Thursday, August 19, 2010

१ टक्क्याची गोष्ट उर्वरीत...

एक टक्क्याच्या गोष्टीचा प्रारंभ....


माझ्या पोर्टलॅंडच्या विमानाची शार्लेटहून वेळ होती संध्याकाळी सव्वा-सहाची आणि हार्टफ़डहून निघालेल्या विमानाची वेळ होती साधारण साडे-चार. दोन तासांपेक्षा थोड्या कमी वेळाचं हे अंतर जर त्याप्रकारे काटलं गेलं आणि आधी म्हटल्याप्रमाणे तिथल्या गोंधळामुळे माझं विमान जरी वीसेक मिनिटं उशीराने धावत असेल तरी पळत पळत का होईना मी हे विमान पकडू शकले असते.म्हणजे ऑप्टिमिस्टिकली मला उरलेला प्रवास आधीच्या प्लानिंगप्रमाणे करता येणं बर्‍यापैकी शक्य होतं..अर्थात म्हणून मी निर्धास्त नव्हते पण अर्थातच विमान चालवायची सूत्र माझ्याकडे नसल्याने मी काही करुही शकणार नव्हते.मनात मात्र हिरकणीसारखं वाटायला लागलं होतं. पहिल्यांदाच दोन वर्षांच्या मुलाला मी साधारण आठवडाभर जवळ घेतलं नव्हतं. त्यामुळे शार्लेटला डी गेटला विमान लागलं तरी सी-११ ला धावत जायची माझी तयारी होती. आता फ़क्त चाकं खाली टेकायची वाट पाहायची.

सहज माझ्या उजवीकडच्या रो मध्ये एक जोडपं आणि त्यांचा मुलगा बसले होते, त्यातल्या बाजुला बसलेल्या बाबांना विचारलं की तुम्ही कुठे जाताय तर तो म्हणाला सिऍटल. मला उगीच माझं विमान हुकलं तर त्यांचा सहारा होईल का म्हणून विचारलं की कितीचं फ़्लाईट आहे तर तो गृहस्थ शांतपणे उत्तरला २० मिनिटांपूर्वी...अर्रर्र च्चच्च...मी मनात...पण या प्रसंगातही ते तिघं ज्या प्रकारे शांत होते आणि तो आपल्या मुलाबरोबर फ़ुली-गोळा खेळत होता ते पाहून मला खरंच नवल वाटलं..अर्थात माझ्यासाठी मी हिरकणी व्हावं का या विचारात आणि ते तिघं एकत्र हाही मोठा फ़रक होताच म्हणा...असो..

शेवटी एकदाची चाकं टेकली ६-२५ आणि कप्तानाचे सहानुभूतीचे शब्द कानी आले आपल्याला कदाचित गेट मिळायला उशीर लागेल पण आपण सुरक्षित पोहोचलो आहोत हे महत्वाचं. मी शेजारणीच्या खिडकीतून सहज नजर टाकून अंदाज घेतला आम्ही सी गेटला होतो. म्हणजे मला अगदीच धावायला लागणार नव्हतं असं मी स्वतःला बजावत आशावादी राहायचा प्रयत्न केला. तरीही जेव्हा गेटसाठी वळलो तेव्हा उजव्या बाजुला दिमाखात टेक ऑफ़साठी जाणारं दुसरं आकाराने बर्‍यापैकी मोठं विमान दिसलं आणि मनात शंकेची पाल चुकचुकली..अक्षरशः या विमानातून याक्षणी उतरून धाड-धाड बाजुच्या वैमानिकाला बसच्या कंडक्टरसारखं टकटक करुन काय रे पोर्टलॅंड का? हा बघ बोर्डिंग पास असं सांगुन घुसखोरी करावी असा विचारही मनात आला पण यातलं काही म्हणजे काही करता येणार नव्हतं. विमान धक्क्याला(आता आमचे जीव टांगणीला म्हणून धक्क्याला) लागलं आणि ज्यांची विमानं चुकलीत त्या यादीत अर्थातच आमच्या विमानाचा नंबर होता..माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. आता प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी काहीही होणार नव्हतं. कारण इस्ट कोस्टवरुन संध्याकाळी वेस्ट कोस्टसाठी प्रत्येक कंपनीचं एखादंच विमान असतं...

बाहेर आलो. विमान कंपनीने माझ्यासारख्यांसाठी पर्यायी बोर्डिंग पास बनवून ठेवले होते. त्यात मला रात्री १०:३० ला शार्लेटहून अटलांटा आणि मग दुसर्‍या दिवशी सकाळी अटलांटाहून पोर्टलॅंड असा मार्ग होता. ’काय गं भवाने राहायची सोय काय?’ असं सौम्य शब्दात विचारल्यावर नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही काही करु शकत नाही पण दुसरीकडे तुमच्यासाठी हॉटेलसाठीचे सवलतीचे पास आहेत ते घ्या असं त्या तळसुंदरीनं सांगितलं..आता मात्र मी पुरते विटले होते. तो सी-११ चा गेट आमच्या बरोबर उजवीकडे होता म्हणजे मी माझंच विमान जाताना पाहिलं. त्याच वेळी शार्लेटहून प्रत्येक विमानं निदान तासाभराच्या अंतराने उडाली, बरीचशी रद्द झाली होती पण जी काही एखाद टक्का विमानं उडाली त्यात नेमकं माझं विमान होतं...एक टक्क्यावाले आम्ही आणखी काय??

आता इथे वेळ काढून अटलांटापेक्षा इथुनच किंवा किमानपक्षी फ़िलाडेल्फ़िया किंवा गेला बाजार न्यु-जर्सीहून कनेक्टिंग मिळालं तरी बरं असा विचार करुन मी दुसर्‍या एका रांगेत उभे राहिले. आणि मुख्य आता मला फ़िलीला जायचं अजीबात भावूक वाटत नव्हतं.खरं तर या दोन्ही ठिकाणी भरभरुन असलेल्या मित्रमैत्रीणींपैकी कुणी भेटू शकलं तर या दगदगीचा त्रास थोडा कमीच वाटेल असं वाटत होतं. काळाचा महिमा आणखी काय??

इथे अर्थातच त्या बाईने बरेच प्रयत्न केले पण एकतर फ़िलीला जाणारी सगळी विमानं तुडुंब भरली होती, न्यु जर्सीला दुसर्‍या दिवशी संध्याकाळीच उडायचा पर्याय होता, शार्लेटचा आणखी काही प्रॉब्लेम असं सगळं पाहता तिच्या मते मी अटलांटाला जाणं हाच सर्वोत्तम मार्ग होता. काही नाही सगळी एक टक्क्याची कृपा.हवं तिथं काही नसायचंच...असो...मुकाट्याने मी ते हॉटेलचं कुपन घेतलं आणि फ़ोन करायला सुरुवात केली.या गोंधळाचा फ़टका बर्‍याच जणांना बसला असावा. एअरपोर्टजवळचे डिस्कॉंन्टेड पर्याय बुक्ड होते. एकदा फ़क्त माझ्या टीम-लीडला फ़ोन करुन कल्प्ना दिली कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी एक-दोन महत्वाच्या मिटिंग होत्या त्या रद्द करणे आणि मुख्य हा नवा हॉटेलचा भुर्दंड पडणार आहे याची त्याला आधीच कल्पना देणे महवाचं होतं. तो अर्थातच काही नाही म्हणाला नाही. मग निवांतपणे एअरपोर्टजवळच्या आणखी एका हॉटेलचा डायरेक्ट नंबर एका सहकार्‍याकडून घेऊन रात्रीचं बुकिंग केलं. हे सर्व होईस्तो साडे-आठ वाजले त्यामुळे अगदी बेकार मुडमध्ये तिथे एका ठिकाणी रात्रीचं जेवणही केलं.

आता त्या रात्रीच्या फ़्लाइटसाठी शार्लेटच्या त्या विमानतळावर शेवटी सी पासून ए गेटकडे जायची वेळ आलीच. हा विमानतळावरचा प्रवास म्हणजे लास वेगसच्या व्हेनेशियन किंवा कुठल्याही हॉटेलच्या आतमध्ये मॉल्स आहेत अगदी साधारण तसाच आहे. अर्थात व्हेनेशियनसारखं खरंच वाटणार खोटं आभाळ नाही पण सांगायचं म्हणजे एकदम मॉलच केलाय. बराच मोठा आहे हा विमानतळ हेही लक्षात आलं म्हणजे समजा जर खरंच मला आधी म्हटल्याप्रमाणे डी गेटकडून सी कडचं विमान धावत पळत पकडायची वेळ आली असती तर काही खरं नव्हतं..

सवा नऊच्या आसपास मी माझ्या इच्छित गेटला पोहोचले तेव्हा तिथे अर्थातच कुणी कुत्राही नव्हता.असला वैताग आला होता. नंतर यथावकाश लोकंही आली पण विमानाचाच पत्ता नव्हता. अगदी साडे दहा झाले तरी अजुन पुढची सुचना नाही इतकंच काय ती बया सांगत होती. लोकंही बरीच झाली होती. अचानक बाजुच्या फ़ोनवर हिंदी ऐकायला आल्यामुळे माझे कान उगाच टवकारले. एक हैद्राबादचे काका प्रथमच अमेरिकेत आले असावेत आणि मुलीकडून चुलतभावाकडे जाताना या गोंधळात बिचारे या अटलांटाच्या विमानात स्टॅंड-बायला होते.मला त्यांच्या वयाकडे वगैरे पाहून त्यांना मदत हवी असेल तर विचारावसं वाटलं तेव्हा मग आम्ही चांगल्याच गप्पा मारल्या. त्यावर खरं तर एक वेगळी पोस्ट होईल. पण हे काका होते म्हणून प्रत्यक्ष बोर्डिंग जे साडे-अकराला झालं तोपर्यंतचा वेळ तरी चांगला गेला.

या सगळ्या भानगडीत अटलांटाला पोहोचायला साधारण एक आणि तिथुन बाहेर पडून हॉटेलला चेक-इन करुन प्रत्यक्ष झोपायला जायला जवळ जवळ पहाटेचे दोन वाजले.पुढचं विमान आठचं होतं आणि आता कुठलाही चान्स घ्यायचा नव्हता म्हणून इतरवेळी कधीही मी अर्धा तासापेक्षा जास्त वेळ आधी जात नाही पण चक्क साडे-सहाची एअरपोर्ट शटल पकडायचं ठरवलं. काय चाल्ललंय काय यार असा विचार करत मी साडे-पाचचा गजर लावला.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या पोर्टलॅंडच्या विमानात बसतानाच कळलं की त्या टवळीने या विमानालाही एक हॉल्ट आहे हे नरो वा कुंजरो स्टाइलने सांगितलच नव्हतं. म्हणजे विमान बदलायचं नव्हतं पण ते मध्ये फ़िनिक्सला तास-दीड तास तरी थांबणार होतं.कप्पाळ आता काय? हेच ते एक टक्का चान्स होता की मी इतकं प्लानिंग करुन काढलेलं एकच थांबा असणारं तिकिट अस चार थांबे होईल याचं आणि ते एक टक्का माझ्या बाबतीत शंभर टक्के खरं होतंय..दुसरं काय....आता विमानात चढल्यापासून उतरेपर्य़ंतच्या सुचनांची सगळी वाक्य ऐकुन मी इतकी किटले होते की मला वाटतं जर एखादं वाक्य ते विसरले असते किंवा क्रम बदलला असता तर मी त्यांना स्युच केलं असतं...असो...

या मारुतीच्या शेपटाचं रावणाच्या मिशीत रुपांतर करायचं तर सातेक तासांचा विमान प्रवास आणि विमानतळावरचा टाइमपास इ. डोक्यावरुन पाणी म्हणजे दहा तासाचा विमानप्रवास करण्यासाठी मी माझ्या इस्ट कोस्टमधल्या ऑफ़िसमधुन साडे-अकरा वाजता निघाले होते ते मी दुसर्‍या दिवशी वेस्ट कोस्टच्या दोन वाजता घरी (एकदाची) पोहोचले. म्हणजेच इस्ट कोस्टच्या संध्याकाळचे पाच वाजता.म्हणजे तासांमध्ये साधारण सव्वीस तास.....अबबब...इतका वेळ तर मला मायदेशाहून इस्ट कोस्ट मार्गेच वेश्टात यायलाही लागला नव्हता..धन्य तो वेदरडीले आणि धन्य माझ्यासारखे असे एक टक्कावाले...और क्या??



तळटीप: त्यानंतरचे दगदगीचे दिवस अजुनही सुरु आहेत फ़क्त तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणजे मी ती दगदग घरुन करतेय....आणि काही आठवड्यानंतर का होईना पण ही पोस्टही लिहिली गेलीय..आता "गेले काही दिवस कुठे आहेस?" "अगं लिही नं काही" असं सांगणार्‍या माझ्या ब्लॉगप्रेमींना काही तरी स्पष्टीकरण द्यायला हवं म्हणून थोडं उशीरा का होईना थोडंफ़ार सपष्टीकरण मिळालं आणि पटलं असेल अशी आशा.

Tuesday, August 17, 2010

१ टक्क्यातल्यांची गोष्ट

सगळं काही सुरळीत असताना आपलं काम होणार नाही याची एखाद टक्का शंका असते. अशा एक टक्क्यांमध्ये माझा नंबर फ़ार पुर्वीपासूनच लागला आहे असं मला बर्‍याचदा वाटतं..त्याची आणखी एक चुणूक दोनेक आठवड्यापुर्वी एका कामासाठीच्या दौर्‍यासाठी बाहेरगावी गेले तिथे पुन्हा एकदा मिळाली.
तसं मी घरुनच पूर्ण काम करायचा घोशा लावला होता; फ़क्त १ टक्का परिस्थितीत त्यांना मला प्रत्यक्ष भेटावं लागणार होतं आणि (अर्थातच मी ती एक टक्कावाली असल्यानं) तसं झालंही. त्याप्रमाणे पोर्टलॅंडहून पश्चिमेकडे म्हणजे न्युयॉर्क किंवा कनेक्टिकट अशा पर्यायाने मला जायचं होतं. एकतर ही वारी बरीच आयत्यावेळी असल्याने खूप सारी (चांगली पर्यायाची) विमानं बुक तरी होती किंवा त्यांचे भाव भारताच्या तिकीटापेक्षा जास्त दिसत होते.मग तुका म्हणे त्यातल्या त्यात म्हणून एअरपोर्ट ट्रॅफ़िकमधुन सुटका व्हावी म्हणून मी स्वतःच नवीन यॉर्कातले दोन्ही विमानतळ वगळले आणि हार्टफ़र्डची तिकीटं काढली. जाताना रात्रीचं म्हणजे रेड-आयचा एकच पर्याय होता पण परत येताना कुठे उडी मारुन यायचं ते थोडं माझ्यावर होतं. माझ्या जुन्या गावचा म्हणजे फ़िलाडेल्फ़ियाचाही पर्याय त्यात होता पण मला उगाच भावुक व्हायला होईल का असा विचार करुन मी जसं आलं तसंच (म्हणजे लहानपणी आई-बाबा शाळेला जाताना कडेकडेने जा अशा काही सुचना देतात थोडासा तसाच मध्यमवर्गीय विचार करुन) शार्लेटच्या पर्यायावर टिचकी मारली.

निघतानाच कुठं माशी शिंकली माहित नाही.मला निदान पाचेक तास शांत झोपायला मिळावं म्हणून मी १५ डॉलर जास्तीचे भरुन लेग-स्पेसवाली खिडकी घेतली आणि बाजुलाच एक सहा-सात वर्षांचा (अतिक्युरिअस...(चिकित्सकपेक्षा भा.पो. वाटतंय म्हणून)) मुलगा आणि त्याचा काळा बाबा माझे सहकारी होते. विमान उडेपर्यंत त्याच्या हजारो शंकानी माझी चांगलीच करमणूक केली. अगदी आपली निळी बॅग कुठे ठेवतातपासून काय काय प्रश्न होते त्याचे. त्याचा बाबा मात्र अगदी शांत चित्ताने त्याचं शंकानिरसन करत होता.आता हा दमून लवकर झोपणार ही माझी शंका अगदी खरी ठरली; पण दुर्दैवाने त्याने थोड्या वेळाने लवंडण्यासाठी चुकीचा खांदा (अर्थातच माझा) निवडला..त्यामुळे मला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही असं काहीसं झाली आणि अर्थातच माझ्या झोपेचं खोबरं व्हायला सुरुवात झाली.त्यात मला एकदा जाग आली की पुन्हा लगेच झोपही येत नाही. केव्हातरी रात्री त्याच्या बाबाच्या लक्षात आलं आणि माझा खांदा मुक्त झाला पण तोवर उतरायची वेळ झाली होती.तरी बहुधा झोपेचा पगडा बराच असावा त्यामुळे शार्लेट मुक्कामाच्या छोट्या फ़्लाइटमध्ये मी जमेल तितकी झोप काढून घेतली.
विमानतळ ते कामाचं ठिकाण डोक्यावरुन पाणी म्हणजे दिडेक तासाचं अंतर होतं.इतकं ड्राइव्ह कोण करणार आणि तेही अर्धवट झोपेत म्हणून सरळ कॅब केली होती. तोही वेळेवर आला आणि आम्ही निघालो. तो मला म्हणाला बरं झालं न्युयॉर्कला नाही गेलीस ते. That city never sleeps so you would have hit the traffic any time you land. थोडक्यात काय तर आता वेळेत हॉटेलवर आणि मग दुपारची मिटिंग असा मी विचार करत होते.पण तीच ती एक टक्क्याची कथा..नेमकं एका ठिकाणी अपघातामुळे मुंगीच्या पावलाने गाड्या सुरु होत्या आणि आम्ही अडकलो. बिचारा ड्रायव्हर मला म्हणतही होता इथं कधी ट्रॅफ़िक होत नाही. मग त्याने हायवेवरुन गाडी काढून थोडं लोकल रस्त्याने पुन्हा हायवेवर आणलं पण तरी दीडचे सव्वा-दोन तास झालेच. चला नमनाला इतकं पुरे...
कामाबद्द्ल तर काय बोलायची सोय नाही.दिवसभर जर मिटिंग एके मिटिंग केलं तर खरं काम पुन्हा हॉटेलवर आल्यावर करायचं हे बहुधा अंडरस्टुड होतं. त्यात माझं नशीब म्हणजे ज्याच्या जागी मी गेले होते तो हे काम सोडून दोन आठवड्यापुर्वीच गेला होता त्यामुळे कसला आगापिछा न कळता लागलेल्या (किंवा दुसर्‍याने लावलेल्या) आगीवर पाणी शिंपडण्याचं काम माझं..काय बोलणार..पण खरं तर त्यासाठीच आपण असतो. म्हणजे नाहीतर कोण एवढे लाड करणार नाही का? असो..
शेवटी (एकदाचा) परतीचा दिवस उडाला आणि उगाच उशीर नको म्हणून ११:४५ ची कॅब केली. फ़क्त ते मला घ्यायला यायच्या ऐवजी मला त्यांच्या पिक-अपच्या ठिकाणी जायचं होतं. माझा एक सहकारी मला सोडणार होता. पण तो वेगळ्या मिटिंगमध्ये, मी कोणा वेगळ्याबरोबर काम करतेय या भानगडीत निघतानाच उशीर झाला; तरी फ़ोनवरुन कॅबला थांबायला सांगितल्यामुळे निदान तिथे काही गफ़लत झाली नाही. आणि यावेळी चक्क नेहमीच्या वेळेपेक्षा गाडी दहा-मिन्टं लवकरच पोहोचली. सेक्युरिटीलाही काही रांग नव्हती. आता फ़क्त तासभरात विमानात चढलं की झालं. मग शार्लेटचा हॉल्टतर तासभराचा होता. म्हणजे गेटपाशी पोहोचेपर्यंतच बोर्डिंगची वेळ झाली असेल आणि मग तिथुन पाचेक तासात पोर्टलॅंड साधा सोपा हिशेब. कुठेही शिंकणार्‍या माशीचा शिरकाव नाही, असा विचार करत मी दुपारच्या जेवणाची सोय केली. खरंच विमानतळावरचं जेवण जास्तीत जास्त ठिकाणी इतकं टुकार असतं नं..हा विमानतळही नावापुरता इंटरनॅशनल बाकी सगळा थंडा कारभार होता. त्यातल्या त्यात एक मेक्सिकन पर्याय होता तिथुन एक बरीटो उचलुन मी शांतपणे पोटपुजा केली.
बोर्डींगही वेळेवर सुरु झालं.बाजुच्या सहप्रवाशीणीबरोबर हाय-हॅलो झालं. कप्तानाने उगाच आपल्या आगमनाची नांदी दिली..थोडा एकतर्फ़ी संवाद केला, हवाईसुंदरी एक्सिट रो इ. सुचना द्यायला उभी राहिली आणि कप्तानाच्या आवाजाने तिला थांबावं लागलं..ही एकाच नाही तर पुढे शिंकणार्‍या हजारो माशांची नांदी होती. कप्तानाच्या मते शार्लेटला जोरदार पाऊस, वीज इ. मुळे आपल्याला टेक-ऑफ़साठी थोडा वेळ थांबावं लागणार आहे. पुन्हा पंधरा मिनिटांनी पुन्हा तेच. साधारण अर्धा तासांनी शार्लेटचा पाऊस थांबायची बातमी आली. पण टेक-ऑफ़चा सिग्नल मिळणार तितक्यात आमच्याकडे वरुणराजांनी बरसायला सुरुवात केली. निघताना चांगला गॉगल घालावा लागेल इतकं ऊन असणार्‍या ठिकाणी हा अंधारुन आलं आणि माझ्यासारख्यांची दयामाया न करता ढग बरसू लागले.आम्ही अर्थातच विमानातच बंदिस्त झालो. थोड्या वेळाने आम्हाला आणखी दिड तास उडायची संधी नसल्याने बाहेर पडायची परवानगी मिळाली.
एवढ्या वेळात वेळेचं गणितही काही कळत नव्हतं. बाहेर पडावं की न पडावं या विचारात मी तशीच बसून राहिले. नवर्‍याला कल्पना दिली.तोही बिचारा आठवडाभर मी नाही म्हणून मुलाला एकटं सांभाळून कंटाळला होता त्यात ही भर.शेवटी वीसेक मिनिटांनी माझी पेटली की जर मला ते फ़िलाडेल्फ़ियाचं कनेक्शन दिलं तर निदान माझी कनेक्टिंग फ़्लाइट मला मिळू शकेल. म्हणून मी बाहेर गेले आणि काउंटरच्या भल्या मोठ्या रांगेत उभे राहिले तोच आमच्याच फ़्लाइटला सिन्गल मिळाला आणि पुन्हा एकदा पळापळ.मीही त्या लोकलाटेबरोबर आत गेले. आणि पावणे-तीन ऐवजी साधारण साडे-चारच्या दरम्यान आम्ही उडालो.

आता प्रश्न होता तो म्हणजे मला माझी शार्लेटची कनेक्टिंग फ़्लाइट मिळेल का? हवाईसुंदरीकडे जरा मस्का लावुन पाहिला की बाई मला जरा पुढे बसायला दे म्हणजे उतरताना मी पळत माझी फ़्लाइट पकडेन. पण पुढे म्हणजे फ़र्स्टक्लास हाच पर्याय होता बाकी सगळ्या जागा भरल्याच होत्या. शिवाय तिचं म्हणणं एक शक्यता शार्लेटला आधीच गोंधळ झाला आहे म्हणजे तुझी फ़्लाइट तिथेचही असेल आणि दुसरं म्हणजे माझ्याच बोटीतले बाकी प्रवासी आहेत त्यामुळे ती फ़क्त हे विमान शार्लेटला पोहोचल्यावरच काय ते करु शकेल.
मग काय झालं पुढे माझं आणि त्यातल्या त्या एक टक्क्यावाल्या बर्‍याचशा गोष्टींचं????

Saturday, August 14, 2010

आला पिकनिकचा महिना

ऑगस्ट महिना अमेरिकेत "picnic month" म्हणून साजरा होतो असं मागेच रेडिओवर ऐकलं आणि उगाच भावूक व्हायला झालं..गेली काही वर्षे न कळत ऑगस्टमध्ये कितीतरी पिकनिकचा भाग आम्ही सारखेच झालो होतो. अर्थात ऑगस्ट म्हणजे मुलांच्या शाळांच्या सुट्टीचा शेवटचा महिना किंवा काही राज्यात शेवटचे आठवडे, उन्हाळा भरात आलेला, मावळतीचं ऊनही उशीरापर्यंत थांबलेलं, शेतांमध्ये मक्यापासून,वेगवेगळ्या बेरी,पीच,भाज्या सगळ्यांचाच बहर या पार्श्वभूमीवर बाहेर जाऊन खेळणं, खाणं नाही व्हायचं तर काय. म्हणजे त्यावरुनच हे असे मास साजरे होतात इथे. जस जुलैच्या गरम लाटांमध्ये आइस्क्रिम आपसूक जास्ती खाल्लं जातं म्हणून तो "Ice cream month" जाऊदे सध्या हे पुराण इथंच थांबवते कारण खादाडी निषेधासाठीची एक पोस्ट या महिन्यात आधीच टाकून झालीय. खरं तर जुलैमध्ये आइस्क्रिमबद्द्ल लिहायचं मी जाणीवपुर्वक टाळलंय...(आळशीपणाला किती गोंडस शब्द मिळाला नाही??)


हम्म्म्म...तर असा हा ऑगस्ट आला की जवळच्या मराठी मंडळाची पिकनिक आधीची प्लान्ड असायची. त्यात जायचं म्हणजे खेळ आणि खाऊ दोन्हीमध्ये आपलाच मेन्यु...सुरुवातीला नमन चविष्ट भेळे, प्यायला पन्हं असं पार पडलं की मंडळी पार्कात खो-खो, लगोरी, क्रिकेट असे देशी खेळ खेळून दमली की मग वडा-पाव-चटणी, पार्कातच समोर भाजलेली कणसं, रसरशीत कलिंगड यावर ताव मारत दुपार कशी निवायची कळायचंही नाही...बच्चा, बच्चे के मॉं-बाप आणि मायदेशाहून आलेले आजी-आजोबा सगळ्यांसाठी आठवणीतला एक मस्त उनाड दिवस. आम्ही जिथे राहायचो तिथेही काही एक छोटा मराठी ग्रुप होता. ही मंडळीही एकदा जवळच्या पार्कात एखादी छोटीशी पिकनिक प्लान करत आणि मग विकत मिळणारे बर्गर पार्कातल्या ग्रिलवर ग्रिल करुन त्यासोबत चिप्स, ज्युस, सोडा अशा अमेरिकन साध्या-सोप्या मेन्युमध्ये रंगलेल्या मराठी गप्पांमध्ये हाही दिवस उन्हाळ्यातल्या आठवणीत राही.

आणखी एक ग्रुप होता माझी एक मैत्रिण सत्संग करायची त्यांचा. आम्ही महिन्यांतून एखादवेळा त्यांच्या कार्यक्रमाला जायचो पण त्यांच्या वार्षिक सहलीला ती आमच्या कुटुंबाला आवर्जुन बोलवायची. या ग्रुपमध्ये गुजराथी मंडळी जास्त होती आणि त्यामुळे अर्थातच मेन्यु विविधता. एका वर्षी त्यांनी मेक्सिकन भेळ केली होती. एकदम पोटभरा प्रकार आहे. रिफ़्राइड बीन्स एका आंटीने घरुन करुन आणल्या होत्या. त्यावर मग बारीक चिरलेले कांदा, टॉमेटो, साल्सा आणि खूप सारं चीज घालून मिक्स करुन खायचं...सोबर चिप्स होत्याच..(आता गुजु म्हटलं की चिप्स आणि चीज नसेल तर खायचं चीज नाही व्हायचं म्हणा) मग त्याच पार्कमध्ये टेनिस, व्हॉलिबॉल, क्रिकेट खेळून दमल्यावर मग थंड कलिंगडाचा उतारा. काही वेळा तर सकाळीच नवर्‍याला चिकन तंगड्या ग्रिल करायचा मूड आला की मग मसाला लावुन त्या भरुन आणखी एखाद्या मित्रमंडळाला फ़ोन केला की त्यांच्याबरोबर मग पार्कात भेटून तिथेच त्या ग्रिल करणं, सोबतीला चीजचं पुरण भरलेल्या भोपळी मिरच्या (इथल्या मिरच्या त्यातल्या त्यात ढमाल्या असतात त्यामुळे पोटही छान भरतं), हवा असल्यास पाव, घरात भाजायच्या लायकीचं असेल ते कांदा-बटाट्यापासून मक्यापर्यंत काहीही पोटात ढकलताना दिवस कसा जायचा कळायचंही नाही. जास्त खाल्लंय असं वाटलं तर तिथल्या तिथं एखादा ट्रेल करुन टाकायचा म्हणजे उगाच गिल्टी फ़िलिंग पोटात घेऊन घरी जायला नको.

या अशा पार्श्वभूमीवर अजून न रुळलेल्या या ओरेगावात(आता हे रडगाणं कधी थांबवणार मी??) थोडं बोअर होणार असं वाटत असतानाच त्यादिवशी नवरा म्हणाला आमच्या ऑफ़िसची पिकनिक आहे आणि तीही ऑफ़िसच्याच आवारात. म्हणजे मान्य आहे मला याच्या ऑफ़िसचा कॅंपस अम्मळ जास्तच मोठा आहे पण तरी रोज ऑफ़िसला जाणार्‍या लोकांना पुन्हा तिथेच बोलवायचं म्हणजे कॉस्टकटिंग की काय रे? असा विचार करतच मी तिथं पोहोचले आणि एका दिवसात त्या भागाचा नक्षाच बदलला होता. इतर वेळी नुसतं वेल-मेंटेन्ड गवताचा भाग होता तिथे मस्त कनाती, तंबु, संगीत अधुन-मधुन येणारा संगीताचा आवाज आणि खूप सारी माणसं(हेही महत्वाचं नाहीतर इथे लोकं दिसणं म्हणजे एकंदरितच...जाऊदे) पाहून माझे आधीचे विचार कधी बदलले कळलंच नाही. मुलांसाठी चित्रकला, तोंड रंगवणे, फ़ुगेवाली, राइड्स, हुलाहुप स्पर्धा, आणखी ते आपण टेलिमॅचमध्ये पाहायचो त्यासारखी एक धावण्याची स्पर्धा असलं बरंच काही होतं...खाऊचीही चंगळ होती..बार्बेक्युचा धूर मागच्या बाजुला भगभगत होता. मेन्यु अर्थातच अमेरिकन होता. शाकाहारींसाठी बर्गर सॅंडविच, सॅलड, मांसाहारींसाठी हॉट डॉग, चिप्स, मका, फ़ळं, अधेमधे टाइमपास म्हणून म्हातारीचा कापूस, आणि शौकिनांसाठी वाइन बार वगैरे बरंच काहीसं होतं..इतकं वर्णन काय करते मी? थोडीतरी फ़ोटोझलक टाकायला हवी म्हणजे नकळत(??) आलेल्या खादाडीचाच उल्लेख जास्त झाल्याने तयार झालेल्या निषेधांच्या खलित्यांचं रुपांतर कौतुकात होईल....

Saturday, August 7, 2010

मावशीबाई तुझी बोली मऊ...

या टीपेचा पोस्टशी संबंध नाही पण तरी एकामागे एक दोन पोश्टा टाकायचं कारण आधीची लिहून ठेवली होती पण फ़ोटोसाठी थांबली होती आणि मीनलने खो कधीच दिल्याने हिचा पण लगे हातो नंबर लावला...नाहीतर एकंदरीत हा ब्लॉग ज्या आळशीपणे पुढे जातोय त्यावर सध्यातरी काही उपाय दिसत नाहीये.....




मुख्य टीप: स्वअनुवादीत कविता या ब्लॉगवर वाचायचं धैर्य करणार्य़ा समस्त वाचकांसाठी ही टीप पुढे जायच्या आधीच देतेय...हे (सु किंवा दु) भाग्य आपल्यावर ओढवण्याचं कारण या टॅगचा कर्ता करविता आणि मला नाही तर वाचकांना टांगवून ठेवणारी मीनल हीच जबाबदार...



मीनलने खो दिला आणि परीक्षेत सगळा पेपर ऑप्शनला टाकलेल्या भागावर आला तर काय होईल तेच झालंय...म्हंजे खरंच अशी सिच्युएशन उर्फ़ खड्ड्यात मी पडलेय तर मी काय करेन?? अक्षरशः वाट्टेल ते लिहेन...आणि मग शेवटच्या ख्रिसमसचं रुपांतर मागची दिवाळी असं झालं तर हा पेपर मॉडरेटर वगैरे सोडा अगदी चितळे दामले पासून ते वरच्या वर्गाचे चांगले सोळणकर मास्तर आले तरी भोपळ्याचं चित्र घेऊन येईल...आणि काय??? खरं तर ऑप्शनच्या भागवर इतकं नमन पण खूपच आहे म्हणा...पण तरी एक मध्य टीप देतेच कारण नंतरच्या शिव्या कमी व्हाव्यात अशी एक सदिच्छा आहे नाहीतर ते आपल्या हरीतात्यांमधल्या शाइस्तेखानासारखं हवं तर दुसर्‍या हाताची बोटं कापा पण शिवी नको प्रमाणे हवं तर दोन भोपळे काढा पेपरवर पण हा शाब्दिक भडीमार नको....(उगाच या पोस्टचं मुपि प्रकरण व्हायचं...)



हं तर मध्यटीप : Last Christmas माझं मावसभाषांमधलं खरं तर आवडीचं गाणं आहे...त्यातलं काव्य, संगीत सारं काही आवडतं..पण तरी त्याचा आणि अनुवादाचा तसा काही संबंध नाही हे कळलंय तरी मी पोस्टतेय यामागे निव्वळ त्या कवितेची माझ्यासारख्या होतकरु कवींनी वाट लावु नये हाच आहे...तसंही होतकरु या शब्दाचा बोलीभाषेतला अर्थ "करु करु पण होत काही नाही" असा आहे याची सु.वा. नोंद घेतीलच म्हणा..

शिवाय जॉर्ज मायकल काय माझ्या मागे येणार नाही कारण त्याला अनुवादाचा अनुवाद करुन दाखवला तरी ते कळणार नाही..तो जास्तीत जास्त एक जांभई देईल...त्यामुळे I am actually playing safe...



मूळ गाणं:

LAST CHIRSTMAS

Last Christmas, I gave you my heart
The very next day, you gave it away
This year, to save me from tears
I'll give it to someone special

Once bitten and twice shyed
I keep my distance but you will still catch my eye
Tell me baby
Do you recognize me
Well, it's been a year, it doesn't surprise me
Merry Christmas, I wrapped it up and sent it
with a note saying "I love you", I meant it
Now I know what a fool I've been
But if you kiss me now, I know you'd fool me again

Last Christmas.........

A crowded room and friends with tired eyes
I'm hiding from you and your soul of eyes
My God, I tthought you were someone to rely on
Me, I guess I was a shoulder to cry on
A face on a lover with a fire in his heart
A girl on a cover but you tore her apart
Maybe this year
Maybe this year I'll give it to someone special

Cause last christmas....

And last Christmas
And this year
It won't be anything like, anything like....


आता माझं होतकरू गाणं....

मागची दिवाळी

आठवतं का मागच्या लक्ष्मीपुजनात, देवळात समोरच पूजा करणारी तू आणि देवाला सोडून या देवीत आणखी गुंतलेला मी?
शेवटी दिवाळीच्या मुहुर्तावर विचारलंच तुला थेट
अन हाय! लगेच भाऊबीजेचं ताट घेऊन घेतलीस तू माझी भेट
या वर्षी मात्र, या वर्षी मात्र आहे मी सावध
शोधतोय वेगळ्याच टाइपचं सावज

या आधीही खाल्लीय एकदा चप्पल अन दोनदा वाटली लाज
ठेवलं मीही अंतर... पण तू मात्र नजरेचं गारुड करुन करुन टाकलंस मला खाक
सांग मला, सांग मला ओळख तरी देशील का?
अर्थात वरीस झालं म्हणा या घटनेला पाठी लागलेल्या प्रत्येक पोराचा हिशेब तू तरी ठेवशील का?
शूभ दिपावली म्हणता म्हणता "प्रेम करतो तुझ्यावर" असं चिट्ठीत म्हटलं तरी वेडी हाक माझी तू ऐकशील का?

अगं मला कितीही मनापासून वाटलं तरी तुला गं का तसं वाटेल??
आणि आता, आणि आता पप्पी जरी दिलीस तरी चटका मला बसेल....
कारण?? अगं कारण मागच्या दिवाळीच्या मुहुर्तावर विचारलंच तुला थेट
अन हाय! लगेच भाऊबीजेचं ताट घेऊन घेतलीस तू माझी भेट

या वर्षी मात्र, या वर्षी मात्र आहे मी सावध
शोधतोय वेगळ्याच टाइपचं सावज

एक गर्दीमय खोली आणि त्यात (थोडीशी जास्त झाल्याने) थकल्या डोळ्यांचे मित्र
त्यातचं तुलाही पाहताना लपतोय मी तुझ्या त्या नजरेपासून...
आताही जाणवतंय किती विश्वास होता माझा तुझ्यावर तेव्हा
आधाराचा खांदा मीच का असं वाटण्याचे दिवस होते तेव्हा
प्रेमिकेचा चेहरा अन हृदयातली जणू काही आग
मनमासिकाचं कव्हर जणू... पण फ़ाडून ते स्वतःच, गेलीस स्वतःच्या तालात

पण काही नाही...पण काही नाही... मीही म्हणतो, आम्हा मुलांच आयुष्यच असं असतं
या दिवाळीला तू नाही म्हटलंस तर ....दुसर्‍या दिवाळीपर्यंत दुसर्‍या कुणाचा तरी नंबर नक्की असतो...

म्हणूनच म्हणतो म्हणूनच म्हणतो...
या वर्षी मात्र, या वर्षी मात्र आहे मी सावध
शोधतोय वेगळ्याच टाइपचं सावज

जर ही कविता(??) वाचून इथवर पोचला असालचं (एकदाचे) तर ही तळटीप:  ही कविता लिहीताना मजा आली आणि अचानक वरदाबाईंच्या तालमीची आठवण झाली...पु.ल.म्हणतात त्याप्रमाणे त्या पेटीवर न सापडणार्‍या पट्टीच्या गायिका होत्या त्याप्रमाणे माहितीतल्या दोनेक छंदात मीही मुक्तपणे बागडून घेतलेय...शिवाय कवितेच्या पोस्टवर पण फ़क्त सुप्रसिद्ध लेखकांच्या उपमा सुचतात हाही संदर्भ बोलका आहेच म्हणा..जाता जाता, बाय द वे कवितेत कंस असतो का?? की कंसातली ही पहिली (आणि कदाचित अखेरची) कविता??पुन्हा हा मोका तुमच्या आमच्या अणि अर्थातच या ब्लॉगच्या वाट्याला न येवो हीच सदिच्छा...

आणि निव्वळ निदान पुरुषवर्ग ही कविता वाचेल या आशेने मी वटवटराव हेरंब आणि चुरा पाव प्रसाद यांना
’खो’तेय....

करुया अंगत "पंगत"

यावेळच्या मायदेशवारीचं वैशिष्ट्य म्हणजे खादाडी चळवळीवर भर...त्याचं कारण इथे आपल्या चवीचं मिळत नाही यापेक्षाही मागच्यावेळी गेले होते त्यावेळी आरुष खूपच लहान होता त्यामुळे मला कुठेही बाहेर खायला देण्यात आलं नव्हतं...(म्हंजे तेच ते परवानगी) तरी चोरुन-मारुन एक दोन डल्ले मारले होते पण यावेळी राजरोसपणे खाऊगल्यांची भटकंती करायची होती..आणि आम्ही दोघंही खव्वेये असल्याने काही प्रश्नच नव्हता.


बोरीवलीच्या मुक्कामात जास्तीत जास्त वेळा गेलेलो ते हे ठिकाण म्हणजे "पंगत". हे आहे बोरीवली पश्चिमेला गोराईच्या सेक्टर २ च्या दिशेने जाताना एकदा वजिर्‍याच्या देवळाकडून सरळ लिंक रोडचा सिग्नल ओलांडला की आधी उजवीकडे "सायली इंटरनॅशनल स्कूल" दिसते तसंच डावीकडे एक मैदान आणि थोडं पुढे उजवीकडे "पंगत" उभं आहे. जेवणाच्या वेळेच्या थोडं आधी गेलं तरी आम्हाला वरती एसीमध्ये जागा मिळाली नव्हती आणि आणखी थोडं उशीरा गेलो असतो तर मात्र रांगच लावावी लागली असती. एकंदरित खवैयांची गर्दी असणारी जागा; पण जायला मात्र हवं हमखास.

मालवणी जेवण ही इथली खासियत. साधा-सोपा मेन्यु आणि वाढणी पण पुरेशी. किंमत मात्र अगदी वाजवी.पहिल्या वेळी आमचं बिल माझ्या भावजींनी दिलं होतं त्यामुळे पाहिलं नाही पण दुसर्‍या वेळी आम्ही सहा माणसं व्यवस्थित हजाराच्या आत का कायतरी जेवलो असू म्हणजे नक्कीच परवडणलेबल आणि मुख्य म्हणजे मासे खाण्यासाठी जाणार असाल तर जे मिळणार ते अगदी ताजं...जे ताजं मिळत नाही ते त्यादिवशी नसतं..उदाहरणच द्यायचं तर पहिल्या वेळी खाल्लेली सुरमई आवडली म्हणून दुसर्‍या वेळी मागवली तर त्यादिवशी ती नव्हती पण बांगडा होता. शाकाहारी लोकांसाठी अगदी कोथिंबीर वडी पासून वालाच्या उसळीसारखे अस्सल मराठमोळे पदार्थ आहेत. (जाणार आहे मी एकदा शाकाहारीसाठीसुद्धा..:))

आम्ही पहिल्यांदी गेलो ते ताईकडे तिला जेवण करायचा त्रास द्यायच्या ऐवजी त्यांच्याच (आणि आता आमच्याही) पसंतीचं हे ठिकाण ट्राय करण्यासाठी. पाच मोठी आणि दोन छोटी म्हणजे तरी बर्‍यापैकी माणसं होतो. त्यामुळे भरपुर काय काय मागवलं. तळणी खायला (आणि करायला सुद्धा) पटाईत असणार्‍या माझ्या नवर्‍याने आपण वडे मागवणार असल्याचं आधीच जाहिर केलं आणि माझे बाबा,भावजींनीही त्याला दुजोरा दिला. पण मला आंबोळी आवडतात आणि इतरवेळी खाल्या गेल्या नाहीत म्हणून मी मात्र आंबोळी खायचं डिक्लेअर केलं, माझी भाची म्हणजे तशी माझीच मुलगी तीपण मला सामील झाली. पण इथली तांदळाची भाकरी छान असते म्हणून ताईने मात्र आठवणीने भाकरी मागवली आणि बरं केलं सगळंच खायला मिळालं...कुणी काय मागवलंय काय करायचंय. मग सुकं म्हणून तळलेली मांदेली आणि सुरमई तर पापलेटचा नंबर कालवणात लावला. प्रत्येकवेळी काहीतरी हटके खायचं मनात असतं आणि असा पदार्थ शोधणारं माझं अर्धांग यावेळी मोरी म्हणजे काय? असं म्हणून एक मोरीचंही कालवण मागवलं..सोलकढी, भात हे अर्थातच होतंच. ये मोरी, मोरी क्या है म्हणत तो मासा ज्यांनी ज्यांनी तोंडाला लावला त्यांना त्याची चव इतकी आवडली की हा आयटम मागवल्याबद्द्ल नवर्‍याने सर्वांतर्फ़े स्वतःच कौतुकही करुन घेतलं.

आंबोळी इतकी लुसलुशीत होती की मी आणखी मागवली कारण नंतर मलाच मिळाली नाही का असं मला वाटलं..शिवाय जे जसं संपेल तसं मागवलं जातच होतं...आमची ऑर्डर घेणार्‍याला आम्ही किती दिवसांचे उपाशी आहोत असं तर वाटलं नसेल नं? असं आता हे लिहिताना मला वाटतंय. असो.

सगळं दहा-पंधरा मिनिटांत चाटुन-पुसून ताटं लख्ख झाली तरी काहीतरी राहिलं होतं बहुतेक म्हणून मग आठवणीने खरवस मागवला गेला आणि बहुतेक केशर घातलेला तो लुसलुशीत खरवस घशाखाली उतरवुन तृप्त होऊन आम्ही खाली उतरलो ते पुन्हा इथे यायचंच यासाठीच.

आणि त्यानंतर साधारण दीड आठवड्यातच परत आलो..यावेळी आई-बाबा,भाचे कंपनी आणि आम्ही दोघं. मुद्दाम विकडेजच्या दुपारी आलो. रांग नसली तरी बर्‍यापैकी गर्दी होतीच. यावेळी नवं काहीतरी म्हणून खीमा फ़्राय मागवला आणि मासे खातोय तर कशाला म्हणता म्हणता तो आधी आणला गेल्याने त्या खीम्याचा फ़न्ना कधी उडवला ते कळलंही नाही. आणि यावेळी आठवणीने खाला तो तळलेला बांगडा..या फ़ेरीचं वर्णन करण्यापेक्षा दोन्हीचे मिळून फ़ोटो (खरं सुरुवातीला फ़ोटो काढले नंतर मात्र सरळ डल्ला...)पाहिले की तुमची पावलंही या पंगतीत नक्की वळतील आणि सारखी सारखी येत राहतील...आणि मला निषेधाचे कमी खलिते मिळतील काय?? यंज्व्याय...