Friday, April 23, 2010

ब्लॉगिंग विश्व आणि मी

शाळेतल्या निबंधासारख्या विषयावर त्यासारखंच रटाळ काही लिहुन पकवायचा अजाबात बेत नाहीये..पण दुसरं काही साधं किंवा वेगळं नाव सुचत नव्हतं म्हणून निबंध तर निबंध असुदे....वाचणारे (हे नमनाचं तेल संपलं की...(आणि तरी आज अगदी पणतीएवढंच आहे)) वाचतीलच...हुश्श..झालं संपली इमानदारी....


ब्लॉग लिहिण्यामागे मुख्य कारण तसंही दिपकचा झाडून सगळ्यांना माहित असलेला ब्लॉग "पु.ल.प्रेम".तेव्हा तर आम्ही एकमेकांना ओळखतही नव्हतो पण या ब्लॉगनिमित्ताने त्याची ओळखही झाली..किती कौतुक करावं या ब्लॉगसाठी दिपकचं तितकं कमीच आहे. पण तरी त्यामुळे स्वतः ब्लॉग लिहावा असं (चुकुनही) मनात आलं नाही..कारण मुळात आपण काहीही ब्लॉगवर लिहू शकतो किंवा लिहावं असं काही वाटलंच नाही.उलट ब्लॉग म्हणजे असं पु.ल.देशपांडेंसारख्या नामांकित साहित्यिकांचंच साहित्य वाचण्याचा आणखी एक मार्ग असं काहीसं फ़िट्ट होतं डोक्यात. किंवा त्याच्या पुढे म्हणजे स्वतः कविता नाहीतर कथा लिहिले पण याबाबतीत लिखाण (आणि बर्‍याचदा वाचन) या बाबतीत मी म्हणजे ढब्बु पैसा...(हो थोडी फ़ार कबुली आहे की मी स्वतः कथा/कवितांच्या ब्लॉगवर फ़ार नसते याची नोंद घेतली आहेच पण तरी..इमानदारी आणखी काय??) पण दिपकशी कधीतरी बोलताना तो मागे लागला अगं तुझ्या भटकंतीबद्दल लिही नं...हे बघ म.ब्लॉ.वि. त्यात किती किती लोकं काय काय लिहितात आणि मग एकदम (माझी लेट) ट्युब पेटली आणि तडातड माझी भटकंती आणि दोन पोश्टा यावर जाऊन विझली...ट्युबच ती किती वेळ तग धरणार??

आणि नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या...काम,घर इ.इ....पण २००९ मध्ये पुन्हा एकदा ब्लॉग लिहावा असं वाटायला लागलं...काही काही आठवणी स्वतःभोवतीच रूंजी घालत होत्या त्यांना मांडावं आणि मग माझिया मनाचा जन्म झाला. खरं तर गप्पा मारण्याचेच विषय आणि स्वान्त सुखाय असंच या ब्लॉगचं स्वरुप आणि त्यामागे मागचा विषयाला वाहिलेला ब्लॉग सुरु करून मग ओढग्रस्तीला लावायचा एक स्वानुभव होताच.

सुरुवातीला (बावळटसारखं) मी लिहायचे आणि मग पुढच्या पोस्टचं मनात येईपर्यंत विसरून जायचे...खूपदा ओळखीच्यांच्याच प्रतिक्रिया यायच्या..मजा वाटायची...प्रतिक्रियामधल्या गप्पा-टप्पा...पण नंतर स्वतःलाच लक्षात आलं....(हो पेटली एक दिवस एकदाची) की आपणही जे ओळखीचे झालेले काही ब्लॉग वाचतो ते सोडून नवनवे ब्लॉग वाचण्यातही मजा आहे...कॉमेन्टाकॉमेन्टीतही गम्मत येते...आणि काहीवेळा एखाद्या पोस्टवर आपण जाईपर्यंत जर सगळ्यांनी त्यावर कॉमेन्टून अगदी कीस काढला असेल की मग खट्टूही व्हायला होतं..अरे माझी कॉमेन्ट आता इतक्या उशीरा काय टाकु?? असंही...काहीकाहीवेळा तर इतरांच्या पोस्ट्समुळे आपल्यालाही काही नवनवे विषय सुचतात..(तेवढंच खाद्य आपल्याही ब्लॉगला मिळतं...) या सगळ्या गदारोळात कधी हे सगळे (आता नावांची जंत्री देऊन उगाच ताणत नाही) ब्लॉगर्स आपल्या परिचयाचे झाले कळलंच नाही..अमेरिकेसारख्या परक्या आणि दुरच्या देशात राहूनही मायबोलीत बोलुन आपलंसं करणारी ही मंडळी घरगुतीच झाली...आणि आता वेळ आली आहे या सर्वांना प्रत्यक्ष भेटण्याची...माझ्या ब्लॉगसाठीचा हा काहीतरी संकेत असावा की नेमका माझा मायदेश दौरा आणि ब्लॉगर्स मीट यांचा संयोग जुळून आलाय...दुधात साखर, एका दगडात दोन पक्षी नाहीतर आंधळा मागतो एक आणि देव देतो दोन..आणि....जाऊदे स्कॉलरशीपच्यावेळी पाठ असलेल्या सगळ्या म्हणी एकापाठी एक लिहून उगाच चव घालवत नाही या निबंधाची....

थोडक्यात दोस्तहो जर वरच्या परिच्छेदातलं (एक ते ट्युबलाईट प्रकरण सोडलं तर) बरचंसं आपल्याही बाबतीत घडलं होतं असं वाटत असेल तर ब्लॉगर्स मीट बद्दल मी काही जास्त सांगायला नको...कार्यक्रम पत्रिकेचं विजेट उजवीकडे आहेच...मी ज्यांचे ब्लॉग वाचते आणि माझ्या ब्लॉगचे वाचक असणार्‍या त्याचबरोबर नवे ब्लॉग आणि वाचक माहित करुन घ्यायला (पुण्याच्या हुकलेल्या संधीनंतर) आणखी एक सुसंधी चालुन आलीय...त्यात मोठ्या संख्येने (रोहन माझं आडनाव संखे होतं...ख्ये नाही) सामील होऊया...आता या ब्लॉगवर भेटुया ब्रेक के बाद..तोपर्यंत डोंट टच दॅट ब्राउजर टॅब....आय मीन.....मी येतेच आहे पण माझिया मनावरचं आपलं प्रेम असंच वाढुदेत....

14 comments:

  1. झक्कास झक्कास.. मज्जा करा. धम्माल येणार आहे मेळाव्याला ते तर दिसतंच आहे. फोटो बिटो पाठवा जरा.. खादाडीचे नाही मेळाव्याचे.. :-) आणि शुभ यात्रा..

    ReplyDelete
  2. ठांकु ठांकु हेरंब..अरे तुला अजुनही येता येईल...फ़्लाईटसाठी बरोबर चोवीस तास आहेत...:)

    ReplyDelete
  3. केवढी एक्सायटेड असशिल ना! मायदेशात असशिल अजुन काही तासांनी. मुंबई मेळाव्याला धमाल येइल.
    हॅप्पी जर्नी! सी यु सुन.

    ReplyDelete
  4. लवकर यावा....खादाडीचे प्लॅन होऊन जाउ द्या!!....येताना मस्त चॉकलेट घेऊन ये!!!

    ReplyDelete
  5. अरे हो विसरलोच आपला प्रवास सुखकारक होवो!!!

    ReplyDelete
  6. हो अगं सोनाली इतका जास्त उत्साह की गेले काही रात्री ३-४ वाजताच उठतेय....

    ReplyDelete
  7. योगेश, चॉकलेट आणते फ़क्त प्रत्येकवेळी ती कुठे जातात हेच कळत नाही...(आणि कितीही आणली तरी)...असो...खादाडीचे प्लान्स आहेत फ़क्त तुम्ही कुणी डाएटवर नका जाऊ म्हणजे झालं....:) शुभेच्छांबद्दल ठांकु....

    ReplyDelete
  8. डाएट???? तो आपला प्रांत नव्हे!!! खाण्यावर आपल मनापासून प्रेम आहे!!!

    ReplyDelete
  9. एक नंबर... नव ब्लॉगर्स आणि वाचक यांच्याबद्द्ल अगदी बरोबर लिहिले आहेस... मस्तच...

    ReplyDelete
  10. धन्सं आनंद..पण ही पोस्ट खरं मला ब्लॉग मेळाव्यासाठीपण लिहायची होती...जरा वरचे परिच्छेदात जास्त रेंगाळले असंही वाटलं...पण एकदा लिवलं की झालं....

    ReplyDelete
  11. अगो तू जाणार तर मीच इकडे आनंदात...रात्रीतून चार वेळा दचकून उठले की गं... हेहे..... मायदेशाची ओढच इतकी तीव्र आहे नं... उडालीस ना गं...तुझा योग अगदी मस्त जुळून आला आहे. मजा करा....खादाडी मनसोक्त व भेटीगाठीही... :) आणि आमची आठवण काढा गं... प्रवासासाठी शुभेच्छा!:)

    ReplyDelete
  12. ही पोस्ट बहुदा तू वाचशील तेंव्हा मुंबईमध्ये पोचलेली असशील... :) लवकरच भेटू... :)

    ReplyDelete
  13. अपर्णा,

    कसंच कसंच... ;-)

    ReplyDelete
  14. रोहन आणि दिपक धन्यवाद..आत्ता वाचतेय कमेन्ट :)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.