Thursday, October 28, 2010

गाणी आणि आठवणी ६ - नवलाख तळपती दीप विजेचे येथ

आभाळ भरुन आलंय...आता हे खरं तर नेहमीच असं राहणार माहित आहे पण तरी का कोण जाणे प्रत्येकवेळी ते असंच उदास करुन ठेवतं...अगदी उठुन खोलीत थोडा प्रकाश करावा असंही वाटत नाही...आणखी काही दिवसांनी तर घड्याळ मागे केलं की मग संध्याकाळही लवकर भेटायला येणार आणि तीही जास्ती करुन सूर्याची लाली न ल्यायता..भरुन आलेल्या दिवसांत अख्खा दिवस म्हणजे जणू एक मोठी संध्याकाळच..संध्याकाळी होणारी संध्याकाळ घेऊन येणार तो काळोख......फ़ोर सिझनचं खूळ नॉर्थ-इस्टला असताना बरं होतं का असं इथे वेस्टातला पाऊस सुरु झाला की हमखास वाटतं.
खरं तर पाऊस, पावसाळा मला फ़ार आवडतो...की आवडायचा? या पावसाला मुख्य त्या पहिल्या पावसाचा मातीचा वेडा करणारा मृदगंध नाही. शिवाय कडाडणार्‍या थंडीत तो पडणार म्हणून भिजायचं सुखही नाही. एकवेळ छत्री-रेनकोट नसेल तर चालेल पण चार किलो कपडे,स्वेटर, कोट, हातमोजे हे सर्व घालुन पावसाला हाय कसं म्हणायचं...त्याऐवजी उरल्या-सुरल्या तोंडाला बोचणारी थंडी नकोशी होऊन गाडी नाहीतर घराच्या हिटरमध्ये धावायची लगबग. पावसाचे बाकी सगळे चोचले पुरवता आले नाही तरी नशिबाने बाहेर पाऊस पडत असताना लागणार्‍या आल्याच्या चहाची चव तीच आहे हा काय तो आशेचा किरण.
घरुन काम करायचं एक बरं असतं...कुठेही बसता येतं...थोडंफ़ार बाहेरच्या पावसाला पाहताही येतं आणि मुख्य म्हणजे आपल्याला हवा तसा चहा करुन त्या छोट्या क्षणाची मजा एकटीने का होईना पण घेता येते. प्रत्यक्ष कामाच्या जागच्या डिप-डिपपेक्षा बरंच बरं....अशी थोडंसं अंधारलेल्या पावसाळी वातावरणात या चहाब्रेकमध्ये स्वयंपाकघरात आले की मला दिसते मीच सकाळी लावलेल्या दिव्याची अजुन जळणारी वात....न कळत माझ्या कानात सी. रामचंद्रांच्या संगीत आणि आवाजातले कुसुमाग्रजांचे शब्द रुंजी घालतात

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात

या गाण्याला एक विशिष्ट आठवण नाही पण मला कुठच्या तरी शांत जागी हे गाणं पोहोचवतं आणि सगळं आर्त वाटतं...प्रत्येकवेळी ते ठिकाण बदलतं...काही जुन्या आठवणीही रुंजी घालत असतात...
मामाकडे मधल्या अंधार्‍या खोलीत आजीच्या पलंगाच्या वरती असणारी आणि खरं तर आजी लावेल तेव्हाच तेवणारी वात ही मुख्य आठवण.एवढ्या मोठ्या घरात माझ्या लाडक्या मामाच्याच वाट्याला घराची अंधारी बाजु का यावी असं त्यावयातही वाटणारी मी. दुसरी आठवण मी सहावीत असताना मावशी गेल्यावर त्या बारा दिवसात सकाळी पांघरुणातूनच दिसणारा रोज तिच्या फ़ोटोपुढे तेवणारा दिवा, पोटच्या पोरीचं हे असं स्वतःच्या समोर निघुन जाणं पाहताना अश्रु आटलेली आजी आणि रोज तितकीच हमसुन दुःख करणारी आई....सगळं त्या वातीच्या साक्षीने...हे सगळं आठवणीतुनही लवकर सरावं म्हणून प्रयत्न करणारी मी.....का हे असं पावसाचं मला एकटीला भेटणं हळवं करतं माहित नाही....
मी कुठल्या तरी कडव्यात माझ्यासाठी दुसरी वाट शोधते,
हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट

अमेरिकेतल्या फ़्रायडे हार्बर नाहीतर हवाईच्या बेटावर ती श्रीमंती घरं पाहायला गेलेलं माझं मन दुसर्‍याच क्षणी मायदेशातल्या माझ्या लहानपणी बाबा नदीत दगड फ़ेकुन तो जाता जाता अनेकवेळा दिसायचा तसंच फ़ेकताना तिथे जाऊन पोहोचतं..श्या किती वर्षं झाली नदीवर जाऊन...नाहीतर लहानपणी सुट्या आणि आमची सूर्यानदी हे समीकरण होतं..बाहेरचा आधी उदास करणारा पाऊस आता नसतोच...मी पुन्हा एकदा गुणगुणते
बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग

एकटेपणातला पाऊस पुन्हा एकदा माझ्याबरोबर येतो आणि मी मुकाटपणे "चल, आता सवयीचे होऊया" असं म्हणून त्याचा हात घट्ट पकडून सोबत करु लागते.....मनात ते गुणगुणणं तसंच असतं....." परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातिल मंद दिव्याची वात".......

20 comments:

  1. सही.. तुझ्यामुळे मला दर वेळी नवीन (माझ्या दृष्टीने नवीन) गाणी कळतात.
    याचंही छान विश्लेषण केलं आहेस !

    ReplyDelete
  2. हेरंब तुझी कमेन्ट इतक्या पटकन आली म्हणून सांगते हे आत्ता या क्षणी जसं वातावरण इथं झालंय आणि एकंदरित जी काही उदासी दाटलीय त्यामुळे सुचलं तसं लिहिलंय रे.....पण जर तुला हे गाणं कधी ऐकायला मिळालं तर नक्की ऐक...मी रेडिओवर ऐकायचे...मायाजालावर नाही मिळणार पण तिथे कुणालातरी रिदम हाऊस मध्ये वगैरे शोधायला सांगितलं पाहिजे.....पावसाळ्यात त्या बाजुला चक्कर मारायला काय छान वाटतं नाही...असो..मी उत्तराची पोस्ट करत नाही कारण पाऊस फ़क्त इथेच आहे...आत्ता याक्षणी....)

    ReplyDelete
  3. काय गं तू... मला एकदम नेऊन पोचवतेस गावाला... :) आता मी सुद्धा आठवणीचे उसासे सोडत बसतो बाकीचा वेळ... :)

    ReplyDelete
  4. रोहन, आपली गावं एकाच भागात आहेत म्हणून तू लवकर पोचतोस बघ तिथे...:)
    आणि तुझे उसासे लवकरच संपतील रे आणि तू तिथे जाऊन भटकशील...आमचे जरा दीर्घ उसासे आहेत बाबा...

    ReplyDelete
  5. तुम्ही seattle ला आहात का? तुमच्या पहिल्या काही ओळीवरुन वाटते.
    मी स्वतः Seattle मध्ये आहे। अगदी मनातले लिहिले आहे।
    Especially, चहा, संध्याकाळ, हवाई etc

    ReplyDelete
  6. अनुप ब्लॉगवर स्वागत...
    ही तुमची प्रतिक्रिया म्हणजे एक प्रकारची पावती आहे...कारण हो तुमचं साधारण बरोबर आहे...फक्त मी seattle ला नाही तर portland च्या जवळ पास आहे..म्हणजे वातावरणाच्या बाबतीत म्हणायचं तर सारखच..... हा जो आता या इथल्या पावसाळी मोसमाचा परिणाम आहे तो माझ्यासारखाच आणखी कुणालाही पटतोय हे पाहून मला वेगळच वाटतंय...म्हणजे in short your comment made my day...I didnot know I could express so well that someone can guess where I am...Thank you so much....:) keep reading....

    ReplyDelete
  7. खरं सांगु तर, तुझ्या या शब्दांवर काय कमेंट दयावी ते कळतच नाही !! फक्त ते वाच राहवे आणि मनात भरुन घ्यावे, पावसाला मनात भरुन घेतो तसे!!

    Simply Speechless !!

    ReplyDelete
  8. मला ही कविता आणि ते गीत यांची पुनः आठवण करून दिलीत आणि त्यावर खूप छानसे समर्पक लिहिलेत याबद्दल धन्यवाद.
    मंगेश नाबर.

    ReplyDelete
  9. छान झाली आहे पोस्ट. मी पण आज घरी जाणार आहे त्यामुळे भारतात असून देखील घरच्या आठवणीने उगीच हळवा झालो.

    ReplyDelete
  10. मस्त आहे..

    हे गाणं फार आवडतं मला..
    सी रामचंद्रांच्या स्वत:च्या आवाजातलं..
    पाठीमागे गिटार वाजवली आहे.

    आता दिवसभर मनात वाजत राहील..

    ReplyDelete
  11. धन्यवाद दीपक...हा फक्त इथल्या पावसाचा परिणाम आहे...

    ReplyDelete
  12. मंगेश खूप खूप आभार आणि ब्लॉगवर स्वागत...हे गीत माझ्याही खूप आठवणीत आहे...

    ReplyDelete
  13. सिद्धार्थ, अरे घरी जाताना हळवा होतोयस मग येताना....जाऊदे...सध्या मनाने आधीच पोच...आणि मनसोक्त दिवाळीची मजा लुटून ताजातवाना होऊन ये....

    ReplyDelete
  14. शार्दुल, त्या गिटारमुळे तर हे गीत खूप जास्त हळवं आणि तरल झालय असं मला वाटत...संगीताचा ढणाणा न करता गाणी किती छान होऊ शकतात याचा उत्तम नमुना...प्रतिक्रियेसाठी आभारी...

    ReplyDelete
  15. 'Paus mala aawadato ki aawdaycha ??'

    agadi mazya babtit pan asach aahe - indiat asatana aandharun aala ki tyamagun yenara paus aani vijancha kadkadat mhanaje etaka chan vataycha - aani mazya maheri chiplun la tar vij kadakadali ki lights janar mag aandharat candle lavun mi aani aai gharachya gallary madhe zopala hota tyavar basun mast gappa maraycho, kadhi kadhi shejarani pan yaychya - tenva paus itaka aawadaycha karan CA chya kantalvanya aabhyasala paus aala ki thodavel break milaycha lights gelet mhanun. :)

    Pan australia la aalyapasun survatila etaka depressed vataycha ki to datun aalela paus nakoch vatayla lagla nantar nantar...

    ReplyDelete
  16. निशा, ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जून लिहिलस त्याबद्दल आभार....मला वाटत उन्हाळाभर वाट पाहून मग बरसणाऱ्या पावसाची किमत आपल्याला मायदेश सोडला की लगेच कळते....इथला पाऊस मात्र वर्षभर दिसत असतो त्यामुळे आपण फक्त उदास होतो...त्यातही इथे अमेरिकेत वेस्ट कोस्टला राहणाऱ्या जवळजवळ सगळ्यांकडून मी पाऊस आवडत नाही हेच ऐकलेय....ही पोस्ट अशाच भावनेतून लिहिली आहे...
    ब्लॉगवर अशीच दिसत राहशील ही आशा.....:)

    ReplyDelete
  17. वाह!
    खूप खूप छान झाली आहे पोस्ट..
    तुझ्यामुळे ते गाणे ऎकेन आता..

    ReplyDelete
  18. आभारी मीनल ...गाणं जरूर ऐक...खूप शांत संगीत आहे....

    ReplyDelete
  19. छान पोस्ट.. आणि हेरंबच्या कमेंटला दुजोरा.. न ऐकलेली गाणी कळतात दर वेळी, तुला मिळाली तर शेअर कर लगेच....

    ReplyDelete
  20. आनंद, तुम्ही दोघ मिळून मला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका...मोडेल ते....
    काही जुनी गाणी दुकानाततरी मिळतील का देव जाणे....आता मी एक यादी करणार आहे आणि पुढच्यावेळी रिदम हाउसला जाऊन त्यांचं डोकं खाणार आहे...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.