Sunday, May 31, 2009

फ़ुलोरा...गाई पाण्यावर

मागे एका कम्युनिटीवर "गाई पाण्यावर काय म्हणून आल्या" कविता शोधत होते. एक दिवस फ़ोन करुन बाबांनापण विचारलं. माझी भाचे कंपनी आणि मुलगा यांना झोपवण्यासाठी बाबा नेहमी म्हणत. आता इथे तेच गाणं पुन्हा मुलाला झोपवण्यासाठी हवं होतं पण बाबांच्या लक्षात आलं की त्यांनाही फ़क्त दिड कडवं येतं. मला वाटतं तेवढं होईपर्यंत मुलं झोपत असावी म्हणून पुर्ण कवितेची कमी भासली नसावी. पण सहज बाबा म्हणाले की बघतो मी कुठं मिळतं का ते. आणि आता आरुषच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक कवितांचं पुस्तक "गीतपुष्पांचा फ़ुलोरा" माझ्याकडे पाठवलं त्यात या गाण्यासाठी खूणेचं पिंपळाचं पानही आहे.
खरंच ज्यांना जुन्या कवितांची आवड आहे त्यांच्यासाठी एक छानच सोय केली आहे श्री. सुनिल नाटेकर यांनी. पुस्तक चाळताना सहज वाटलं की यातल्या बर्‍याच कविता आपल्या आठवणीतल्या आहेत. मग त्याची एक ब्लॉग वर ऊजळणी का करु नये? म्हणून विचार करतेय अधून मधून आपल्या आवडत्या कवितांचा एक फ़ुलोरा मांडुया. कसं? फ़ुलोरा म्हणजे "पुष्पगुच्छ" हा अर्थही मला खूप आवडलाय.
कवी "बी" यांची "माझी कन्या" ही कविता तिसरी-चौथीत असेल. सर्व कडवी नव्हती आणि पुस्तकापेक्षा जास्त कडवी ओरकुटवर मिळाली म्हणून सुरुवातीला पुस्तकातली आणि नंतर इतर अशी सर्व कडवी देऊन श्रीगणेशा करतेय. अशाच काही आवडीच्या, वेगळ्या कविता अधून मधून इथं मांडायचा विचार आहे.

माझी कन्या

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !

-------------------------------------------

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !
----------------------------------

11 comments:

  1. Sundar kavita ahet sagalya. pan mala padalela prashna ha, kI ya sagaLyaa kavita karun rasamadhec ka asataat? I mean.. anagai geete??

    ReplyDelete
  2. छान मॅडम...आज बऱ्याच दिवसानी प्रेजेंटी लावलीत...पण कविता मस्त आहेत....
    मी पण मुलांना झोपवतांना ’राम कोणाचा....’ हे पद म्हणायचे आता गौरी तेच तिच्या बाळांसाठी( टेडी बाळं...)म्हणते.....

    ReplyDelete
  3. तन्वी, तूच इथे मागचे काही पोस्टस हजेरी लावली नाहीये बहुतेक. यापेक्षा जास्त वेळा मी लिहिलं तर बाकीच्यांच कठीण होईल. :)
    महेन्द्रकाका, लहान मुलं रडता रडता झोपतात ना म्हणून बहुतेक करुणरस हा अंगाईगीताचा बेस दिसतोय...म्हणजे आधी त्यांना रडवा मग ती आपोआपच झोपतील...हा हा हा!!!

    ReplyDelete
  4. कविता सुंदरच आहेत.आमची आजी, मग आई व काही वर्षांपूर्वी मीही ह्यातल्या काही म्हणत असे. वाचताना पुन्हा एकदा पोरगं बाळ झाले आणि मी...:)
    बाकी तुमचे करूण रसाचे विश्लेषण मस्त. :D

    ReplyDelete
  5. आपल्या प्रतिक्रियेबद्द्ल खूप खूप धन्यवाद. लहान मुलांच्या झोपेचे पण नखरे असतात. कधी कधी बराच वेळ जर तो झोपला नाही तर मी इतकी वेगवेगळी कडवी जोडते की बहुधा तो कंटाळून झोपतो..

    ReplyDelete
  6. अंगाई गीतांवर माझा विशेष लोभ !!
    मी पण माझ्या लेका करता खुप म्हटली.पटदिशी झोपुन जयचा,पण ह्याच्या विपरित छोटा लेक सगळ्या अंगाई गीतांचा आस्वाद घेत अगदी डोळे मोठे करत बघायचा.शेवटी गाण्यांची गाडी हिंदी गाणी>आरत्या>आणि मग अगदी शेवटी washing powder nirama,washing powder nirama ,dhudh ki safedi nirama jo laye,sabaki pasand nirama ह्या वर चक्क आदळायची [:)][:P] मग कुठे बाळराजे गाढ झोपलेले दिसायचे..हे हे हे.
    पण ही गीते मस्तच,करुण रसाबद्दलचे विश्लेषण खरच जोरदार...

    ReplyDelete
  7. प्रतिक्रियेबद्द्ल धन्यवाद माऊ...खरयं तुमच आमच्या बाळानेही भरपुर आरत्या इ. ऐकलय. म्हणून तर हे मोssssठ्ठ अंगाईगीत जरा बरं वाटतय..माझ्या तर प्रत्येक अंगाईगीताला स्वतःची कडवी असतात आणि कधीकधी आजुबाजुला कुणी असेल त्यांना काही सुचना (एसी लावा इ.) असतील त्याही कडव्यात गुंफ़ून सांगते...सुरुवातीला बाबाला कळायचं नाही पण आता सवय झालीय...:)

    ReplyDelete
  8. ह्म्म्म. लहान मुलांना झोपावाताना अंगाई गीते म्हणावी लागतात तर. आमच्यावेळी आमचे असे लाड केले गेले नव्हते :( पण माझ्या होणार्‍या मुलाचे करावे म्हणतोय. अगोदर मला शिकून घेऊन बायकोला शिकवावे लागेल. आमची बायको कॉनवेंट वाली ना :)

    ReplyDelete
  9. प्रवीण, ही प्रतिक्रिया उत्तर द्यायची राहून गेली होती..म्हणून उशीरा को होईना उत्तर देते..
    ब्लॉग वर स्वागत आणि आता तुमचं बाळ होऊन मोठं झालं असेल म्हणा पण इथे मी फुलोरामध्ये बरीच गाणी पोस्ट केली होती..ती तुमच्या कॉन्वेत वाल्या पत्नीला दिलीत तरी कामं होईल...

    ReplyDelete
    Replies
    1. hi kavita majhe pappa mi lahan asatana majhyasathi roj mhanayche jhoptana ....mag mala hi hoti shalet astana....aata pappa hich kavita majhya mulisathi hi mhantat..... :)

      Delete
    2. वर्षा खूप आभार आणि ब्लागवर स्वागत.
      ही कविता बरेच आई-बाबा आणि नातवंड यांची लाडकी आहे यात शंका नाही. :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.