आज चौदा नोव्हेंबर...बालदिनाच्या निमित्ताने मोठ्या वाचकांसाठी ही एक लघुकथा.कुणाच्याही प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग घडू नये हीच अपेक्षा.
_______________________________________________________________________
’आता कुठे बारा वर्षांची तर होतेय.इतकी काय घाई आहे तिला मोबाईल घेऊन द्यायची?’
’अगं, पण जग कुठे चाललंय पाहतेस नं? शिवाय आपल्या आय.टी मधल्या नोकर्या.किती बिझी असतो आपणही? ही कुठे अडकली, मुंबईत काय झालं तर निदान संपर्कात तर राहता येईल न?’
’अरे पण तिचं वय?’
’वय-बिय काही नाही.बदलते वक्त के साथ बदलो असं लग्नाआधी कोण म्हणायचं?’ हे संभाषण आता आपलं सासुबाईंपासून वेगळा संसार थाटण्याकडे वळणार असं दिसताच शीतलने आवरंतं घेतलं..’बरं
बघूया', असं समीरला म्हणताना तिला एकदम सानियाचं बाळरुप आठवलं.
खरं तर लग्न झाल्या झाल्या दोघांच्या घरच्या सल्ल्याला न जुमानता चांगली पाच वर्षे थांबून मग जेव्हा मूल व्हायचा निर्णय घेतला तेव्हा निर्सगाने आणखी दोन वर्षे त्यांना थांबायला लावलं त्यावेळीच सगळं सोडून घरी बसायचं असं शीतलने ठरवलं होतं.पण जेव्हा तेव्हा आपल्या लॅपटॉपपुढे बसायची सवय म्हणा किंवा आधीच मोठं कर्ज काढून घर घेतल्याचा खर्चाचा बोजा आता एक बाळ घरात आल्यावर आणखी वाढणार म्हणून म्हणा, बाळंतपणाची रजा थोडी थोडी करुन नऊ महिने वाढवून शेवटी सानियाला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला गेलाच.
कामावरचा ’तो’ दिवस शीतलला पाळणाघरात वारंवार केलेल्या फ़ोनखेरीज आणखी काही केल्याचं आठवतही नसेल. हळूहळू जसजसे महिने उलटत गेले तसं शीतलपेक्षा सानियालाच पाळणाघराची सवय झाली. तिथल्या काकी खरंच खूप जीव लावायचा. तरीही घरी परत आल्यावर मात्र आई आई करणार्या सानियाशी खेळताना, तिचा अभ्यास घेताना शीतलचा दिवसभराचा शीण कुठे पळून गेला तेच कळायचं नाही.समीरही जमेल तेव्हा लवकर ऑफ़िसातून येऊन माय-लेकींबरोबर वेळ द्यायचा. महिन्यातले इयर एंडिंगचे दिवस सोडले तर इतर दिवशी त्याला ते जमायचंही. एक मनाला लागलेली थोडी टोचणी सोडली तर सगळं काही नियमीतपणे सुरु होतं.
सानियाच्या जन्माआधी टीम-मेंबर म्हणून काम करणार्या शीतलच्या ऑफ़िसमधल्या जबाबदार्याही आता वाढायला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून इतरांना मदत करायचा तिचा गुण हेरुन टीम-लीडचं काम तर तिच्याकडे आलं होतंच. हळूहळू जास्तीत जास्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे टास्क्स तिच्याकडे यायला लागले होते. मनातून ती या प्रगतीबद्द्ल सुखावत होती आणि एकीकडे कामाच्या जागचा संध्याकाळचा एक-एक तास वाढत होता.
समीरचंही काही वेगळं विश्व नव्हतं.तोही ऑफ़िशीयली प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळाल्यापासून
घरी आल्यावरही कुठच्या दुसर्या देशातल्या वेळेप्रमाणे कॉन्फ़रन्स कॉल्स, सकाळी लवकर उठून घरुनच प्रेझेंटेशनची तयारी या आणि अशा न संपणार्या कारणांमुळे कायम कामाला जुंपला गेलेला असे. त्याला एक काय ती रविवारची सकाळ थोडी-फ़ार मिळायची त्यात अख्खा आठवड्याचं साचलेलं ऐकायचं की राहिलेली झोप पुरी करायची या द्विधा मनस्थितीत समोरच्याने बोललेलं कळायचं तरी का देव जाणे. नुस्तं हम्म, अच्छा, असं का यातले सुचतील ते शब्द टाकून तो मोकळा व्हायचा.
शीतल आणि समीर असे कामात आकंठ बुडल्याने,संध्याकाळी सानियाबरोबर वेळ द्यायचा म्हणून स्वयंपाक-पाणी करणार्या रखमाला आता मी येईपर्यंत थांबशील का म्हणून विचारलं गेलं. तिला घरचे पाश नव्हते आणि सानियाही तशी काही उपद्रवी कार्टी नव्हती म्हणून बाईंची अडचण समजून ती समजुतीने थांबायची. घरात असेपर्यंत जमेल ती कामं उरकत बाईंना आल्या आल्या काही करायला लागू
नये म्हणून हात चालवायची. बाई आपल्याला नोकरांसारखं वागवत नाहीत ही भावना तर होतीच.
पण कुठेतरी काहीतरी कमी जाणवायला लागली होती. आई घरी उशीरा येते हे आतापर्यंत सानियाच्या अंगवळणी पडलं होतं. त्यामुळे शाळेतून घरी आल्यावर आपला अभ्यास करुन ती सरळ टि.व्ही. नाहीतर गेम्समध्ये रमायला लागली.आतापर्यंत शाळेतला पहिला नंबर तिने सोडला नव्हता म्हणून तिच्या अभ्यास सोडून इतर गोष्टींवर घरातले तिला कुणी आधीपासूनच काही बोलत नसत. आई आली की, ’
सानू बेटा, चल पटकन जेऊया’, असं म्हणताच ताडकन उठून तिच्याबरोबर जेवायला यायची आणि नेमकं त्याचवेळी आईच्याही नंतर थांबलेल्या कुणा कलिगचा ऑफ़िसमधून फ़ोन आला की तिचं ते कंटाळवाणं बोलणं ऐकत जेवून उठून गेलं तरी आईला पत्ताच नसायचा. मग नंतर तर तिने सरळ रखमाला मला खूप भूक लागलीय असं सांगून आधी जेवायला सुरुवात केली. शीतलला वाटलं आपण लेट येतो म्हणून पोर कशाला उपाशी ठेवा. तिने रोज आल्यावर सानू नीट जेवलीय याची चौकशी करायला सुरुवात केली.
समीरला खरं तर आपल्याला अनेक शंका विचारुन माहिती करुन घेणार्या लेकीबरोबर रात्री काहीतरी गोड खात बाल्कनीत बसून गप्पा मारायला खूप आवडायचं.पण त्याच्या कामाचं रुटीन पाहून सानियानेच बाल्कनीत बसायचा त्यांचा शिरस्ता मोडून टाकला. ती सरळ आपल्या पांघरुणात शिरुन आवडीचं पुस्तक वाचत बसे. आजकाल या पुस्तकांतील पात्रांशीच तिच्या काल्पनिक गप्पा रंगत. आणि ती तन्मयतेने वाचतेय असं आपल्या मनाचं समाधान करुन समीर पुन्हा आपलं लॅपटॉपमध्ये डोकं घाले. रात्रीची जेवणं होताना आणि जेवणं झाल्यावर या तिघांच्या किलबिलीने इतरवेळी गजबजणारं घर आताशा पिलं उडाली की रिकामी झालेल्या घरट्याप्रमाणे शांत होऊन गेलं. रखमाची ’निघते बाई’ हे अंतिम वाक्य.
असं असलं तरी रात्री झोपताना एकमेकांशी बोलण्याची सवय शीतल आणि समीरमध्ये कायम होती. दोघं एकाच क्षेत्रातली असल्याने आपण खूप बोलू शकतो हे त्यांना वाटे आणि त्यात काही चूक नव्हतं. फ़क्त आपण आजकाल फ़क्त एकमेकांच्या डेड-लाइन्स, ऑफ़िस पॉलिटिक्स, अप्रेजल,टेक्नॉलॉजी याच विषयांवर बोलतो हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसत. अर्धाएक तास किंवा काहीवेळा त्यापेक्षा कमी वेळ बोलता बोलता एकजण हूं हूं करत झोपला की दुसराही झोपून जाई आणि मग सकाळची तारेवर कसरत करता करता काल आपण काही बोललो होतो याची आठवणही येणार नाही इतक्या चपळाईने दिवसाची कामं त्या दोघांचा कब्जा घेई.गाण्याच्या क्लाससाठी निघून गेलेली सानु दोघांच्या दृष्टीने काहीतरी शिकतेय, आपण तिच्यासाठी म्हणून हा सगळा रामरगाडा चालवतोय. ती पुढे जावी हेच आपल्या मनात आहे म्हणून स्वतःची समजुत मनातल्या मनात कधीतरी काढली जाई इतकंच.
त्यातंच सानियाचा बारावा वाढदिवस आला. नेमका रविवार असल्याने यावेळी तिच्यासाठी सुटी काढली नाही याचा सल नव्हता.
’सानिया, चल पार्टीसाठी चायना गार्डनमध्ये जाऊया. येताना फ़्लोट खाऊया. यावेळी तुझ्यासाठी मस्त ब्रॅंडेड जीन्स घ्यायची अगदी तुझ्या आवडीच्या स्टाइलसकट’, बोलताना खूप एक्साइट झालेल्या समीरला सानियाचा थंड चेहरा पाहून, कागदावर छान दिसलेल्या प्रोजेक्ट प्लानला टिम-मेंबरनी डेड लाइनची तारीख पाहून दिलेला प्रतिसाद आठवला. आता थोडं टीम स्पिरीट वर आणलं पाहिजे...’गाइज, ऑन अवर लास्ट असाइनमेंट विथ द सेम क्लायंट....’ मनात आलेल्या वाक्याने तो दचकलाच...बापरे...’ओके बेटा, बरं मग तू सांग. काय करायचं यावेळी..मस्त रविवार पण आहे..बोल.’ ’बाबा, मला सेलफ़ोन हवाय. वर्गात सगळ्यांकडे आहे..’ तिला काही उत्तर द्यायच्या आत शीतलला आपल्याला विचारायला हवं हे लक्षात घेऊन समीर शब्दांची जुळवाजुळव करत बसला. अर्थात अप्रेजलला टीम-मेंबरना हाताळायची सवय झालेल्या समीरला सानियाला पार्टीसाठी पटवणं फ़ार कठीण नव्हतं.टोलवाटोलवी हा प्रोजेक्ट मॅनेजरचा गूण घरच्या प्रोजेक्ट्ससाठी पण कामाला येतो हे त्याला माहितही होतं.
शेवटी पार्टी करुन, फ़्लोट खाऊन परत येताना चौपाटीवर फ़िरुन घरी येईपर्यंत सानिया गाडीत झोपूनही गेली होती. त्यानंतर मग रात्री शीतलबरोबर वरचा संवाद रंगला होता.
खरं म्हणजे आता सेलफ़ोनला वयाची अट आणि आर्थिक अडचण ही दोन्ही कारणं राहिली नाहीत हे शीतललाही कळत होतं पण तरी शाळेपासून लेकीच्या हातात तो यावा असं तिला मनापासून वाटत नव्हतं..पण कसंतरी करुन समीरने तिला पटवलंच...हो म्हणायच्या ऐवजी "प्रोजेक्ट मॅनेजर कुठला" असं ती त्याला म्हणाली तेव्हा तोच जास्त हसला होता. बाकी काही नाही पण अचानक संपर्क साधायला सेलफ़ोन हवा या एकाच कारणावर दोघांचं एकमत झालं होतं.शिवाय तू संध्याकाळी लवकर येत नाहीस त्यावेळी एखादा गमतीशीर मेसेज पाठवून तिचा मूड बनवू शकशील, तुमचं कम्युनिकेशन वाढेल, आई-मुलींमध्ये कसं मैत्रीचं नातं हवं, असली मुलामा देणारी कारणंही समीरने दिली होतीच.
सेलफ़ोन आल्यामुळे सानियाला घरात संध्याकाळी एकटं असतानाचा वेळ आता थोडा बरा जायला लागला.शिवाय आईपण सारखे सारखे मेसेजेस करायची.बाबाही कधीकधी तिचा जुना काढलेला फ़ोटो किंवा एखाद्या पुस्तकातलं छान वाक्य पाठवायचा.आई-बाबांशी पुन्हा एकदा मैत्री वाढत होती.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेत मैत्रीणींमध्ये उगीच थोडा खाली गेलेला तिचा भाव पुन्हा एकदा जैसे थे वर आला होता.आता कसं सगळ्यांशी टेक्नॉलॉजीने बोलता येऊ लागलं.आधी तसंही घरचा फ़ोन होता पण आता टाइमपास एसेमेस..शुभेच्छा सगळं मोबाइलवर. आणि मधल्या सुट्टीत त्याबद्दलची चर्चा. शाळेत अर्थात फ़ोन वापरायला बंदी होती. पण व्हायब्रेटमोडमध्ये असलं की कुणाला कळतंय.
आताच दिवाळीची सुट्टी संपली होती आणि शाळेच्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरु झाली होती.बाईंनी सुरेल आवाज असलेल्या सानियाला गायनात निवडलं होतं. त्यासाठी रोज शाळा सुटल्यावर एक तास सराव असे. तीन राउंडमधून एकामागे एक बाद होणारे स्पर्धक पाहून सानियाला थोडं टेंशन आलं होतं. पण तिसर्या राउंडला जे तीन विद्यार्थी उरले त्यात सानियाचा नंबर होता. आई-बाबाला ही बातमी तिने
शाळेतूनच एसेमेस करुन दिली. आई-बाबांचं जवळजवळ लगेच "कॉन्गो सानू" आलं आणि तिला हसू आलं.आता आई-बाबा इथे हवे होते असं तिला वाटलं. पण आज घरी गेल्यावर बोलू असा विचार करुन ती मैत्रीणींच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. त्या शुक्रवारी नेमकं रिलीजमुळे बाबाला ऑफ़िसमध्येच राहावं लागलं आणि आईलाही एका कलिगला लवकर घरी जायचं होतं म्हणून नेहमीपेक्षा उशीर होणार होता.
आई-बाबा सारखे तिला चिअर-अप करणारे मेसेज पाठवत होते आणि तितकीच सानिया अस्वस्थ होत होती. खरं तर इतकी आनंदाची बातमी असूनही तिला जेवावंसं पण वाटत नव्हतं. रखमाला बेबीचं काहीतरी बिनसलंय कळत होतं पण काय करायचं हे न सुचल्याने ती आपली कामं आवरत होती. कंटाळून सानिया आपल्या रुममध्ये जाऊन पडली आणि शीतल घरात शिरली. ’आज बेबीचं चित्त ठिकाणावर नाही’ हे रखमाचं वाक्य तिच्या डोक्यात शिरलं पण आठवडाभरच्या कामाच्या कटकटीने दमलेल्या तिला हा विषय सुरु करायचा नव्हता. शिवाय आज समीरही येणार नव्हता. सानियाच्या दरवाज्याचं दार थोडं ढकलुन पाहिलं तर ती बिछान्यावर झोपलेली दिसली म्हणून तिला उगाच उठवायलाही तिला जीवावर आलं. गाण्याच्या क्लाससाठी सकाळी उठायचं असतं रोज... झोपूदे...असं मनातल्या मनात म्हणून तिनं आपलं पान घेतलं. चार घास घशाखाली गेल्यावर झोपेने तिचाही ताबा घेतला.
समीरचा शनिवारही ऑफ़िसमध्ये जाणार होता म्हणून सानियाला तिचे शनिवारचे सगळे क्लासेस इ.ला न्यायची जबाबदारी शीतलवरच होती. त्या सगळ्या गडबडीत गाण्याच्या स्पर्धेचा विषय राहूनच गेला. रविवारी सकाळी समीर आल्यानंतर मग खास मटणाचा बेत आणि मग लगेच येणार्या सोमवारची तयारी करणार्या आपल्या आई-बाबांकडे पाहुन त्यांच्याशी काही बोलायचा सानियाचा मूड गेला.पुढच्या शुक्रवारी संध्याकाळच्या कार्यक्रमात तिचं गाणं होतं. हा आठवडा तयारीसाठीचा शेवटचा आठवडा होता.
खरं तर गाणं हा सानियाचा प्राण होता.गाणं आवडतं म्हणून कारेकरबाईंच्या सकाळच्या बॅचला जायचा शिरस्ता तिने आजतागायत कधीच मोडला नव्हता. बाईंबरोबर "सा" लावला की कसं प्रसन्न वाटे. वेगवगळे राग समजावून सांगायची त्यांची हातोटी तिला फ़ार आवडे. त्यांनी शिकवलेल्या सुरांचा पगडा इतका जबरदस्त असे की संध्याकाळी पुन्हा घरी रियाजाला बस म्हणून सांगायला कुणी नसे तरी तिची ती तानपुरा लावुन बसे आणि सकाळची उजळणी करी.
हा आठवडा मात्र ती सकाळी घराबाहेर पडे पण बाईंकडे जायच्या ऐवजी एका बागेत जाऊन नुस्ती बसुन राही आणि आई-बाबा कामावर जायच्या वेळेच्या हिशेबाने ते गेले की घरी परते. संध्याकाळी सरावासाठी पण ती थांबत नसे. बाईंनी याबद्दल विचारलं तर माझ्या गाण्याच्या बाई माझी स्पेशल प्रॅक्टिस घेताहेत म्हणुन चक्क थाप मारली होती.
"hey how is practice " शेवटी गुरुवारी आईचा एसेमेस आला तेव्हा निदान तिला हे माहित आहे असं वाटुन सानियाला थोडं बरं वाटलं. बाबाने तर अख्खा आठवड्यात तिचं गाणं या विषयावर चकार शब्द काढला नव्हता.
"ya ok" बसं आईला इतकंच रिप्लाय करुन सानिया मात्र सेलवर चक्क एक गेम खेळत बसली.
शेवटी शुक्रवार उजाडला. आज संध्याकाळी आई-बाबा आपला कार्यक्रम पाहायला य़ेणार नाहीत याची तिला जवळजवळ खात्रीच होती.गायचाही तिचा बिल्कुल मूड नव्हता.
"Sanu, I am into middle of a work problem" असा आईचा दुपारी आलेला संदेश पाहून सानियाचा उरलासुरला उत्साहही गळाला होता.
पूर्ण आठवडा मूड ठीक नसलेल्या आपल्या मैत्रीणीचं आज काहीतरी जास्त बिनसलंय हे तिच्याबरोबर शाळेत कायम असणार्या अर्चनानं ताडलं होतं.पण तरी तिला सरळ विचारुन तिला वाईट वाटावं असंही तिला वाटत नव्हतं. शिवाय वाढदिवसाच्या गिफ़्टचा विषय निघाला होता तेव्हा पटकन सानिया म्हणाली होती तेही तिच्या लक्षात होतं..."मोबाइल न घेऊन सांगतात कुणाला? त्यांना माझ्याशी बोलायला वेळ कुठे आहे?" हे असं याआधी कधी ती आपल्या आई-बाबांबद्द्ल बोलली नव्हती. त्यामुळे उगाच जखमेवर मीठ नको म्हणून ती दुसर्याच कुठल्या विषयावर आणि कार्यक्रमांबद्दल तिच्याबरोबर बोलुन तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती.
सानियाला मात्र आजुबाजुला बाकीचे पालक पाहुन कसंतरी व्हायला लागलं. शेवटी तिने आईला सरळ बाथरुममध्ये जाऊन फ़ोन लावला तर नुसती रिंग वाजत राहिली. सानियाचे डोळे पाण्याने भरले. तरी तिने घाईघाईत "aai, where are you?" असा मेसेजही करून ठेवला. कॉल आणि मेसेज दोन्हींपैकी एकाचं तरी उत्तर येईल म्हणून थोडावेळ बाथरुममध्येच ती थांबली.
अखेर पाच-दहा मिनिटांनी अर्चनाच्या हाकेने तिला फ़ोन बॅगमध्ये ठेऊन बाहेर यावंच लागलं. गाण्यासाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांनी स्टेजमागे यावे असा इशारा माइकवरुन देण्यात आला होता. अर्चनाला सानियाचा पडलेला चेहरा पाहवेना. काय करायचं तेही कळत नव्हतं.
आता निर्धाराने स्टेजमागे जायचंच नाही असा निर्णय घेऊन सानिया गर्दीत जायला लागली. इतका वेळ आपल्या बरोबर असलेली सानिया कुठे दिसत नाही म्हणून अर्चनाने थोडंफ़ार शोधलं पण ती दिसतच नाही हे पाहून शेवटचा पर्याय म्हणून गाण्याच्या बाईंनाच सांगायला ती सरळ शिक्षक उभे होते तिथं गेली. बाईंना खरं म्हणजे जास्त काही सांगावं लागलंच नाही. सानियाचा मूड जसा तिच्या प्रिय मैत्रीणीने ओळखला होता तसंच आपल्या लाडक्या विद्यार्थीनीचं काय चाललंय हे बाईंच्याही नजरेत आलं होतं. म्हणून जास्त चर्चा न करता त्यांनी हॉलमध्ये सानियाला शोधलंच. "चल, मी तिला समजावते", असं म्हणून बाईंनी सानियाला शोधून स्टेजमागे नेलंही.
बाईंबरोबर खोटं बोलायची ही पहिलीच वेळ. सानियाला तर रडूच कोसळलं. बाईही कावर्या-बावर्या झाल्या.तिला एका खुर्चीत बसवून कुणाला तरी पाणी आणायला त्यांनी पाठवलं आणि शब्दांची जुळवाजुळव करु लागल्या.सानियाचं इतके दिवसाचं साचलेपण तिच्या नाका-डोळ्यावाटे सतत वाहू लागलं. नाकाचा शेंडा लाल, कानाच्या पाळ्या लाल, आणि सारखी मुसमुसणार्या तिला बाईंना पाहावत नव्हतं. इवल्याशा वयात किती हा कोंडमारा असं त्यांच्या मनात येतंय तोच सानियाची आई शीतल अर्चनाबरोबर धावत धावत तिथे आली.
आईला बघून सानिया आईकडे झेपावली.तिचे पटापटा मुके घेत आईच्याही डोळ्यांना धारा लागल्या. तिला घट्ट जवळ घेत आजूबाजूच्यांची पर्वा न करता शीतलने चक्क सानियाची काही न विचारता माफ़ी मागितली. बाईं सानियाला शोधायला गेल्या तेव्हा अर्चनाने सानियाच्या आईला पुन्हा फ़ोन लावला होता आणि परिस्थितीची कल्पना दिली होती.
'पिलू, आईने तुझ्याकडे किती दिवस पाहिलंच नाही नं? इतके दिवस फ़क्त एसेमेसवरुनच तुझी खबरबात घेत राहिले आणि तुला प्रत्यक्ष जवळ घ्यायला मात्र मला वेळच मिळाला नाही नं? एकदाही घरी तुझं गाणं गाऊन घेतलं नाही...इतकं छान स्पर्धेत गाणारं माझं पिलू पण माझ्यासाठी मात्र मागच्या बाकावर उभं करुन ठेवलेल्या मुलासारखं मी तुला शिक्षा दिली...माफ़ कर गं मला राणी प्लीज...."
आईला अचानक पाहून आणि त्याहीपेक्षा गेले कित्येक दिवस हरवलेला तिचा स्पर्श मिळताच सर्व काही मिळाल्यासारखे वाटणार्या सानियाला स्पर्धेआधीच पदक जिंकल्याचा आनंद झाला होता.अजूनही तिचे डोळे भरुन येत होते पण ते आपल्या आईला कन्फ़ेस करताना पाहून.
या सर्व ताणाताणीत या स्पर्धेत जरी तिची चुरशी झाली नाही तरी यापुढच्या प्रत्येक वाटचालीत तिची आई तिच्याबरोबर प्रत्यक्ष असणार होती हे समाधान खूप होतं आणि अति कामाने यंत्र झालेल्या शीतल आणि समीरसाठी मात्र नियतीने काही कठोर घडण्याच्या आत घेतलेल्या छोट्या परीक्षेतच शंभर टक्क्यांनी उत्तीर्ण व्हायचं होतं....एका छोट्या यंत्रापेक्षा स्पर्शाची ताकत त्यांना या प्रसंगातून पुरेपूर
कळली होती.
वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आई आणि टीन-एज मुली याबद्दल एक लेख वाचला होता. त्यात ज्यांचे आईबरोबर प्रत्यक्ष संपर्क आहेत आणि ज्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरायचं प्रमाण जास्त आहे या दोन्ही गटांमधलं परीक्षांमधलं यश याबद्दलचे आकडे दिले होते. त्यातली तफ़ावत पाहून त्यातल्या मुद्द्यांच्या आधारे हा विषय कथारुपाने मांडायचा हा एक प्रयत्न...दिवाळी अंकामधल्या प्रतिक्रियांनी खूप छान वाटतंय. ब्लॉग वाचकांनाही ही कथा आवडेल अशी आशा आहे.....
पूर्वप्रसिद्धी - मोगरा फ़ुलला दिवाळी अंक २०११