Saturday, November 13, 2010

आई, मला गोष्ट सांग ना....

’आई, मला गोष्ट सांग ना’ हे मी माझ्या आईला कधी सांगायला सुरुवात केली माहित नाही. आईला माहित असेल कदाचित तरी एकंदरित वाचनाचा छंद बर्‍याच आधीपासुन आहे हे खरं.पण तरी पुस्तकांचा नाद माझ्या मुलाला थोडा लवकरच लागला असं मला नेहमी वाटतं...म्हणजे गादीच्या कोपर्‍यात पडलेलं पुस्तक मी नावावरुन शोधत असताना त्यानं मला थोडंसं रांगता असण्याच्या काळात आणून दिल्याचं मला आजही आठवतं आणि त्याचं संपुर्ण श्रेय लहान मुलांसाठीच्या पुस्तकांना आणि इथल्या लायब्ररीमध्ये होणार्‍या स्टोरी टाइम या कार्यक्रमाला जातं.
अमेरिकेत मिळणारी लहान मुलांसाठीची पुस्तकं पाहिली तर दणकट पुठ्ठ्याची बांधणी, त्यातली मोठ्ठाली चित्र आणि अर्थातच लहानग्यांना रस वाटेल अशी सोपी भाषा व कथा.सारं कसं जुळून आलंय.लहान मुलंच काय मोठी माणसंही प्रेमात पडतील. निदान मी तरी पडलेय बुवा...मला काय सगळ्याच कथा नवीन...एक वाचायला सुरुवात केली की युवराज दुसरं पुस्तक स्वतःच घेऊन येतात, काही वेळा तर वन्स मोअर पण असतो, काही पुस्तकं तर मुलांना (आणि अर्थातच आईला) पाठ होतात की एखाद्या दिवशी नाही सापडलं तर सरळ साभिनय म्हणूनही दाखवलं जातं...
यावेळच्या मायदेश दौर्‍यात अशा प्रकारची मराठी पुस्तकं शोधण्याचा प्रयत्न केला पण नाही बा...मला काही तसं मिळालं नाही...लहान मुलांची पुस्तकं पण मोठ्यांनीच वाचावी असा शब्दांचा टाइप आणि मोजकीच चित्रं...ही पुस्तकं वाचताना मुलं इतक्या पटकन शब्द अर्थासकट शिकतात की त्यांना वेगळं समजवावं लागत नाही. या पार्श्वभूमीवर पाश्च्यात्यांचं नक्कीच कौतुक करावं असं वाटतं..अर्थात त्यांच्या किंमतीही तशाच असतात पण सगळीच काही विकत घ्यावी लागत नाहीत त्यासाठी आमचं चकटफ़ू वाचनालय कामी येतं की.
वानगीदाखल खालची चलतफ़ीत पाहिलीत तर तुमचं माझं मत एकच होऊन जाईल...खरं म्हणजे एकच पुस्तक वाचायचं म्हणून बसले, रेकॉर्डिंग करायचं बाबाच्या मनात आलं तर चिरंजीवांनी दुसरं कधी आणून आम्ही तेही वाचायला लागलो ते कळलंच नाही. ही दोन्ही पुस्तकं त्याची वय वर्षे दोनमधली लाडकी आहेत हे वेगळं सांगायला नको आणि हे पुस्तक वाचतानाचा आमचा दोघांचा संवादही थोडी-फ़ार मजा नक्कीच आणेल...नशीब त्याला ’आई, मला गोष्ट सांग ना’ हे वाक्य अजून म्हणता येत नाही ते नाहीतर नक्कीच माझ्यामागे भूणभूण वाढली असती....



यावेळच्या बालदिनासाठी ब्लॉगवाचक आणि त्यांच्या घरातील छोटे कंपनीसाठी माझिया मनाकडून ही छोटीशी भेट....बालदिन जिंदाबाद....

22 comments:

  1. होय, आपल्याकडे इतकी सुंदर लहान मुलांची पुस्तकं मिळत नाहीत हे खरेच... बालदिनाच्या शुभेच्छा....

    ReplyDelete
  2. Shooo Shweeet...


    सर्व बच्चे कंपनी आणि मोठ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा .. (मोठ्यांना खास यासाठी की त्यांच्यामध्ये असलेल ते बालपण आयुष्यभर जपून ठेवायला)..
    :-)

    ReplyDelete
  3. अपर्णा, आपल्याकडे इतकी सुंदर पुस्तकं नाही मिळत अजून - मराठी तर नाहीच नाही. तरी आपण लहान असतानापेक्षा बरीच सुधारणा आहे. मी लहान असताना मोठ्या भावांसाठी घेतलेली, फाटलेली पुस्तकंच जास्त वाचलीत. त्यामुळे कुठे लहान मुलांची छान पुस्तकं दिसली म्हणजे आईला छळत असते - मला तू काही पुस्तकं घेतली नाहीस म्हणून ... मग शेवटी आई "आता घेते" म्हणून घेऊन देते कधी कधी :D

    ReplyDelete
  4. कित्ती गोड्ड!
    आरुषला आणि तुलाही(किती रंगली होतीस गोष्टीत)बालदिनाच्या शुभेच्छा!

    ReplyDelete
  5. लहान मुलांना तिकडे चागली पुस्तके मिळतात पुस्तकाची चागली ओळख होते त्यामुळे मुलांना गोष्टी सांगणे पालकांना सोपे जाते व मुलांना पण गोडी लागते,सर्व लहानांना व मोठ्यांना बालदिनाच्या शुभेच्या

    ReplyDelete
  6. इकडची पुस्तकं बघून माझ्याही डोक्यात अगदी हेच आलं होतं. भारतातून आणलेल्या सगळ्या पुस्तकांच्या आदितेयने चिंध्या करून टाकल्यात कधीच. इकडची पुस्तकं चांगली जाड बांधणीची असल्याने कितीही इच्छा असली तरी त्याला तसं करता येत नाही ;)

    बाकी व्हिडीओ जाम कुल आलाय. आरुष कसला गोड दिसतोय.. छान बोलतोय एकदम :).. तुम्हालाही बालदिनाच्या शुभेच्छा !!

    ReplyDelete
  7. आनंद खरय बघ...त्यातही नासधूस category मुलांची तर सोयच नाहीये....

    ReplyDelete
  8. आभारी सुहास...त्या निमित्ताने आरुषची पण ओळख झाली असेल अशी आशा करते...संमेलनाला त्याला आणण अशक्य होत आणि नंतर भेटही झाली नाही...

    ReplyDelete
  9. हा हा गौरी तू पण न..लहानपणी मला शाळेत बक्षीस म्हणून तरी नवी पुस्तक मिळायची पण नाहीतर मी जास्तीत जास्त पुस्तक जवळच्या वाचानालातूनच आणून वाचली आहेत....त्या काकांना आम्ही सॉलिड पिडायचो जास्त पुस्तक द्यावी म्हणून..:)

    ReplyDelete
  10. मीनल खरय त्याच्या पुस्तकात काही वेळा मीच रंगते :) माझ्यासाठी नवीन बालकथा आहेत न ग ह्या..आणखी एक मेमरी बुक सारखा प्रकार पण आहे...कधी जमल तर त्याची वानगी देईन....त्यात पहिल्यापासून वाचलेलं संदर्भ लक्षात ठेवून गोष्ट पुढे न्यायची असते...मजा येते....:)

    ReplyDelete
  11. महेशकाका, धन्यवाद..तुमच खरय अशा पुस्तकांमुळे मुलांना गोडी लागते...मला तर आरुषला वाचून दाखवायला दमले असले तरी कधीच नाही म्हणवत नाही...कारण हे बीज मी आत्ताच रोवू शकते पुढे त्याचा फायदा मुलांना होईल अशी आशा....

    ReplyDelete
  12. हेरंब तू खर तर आरुषला प्रत्यक्षही भेटू शकतोस पण सध्या हेही नसे थोडके...:) तुला काय वाटत चिंधड्या करायचे प्रयत्न आमच्याकडे होत नसावेत...त्यावरून आठवलं त्याची खेळणी फेकायची (उर्फ गोळा करून एका टबमध्ये टाकायची) पद्धत पाहून आई म्हणाली होती भारतातली खेळणी हा जास्तीत जास्त एक दोनवेळा वापरेल..इथली आहेत म्हणून टिकतात...:)

    ReplyDelete
  13. अपर्णाबाई : 'लिहावे नेटके' हे सुन्दर पुस्तक माधुरी पुरन्दरे यांनी तुमच्या सगळ्या तक्रारी लक्षात घेतल्याप्रमाणेच बनवले असावे. पुस्तकाची बान्धणी, भाषा, वापरलेले टंक या सर्वच बाबींत ते पुस्तक सरस आहे. मला वाटते ते एकच पुस्तक असे नसून त्याचे दोन-तीन भाग असावेत. लहान मुलांसाठी ते लिहिले असले तरी इतर वयाच्या वाचकांनाही ते सन्दर्भासाठी म्हणून ज़वळ बाळगणे फायद्‌याचे ठरावे.

    ReplyDelete
  14. धनंजय काका, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...बऱ्याच दिवसांनी आलात....:) तुम्ही सुचवलेलं पुस्तक मिळवण्याचा नक्की प्रयत्न करेन..... मला तसंही लहान मुलांची पुस्तक वाचायला आवडतात त्यामुळे हे वाचताना कंटाळा येणार नाही असं वाटतंय....

    ReplyDelete
  15. माधुरी पुरन्दरेला लहान मुलांसाठी पुस्तक लिहायची कला साध्य झाली हे एक आश्चर्यच आहे. ती पारंगत असलेल्या अनेक विषयांत ही एक भर. ती चित्रकार आहे पण त्या विषयात माझं ज्ञान शून्य. गाते तर छानच हे मी नक्की सांगू शकतो, पण 'आक्रोश'मधे गायल्यानन्तर ती हिन्दी सिनेमाच्या उथळपणामुळे त्या लांडग्यांपासून दूर राहिली असेल. अभोगी रागात जास्त गाणी ऐकायला मिळत नाहीत. माधुरीनी त्या रागात 'क्षण एक मना' हा आनन्द मोडकांची चाल असलेला (बहुतेक नामदेवाचा) अभंग फार उत्कट गायला आहे. तिची गाण्याची निवड चोखन्दळ आहे. काहीतरी कचरा ती गात सुटली आहे, असं कधीही मी पाहिलेलं नाही. ती म्हणे फ्रेंच उत्तम ज़ाणते. काही फ्रेंच नाटकांचे तिनी अनुवाद केले आहेत. एक फार छान वाटला, आणि एक एकदम फालतू. पिकासोवरच्या तिच्या पुस्तकाला कोठावळे पुरस्कार मिळाला आहे. पण पिकासो हा डुक्कर माणूस, म्हणून मी ते वाचायच्या भानगडीत पडलो नाही. (हे म्हणजे चार्ली चॅप्लिन डुक्कर माणूस म्हणून त्याचे चित्रपट टाळण्यासारखं असेलही; पण माणूस म्हणून कसाही असो, तो थोर कलाकार होता. पिकासोच्या कलेबाबत मला मतच नाही, तेव्हा उगीच का पुस्तक वाचा? पुस्तकबिस्तक वाचण्यापेक्षा त्याचा कंटाळा कधीही चांगला.) माधुरी पुरन्दरेनी लहान मुलांसाठी ३-४ पुस्तकं लिहिली आहेत, असं मी उडतउडत ऐकलं आहे. त्यांपैकी 'लिहावे नेटके' मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. त्या पुस्तकाचा खूप गवगवा व्हायला हवा. आवर्ज़ून संग्रही ठेवावं, असं ते पुस्तक.

    ReplyDelete
  16. आरूषचा ख्रिसमस ट्री लाजवाब, आणि शेवटचं प्लीजही भन्नाट, प्लीज असंच म्हणायचं आरुषसारखं कामं होतात त्यामुळे पटापट :)

    ReplyDelete
  17. माधुरी पुरंदरे याच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी....खरच किती चतुरस्त्र व्यक़्क्तिमत्व दिसतंय. हे पुस्तक शोधावं लागणार असं दिसतंय...

    ReplyDelete
  18. प्रसाद, आरुषच्या निमित्ताने तुझ ब्लॉगवर येण आवडलं.....:) अरे त्याचे काही काही शब्द भन्नाट आहेत आणि त्याचा शब्दकोश बनवावा म्हणत होते तर बोबडे बोल सरळ व्हायला लागलेत....:(
    तुला video पाहताना मजा आलेली दिसतेय....:)

    ReplyDelete
  19. अपर्णा,
    आपल्याकडे उत्तम लहान मुलांच्या पुस्तकांची वानवा नाहीये...फक्त तिथल्यासारखं उत्तम मार्केटिंग हवंय...

    ReplyDelete
  20. बाबा या बाबतीत मात्र मी सहमत नाही बरं का तुझ्याशी...अनुभवाचे बोल आहेत हे...तू व्हिडीओमध्ये दोन्ही पुस्तकांची बांधणी बघ आणि मी वय वर्षे दोन-तीन म्हणजे फ़ाडाफ़ाडी करण्याच्या वयातल्या मुलांच्या पुस्तकांबद्दल लिहितेय हे लक्षात घे. गोष्टी दोन्हींकडे आहेत आणि त्या आपल्या आपल्या जागी छान आहेत पण ही पुस्तकं इतकी दणदणीत आहेत नं आपल्या इतकी पुस्तकं त्यांच्यासमोर फ़ुल्या फ़ुल्या फ़ुल्या....(आयला मध्येच हा रावसाहेबांचा किडा का चावतोय बरं....आपल्या इथली पुस्तकं जास्त वाचण्याचा परिणाम दिसतोय....)

    ReplyDelete
  21. अगं तुम्ही दोघेही मस्त रंगला होतात. :)

    खरेच आपल्याकडेही इतक्या लहान मुलांना रंगवून सांगण्यासारख्या कित्येक सचित्र गोष्टी आहेत. फक्त त्या इतक्या चांगल्या बांधणीत नाहीत. कदाचित प्रकाशकांना काढायचे असेल पण किंमत जास्त होईल या भीतीपोटी... :(

    ReplyDelete
  22. हाभार श्रीताई...तुझी ती भिती रास्त असेल कदाचित...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.