Sunday, May 31, 2009

फ़ुलोरा...गाई पाण्यावर

मागे एका कम्युनिटीवर "गाई पाण्यावर काय म्हणून आल्या" कविता शोधत होते. एक दिवस फ़ोन करुन बाबांनापण विचारलं. माझी भाचे कंपनी आणि मुलगा यांना झोपवण्यासाठी बाबा नेहमी म्हणत. आता इथे तेच गाणं पुन्हा मुलाला झोपवण्यासाठी हवं होतं पण बाबांच्या लक्षात आलं की त्यांनाही फ़क्त दिड कडवं येतं. मला वाटतं तेवढं होईपर्यंत मुलं झोपत असावी म्हणून पुर्ण कवितेची कमी भासली नसावी. पण सहज बाबा म्हणाले की बघतो मी कुठं मिळतं का ते. आणि आता आरुषच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक कवितांचं पुस्तक "गीतपुष्पांचा फ़ुलोरा" माझ्याकडे पाठवलं त्यात या गाण्यासाठी खूणेचं पिंपळाचं पानही आहे.
खरंच ज्यांना जुन्या कवितांची आवड आहे त्यांच्यासाठी एक छानच सोय केली आहे श्री. सुनिल नाटेकर यांनी. पुस्तक चाळताना सहज वाटलं की यातल्या बर्‍याच कविता आपल्या आठवणीतल्या आहेत. मग त्याची एक ब्लॉग वर ऊजळणी का करु नये? म्हणून विचार करतेय अधून मधून आपल्या आवडत्या कवितांचा एक फ़ुलोरा मांडुया. कसं? फ़ुलोरा म्हणजे "पुष्पगुच्छ" हा अर्थही मला खूप आवडलाय.
कवी "बी" यांची "माझी कन्या" ही कविता तिसरी-चौथीत असेल. सर्व कडवी नव्हती आणि पुस्तकापेक्षा जास्त कडवी ओरकुटवर मिळाली म्हणून सुरुवातीला पुस्तकातली आणि नंतर इतर अशी सर्व कडवी देऊन श्रीगणेशा करतेय. अशाच काही आवडीच्या, वेगळ्या कविता अधून मधून इथं मांडायचा विचार आहे.

माझी कन्या

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकात
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनातिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

तुला ’लंकेच्या पार्वती’ समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यातिल बोलली एक कोण
’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

नेत्रगोलातुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रा तव लव न तुळो येती.

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदता, अनुभवि जाणती ते !

देव देतो सद्‌गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?
लांब त्याच्या गावास जाउनीया
गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !

"गावि जातो," ऐकता त्याच काली
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे "येते मी" पोर अज्ञ वाचा !

-------------------------------------------

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
का ग आला उत्पात हा घडून ?

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !

बालसरिताविधुवल्लरीसमान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारिरत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलातून.

भेट गंगायमुनास होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपेसे.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !
----------------------------------

Monday, May 25, 2009

पतंगोत्सव

उन्हाळा आला त्याची सुरुवात काही बिचेसवर काइट फ़ेस्टिवलने होते. पतंगोत्सव हा शब्द मला सहज सुचला. काय असेल बुवा हा काइट फ़ेस्टिवल असा विचार करत आम्ही वाइल्डवूड या न्यु जर्सीच्या किनारी पोहोचलो आणि थोडं वेगळचं वाटलं म्हणजे अगदी आपल्यासारखं काटाकाटी बिटाकाटी नाही फ़क्त हवेवर पोहत असलेले वेगवेगळ्या आकाराचे पतंग. कागदी नसावेत. आणि उडवण्याची पद्धतही वेगळी. माझ्या मित्राच्या शब्दात सांगायचे तर इथले पतंग पकडून उभं राहायचं, मजा फ़क्त पाहाणा-याला येणार आणि भारतातले पतंग म्हणजे उडवणा-याला पण तेवढीच मजा देणारा. असो..माझा नवरा म्हणतो यांची संक्रात आहे वाटतं....या पतंगोत्सवाची एक झलक...

Sunday, May 24, 2009

प्रॅक्टिकल जोक

आजच्या लोकसत्ता ऑनलाईन मधलं "काय चाललंय काय" कार्टून आलंय. एक विद्यार्थी अगदी बाकापर्यंत लोंबणारी दाढी घेऊन बाकावर बसलाय आणि प्रश्नपत्रिका देणा-या प्राध्य़ापकाला सांगतोय " परीक्षा झाल्याशिवाय दाढी करायची नाही असा मी निश्चय केला होता! पण विद्यापिठाच्या परीक्षा एवढ्या पुढे जातील असं वाटलं नव्हतं!!"
हे वाचून हसायला अर्थातच येतं पण इंजिनियरींगच्या परीक्षेच्या वेळी आमच्या वर्गातील मुलगे खरंच दाढी करण्याचा वेळ वाचवायचे त्याची आठवण झाली. म्हणजे आम्हाला परीक्षेच्या आधी दोनेक आठवडे स्टडी लिव्ह असायची. त्यानंतर पहिल्या पेपरला या मुलांचे अवतार बघण्यासारखे असायचे. जरा गोरी स्मार्ट मुलं अजून हॅंडसम वाटायची पण काही मुलं अक्षरशः आजारी नाहीतर तद्दन कंगालही दिसायची. नंतर एक दीड आठवडा असाच अवतार असे. आणि तेव्हा परीक्षेच्या टेंशनमध्ये आम्हा मुलींचं हे ऑब्जर्वेशन नसे बरं! पण पाठोपाठ तोंडी परिक्षा चालू व्हायची ना तेव्हा सर्वजण एकदम चकाचक दाढी करुन येत तेव्हा मात्र नक्कीच काही वेगळा मेक अप केलाय का असा प्रश्न मुलींना पडे. तेव्हा मग आपसूक त्यांच्या पुर्वावतारावर प्रदीर्घ चर्चा होतं. आज एकदम त्याची आठवण करुन दिल्याबद्द्ल लोकसत्तासाठी ही छोटीशी पोस्ट (आणि पोस्त)

Friday, May 22, 2009

माझ्या सुरुवातीच्या नोक-या

त्या दिवशी एका घरगुती पार्टीत नोकरी या विषयावर चर्चा रंगात आली होती. प्रत्येक जण आपापला अनुभव सांगत होते, तेव्हा मन सात वर्ष मागे गेलं.
इंजिनियरींग झाल्यावर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलं तरी आमच्या इथे कॅंपससाठी फ़क्त महिन्द्रा आली होती आणि मेकच्या काही मुलांना घेऊन गेली. टेलिकॉमवाले आम्ही सु.बे. (सुशिक्षित बेकार) मध्ये सामील.. मग इथे तिथे प्रयत्न करुन पहिली नोकरी नेटवर्क कम हार्डवेअर सपोर्टसाठी मिळाली. नाव लिहित नाही पण ही एक मोठी पण सरकारी कंपनी होती. त्यांनी कायम नोकरीतली पळवाट म्हणून माझ्यासारख्या अडल्या-नडल्या ईंजिनियरसाठी तथाकथित हंगामी पद काढले होते. म्हणजे काही नाही काम नेहमीपेक्षा जास्त आणि पगार मात्र ३००० रु. फ़क्त. एका वर्षानंतर पुढचं काय ते कळेल. असो. आधीच घरी राहुन कंटाळा त्यात काही तरी डोक्याला उद्योग म्हणून काम सुरु केले.
क्लायंन्टकडे दिवसभर काम. कधी कधी अक्षरश: वेठबिगारी का काय म्हणतात तसे वाटे. काही काही ठिकाणी quarterly maintainance च्या नावावर डेस्कटॉप्स पु स णे.... आणि तेही स्वच्छ. बोलतोय कुणाला. एक वर्ष भरायचं आणि पुढे पाहु असं ठरलं होतं. काही काही कलिग्ज खूपच चांगलेही होते. त्यामुळे ते दिवसही गेले. आणि शेवटच्या काही महिन्यात एकट्याने साईट सांभाळणे असे कामाविषयीचे चांगले अनुभवही मिळाले. आता वाट पाहात होते त्या सो कॉल्ड अप्रेजलची. माझ्या आसपास लागलेल्या ब-याच जणांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली होती पण तरी आपण केलेल्या कामाचे चीज होतेय की नाही हे तर पाहायला हवे ना?
होता होता तो दिवसही आला. आणि हेड ऑफ़िसला गेले. डिविजनल हेड, एक एच. आर. वाली आणि मी असा वन ऑन वन सामना होता. हेडनी कामाची अगदी तुफ़ान स्तुती केली. बहुतेक क्लायंन्ट आणि सिनियरचा फ़िडबॅक चांगला मिळाला होता. आणि मग रड्या आवाजात सांगायला सुरुवात केली. तुमचं सर्व चांगलं आहे पण काय आहे, बी.ई. च्या पाचव्या सेमेस्टरमध्ये तुम्हाला फ़र्स्टक्लास नाही. थ्रु आऊट फ़र्स्टक्लास नसल्यामुळे तुम्हाला अजुन एक वर्ष हंगामी काम म्हणून काम करावे लागेल आणि मग आपण बघु. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला एकटीला आय डी बी आयची टेरिटरी यावेळी देऊ. मला जो काही सात्विक संताप आला ना की मी म्हटले काम देताना तर तुम्हाला माझा थ्रु आऊट फ़र्स्टक्लास आठवत नाही आणि आता एका वर्षानंतर आधीच्या कामाचं पाहायचं तर तुम्ही थ्रु आऊट फ़र्स्टक्लास पाहातयात. मनात म्हटलं पुढच्या वर्षीपण अशीच रडगाणी गातील..काय भरवसा..असो. हातातली नवीन हंगामीची ऑफ़र अर्थातच नाकारली.
घरी येऊन ही बातमी देताना नाही म्हटलं तरी थोडं धस्स झालं पण आतापर्यंत घरच्यांचा मला जो सपोर्ट होता तो तसाच राहिला. असो. काळ तसा कठीण होता.
म्हणजे नोकरी पण नाही काय करायच तेही नक्की ठरवलं नव्हतं. फ़क्त मागच्या वर्षभरातील अनुभवावरुन ते क्षेत्र थोडं जास्त मेल डॉमिनेटिंग वाटलं म्हणून मग सरधोपट सॉफ़्टवेअरसाठी प्रयत्न करायचा असं साधारण ठरवलं. त्यावेळी जावा जरा हिट होतं त्यामुळे एक दोन-तीन महिन्याचा दादरला कोर्स चालु केला. त्यांचा जॉब असिस्टंट पण असणार होता. त्यामुळे आता सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. तसं बरं चांगलं होतं पण डॉट कॉम बुम नेमकी त्याच वेळी कोसळायला लागली आणि माझ्यासारखे उभरते सॉफ़्टवेअर इंजिनियर मनानेच कोसळले. त्या सो कॉल्ड जॉब असिस्टंटची पण रडगाणी चालु झाली. इथे माझी एक मैत्रीण झाली होती. आम्ही दोघी एकत्र नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तर त्या जॉब असिस्टंटतर्फ़े आम्ही दादरमध्ये एका ठिकाणी मुलाखतीसाठी गेलो.
सर्व फ़ार्स होता. एक सरकारी नोकरी करणा-या बाई दुसरीकडे नव-याच्या बिझनेस कॉन्टॅक्ट्स वापरुन काही सॉफ़्ट्वेअर प्रोजेक्ट्स घेऊन आमच्यासारख्या होतकरुंकडुन करुन घेत होती. काम पण घरी स्वतःच्या पी.सी. वर करायचे. आणि हिला नंतर फ़्लॉपीवर आणुन द्यायचे. पगार पण यथातथाच. मला मनातुन पसंत नव्हतं पण माझी ती मैत्रीण जरा जास्तच उत्साहित वाटली म्हणून हो म्हटले. तिथे कोर्सच्या इथे मात्र लगेच नोटीस बोर्डवर आम्ही पहा किती छान जॉब असिस्टंट देतो ई. फ़ुशारक्या मारुन पार.
चला काही तरी उद्योग सुरु झाला. मला स्वतःच्या जी.के. मध्ये काही भर पडतेय वाटत नव्हते. शिवाय त्या बाईंची काम घेताना बोलण्याची पदधतही फ़ार छान नव्हती. नशीब आधीच्या नोकरीत कमवेलेल्या पैशात आणि ज्ञानात स्वतःचा पी.सी. स्वतः बनवला होता. नाहीतर ही थातुर मातुर नोकरी पण पदरात पडली नसती. मागच्या वर्षी तो पी.सी. मोडीत काढताना काय यातना झाल्यात त्या माझ्या मलाच माहित आहे. असो. मन ना असं उगाच भरकटतं...जाउदे.
तर हा कसाबसा चालु असलेला प्रकार चार आठवड्यात संपण्याचं मुख्य कारण साकीनाक्यातल्या एका कंपनीत जावाच्या नोकरीसाठी अर्ज केला होता; तिथे मिळालेली नोकरी. आधीच्या बाईंचे तोंड पाहायची इच्छाच होत नव्हती म्हणून पगारही घ्यायला गेले नाही. माझी मैत्रीण मला सांगत होती पण मी तसा प्रयत्न केला नाही.
ही नवी नोकरीही फ़क्त आधीच्या जंजाळातून सुटका म्हणून पत्करली होती असं म्हणणं जास्त बरोबर ठरेल.कारण पहिल्यापासून उगाच संशयास्पद वातावरण. एकतर मुलाखत ई. शनिवारी ठेवली होती आणि त्यादिवशी तिथे इतकं गुढ वातावरण. आता आठवलं तरी विचित्र वाटतं आणि पगार होता ६००० रु. तरी दोन वर्षांचा बॉंड. अडला हरि म्हणून सुरु केलं. ही नोकरी सुरु झाली पण म्हणावं तशी पकड घेत नव्हती. फ़क्त काही मराठी कलिग्ज तिथे मिळाले. ब्रेक टाईम बरा जायचा. पण प्रवासही त्रासदायक होत होता.
मागे त्या आधी उल्लेख केलेल्या मैत्रीणीबरोबर अंधेरीतल्या सिप्झमध्ये जवळ जवळ सर्व कंपन्यांमध्ये रेझ्युम टाकुन आलो होतो. वरची नोकरी सुरु होऊन दोनेक आठवडे झाले असतील; सिप्झमधल्या एका कंपनीची मुलाखतीसाठीची मेल आली. मुलाखत शनिवारी असल्यामुळे आधीच्या ठिकाणी रजा-बिजा टाकण्याचा काही संबंध नव्हता. नशीब बरं होतं. सकाळी नऊ वाजता सुरु झालेली मुलाखत प्रक्रिया रात्री नऊला संपून हातात. पगार दहा हजार हातात. बाकीचे कापाकापीचे वेगळे. पहिल्यांदा पाच आकडे पाहुन थोडासा हर्षवायुच झाला. शिवाय सिप्झ म्हणजे सॉफ़्टवेअरची पंढरी. आता करिअरची गाडी सुसाट सुटणार याची उगाच खात्री.
असं असतं असंच नाही. माझ्या सगळ्यात पहिल्या नोकरीतला एक मित्र अजुन कॉन्टॅक्टम्ध्ये होता. तो आणि मी एकाच दिवशी ती कंपनी जॉईन केली होती. रात्री नऊ वाजता त्याला फ़ोन केला. माझं कौतुक करायला तो मला बोरिवली स्टेशनला भेटला. काय मंतरलेले दिवस होते. नाव किना-याला लागल्यासारखं घरच्यांनाही वाटलं.
ऑफ़र लेटर घेऊन घरी आले पण मनाची तयारी अजुनही होत नव्हती. आता काय?? काय म्हणजे आधीची नोकरी जावामध्ये म्हणजे आधी शिकलेल्याचा फ़ायदा करुन देणारी तर नवीन जागी कुठच्याही म्हणण्यापेक्षा मेनफ़्रेमवर टाकण्याची जास्त शक्यता होती. रात्र जरा बेचैनीची गेली. पण इतकी मोठी कंपनी, पगार आणि टेक्नॉलॉजी काय पुढे मागे बदलता येईल असा सारासार विचार करुन सोमवारी जुन्या नोकरीवर बरं नाही असा फ़ोन करुन ह्या मेडिकलला गेले. उरलेला आठवडा जुन्या ठिकाणी भरला पण तोच शेवटचा करावा असाही विचार केला. नव्या नोकरीची जॉइनिंग डेट पुढची होती त्यामुळे आई-बाबांबरोबर शिर्डीला जायचा कार्यक्रम निश्चित केला. इथेही बॉन्ड होता म्हणून तिथले कलिग्ज म्हणाले जाताना सांगून जाऊ नकोस. त्या शुक्रवारी तिथला एक कलिग अंधेरी स्टेशनला माझ्याबरोबर सोडायला, बाय म्हणायला म्हणून आला. मनातल्या मनात कळत नव्हते ही नोकरी सोडण्यामागे शहाणपणा आहे की नाही?
सांगायचे तात्पर्य गेले सहा महिने एक तो जावाचा क्लास नंतर या दोन बिनपगारी नोक-या करुन फ़ायनली एका नवीन दोन वर्षांचा बॉन्ड असलेली नवीन नोकरी माझी वाट पाहात होती. या नोकरीबद्द्ल पुन्हा केव्हातरी लिहिन. म्हणजे आतापर्यंतचा प्रवास वाचायला मजा आली असेल तरच हा!
पण आता खास हे आठवण्याचे दुसरे निमित्त सध्या मंदीच्या काळात पुन्हा एकदा नोकरी शोधायला कंबर कसली आहे. त्यामुळे आतापर्य़ंतचे सर्व अनुभव एखाद्या निवांत दुपारी हमखास आठवतात.नशीबात वेगवेगळ्या नोक-यांचा योगच दिसतोय असं काहीसं वाटतंय...बघुया हा नवा अनुभव कधी मिळतोय ते....

Tuesday, May 19, 2009

प्रिय अपर्णास....

मागच्या आठवड्यात चिरंजीवांचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने माझ्या बाबांनी बरेच दिवसांनी मला एक पत्र लिहिले. त्यातला काही भाग खास लक्षात ठेवावासा वाटतोय. ब्लॉगवर आला की आपसुक जास्त वेळा नजरेखालुन जाईल म्हणुन थोडं पर्सनल असलं तरी पब्लिक करतेय.

चि. आरुषचा पहिला वाढदिवस म्हणून हा पत्रप्रपंच. त्याला सर्दी झाली हे मला कळलं. आई आपल्या बाळाला मोठं करते म्हणजे १."घार हिंडते आकाशी, चित्त तिचे बाळापाशी!" २. "वानर हिंडे झाडावरी, पिले बांधुनि उदरी". कविता म्हणणारे म्हणोत बापडे. पण जी माय म्हणजे आई हे करते धन्य ती!
चि. आरुषकडे तुझे भरपूर लक्ष आहे. मला अमेरिकेत आल्यावर कळले, मुलांना पंधरा वर्षे जपावे लागते. "मुले ही देवाघरची फ़ुले आहेत" हे साने गुरुजींना कळले. ब-याच लोकांनी तो सुविचार म्हणून फ़लकावर लिहिला. अनुभव मात्र आईला किंवा आजी-आजोबांना आला.
पंधरा वर्षांपर्यंत मुल चंचल, अपक्व, नासमज असते. कान, नाक, डोळा, हातपाय कसे सुरक्षित ठेवावे हे त्याला कळत नाही. पडणे, झडणे, सायकल चालविणे इथे बारीक लक्ष ठेवावे लागते. अगदी डोळ्यात तेल घालून.
मुलांविषयी थोडेसे....(सन्मा. चिपळूणकर सर)
* मुलांवर डोळस प्रेम करा. त्यांच्या गुणदोषांसकट त्यांचा स्विकार करा.
* मुलांना सतत धारेवर धरु नका. अपमानित करु नका.
* गरज असेल तेवढेच त्यांना करु द्या.
* मुलांना गरज असेल तेवढेच मार्गदर्शन करा.
* मुलांना शिकवत राहण्यापेक्षा त्यांना सुचवा.
* मुलांना स्वयंअध्ययनाची गोडी लावा.
* खेळण्याची संधी द्या.
* योग्य-अयोग्य. चांगले-वाईट, भले-बुरे ओळखण्याची दृष्टी त्यांना द्या.
* मुलांना अवाजवी शिक्षा करु नका.
* मुलांसमोर नकार घंटा सतत वाजवून त्यांचा उत्साह, उभारी खच्ची करु नका....
तुझेच बाबा...

Monday, May 18, 2009

चिमणीचा घरटा

गेले दोन वर्ष मागल्या दारी जो ओटा आहे तिथे वळचणीला एक चिमणा-चिमणी घरटं बांधतात आणि साधारण मेच्या सुमारास पिलं बाहेर येतात. या वर्षीही चिमणीला मी हिवाळा संपता संपता तिथेच पाहिले आणि म्हटलं हिला जागा आवडलेली दिसते. नंतर इतकं लक्षही द्यावसं वाटलं नाही पण काही आठवड्यांनी अचानक इथे आपल्या इथल्या मैनेसारखे पण संपुर्ण काळे दिसणारे ककु त्यात जाताना दिसले आणि पुन्हा एकदा लक्ष घरट्याकडे वेधले.
पक्षिप्रेमासाठी पुर्वी इतकं मनमुराद फ़िरता येत नसलं तरी जमेल तितकं घरगुती पक्षीनिरिक्षण आणि वाचन मी आवडीने करते. त्यामुळे जेव्हा मी ककुला तिथे जाताना पाहिले मला लगेच आपल्या कोकिळेची आठवण झाली. कावळ्याच्या घरट्यात शिताफ़ीने अंड टाकुन मग पिलं थोडी वाढवुन मिळाली की मग त्यांचं पाहणारी कोकिळा. मला वाटलं ही पण तशीच भानगड दिसते. आता या नैसर्गिक चमत्काराचे आपण इकलौते गवाह वगैरे होणार म्हणुन एकदम फ़ुल फ़्लेज थ्रिल. आता रोज घरट्यावर लक्ष ठेउया, मध्ये मध्ये फ़ोटो आणि जमलं तर शुटिंग काय काय बेत पण मनातल्या मनात आखायला सुरुवात केली.
चिमणी आणि ककु रोज आलटुन पालटुन जाताना दिसत होती. मला तर वाटत होतं ककु कपल भलतच हुशार पण आहे. चिमणी बाईंची नाहीतर चिमणा काकांची फ़ेरी झाली की लगेच संधीचा फ़ायदा घेऊन आतमध्ये जाउन काहीतरी खुसुर-फ़ुसुर करत. पण ही बया चोचीत दोरे, गवताच्या काड्या-बिड्या घेऊन काय बाहेर येत होती काय कळत नव्हतं. म्हणजे दुसरीकडे कुठे घर बांधतेय आणि इथुन सिमेंट-रेतीची तरतुद चाललीय काय माहीत...हे नाही हं चालायचं. माझा अंदाज खोटा ठरला तर आधीच टिंगल करणा-या माझ्या नवऱ्याच्या हातात कोलीत नाही का मिळणार. पण तसं नाहीयं वाटतं.

नंतर एकदा चिमणा आणि ककु यांचं जोरात भांडण चालु झालेलं; मीच नाही तर आत खेळणा-या माझ्या लेकानं पण ऐकलं. चांगलीच चिडली होती दोघं. मला आपलं काहीच कळत नव्हतं. म्हणजे हिने अंडी घातलीत आणि तिनाची चार झालीत हे गणित चिमणा चिमणीला कळलं की काय? पण भांडणं चालुच होती आणि आता ककुच्या घरट्यातल्या फेऱ्या पण वाढल्या होत्या. मी जास्त कन्फ़्युज.
आता बरेच दिवस चिमणी मात्र तिथे दिसत नाही.
आणि आमच्या बागेत एक लाकडी बर्डहाउस ठेवलेय तिथे बसु लागली. कळलं मला की तिच्या लाडक्या जागेवर अतिक्रमण झालय आणि विणीचा हंगाम पुर्ण संपायच्या आत दुसरं घर बांधलं नाही तर गोची होईल म्हणुन तिनं आपली सोय बंगल्यातुन वन बेडरुम मध्ये करायला घेतलीय. वाईट वाटलं पण काय शेवटी "survival of the fittest".
बरं ते जाउदे पण आताच घरट्यातुन पिलांचे आवाज यायला लागलेत. श्री आणि  सौ ककु सारखे किडे घेऊन फेरयांवर फेऱ्या  मारताहेत. शेवटी न राहावुन कॅमेरा उंच पकडुन फ़ोटो काढलाय.




पिलांच्या चोची काय सुंदर दिसताहेत...पुन्हा एकदा एक्साइटमेंट! पण मला त्यांचे आवाज मात्र चिव-चिव सारखे का वाटताहेत काय कळत नाहीहेत..
काय हरकत आहे एखाद्या वर्षी ककुच्या घरट्यात चिमणीने अंडी टाकायला?

Wednesday, May 13, 2009

आजोबांच्या गोळ्या

खरं सांगायचं तर मी स्वतः माझे सख्खे आजोबा पाहिलेही नाहीत त्यामुळे आमच्याशी कडक शिस्तीत वागणारे माझे बाबा माझ्या भाचे कंपनीचे खूप लाड करताना पाहते तेव्हा मला नेहमी वाटतं की आजोबा प्रकार काय असतो आपल्याला खरंच कळत नाही. त्यादिवशी औट घटकेसाठी का होईना एक आजोबा भेटले आणि पटलं की गोरा असो का भारतीय, पैलतीर दिसू लागलेल्या माणसाच्या ओठी प्रेमाचीच भाषा येणार...
मुळात अमेरिकन माणसे स्वतःत रमणारी. अशी दिसली की तोंडभर हा......य़ करतील पण हाय पुढे जास्त इंटरेस्ट असेलच असे नाही. माझी एक मैत्रीण म्हणते की एक प्रकारे ती तुम्हाला सांगताहेत की we are trying to be friendly ...doesn't mean we are freinds... असो. नमनालाच घडाभर तेल नको.
या कम्युनिटीत नव्याने राहायला आलो तेव्हा एकदा WFH म्हणजे वर्क फ़्रॉम होम करताना खिडकीतून बाहेरच्या साइड वॉकवर कुणीतरी हळुहळु चालताना दिसलं. पाहिलं तर काठी घेऊन एक वयाने सत्तर-ऐंशीच्या घरातले एक गृहस्थ आपला मॉर्निंग वॉक घेताना दिसले. एकंदरितच माणसे कमी दिसतात म्हणुन सहज नजरेला चाळा म्हणून मी बसल्या जागेवरुन उगाच अंदाज बांधत बसले. हे एकटेच राहात असतील मग यांची घराबाहेरची कामे कोण करत असेल आणि काय आणि काय...असो. संध्याकाळी घरात पण त्यांचा विषय काढत बसले.
अशी माणसं दिसली की मला उगाच गलबलुन येतं. मग काही दिवसांनी नवरा उशीरा कामावर जाताना या दोघांची समोरासमोर गाठ पडली आणि त्यांच्याशी हातमिळवुन आलेला माझा नवरा "अगं, तू त्या आजोबांबद्द्ल बोलत होतीस ना ते भेटले होते. त्यांचा हात काय कडक आहे माहितेय?" मितभाषी लोकांचं बरं असतं ते कुण्याच्या जास्त चौकशा करत नाहीत, त्यामुळे त्यांना बरेच प्रश्न पडतच नसावेत. हा मला यापेक्षा जास्त माहिती देणार नाही हे माहित असल्यामुळे मी अजून जास्त छेडले नाही. पण त्या हाताबद्द्लच्या कॉमेन्ट्वरुन मात्र मला पु.लं.च्या पेस्तनकाकांची आठवण झाली. असो.
नंतर बरेच महिने आम्ही आमच्या दैनंदिन जीवनात व्यस्त. अधुन-मधुन बाहेर चालताना कुणी आहेस वाटलं तर स्पीडवरुन मला कळे की काठी घेउन मॉर्निंग वॉक चाललाय....मी जवळ जवळ विसरुनही गेले होते की मी मध्ये काही दिवस अमेरिकेत एकटे राहणाऱ्याचा इतका विचारपण करत होते ते.
आज ब-याच दिवसांनी सकाळी मी माझ्या छोकऱ्याला बाबागाडीत बसवुन फ़िरायला म्हणुन बाहेर काढले आणि समोरुन पाहिलं तर साइड वॉकवरुन काठीचा थोडा आधार घेत, चालीचा तोच तो ओळखीचा वेग...आज मात्र जरा यांच्याशी बोलुयातच म्हणून आमचा वेग थोडा कमी केला आणि मग एक मोठ्ठं हॅलो... आजोबांनी माझ्याकडे आणि बाळाकडे जवळ जवळ एकत्रच पाहिलं आणि सर्वात प्रथम बाळाची चौकशी केली. त्यांना माझे इंग्लिशचे उच्चार (accent) आवडल्याचं कळलं. मला आपलं तेवढंच बरं वाटलं.
जुन्या लोकांना भारतीय लोक पटकन ओळखु येत नसावेत बहुधा...त्यांनी मला विचारले की मी कुठली आहे. पुढच्या प्रश्न काय असेल त्याची साधारण कल्पना आली मला कारण आतापर्यंत भेटलेल्या जवळजवळ प्रत्येक गोऱ्याने हा प्रश्न सम पॉइंट ऑफ़ टाईम केला आहे. तो प्रश्न म्हणजे इथे तुला आवडतं का? याचं माझं प्रामाणिक उत्तर "हो आणि नाही" आहे. हो चं कारण कुणी विचारत नसतं पण नाहीचं कारण आमचे दोघांचे पालक, बहिण-भावंड इथे नाहीत. हेच उत्तर मी याही वेळी दिलं...आता आजोबांची कळी खुलली. ते मला स्वतःहुन आपली माहिती द्यायला लागले.
यांना तीन मुलगे पण ते तिघं आमच्या भागापासून निदान दोन तासांच्या(म्हणजे आपल्या मुंबईपासुन पुण्यापेक्षा जास्त) अंतरावर राहतात त्यामुळे हे इथे एकटेच. मी अजुन काही विचारायच्या आत ते स्वतःहुन म्हणाले मला मुलगी नाही ना....मी पण माझी जुनी जखम मोकळी केली की आम्हाला पण मुलगी होईल तर बरं असं वाटायच पण....यावरची आजोबांची प्रतिक्रिया फ़ारच बोलकी होती...अगदी आपल्या इथल्या कुठल्याही बापासारखी..."a son is a son untill he gets his wife and a daughter is a daughter for the rest of her life" ते नुस्तं सांगून थांबले नाहीत तर त्याचा शब्दशः अर्थ स्पष्ट करुन सांगितला. मला इतकं भरुन आलं..काय बोलु?? मी म्हटलं अहो मला आपलीच समजा आणि मी काही मदत करु शकले तर नक्की सांगा.
त्यांनी माझ्याबरोबर थोड्या इथल्या गप्पा केल्या. ते ब्याण्णव वर्षांचे आहेत हे मला खरंच वाटत नव्हते. ते म्हणाले मी कधीही दारू प्यालो नाही आणि बायकांच्या मागे लागलो नाही. फ़क्त माझ्या मित्रांबरोबर मी खूप मैदानी खेळ खेळलो आहे. मला वाटलं काय देश आणि संस्कृती घेऊन बसतो आपण. शेवटी मूळ प्रश्न आणि त्यांची उत्तरे सगळीकडे सारखीच नाही का?
थोड्या वेळाने आपल्या खिशातुन आजोबांनी एक छोटी प्लॅस्टिकची पिशवी काढली, त्यात आपल्या इथल्या लिमलेटसारख्या गोळ्या होत्या. ते म्हणाले मी चालतो तेव्हा माझी एक शेजारीण जी इतर वेळी मला सारखी मदत करते ती जर दिसली तर तिला मी ह्या गोळ्या देतो. आज मी त्या तुला देणार आहे. आणि तू त्या सर्व एकदम खाउ नकोस. यांची चव नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. मी आभार मानून त्या घेता घेता त्यांना विचारु पाहात होते की मी तुम्हाला काय देऊ पण ते म्हणाले I like the fact that you accepted this....मला कळेचना आणि खरं माहित नाही त्यांनी असं का म्हटलं...अशा छोट्या प्रसंगात का कुणास ठाऊक मला वाटतं हाच आपल्या आणि त्यांच्या कल्चरल डिफ़रन्सचा भाग असावा...असो..
नंतर उरला वेळ लेकाला फ़ेरफ़टका मारताना मी मनातून हाच विचार करतेय की मला आजोबा असते तर त्यांनी मला आताही अशाच खूप दिवस पुरणा-या गोळ्या दिल्या असत्या आणि बरोबर त्या लगेच संपवू नको ही सुचना.
माहित नाही पुन्हा आमची भेट कधी होईल. पण यावेळी मला माझ्याजवळ या आजोबांसाठी काहीतरी ठेवायचे आहे. काय बरं ठेऊ??

Sunday, May 10, 2009

एक आजारी आठवडा

इथे सगळीकडे स्वाईन फ़्लुची साथ सुरु आहे म्हटल्यावर आपण पण सुरात सुर मिळवायला हवा नाही का? म्हणजे झाले असे की साधारण एप्रिल संपता संपता जसा स्प्रिंग बहराला येतो तसा पाऊसही चांगला पडतो. पण यावर्षी मात्र या पावसाच्या आधी हिट वेव्ह ने चांगले चार दिवस हजेरी लावली..पारा ९४ फ़ॅ. म्हणजे ३५ से. च्या आसपास. त्यातून सावरतोय तितक्यात एकदम ५५ फ़ॅ. म्हणजे १३ से. इतक्या खाली उडी.
लहान माझं बाळ ते! कसं झेपायचं त्याला? मग काय नाक लागलं गळु आणि तापानेही हजेरी लावली. रविवारी संध्याकाळी कणकण वाटली म्हणुन तापाचं औषध दिलं तर स्वारी सोमवार दिवसभर खेळली. नेमका सोमवारीच नवरोबांचा ऑफ़िसमधून फ़ोन. म्हणतोय मला ताप येईल असं वाटतय. त्याच्या ऑफ़िसमध्ये ऑन ड्युटी डॉक्टर किंवा नर्स असते. त्याला तिथुन तात्पुरतं औषध घे म्हटलं. पण तो संध्याकाळी घरी आला आणि घरातला हिटर एकदम ७५ फ़ॅ.वर वाढवला. नॉर्मली आम्ही ७० पर्यंत ठेवतो बाहेर गार असेल तर. मी म्हटलं पड थोडा वेळ. पण आम्हा आय.टी. वाल्यांच्या अंगात लॅपटॉप इंटरनेट अंगात भिनलंय की हा उगाच काहीतरी काम करतोय आणि म्हणतो मला वाटतं हा स्वाईन फ़्लु असेल. त्याही अवस्थेत इतकं हसु आलं ना. मी म्हटलं 'तू नेटवर त्याची लक्षणं वाचतोयस का? तसं असेल तर तुला नक्की वाटेल की हा स्वाईन फ़्लुच'. 'नाही, ऑफ़िसच्या मेलमध्ये आलंय'...हे ऑफ़िसचे एच. आर. वाले पण ना...इथे मंदीच्या काळात रोगाची लक्षणं कसली वाटताय..नोकरी शाबुत राहिलसं काही सांगा ना....असो. पण माझा जोक कळण्याच्या मनस्थितीत हा अर्थातच नव्हता. म्हणुन त्याने लगोलग डॉक्टरच्या इमर्जन्सी लाइन वर फ़ोन केला. खरं तर ही बया कधीही स्वतः लागलीच फ़ोनवर येत नाही पण त्यादिवशी चक्क मॅडम स्वत:च्या घरच्या लाईनीवर कॉल घेतात म्हणजे....(हा पण मंदीचा परिणाम की काय..पेशन्टस कमी झाले असतील. :)) असो..तिने दुस-या दिवशी सकाळची अपॉइन्टमेन्ट दिली..म्हणजे हा स्वाईन नव्हता. माझा नवरा वर तिला विचारतो आर यु शुअर की मी आत्ता नको यायला?? मला इतके हसायला येत होते ना.

त्याचा ताप पाहते तोवर बाळराजे पण तापलेले वाटले आणि यावेळी ताप चांगला १०२ फ़ॅ. जरा घाबरलोच. लगेच तापाचे औषध देऊन कपाळाला चंदन उगाळुन लावले. आता मात्र मला खरोखरच थोडं टेंशन आले कारण बाळाला सतत दोन संध्याकाळ ताप येत होता.

रात्री माझी खरी कसोटी होती. तापातल्या नव-याला उनउन खिचडी आणि पटकन सुचलं तसं सुप देऊन दुस-या बेडरुममध्ये झोपवलं. नेहमीच्या ठिकाणी मी आणि माझा लेक. दर दोन तासांनी उठणा-या माझ्या पिलाला मध्ये काही वेळ मांडीवरच घेऊन बसले. अक्षरश: कशीतरी रात्र सरली. सकाळी पहिल्यांदा नव-याची फ़ॅमिली डॉक्टरकडे अपॉइन्टमेन्ट. तो एकटाच ड्राइव्ह करुन गेला. काही पर्यायच नव्हता. कारण नाहीतर तिघांना जावं लागलं असतं. तो गेल्यावर मी बाळाच्या डॉक्टरकडे फ़ोन केला. (इथे मात्र नर्सच हं) इतर वेळी काय लक्षणं आहेत ऐकुन ती कधीकधी थांबायला सांगते पण यावेळी मात्र तिनेही जरा दुपारची अपॉइन्टमेन्ट दिली. नवरा येईस्तो थोडी फ़ार जेवणाची तयारी, बाळाची खिचडीचा कुकर बनवुन ठेवला आणि मग एकटी बाळाला घेऊन डॉक्टरकडे. "इयर इन्फ़ेक्शन" इथे इतर आयांकडुन नेहमी ऐकलेला शब्द आज आमच्यासाठीपण लागु झाला. चला आता घरी उरलेल्या दिवसांचा सामना करायला.
आल्या आल्या जेवणं आटपुन पुन्हा नेहमीची कामं. बाळाचा डायपर बदला, सर्वांची भांडी आवरा, बाळाला झोपवा कामांची रांग वाढतच होती. मनातल्या मनात आठवत होते माझ्या ताईकडे किंवा माझ्या मामे/मावस बहिणींकडेही असं कुणी आजारी पडलं की लगेच माहेराहुन कुणी मोठं व्यक्ति तिथे दिमतीला. इथे म्हणजे आपणचं काळजीवाहु कम कुक कम सर्वंट. असो...

आणखी एक वैऱ्याची रात्र तशीच काढली. आणि खरं तर दिवसही वैऱ्याचाच. कारण कामं वाढलेली. इतर वेळी सरळ शिळं, फ़्रोजन वगैरे खाल्लं जातं. त्यामुळे मोठ्यांचं जेवण रोज करावं लागत नाही. पण आजारपणात ही चैन परवडत नाही ना? मग काय एक जादा काम. तिस-या दिवशी नवऱ्याला बरं वाटत होत पण त्याने WFH घेतलं म्हणजे प्रवासाचा शीण नको. पण आता माझीच बॅटरी डाउन व्हायला लागली होती. ह्या दोघांच्या सर्दीने मलाही त्रास द्यायला सुरुवात केली होती. रात्री मध्येच इतकी थंडी वाजली की ताप आलाय हे कळत असुन उठवत नव्हतं. तो बिचारा आला तसाच रात्रीच्या पोटात गडप झाला. करणार काय? त्याच्याकडे लक्ष द्यायला मला मुळी वेळच नव्हता. आणखी दोन दिवस असेच कसेतरी काढले.
मध्ये एकदा नवऱ्याला वाटत होते कुणाला भारतातुन बोलवुया का? पण मी म्हटलं फ़क्त सर्दी-ताप आहे. जाईल. आणि आपण सर्व एकत्र आजारी पडलोय म्हणुन वाटतय. आपण इतकं सर्व एकट्याने करतो ना मग हा प्रसंगही एकट्याने जमतोय का बघु. पुढच्या वेळी आपण अधिक तयार असु...
असो. आठवडाभरात सर्वजण थोडेफ़ार का होईना बरे झालोय आणि ही पोस्ट लिहितेय. मला माहितेय असं एकट्याने सर्वांचे आजार काढण्याचा पर्याय बऱ्याच जणांना आवडणार नाही. पण आजकाल सर्वांनाच थोडेफ़ार प्रश्न समोर असतात. त्यात अशा साध्या साध्या आजारांसाठी मदत घ्यावी असं वाटलं नाही. तसं आमचं इथलं मित्रमंडळही हाकेला लगेच धावुन आलं असतं पण हा एक आजारी आठवडा मला स्वतःला एक वेगळा आत्मविश्वास देऊन गेला.

Friday, May 8, 2009

पहिला मदर्स डे

हा येणारा १० मेचा मदर्स डे माझा पहिलाच असणार आहे. ज्याच्या मुळे तो येतोय ते माझं बाळ खरं तर त्याच्या पुढच्या आठवड्यात वर्षाचं होईल. म्हणजे आपल्या आईसाठी आपल्यामुळे आज काही खास आहे किंवा तिला खास वाटेल असं काही करुया असं त्याचं वयही नाही. पण तरी माझ्यासाठी मात्र हे खासच.
मनात उगाच वाटतं नाहीतरी मुलगे कुठे भावनाप्रधान असतात. कदाचित लहानपणात तसं नसेल. पण नसताही गेला हा दिवस खास. की असं होईल नव-यातर्फ़े काही सरप्राइज वगैरे मिळणार पण ती शक्यता फ़ार फ़ारच धूसर कारण आत्ताच माझा स्वतःचा वाढदिवस होऊन गेला पण तसं काही खास-बिस नाही...आपलं नेहमीप्रमाणे बाहेर जाऊन खाऊन येणे आणि आता मूल लहान असल्यामुळे शक्य तितक्या जवळच्या ठिकाणी. म्हणजे अगदीच गरज पडलीच तर पटकन घरी यायला बरं....ते जाउदे उगाच भरकटतेय मी...
मुलगी नसली तरी मला एक गोड भाची आहे तिला आठवण येईल का की आज माझ्यासाठी काही स्पेशल आहे ते?? ह्म्म्म्म....माहित नाही...उगाच हुरहुर ...
मागचा मदर्स डे उलट जास्त छान म्हणायचा..बाळंतपणाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी आईच माझ्याजवळ....
कदाचित काही म्हणजे काहीच होणार नाही. आम्ही नेहमीप्रमाणे रविवार म्हणजे जमेल तितकी घरची कामे आटपू, बाळाचे रुटिन आहेच....आणि जर तो दुपारी छान झोपलाच तर एखादा ऑनलाईन सिनेमा किंवा नाटक असं काही...नाहीतर मागच्या आठवड्यातले राहिलेले डि.व्ही.आर. मध्ये रेकॉर्ड केलेले कार्यक्रम पाहू...

श्या...काय होतय काहीच कळत नाही...पण मला वाटतं कदाचित माझं बाळ जेव्हा आई हाक मारायला शिकेल ना तोच मदर्स डे वेगळा वाटेल...बाकी हा म्हणजे फ़क्त मे महिन्याचा दुसरा रविवार. आणि इथे रविवार म्हणजे वेगळ्या प्रकारे कामाचाच एक वार....फ़क्त मानेवर बॉसचं जू नसलेला....

पण बाळा जर तू मोठ्ठा होऊन हा ब्लॉग वाचणार असशील तर फ़क्त तुझ्यासाठी हा जास्त काही मॅटर नसलेला धागा मी लिहीत आहे बरं....म्हणजे सांगायचं बरच आहे पण कळत नाही कसं ते....

Saturday, May 2, 2009

आम्ही लायब्ररीत जातो



स्वतःला आम्ही बिम्ही म्हणवुन घ्यायची सवय मला नाही. बरं वाचनालय ही अशी टी.पी. (म्हणजे time pass हो) करायला जायची जागा पण नाही. मग काय इतकं आम्ही लायब्ररीत वगैरे? सांगते...आम्ही म्हणजे मी आणि माझा अकरा महिन्यांचा मुलगा. म्हणजे मी काही अगदी खाष्ट आई व्हायचं इतक्यात तरी ठरवलं नाहीये पण इथे लायब्ररीत खास लहान मुलांसाठी खेळ, गोष्टी असे कार्यक्रम ठेवले असतात जे मी इतके दिवस ऐकून होते ना त्यासाठी प्रथमच आमच्या चिरंजिवांना नेलं. नेलं म्हणजे न्यायचा धीर केला त्याची आठवण म्हणून ही खास पोस्ट.

नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने पैकी पहिलं विघ्न म्हणजे सकाळचा मोठा कार्यक्रम जो खुपदा न्याहारी नंतर जमेल तेव्हा करायची बाळराजांची सवय. पण आज मी जरा लकी होते त्यामुळे साडे नऊ पर्यंत डायपर बदलुन आम्ही तयार होतो. पण हाय..मी लायब्ररीच्या वेबसाइटवर वेळच पाहायची विसरले होते. नशिबाने आम्हाला एक पाच मिनिटाच्या ड्राईव्हवर ही गावची लायब्ररी असल्याने आयत्या वेळी पोहोचता येण्यासारखं होतं.

बाहेर जायचं नक्की केलं आणि पाहाते तर कार सीट घरातच. मला या अमेरिकन बायांच आश्चर्य वाटतं. दहा- बारा पौंडाची कारसीट आणि त्याच्या दुप्प्ट वजनाचं बाळ उचलुन पार्किंग लॉटपासुन मुक्कामाच्या ठिकाणी आरामात जाताना दिसतील. मी गेल्या अकरा महिन्यात एकदाही हे धाडस केलं नाहीये. आपली म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत. नव-याने कारसीट गाडीत लावली असेल तर फ़क्त बाळाला त्यात बांधायचं आणि स्वारी पुढे.. आता काय करायचं? बरं शेजारी, म्हणजे डावीकडची आणि समोरची मंडळी कामावर आणि ऊजवीकडे एकटी राहणारी म्हातारी बेट्टी. ती काही ड्राईव्हवेवर आताच चालायला शिकलेल्या आमच्या बाळाला आवरु शकणार नाही. पण आज डावीकडच्या मंडळीकडे दोन दोन गाड्या पार्क दिसतात. चला बघुया कुणी मिळतंय का मदतीला. दोन-तीनदा दार वाजवल्यावर आमच्या शेजारणीच्या सासुने दार उघडलं. हिला आपल्या नातीला मधेमधे सांभाळायला आवडतं आणि आमच्या नशिबाने ही स्वतः इथेच तिला सांभाळणार होती. तशी खूप मदतीला तत्पर इथली लोकं पण आपण सांगितलं तरच. मग काय आमचं पोरगं थोडावेळ तिच्याकडे आणि मी गाडी तयार करुन स्वारी एकदा जायला तयार झाली. सर्व ट्रॅफ़िक सिग्नलपण व्यवस्थित मिळून बरोबर दहा वाजता आम्ही पोचलो.

आधी तर नवीन जागा बघुन आईला चिकटणारा माझा मुलगा तिथे असणारी खूप मुले पाहुन लगेचच पळापळी करायला लागला. चला बरे झाले मी म्हटले. एका हॉलमध्ये सर्वांना नेल्यानंतर एक त्यांची इन्स्ट्रक्टर ओळख करुन देत कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातीला "when you are happy when u know u clap your hands" हे गाणं साभिनय चालु केलं. आणि अशीच काही इतर गाणी क्रमाने चालु झाली. तिच्याकडे हाय हॅलो,बटाटा आणि म्हणजे कुठच्याही विषयावरची चारोळीसदृष्य मजेदार गाणी होती..मला त्यातली बरीच नवीन होती. आधीच मी मराठीतून शिकलेली आणि बरीच वर्ष इंग्रजी बडबडगीतं ऐकलीही नाहीत. एकीकडे थोडी व्यवस्थित चालु, उभं राहु शकणारी दोन तीन मुलं मनापासून अभिनय करतात. माझ्या मुलासारखी काही मुलं भरकटल्यासारखी इथे तिथे फ़िरतायेत आणि मध्येच आपली आई आहे ना आसपास हे पण चेक करतात. तर कुणी एक्स्पेरियंस मुलं नंतर खेळायला मिळणार हे माहित असल्यासारखं खेळ्ण्याच्या कपाटाकडेच घुटमळतात अगदी मजेदार दृष्य होतं.

माझा मुलगा अचानक एका मुलीच्या मागे मागे लागु लागला मला कळेचना की हे काय आतापासून! नंतर पाहिलं तर तिच्या तोंडात पॅसिफ़ायर होतं इथे बऱ्याच आया सोय़ीचं पडतं म्हणून देतात तोंडात ठेऊन पण आमच्या बाळाला हा दागिना नवा त्यामुळे तो ते काढण्यासाठी आपला तिच्या मागे मागे...शेवटी त्याला मांडीवर घेऊन बसले तर नेमकी आमच्या समोर बसलेली एक आई नव्या फ़ॅशनचा छोटा टॉप घालुन बसल्यामुळे मागे थोडा कंबरेचा भाग दाखवत बसली होती. आजकाल दात येत असल्यामुळे बाळाला हात वगैरेची स्कीन दिसली तर चावायची सवय आहे. ईथे तर एकदम गोरी गोरी कातडी समोरच...हा जवळ जवळ सुटलाच होता माझ्या हातातून तिच्या दिशेने तेवढ्यात पुढचा बाका प्रसंग ओळखून मी पटकन त्याला घेऊन मागे काही खुर्च्या भिंतीला टेकवून ठेवल्या होत्या त्यावर जाउन बसले. नशीब कोणाला कसला अंदाज आला नाही ते.
थोड्याच वेळात माझ्या नशिबाने गाणी संपली आणि दोन कोप-याला खेळण्यांची दोन कपाटे होती ती उघडून मुलांना खेळायला दिले...आता जरा एक्सप्लोर करायचे तर आमचे बाळराजे फ़क्त सगळी खेळणी गोळा करुन पुन्हा तिथल्या एका बॉक्समध्ये घालायचा उद्योग करु लागले. म्हणजे काही मुले ती खेळणी घेऊन पळत होती आणि हा ती परत मिळवून जागच्या जागी ठेवतोय...हाय रे.....हाही वेळ तसा मजेत गेला. मुख्य आता आई आपल्याबरोबर खेळत नसली तरी चालत होतं...इतक्यात क्लिन अप साठीचं खास गाणं चालु झालं आणि सर्वांनी घेतलेली खेळणी कपाटात आणायला सुरूवात केली. आम्ही तर इतका वेळ जवळ जवळ तेच काम करत होतो... असो पण एक तास कसा गेला खरंच कळलं नाही.

अमेरिकेत आल्यानंतर इथल्या अनेक सुविधांपैकी सार्वजनिक वाचनालय ही आम्हा दोघांनाही आवडलेली सोय आहे. तुम्ही फ़क्त त्या गावात राहण्याचा हवाला म्हणून एखादे पत्र आणि तुमचा आय.डी. दाखवलात की लायब्ररी कार्ड तुमच्या नावावर. नो फ़ी नो नथिंग... अगदी सुरुवातीच्या बेकारीच्या काळात मी इथे अगदी पडिक असे आणि नंतरपण मला दर आठवड्याला प्रवास करावा लागे त्यावेळीही विमानात वाचायला पुस्तकं घ्यायला जाणं नेहमीचं. हॅरी पॉटरचे सर्व भाग मी लायब्ररीतुनच वाचून संपवलेत. आतापर्यंत मला हव्या त्या प्रत्येक विषयावर इथे पुस्तक मिळालय. अगदी भारतीय पाककृतीचं सुद्दा. असो..लेकाला लायब्ररीत नेण्याच्या निमित्ताने मीच मनाने किती मागे जाऊन आले कळलंच नाही.

पण खरंच आहे अगदी सर्व वयाच्या लोकांसाठी काही ना काही कार्यक्रम इथे असतात. आता मीच माझ्या मुलाला ज्या कार्यक्रमासाठी आणलेय ते जन्मापासून ते दोन वर्षे वयासाठी तर वरच्या मजल्यावर अगदी सिनियर सिटिझनसाठी संगणक शिक्षण इ. पर्यंत कार्यक्रम असतात. आणि सर्व चकटफ़ु..पुन्हा एकदा मी इथल्या लायब्ररी सिस्टिमला मनोमन धन्यवाद दिले. खरंच कसं मेंटेन करतात माहित नाही. आपण भारतीय वेस्टर्न कल्चर किती पट्कन आमच्या कडेही आहे हे आजकाल मॉल, फ़ॅशनेबल कपडे ई. च्या रुपाने दाखवत असतो नाही? पण वेस्टर्न कल्चरमधले हे गुण आपण कधी आणि कसे घेणार?