Thursday, November 25, 2010

तो, ती आणि (त्यांना पाहणारा) तो

शुक्रवारची सकाळ....आठवड्यातील शेवटचा का होईना पण कामाचा दिवस. तो जरा लवकर उठून आवरतोय. शेजघरात ’तो’ आणि ती अद्याप साखरझोपेत आहेत.

तिच्याकडे पाहताना तो सुखावतो. ’अशी शांत झोपलेली शेवटी केव्हा पाहिली होती बरं?? किती घाईचं झालंय आयुष्य?’ सकाळी उठून भराभर आवरुन ’त्या’ला घेऊन पळायचं ते मावळतीला ’त्या’ला घेऊन उगवणार. तिला कधी पाहणार! खरं तर काल ती पण जरा उशीराच झोपली होती. ऑफ़िसचं काही काम करत बसली होती. तेही ’त्या’ला झोपवायचं काम झाल्यावर.

तिचे थोडेसे विस्कटून कपाळावर आलेले केस, शांत झोपलेला चेहरा पाहताना हळुहळु जवळ जाऊन पुर्वी उठवायचो तसं काही करायला हवं.......त्याच्या मनात हा विचार येतो तितक्यात ’तो’ झोपेतच हसतो. नुसतं ओठ विलगुन नाही तर थोडसं खदखदा.

’किती वाजले? बापरे सव्वा आठ! उठवायचं का दोघांना एकदमच? ती तशीही उठेल पण ’त्या’ची झोप मोडायला फ़ार जीवावर येतंय. रात्री झोपतानाचा दंगा....आधी सगळ्या गाड्या,ट्र्क, विमानं यांना स्वतःच्या बिछान्यात झोपवून नंतर स्वारी तिच्या कुशीत दमदाटी केल्यावर झोपलीय. असा शांत, जागा असताना क्वचितच असतो नाही? हम्म........काय करणार आपल्या ऑफ़िसच्या रुटीनला तोही जुंपला गेलाय. किती वाटलं त्याला घट्ट जवळ घेऊन झोपावं तरी शुक्रवारी ते शक्य नाही. उद्या नक्की.."त्या"च्या भाषेत ’उद्या तुत्ती’.........’

इतक्यात तिलाच जाग येते. त्याच्याकडे बघता बघता घड्याळाकडे पाहात ती पुटपुटते. ’उठवलं नाहीस?’ तिचं ऐकलं न ऐकलं करुन नकळत तो म्हणतो ’छान झोपली होतीस’ ती प्रसन्न हसते. या एका वाक्याने तीही भूतकाळात पोहोचते आणि सकाळी त्याने उगाच ’गुड मॉर्निंग’ म्हणण्यापेक्षा जास्त छान वाटतंय अगदी पूर्वीच्या फ़क्त दोघांच्या सकाळींमध्ये पोहोचवणारं असा विचार करते.

’तो आता कसा हसला ऐकलंस?’

’अरे नाही रे..’

दोघांचं लक्ष शांत झोपलेल्या ’त्या’च्याकडे जातं आणि दिवसाच्या रहाटगाडग्याला जुंपण्यासाठी त्याला कुणी उठवायचं अशा प्रश्नार्थक नजरेने ते एकमेकांकडे पाहतात. पण इतका वेळ त्या दोघांना पाहणार्‍या त्याने आजच्यासाठी थोडं जास्त ठरवलं असतं. ’त्या’ला हळुहळु उठवत आज सर्वांसाठी ऑम्लेटचा नाश्ता बनवण्यासाठी तो सज्ज होतो..................तिला फ़क्त उठून, स्वतःचं आवरुन न्याहारीला बसायचं असतं.तळटीप....अशा बर्‍याच सकाळी, दुपारी, संध्याकाळी मला न मागता मिळतात. त्यासाठी नेहमीच माझं स्टेटस नोकरी करणारी होते असंही नाहीये किंवा उगाच "हे तुझं काम हे माझं" असले वाद मध्ये न येताच ते आपसूक समोर आलंय...या परदेशात मी जास्त काय अपेक्षा करु? याला माझीच नजर लागु नये म्हणून ही तळटीपेची तीट लावतेय. काहीवेळा ’तो’ त्या गाठी वर का बांधतो याची उत्तर मिळायला अवधी द्यावाच लागतो. पण नंतर कळतं की "त्या"ची निवड चुकली नाहीए...

जवळच्या व्यक्तींबद्द्ल लिहिताना मी नेहमीच अडखळते.....पण नेमकं काय सांगायचंय हे फ़क्त ’माझिया मना’ला इतकं हळवं होताना माहितेय....

30 comments:

 1. .

  अजून एक तीट लावलीय अपर्णा मी ... दृष्ट नको लागायला म्हणून :)

  ReplyDelete
 2. छान लिहिलंय अपर्णा, रोजच्या धबगाड्यात अश्या छोट्या छोट्या गोष्टीच जगण्याचं बळ देतात..

  ReplyDelete
 3. अगदी खर जवळच्या व्यक्तीबद्दल बोलण्यासारख खूप काही असत पण शब्दाचा मेळ जमत नाही.

  पण तू चांगलाच मेळ साधलायेस. मस्त.

  ReplyDelete
 4. सुंदर !! अजून काय लिहू ?


  .

  गौरी + १ .. माझीही एक..

  ReplyDelete
 5. धन्यवाद गौरी...अगं कधीचा ड्राफ़्ट होता. पोस्टू की नको मध्ये राहिलेला. शेवटी तीट लावुन टाकला...:)

  ReplyDelete
 6. सुंदर, छान, मस्त ,

  ReplyDelete
 7. आभारी प्रिती...मी हा विचार केला नव्हता पण खरंय शेवटी छोट्या छोट्या गोष्टीच जास्त महत्वाच्या ठरतात आणि ते आपण वेळेत जाणलं तर सारंच सुखावह होतं....

  ReplyDelete
 8. धन्यवाद शार्दुल.

  ReplyDelete
 9. आभारी, सचिन. मागे एकदा चतुरंगमध्ये स्त्री घरातील पुरुषाला स्वयंपाकघरात जाऊ देते की नाही अशा काही विषयावरुन प्रतिक्रिया/वाद रंगले होते. त्यावेळी मी माझ्य घरातले असे अनेक छोटे प्रसंग आठवत होते. त्यावेळी वाटलं होतं की ब्लॉगवर काहीतरी लिहावं पण म्हटलं तसं जवळच्या माणसांचं कौतुक नेमक्या शब्दात करायचं सुचत नव्हतं...या छोट्याशा प्रसंगामुळे बहुधा ते थोडंफ़ार जमलं असावं...

  ReplyDelete
 10. हेरंब धन्यवाद रे.....थोडं आधी लिहिलंय मी...फ़क्त पोस्ट आज केलंय.

  ReplyDelete
 11. धन्यवाद महेशकाका.

  ReplyDelete
 12. सॅल्युट!


  दिपक

  ReplyDelete
 13. दिपक, तुझा सॅल्युट कुणाला ते सांग नं...:)

  ReplyDelete
 14. सपा +१
  बाकी आमच्याकडूनही एक तीट! :)

  ReplyDelete
 15. मस्तच लिहिलं आहेस. खूप जास्त हळवी झाली होतीस वाटतं. छान आहे एकदम. मला असं लिहायला कधी जमेल देव जाणे.

  ReplyDelete
 16. संकेत खरंच हळवी झाले होते मी...तुला सांगु असं लिहिता यावं लागत नाही ते आपोआप सुचतं...तुझ्याही बाबतीत असे काही प्रसंग घडले असतील किंवा जेव्हा ते घडतील तेव्हा तुलाही हे नक्कीच आठवेल....माझी "दर्शन" ही पोस्ट आहे नं तसं मी पुन्हा कधीच लिहू शकणार नाही आणि या पोस्टेचंही तेच....ते असंच येतं....एकही अक्षर न खोडता फ़क्त तळटीप घातली आणि मी ही पोस्ट टाकली..शप्पथ...:)

  ReplyDelete
 17. *
  माझी तिट नाही, तिटोबा!
  Lucky!! :)

  ReplyDelete
 18. तिटोबा...:) आभारी मीनल....

  ReplyDelete
 19. माझाही तीटोबा.. सुंदर लिहिलंय

  ReplyDelete
 20. सहीच!
  गौरी +२.
  हळवेपणा वाढत चाललाय ना गं... :)

  ReplyDelete
 21. हळवेपणा वाढत चाललाय .........hmmmmmmm

  ReplyDelete
 22. अच्छा, तर आत्ताशी कळालं की तुला [इथला] पहिला परिच्छेद मागे का घेऊन गेला ते... तायडे, मला या अशा गोष्टींचं नेहमीच कुतुहल वाटतं; तुम्ही लोकं ह्या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन सर्व काही अगदी सुरळीतपणे कसे सांभाळत असता याचं... असो. परीक्षेमुळे "बर्‍याच" दिवसांपासून आणि केवळ "काही" दिवसांकरता बिझी(!) होतो नि असेन, त्यामुळेच की काय तुझ्या व इतर केवळ "काही"जणांच्या पोस्ट्सवर नियमीतपणे प्रतिक्रिया नोंदवणारा मी मध्यंतरी अदृश्य होतो! :)

  ReplyDelete
 23. विशाल welcome back...तुम जिस पाठशाला में पडते हो उसके हम हेडमास्तर रह चुके है so worry not..:)
  अरे पाहिलं अभ्यास. ब्लॉग आणि प्रतिक्रियामध्ये उशीर चालतो...खर सांगू का ही पोस्ट पाहिलीस न तू...मी पण कित्येक ब्लॉग वर नियमित प्रतिक्रिया टाकू शकत नाही आजकाल..जमेल तसं blogging सुरु आहे....
  आणि बाकी म्हणशील तर पाण्यात पडल्यावर पोहोता येतं तसच आहे....आला दिवस साजरा करावाच लागतो..त्यात आणि परदेश म्हणजे आपणच आपल्याला मदत करायची...

  ReplyDelete
 24. Anand aabhari...tula reply rahun gela asa watatay....

  ReplyDelete
 25. किती सहज सुंदर आणि हळुवार लिहलस अपर्णा ...... एक तीट माझ्याकडून ही ....

  ReplyDelete
 26. खूप आभारी ज्यो...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.