Saturday, April 17, 2010

अत्तराची बाटली

कालच काही राहिलेलं सामान इथे-तिथे करताना एक अत्तराची रिकामी बाटली हाताला लागली..मला अशा रिकाम्या बाटल्या जमवायचा सोस आहे असं नाही पण का कोण जाणे त्यांच्यातल्या सुवासाची आठवण म्हणून टाकवतही नाहीत मग कुठे क्लोजेट्च्या कोपर्‍यात नाहीतर एखाद्या बॅगेच्या तळाशी अशी एक एक बाटली ठेवली जाते...कधीतरी नेमकंच तो कप्पा, जागा समोर आली, हलवाहलवी झाली की तिथे ठेवलेली बाटली आपल्या अस्तित्वाने तिच्या वैभवाच्या काळाची आठवण देऊन जाते..


अत्तराची आवड तशी माझ्या आई-बाबा दोघांना आहे पण तरी अगदी लहानपणी अत्तर म्हणजे फ़क्त कुणाच्या लग्नाला जायचं असलं की कपडे घातल्यावर उडवायचं हे जास्त ठळकपणे आठवतं...त्यावेळी अर्थात मॉल्स मध्ये दिसणारी महागडी अत्तरं उर्फ़ परफ़्युम्स, डिओज हे सगळं अवतरलं नव्हतं..त्यामुळे आई-बाबा,छोकरा, छोकरी सगळेच सरसकट घरात असलेली एकमेव अत्तराची बाटली वापरत..आणि त्याने सगळेच एकाच वासाचं वलय घेऊन त्या लगीनघरी पोहोचले तरी कुणालाही त्यात काही वावगं वाटत नसे....

त्यावेळी अत्तर नेहमी नवनव्या बाटल्यांमध्ये घरात येत असंही नसे...पुष्कळदा जुन्या बाटलीत अत्तर रिफ़िल करुन देणारे असत ते स्वस्तही पडत असावं..शिवाय लगे हातो रियुजचं प्रिंसिपलही नकळत वापरलं जाई (हे अर्थात आता गो ग्रीनच्या जमान्यात असल्याने सुचतंय)...आमच्याकडे एक शेजारच्यांचा नातेवाईक होता तो हे काम कुठूनतरी नेहमी करुन आणून देत असे..त्यामुळे ते काका आले की आई नेहमी आपल्याकडची रिकामी अत्तराची बाटली तुझ्या खेळण्यांमध्ये आहे का ते मला लगेचच पाहायला लावी..पण काही काही वेळा ती बाटली नेमकीच मिळत नसे..त्यामुळे मग जर फ़ारच वाटलं तर त्याला त्याच्याच बाटलीत अत्तर भरुन आणायला आई सांगे..त्यावेळी तो थोडे पैसे जास्त घेई असं वाटतं..

माझ्या आठवणीत त्यावेळचं चार्ली हे एकमेव अत्तराचं नाव. आमच्याकडे चार्लीची एक रिकामी बाटली नेहमीच पाहिलेली मला आठवते..आणि ते वर म्हटलेले काका काय कुठल्याही बाटलीत अत्तर आणत आणि हा घ्या तुमचा चार्ली...कधी कधी वास वेगळाही वाटे पण चालायचं हो आता कंपनी मध्ये मध्ये वेगळा लॉट पाठवते असलं काहीही उत्तरही मिळायचं...पण तरी अत्तराची रिकामी बाटली आवर्जुन ठेवली जायची आणि मुख्य म्हणजे एक बाटली काहीवेळा वर्षभरपण चालायची..अजुन एखादं घेऊया असली चंगळ करावीशीपण वाटली नाही..

चार्लीनं बरीच वर्ष राज्य केलं पण ब्रुट-बिट पण आले नंतर..तरी मुलींचं आणि मुलांचं अत्तर वेगळं असतं किंवा असावं हे कळायला फ़ारच वर्षे जावी लागली..मला अजुनही ब्रुट म्हटलं की माझ्या दादरच्या मैत्रीणीचं संतुरच्या गल्लीतलं घर आणि खूप भिजुन घरी पोहोचलो आम्ही गरम पाण्याने अंघोळ झाल्यावर तिने आवर्जुन लावायला दिलेला ब्रुटचा तिचा हात आठवतो...आमच्या दोघींचा खूप आवडता ब्रॅंड होता तो.तो लावुन तिच्या स्कुटी आणि एम-एटीवर सगळी मुंबई अगदी बी.सी.एल.पर्यंतही जाऊन आलो..निव्वळ त्या अत्तराच्या साक्षीने..

मला जेव्हा नोकरी लागली तेव्हा पहिल्या पगारात बाबांना अत्तर घ्यावसं वाटलं कारण आता इतक्या वर्षानंतर बाबांना अत्तर सगळ्यात जास्त आवडतं हेही लक्षात आलं.अजुनही बाबांना काय घ्यायचं तर अत्तर हे समीकरण माझ्या डोक्यात पक्कं बसलंय..

जेव्हा पुरुष आणि स्त्रीयांची अत्तरं वेगळी असतात हे कळायला लागलं तेव्हा सगळ्यात वाईट वाटलं कारण त्यामुळे ब्रुट आता लावता येणार नव्हता..त्याबद्दल एक लाडिक तक्रार मी एका मित्रापाशी केली त्यावेळी त्याने मला अत्तराचं भन्नाट लॉजिक नॅशनल पार्कवरुन बोरिवली स्टेशनला चालत येताना सांगितलं होतं. तो म्हणाला सोप्पं आहे अगं तुला ब्रुट आवडु देत नं..फ़क्त तू तो तुझ्या खास मित्राला दे आणि मग that's how you smell it... असो..आता तेवढं धैर्य असेल तर..जाउदे...लग्नानंतर वापरेन ही युक्ती हे मनातलं त्याला न कळता मी मात्र त्याच्या लॉजिकला (आणि अर्थातच इतकं साधं लॉजिक माहित नसलेल्या माझ्या डोक्याला) दाद दिली...

आता तर काय प्रत्येकजण अत्तराच्या बाबतीत जरा जास्तच जागरूक होतोय...शॉपर्स स्टॉप मध्ये इथल्या मेसिजसारखे परफ़्युम सॅंपल घेऊन पुतळ्यासारखे उभे असणारी मुलं-मुली आणि चार आकडी अत्तरांच्या बाटल्या घेणारे लोक हे दृष्य खूपच कॉमन झालंय. पुर्वीची आवड आता खतपाणी मिळाल्यामुळे तर्‍हेतर्‍हेची अत्तरं माझ्याही कपाटात निवांत पडून आहेत..पण तरी स्पेनच्या ट्रिपच्यावेळी पॅरिस एअरपोर्टवरून नवर्‍याने आणलेल्या बरबरीला अजुनही इवलु इवलुसं करुन जपतेय...त्यावेळी मला माझा अमेरिकेतला विसा ट्रान्स्फ़र मोडला असल्यामुळे जायला मिळालं नव्हतं पण त्याने अगदी आठवणीत ठेऊन माझ्यासाठी आणलेलं ते गिफ़्ट आहे...त्यातले शेवटचे थेंब कदाचित त्यात तसेच राहतील असंही वाटतं किंवा नुस्त्या बाटल्यातरी...

पण आजची अत्तराची बाटली भेटली, ती होती ती कुणा एका थॅंक्सगिव्हिंगच्या सेलला सियर्समध्ये उगाच २०% डिस्कॉंन्ट होता म्हणून..खरं तर त्यांच्याकडे ओपन सॅम्पलही नव्हतं आणि त्या सेल शॉपिंगच्या गडबडीत बाटली आवडली म्हणून घेतलेलं ते अत्तर. नंतर खरंचही आवडलं आणि मनसोक्त वापरलंही..त्याचा वास मला माझ्या शिकागोजवळच्या नेपरविलमधल्या ऑफ़िसमध्ये घेऊन जातो..मला ते ऑफ़िस का कोण जाणे कधीच आवडलं नाही पण तिथे भेटलेल्या दोन भारतीय मुलींनी मात्र या अत्तराचं नाव आवर्जुन विचारलं होतं आणि मग अत्तरांसाठी नावाजलेला ब्रॅंड नसल्याने मला उगाच अवघडल्यासारखं झालं होतं...आज त्याच त्या जुन्या अदिदासच्या बाटलीने मला मात्र लहानपणीच्या सर्व जणांत एक ते आताच्या एकाकडे अनेक अत्तरांच्या बाटलींच्या राज्यात झकासपणे फ़िरवुन आणलं...

33 comments:

  1. अत्तर मी फार आत्मियतेने कधी वापरलं नाही, अजुनही त्यातलं विशेष काही कळत नाही. अत्तर टेस्ट करताना मध्येच कॉफी बिन्सचा वास देतात, तो मला बरा वाटतो ;-)

    ReplyDelete
  2. आनंद हैद्राबादच्या उन्हाळ्यात तर अत्तर मस्ट झालं असेल पण....

    ReplyDelete
  3. धन्यवाद अनिकेत...

    ReplyDelete
  4. छान सुगंधी लेख! खूप आवडला.

    ReplyDelete
  5. आभार क्रांति....

    ReplyDelete
  6. वा! वा! एकदम खुशबूदार!
    आमच्या घरी पण कित्येक वर्ष चार्ली हे अत्तर वापरले जात असे. डोंबिवलीला ’हेमंत सुगंधी भांडार’ मध्ये अजुनही रिकाम्या बाटलीत अत्तर भरून मिळते आणि बाटलीचे २० - २५ रु कमी पडतात :) तिथले पारीजात हे सेंट खुपच सुंदर वासाचे आहे.

    ReplyDelete
  7. माझंही थोडंफार आनंद सारखंच आहे. जास्त काही कळत नाही. लहानपणापासून मोठा ब्रांड चार्लीच वाटायचा. आणि अजुनी मुलींचं कोणतं आणि मुलांचं कोणतं हे वासावरून कळत नाही. पण आठवणींमधली सुगंधी सफर मात्र आवडली.

    ReplyDelete
  8. सोनाली, पारिजात नावावरुन तरी एकदा हुंगलं पाहिजे असं वाटतंय....

    ReplyDelete
  9. @The Prohpet, खरं तर आपल्या प्रकृतीप्रमाणे जे अत्तर आवडेल ते लावावं असं मला अजुनही वाटतं..पण सध्याच्या मार्केटिंगच्या युगातलं हे आणखी एक मार्केटिंग आहे..त्यामुळे घरटी निदान दोन बाटल्या खपतात...

    ReplyDelete
  10. मस्त आहे लेख
    ब्रुट, चार्ली ह्या बाटल्या आमच्या शोकेसमध्ये असायच्या,
    लग्नसमारंभांना लावयला मिळायची अत्तरं,
    नंतर नंतर मी शाळेत जाताना हात उंचावून ते अत्तर काढून लावायचो,
    सुरुवातीला किती फवारावं याचा अंदाजही नसायचा, शाळेत अगदी बाजूच्याला चक्कर येण्याएवढ्या प्रमाणात ते लावायचो,
    त्या नाजूक नक्षीदार बाटल्या हलवून त्यातल्या अत्तराचे फसफसणारे सोनेरी बुडबुडे बघायला मला जाम आवडायचं,
    धन्यवाद या फवार्‍याबद्दल

    ReplyDelete
  11. अत्तराचा मला पण भारी शौक. मनिष मार्केट, जे मुस्लिम मार्केट आहे न्यू मुंबईला तिथे खास ह्या खुशबूसाठी पाय वळतात...मस्त झालीय पोस्ट

    ReplyDelete
  12. प्रसाद अरे तू तर मला शोकेसची पण आठवण करुन दिलीस..कसं विसरले काय माहित? पण हो आमच्याकडेपण ते शोकेसमध्येच असायचं...मग आता काय निदान पुढच्या तीन-चार क्युबिकलपर्यंत जाईल एवढीतरी फ़वारणी होत असेल नं??

    ReplyDelete
  13. माझा एक नाशिककडचा मित्र मला एकदा त्या मनिष मार्केटच्या अत्तरखरेदीला घेऊन गेला होता आणि मला तोपर्यंत माहितच नव्हतं..मग काय तुझी मुंबई ?? असं बरेचदा ऐकवायचा तोही...
    आणि हे नवी मुंबईचं एक म्हापेची आय.टी.कॉलनी सोडली तर काही माहित नाही बघ...ती आमच्यासाठी नेहमी नवीच...

    ReplyDelete
  14. सकाळीच वाचली पोस्ट. पण कमेंटता आलं नाही. आत्ता युवराज झोपल्यावर कमेंटतोय.

    कसली सुंदर झालीये पोस्ट !! एकदम सुगंधित, सुवासिक... ब्रुटसारखी.. फ्रेश झालो एकदम..

    मला फक्त चंदनाचं परफ्युम आवडायचं. म्हणजे अजूनही. आणि ते पण फक्त उग्र वासाचं. असं एकदम उग्र चंदनाचं परफ्युम बंगलोरला 'कावेरी' मध्ये मिळतं.... एकदम highly concentrated. अगदी छोटीशी मी बाटली फार वर्षापूर्वी १५०, मग २०० , मग २५० अशी मिळायची.. आता माहित नाही. ५०० असेल आरामात. सिद्धार्थ सांगू शकेल मे बी. अक्षरशः कपडे धुवून आले तरी वास जायचा नाही. कोणी बंगलोरला जाणार असेल की मी माझ्यासाठी एकदम ४-५ बाटल्या आणायला सांगायचो. १ बाटली आरामात ३-४ महिने (जास्तच) पुरायची..

    सोनाली म्हणाली त्या हेमंत सुगंधी भांडार मधून पण आम्ही आणायचो पूर्वी. पण ते माझी ही highly concentrated चंदन परफ्युमची नाटकं सुरु होण्याच्या खूप आधी. :-)

    हुश्श !!!! संपली एकदाची कमेंट.. 'अत्तराची बाटली : भाग २' म्हणून मी टाकू का ही माझ्या ब्लॉग वर :P

    ReplyDelete
  15. हेरंब अरे भा.पो. मी स्वतःही अशी लेटमार्क कॉमेंटवालीच आहे..
    माझ्या बंगलोरच्या एकमेव ट्रिपमध्येही लक्षात राहिलेलं दुकान ’कावेरी’ आहे. तिथे मी इतका वेळ काढला की माझ्या बंगलोरला स्थायिक मावसभावाने तिथल्या तिथे मी आता यापुढे कुणालाही कावेरीत आणणार नाही असं जाहिर केलं...:) काय काय घेतलंस ते विचारु नकोस दुसरी पोस्ट माझी कावेरीतली खरेदी किंवा असं काही होईल...आणि मग सगळा भांडाफ़ोड...(आठवतंय नं खरेदीच्या बाबतीत चाकुपुराणातले माझे मौलिक विचार??)
    आणि 'अत्तराची बाटली : भाग २' खुशाल टाक...फ़क्त आपली पार्ट वनची जाहिरात टाकायला विसरु नकोस...पेटंट माझ्याकडेच ठेवते तुर्तास..

    अजुन एक, सिद्धार्थला "कावेरी" वगैरे अशी मुलींची नावं सांगुन कोड्यात पाडू नकोस....साधा सरळ मुलगा आहे तो...(असं म्हणायचे)

    हुश्श...संपलं उत्तर...:)

    ReplyDelete
  16. अग छे. मी कुठला टाकतोय भाग २... मी म्हटलं की माझी प्रतिक्रिया एवढी मोठी झाली आहे की ती भाग २ म्हणून खपू शकेल :-)

    ReplyDelete
  17. Mast zaliye post...
    Mala tar attarache naav kadhale tari kase tari hvayache..coz Mi ekda perfume pyayale hote..
    tyachya nantar perfume laavane band ch kele hote mi
    varshbhar...!!! KHare tar perfume cha vaas aala tari potat dhavalayache... :)
    Pan tari perfume sathi jeev taknaare kitti tari jan astat nai...Mazya mitrachya taai la tichya fiance ne 12000 che perfume gift dile....!!! :)

    ReplyDelete
  18. कळलं रे मला हेरंब तू पण ना ......

    ReplyDelete
  19. मैथिली, अत्तर पिऊन तुझ्या अंगाला वर्षभर वास नव्हता येत नं...हा हा हा....आता लावत असशीलच अत्तर. कॉलेजमध्ये तर काय ब्रॅन्डेड गोष्टींचा जमाना आहे...प्रतिक्रिया छान आहे तुझी एकदम गप्पा मारल्यासारखी...

    ReplyDelete
  20. Hehe... nahi ga taai( I hope u r fine wid ths TAAI sambodhan)
    Aani ho pratikriya gappa maralya sarakhi aahe karan tuzi post ch ekdam mast aahe...

    ReplyDelete
  21. अगं मैथिली ताई नाही म्हटलंस तरी चालेल..मला सवय नाही कारण मी आमच्या घरातलं शेंडेफ़ळ आहे नं...असो...तुला जसं जमेल तसं संबोध...
    आणि तुला पोस्ट आवडलीय हे पुन्हा सांगितल्याबद्द्ल उगाच थोडं वरती गेल्यासारखं वाटतंय...ही ही....

    ReplyDelete
  22. अपर्णा...मला पण अत्तर खूप आवडतात...आता इजिप्त मध्ये होतो तेव्हा खूप वेग वेगळ्या प्रकारचे अत्तर मिळाले...इजिप्त मधील अत्तर हे त्यांच्या प्युयरीटी साठी प्रसिद्ध आहेत...बातल्यांचे तर इतके प्रकार होते की बस्स...पण खूप नाजूक असल्या कारणाने भारतात येई पर्यंत निम्म्या बाटल्या हॅरी ओम झाल्या!! कैरोचा सफरनामा लिहिल तेव्हा हे सगळ लिहिलच....कमेंट जरा जास्त लांबतेय वाटतय....असो...पोस्ट मस्तच झाली आहे.

    ReplyDelete
  23. योगेश, अरे तुझ्याकडे तर अत्तर माहितीचा खजाना असेल..मग कधी टाकतोयस पोस्ट...मी त्या मिडल इस्टर्नमधल्या बाटल्या फ़क्त टि.व्ही.तच पाहिल्यात..पुढच्या वेळी बबल रॅप कर कदाचित ओम स्वाहा होणार नाहीत...

    ReplyDelete
  24. एक राहिलं लांब कमेन्टचा मान हेरंबने आधीच पटकावलाय..:)

    ReplyDelete
  25. mastch aahe post.
    mala phakt indian flavor of attar mhanje heena, gulab etc aavadatat anee chalatat else I have a headache:)
    sonali

    ReplyDelete
  26. धन्यवाद सोनाली...अत्तरामुळे डोकेदुखी म्हणजे त्रास आहे...जर बाहेर असं घमघमाटलेलं कुणी तुला भेटलं तर काही खरं नाही...खरं म्हणजे आपली भारतीय वासाची अत्तरं जास्त छान असतात असं कुठेतरी मलाही वाटतं...

    ReplyDelete
  27. पोस्टचा सुवास दरवळतो आहे इथे.... :-)

    ReplyDelete
  28. माझी सगळ्यात ला्ष्ट कमेंट... :) अगं पॉयझनला विसरलीस गो बाय... एके काळी याचं भारी स्तोम होतं. शिवाय DO IT हेही खूपच प्रसिध्द होतं... मला बाबा फुलांच्या सुवासाची अत्तरे आवडतात पण ती इतकी स्ट्रॉंग केलेली असतात की लावायची हिंमतच होत नाही.... :( मात्र एस्ते लॉडरची सगळीच परफ्युम्स एक से बढकर एक आहेत. अतिशय मंद परंतु प्रफुल्लीत करणारा सुवास. बाकी चार्ली आणि ब्रुट चे राज्य बरीच वर्षे अबाधित होते.
    एकदम मस्त, गंधित झाल्यासारखे वाटले गं पोस्ट वाचून. :)

    ReplyDelete
  29. धन्यवाद देवा...:) मला वाटलं देवाला अगरबत्ती सोडूनही इतर वासात रस नक्कीच असेल...ही ही...

    ReplyDelete
  30. अगं श्रीताई लाष्ट काय?? येऊदेत नं अजुन...चुकून एखादा मूक नाहीतर परतफ़ेड वाचक मिळू शकतो की??? :)
    अगं ते पॉयझन मी विसरलेच बघ...कदाचित आमच्या दोघींच्या लाडक्या ब्रुटने तमाम अत्तरांवर मात केली असावी...एस्टे लॉडरचे परफ़्युम मी वापरले नाहीत पण कधी शलान(chanel) बघ मेसिजमध्ये वगैरे सॅंम्पल करुन मला आवडलं होतं...इथे मी काही काही वेळा सहज म्हणून खिशाला परवडणार असतील तर नवे वापरुन पाहाते....

    ReplyDelete
  31. लाष्ट कमेंटचा मान माझा :))

    असो अगं इथे ईतक्या पर्फ्युमरीज आहेत की विचारता सोय नाही.... दर दोन तीन दुकानाआड अत्तराचे दुकान.... आणि विविध आकारच्या बाटल्या अगदी बोटाच्या पेरापासून ते हातभर लांब.... माझे तर आवडते ठिकाण आहेत ही दुकानं!! भारतात जातानाही आमचे बरेचदा तेच गिफ्ट असते.....

    बाकि पोस्ट एकदम सुगंधित ....

    ReplyDelete
  32. तन्वी, तुम्ही लाष्ट कमेन्टची स्पर्धा लावली तर या ब्लॉगचं काही खरं नाही बघ...तुला शिक्षा म्हणून आता एक तुमच्या इथल्या अत्तरांच्या बाटल्यांची पोस्ट टाक...(आणि कं आला असेल तर निदान फ़ोटो पोस्ट)....नाहीतर कायम टांगलेलं ठेवेन तुला...(म्हणजे काय ते नीट मलाही माहित नाही पण....:)
    चल कामाला लाग....

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.