Wednesday, December 30, 2009

२००९ ला निरोप

सध्या ब्लॉग्ज, वृत्तपत्रं, फ़ॉर्वड मेल्स सगळीकडे २००९ ला निरोपाच्या भाषा सुरू आहेत त्यामुळे थोडंसं टॅगच्या पोस्टसारखं ठरवलं आपणही देऊया आपला एक छोटासा निरोप आणि येणार्या वर्षासाठी शुभेच्छा. आपण कितीही घोष केला की हिंदु नववर्ष आता नाही पाडव्याला तरी काय आहे, शेवटी रोज जी तारीख लिहितो तिचं वर्ष बदलायचा दिवस १ जानेवारीलाच येतो. म्हणजे या नववर्षापासून कुणाची सुटका नाही.
तर काय काय घडलं २००९ मध्ये माझ्याकडे? काही नाही एका साध्यासुध्या मराठी घरात घडू शकेल तेच...सगळं घरगुती तरीही खास. सगळ्यात पहिलं मागची थंडी आवरता आवरता हा ब्लॉग चालु केला आणि आठवड्यामाजी काही बाही लिहून चालुही ठेवला. खरं तर विश्वास बसत नाही की चक्क २९ लोकांना या ब्लॉगशी दोस्ती करावीशी वाटली आणि जवळपास दहा हजार भेटी. अधेमधे काही लिहायची प्रेरणा म्हणजे माझे फ़ॉलोअर्स आणि आवर्जुन मिळणार्या प्रतिक्रिया.
त्यानंतर मुख्य म्हणजे मुलाचा पहिला वाढदिवस. कालपरवापर्यंत रांगणार्या आणि महिन्यांमध्ये मोजणी होणार्या बाळाला वाढदिवशी औक्षण करताना आधीचं वर्ष लख्खपणे तरळलं. आईची खूप आठवण झाली त्याच्यासाठी पण आई नाही येऊ शकली तरी भारतातून त्याची आत्या आणि नवर्याची एक मैत्रीण येऊ शकले हा बोनस. आता एका मित्राच्या भाषेत सांगायचं तर terrrible two चालु झालेत.
त्यानंतर बी.एम.एम.ची तयारी. जे काही थोडं-फ़ार करता आलं वॉलेंटियर म्हणून त्यातल्या शेवटच्या टप्प्याचं काम आणि मग मुख्य तीन दिवसांची धमाल. खूप सारे कार्यक्रम, भारतीय जेवण, मैत्रिणींशी गप्पा, थोडंफ़ार गॉसिप आणि बरंच काही पण फ़ुल टू मजा. त्यानंतरही जवळच्या मराठी मंडळात कार्यकारिणीत असल्याने वेगळी धमाल होतीच. सणावारी कार्यक्रम, त्याच्या मिटिंग्ज, थोडंफ़ार वेबचं काम शिकणं असं काही ना काही चालुच होतं.

उन्हाळा म्हटला की काहीतरी हिंडण्या-फ़िरण्याचा कार्यक्रम झालाच पाहिजे तसं ऑगस्टच्या सुरूवातीला लेक जॉर्जला जाऊन आलो. एकदम रिलॅक्सिंग जागा आहे. खरं तर फ़ॉलमध्ये गेलं तर रंगांचा बहर फ़ार छान पाहता येईल. पण उन्हाळ्यात बोटिंग आणि मोठमोठ्या दिवसांची मजा लुटायलाही अगदी योग्य.

त्यानंतर नेहमीचं रूटिन चालु असतानाच एकदम कोस्ट-टु-कोस्ट घरंच बदललं. आई आली आमच्याबरोबर राहायला. आणि नव्या जागी जायच्या आधी घरी आईसोबत मुलाला एकटीने सांभाळायचा वेगळा अनुभव. सॉलिड दमायला व्हायचं आणि कायम डोक्यात काही ना काही काम नाचत असायचं.अगदी गाडीचं सर्विसिंग राहिलंय इथपासुन ते घर दाखवायचं एक ना दोन.. कुणी विश्वास ठेवो न ठेवो पण कुठलंही डाएट न करता त्या तीनेक महिन्यात माझ्या वजनाचा काटा आपसुक खाली आला. असो...
सगळं आवरून कसंबसं कडाक्याची थंडी पडायच्या आत निघालो आणि जवळजवळ दुसर्याच आठवड्यात तिथे जुन्या जागी बर्फ़ पडल्याचं मैत्रीणीने कळवलं. म्हटलं नशीब नाहीतर मुव्हिंगमध्ये हाल झाले असते.
इथे महिनाच होतोय आताशी, नव्या जागी रूळायचं काम पुढच्या वर्षातच होणार आता. पण सध्यातरी सरत्या वर्षाला शांततेत निरोप आणि येणारं वर्ष सर्वांसाठीच आशेचे किरण घेऊन येवो ही अपेक्षा.....

Tuesday, December 29, 2009

तो भुरभुरतोय...

खरं तर थंडीवर आणि त्यातल्या त्यात बर्फ़ावर लिहायचं नाही असं फ़िली सोडताना असं जाम ठरवलं होतं. एकतर ओरेगावात जास्त बर्फ़ नसतो हे आणि दुसरं कारण असं काही नाही पण जितकं थोडा थोडा बर्फ़ पडताना पाहाणं छान वाटतं तितकाच वैताग तो गाडीवरून आणि घराबाहेरून काढताना येतो आणि मुख्य त्यानंतर बरेच दिवस रेंगाळणार्या थंडीचा. त्यामुळे तोंडदेखलं बर्फ़ाचं कौतुक करा आणि मग नंतर कंटाळा आला म्हणा म्हणून टाळलं...
आजही इथल्या हिवाळ्यासारखी डिमेन्टर्सवाली गडद धुक्याची सकाळ सुर्याचा पेट्रोनस चार्म घेऊन नाही येणार हे जरी माहित होतं तरी थोड्या फ़्लरीज सुरू झाल्या आणि पुन्हा तेच "वॉव! स्नो फ़ॉल" असं वाटणं झालंच....मग पुन्हा थोडा वेळ तो थांबला आणि दुपारनंतर तो छान भुरभुरतोय..अशावेळी हातात चहा नाहीतर कॉफ़ीचा कप. आणि भजी बिजी असतील तर काय बहारच...सध्या तरी मागच्या वर्षीचा फ़ुटातला बर्फ़ आठवतेय आणि इथल्या इंचवाल्या बर्फ़ाचा आस्वाद घेताना राहावत नाही म्हणून ताजे घेतलेले फ़ोटो टाकतेय....चला व्हाईट ख्रिसमस नाहीतर नाही पण आत्ता सगळीकडे पांढरी चादर पसरतीय आणि या वर्षी बर्फ़ साफ़ करायची भानगड नाहीये...घर भाड्याचं असल्याने...त्यामुळे मस्त निवांत आनंद घेतोय....

Wednesday, December 23, 2009

ईशान्येकडून वायव्येकडे

माझ्या आईचं एक पेटंट वाक्य म्हणजे जोडीला जोडी बरोबर मिळते; कंजुसला चिकट आणि हुशारला दिड शहाणा..इ.इ....जोक्स अपार्ट..आमच्या दोघांच्या बाबतीतही ते बर्याच अंशी खरं आहे. ते म्हणजे कंजुस आणि हुशार असं काही नाही पण प्रवासाचं, नवनव्या जागा पत्ते काढून फ़िरण्याचं वेड दोघांनाही सारखंच आहे. त्यामुळे सुट्ट्या, डिल्स, विकेंड या सगळ्याचा नेहमीच पुरेपुर लाभ आम्ही उठवला आहे. मागची काही वर्षे फ़िलाडेल्फ़ियाच्या जवळ राहिलो तेव्हा तर फ़िरायची मजाच होती. कारण अमेरिकेतील दोन महत्वाची शहरं एक म्हणजे देशाची राजधानी वॉशिंग्टन डि.सी. आणि आर्थिक राजधानी न्युयॉर्क यांच्या मध्ये हे वसलंय; शिवाय जवळपास ड्राइव्ह नाहीतर विमानाने जाऊन पाहाता येणारी भरपूर ठिकाणं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच.
मागे एकदा कामासाठी मी कॅलिफ़ोर्नियामध्ये होते. तिथलं वेगळं हवामान, निसर्ग पाहुन मी सहज एकदा याला म्हटलं, ’एकदा वेस्ट कोस्टला राहायला पाहिजे रे म्हणजे सगळी छोटी छोटी ठिकाणं पाहता येतील’. माझी वाणी इतक्यात खरी होईल असं वाटलं नव्हतं. पण नेमकी कामाची एक चांगली संधी पाहुन माझ्या बेटर हाफ़ ने आमचा मुक्काम हलवला आणि मागच्याच महिन्यात आम्ही आलो ते ओरेगन राज्यातल्या पोर्टलॅंडजवळ.


म्हणजे ईशान्येकडून वायव्येकडे म्हणजेच नॉर्थ इस्ट मधुन नॉर्थ वेस्टकडे. अमेरिकेचा नकाशा म्हणजे एक आयत आहे असं पकडलं तर त्याच्या उजव्या कोपर्यातल्या साधारण वरच्या भागातुन बरोबर डाव्या बाजुच्या वरच्या भागात कसं जाल तसं...जवळ जवळ आडव्या सरळ रेषेसारखं. नुसतं नकाशात पाहिलं तरी कळतं किती लांबचा पल्ला आहे तो..
खरं बोलताना मी मागे तसं बोलले पण जेव्हा खरंच इतक्या लांब सगळं बांधुन जायची वेळ आली तेव्हा मात्र ते शब्द मागेच घ्यावे असं वाटलं होतं. पण अर्थातच आता ते शक्य नव्हतं. घर सोडून पाहिलं आणि एकदाचे ओरेगावला (असं आम्ही आपलं लाडाने म्हणतो म्हणजे मुंबईची आठवण होते. गोरेगाव सारखं ओरेगाव.."फ़क्त इस्ट की वेस्ट ते सांग"..इति नवरा :)) आलो.
मागचे महिनाभर राहताना पुन्हा एकदा मनातल्या मनात अमेरिकेतल्या विविधतेला सलाम करतेय. अर्थात हा देशच इतका मोठा आहे की एक म्हणजे देशातल्या देशात सगळीकडे किती वाजलेचा वेगळा गजर, भिन्न टाइम झोनमुळे. त्यात निसर्गाने सगळीकडे इतकं भरभरून आणि वेगवेगळं दिलंय त्याने मी तर नेहमीच थक्क होते. नावाला म्हणायचं दुसर्या भागात आलो पण दुसर्या देशात आल्यासारखंच.


नॉर्थईस्टमध्ये मुख्य चार ऋतु वसंत(स्प्रिंग), उन्हाळा(समर), हेमंत (फ़ॉल) आणि अर्थात हिवाळा(विंटर). पानगळतीची मजा घेऊन कडाक्याच्या थंडीतल्या लांबलचक काळोख्या रात्री बर्फ़ाने पांढर्या होताना पाहायची सवय जडलेलो आम्ही आता इथे सरत्या हेमंतात आलो तरी इथे मस्त हिरवं हिरवं आहे. त्याचं मुख्य कारण इथं असणारे देवदारांच्या रांगा. तशी पानगळतीची झाडंही आहेत.


माझ्या खिडकीसमोरच एक होतं त्याची पानं जरा उशीरानेच गळली पण तसा फ़ारसा फ़रक पडत नाही इतक पाइन्सनी त्यांना कव्हर अप केलंय. इथेही म्हणायला चार ऋतु पण मुख्य पावसाळा आणि उन्हाळाच असं इथल्या लोकल्सशी बोलताना जाणवलं. थंडी जास्त नसावी असा विचार करतच होतो तोच एक आठवडा आक्टिर्कवरून थंडीच्या लाटेन जे गारठलो तेव्हा फ़िलीपण फ़िकं वाटलं. पण नशीब एक दहाच दिवस असं होतं पुन्हा आपली गुलाबी थंडी म्हणजे तापमान साधारण ० ते ११ च्या दरम्यान. रात्री जातं शुन्याच्या खाली पण तोस्तर आम्ही घरच्या हिटरमध्ये गरमीत असतो. त्यामुळे चालतं..



जसं मी वेस्टात जाऊया म्हटलं तसंच नॉर्थइस्टला असतानाची नेहमीची रड म्हणजे इथे मान्सुन नाही रेची. म्हणजे पाऊस होता पण कधीही येणारा आणि एखादा दिवस फ़ारफ़ार तर तीन-चार दिवस सरळ असा..आपला भारतासारखा नाही. पण होल्ड ऑन..बहुतेक माझी जीभ काळी आहे...(बहुतेक नाही आहेच..इति अर्थातच...अर्धांग...) ती पावसाची कमी आता बहुतेक (पुन्हा बहुतेक नाही शंभर टक्केच) भरुन निघणार असं दिसतंय..गेले दहा दिवस रोज सतत आणि संततची पर्जन्यधार. सुर्यमहाराजही दिसत नाही आहेत...
इथे येतानाच्या काहीच दिवस आधीचा एक विचित्र योगायोग म्हणजे आधीच्या लायब्ररीच्या बुकसेलमध्ये चक्क हरि कुंभार (म्हणजे माझा लाडका हॅरी पॉटर हो) दिसला..मग काय उचललंन त्याला लगेच दोन डॉलरमध्ये...आणि नेमकं ते तिसरं अजकाबानच्या कैद्यावालं का निघावं...त्यातले डिमेन्टर्स आहेत ना तसं सकाळी धुकं आणि मळभ दाटुन येतं आणि दिवसभर थेंब थेंब आभाळ गळून सगळा आनंद एक्सॅक्टली डिमेन्टर्ससारखाच घेऊन जातात..म्हणजे पाऊस आणि पावसाळा मला खूप खूप आवडायचा असं भूतकाळात म्हणावं लागणार इतका पाऊस. पण जाऊदे काळ्या जीभेने जास्त न बोललेलं बरं असं तुर्तास ठरवलंय...

पण तरी पेला बराच अर्धा भरलाय बरं का? बर्फ़ नॉर्मली नसतो पण झाला की सॉलिड ही अर्थातच आमच्या साशाची टीप...तर असो. आल्या आल्या एकदा पॅसिफ़िकच्या एका बीचवर जाऊन आलो. टच ऍन्ड गो सारखंच गेलो..कारण बरंच थंड होतं....मला तर बीच खूप आवडला. नॉर्थईस्टमधल्या अटलांटिकच्या किनार्यापेक्षा खूप वेगळा जास्त उसळणारा सागर वाटतोय. तसंही आम्ही पॅसिफ़िक हवाईच्या किनार्यांवर पाहिला होता तेव्हापासून मी त्याच्या प्रेमात आहेच..(मरो ती काळी जीभ...विसरूया आता तिला...:))
आताही सगळं नॉर्थइस्ट स्नो स्टॉर्ममध्ये बुडलंय तर त्यांच्या दु:खात सामील व्हायला म्हणून खास इथल्या डोंगरांमध्ये जाऊन आलो. मस्त बर्फ़ही होता आणि शब्दात मांडू शकणार नाही असं निसर्गसौंदर्य...फ़ोटोच टाकते..काय म्हणायचं ते कळेल.


खरं सांगायचं तर एक महिना आणि त्यातही थंडी (ती अमेरिकेत कुठेही जा त्रास देतेच...तिला आवडतं) हे कॉंबिनेशन असं आहे की इतक्यात काही भाष्य करणं कठीण आहे.फ़क्त बरीच वर्ष एकाच ठिकाणी राहिल्यामुळे त्या जागेबद्द्लची जी सहजता येते ती इतक्यात येणार नाही पण इथेही आमच्यासाठी काही खास असेल.



नवी ठिकाणं, परिचय आणि बरंच काही येत्या काही महिन्यात ब्लॉगवर नक्की लिहायचा प्रयत्न करेन. तुर्तास माझ्या मागच्या घरासंबंधी पोस्टना ज्या सर्वांनी प्रतिक्रिया देऊन माझा धीर वाढवला त्या सर्वांचे आभार नाही पण ही पण पोस्ट खास त्यांना इथली खुशाली कळावी म्हणून.. लोभ आहेच तो असाच वाढुदे...आपण अप्रत्यक्षरित्या "माझिया मनास" नेहमीच दिलासा देता ही या सरत्या वर्षातलीच जमेची बाजु...असो..जास्त सेंटि होईन मी....तर कळावे....इतक्यातच आम्ही ईशान्येकडून वायव्येकडे सुखरूप एक अख्खा महिना काढलाय...

Tuesday, December 22, 2009

धागा वाढता वाढता वाढतोय.....

टॅगला धागा म्हटलं तर चालेल ना? महेन्द्रकाकांनी टॅगलंय म्हणून पहिले जाऊन त्यांची उत्तरं पाहिली आणि मग गौरी आणि मग जी...बापरे इनफ़ायनाईट लुपसारखी भटकणार की काय...इंजिगियरींगची सवय सगळ्यांच्या असाइनमेन्स्टस पाहुन मग त्यातल्या निवडक उत्तरांमधुन आपलं युनिक उत्तर बनवायचं...चला त्यानिमित्ताने गौरी आणि जी यांचीही उत्तरं पाहुन ठेवलीयत...
आता प्रयत्न करतेय माझी युनिक उत्तर लिहायचा. सुचलं तसंच लिहिणार तसंही ब्लॉगवर काय लिहायच पेक्षा कसं कारण दोन मिन्ट लॅपटॉपवर बसलं तर लेकरू लगेच बाजुच्या खुर्चीवर जमेल तसं चढुन पुढचा पाय टेबलवर मग काय उठा असं चाललंय...त्यामुळे एका शब्दात लिहिलं तर होईल तरी. पण मी शक्यतो वाक्य नाही लिहिणार....कृपया स्वल्पविराम आणि टिंबांमुळे वाढलेल्या उत्तरांना फ़क्त शब्दमर्यादा वाढवली असं म्हणुया फ़ार तर पण आपण महेन्द्रकाकांसारखं नाही हं....मुळीच नाही....वाक्य बिक्य....अह्म्म्म्म....
हे सगळे प्रश्न पाहताना उगाच लोकप्रभेसारख्या मासिकात सु(?)प्रसिद्ध व्यक्ती आपल्या आवडी-निवडी लिहितात ना तसं वाटतंय...हे हे...काय हरकत आहे एक दिवसाची सु(?)प्रसिद्धी....चलो...नमनालाच तेल ओत ओत ओततेय....

1.Where is your cell phone?
किचनच्या काउंटरवर...वाट पाहातोय नवरा दिवसात एकदा तरी फ़ोन करेल याची...................

2.Your hair?
आहेत अजुन तरी...काही डोक्यावर काही बाळाच्या मुठीत....पण आहेत...शिल्लक..

3.Your mother?
माझी सखी

4.Your father?
फ़िरणं, गप्पा, तळण खाणं.....

5.Your favorite food?
सध्या तरी आयतं पानात आलेलं काहीही....आणि नंतर भांडी आवरणारं पण कुणी देईल ते....उदा. भाग्यश्रीताईंची पाणीपुरी, इ.इ.....

6.Your dream last night?
रोजचं एकच स्वप्न...आरूष झोपेतुन उठून रडतोय आणि मी नवर्याला त्याला घ्यायला सांगते आणि मी अर्थातच शांत झोप घ्यायचा प्रयत्न....

7.Your favorite drink?
शहाळ्याचे पाणी

8.Your dream/goal?
फ़क्त स्वतःसाठी काम करणं....या कंपनीसाठी त्या कंपनीसाठी बास.......कंटाळा आलाय...

9.What room are you in?
डायनिंग एरिया...त्यातल्या त्यात सेफ़ जागा वाटतेय लॅपटॉपसाठी....

10.Your hobby?
निसर्गभ्रमंती...सध्या जवळजवळ थांबलीय...

Reading
आवडते ब्लॉग्ज, हरी कुंभाराचं अझकाबानचे कैदी कितव्यांदातरी.....

11.Your fear?
सगळे पाळीव (?) आणि मोकाट कुत्रे/मांजरी

12.Where do you want to be in 6 years?
माझी मुंबई...

13.Where were you last night?
वाटलं तरी कुठे जाऊ शकतो का सद्यपरिस्थितीत..नाहीतर गेलो होतो कधीतरी पब लाइफ़ पाहायला म्हणून...जो काही सांस्कृतिक धक्का बसलाय की त्यानंतर रोज फ़क्त रात्रीचे मूलंच....

14.Something that you aren’t?
तोंडावर गोडबोलायचं आणि मागून मार-मार मारायची....

15.Muffins?
बनाना वॉलनट फ़क्त नवरा आणतो म्हणून आणि मग फ़क्त त्याच्याबरोबर चाखायचं म्हणून....

16.Wish list item?
खरंच मोठी आहे.....आणि थोडी कंटाळवाणी....

17.Where did you grow up?
वसई, जि. ठाणे..म्हणजे टेक्निकली मुंबई...

18.Last thing you did?
पोराचा डायपर बदलला...(हात धुतलेत अर्थातच....)

19.What are you wearing?
हिरवा आणि राखाडी...थोडक्यात जे मिळालं ते....

20.Your TV?
पॅनासोनिक त्याच्यावर झी सारेगमप चाललंय आणि नको तिथे वरचे नी पाहायचं कर्मात.....पार्शालिटी नेहमीप्रमाणे...जाऊदे...भरकटतेय....

21.Your pets?
सध्यातरी मुलगाच आणि नेहमीचाच तोच...

22.Friends?
वृक्ष आणि काही काही वल्ली....

23.Your life?
चाललंय नेहमीचंच....

24.Your mood?
सेलेब्रेटी...

25.Missing someone?
हो....कामवाली..............:(

26.Vehicle?
सगळ्या देशी लोकांची इथे असते तिच....कुमारी टोयोटा ...(टोयोटा कॅमरी यार...)

27.Something you’re not wearing?
कानातले...सगळ्यात पैलं लेकाच्य हातात लागतात ना आजकाल....

28.Your favorite store?
ट्रेडर जोज, खादी ग्रामोद्योग...ही खरेदीसाठी आणि नुस्तं पाहायला मुंबैतलं मेसिज उर्फ़ शॉपर्स स्टॉप
Crosswords/Landmark
पाइन्स

Your favorite color?
पांढरा आणि गोड गुलाबी....(टॉम बॉय कॅटेगरीपण शेवटी मुलगीच असतात असं अचानक लक्षात आलं)

29.When was the last time you laughed?
सक्काळीच बापाच्या मागे पोरगा त्याचा बाथटब घेऊन गेला ते ध्यान पाहुन....हे हे....

30.Last time you cried?
घर सोडताना मागच्या महिन्यात

31.Your best friend?
जगभर कामासाठी फ़िरतोय...

32.One place that you go to over and over?
diaper changing station....

33.One person who emails me regularly?
सध्यातरी ब्लॉगस्पॉटवाले...प्रत्येक कॉमेन्टसाठी इमाने इतबारे मेल करतात बिचारे...बाकीच्यांनी इमान कधीच सोडलंय...

34.Favorite place to eat?
गजाली, पी एफ़ चॅंग, तंदुरी मिळेल ती सगळी आणि दादरमधली अगणीत.............

तन्वीला सगळ्यांनीच टॅगलंय म्हणजे आतापर्यंत ती खरडत असेल...म्हणून मी पेठेकाका,हेरंब,रोहन, अजय, भाग्यश्रीताई, अश्विनी(तिचा ब्लॉग आय डी पण माहित नाही पण लेट्स सी ती प्रतिक्रियेमध्ये लिहीणार का काही....अश्विनी............ये ना..........) यांना टॅगतेय.....

Thursday, December 17, 2009

वैरीण झाली.........पोळी.......

सध्याच्या सारेगमपच्या एका भागात सलीलने त्याची एका गाण्याची प्रतिक्रिया देताना सहज म्हटलं की नव्याने स्वयंपाक शिकलेल्यांच्या पोळ्या लगेच ओळखता येतात. तसं माझी आणि माझ्या नवर्‍याची नजरानजर झाली आणि काय बोलणार एका दुखर्‍या नसेवर बोट ठेवलं गेलं. म्हणजे तसं ते रोजच ठेवलं जातं, कारण पोळीशिवाय पान हलत नाही (म्हणण्यापेक्षा पान वाढल जात नाही) आणि पोळी तर करता येत नाही. मग नाचता येईना अंगण वाकडं तस वातड पोळीसाठी इथलं विकतचं पीठ म्हणजे मैदा, नाहीतर कॉइलवाला गॅस असली कायबाय निमित्त करुन आपलं मनाचं समाधान करून घ्यायचं आणि काय...
माझ्या पिढीतल्या बाकी सगळ्याच मुलींसारखं मलाही घरातल्या स्वयंपाकघरात कधी काम करावं लागलं नाही. किंवा जास्त स्पष्ट सांगायचं तर आपल्या मुलांनी चांगलं शिकुन मोठ्ठं व्हावं म्हणून माझ्या आईने कधीच आम्हा कुणालाच अभ्यासातून बाहेर काढुन हे करा ते करा केलं नाही. जो काही वेळ असे तेव्हा तिला सटरफ़टर मदत नक्कीच केली पण स्वयंपाक अहं...कधीच नाही. त्यामुळे लग्न झाल्यावर थेट अमेरिकेत आल्यावर सर्वात जास्त आठवण झाली ती रोज मिळणार्‍या आईच्या हातच्या स्वयंपाकाची. ती तशी अजुनही येते पण तो पहिला महिना किंवा सुरुवातीचे बरेच महिने खाण्याच्या बाबतीत एकदम बेकार होते.
पहिल्यांदा नवर्‍याबरोबर जाऊन भाज्या-बिज्या घेऊन आलो. काही मसाले इतर सामान भारतातून आणलेल्या बॅगमध्येही होतं. पण कसं करायचं?? मुख्य प्रश्न. भाज्या तरी तशा सोप्प्या आणि कुकरचाही आधार होता. पण चपातीचं काय? आणि नवर्‍याला तर काय कधीही विचारलं काय करायचं जेवायला तर उत्तर चपाती-भाजी असंच असे. माझ्या आईकडे तसं भात खाणारेच जास्त म्हणायचे कारण आम्ही टेक्निकली कोकणातले. पण सासरकडचं गाव नाशकाकडे म्हणजे त्यांना जास्त सवय पोळीची. त्यामुळे जरी भाज्या साधारण फ़ोडणीचा मंत्र मारून आणि जमेल ते मसाले घालुन केल्या तरी पोळ्यांचं काय. हा काय नुसता वरण-भात-भाजी खायचा नाही शिवाय डब्यात रोजची सवय असल्याने मलाही पोळ्या आवडतात. पण स्वतः करायच्या म्हणजे गाडं कायमचंच अडलेलं.

मला पीठ मळण्यापासुनच जो कंटाळा आला असे तो गॅसवर तवा ठेऊन त्या नवर्‍याच्या भाषेत हॉस्टेलच्या चपात्या होईस्तोवर म्हणजे पोळ्यांचा कंटाळाच..त्यातुन या पदार्थाचं एक त्रांगडं म्हणजे बाकी जवळजवळ सर्व पदार्थ रेसिपी वाचुन करता येतात आणि बिघडले तर थोडेफ़ार सुधरताही येतात पण पोळीची रेसिपी वाचुन मऊसूत पोळी करणार्या व्यक्तीचा मी जाहिर सत्कार करायला तयार आहे.फ़ोनवर आईला विचारुन पोळी करायची कशी??
मग इथे ज्या सुग्रास जेवण करणार्‍या मैत्रीणी भेटल्या त्या सगळ्यांकडून पोळ्या कशा करायच्या हे शिकायचाही प्रयत्न केला.कुठेही जेवायला बोलावलं की साधारण भाज्या, गोड पदार्थ इत्यादींच कौतुक पहिल्यांदी होतं. पण आम्ही दोघं कुठे गेलो की मऊसुत पोळीचा लचका तोडता-तोडता लगेच आणि जवळ जवळ एकत्रच पोळीला दाद देत असु तेव्हा त्या घरच्यांचा चेहर्‍यावरचा भाव खरंच पाहण्यासारखा असे.

अर्थात आमच्याकडे येऊन जर चुकून घरची पोळी ताटात आली तर त्यांना लगेच कळेल ते दाद का मिळतेय..पण तशी मी हुशार आहे.एकतर कुणाला बोलावल्यावर शक्यतो पोळीला जमेल तेवढं टाळता येईल असंच काहीतरी मेन्युवर ठेवायचं नाहीतर सरळ भारतीय दुकानात विकत मिळणारी पोळी मायक्रोवेव्ह करून पानात आणि हेही नसेल तर मग पोळीचा सख्खाच भाऊ पराठा भरपुर बटर लावुन दिला की कोण पोळीची आठवण काढील?
मला तर वाटतं ही बया माझ्यासारख्या काहींना कधीच प्रसन्न होत नसावी. सुरुवातीला इथं मिळणारं गोल्डन टेम्पल जरा मैद्यासारखं वाटलं म्हणून इतर पीठं वापरून पाहिली तर त्यांनीही मला कधी साथ दिली नाही. म्हणजे आमच्या इतर मित्रमैत्रीणींच्या घरी जाऊन "अरे वा, चांगल्या होतात वाटतं पोळ्या. कुठलं पीठ वापरतेस?" म्हणून ते वापरावं तरी ते माझ्याकडे आल्यावर येरे माझ्या मागल्या. मग कुणी म्हणे अगं पीठ कोमट पाण्याने मळ, नाहीतर मळताना त्यात दूध घाल.एक ना दोन कितीतरी सल्ले पण माझ्या स्वयंपाकघरात मंत्र मारल्यासारखी पोळी वातड ती वातडच..

त्यानंतर आमच्याकडे माझे सासु-सासरे आले दोन-तीन महिन्यांसाठी. माझी पोळीबद्दलची रड त्यांच्या कानावर गेली असावी. सासुबाई माझ्यासाठी खास गिरणीत दळलेलं पीठ घेऊन आल्या.मुख्य त्यांनी माझ्या घरी पहिल्यांदाच इलेक्ट्रिकचा गॅस पाहिला त्यामुळे त्यांची माझ्याबद्दलची (की माझ्या नेहमी बिघडणार्‍या पोळ्यांबद्दलची) कणव वाढली. मग त्या स्वतःच मुक्काम संपेपर्यंत पोळ्या करायच्या आणि तेही मी आणलेल्या इथल्या पिठाच्या. मी परत गेले की तू मी आणलेलं पीठ वापर, मग चांगल्या होतील असा दिलासा पण दिला. पण अगदी माझ्या आईसारखंच मला पोळ्या करायला मात्र त्या शिकवु शकल्या नाहीत. किंवा कदाचित त्यांनी माझी एकंदरित प्रगती पाहुन तो विचारच सोडला असावा.

त्यानंतर मग आम्ही घर घेतलं आणि इलेक्ट्रिकच्या गॅसची कटकट संपली. आता तरी पोळी प्रसन्न होईल अशा विचारात मी होते. पण थोडा वातडपणा कमी झाला इतकंच आणि फ़ुलके थोडे बरे व्हायला लागले.म्हणजे नवर्‍याच्या भाषेत होस्टेल बदललं..मी म्हटलं त्याला अरे पोळी करणं किती चॅलेंजिंग आहे माहित आहे का तुला?? तर यावर साहेबांचं उत्तर म्हणजे, त्या खाणं किती चॅलेजिंग आहे माहित आहे का तुला?? काय बोलणार मी स्वतःच माझ्या चपात्यांना चॅलेंजिग चपाती म्हणते..फ़क्त याची व्याख्या आमच्या दोघांच्या दृष्टीने वेगळी आहे इतकंच. आणि आता तर काय पुन्यांदा कॉइलवाला गॅस इकडच्या घरात त्यामुळे परत एकदा बोंबाबोंब. वैरीण आहे माझी ही पोळी दुसरं काय?

ता.क.फ़ोटोअर्थातच मायाजालावरुन साभार हे काय सांगणं??




Tuesday, December 15, 2009

फ़ुलोरा... असा होता गाव

सामान लावताना पुस्तकांच्या खोक्यात "फ़ुलोरा" दिसलं आणि लक्षात आलं अरे, आई आल्यापासुन आपण गाणी शोधत नाही आहोत. मागे मारे ठरवलं होतं की आपणही इथे एक गीतपुष्पांचा फ़ुलोरा मांडुया आणि एक आज्जी क्या आ गयी और गाने-वाने की छुट्टी...आता आज्जी आहे म्हटलं की बाळ झोपण्यासाठी पहिलं प्राधान्य तिलाच आणि तिची गाणी इतकी वेगवेगळी असतात की मग पुस्तकांची गरज लागत नाही. पण आता जास्तीत जास्त महिना आणि मग जाईल ना आज्जी. नंतर हे प्रकरण माझ्याचकडे येणार तेव्हा आताच तयारी केलेली बरी म्हणून मग उघडलं एकदाचं आणि ही एक मस्त कविता हाती लागली. खास छोट्या कंपनीसाठी. लिहिली आहे, पद्मिनी बिनीवाले यांनी.
"असा होता गाव"

एक होता हलवाई
त्याचे नाव दलवाई
बसल्या बसल्या दुकानात
खात राही मिठाई...

एक होता धोबी
रोज नवी खुबी
शर्ट नवा पॅंट नवी
घालून स्वारी उभी...

एक होता शिंपी
कापड घेई फ़ार
दिवाळीचे कपडे
शिमग्याला तयार...

एक होता गवळी
पाणी घाली दुधात
म्हैस फ़ार पाणी पिते
अशा मारी बात...

असे होते लोक आणि
असे होते गाव
राजा होता असातसा
माहित नाही नाव...

Sunday, December 13, 2009

सखी शेजारीण

नवीन जागा ती पण परदेशात असली की शेजारी नसणार हे जवळजवळ गृहित धरलं होतं. कसंबसं एका जागी बस्तान बसवुन चार-दोन डोकी ओळखीची झाली होती तोवर घरंच बदललं...त्यामुळे नव्या जागी आल्याच्या दुसर्याच संध्याकाळी दारावर टकटक ऐकुन मी नवर्याला म्हटलं, "अरे, जरा हळू धाव आरूषबरोबर.बघ, खालच्या माळ्यावर राहणारे वरती आले वाटतं." नवर्याने दार उघडलं. मी किचनमध्ये फ़ोडणी देता देता मनाची तयारी करत होते; मुलाच्या दाणदाण धावण्याची काय काय कारणं द्यायची, माफ़ीनामा इ.इ. पण हे काय? दारातला आवाज चक्क "हाय मी साशा. तुमच्या खालच्या माळ्यावरच राहाते. काल मी पाहिलं तुम्हाला ये-जा करताना आणि मी आज पम्पकिन मफ़िन्स बनवले तेव्हा म्हटलं ओळखही होईल आणि काही हवं नको विचारताही येईल."(अर्थात इंग्रजीत) मी अक्षरश: तीन-ताड उडाले. आतापर्यंत अमेरिकन शेजार्यांनी माझ्या कुठच्याही अपार्टमेन्टमध्ये येऊन ओळख-बिळख केलेली कधी आठवत नाही. फ़क्त जेव्हा आम्ही घर घेतलं तेव्हाच काय त्या अशा शेजार्यांशी ओळखी. मग आता इतकं प्रेमाने आलेल्या व्यक्तीला भेटलं तर पाहिजे म्हणून मीही लगेच गॅस आईकडे सोपवुन तिला नमस्कार करायला दारात आले.


तर ही आमची इथली पहिली सखी शेजारीण "साशा".आणि आम्ही आल्या आल्या झालेली आमची पहिलीवहिली तिनेच खास प्रयत्न करून घेतलेली भेट. ती गेली तीन वर्ष या भागात राहाते. गेले तीन महिन्यांपासुन नोकरी गेल्याने तिच्या रुमपार्टनरबरोबर इंशुरन्सचा अभ्यास करुन नवी नोकरी/व्यवसायाच्या मागे असलेली. "जिम आणि मी फ़क्त एकत्र राहातो. No romantic relations" असं खास आवर्जुन स्वतःच सांगितलं. मग आपलं नेहमीचं संभाषण कुठून आलो, काय करतोय इ.इ. माझ्या याआधी झालेल्या ओळखी झालेल्या काही इतर अमेरिकन्स प्रमाणे आमची सर्वांची, अगदी आता काही आठवडेच इथे असणार्या माझ्या आईचंसुद्धा नाव लिहुन घेतली.
तशी थोडी थंडी इथंही आहे, त्यामुळे आम्हाला ब्लॅंकेट्स, कर्म्फ़रटर्स हवी आहेत का? मुलासाठी काही माहिती हवी आहे का? स्वयंपाकघरात काही भांडी-कुंडी लागणारेत का? एक-ना दोन हजारो मदतीचे हात एकदमच पुढे करणारी. आपल्या इथे साधना कट म्हणतात ना तसे केस पण थोडे तिरके वळवलेले, साधारण पाच फ़ुट चार इंचापर्यंत उंची, गोरी गोरी पान, निसर्गंत: लालसर गाल, तिच्या घरात असणार्या मांजरासारखेच घारे डोळे आणि अतिशय प्रेमळ मुलायम आवाज अशी "साशा". तिने आणलेले मफ़िन्स खरंच छान होते अगदी तिच्या आवाजासारखे मुलायम. अरे हो आणि त्याच्यावर तिने तिची रेसिपीसुद्धा प्लॅस्टिकच्या पिशवीत लिहुन ठेवली होती. किती अभिनव असतात ना काही माणसं? भारतीय माणसांबद्द्ल तिला थोडं आकर्षण असणार असं एकंदरित बोलण्यातुन वाटत होतं.मी म्हटलं तिला नंतर सगळं सामान आलं की एकदा चहाला ये. तिचा मदतीचा आग्रह जरा जास्तच होता म्हणून मी फ़क्त तिला विचारलं इथुन लायब्ररीत जायलासुद्धा बस आहे का?
त्यानंतर आमच्याशी थोडावेळ इतरही काही विषयांवर ती बोलली. तिला म्हटलं मी की आई आता काही आठवडेच राहिल तर अगदी आवर्जुन म्हणाली की मग तुम्ही तिला पॅसिफ़िक दाखवायला नक्की घेऊन जा आणि तिथे खूप वारं असतं म्हणून आईच्या कानात घालायला कापुस न्यायला विसरू नका. आणखी काही इथल्या हवामान विषयक टिपा देऊन आणि थोड्या जुजबी गप्पा संपवुन ती गेली. माझ्या आईला फ़ारच बरं वाटलं की मला एकतरी संपर्क करू शकणारी शेजारीण आहे. माझ्या आधीच्या घरून निघताना तिला नव्या जागेबद्द्ल सगळ्यात जास्त काळजी हीच होती बहुतेक.
थोड्याच वेळात दारावर पुन्हा टकटक. अतितत्परतेने लगेच मला हवी ती बसची माहिती काढुन आणली पण तिने. आता मला जरा काळजीच वाटायला लागली कारण माहित नाही हा मदतीचा अतिरेक न ठरो असंही वाटून गेलं. शिवाय एक-दोन भेटीतच जास्त सलगीत आलेल्या माणसांबद्द्ल मला सगळ्यात प्रथम तर भितीच वाटते. न जाणो आपल्याला ही आपुलकी जबरदस्ती न होवो.
आधीच सामान अजून आलं नाही अशा अपुरया स्वयंपाकघरात रविवारी झटपट कांदेपोहे केले तेव्हा उगाच साशाची आठवण झाली.तसंही तिच्या त्या पम्पकिन मफ़िनच्या रिकाम्या डिशमध्ये काय द्यावं हा प्रश्न होताच.आणि त्यातुन आदल्या रात्री आणलेला उरलेला पिझ्झा गरम करायला ओव्हनचा ट्रेपण नव्हता. चला नाहीतरी ती इतकं म्हणून गेलीय तर घेऊया तिची मदत अशा दुहेरी तिहेरी हेतुने गेले कांदेपोहे आणि बाजुला थोडं फ़रसाण घालुन. दाराबाहेर मला पाहुन लगेच माझा हात प्रेमाने दाबुन ती मला घरात घेऊन गेली आणि तिचा दिवाणखाना आतुन पाहिल्यावर मी थक्कच झाले. घरी टि.व्ही. नाही हे तिनं तसंही पहिल्या भेटीत सांगितलंच होतं.( माझ्या नवरयाला त्यामुळे पडलेला प्रश्न म्हणजे आता हिच्या घरचं फ़र्निचर कुठच्या दिशेकडे पाहिल...असो) तर अगदी आटोपशीर पण छान इंटेरिअर केलं होतं.
फ़ायरप्लेसच्या वरच्या भागात बरोबर तिथं असणार्या भागाच्या आकाराची मोठी फ़्रेम आणि समोर एकच तीन माणसं बसु शकतील असा सोफ़ा. मधल्या उरल्या जागेत मोठा रग. मोठ्ठा शब्द्पण कमी पडेल असा. जरा आडवा वाटेल असा. मला तो भारतीय वाटला पण लगेच मी काही विचारलं नाही. आणि सगळ्यात वेगळं म्हणजे आडव्या समोरासमोरच्या भितींना टेकवुन ठेवलेल्या चक्क "कायाक" म्हणजे त्या एक किंवा दोन माणसंच पाय लांब करून बसू शकतील अशा होड्या. लांबच्या लांब दिवाणखान्याला शोभतील अशा. एकावर एक तीन एका बाजुला आणि दुसरया बाजुला दोन. मी काही विचारायच्या आतच ती म्हणाली "आवडल्या ना? मीच बनवल्यात." बापरे. आता तोंडात बोट घालण्याचीच पाळी होती. मग बेडरूममध्ये त्यांची सुबक वल्ही बनवली होती तीही दाखवली. लगेच आणखी एका बोटीचा फ़ोटोही दाखवला; आपण स्पीडबोट म्हणतो ना तशी. ही तिला आता विकायची आहे कारण ठेवणं परवडत नाही.
मग बोलता बोलता तिनेच सांगितलं की अशीच एकदा समुद्रावर असताना कायाक सरळ करताना की काय तिच्या पाठीचा कणा, गळा असं सर्व ताणलं गेलं आणि त्यामुळे तिची मोठी गळ्याची सर्जरी झाली. त्याचा मोठा व्रण पाहून मला जरा गलबलंच. आणि या सगळ्यात वाईट म्हणजे हे सर्व तिचा नवरा सहन करू शकला नाही; म्हणून त्यांचा घटस्फ़ोट झाला. जेव्हा आधाराची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तो गेला. त्याला घरातलं सगळं फ़र्निचर हवं होतं आणि तिला तसंही कमी सामान चाललं असतं म्हणून मग तेव्हापासून ती एकटी आहे.आणि कधीतरी हा जिम तिच्या अपार्टमेन्टमध्ये रूममेट म्हणून आला असावा. त्याच्याशीही तिने माझी ओळख करून दिली. थोडासा पायाचा प्रॉब्लेम असल्याने लंगडणारा असला तरी तो खूप मदतशील आहे अशी तिची टिपणी होती.
मला फ़क्त तिला पोहे देऊन, माझ्यासाठी ट्रे घेऊन यायचं होतं आणि तरी बराच वेळ गेला. वरती मुलाची आन्हिकं आटपायची होती. तिचा निरोप घेईस्तोवर बरंच काही तिला बोलायचं होतं असं वाटत होतं. मला तिने तिची सर्व पुस्तक, ती योगाभ्यास करते हे दाखवलं आणि मुख्य म्हणजे तिचं जे मांजर आहे, खरं म्हणजे बोका, तो खरं तर तिच्या सर्जरी नंतर तिला सोबती म्हणून कसा आला आहे अशा बर्याच गोष्टी सांगितल्या. तिला मध्येच आजारपण वर आलं की दिसेनासं होतं आणि ते या बोक्याला कळतं मग तो तिला नमस्काराची पोझ घेऊन आणि हातावर हात ठेवुन आधार देतो. एकीकडे मला तिच्याबद्द्ल नक्कीच काहीतरी वाटत होतं पण तरी या लोकांची आयुष्य वेगळी आणि अति गुंतागुंतीची असतात हे पुन्हा एकदा कळत होतं.
मग मागच्याच रविवारी आमचं सामान आलं आणि मुव्हर्स ते वरती आणू लागले तशी पुन्हा एकदा दारावर टकटक. अरे साशा?? हे काम चालु आहे तर मी तुमच्या बाळाला माझ्या घरात घेऊन जाऊ का म्हणजे तो मध्येमध्ये न आल्यामुळे तुमचं पटापट होईल. मी आईला आणि आरूषला त्यांच्याकडे थोडावेळासाठी पाठवलं. मला खरंच आश्चर्य वाटलं की फ़ारशी ओळख नसलेल्या आमचा इतका विचार करणारंही कुणीतरी आहे.
आतापर्यंतची सगळी घरं आणि तिथली वास्तव्यं वेगवेगळ्या कारणांसाठी लक्षात राहिलीत पण इथल्या वास्तव्यात सगळ्यात जास्त लक्षात राहिल ती आमची सखी शेजारीण आणि तिनं दाखवलेली आपुलकी यासाठी असं सध्यातरी वाटतंय...

Friday, December 4, 2009

"चीची" ची गोष्ट

लहान मूल बोलायला लागलं की आई-बाबांना जो काही आनंद होतो तो झाला आहे जुलै मध्येच. त्याबद्द्ल छोटी पोस्ट पण झालीय. तर गोष्ट "दुदु" वरून सुरू झाली आणि आता त्यावर इतके महिने झाले तरी प्रकरण तिथेच घुटमळतेय म्हणून पुन्हा एकदा पोस्टतेय...


हे चीची प्रकरण कधी सुरू झालं नक्की आठवत नाही पण बहुधा जुलैच्या शेवटी शेवटी आई आली तेव्हा ती माझ्या मुलाला, आरूषला मागच्या सनरूममध्ये बसवून पक्षी दाखवायची आणि पहिल्यांदी "ची" त्याच्या छोट्याशा शब्दभांडारात आली असावी. चिऊ कसं स्पष्ट बोलणार ना माझं छोटसं लाडकं पिल्लु ते....मग तोही आजीबरोबर ची ची असं नुसतं म्हणून आम्हाला चिऊ दाखवायला लागला. आणि त्याचवेळी खिचडी एके खिचडी खाऊन तिलाही " चीsची" म्हणून सांगु लागला. इथे हा s आहे ना तो जास्त महत्त्वाचा आहे कारण आता तो दुदु हे विसरून त्यालाही "चीचीs" असंच म्हणतोय.. तर हा s आहे ना, तो या दोन मोठ्या आणि महत्वाच्या शब्दांना वेगळं करतो. महत्वाच्या कारण आई-बाबाकडे मागायचे दोन मुख्य खाऊ आहेत ते..एक भूक जास्त असेल तेव्हा खिचडी आणि दुसरं लहान बालकांच पुर्णान्न दूध. सध्या तरी तो जेव्हा "चीची" करतो तेव्हा नक्की काय हे बहुतेकवेळा फ़क्त मलाच कळतं. ची नंतर थोडा पॉज असेल तर खिचडी आणि दोन्ही ची घाईत असतील तर दूध असं माझं समीकरण आहे पण सुरूवातीच दूध नाहीतर दुदु हे गेलं कुठे हा प्रश्न आहेच..

खरं तर आता त्यांचं शब्दभांडार वाढेल असं साधारण पुस्तक-इंटरनेटवर लिहिलंय पण आमचे साहेब आपले जे दिसतं त्याला "चीची" शब्द वेगवेगळ्या रागातच गाऊन सांगतोय..मोठेपणी कॉपी करणारा संगितकार वगैरे होणार की काय माहित नाही.

शेवटी काल रात्री अवेळी उठल्यामुळे झालेल्या झोपमोडीच्या वैतागाने बहुतेक एक संपुर्ण चीचीचीच...(बापरे काय शब्द आहे हा) गोष्ट त्याला सांगितली.आई त्याला त्याच्या एका पुस्तकात काऊचं दूध (जरा आधुनिक आजी झालीय ती आजकाल त्यामुळे तिने स्वतःच काऊ म्हटलंय...माझ्यावर दोष देऊ नका) असं नेहमी सांगुन त्याने दूध प्यावं असं म्हणत असते या बेसिकवर आधारलेली आहे...नीट ऐका..कदाचित तुमच्या घरातल्या एखाद्या लहानग्यासाठी इमर्जन्सिला उपयोगी येईल.

तर एकदा एक काऊकडे एक ची येते आणि तिला म्हणते," काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली दाणे खा".
मग तिच्याकडे एक भू-भू येतो. तो म्हणतो, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला रे कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपला खाऊ खा".
नंतर तिच्याकडे एक स्कुल-बस येते. ती म्हणते," काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली पेट्रोल खा".
मग तिच्याकडे एक खारु ताई येते. ती म्हणते, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला गं कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपली त्या झाडावरची फ़ळं खा".
नंतर तिच्याकडे एक ससुल्या येतो. तो म्हणतो, "काऊ, काऊ, मला चीची दे". काऊ म्हणते "तुला रे कशाला चीची? मी चीची देणार आहे आरूषला. तू आपला लॉनवरचं गवत खा".

असं मग, नंतर, मग, नंतर करत ...आता काय अधीक सांगणे न लगे...आपल्याला हवं तेव्हा गाडी आपल्या पिलाकडे गाडी वळवुन ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी संपुर्ण करणे. मी जी उदाहरणं दिलीत ती त्याला रोज दिसणारी, आवडणारी आहेत.. माऊला मात्र या गोष्टीत आणायचं जरा टाळलंय कारण तिला चीची दिली तर चालेल असं रात्री तरी वाटत होतं पण म्हणजे झोप पूर्ण झाली नसल्याची लक्षण होती ती. पण उंदिरमामा तिला चालला असता. अरे पण माऊने उंदिरमामाला खाल्लं असतं तर मग उंदिरमामाला चीची साठी काऊकडे कसं पाठवणार..
शिवाय आपला ओरिजिनल काऊ म्हणजे कावळा त्यालाही एंट्री नाहीये कारण ती गोची आजीने गाईला काऊ म्हटल्यामुळे झालीये...

जाऊदे जास्त विचार करतेय का मी?? की आजही अशीच झोपमोड होणार किंवा आरूषची गाडी ची, चीची आणि त्यांची भावंडं यावरून पुढे कधी जाणार याची?
नशीब आई, आज्जी, बाबा,दादा ह्यांना तरी चीची च्या सुरात नाही म्हणत ते...

Friday, November 27, 2009

घर पाहावं सोडून

"घर पाहावं बांधून" ह्या म्हणीचा कर्ता करविता नक्कीच बाबा आदमच्या काळातला असणार कारण त्याच्यावर बहुधा फ़क्त एकदा घर बांधुन झाल्यावर सोडण्याची वेळ कधीच आली नसणार.आपल्या इथल्या जवळजवळ सर्व शहरांतले जागांचे वाढते भाव पाहाता घर पाहवं बांधुन म्हणणं या काळात किती बरोबर आहे देव आणि कदाचित बिल्डर्स जाणे पण तसंही असलं तरी मी तर म्हणेन तुम्ही मारे घर कितीही चांगलं घ्याल नाहीतर बांधाल पण बच्चु एकदा का गाशा गुंडाळायची वेळ आली की ते प्रोजेक्ट शंभर टक्के यशस्वी करायचं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे.


मी मुंबईत असेपर्यंत तरी अशी नोकरीसाठी पटापटा शहरं बदलणारी वृत्ती नव्हती पण इथे अमेरिकेत मला वाटतं काही काही लोकांना तर दर तीनेक वर्षांनी घरं नाही बदलली तर चैन पडत नाही.तरी आता एकंदरित रियल इस्टेट थंड असल्यामुळे मालकीची घरं बदलायचं थोडं कमी झालंय पण भाड्याच्या जागांचं काय?? त्या बदलायचं अजुन तसंच आहे. असो. तर मुद्दा हा नाही आहे. प्रश्न आहे तो एकदा घर मग ते स्वतःचं असो भाड्याचं, बदलायचं ठरवलं तर इथुन गाशा गुंडाळा आणि नव्या जागी परत गाशा सोडा हे एका वाक्यात सोपं वाटणारं प्रकरण आपल्याला कुठल्या दिव्यातुन जावं लागणार आहे ते खरं म्हणजे दिव्य पार पडल्यावरचं कळतं.


घर सोडायच्या व्यापाची मोजणीच करायची असेल तर गणिती भाषेत वर्षांच्या समप्रमाणात करावी. नाही कळलं?? म्हणजे जितकी जास्त वर्षं तुम्ही एका वास्तुत राहिलात त्यावरुन आता किती मोठं खटलं मागं लागणार ते समजुन घ्यावं. मुहुर्ताचा नारळ जर तुम्ही घरातल्या सर्व वस्तुंची एकदा यादी उर्फ़ इन्व्हेंटरी करून करणार असाल तर सावधान! आपण महाभारत युद्ध भाग १ सुरु करतोय याची पूर्ण कल्पना असुद्या. अहो म्हणजे माहित आहे इथे दरवर्षी थॅंक्स-गिव्हिंग आणि त्याची चुलत-मावस-सावत्र इ.इ.भावंडं असणार्या सेलच्या नावाखाली आपण कायच्या काय शॉपिंग करत सुटतो पण आता इन-मीन-तीनच्या कुटुंबात स्वयंपाकघरात असू दे, लागतं, म्हणून प्रत्येक वस्तुंची तीन-चार व्हर्जन्स असतील तर बायकोचं काही खरं नाही. तीन-तीन डिनर सेट घरात आणि त्यातला एक तर स्वयंपाकघरातल्या सगळ्यात उंच जागी ठेवला गेल्यामुळे जवळजवळ कधीच न वापरला गेलेला? ही पास्ता प्लॅटर खरं म्हणजे पीठ मळायला चांगली पडेल असं म्हणून घेतलेली चक्क स्वयंपाकघर सोडून दुसरर्याच खोलीतल्या कपाटात तिच्या ओरिजीनल पॅकिंग सहित?? असा नवर्याच्या हल्ला होणार याची पुर्वकल्पना असेल तर बायकांनो आधीच त्याच्या कपड्याच्या ढिगार्यातुन लेबलं पण न काढलेले कपडे त्याला दाखवायला विसरु नका आणि मुख्य म्हणजे त्याच्या जिमच्या न वापरलेल्या वस्तु दाखवायच्या ऐवजी फ़क्त त्याच्या ढेरीकडे बोट दाखवा न बोलता प्रतिहल्ला यशस्वी होईल. आमच्याकडे तर स्वयंपाकघरातही वस्तु वाढवण्यात नवरोबांनीही सढळ हस्ते मदत केलीयं. कुठेही शेफ़ नाईफ़ दिसले की त्याच्यातला कसाई जागा होतो. मोजले तर कांदा-टॉमेटोपासुन मासे-मटण प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या सुरीने कापता येईल की काय असं मला नेहमी वाटतं आणि कधीही माझं कापताना बोटाला लागलं तर तू चुकीची सुरी घेतलीस असा माझ्यावर नेहमी हल्ला होतो. हां तर सांगायचं म्हणजे घर बदलायला किती अवकाश आहे त्यावर हे हल्ले प्रतिहल्ले किती काळ चालु द्यायचे हे पाहायचं. नाहीतर माझ्यासारखी भडकू असेल तर "जा मग ओत पैसा बाहेर आणि बघ तुझं तुच. मला खूप काम आहेत" असं सांगुन तहाच्या बोलणीचा मार्गपण बंद करुन टाकला की बिचारा नवरा. खरंच बिचारे नवरे, बायकोने असं काही सांगितलं की नक्की काय वाटतं त्यांना देवजाणे पण आता अशा केसमध्ये यांच्या मदतीला आल्यासारखं करून कामं नंतर वाढवणार्या लोकांनाच इथं मुव्हर्स म्हटलं जातं असं मला वाटतं.


तर तात्पर्य, जर मोठं घर आणि जास्त वर्ष हे कॉंबिनेशन असेल तर मात्र प्रोफ़ेशनल मुव्हर्स हेच तुमचं महाभारतापेक्षा मोठं होऊ शकेल असं युद्ध थांबवु शकतील. म्हणजे थोडक्यात काय तर तुमची इज्जत तुम्ही काढण्यापेक्षा त्यांना वर भरमसाट पैसे देऊन त्यांनी नको त्या वस्तु नेऊन, हव्या त्या ठेवुन गेले की आपण महाभारत युद्ध भाग २ करायला मोकळे..आणि फ़ार लांब जात असाल तर गाडीलाही विसरू नका. तिलाही शिपच केलेलं बरं पडतं. त्यामुळे त्याची तजवीज आधी करायला हवी. हे काम त्यामानानं कमी वेळखाऊ आहे कारण गाडीचे डिटेल्स आपल्याला इंटरनेट वर देऊन मग तुलनेने परवडणार्याबरोबर एक दिवस पक्क करता येतो. आणि मुख्य म्हणजे तो बदलणंही जास्त खटपटीचं नाही. पण घरातल्या सामानाचं तसं नाही. मुव्हिंग करणार्या कंपन्या शक्यतो आपला माणूस पाठवुन आपलं सामान पाहुन त्याचं साधारण वजन किती होईल त्याप्रमाणे किती खर्च येईल याचा अंदाज देतात. काही काही कंपन्या तेही इंटरनेटवर करतात पण त्यात फ़सवणूकीचा संभव जास्त. म्हणून असे अनेक अंदाज घेऊन त्यातल्या एकाबरोबर आपलं मुव्हिंग पक्कं करणे या गोष्टीसाठीसुद्धा आपला बराच वेळ जाणार आहे हे खूपदा लक्षात येत नाही त्यामुळे जायचा दिवस दोनेक आठवड्यावर आला तरी हे झालं नाही तर भाग दोन युद्धाला आधीच तोंड फ़ुटतं हेही लक्षात असूद्या.

युद्ध भाग दोन आधी सुरू झाल्यामुळे आता खूप गोष्टी नवरा-बायको कुठल्या मुद्यावरून गुद्यावर य़ेणार नाही त्यावर अवलंबुन असतात. मग पॅकिंग त्यांना द्यायचं, आपण करायचं की थोडं त्यांनी थोडं आपण हा यक्षप्रश्न उभा राहतो. नेहमीप्रमाणे नवरोबांना तू कशाला त्रास करतेस (किंवा मग त्याला मदत करायला लागणार त्याने आपण कशाला त्रास घ्या हा खरा अर्थ) आपण त्यांनाच सांगु की, असं म्हटलं की आपण काही करण्यात तसाही अर्थ नसतो. त्यातून घरात लहान मूल असेल तर मग वेळही मिळणं कठीण. आता वाट पाहाणं फ़क्त त्या दिवसाची.


ही इथली मुव्हर्स लोकं तशी खरंच प्रोफ़ेशनल असतात. पण दिलेल्या सुचनांच तंतोतंत पालन करणारी. एकदम संगणकाला मागे टाकतील. किचनमधलं सर्व असं जर तुम्ही म्हटलं तर तिथे तुम्ही स्वतःसाठी ठेवलेला ब्रेड, त्याच्या बाजुला दुसरं कसलं वेश्टन टाकायचं राहिलंय, पडलं असेल ते सगळं सगळं घेतील. त्यामुळे त्यांच्या पाठी गृहमंत्रीण उभी तर कारभारी बेडरुममधल्या सुचना देऊन खाली इतर राहिलेली जुजबी कामं जसं हौसेने घेतलेल्या मोठ्या स्र्किनवाल्या टि.व्ही.ची पिलावळ साउन्ड सिस्टिम, डिव्हीडि प्लेअर, रेकॉर्डर हे सर्व मोकळं करणे याच्या मागे. मध्येच आठवतं अरे आपली अमुक-तमुक बॅग काही महत्वाची कागदपत्र असल्याने आपल्याबरोबर ठेवलीच पाहिजेत. ती शोधायला वर जावं तर त्यांनी तिथे डोनेट करायला काढलेल्या कपडे इ. च्या बॅगेलाही मुव्हिंगच्या सामानात कोंबलंय. नशिब पाहिलं असं म्हणत आता त्यांनी बिघडवलेलं काम मुकाट्याने आपणचं करतो. त्याने निदान नसत्या गोष्टींच्या वजनाचा भुर्दंडतरी पडणार नाही. दोष खरं तर मुव्हर्सचा नसतोच. कारभार्यांनी काय सांगितलंय त्यावर पण असतं. आणि या कामगारांना फ़क्त होयबा नायबा कळणार. आपण आपल्या न आवरलेल्या पसार्यांतून त्यांना हे हवं आणि ते नको सांगायचं आणि त्यांनी ते लक्षात ठेवायचं म्हणजे जरा अतिच..असो.

दोनेक तासांत आम्ही करू सांगणार्यांना आपली पसरलेली घर आवरून बंद करून ठेवायला पाच-सहा तास पुरतात आणि आपण हुश्श करून जमिनीवर (अहो फ़र्निचर नेलं ना त्यांनी) टेकतो आणि म्हणतो झालं बाबा. पण हे दोन मिनिटांचं हुश्श असतं. आता उरलेलं घर आवरायला उठलं की अरे हा आरसा का नेला त्यांनी?? हा तर इथेच ठेवायचा होता. अरे बाथरुममधलं काहीच नेलं नाही वाटतं. अशा सु(?)संवादांनी घर भरून जातं. युध्द भाग दोन पुढे न्यायचे त्राण खरं संपले असतात केवळ म्हणून आपण झालं गेलं गंगेला मिळालं म्हणतो आणि काही जास्त महत्वाच्या गोष्टी नव्या पत्यावर सरळ पोस्ट करतो. उरलेल्या काही वस्तु चांगल्या असल्याने मग जवळ राहणा-या मित्र-मैत्रीणींना पटवून त्यांना देऊन टाकतो.



इतकं सामान त्यांनी नेलं तरी घर अजुन पुरतं रिकामं झालेलं नसतंच त्यामुळे आता कचरा टाकण्याचा एक जंगी कार्यक्रम पुढच्या एखाद्या दिवसासाठी जाहिर करावाच लागतो आणि आपली उरली-सुरली कुलंगडी बाहेर येतात. आता यापुढे असं अनावश्यक सामान कधी घेणार नाही असं आपण आपल्याला म्हणत राहतो. आणि मोठमोठे बॉक्सेस रिसायकलींग, डोनेशन भरून घराबाहेर त्यांचीच रांग लागते. घर मोठं असेल तर चकाचक करायचं काम फ़क्त कामवालीच करू शकते यावर माझा एकशे एक टक्के विश्वास आहे. तिथे पाच-पंधरा डॉलर्स जास्त घेतले तरी मला अजिबात वाईट वाटत नाही.


असो हा फ़क्त ट्रेलर आहे. आता जेव्हा ही लोकं तुमचं सामान पोचतं करतील त्यावेळची कामं तुमची तुम्हालाच करायची आहेत. मुव्हिंगच्या कंपन्या जशा पैशापासरी दिसतात तशा अनपॅकिंग असिस्टन्स नावाने काहीही दिसत नाही. यात काय ते समजायचं. तेव्हा खरी लढाई तो आगे है...सामान यायची वाट पाहातानाच नव्या रिकामी घरात बसून ही पोस्ट लिहितेय आणि मनातल्या मनात म्हणते "घर पाहावं सोडून"....


ता. क. यातले सर्व फोटो नवीन रिकाम्या घराचे आहेत.

Saturday, November 21, 2009

दादर

त्या दिवशी एक नवी मैत्रीण बोलता बोलता मी दादरची असं म्हणाली आणि दादरच्या आठवणींचा भुंगा पुन्हा एकदा गुणगुण करायला लागला. काही काही गावं अशी असतात की आपण तिथे राहणारे नसतो पण इतकं जिव्हाळ्याचं का वाटाव असं वाटत राहात तसं माझ्या मनात "दादर".

अगदी लहानपणी जेव्हा दिवाळी किंवा कुणा नातेवाइकाच्या लग्नाची खरेदी म्हटलं की हमखास आठवणार ते म्हणजे दादरच. माझी मावशी एलफ़िन्स्टनला राहायची त्यामुळे तसंही तिच्याकडे जायला जलद गाडीतून दादरलाच गाडी बदलायचीही असायची. खरेदीच्या वेळीही सगळं झालं की मग मावशीकडे असंच न सांगता ठरलेलं असायचं. तेव्हाचं दादर म्हणजे सुविधाच्या गल्लीतून सुरु करायचं आणि फ़्रॉक पसंत पडेपर्यंत एकामागुन एक दुकानांच्या पायर्या चढायच्या. त्या भागातले सगळे कायम गर्दीचे रस्ते पालथे घालायचे हा एक वार्षिक कार्यक्रमच होता.तेव्हा वर्षाला साधारण एक नवा फ़्रॉक इतकी चैन होती म्हणून मग तो एकच घरी गेल्यावरही आवडेल असा घ्यायचा त्यामुळे कधी कधी माझी आई कंटाळुन जायची. मग प्लाझाच्या समोर एक गु-हाळ आहे त्याच्याकडे ऊसाचा रस ठरलेला. कपड्यांच्या बाबतीत माझं एक नेहमीचं रडगाणं म्हणजे ९९% वेळा दुकानात घेतलेलं घरी लेऊन पाहिलं की नाक मुरडलंच पाहिजे. केवळ तेवढ्यासाठी मला इथे अमेरिकेतली रिटर्न पॉलिसी प्रकार फ़ार आवडतो. असो..भरकटतेय. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे हेच की दादरचा लळा लागला तो त्या दिवसांत.

मग शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी झाल्यावर रूपारेलला गेल्यामुळे आता दादर जरा जास्त जवळ आलं. कधीतरी मैत्रीणींबरोबर शिवाजी पार्कच्या कट्यावर बसुन गप्पा मारणं आवडायचं.बारावीच्या देसाई क्लासला शहाडे-आठवल्यांच्या गल्लीत जायचं तेव्हाचं दादरला जाणं अजुन थोडं वेगळं. बारावीचं टेंशन पण तरी क्लासच्या ग्रुपबरोबर मंजुच्या वड्याची चव जिभेला लागली ती अजुनपर्यंत मुंबईत गेलं आणि उभा वडा खाल्ला नाही तर देवळात गेलो पण प्रसाद घेतला नाही असं काहीसं वाटतं.

पण तरी त्याहीपेक्षा दादरच्या जास्त जवळ आले ते नंतर मी भगुभईला डिप्लोमा इंजिनियरिंगला गेल्यावर. माझी जिवलग मैत्रीण दुर्गेशा शिवाजी पार्कच्या जवळ म्हणजे संतुरच्या गल्लीत राहायची. आता तिथे इमारत झाली पण तेव्हा त्यांचं तिथे छोटंसं घर होतं. अभ्यासासाठी त्यांच्याकडे राहाणं अगदी नियमाचं झालं आणि दादरची ओढ अजुनच वाढली. तिच्याबरोबर आम्ही आसपासच्या भागात खादाडीचे इतके कार्यक्रम केलेत की त्यावर एक वेगळी पोस्ट होईल. तिची आजीपण जवळ म्हणजे सिंधुदुर्गच्या बाजुच्या इमारतीत राहायची. आजी एकटीच असल्याने आम्ही दोघी खूपदा तिच्याकडेच राहायचो. इंजिनियरिंगच्या अवेळी मिळणार्या सुट्ट्यांमध्येही मी अधुनमधुन त्यांच्या कडे जायचे. मग ठरवुन गेलं की सिटिलाइटच्या त्यांच्या लाडक्या कोळीणीकडून आणलेले सुरमई नाहीतर पापलेट तिची आजी टिपिकल सारस्वत पद्धतीने इतके झकास करायची की त्याच्यावर शिवाजी पार्कच्या पानपट्टीवाल्याकडचं थंड थंड पेटी पान खाणं म्हणजे काय आहे हे कळायला ते सर्व त्याच क्रमाने खायला पाहिजे. सिंधुदुर्गचं किचन त्यांच्या खिडकीतून दिसतं त्यामुळे ताजा बाजार आला असला की आजी आम्हाला आग्रह करून रात्री जेवायला तिथेही पाठवायची. माझ्या घरी माझ्या आईला तसं बाहेर खाणं हा प्रकार फ़ारसा आवडत नाही त्यामुळे त्यांच्या आग्रहाचं मला इतकं कौतुक वाटायचं ना की बास. मग रात्री परतताना शिवाजी पार्कला एखादी चक्कर मारुन आजीसाठी आठवणीने पानात मिळणारी कुल्फ़ी घेऊन जाणं आणि उरलेल्या गप्पा तिघींनी एकत्र मारणं या सर्वांत खरंच खूप आनंद होता. या अशा दिवसांनी मग दादरबद्दल वाटणारं प्रेम जरा जास्तच वाढलं. त्यानंतर मग पुढच्या शिक्षणाची आमची कॉलेजं वेगळी झाली तसा तिचा माझा संपर्क कमी झाला आणि मग आम्ही एकमेकांशी फ़क्त इ-मेल चॅटवर आलो तसं वाटलं की गेलं दादर आता. त्यानंतर तर ती नोकरीसाठी बंगलोरला गेल्यामुळे मग दादरला हक्काचं कोण असा प्रश्नच पडला.


तेवढ्यातच निसर्ग भ्रमणाचा नवा छंद लागला होता त्यातुन ओळख झालेली माझ्यापेक्षा वयाने मोठी असली तरी खूप समजुन घेणारी नवी मैत्रीण संगिता मला मिळाली आणि दादर पुन्हा एकदा आयुष्यात आलं. खरं तर ती टेक्निकली माटुंग्याला राहायची पण दोन रस्ते ओलांडले की शिवाजी पार्क म्हणजे जवळजवळ दादरमध्येच. आणि रूपारेलच्या मागे म्हणजे दादर असं माझं ढोबळ कॅलक्युलेशन आहे त्यात तिचं घर बसतय...मग जेव्हा केव्हा रात्रीची कर्जत लोकल पकडायची असली की माझा मुक्काम पोस्ट संगिताच्या घरी असं ठरलेलं. तेव्हाही रात्री शिवाजी पार्कला चक्कर किंवा नेब्युला नाहीतर जिप्सीमध्ये कधी जाणं हेही. आणि तेव्हा तर मी नोकरीपण करत होते त्यामुळे मग तसं खर्चाचाही प्रश्न नव्हता. त्यानंतर एकदा एका आजारपणानंतर ऑफ़िसचा प्रवास थोडा त्रासदायक होत होता म्हणून एक आठवडा मी त्यांच्याकडून नोकरीही केली होती. आणि तात्पुरतं तिथेच एका ठिकाणी महिनाभर पेइंग गेस्ट म्हणूनही राहिले होते. आता दादरची जरा जास्तच चटक लागली होती असं वाटत होतं.
पण मग त्यानंतर लग्नानंतर मायदेश सोडल्यामुळे पुन्हा दादर टप्प्याबाहेर गेलं पण आठवणीतुन अर्थातच नाही. पहिल्यांदा आले तेव्हा आम्ही जुना चारेक जणांचा ग्रुप पुन्हा शिवाजी पार्कवर भेळ खात गप्पा मारत बसलो. अरे हो तिथल्या कॅंटिनचा वडाही छान आहे हे सांगायचं राहिलं. त्यानंतर अचानक एक दिवस आमच्या एका कॉमन मित्राची इ-मेल आली की एका आजारपणामुळे आमची जिवलग मैत्रीण गेली. ती तिच्याबरोबर माझं दादर घेऊन गेली असं का कोण जाणे मला इथे वाटत होतं. त्यानंतर भारतात गेले तेव्हा तिच्या घरच्यांना भेटायला गेले त्यावेळचं दादर खूप वेगळं, गर्दीतही एकटं का वाटलं माहित नाही. पण आता सर्व पुर्वीसारखं आहे असं नाही. शिवाय मुख्य जाणवलेली गोष्ट म्हणजे शिवाजी पार्काचं मराठीपण खूप कमी झाल्यासारखंही वाटलं. आधी राउंड मारताना येणारे मराठी आवाज आता कमी झाल्यासारखे वाटले.चालायचं दादरला घर घेणं हे जर म्हणायचं असेल तर मला पु.ल. देशपांडे म्हणतात त्याप्रमाणे मुंबईकर व्हायला तुम्हाला मुंबईत कुणी दत्तक वगैरे घेतयं का पाहा तसं वाटतं. मग आता तिथले मराठी कमी झालेच असणार.


मी अमेरिकेला जेव्हा आले तेव्हा माझ्या नवर्याला म्हटलं होतं की आपण दोघं इथे खूप मेहनत करू म्हणजे आपल्याला दादरला निदान एक वन बीएचके तरी घेता येईल. आतापर्यंत कधीही कसाही गुणाकार भागाकार केला तरी ते स्वप्न स्वप्नच राहाणार हे आता कळतंय पण तरी दादरची ओढ काही जात नाही. फ़क्त काहीतरी संकेत असल्यासारखं नेमकं दादरच्या आसपास राहणार्या मित्र मैत्रीणी कसे काय भेटतात ठाऊक नाही पण जेव्हा जेव्हा दादर सुटतंय असं वाटतंय तेव्हाच कुणीतरी म्हणतं मी दादरचा/ची आणि मग मन मागे मागे जात पुन्हा दादर स्टेशनवर येऊन थांबतं.

Thursday, November 12, 2009

मन तळ्यात मळ्यात....

हा विषय तसा जमेल तितका वेळ टाळला. म्हणजे पहिल्यांदा वाटलं तेव्हा फ़क्त मनाचं रडगाणं गायलं...मग पुन्हा वाटलं तेव्हा नदीच्या दुसर्या किनारी जाऊन पाहिलं पण आता घोडा मैदान जवळ आलं आणि राहावलं नाही. ही पोस्ट खरं तर लिहुन पोस्ट न करता ठेवावी असंच वाटतंय पण तरी पोस्ट करतेय. माझी एक मैत्रीण मला नेहमी म्हणायची मनातलं कधी साचु देऊ नये त्याचा त्रास जास्त होतो. लिहुन काढलं की मग तो सल उरत नाही असाही एक सल्ला होता. कदाचित त्यासाठीही हे लिहिणं.
या घरात राहायला आलो तो पहिला दिवस अगदी लख्ख आठवतो.  इन्व्हेस्टमेन्टच्या दृष्टीने आणि मुंबईत कुठे पुढे-मागे अंगणवालं घर (उर्फ़ बंगला) परवडणार म्हणूनही, एक छोटं तीन बेडरुमचं घर घेतलं आणि एका ऑगस्टमध्ये आम्ही तिथे आलो. आधी अपार्टमेन्टच्या वर्दळीची सवय होती त्यामुळे इथे अगदी टाचणी पडेल इतकी शांतता पाहून खरं तर भयाणच वाटलं होतं आणि विचारही आला कसं होणार आपलं. पण मागचे तीन वर्षांपेक्षा जास्त इथे राहिल्यावर ती शांतताच आमची मैत्रीण झाली की आम्ही त्या शांततेचं रुपांतर किलबिलाटात केलं सांगणं कठीण आहे. पण आताशा खूप आपलं वाटायला लागलं.
घेतल्या घेतल्या जवळजवळ पहिल्याच महिन्यांत माझ्या अगदी जवळच्या तीन मैत्रीणी ज्यातल्या दोघी आता वेगवेगळ्या देशांत आहेत त्यावेळी नेमक्या अमेरिकेत होत्या. माझं त्यातल्या त्यात मध्यवर्ती आणि मोठं ठिकाण असल्याने, त्या सर्वांना एकत्र बोलावुन एक छोटं गेट-टुगेदर झालं. खूप खूप गप्पा मारल्या. दोन रात्री त्या राहिल्या. घर लगेच भरुन गेलं. त्यानंतर माझे आई-बाबा, सासुबाई, नणंद, भाचा असे नातलगही येऊन राहुन गेले. त्यांना थोडफ़ार अमेरिकेचं नॉर्थ-ईस्ट दर्शन करवता आलं. काही जवळचे मित्र-मैत्रीणी यांच्यासाठीही न्युयॉर्क, डी.सी.ला जायचं असलं तर हक्काचं राहायचं ठिकाण म्हणजे हे घर होतं. नंतर बाळराजांचं आगमन, त्याचा पहिला वाढदिवस सगळं एकापाठी एक चालुच होतं.
पहिल्या दिवशी एकटेपणाची जाणीव होती ती कुठे पळाली कळलंच नाही. इथुन जशी इतर महत्त्वाची शहरं जवळ तसं इथली नेहमीच्या खरेदीपासुन, खायला जाण्याची सगळी ठिकाणं जवळ. काही काही दुकानं तर अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. एक वेगळा वेग इथेही आला. शिवाय स्वतःच घर म्हणजे थोडफ़ार बागकामाची आवड असलेल्या मला तर पर्वणीच होती. अगदी स्प्रिंगला येणारी डॅफ़ोडिल्स, ट्युलिप्स. फ़ॉलमधली मम्स आणि मग जवळजवळ थंडी पडेपर्यंत येणारे छोटे गुलाब आणि देवासाठी झेंडु लावणं मला खूप आवडायचं. दरवर्षी उन्हाळ्यात टॉमेटो आणि इतर काही भाजी, फ़ुलझाडं लावणे आणि मग उरला ऋतु त्याची निगराणी करणे हाही एक आवडता उद्योग बनला. अगदी पहिल्यांदी लावलेली मम्स (आपल्याइथल्या शेवंतीसारखी फ़ुलझाडं) अजुनही आता फ़ॉलमध्ये येतात.
या घराच्या मागच्या बाजुला एक सनरुम आहे म्हणजे त्याच्या तीन बाजुला संपुर्ण काचेच्या भिंती त्यामुळे मागच्या लॉनवर य़ेणारे ससे, खारींची पळापळ पाहाणे हाही एक टि.पी. होता. शिवाय ऋतुंप्रमाणे सुंदर पक्षीही दिसत. शिवाय आपण काचेच्या पल्याड असल्याने तेही बिनभोबाट आपल्यासमोर वावरत. मला आवडतो म्हणून इथे झोपाळा ठेवला आहे. प्रसन्न सुर्योदय असण्यार्या सकाळी तिथे बसुन चहा घेणे आणि बाहेरचा निसर्ग पाहाणे यात वेगळंच समाधान असे. त्याचप्रमाणे बाहेर बर्फ़ पडला असताना तिथला जुन्या काळचा स्टोव्ह (किंवा फ़ायर प्लेस) मध्ये लाकडाचा ओंडका टाकुन खूप गरम झालं की तिथं बसून तो पांढरा बर्फ़ आणि बाहेरच्या तारांवर ओघळताना गोठलेले बर्फ़ाचे आकार पाहाणं हाही एक वेगळा छंद बनला. कधी आपण या घराचे झालो कळलंच नाही. हे भाड्याचं घर नाही म्हणून ही ओढ की आतापर्यंत सर्वात जास्त वर्ष निवास केल्यामुळे आलेलं प्रेम सांगणं कठीण आहे. पण पाहता पाहता इथे वेळ पुरेनासा झाला.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या देशात असुन आपुलकीने आमची चौकशी करणारा शेजार मिळाला. ही एक गोष्ट मी इथल्या अपार्टमेन्ट मध्ये नेहमीच मिस केलीय. शेजारी कधीही हायच्या पुढे नाही. एखादा भारतीय असला तर थोडा फ़ार परिचय होण्याची शक्यता. इथे मात्र कधीकधी "आज तुझा नवरा घरी नाही तर मी बाहेरचा बर्फ़ काढुन देऊ का" म्हणणारा शेजारणीचा मुलगा आणि "अगं, आता हा ड्राइववेवर धावतोय" अस म्हणत प्रेमळपणे आरुषला "यु सन ऑफ़ अ गन" म्हणणारी बेट्टी आजी, समोरचं दोन मुलींवालं डिनिसचं कुटुंब, "आय विल किप यु इन माय प्रेअर्स" म्हणणारी मेरी आणि कोपर्यावरची मॉली सगळ्यांनीच इथल्या वास्तव्यात जान आणली.
हे इतकं पारायण सांगायचं कारण म्हणजे आता निर्णय झालाय. गेले बरेच दिवस आम्ही दूरदेशी गेलेल्या बाबाची वाट पाहात होतो जे मी मागच्या एका पोस्टमध्ये लिहिलंय सुद्धा. त्यामुळे हे ठरवणं जवळजवळ अपरिहार्य झालंय..आमचं कुटुंब जिथे एकत्र राहु शकेल त्या नव्या गावी आम्ही जातोय. या इकॉनॉमीमध्ये घर विकुन होणारा तोटा टाळण्यासाठी जमलं तर हे घर भाड्याने देऊन आम्ही स्वतः आता पुन्हा एकदा नव्या गावी भाड्याच्या घरात राहायला जाऊ.
पाखरांचं बरं असतं नाही? काडी-काडी जमवुन बांधलेलं घरटं त्यांची पिलं मोठी झाली की पुन्हा मोकळ्या आकाशात जायला तयार होतात. आपण मात्र वास्तुवरही जिवापाड प्रेम करतो आणि मग ती सोडताना सगळ्या जुन्या आठवणी काढत बसतो. खरं तर राहताना कितींदा त्यातल्या थोड्याफ़ार कमी पडणार्या वस्तुंबद्द्ल किरकिरही केलेली असते पण आता सोडणार म्हटल्यावर सगळं अतोनात आवडू लागतं. आम्हाला आधी वाटायच की आता इथुन निघायचं ते थेट मायदेशी जायलाच अधेमधे कुठे हलुया नको. पण शेवटी सगळं आपण ठरवतो तसं थोडंच होणार असतं?? म्हणजे पुन्हा एकदा इथलं सगळं गुंडाळा आणि दुसरीकडे सोडवा.
गेले काही वर्षात किती सामान वाढवलयं याचा आता अंदाज येतोय. विशेषतः मूल झाल्यानंतर तर अगदी अतोनात वस्तू आल्यात त्या सर्व नेणं शक्य नाही. ते परवडणारही नाही. नवं शहर आमच्या शहरापासुन थोडं थोडकं नाही तर चांगल जवळजवळ ३००० मैल लांब म्हणजे अमेरिकेच्या दुसर्या कोस्टमध्ये..विमानानेही सलग ६ तास तरी लागतील. इथे लांब जागा बदलणं म्हणजे तिथे जाऊन बरचसं नवं घेणं जास्त परवडेल इतकं ते सर्व घेऊन जायचा खर्च आणि व्याप आहे. पण घर रिकामी तर करावं लागणार आहे. प्रत्येक खोली आवरताना तिथल्या सर्व आठवणींचा गुंता.
कितीवेळा वाटतं खरंच हा निर्णय घेऊया की सरळ अजुन काही दिवस इथं राहुन पुन्हा याच भागात नव्या नोकर्या शोधाव्यात. मनाचं सारखं तळ्यात-मळ्यात सुरू असलं तरी खरं सांगायचं तर ते जवळजवळ अशक्यच आहे. सध्या फ़क्त स्वतःला समजावणं चालु आहे की कधीकधी काही बदल काही वेगळ्या कारणांसाठी आवश्यक असतात. असे प्रसंग आपल्याला इथल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी लागणारं बळ देतं. आणि आता नुसतं हे घर सोडताना जर इतका त्रास होतो तर कुणास ठाऊक हा देश सोडताना किती त्रास झाला असता?? आता यातुन निभावलं तर कायमचं परत जाणं जास्त चांगल्या प्रकारे होईल. आणि मुख्य म्हणजे आता एक नवं शहर, तिथली प्रेक्षणीय स्थळं हे सर्व पाहुन जर परतायचं असेल तर का नाही??

Friday, November 6, 2009

शुध्द लेखन

खरं तर मी या विषयावर लिहायचं म्हणजे एखाद्या पाचवी फेल चंपुने पी एच डी चा प्रबंध लिहिण्या सारखं आहे. मराठी माध्यमातून शिक्षण झालं तरी व्यावसायिक कामात मराठी लिहिणं कमी म्हणण्यापेक्षा अगदी नसल्यामुळे आता माझं मराठी जरी काही फार चांगलं राहिलं नसलं तरीपण या विषयावर लिहिण्याची हिम्मत करतेय. मराठी भाषे मधे बऱ्याच अनुदिनी सुरु झालेल्या आहेत. खूप सुंदर लेख, कविता लिहिले जातात, लोकं आपले अनुभव पण लिहितात. मला तरी सगळ्यांचच लिखाण वाचायला खूप आवडतं.

बऱ्याचशा ब्लॉग्ज वर मी आपल्या प्रतिक्रिया पण देते. बऱ्याच लोकांच्या अनुदिनीवर इतके सुंदर लेख असतात, कविता असतात, गुजगोष्टी असतात, पण  केवळ काही महत्त्चाचे शब्द चुकवल्यामुळे  त्या वाचतांना उगीच अडखळल्यासारखं वाटतं. बरेच लोकं अगदी साधा शब्द आहे ’आणि ’ हा दिर्घ(आणी) लिहिलेला असला की तो वाचतांना अडखळल्या सारखं वाटतं. माझा पण नेहेमीच गोंधळ उडतो ह्र्स्व आणि दिर्घ लिहितांना. तरीपण शक्यतोवर उच्चाराप्रमाणे लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर बरच शुध्द लिहिलं जाऊ शकतं.

आता माझी पण लिहिण्याची पध्द्त जी आहे ती बोली भाषेप्रमाणेच आहे. म्हणजे असं बघा, की ’लिहिलं’.. हा शब्द जेंव्हा लिहितॊ, तेंव्हा वर असलेल्या अनुस्वारामुळे ते बरोबर वाचलं जातं,जेंव्हा ’लिहिल’ असं लिहितो तेंव्हा ते  बरोबर वाचलं जात नाही. म्हणजे काय, तर बोली भाषेत लिहितांना जर अनुस्वार तरी पण दिला तरच ते बरोबर वाचता येते, नाहीतर लिहिल (लिहिलं) , केल, (केलं)  चा उच्चार चुकीचा केला जातो. ...

प्रमाण भाषेनुसार हा अनुस्वार देण्याची पध्दत हल्ली बंद करण्यात आलेली आहे, आणि हे चुकीचे मानले जात आहे.   हल्ली प्रमाण भाषेत ’लिहिलं’ ऐवजी ’लिहिले’, ’केलं’ ऐवजी ’केले’ , ’सारखं’ ऐवजी ’सारखे’, असे लिहिण्याची पध्दत आहे. अर्थात आपण  ( मी सुध्दा) जे  बोली भाषेनुसार लिहितो, ते व्याकरणाच्या दृष्ट्या फारच चुकीचे आहे. पण निदान ते वाचताना अडखळल्यासारखं तरी होत नाही असं मला बुवा वाटतं.

अगदी साधे सोपे नियम जरी पाळले तरीही बरेच लिखण शुध्द होऊ शकतं.जसे "आणि" हा शब्द ह्रस्व लिहिणे. शब्दाच्या सुरुवातीची वेलांटी ह्र्स्व लिहिणे. बहुतेक शब्दांची शेवटच्या अक्षरची वेलांटी ही नेहेमीच दिर्घ असते. अर्थात मी या विषयामधे भाष्य करण्याइतपत मोठी नाही, पण मला जे काही प्रामुख्याने जाणवले, ते इथे लिहिले आहे. या मधे जर कांही चुका असतील तर त्या अवश्य दुरुस्त करा.यात अजुन काही नियम/सुचना घालुन आपल्या सर्वांसाठी एक नियमावली किंवा संदर्भ मिळाला तरी खूप.

जेंव्हा वेलांटी ही शब्दाच्या मधे येते, तेंव्हा मात्र ती बहुतेक वेळेस ह्रस्वंच असते. हे सगळे ठोक ताळे आहेत. आता बघा, आणि जरी ह्रस्व असला तरी पाणी हा दिर्घंच असतो. या सगळ्य़ांची कारणं शोधताना जाणवलं की शेवटी आपण अर्थानुसार तो शब्द किती दिर्घ उच्चारतो त्यानुसार ते ठरत असावे. अर्थात या विषयातल्या एखाद्या माहितगाराने हा लेख अजुन पुढे वाढवला तर झाला तर आपल्या सर्वांचाच फ़ायदा आहे. कारण आधी आपण मायाजालवर मराठीत लिहित नव्हतो ते लिहायला (आणि वाचायला) लागलो. पुढची पायरी मराठी भाषा शुद्ध लिहायचा प्रयत्न करणे असं म्हणायला काही हरकत नाही.

असो. अजुन एक मुद्दा म्हणजे मराठी शब्द, हे मराठी व्याकरणाप्रमाणेच लिहावेत. जसे प्रत्येक शब्द, जॊ इकारान्त, किंवा उकारान्त असेल तर तो नेहेमी दिर्घ लिहावा. फक्त संस्कृत मधुन घेतलेल्या शब्दांना संस्कृत प्रमाणे नियम लावावे. मराठी व्याकरणामधे संस्कृत चे शब्द घेतल्यामुळे जास्त त्रास होतो लिहितांना. इतर भाषांमधे पण संस्कृत शब्द घेतले आहेतच , पण त्यांनी व्याकरण त्या - त्या भाषेचं लावलंय म्हणुन इतर भाषांचं व्याकरण सोपं जातं मराठी पेक्षा.

शाळेत शिकलेले अजुन काही आठवलेल्या नियमात महत्त्वाचा नियम म्हणजे,
१. एकेरी शब्द नेहमी दिर्घ लिहावेत जसे मी, ही, ती.
२. आणि त्याच शब्दाचं रुप जसं ती - तिला इथे तिला मध्ये "ति" ह्र्स्व, तू - "तुला" (हा मी जास्तीत जास्त वेळा चुकीचा लिहिलेला पाहिला आहे म्हणून खास उल्लेख)
३. उच्चारानुसार लिहिले जाणारे काही शब्द उदा.
उगीच
करतील
म्हणून
जीवन
खूप
तरी
करून
देऊन

ऋतु

काही वेळा वेळ असेल तर मी चक्क एखादं मराठी पुस्तक पाहाते आणि नक्की करते माझं शुद्धलेखन बरोबर आहे का?? तुम्ही म्हणाल हा काही पर्याय आहे का? पण चुकवण्यापेक्षा बरं. तरीसुद्धा काही ना काही राहून जातेच म्हणा...

या विषयावरचा गाढा अभ्यासू म्हणून श्री अरुण फडके यांचं नाव घेता येइल.  फडके यांचे बरेच कार्यक्रम होतात व्याकरणावर. त्यांची बरीच पुस्तकं पण आहेत शुध्द लेखनावर. आता इथे माझ्याकडे संदर्भासाठी नाहीयेत पण मिळवुन थोडा प्रयत्न तुम्ही आम्ही सर्व मिळुन आपली भाषा शुद्ध लिहिण्यासाठी प्रयत्न जरुर करायला हवा यासाठी हा प्रपंच. कळावे लोभ असावा...

ता.क. या पोस्टसाठी माझे काही ब्लॉग मित्र-मैत्रीणींनी त्यांची नावे न सांगण्याच्या अटीवर मदत केली आहे. एकटीने हे एवढे नियमही लिहीणे अन्यथा जमलंच नसतं. अजुनही ज्या काही त्रुटी असतील त्या भरुन काढण्यासाठी वाचक वर्ग मदत करेल ही अपेक्षा.

Tuesday, November 3, 2009

दिव्यांची आरास





मोठी माणसं घरात असली की सगळे सण कसे नीट आठवण करुन दिले जातात. आता जी पौर्णिमा गेली ती "त्रिपुरी" यावर्षी आई घरात असल्यामुळे तिने आठवण करुन दिली. मग या दिवशीही एक दिव्यांची माळ घरात लावली. ती लावता लावता मला मागची त्रिपुरी आठवली.
मुंबईत बोरिवली पश्चिमेला मंडपेश्वर भागात ज्या गुंफ़ा आहेत तिथे प्रथमच त्रिपुरी पौर्णिमेला जायचा योग आला आणि प्रत्येक जणांनी केलेली दिव्यांची आरास पाहुन डोळे आणि मन तृप्त झाले. मुंबईजवळच राहुनही कधीच जाणं का झालं नाही माहित नाही आणि आता मायदेश सोडुन काही वर्ष झाल्यानंतर का होईना जाणं झालं हेही नसे थोडके. शक्य असेल तर या दिवशी मुंबईकरांनी (आणि इतरांनीही)  तिथे नक्की जायलाच हवं.
इथे एक छोटी टेकडी आहे, जिच्या आत या गुंफ़ांमधलं महादेवाचं मंदिर आहे. आसपास जो काही परिसर आहे तिथे या दिवशीच्या संध्याकाळी तिथे मोठमोठ्या रांगोळ्या काढुन त्याभोवती दिवे, पणत्या, समया ठेवुन दिव्यांची आरास केली जाते. सगळी जणं आपापले दिवे किंवा काही नुसतं तेल घेऊन मग ते सगळीकडे लावतात. कुठला दिवा विझला की तो मागुन येणारा कधी लावतो कळणारही नाही. काळोख व्हायला लागला तसा तो परिसर या लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला आणि कानावर तिथे लावलेले शांत सुरातले अभंग. दिवाळीचं हे वेगळं रुप प्रत्येक मुंबईकराने डोळ्यात साठवायलाच हवे आणि या गुंफ़ा जतन करण्यासाठीही पाठिंबा. जास्त लिहिण्यापेक्षा फ़ोटो लावते. पुढच्या वर्षी नक्की जाल..






























Saturday, October 31, 2009

एवढा मोठा भोपळा...






सध्या सगळीकडे घरांपुढे कोरलेले भोपळे आणि त्यात लावलेल्या मेणबत्या दिसतात. काही ठिकाणी वेगवेगळे रंग आणि आकाराचे भोपळे सुबकरित्या रचुन ठेवलेत..सरता उन्हाळा आणि कापणीचा हंगाम संपल्याच्या आठवणी आहेत. आता भले सगळीच जण शेती करत नाहीत. पण हे ऋतुप्रमाणे घरसजावटीची अमेरिकन पद्धत माझ्या आईलाही खूप आवडते..


त्यानिमित्ताने आपली भोपळयातल्या म्हातारीची गोष्ट आठवली. तसंही लेकाला गाणी म्हणून झोपवायचं जवळ जवळ बंद आहे गेले दोन महिने (आजी आहे ना आता इथे हक्काची) म्हटलं जरा गोष्टतरी सांगुया. लहान मुलांच्या बर्याच गोष्टी ऐकताना पडलेले काही प्रश्न कायमच आहेत मला. जसं म्हातारी एवढ्याशा भोपळ्यात मावुच कशी शकते?? पण काही आठवडे आधी एका फ़ार्ममध्ये गेलो होतो निमित्त होतं सफ़रचंद खुडणी करायचं..(apple picking) तिथे लगे हातो भोपळे, द्राक्ष आणि अर्थातच सफ़रचंद असं सर्व काही वेगवेगळ्या विभागात लावलं होतं आणि ते पाहायला जायला आपल्या बैलगाड्यांसारख्या पण बैलाऐवजी यंत्र अशा गाड्या होत्या. इथे सगळ्यात मोठ्ठा पाचशे  पौंडाचा एवढा मोठा भोपळा पाहुन मात्र आता पुन्हा तो म्हातारी त्यात बसली कशी हा प्रश्न पडणार नाहीये...तुमच्यापैकी कुणाची मुलं लहान असतील किंवा माझ्यासारखे काही अजुन तो प्रश्न मनात ठेऊन असतील तर नक्की यातले फ़ोटो दाखवा. त्यांच शंकानिरसन होऊन जाईल..अरे आणि फ़क्त भोपळेच किती प्रकारचे आणि रंगाचे असावेत??


मान गये..बरेच दिवस ठरवत होते त्यावर लिहिन आज सुदिन उगवलाच आहे तर लगे हातो तेही फ़ोटो टाकुन देते.





भोपळ्याची आठवण आजच यायचं कारण आज इथे अमेरिकतला एक सण "हॅलोविन" साजरा होतोय. त्यानिमित्ताने सगळीकडे कोरलेले भोपळे आणि त्यात ठेवलेल्या मेणबत्या इ. दिसतयं. कधी नव्हे ते आम्हीही मुलाच्या निमित्ताने "ट्रिक ऑर ट्रीट" साठी जाऊन आलो. अरे आपण हे आधीच का नाही केलं असं ती आलेली वेगवेगळ्या चवीची चॉकोलेट्स खाताना वाटतंय.
या सणामागचं नक्की शास्त्र माहित नाही आहे पण जे काही ऐकलंय त्यावरुन मला वाटतं या दिवसात रात्री मोठ्या होत्यात तसं भुताच्या आठवणी जाग्या होत असाव्यात. तर अशा वाईट मृतात्म्यांना पळवुन लावायचं म्हणजे स्वतःच वेगवेगळे शक्यतो भीतीदायक कपडे घालुन संध्याकाळ झाली की फ़िरायचं आणि घरोघरी जाऊन म्हणायचं "ट्रीक ऑर ट्रीट?" म्हणजे आता घाबरवु की तुम्ही मला काही देताय?? मग समोरचा निमुटपणे ट्रीट म्हणजे चॉकोलेट देतो. गावात एखादा भूतबंगलाही उभारला असतो. त्यात जायचं म्हणजे पण मजाच असते.

आजकाल काही काही लोकं चॉकोलेट ऐवजी मुलांच्या खेळायच्या वस्तुही जसं प्ले डो इ. देतात. समजणारी मुले ती इतकी गोळा केलेली चॉकोलेट्स हट्टाने खातात म्हणून असेल. आम्हाला काय ते टेंशन नव्हतं. म्हणजे सुरुवातीला आमच्या बाळाला कळत नव्हतं की हे काय चालु आहे म्हणुन तो असं लोकांकडून काय घ्यायचं म्हणून नुसताच पाहात होता. मग एक-दोन घरं झाल्यावर आम्ही त्याला एक चॉकोलेट खायला दिलं मग मात्र अंदाज आला त्यालाही या ट्रीटचा. त्याच्यापुढच्या घरात तो आपला स्वतःहुन अजुन हात पुढे करतोय. मजा आहे..

आम्ही त्याला एक डायनॉसोरसारखा कपडा आणला होता. तो घालुन आमच्या आसपासच्या काही ओळखीच्या आणि काही अनोळखी घरांमध्ये फ़िरलो. थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर मात्र घरात आल्यावर त्याचं चॉकोलेटचं मडकं आम्ही लपवुन ठेवलंय. तो झोपला की आम्ही ती हळूहळू खाऊ...किती दुष्ट आई-बाप आहोत ना?? अहो पण याच वर्षी. पुढच्या वर्षी त्याची चॉकोलेट्स ढापायची काही नवीन ट्रीक आम्हालाच शोधावी लागेल.

Thursday, October 29, 2009

असाही एक निरोप

आज कॅथीची  निरोपाची मेल आली. उद्या तिचा या कंपनीतला शेवटचा दिवस. २७ वर्ष तिथे तिने इमाने-इतबारे काम केलं ती कंपनी दुसर्या कंपनीने विकत घेतल्यामुळे झालेल्या उलथापालथीत नोकरी गमावणार्यांपैकी ती एक. या शेवटच्या निरोपाच्या मेलमध्ये तिला माझी आठवण यावी हे मी माझंच भाग्य समजाव. कारण खरं तर मी या प्रोजेक्टवरुन निघाल्याला आता जवळजवळ दिड वर्ष होईल. मधल्या काळात किती गोष्टी होऊन गेल्या, मी जे काम तिच्याबरोबर करायचे त्यासाठी किती अजुन जण येऊन गेले असतील पण तरी तिला या निरोपात मलाही सामावुन घ्यावसं वाटलं हे खरंच खूप आहे. मी तिथुन गेल्यानंतर आम्ही कधी बोललोच नाही असंही नाही पण तरी तिच्या ऑफ़िसच्या कामाचा मी आता भाग नव्हते हेही तितकंच खरंय.
खरं तर कॅथी या कंपनीत २७ म्हणजे तशी खूप वर्ष आहे आणि इथल्या मोठ्या कंपन्यांचे रिटायरमेन्ट बेनेफ़िट्स पाहात ही नोकरी गेल्यावर जिचं फ़ारसं नुकसान होणार नाही अशातली ही एक अशी बर्याच जणांची समजुत. पण तिचा धाकटा मुलगा अजुन कॉलेजला आहे आणि मुख्य म्हणजे याच कंपनीत असणार्या तिच्या नवर्याची नोकरीही एक दोन महिन्यांपुर्वीच संपली आहे हे लक्षात घेतले तर हे जाणं तिच्या दृष्टीनेही सुखकर नसणार. शेवटी महिन्याचा पगार हातात पडणे आणि पेंशनचा पैसा यात फ़रक तर आहेच ना?? पण तिची ही मेल वाचताना तिने इतकं समजुतीने सगळं लिहिलंय की खरंच अशा माणसांचं कौतुक वाटावं. आपल्याला काढलं गेल्याची कुठेही कटुता नाही. नेहमीसारखं टाइम टु से गुड-बाय किंवा अशाच अर्थाचं काही म्हणण्यापेक्षा ती म्हणते "धिस वॉज अ गुड रन". जेवणाच्या सुट्टीत रोज काही मैल पळण्यासाठी ती तशीही संपुर्ण इमारतीत प्रसिद्ध होतीच. आणि आपल्यालाही लोकं धावण्यासाठी ओळखतात हे बहुधा माहित असणार त्यामुळे हे शब्द खूप काही सांगुन जातात. 
आपल्या मेलमध्ये चार मुख्य प्रश्नांची चर्चा ती करते 
१. या कंपनीमधला माझा वेळ इतका छान का होता? 
२. मी इथे काय शिकले 
३. मी इथलं काय लक्षात ठेवेन? 
४. हा मेल वाचणार्यांसाठी मी काय सांगु इच्छिते? 
उत्तरांमध्ये अत्यंत मोकळेपणाने तिने काही इतरांना न माहित असलेल्या गोष्टींचे उल्लेख केलेत जसं तिचं पदवी आणि त्यानंतरचं शिक्षण कंपनीच्या खर्चाने झालंय. आणि त्यामुळे ती कशी पुढे जाऊ शकली. शिवाय तिचा नवरा तिला इथेच भेटला आणि मुख्य तिने इथेच असताना धावायची सुरुवात केली. तिच्या डेस्कपाशी तिचे अनेक ठिकाणच्या मॅरेथॉनचे फ़ोटो मी पाहिलेत.मलाही एकदा तिने तिच्याबरोबर लंच टाइममध्ये धावायचं तर ये असं म्हटलं होतं पण मी आपलं फ़क्त चालायचीच. बोलता बोलता एकदा धावल्यामुळे तिचा घरगुती आणि कामाचा स्ट्रेस कमी होतो असंही म्हणाली होती. तिने लिहिलेलं सगळं तिच्याच शब्दात देण्याचा मोह जास्त होतो पण तरी अशा प्रकारे तिचं तिने ठरवलेल्या माणसांना लिहिलेलं पत्र असं उघड करणंही प्रशस्त वाटत नाही म्हणून तिनं लिहिलेली काही वाक्यं जशीच्या तशी देतेय.
What have I learned ?  
Most important - I learned that people matter more than things or jobs or tasks. 
What will I remember?   
I'll remember that  the relationships I developed along the way are what enriched my life.
What can I leave you with now?   
1)  Don't worry - Be Happy  !  (My middle name is Anxiety). 
2)  Count your blessings !  What really matters at the end of the day is that you know you are loved and you are the most important person to somebody in this world. Try to love others.  The rewards are immeasurable. 
When feeling frustrated with yourself or others, remind yourself that you are doing the *very best*  job you can - and most times, so are others.  

मी तिच्याबरोबर काम करताना जेव्हा माझ्या जाण्याची वेळ आली तेव्हा मला खासगीत मग मी तुला इथेच ठेवण्यासाठी तुझ्या मॅनेजरशी बोलु का? किंवा बाळ झाल्यानंतर कामावर यायचं पाहायचं का? असं आपुलकीने विचारणारी, दोनेक वर्षांपुर्वी माझे आई-बाबा इथे आले होते त्यांच्या भारतात परत जायच्या दिवसाबद्द्ल लक्षात ठेऊन मला समजावणुकीचं बोलुन, कधी तिचेही घरगुती काही प्रश्न सांगणारी, कामाच्या वेळी तिला काही अडलं तर अगदी स्वतः क्युब मध्ये येऊन चर्चा करणारी आणि मुख्य म्हणजे केलेल्या कामाचं दिलखुलास कौतुक करणारी, माझ्या शेवटच्या दिवशी कार्ड आणि होणार्या बाळासाठी मायेने भेटवस्तु घेऊन घेणारी अशी कॅथी ही बरीच रुपं या पत्राने मला आठवली. आता पुन्हा कधी चुकुन-माकुन त्याच ऑफ़िसमध्ये जाणं झालं तर अजुन एक ओळखीचा आणि भेटल्याबरोबर गळामिठी मारणारा एक चेहरा तिथे नसेल याचं मनापसुन वाइट वाटतंय. पण हे पत्र पुन्हा पुन्हा वाचलं की निरोपाची वेगळी भाषा खूप काही शिकवुन जाते. 

Saturday, October 24, 2009

पाच का चौदह

नाही नाही मला तशी कल्पना आहे की आता मल्टिप्लेक्सचा जमाना आल्यामुळे ब्लॅकवाल्यांचा धंदा बसलाय पण ही जी मी आता एक छोटीशी गोष्ट मोठी करुन सांगणार आहे तिचा आणि ब्लॅकच्या तिकिटांचा अजाबात संबंध नाय... ते ब्लॅकने तिकिट घेऊन पिक्चर पाहायचे दिवस वेगळेच होते नाही??  मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघींनी असा ब्लॅकने पाहिलेला पिक्चर म्हणजे "हैदराबाद ब्लुज". त्यात इतकं हसायचं आहे आणि आम्ही दोघी एक-दोन रांगा अलिकडे-पलिकडे. पण काय करणार ऍडव्हान्स बुकिंग फ़ुल्ल झालं होतं आणि मला तर तिकिट घेतानाच धाकधुक. एखाद्या मुलाला बरोबर घेतलं असतं निदान त्या ब्लॅकवाल्याबरोबर डिल करायला तरी बरं झालं असतं असं नंतर वाटलं. असो इतकं विषयांतर पुरे...
तर आज काही कामानिमित्ताने software development estimates या विषयाची जरा अधिक छाननी करत होते तर एक मस्तच template हातात पडलयं. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनमध्ये छोटा बदल करण्याचं काम करताय आणि त्याला मुळात ५ मिनिटं लागणार आहेत तर त्याला खरा किती वेळ लागेल?  म्हणजे थोडक्यात "काय रे, तुम्ही software वाले इतका वेळ काय काम करता?" असं कुणी विचारलं आणि त्याला तुम्हाला समजावायचं असेल तर हे template नक्कीच चांगलं आहे.
म्हणजे पहा पाच मिनिटात तुम्ही कोड बदलला आणि २ मिनिटांत तो कंपाइल केला. मग तुम्हाला काही अभावित आणि अनभावित कंपायलेशन मधल्या चुका मिळतील त्या दुरुस्त करण्यासाठी साधारण १५, १५ अशी ३० मिनिटे पकडा.पण तरी का बर डम्प येतोय हे जरा जास्त डोकं लढवुन करायला हवं मग त्यासाठी अजुन एक तासभर लागेल. आणि हे काम अर्थातच तुम्हाला एकट्याने झेपेलच असं नाही मग तुमच्या आजुबाजुच्या लोकांची डोकी साधारण अर्धा तास खपवा. जाउदे शेवटी सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित लिहुन काढा जास्त नाही आठेक मिनिटांत आता पुन्हा थोड्या पुर्वीसारख्याच कंपायलेशन चुका आणि इतर डम्प इ. भानगडी. पण आता जरा अनुभव गाठीशी आहे त्यामुळे त्याला ४ आणि १० मिनिटं. हुश्श.आता मात्र जरा एकदा स्वतः थोडं एक-एक करुन टेस्ट करा लावा जरा आणखी दहा मिनिटं. चला आता खरा प्रश्न मिळाला त्यामुळे पाचेक मिनिटांत त्यावर उतारा आणि आता मात्र थोडं आधी विचार न केलेले चेक्स इ. टाका विसेक मिनिटं, थोडे नवे फ़िचर्स ३० मिनिटं आणि पुन्हा एकदा कंपायलेशन २ मिनिटं.पुन्हा एकदा टेस्टिंग, प्रोग्राम आणि युजर डॉक्युमेंटेशन प्रत्येकी दहा मिनिटे. मध्येच तुमचे संगणकाचे काही प्रॉब्लेम्स आले असतील आणि पुन्हा काही टाइप करायचं तर त्यालाही असुदेत ना एक पंधरा मिनिटे. चला बदल तर झाले आता एकदा पुर्ण सॉफ़्टवेअर इन्स्टॉल करुन त्याचं टेस्टिंग एक दहा मिनिटं. आता हे काही पहिल्या फ़टक्यात नीट चालणार नाही मग काय लढवा डोकं एक तासभर.आणि मग आलं ना पुन्हा बर्यापैकी नवं चक्र....विश्वास बसतोय ना?? शेवटी हे बस्तान नीट बसवुन आणि पुन्हा एकदा कागदोपत्री (म्हणजे आपलं डॉक्युमेंटेशन इ. हो) करुन जर सगळी गोळाबेरीज केलीत तर किती वेळ लागु शकतो माहितेय? १४ तास आणि ४० मिनिटे. म्हणजे झाले ना पाच का चौदह. नाही विश्वास बसत?? ही लिंक पाहा.

आणि आता कुणा सॉफ़्टवेअर मधल्या माणसाला तुम्ही दिवसभर (किंवा कधी कधी महिनोन महिने) काय करता असं विचारायच्या आधी याचा नक्की विचार करा. आणि तरी हे फ़क्त पाच मिनिटाचं उदाहरण आहे मग मोठमोठी प्रोजेक्टस यशस्वी करायला काय मेहनत घ्यावी लागत असेल याचा अंदाज आला की नाही?? मी मागे एकदा तीन महिन्यांसाठी प्लान केलेल्या प्रोजेक्टवर जवळजवळ सहा महिने खपले त्याचं गणित आता सांगायलाच नको. खरं तर मला वाटतं फ़क्त सॉफ़्टवेअर कशाला घरातलं एखादं पाच मिनिटांचं कामही कधी कधी पाच तास घेतं तेही मला वाटतं याच पद्धतीनं शोधता येईल. सगळीकडे आपलं पाच का चौदह, पाच का चौदह केलं की झालं...

Wednesday, October 21, 2009

वीज जाते तेव्हा....

परवाचीच गोष्ट, दिवाळीनंतरचा हा पहिलाच दिवस. सक्काळ सक्काळची माझी एक सवय आहे. उठल्या उठल्या आय पॉड (टच) वर पहिल्यांदा इ-मेल पाहुन घेणं. कधी कधी प्रत्यक्ष लॅपटॉप चालु करुन सविस्तर पाहायला वेळ लागतो पण साधारण पहिल्या डाकेने काय आलंय याची एक माहिती करण्याचं जवळ जवळ व्यसनच म्हणा ना. आता ब्लॉगींग सुरु झाल्यानंतर तर बरं वाटतं प्रतिक्रियांचे मेल्स वाचायला. फ़क्त त्यात एकच प्रश्न म्हणजे आय-पॉडवर देवनागरी वाचता येत नाही त्यामुळे मग काय बरं लिहिलं असेल ते अगदी प्रत्यक्ष वाचेपर्यंत घोळत राहातं. आज सकाळी तसंच इंग्रजीतले प्रतिक्रिया मेल वाचुन त्यांना उत्तर द्यायचा खूप मोह झाला होता पण त्यासाठी अर्थातच मला बराहावर जायचं होतं. ब्लॉगवर शक्यतो देवनागरीतच लिहायचा प्रयत्न असतो ना म्हणून. त्यामुळे लेकाला पटापटा दुध देऊन लॅपटॉप चालु केला. मेल उघडुन वाचत होते तोवर अचानक लॅपटॉपचा बॅटरीचा आयकॉन दिसला. मला वाटलं पाठुन पॉवर निघाली असेल. म्हणून एकदा तपासलं. लेकही सारखा पाठीपाठी करत होता तेव्हा त्याच्या पायात आलं का ते पाहिलं तरी काही नाही. आणि अचानक जाणवलं. मी आजकाल जिथे लॅपटॉप ठेवते तिथेच माझा एक कि-बोर्ड आहे आणि आजकाल मुलाला त्याचं चालु-बंद करायचं तंत्र जमतं (किंवा मीच शिकवुन ठेवलयं काही म्हणा) तर तो ते चालु बंद करुन कि-बोर्ड बडवत असतो. यात फ़ायदा आमचा दोघांचा होतो. त्याला थोडा विरंगुळा आणि मोठ्यांच्या गोष्टींशी खेळायला मिळतं आणि तो जितका वेळ त्यात गुंतेल तितका वेळ मी संगणकावर काम करु शकते. असो. तर आज सकाळीही तो ते बडवत होता त्याचाही आवाज बंद झाल्यामुळे तो माझ्याकडे आला होता. त्याला ते कदाचित चालु करता आलं नसेल असं वाटुन मी त्याला आधी ते चालु करुन द्याव म्हणून पाहिलं आणि झटकन माझ्या डोक्यात प्रकाश पडला अरे वीज गेली वाटतं??
या भागात आम्ही २००४ पासुन आलो तेव्हापासुन ही पहिलीच वेळ तशी वीज जायची त्यामुळे खरं तर आपल्याच घरचं काही बिघडलयं असं वाटुन मी दिवाळीच्या निमित्ताने घरी असणार्या नवर्याला लवकर उठवण्याची संधी सोडली नाही. तो बिचारा डोळे चोळत खाली आला आणि त्याने पेको (आमचे वीजमंडळ) चा फ़ोन फ़िरवला. त्यांच्या संदेशामध्ये त्यांनी आमच्या भागात काही तांत्रीक बिघाडावर काम चालु असल्याचं अगदी लगेच अपडेट केलं होतं...हम्म्म्म...आता काय करायचं?? एकतर बाहेर तापमान एक आकडी आणि घरातला हिटर बंद. नशीब की आज सुर्यदेवांनी थोडी कृपा केली होती त्यामुळे थोड्याच वेळात निदान सनरुममध्ये तरी बसु शकणार होतो. आणि आमच्याकडे इतरांसारखं कॉइल नाही आपला नेहमीसारखा गॅस आहे त्यामुळे चहा-पाणी तरी होणार होतं. फ़क्त लायटर इलेक्र्टीक असल्यामुळे काडेपेटीने गॅस पेटवायचा होता. मात्र बाकी सर्व बंद. इंटरनेट नसल्यामुळे तर एक अंग गळुन पडलंय असंच वाटत होतं. पाचेक मिनिटांतच माझ्या शेजारणीची सासु आज तिच्या मुलीला सांभाळायला आली होती तीही येऊन चौकशी करुन गेली की आमच्याकडेही तिच्यासारखंच सर्व बंद आहे म्हणून.
पण काही का असेना आज बाकी कसला विचार न करता बाहेरच्या खोलीत सुर्यप्रकाशाची मजा चाखत झोपाळयावर बसल्या बसल्या मला सहजच लहानपणीचे भारतातले वीज जाण्याचे दिवस आणि मुख्य म्हणजे रात्री आठवल्या. आम्ही राहायचो त्या गावात काही ना काही कारणामुळे नेहमीच वीज जायची. कधी खूप पावसामुळे तारेवर झाड पडलंय, कधी कुठला ट्रान्सफ़ॉर्मर जळालाय कधीकधी नुसतंच लोडशेडिंग म्हणून. सुटीच्या दुपारच्या वेळी ती गेली की फ़ारच कंटाळा येई कारण मग खूप गरम होत असे. रात्री विशेषकरुन जेवणं झाल्यावर वीज गेली की मात्र मला खूप बरं वाटे. एक म्हणजे रात्रीचा काही अभ्यास करायला नको आणि दुसरं म्हणजे अशावेळी मग शेजारी पाजारी मिळून कधी अंताक्षरी नाहीतर भूता-खेतांच्या गप्पा असं काही चालु होई. आणि मग एकदम सगळ्यांचे दिवे चालु झाले की सर्व मुलं एकदम ओरडत त्याचीही एक वेगळीच मजा होती. "कॅंडल लाईट डिनर" या भानगडीला नक्की इतकं काय महत्त्व आहे हे मला कधी कळलं नाही कारणं मेणबत्तीच्या उजेडात जेवणं बर्यापैकी नेहमीची. माशांचे काटे नीट दिसतील का हा मला त्यावेळी पडलेला एक गहन प्रश्न असे. आणि कधी कधी आई मला खास काटे काढलेले पिसेस देई ही त्यातल्या त्यात मिळालेली सवलत. हे वीज प्रकरण पुढे माझे भाऊ-बहिण दहावीला वगैरे गेल्यावर महाग पडायला नको म्हणून माझ्या बाबांनी घरी चक्क पेट्रोमॅक़्स घेतली होती. त्याचं तेलपाणी करायला ते बसले की त्यांना पाहायला मला फ़ार मजा येत असे. मात्र एखाद्या "ये जो है जिंदगी" सारख्या लाडक्या सिरियलच्या वेळी जर वीज गेली की मात्र सगळे जण लाईटवाल्यांच्या नावाने शिमगा करत.
सगळीकडे चांगला मिट्ट काळोख असताना खेळल्या जाणा-या आंधळी- कोशिंबीरीची सर मात्र कुठच्याही खेळाला नाही. त्यात आपल्यावर राज्य आलं की संपलंच. मग मात्र कधी एकदा उजेडाचं राज्य परत येतय असं होई. आमच्या चाळीतील मुलं खिडक्यांच्या वर वगैरे चढुन बसत आणि वरुन टपली मारुन कंन्फ़्युज करत.
माझ्या आजोळी सुट्टीत नेहमीच रात्रीचीच वीज नसे. आणि त्या पालघर मधल्या आडगावात गेलेली वीज परत लगेच यायची शक्यताही नसे. त्यावेळच्या मोठ्या ओट्यावर बसुन सगळी मोठी मंडळी बराच वेळ त्यांच्या लहानणीच्या आठवणी काढत त्या अशा ऐकावं ते नवलचवाल्या असत. आणि मग घरात खूप गरम होतंय म्हणून मागच्या सारवलेल्या खळ्यात मस्त खाटा टाकुन चांदण्या रात्रीचं आकाश पाहात झोप कशी येई कळतच नसे. तिथे दुस-या दिवशी कधीतरी वीज परत येई. इतक्या सा-या मावस-मामे भावंडांच्या गराड्यात कळतही नसे की आपली काही गैरसोय होतेय. आमची नाती त्या काळोख्या रात्रींनी खरंतर जास्त घट्ट केलीत. आताच्या अस्तित्त्व टिकवण्याच्या शर्यतीत सगळे कसे पांगलेत आणि पुर्वी काहीच सोयी नसताना आपण कशी मजा केली याची आठवण कधी काळी काढली की नाही म्हटलं तरी थोडं वाइटच वाटतंय.
आता इथे मात्र खरं तर दोनच तास झालेत पण नवरोबांना नेट हवंच आहे असं काहीसं दिसतंय म्हणून पुन्हा एकदा तोच फ़ोन फ़िरवला तर त्यांनी चक्क ५३ घरांमध्ये वीजेच्या प्रश्न आहे आणि १२:२० पर्यंत तो सुटेल असा रेकॉर्डेड मेसेज ठेवला होता. मला नाही म्हटलं तरी थोडं कौतुकच वाटलं. अर्थात प्रगत देश आहे हा म्हणजे इतकं तर नक्कीच असेल. थोड्या वेळाने आमच्या बॅकयार्डमध्ये एक वीजेचा खांब आहे तिथे एक काळा-कभिन्न माणुस येऊन पाहुन गेला. त्याची गाडी गेली आणि पाचेक मिनिटांत वीज परत आली. साधारण पावणे-बारा झाले असावेत. आहेत बाबा वेळेचे पक्के. नेटसाठी लायब्ररीत गेलेल्या नवर्याला मी फ़ोन करुन परत घरी बोलावुन दिवसाच्या सुरुवातीला लागले.