वर्तमानपत्र किंवा इतर कुठेही गद्य वाचून एखाद्या लेखक/लेखिकेच्या प्रेमात पडणं हे मी नक्की केव्हा सुरु केलं माहित नाही.पण अशाच एका वर्तमानपत्रातल्या सदरातले लेख वाचून फ़ार पुर्वीच मी डॉ. शरदिनी डहाणूकर या लेखिकेच्या प्रेमात पडले. आणि त्यातच कधीतरी आईला तिच्या एका वाढदिवसाला त्यांची काही पुस्तकं भेट म्हणून दिली. अर्थात घरातच असल्याने मीही ती वाचली पण नंतर विसरली गेले हेही खरंच. मागच्यावेळी आई येताना त्यातली एक-दोन माझ्यासाठी घेऊन आली. आधी मला वाटलं की तिने असं का करावं पण त्यातलं ’मनस्मरणीचे मणी’ हे पुस्तक मी आताशा पुन्हा एकदा वाचायला घेतलं आणि खरं तर एक नवी मैत्रीण मला मिळवून दिल्याबद्द्ल मी मनातल्या मनात आईला दुवाच दिला.
डॉ. शरदिनी डहाणूकर काही वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत शिकागोमध्ये राहिल्या आणि मग परत भारतात परत गेल्या. त्यानंतर बर्याच वर्षांनी पुन्हा बहुधा कॉन्फ़रन्सेसच्या निमित्ताने काही दिवसांसाठी त्यांची अमेरिकावारी झालेली दिसतेय. शिवाय जगात इतरत्रही बर्याच ठिकाणी त्यांची एकटीने किंवा एखाद्या ग्रुपबरोबर भ्रमंती झाली आहे. या सर्व प्रवासात त्यांना जाणवलेल्या काही प्रवृत्ती, मानवी मनाचे हिंदोळे, त्यांना उलगडणारी निसर्गाची रुपं या सर्वांचं एकत्रित वर्णन, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, मनाच्या पेटीत असेच जपलेले...सुटे सुटे....एका सुत्रात न ओवलेले तरीही सप्तरंग फ़ाकणारे....
ललित, प्रवास, व्यक्तिचित्रण यापैकी कुठल्याही साच्यात न बसणारं पण तरीही कुठलाही लेख वाचला की लेखिकेच्या जगात घेऊन जाणारं एक छोटेखानी सुंदर पुस्तक.
माझ्यासाठी यात साम्याचे धागे भरपूर आहेत म्हणुनही कदाचित यावेळी मी हे पुस्तक खर्या अर्थाने वाचतेय.तिचं आणि माझं अमेरिकेतलं पहिलंवहिलं एअरपोर्ट शिकागोमधलं ओहेर...एकेकाळी जगातलं सर्वात जास्त व्यस्त आणि सध्या अमेरिकेतलं...पुस्तकातली शिकागोची हाडं गोठवणारी थंडी, लेक शोअर ड्राइव्ह (आम्ही दोघंही याला राणीचा नेकलेस म्हणायचो) , सिअर्स टॉवर हे उल्लेख मला माझ्यासाठीचे वाटतात. त्यानंतर मग तिच्या ट्रीप्समधले आणि इतरत्र होणारे नॉर्थ इस्टचे उल्लेख तर आणि जवळीचे. या सर्वात जास्त जवळची वाटते ती तिच्या काही लेखांमधुन भेटणारी मुंबई. तिचं माहेर आणि सासरही दक्षिण मुंबईत. त्या सगळ्या भागाचं पुर्वीपासून असलेलं आकर्षण आजही आहेच.
त्यानंतरचा समान धागा म्हणजे इथे कायमसाठी राहिलेल्या भारतीयांचे मानसिक प्रश्न, कुचंबणा आणि त्यांच्या पुढच्या पिढीची मानसिकता यावर अधून मधून टाकलेला प्रकाश. इथे ओळख झालेल्या अशा मंडळींची आयुष्य थोड्याफ़ार जवळीने आम्हीही पाहतोय त्यामुळे "घरोघरी मातीच्या" हेही पटतं आणि आपण यात अडकायचं का हा विचार करायला लागलेल्या मनाला दिशा मिळते.तिला परदेशात मिळालेल्या मैत्रीणी तर मला इथल्या माझ्या मैत्रीणीच की काय असंच वाटतं...म्हणजे किती गं आपलं सगळं सारखं म्हणण्याइतक्या....
जगातल्या इतर देशांचे उल्लेखही वाचनीय आहेत आणि कुठेही या सर्वांची एकमेकांशी तुलना न करता आठवणीत घेऊन जाण्याची शरदिनीची पद्धत मला खूपच आवडते. तिच्या माझ्या वयातलं अंतर आणि लेखक-वाचक असं नातं न राहता एक एक लेख पुढं जाताना मी तिची मैत्रीणचं होऊन जाते.आता आपल्यात ती नसली नाहीतर तिची पत्रमैत्रीण तरी व्हायचा मी नक्कीच प्रयत्न केला असता.
भाषेचा एक वेगळा लहेजा, अलंकारिकता, उपमा हे सारे दागिने सांभाळतानाही मूळ लेखाला मानाच्या पैठणीचं रुप कसं देता येतं निदान हे पाहायला तरी एकदा वाचायलाच हवं हे पुस्तक.
यातली आवडलेली वाक्यं,घटना,व्यक्तींचे संदर्भ यातलं बरंच काही लिहावसं वाटतं पण त्याऐवजी यातल्या पहिल्याच लेखाचं अभिवाचन "दीपज्योती" या दिवाळी अंकासाठी मी केलंय. मला वाटतं हे एक प्रकरण बाकीच्या लेखांबद्द्ल बरंच काही सांगुन जाईल.देवकाकांनी माझ्याकडून हे अभिवाचन जे मी आधी जालवाणीसाठी केलं होतं पण तिथं ते चाललं नसत म्हणून विसरले होते तरी त्याची आठवण करुन देऊन पुन्हा करवून घेतल्याबद्द्ल त्यांचेही आभार.
डॉ. डहाणूकरांविषयी वाचलं होतं पूर्वी...
ReplyDeleteआता हे पुस्तक 'टू रीड' लिस्टमध्ये टाकतो! :)
मस्त वाटतंय ग पुस्तक.. गेलं विशलिस्टमध्ये!!
ReplyDeleteआणि तुमच्यातल्या साम्यस्थळांमुळे आम्ही इतके दिवस एका 'लेखिके'चा ब्लॉग वाचत होतो याची खात्री पटली ;)
नक्की वाच, बाबा ...अगदी छोटे छोटे आहेत लेख आणि संपूर्ण पुस्तक पण वाचताना एक वेगळा अनुभव येतो बघ....मला तर ha ब्लॉग बंद करून अशीच पुस्तक वाचावी अस मनात येतंय.....:)
ReplyDeleteहेरंब, पुस्तक जरूर वाच पण एक सांग यावेळी नव्या जर्सीत भोपळ्याऐवजी हरभरे पिकलेत का रे?? की "लेखिका" शब्दावर श्लेष आहे??.....
ReplyDeleteबाकी एक आहे, वाचताना साम्यस्थळ असतील तर जरा आपुलकी वाढते...मलाही तुझ्या ब्लॉग वर आदितेय आणि काही मलाही टोचणारे विषय आले की आपसूक हे होतच...कदाचित म्हणून आपण ब्लॉगवर आवर्जून प्रतिक्रिया देतो....:)
मी आणल होत वाचनालयामधून..खूप खूप आवडला..
ReplyDeleteऑल क्रेडिट गोज टू यू अपर्णा :)
सुहास तू दिवाळी अंक आणि इथेही प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल दोनदा धन्यु ....:)
ReplyDeleteआणि हुश्श...तुला आवडलं म्हणून, कारण हे नेहमीच्या पठडीतल पुस्तक नाही न रे....उगीच दडपण आल होत...म्हणून इथेही मी ते अभिवाचन लिंकून ठेवलंय....शारदिनीची आणखी काही पुस्तक वाचनालयात असतील वाच आणि एखाद मलाही सुचव..
छान आहे लेख. वाचायला हवं हे पुस्तक एकदा. :-)
ReplyDeleteधन्यवाद संकेत....लेख म्हणजे तू ते अभिवाचन ऐकल असशील अशी अपेक्षा आहे...पुस्तक मिळालं तर जरूर वाच...
ReplyDeleteहो, ऐकलं की. आवडलं. म्हणजे तू केलेलं वाचनही चांगलं आहे आणि त्यांच्या लिखाणाबद्दल तर प्रश्नच नाही. म्हणूनच विश लिस्टमध्ये अॅड केलं आहे ते पुस्तक मी. :-)
ReplyDeleteडॉ. शरदिनी यांचे पुस्तक वाचण्यात आलेले नाही, नविन चांगल्या लेखकाच्या शोधात होते, वेळेवर सांगितलेस बघ!
ReplyDeleteसंकेत, वाटलच मला....:) आभारी....
ReplyDeleteमीनल, त्यांची बरीचशी पुस्तक त्यांच्या झाडं वेली फुले यांच्या प्रेमापोटी लिहिली गेली आहेत...वृक्षगान म्हणूनही एक पुस्तक आहे...पण मला त्यांची हटके शैली आवडते....हे पुस्तक तर मस्तच आहे....
ReplyDeleteतू रिकमेंड करते आहेस तर पाहतो मिळवायचा प्रयत्न करून हे पुस्तक
ReplyDeleteआनंद पुस्तक तसं जुनं आहे...बहुतेक वाचनालयात मिळेल..पण आवडेल बघ तुला...
ReplyDelete