तरी शिक्षक व्ह्यायला हव होत असं आता वाटत..
    जाता जाता, "air hostess" या शब्दाच भाषांतर "हवाईसुंदरी" कुणी केलं काय माहित..त्यात कुठेही beautiful हा शब्दही नाहीये....आणि का रे तुम्ही लोक त्या Air India च्या मागे लागता नेहमी???

    ReplyDelete
  13. प्रसिक मजेशीर आहे रे....ईंजिनीअर म्हणजे रेल्वेचे ईंजिन चालवत असणार ....हा हा हा...पण logical आहे....

    ReplyDelete
  14. बाबा....भारी होतं माझ्यासाठी तरी....खर सांगायचं तर ही पोस्ट लिहिताना मी अजून कुठल्या नव्या किनारयाला लागणार का असाच विचार करत होते....:)

    ReplyDelete
  15. हम्म सोनाली आपली पिढी सगळी असाच विचार करणार असं वाटत पण आताच्या पिढीचे विचार काही वेळा इतक्या आधीपासून पक्के पाहते तेव्हा मी एकदम बावळट वाटते माझीच मला...

    ReplyDelete
  16. धन्यवाद दीपक, तुला ब्लॉगवर पाहून मलाही मजा आला...स्वागत..

    ReplyDelete
  17. सेम पिंच सचिन...फक्त कदाचित तुला त्याच बंदरावर जायचं तरी असेल...माझ आणि माझ्या मावस बहिणीच बरोबर उलट झाली.....असो पण ते आर्थिक दृष्ट्याच मात्र शंभर टक्के पटेश....

    ReplyDelete
  18. शरयू काय बोलू मी?? आमच्याकडच्या प्रश्नाकर्त्यांनी बहुधा कुवत वगैरे गोष्टी विचारात घेतल्या नसाव्यात...:)

    ReplyDelete
  19. राजीव ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार....तुमच निरीक्षण खरय...आमची नौका भलतीकडेच गेलीय.....:)
    आणि ते "पुरुषांचा लेडीज डब्बा" वाचून आता मी इकडे एकटीच हसतेय....:)

    ReplyDelete
  20. अगदी जिव्हाळ्याचा विषय. लहानपणी मला बस कंडक्टर व्हायचं होतं. कायम पैशांच्या बॅगा घेऊन फिरणारा हा नरविशेष कायम माझ्या आदराचं स्थान होता. पण त्या बॅगेतले पैसे कंडक्टरला मिळत नाहीत हे कळल्यावर कंडक्टर होण्याचं माझं स्वप्न भंगलं. त्यानंतर मला आईस्क्रीमवाला व्हायचं होतं. कारण मग खूप खूप आईस्क्रीम खायला मिळालं असतं ना! आणि तेही आई-बाबांकडून पैसे न मागता. कल्हईवाल्याची ‘ल्हीऽऽऽऽऽऽय्‌’ अशी आरोळी ऐकून मला काही दिवस कल्हईवालाही व्हावसं वाटत होतं!! ;-)

    ReplyDelete
  21. एक सूचना:
    अवं बाय, जरा वाचकांची सोय करा की. एक एमेल सब्स्क्रिप्शनचा डबा जोडा जरा आपल्या ब्लॉगला. बरं असतंय त्ये जरा वाचनार्‍यांसाठी.

    ReplyDelete
  22. अपर्णा, अगं "जाना था जापान" मध्ये माझा हात कुणीच धरू शकणार नाही बहुतेक.
    शाळेत असताना मला मोठेपणी कोण होणार हे कधीच सांगता यायचं नाही ... डॉक्टर व्हायचं नाही एवढं मात्र वाटत होतं ... आई बाबा, दोन्ही आजोबा डॉक्टर होते ना :)
    दहावीच्या नंतर मला लिंग्विस्ट किंवा गणितज्ञ व्हायचं होतं. कला शाखा घेतल्यानंतर ए जे क्रोनिनची सगळी पुस्तकं वाचली, आणि आपण दोन्ही आजोबा, आई-बाबांसारखं डॉक्टर व्हायला हवं होतं हे जाणवलं. मग जर्मन शिकल्यावर भाषांतरकार व्हायचं होतं. त्यानंतर आयएएस. मग शाळेत शिकवायचं होतं. पुढे सॉफ्टवेअरमध्ये शिरले. सध्या तरी तिथेच मुक्काम आहे. पण एवढी वर्षं एका क्षेत्रात स्थिरावणं मला पचणारं नाही. आता मोठ्या सुट्टीनंतर यात काहीही बदल व्हायची दाट शक्यता आहे. (मी नोकरी सोडून शेती सुरू केलीय, किंवा लॅंडस्केप डिझायनिंग शिकते आहे असं कदाचित ऐकायला मिळेल तुला. :D)

    ReplyDelete
  23. संकेत प्रतिक्रियांवरून बरयाच जणांचा जिव्हाळ्याचा विषय दिसतो अस वाटत....:)
    तुझ्या कोण व्हायचंच्या कल्पना एकदम नामी आहेत....:)
    आणि तुझा तो नवा डब्बा शोधते..तशी ब्लॉग सजावट या बाबतीत मी आळशी आहे..तूर्तास तू follow करतोस त्यावरून काम चालवून घे ही न. वि.

    ReplyDelete
  24. गौरी तुझी लेटेस्ट पोस्ट वाचली आहे, त्यामुळे भा पो....बाकी हे आई बाबा असतात ते व्हायचं नाही याबाबतीत आपल सेम पिंच....आणि मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे वयाप्रमाणे हा प्रश्न इथेही गहन होतोय..त्याच मूड मध्ये लिहिली गेलेली ही पोस्ट आहे...पण तूर्तास काही बदल शक्य नाहीत....तुझी अपडेट कळव...शुभेच्छा.

    ReplyDelete
  25. पूर्वी आपण ठरवचो कि आपण हे होणार किवा घरचे काही लोक तू हे हो म्हणजे सर्वाना बर वाटेल व आनंद होईल ते तेव्हा शक्य होते,आता ते शक्य नाही जे होणार तेच होणार विचाराची गाडी किती पुढे गेली तरी आपला नशीब बराबर असत

    ReplyDelete
  26. हम्म महेशकाका खरय...पूर्वी बरच सरधोपट होत. आता मात्र बरेच चांगले पर्याय आणि प्रतिष्ठेच्या नव्या कल्पना पुढे आल्या आहेत....अगदी पूर्वी गाणं/नाच असे पर्याय कमी महत्वाचे होते. पण आता कलांना पर्यायाने कलाकाराना चांगले दिवस आले आहेत....:)

    ReplyDelete
  27. एकदम खरंय.. आजकालच्या पिढीला काय व्हायचंय याची आधीच कल्पना असते ....

    ReplyDelete
  28. होय रे आनंद त्या बाबतीत मी किती ही होते तेच हा पोस्ट मध्ये आलंय बघ...

    ReplyDelete
  29. हाहा.. भार्री झालीये पोस्ट..
    बारावीपर्यंत सायन्स नक्की होतं, पण ’पुढे काय’ चा गोंधळ होताच..
    BTW, मला पार्श्वसंवादक (CN or discovery)व्हायचं होतं.(आहे)पण एकदा फोनवर मी हॅलो म्हटल्यावर,"काय काका, कसे आहात" चा प्रश्न ऎकून बेत रहित केला.. ;)

    ReplyDelete
  30. मीनल सेम पिंच.....:) अग निवेदक होणे या एका गोष्टीवर मी एक पोस्त लिहिली पाहिजे...तूर्तास माझा नंबर लागावा म्हणून फक्त इप्रसारणचा उल्लेख केलाय बघ....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.