Wednesday, December 31, 2014

चले चलो

खरं मला या पोस्टचं नाव hibernation द्यायचं होतं पण त्याचा मराठी अर्थ निष्क्रियता आहे हे पाहिल्यावर तो विचार रद्द केला. निष्क्रिय या शब्दा मध्ये जो ढिम्मपणा आहे तो मनात आणलं तरी प्रत्यक्षात आणणं कठीण इतके आपण परिस्थितीने बांधले असतो. माझं जाऊदे, माझ्या आसपासच्या सत्तरीतल्या पालक मंडळींना पाहिलं तर तर तेही नुसतेच बसून राहिलेत असं क्वचितच दिसतं. 

तर असो. सांगायचा मूळ मुद्दा पूर्ण विसरायच्या आधी हेच म्हणायचं होतं की या वर्षी जसा छान वसंत आणि मग थोडा वाढीव उन्हाळा मिळाला, इथवर सगळं कसं चांगलं सुरु होतं. नुसतं विकेंड टू विकेंडच्या ज्या सगळ्या ट्रिपा केल्या त्याबद्दल लिहायचा पेशन्स असला तर हातून बरीच प्रवासवर्णनं लिहून झाली असती आणि त्यांची आठवण संग्रहीत राहिली असती. बघूया आता पुढच्या वर्षी या जुन्या ट्रिप्सबद्दल काही खरडता आलं तर. 
पण मग पानगळती सुरु झाली आणि नेहमीचेच छोटे छोटे प्रश्नदेखील मोठे वाटू राहिले. उगीच होणारी चिडचिड स्वतःलाच त्रास देऊ लागली. ऑफिशियली हिवाळा एकवीस डिसेंबरनंतर येतो पण इकडे आधीच त्याचा इफेक्ट येऊ लागला.  

 त्या दिवशी एक अस्वल थंडीत झोपून राहतं आणि बाकीचे प्राणी त्याच्या गुहेत येऊन मज्जा करून जातात अशा अर्थाची एक बालगोष्ट वाचून  झाल्यावर असंच आपण पण हायबरनेट करावं असा विचार मनात आला. थंडी इतकी कडाक्याची आहे की कामासाठी बाहेर पडूच नये, तिकडे कोणाचं काय सुरु असेल आपल्याला काय त्याचं, तिकडे कशाला आपल्याच घरात काही मज्जा सुरु असतील तरी आपण त्याचा भाग न बनता सरळ त्या अस्वलासारखं ढिम्म झोपून राहावं असं या थंडीने किंवा त्यामुळे येणारे आजार आणि इतर कटकटींमुळे झालंय. तरीदेखील एक उडी थोडं साऊथला मारून आलोय आणि मग पुन्हा आजारांची रांग मार्गी लावतोय. या परीस्थितीत एक मोठा आरामाचा कार्यक्रम तर हवाच. 

अर्थात असं काहीही वाटलं तरी प्रत्यक्षात जास्तीत जास्त तासभर स्वतःच्या दुखण्यांना देऊन आपण सावरतो. हा थोड्या वेळचा चढ आहे पुन्हा उतारावर आपलीपण गाडी लागेल ही आशा असते आणि तसंही हायबरनेट करायची सोय नाही हे वास्तव आहेच. 

आम्हाला शाळेत या दिवसात शनिवारी आमचे ड्रीलचे सर एक दो एक दो करायला लावायचे. आज ही पोस्ट लिहिताना जरा मागे ब्लॉगकडे लक्ष दिलं तेव्हा लक्षात आलं. या वर्षी महिन्यांची अनुक्रमणिका पहिली तर अगदीच एक दो, एक दो आहे एखादवेळेस तीन. बाकी, प्रकार बदल, वगैरे काही नाही. म्हणूनच सुरुवातीला लिहिताना ब्लॉग पण निष्क्रिय झालाय का असा विचार करत होते. पण या एक दो, एक दो मध्येच पुढे चालायचं बळ  मिळेल असं वाटलं. छोटी छोटी पावलं का होईना पण हालचाल आहे. म्हणून हे स्वतःचं स्वतःला सांगणं की चले चलो.

उद्या दिनदर्शिका बदलायची तर त्याचं स्वागत निष्क्रिय शब्दाने करण्यापेक्षा "चले चलो". शुभेच्छा तर सर्वांसाठी आहेतच. Welcome 2015 आणि जाता जाता २०१४ मधल्या काही महत्वाच्या भटकंतीचं हे कोलाज.

Sunday, December 21, 2014

सुरज की बाहों में...

माझं त्याचं प्रेम तसं पाहायला गेलं तर खूप जुनं पण बहुतेक मलाच ते माहित नव्हतं. त्याला माहित असावं पण मीच जेव्हा तो नेहमी असायचा तिथे राहायचं सोडून लांब लांब जात राहिले. मग मलाही त्याने दर्शन द्यायचे दिवस कमीकमी केले. आज तर सगळ्यात लहान दिवस म्हणजे तो दिसला तरी कमीच वेळासाठी पण आमच्याकडे तर चांगला दहा दिवस तो दिसणार नाही असं आधीच माहित आहे. हो, हा  तोच तो आपला दिवस ज्याच्या येण्याने सुरु होतो  जाण्याने संध्याकाळ संपते तो रवि/सूर्य, माझा हिवाळ्यातला आशेचा किरण. 
जेव्हा काळोख्या दिवसाने नैराश्याचं वातावरण येतं तेव्हा त्याला शोधायला मी दक्षिणेला गेले आणि अपेक्षेप्रमाणे तो प्रशांत महासागरावर माझी पहाटे वाट पाहत होता. त्याला पाहताना त्या दिवशीचा तो वॉक मी नक्की कितीवेळ केला त्याची कुठे मोजदाद करा?


एखादा दिवस असा येतो जेव्हा तो असतो पण आपल्या रोजच्या धावपळीत त्याच्यासाठी वेळ नसतो आणि नेमकं त्याच दिवशी त्याच्याकडे मोप वेळ असतो मग रुसून तो जायच्या आधी त्याला पाहून घ्यावं. इथे कुणाला माहित तो पुन्हा केव्हा दिसणार आहे? 



आणि खरं तर असंच होतं. तो लवकर येतच नाही. नैराश्याचे ढग दाटून येणार, त्याची ही मैत्रीण त्याच्याविना एकटी होणार हे त्यालाही जाणवतं आणि मी ऑफिसला जायच्या रस्त्यावर फक्त माझ्यासाठी तो त्या आमच्या लाडक्या जागी येतो. नुसता येत नाही तर मी माझ्या मनातल्या भावना त्या दिवशी जास्त प्रगट केल्या म्हणून एक खास नजारा प्रदर्शीत करतो. त्यादिवशी सहकार्यांना सेलफोनमध्ये त्याला दाखवताना," तुला कसा दिसला?" म्हणून भाव पण खायला मिळतो. 





त्याच्याबरोबर किंवा फक्त त्याच्याबरोबर शेयर केलेले असंख्य क्षण मी जपलेत, हे माझे जुने अल्बम पाहायला गेले की लक्षात येतं. माझ्या कित्येक कातर संध्याकाळी,प्रसन्न किंवा काही वेळा मरगळलेल्या सकाळी, तो माझ्यासाठी असतो . मला खरचं तो किती आवडतो हे मला नेमकं तो जेव्हा खूप दिवसांसाठी दिसणार नसतो तेव्हा जाणवतं. अशावेळी माझ्या स्वार्थी मनाला मी खूप कोसते.    


तो वाट पाहायला लावतो पण जेव्हा येतो तेव्हा आधीचा विरह संपतो आणि पुन्हा मी त्याच्याबरोबर ते जुने संवाद करायला तयार होते.

आमची मैत्री, आमचं प्रेम इतकं जुनं आहे की आणखी कुणी कितीही प्रयत्न केला तरी ते आमच्या दोघातून निघून जाणार नाही आणि या भरवशावरच तर हे संबंध अव्याहतपणे टिकून आहेत.






या प्रेमाची ही चित्रगंगा. त्याच्या आजच्या सर्वात लहान दिवसानंतर पुन्हा दिवस मोठा होणार आणि मग  माझ्यासाठी  आशेची ऊर्जा घेऊन तो येणार त्याची ही नांदीच. 


Thursday, November 6, 2014

अल्याड पल्याड

आज बरेच दिवसांनी इथे येणं झालं. सुरुवात काही वर्षांपुर्वी डावीकडच्या  बैठ्या इमारतीतून झाली होती. त्यानंतर मग यथावकाश उजवीकडची थोडी लाम्बुळकी आणि आधीपेक्षा मोठं परसदार (backyard) असलेल्या इमारतीतले वर्गदेखील आमच्या ओळखीचे झाले; नव्हे त्यांची सवय झाली.

सुरुवातीला म्हटलं तसं, मध्ये काही महिने फारसं येणं झालं नाही. पण कधीतरी आलं की मी माझ्या पिल्लांना तिथे रोज सोडायचे माझे जुने दिवस चटकन तरळतात. तेव्हा मुलांना सारखी आई लागायची. त्याची जागा बाबाने कशी पटकन घेतली हेही लक्षात येतं. आई काय, बाबा काय, मुलांना घरच्या माणसाला इथून निरोप देताना व्हायचा तो तात्पुरत्या विरहाचा त्रास व्हायचाच पण तरी जितक्या लवकर ती नवीन रुटीनला रुळतात तसे आपण मोठे रुळतो का हे एक मोठंच कोडं. 

आजही आम्ही आत आलो आणि मग यावर्षी आमचा वर्ग जवळजवळ शेवटाला असल्याने तो एक थोडा मोठा हॉलवे आहे तो चालायचा. चालताना डावीकडे आधी एका वर्गाचं दार आणि मग एक छोटी त्रिकोणी खिडकी असे एकामागून एक तीन चार वर्ग पार केले की आमच्या वर्गाचं दार. त्यापल्याड एक छोटी दुनिया. तिथलं सगळचं छोटं छोटं. काही मुलांना आईबाबा परत जाताना एखादं पुस्तक वाचून दाखवताना बसायला ठेवलेला सोफा आणि शिक्षकांचा laptop ठेवायचं टेबल वगैरेच काय त्या तशा मोठ्या गोष्टी. बाकी सगळं इवलं इवलं. छोट्या छोट्या टेबलांपाशी काही बाही करू पाहणारी छोटी छोटी मुलं. त्यातली काही त्या दिवसाला रूळलेली, स्वत:चा पसारा करून त्यात रमणारी तर एकदोन थोडी हिरमुसलेली आईबाबांना नुकताच निरोप देऊन भांबावलेली. 

आम्ही सवयीप्रमाणे रेनकोट जागेवर ठेवून गेल्यागेल्या हात धुवायचं प्राथमिक कर्तव्य पार पाडत असताना "तू येऊ नको. तू तिथेच थांब", अशी चिमुकली आज्ञा. हे मला थोडं नवीन. "बरं बाबा". 
हम्म आता काय? एका चिमुकल्या बोर्डवर स्वतःच्या नावाचं स्पेलिंग येत असल्यास लिहिणे. आमचा उलटा एस आणि उलटा एन वाचताना मला फार मजा वाटते. 

तेवढ्यात आमच्या वर्गाची त्रिकोणी खिडकी दिसते. आज गोष्टीची तशी गरज नाहीये नाही तर आमचं ध्यान लगेच पुस्तक वाच नाहीतर  कार्पेट पुसतो मोडला येऊ शकतो. आज खिडकीशी चक्क रांग आहे. 

तोवर मी अल्याडची छोटी दुनिया पुन्हा थोडा वेळ पाहून घेते. छोटी छोटी भातुकलीसारखी भांडी, परसदाराला लागून असेलला एका रानवाटेवरून मुलांनी आणलेले काही पाइनकोन्स, फॉल लीव्ज, खारुताईचे लाडके नट्स या सगळ्यामधून शिक्षिकांच्या सहाय्याने मुलांनी बनवलेले वेगळे वेगळे आर्ट पिसेस आणि त्यांचाच वर्गसजावटीत केलें उपयोग. आजूबाजूला असणारे एक दोन छोटे फळे आणि त्यांच्यावरच्या मुलांच्या रेघोट्या. तितक्यात कुणी तिकडे छोटे छोटे tracks सांधून गाडी बनवून तिचा डायवर होतोय. कुणी एका पेटाऱ्यातल्या सुरवंटाला खाऊ देतोय. या सगळ्याचं जर मी चित्रकार असते तर फार सुंदर चित्र झालं असतं. 

अरे इतक्यात रांग कमी होतेय म्हणजे पल्याड जायला हवं.  आजकाल इकडे निरोप देताना आई/बाबा पल्याड आणि मुलं अल्याड अशी खिडकीच्या काचेवर कारागिरी चालते आणि मग फ़ुल्ल फायनल टाटा असं रुटीन आलंय. 

मी मुलाला तिकडे पिटाळून बाहेर खिडकीपाशी बसते. त्याला सरळ दिसेल असे "एस" आणि "एन" काढताना माझं पण डोकं थोडावेळ थांबतं. तेवढ्यात आमच्या पिकासोने पण याची नोंद घेऊन त्याच्या बाजूच्या काचेवर पुन्हा ते स्पेलिंग, त्याच्याभोवती रेघोट्या सुरु केलं. मी त्याच्या नावाला एक सुंदर हार्ट काढून माझ्या चित्रकलेची सांगता केली. 


त्यानेही हात हलवून आतमध्ये त्याच्या त्या दिवसाच्या आवडीचं काही शोधायला सुरुवात केली. पल्याडहून हे पाहणारी मूक मी, अजून त्याच्या त्या अल्याडच्या दुनियेतून बाहेर यायला पाहत नव्हते. असं  का व्हावं की माझ्या त्या पल्याडच्या दुनियेतलं काहीच मला खुणावू नये?
  

Friday, October 24, 2014

दिवे लागले रे

हा उत्सव खरं तर फक्त दिव्यांचा. त्यांनी घराबाहेर लावलेल्या कंदिलात असावं, त्यांनी रांगोळीजवळ मिणमिणत राहून तिची शोभा वाढवावी आणि घरभर तेवत राहावं. फटाके वगैरे प्रभूती नंतर आल्या असाव्यात. त्यांचं माझं, मी मायदेशात असतानाही विशेष सूत जुळलं नव्हतं आणि देशाबाहेरसुद्धा आणले तर फार फार तर फुलबाजीसारखे.
 
या वर्षी देखील बरेच दिवे लावायचं मनात होतं मग बाकी सगळ्या कामाच्या आठवड्यात शुक्रवारी थोडं मनासारखं दिवाळीला घरी आणायचा मुहूर्तही आला.
 
फराळ संपूर्ण सासरहून आला त्यामुळे तिकडे उजेड पाडायला वाव नव्हता पण त्यामुळे थोडं डोकं चालवायला वेळ मिळाला आणि नेहमीच्या रांगोळीला साथ म्हणून घरातला एक भाग थोडी फुलं,रांगोळी, तोरण आणि अर्थातच दिवे लावले आणि घरी आलेल्या पाहुण्यांनीही वातावरणनिर्मितीसाठीची दाद दिली. त्याचेच थोडे फोटो आणि अर्थात दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
 


 
शुभ दीपावली.येणारे वर्ष आपणासाठी लाभदायी ठरो हीच प्रार्थना.
 

Saturday, September 13, 2014

रेषेवरचा लढा On the line

काहीवेळा एखादी सुप्रसिद्ध व्यक्ती विशेष करून खेळात प्राविण्य मिळवणारी, त्या क्षेत्रात कितीही माहीर असली तरी काही कारणांनी आपल्याला ती तितकी भावेल असं नसतं. माझं अगदी तसं विल्यम्स भगिनीबद्दल होतं.अगदी आता आतापर्यंत सरीनाबद्दलही काही आस्था नव्हती. आणि एकदा एका पुस्तकांच्या दुकानात "On the line" सेलवर दिसलं. जिचा समोर येणारा खेळ पाहणे सोडून आणखी काही माहिती मिळवायचा प्रयत्न केला नाही ती समोरून स्वत:ची माहिती देते, यापेक्षा इतक्या लवकर ही बया आत्मचरित्र लिहून पार झालीदेखील अशा काही मिश्र विचारात मी ते पुस्तक घेतलं. 
मला आधी वाटलं होतं की एवढ्या लवकर हे पुस्तक का आलं पण वाचून संपल्यावर मात्र ते वाचलं म्हणून या व्यक्तीने किंवा खरं तर या दोघी बहिणींनी या टप्प्यावर यायला किती मेहनत केली आहे हे कळलं हे बरचं झालं हे मान्य करायला हवं. 

पुस्तकाची सुरुवात अर्थातच तिच्या लहानपणी तिच्या बाबांनी या पाच बहिणींना  टेनिसचे धडे देता देता सरीना आणि विनसवर जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली आणि एकंदरीत त्यावेळची बिकट परिस्थिती, त्याचा विचार न करता एक दोन गावातील पब्लिक कोर्टमध्ये मुलींना खेळायला घेऊन जाणे. एल ए चे बरेच नेबरहुड्स तसे कुप्रसिद्ध. काही वेळा आदल्या रात्री गर्दुल्यांच्या वावरामुळे कोर्टवर काचा,बियरच्या बाटल्या असं काहीबाही पडलं असे. खेळताना कधी कधी आसपासहून येणारे बंदुकांचे आवाज तिला आधी फटाक्यांचे वाटत पण या पेक्षा माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे विनस आणि सरीना खेळताना त्यांना पहाणारी काही मुलं त्या दोघींना blackie one आणि blackie two म्हणून टोमणे मारत होती. बरंच ऐकून घेतल्यावर शेवटी टुंडेने त्यांना पळवून लावलं. मला उल्लेखनीय वाटतं ते यावर ती म्हणते 

As kids, I don't think we heard those taunts as racist remarks. They were just taunts. Those kids were just being mean. If Venus and I had been more typical California golden girls,these kids might have called us Blondie One and Blondie Two. We were just different;that's how I took it at the time.But may be Tunde heard these remarks differently and that's why she chased these boys down.   

त्यावेळी तिची आई नर्स म्हणून काम करी तर बाबांची स्वतःची सेक्युरिटी फर्म होती. आई बाबांनी आपल्या आपल्या कामातून विशेषतः बाबांना त्यांच्या कामाच्या वेळा थोड्याफार बदलून मुलींवर केलेली मेहनत पुस्तक वाचताना जागोजागी दिसून येते. 

तिच्यापेक्षा थोड्याच मोठ्या, तिच्यायचं शब्दात सांगायचं तर "One year, three months and Nine days. Thats the age difference between me and Venus. These days,it doesn't seem like much, but when we were kids it felt like I'd never fill the gap." या दोन बहिणींमधली चुरस आणि प्रेम याची एकाचवेळी होणारी घालमेल सरीनाने अनेक प्रसंगातून डोळ्यासमोर उभी केली आहे. विशेषतः तिने विनसला हरवताना तिचं एक खेळाडू आणि मग नंतर लाडकी बहिण म्हणून  स्वतःच्या मनाशी होणारे संवाद. विनसमुळे  जरी सुरुवातीला तिला तो फोकस, ते लक्ष मिळालं नाही तरी विनस नसती तर आपला आताचा खेळ नसता हेही ती खुल्या दिलाने मान्य करते. Me and V असा एक संपूर्ण लेख या दोघींबद्दल लिहून जणूकाही वाचकांची मागणी पूर्ण केली आहे. 

त्याचप्रमाणे एक लेख आहे तो त्यांच्या २००१ च्या Indian Wells ला खेळल्या गेलेल्या ATP tournamment बद्द्ल.तेव्हा खर या दोघी तशा लहान म्हणजे एकोणीस विशीतल्या. त्यामुळे अजून खेळाडू म्हणून आपल्याला असणारे हक्क वगैरेमध्ये फारशा न मुरलेल्या. नेमक्या एका सामन्यात विनसला दुखापत होते आणि पुढच्या सेमीफायनलमध्ये तिला खेळता येणार नसतं. पण जेव्हा या दोघींची नुकतीच हवा सुरु असते आणि दोघी आपापल्या गटात जिंकल्या तर आमनेसामने होणारी संधी संयोजक सोडणार नसतात. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत ते तिला भरीस घालतात आणि सामना सुरु होण्याच्या अगदी पाचेक मिनिटं आधी विनस सामना सोडतेय असं कळल्यामुळे प्रेक्षक नाराज होतात. त्याचा परिणाम म्हणजे नंतरची सरीना आणि किम क्लायस्टर्सच्या सामन्याच्यावेळेस प्रेक्षक तो राग सरीनावर काढतात. म्हणजे अगदी सामना सुरु व्ह्यायच्या आधी किमसाठी ते उभे वगैरे राहतात आणि सरीनाची माहिती सांगत असताना तिची हुर्यो उडवणे अशा सलामीने सामना सुरु होतो. सरीना म्हणते हा सामना खर किम आणि मी नसून प्रेक्षक विरुद्ध मी. आणि फक्त हुर्यो म्हणजे "बू" करणे नाही तर सगळ्या जगात निषिद्ध मानलेल्या शब्दाचा कोरस "निगर" . इतक्या दडपण आणि हुल्लडीमध्ये तिने हा सामना ४-६,६-४,६-२ ने जिंकून सगळी तोंडं गप्प केली. त्या सगळ्या विखारातही मध्ये एका आवाजाने तिला साद घातली होती "Come on, Serena!" ती ते विसरू शकत नाही. या सामन्याचा आंखो देखा हाल लिहिताना ती अखेरीस लिहिते की अशा मानहानीपुर्वक प्रसंगानंतर मी आणि V पुन्हा कधीच इंडिअन वेल्सला गेलो नाही आणि जाणारही नाही. गम्मत म्हणजे दरवर्षी पत्रकार तिला विचारतात आणि प्रत्येकवेळी तिचं तेच उत्तर असतं. 

No I won't go back. I will not give this people the validation. I will not stand down. It's a point of pride. I don't care what these folks say about me, about how I'm vindictive or stubborn or reading too much into the situation. I actually heard that one, early on,from some official. Remember, I was there. I was the target. I know what I know. All I have to do is set a positive example.

माझ्यापुरता सांगायचं तर गेली कित्येक वर्षे या स्पर्धा पाहताना मला सरीना नेहमी आक्रमक, फायरी आणि थोडक्यात "माज असलेली" वाटून मी कधी प्रेक्षक म्हणून तिला पाठिंबा दिला नाही. ती जिंकली, तरी नाही. पण हा वर उल्लेखलेल्या प्रसंगात मला तिच्या आक्रमकतेचं बीज दिसलं आणि इथून पुढे तिच्या खेळाकडे पाहायचा माझा दृष्टीकोण बदलला. कदाचित ती चीड, ते एक प्रकारचं वर्णभेदाचं ragging तिला आयुष्यभरासाठी झोंबलं असेल, त्या प्रसंगामुळे ती बदलली असेल आणि तिची मुळात आक्रमक दिसणारी शरीरयष्टी त्यात आणि भर घालत असेल. तसंही काही वर्षांपूर्वी कोच बदलल्यानंतरची सरीना बरीच मवाळ आणि प्रत्येक गुणावर जोरदार प्रतिक्रिया देण्यापेक्षा विचारी झाली आहे असे मला तरी वाटतेय. हे पुस्तकदेखील मी त्यामुळेच घेतलं. अर्थात त्यामानाने हे आत्मचरित्र लिहायला तिने घाई केली आहे कारण हे पुस्तक प्रसिध्द झाल्यानंतर तिने आणखी स्पर्धा जिंकल्या आहेत. या पुस्तकापेक्षा आताची सरीना फार वेगळी वाटते. 

पुस्तकात पुढे  तिने तिच्या येशु ख्रिस्तावरचा विश्वास आणि त्यावर एक मोठा (माझ्यासाठी कंटाळवाणा) धडा लिहिला आहे त्याची तशी गरज नव्हती पण तिला वाटली असावी. मग त्या बहिणींनी एकत्र फ्लोरिडाला राहणं, तिच्या आईवडिलांचा घटस्फोट, तिचा स्वतःचा पहिला ब्रेक ऑफ वगैरे घरगुती उल्लेख शिवाय तिने आफ्रिकेमध्ये केलेली मदतीची कामं आणि त्यानिमित्ताने झालेली नेल्सन मंडेला यांच्याबरोबरची पंधरा मिनिटांची अमुल्य  भेट हेही प्रसंग आहेत. सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे तिच्या लाडक्या मोठ्या बहिणीचा (वर एकदा उल्लेख झालेली Tunde) एल ए मध्ये स्वतःच्या बॉयफ्रेंडबरोबर फिरताना त्याचं दुसऱ्या कुणाबरोबर भांडण झाल्यामुळे झालेल्या गोळीबारात झालेला मृत्यू. चुकीच्या वेळी तिचं चुकीच्या माणसाबरोबर असणं तिचा जीव घेऊन गेलं आणि तिच्या पाठी हिचा छोटा भाचा आणि सगळे  दु:खात.   

सरीनाला सामना सुरु असताना तिच्या match book मध्ये काही तरी लिहायची सवय आहे. संपूर्ण पुस्तकात अशा बऱ्याच entries आहेत. एक धडा तर तिच्या २००८ च्या युस ओपनच्या जर्नलवर आहे. आपण जर टेनीस आवडीने पाहत असाल तर हे डीटेल्स वाचायला नक्की आवडतील. तिच्या वानगीदाखल काही entries पहा 

Breathe. Remember, there are so many more important things. This is so small. 

Believe it, Act it. Become it. 

Hold serve,hold serve,hold serve. Focus,focus,focus. Be confident.be confident.be confident. Hold,hold,hold,Move up. Attack. Kill, Smile. Hold!!!

तसं पाहिलं तर साहित्याच्या किंवा आत्मचरित्र या प्रकारात कुठेही ठसा उमटवणारं हे पुस्तक नाही. त्यासाठीचे सगळे मार्क मी अजूनही आन्द्रेच्या "ओपन"ला देईन. तरी देखील हे पुस्तक मी वाचलं, हे मला आवडलं कारण मला यातून सरीनाद्वारे काळ्या लोकांना अजूनही किती वर्णद्वेषाला सामोरं जावं लागतं हे कळलं. तिच्यासारखे सगळेच स्वतःला वेगळं सिद्ध करू शकत नसतील पण तिनं ते केलं. स्वतःचा स्वभाव अतिशय चांगला आहे अशा बतावण्या तिने या पुस्तकात केल्या नाहीएत. किंबहुना लहानपणापासून मी अतिशय चुरसी आणि जमल्यास चीटिंग करूनही जिंकावं, लहान असल्यामुळे बहिणीवर कुरघोडी करता यावी असं वाटायचं हे सुरुवातीलाच दाखले देऊन प्रांजळपणे कबुल केले आहे. आणि मांडलेल्या प्रसंगातून कुठेही स्वतःला किंवा कुटुंबाला सहानुभूती मिळावी म्हणून लिहिले आहेत असं देखील वाटत नाही. पण तिने स्वतःला ठरवून वलयात ठेवलं त्यासाठी कष्ट केलेत  आणि त्या कष्टाचं फळ तिचं तिने मिळवलं आहे, प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात होऊन. 

टेनिस खेळताना सर्विस करताना खेळाडू सीमारेषेवर जातात आणि मग खेळ बहरेल तसं प्रसंगी पुढेही येतात. पण खरा लढा असतो तो रेषेवरून चेंडू समोरच्याला सहजगत्या मारता येणार नाही अशा जागी टोलवायचा. परवाच्या त्या सुप्रसिद्ध १८ व्या जेतेपदाच्या विजेत्या चेंडूने सरीनाकडची ही सीमारेषा पार केली आणि ती आनंदाश्रू न आवरल्याने तिथेच कोसळली. रेषेवरचा तिचा आतापर्यंतचा लढा तेव्हा तिला आठवला असेल का?




सरीनाचं तिच्या १८ व्या जेतेपदाबद्द्ल खास अभिनंदन !!!

Sunday, August 3, 2014

ओघळलेले मोती

कधीतरी फार जुनं आठवायला लागलं की मला "दया" आणि "विमल" आठवतात. दयाने तिसरीत शाळा सोडली कारण तिने शिक्षण घेण्यापेक्षा चार घरची धुणीभांडी केल्यास, तिच्या घरी जास्त उपयोग झाला असता. तसं पाहायला गेलं तर तिसरीच्या वर्गातल्या अतिशय प्रेमळ जॉनाबाई आणि दया अचानक शाळेत यायचं बंद होणं सोडलं तर काहीच आठवत नाही. 

चौथीत आम्ही खेळाच्या तासाला सर्व मुली रिंगण करून मग आतली मुलगी एक मैत्रीण शोधते असा काही खेळ खेळायचो. ते आठवलं की आठवते विमल. माझ्यापेक्षा उंच, सावळी आणि टिकलीच्या जागी तुळस गोंदलेली माझी चौथीतली मैत्रीण. तिची टिकली पडली तरी चेहऱ्यात फरक जाणवत नसे. चौथीमध्ये मी शाळा बदलली आणि त्यानंतर मला विमल कधीच दिसली नाही. आमची मैत्री तिथेच थिजली. 

मग पुन्हा हायस्कूलमध्ये अनेक मैत्रिणी मिळाल्या. पण दहावीनंतर मी एकटीच रुपारेलला गेल्यामुळे पुन्हा ते संबंध तिथेच राहिले. रुपारेलला बारावीपर्यंत राहायचं ठरलं असल्यामुळे खरं तर मैत्रीण होणार की नाहीत मग त्या टिकतील का वगैरे अर्थातच तेव्हा न पडेलेले प्रश्न होते. पण अशी सांगून होत नाही न मैत्री? त्यामुळे तिथेही ती झालीच. त्यात मी एकटीच मेडिकलला न गेल्यामुळे मी बहुदा पूर्ण आयसोलेट होणार होते पण अम्रिता आणि श्रुती या दोघी पत्ररूपाने बरीच वर्षे टिकल्या. नशिबाने नंतर आम्ही ईमेल, सोशल साईट्सवरदेखील जोडलेले राहिलो. पण त्याच काळातल्या निदान डझनभर मैत्रिणी आणि त्याही त्या दोन वर्षात अतिशय जीवाभावाचे संबंध असलेल्या मैत्रिणी अशाच कुठेतरी हरवल्या. 

डिप्लोमाच्या वर्षातल्या मित्र-मैत्रिणींचा आढावा घ्यायचा तरी थोड्याफार फरकाने हा असाच म्हणजे अगदी मागच्या वर्षी मी त्यातल्या त्यात समिताला वीसेक वर्षांनी भेटले पण त्या भेटीत त्यावेळी मेल्स वगैरे नसल्यामुळे आता हरवलेल्या मैत्रिणीची आठवण अगदी सुरुवातीलाच निघाली. डिग्रीला पोचेपर्यंत अगदी आतासारखं "मुठ्ठी में नेट" आलं नसलं तरी सायबर कॅफे होते पण तरीही त्यावेळचेही काही संबंध हरवले. मग पुन्हा इतक्या वर्षांनतर ते शोधलेही गेले नाहीत. त्यात मुलीची बदलेलेली आडनावं माहित नसल्यामुळे त्यांचा तर शोधही मुश्कील. 

असो. आज जागतिक मैत्रीदिन वगैरे आणि मी नक्की काय आठवतेय? सहज मनात आलं, आठवतं तेव्हापासून मैत्रीची माळ ओवायला घेतो. सुरुवातीची गाठ मारायची राहून जाते आणि मग त्यातले काही मोती ओघळतात. अर्थात म्हणून आपण आपली माळ ओवायची सोडणार नसतो आणि ते ओघळणारे मोतीही या न त्या कारणाने ओघळायचे थांबणार नसतात. आजच्या या मैत्रीदिनी जसं तुम्ही तुमच्या संपर्कात असणाऱ्या जीवलग मित्र-मैत्रीणीना आठवणीने शुभेच्छा देताहात तसंच तुमच्याही काही ओघळलेल्या मोत्यांची आठवण जरूर ठेवा.

जागतिक मैत्रीदिनाच्या सर्व वाचकांना अनेक शुभेच्छा. 

Wednesday, July 9, 2014

लाकडाचं सौंदर्यदालन

मागे नाशिकचा दौरा झाला तेव्हा काही कारणास्तव "गारगोटी"ला भेट द्यायचं राहून गेलं. त्यानंतर एका सहकाऱ्याने एका लोकल "गारगोटी"बद्दल माहिती दिली. म्हटलं नाशिक नाही तर इकडे तरी जाऊया. या स्थळाबद्दलची माहिती इकडे आहेच.
मला इकडे जावसं वाटलं याचं खरं कारण माझा मोठा मुलगा सध्या कुठेही खेळताना सापडलेले दगडधोंडे घेऊन येतो आणि मग asteroid आहे म्हणून आम्हाला फुशारकी मारून दाखवतो. त्याला हा संग्रह पाहायला आवडेल असं मला वाटलं.
मुख्य मजला पहिला की तळघर पाहायला विसरू नका असं तिथल्या माणसाने आम्हाला सांगितलं होतं. त्याप्रमाणे तळघरात गेलो आणि उतरताना डावीकडे वळलो आणि मी मंत्रमुग्धच झाले. हे दालन चक्क फक्त लाकडांचं म्हणजे ज्याला इंग्रजीत petrified wood म्हणतात त्याचं होतं. आता गुगलवर तुम्हाला या प्रकाराबद्दल माहिती मिळेलच. हा प्रपंच फक्त तिथे काढलेल्या काही फोटोसाठी. एन्ज्व्याय :)
विविध प्रकारच्या वृक्षांच्या लाकडांचे नमुने 
जतन केलेली वनसंपदा

सव्वादोनशे मिलियन वर्षांपूर्वीचं खोड
खोडांचे आणखी नमुने







फुलपाखरू छान किती दिसते
सुचीपर्णी वृक्षांची सुकलेली फळे आणि काही भग्न खोडे




Saturday, June 21, 2014

गाणी आणि आठवणी १७ - दिल है छोटासा

मी डिप्लोमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असताना  "रोजा" रिलीज झाला होता. तेव्हा चित्रहार पाहायचो, त्यावेळी पाण्यावरचे थेंब उडवणारी आणि दक्षिणेकडच्या प्रचंड हिरव्या परिसरात चित्रित केलेल्या या गाण्यावर आणि त्याच्या संगीतावर फिदा होऊन मी आणि माझी मैत्रीण दोघी हा चित्रपट पाहायला गेलो होतो. मी शिक्षण सुरु असताना बाहेर जाऊन चित्रपट पाहायचं प्रमाण फार कमी होतं. पैसे हा प्रश्न होताच पण घरात टीव्हीपण मी आठवीत वगैरे असताना आल्यामुळे असेल आवड पण नव्हती. त्यातून त्याकाळी शनिवारी येणारा मराठी आणि रविवारचा हिंदी असे दोन चित्रपट दाखवले जात, त्यात नेमके मी महा रडके किंवा (माझ्यासाठी) पकाऊ चित्रपट पहिले गेल्यामुळे हा तेव्हा नवा असलेला प्रांत मला तेव्हातरी विशेष मनात भरला नव्हता.

रोजाची गाणी आवडणे हे रोजा पाहण्याचं पहिलं कारण असू शकेल (आणि मैत्रिणीने स्वतःच तिकीट काढून "चल गं" म्हणून नेणं हे दुसरं). मला वाटतं सुरुवातीलाच हे गाणं आहे. आम्हा दोघीसारखीच मोठं होऊन कुणीतरी खास व्ह्यायची स्वप्नं पाहणारी ही मुलगी "रोजा" म्हणजे अभिनेत्री मधुबाला या चित्रपटात कसली मस्त दिसलीय. नंतर एक दोन चित्रपटानंतर कुठे गेली काय माहित? मला या गाण्याचं प्रत्येक कडवं आवडतं आणि त्या शब्दांना न्याय देणारं रेहमानचं संगीत. तो पण तेव्हा मोठं व्ह्यायचं स्वप्न पाहत असणार. त्याची मेहनत रोजाच्या प्रत्येक गाण्यात दिसते. काही गोष्टी पहिल्याच फटक्यात आवडतात (किंवा आवडत नाहीत) तसं रेहमान पहिल्याच गाण्यात आवडला. त्याच्या संगीताच्या, सुरावटींच्या प्रेमात माझी पिढी आकंठ बुडाली. पण सगळ्यात जास्त आवडला तो "रोजा"चा हिरो "अरविंद स्वामी". 

तो डॉक्टर आहे पण त्याला अभिनय आवडतो ही जादा माहिती कॉलेजमधल्या कुणाकडून तरी समजल्यावर, "अरे वा डॉक्टर चालेल नं भावी इंजिनीयर मुलीला", असं म्हणून वर्गातल्या सगळ्याच मुली त्याच्या प्रेमात. आधीचे सगळे क्रश विसरून परी यासम हा वाटणारा चित्रपटातला रिषी. मग त्याची वासिम खानबरोबरची बोलणी, पळून जायचा प्लान वगैरे मध्ये त्याला किती लागतं तरी "यार कसला दिसतो न तरी पण" आम्ही दोघी एकमेकींच्या कानात. मला वाटतं आमचं बजेट जास्त असतं तर कदाचित आम्ही हा चित्रपट बाहेर जाऊन पुन्हा एक दोनवेळा पहिला असता. शिवाय मुंबईच्या बॉम्बस्फोटाचे ताजे साक्षीदार म्हणून देखील हा चित्रपट आमच्यासाठी माईलस्टोन होता. 

त्या वयात हा "क्रश" जसा साहजिक होता तसचं "दिल है छोटासा" सारख्या गाण्यांनी भारावून जाणंही साहजिक होतं. माझ्या बाबांकडच्या कुटुंबात मी पहिली इंजिनियर. माझे दहावीचे मार्क मी बोर्डात वगैरे आले नसले तरी आमच्या घरात सगळ्यांना भारी कौतुक वाटण्याजोगे. मला बारावी मध्ये मुंबईत फ्री सीट मिळवण्याइतके मार्क्स मिळाले नाहीत आणि पेमेंट किंवा बाहेर जाउन शिकायची ऐपत नव्हती.तसं कागदावर जातीची सवलत पण होती पण त्यातही दोन टक्क्यांची स्पर्धा होतीच. 

असो बोलायची वस्तुस्थिती न पाहिलेल्या स्वप्नांचं काय होणार याची खात्री नसताना रोजाची स्वप्नं त्या वयात आपली वाटणं सहज होतं. 

तिला रिषीबरोबर लवकर लग्न न करता शिकायचं होतं शिवाय त्याने आपल्या बहिणीला नकार देऊन आपल्याला वरलं याचा राग होताच. मग ती त्याच्या प्रेमातही पडते आणि तो संकटात सापडल्यावर अगदी  राष्ट्रपतीकडे दाद मागायलाही जाते. दिसायला सुंदर, हळवी आणि करारी अशी मुलगी व्हावं असं मलाच काय माझ्याबरोबरीच्या बऱ्याच मुलींना वाटलं. मला वाटतं "मणिरत्नम" हे दाक्षिणात्य नावदेखील माझ्या पिढीला तेव्हा कळलं आणि लक्षात राहिलं. नंतर जेव्हा चित्रपट पहिले गेले तेव्हा हा कुणाचा वगैरे प्रश्न पडू लागले किंवा मणीरत्नम या नावाने बरेच चित्रपट आवर्जून पहिले गेले. अजूनही मी चित्रपट पाहण्यासाठी वेडी होत नाही किंवा मला कथा वगैरे लक्षात राहत नाहीत. पण रोजा पाहिल्यानंतर मला चित्रपट पहायचा जो काही रस निर्माण झाला त्याचं श्रेय चित्रहारमध्ये पाहिलेल्या आणि अतिशय आवडलेल्या या गाण्यात आहे. 

आजही मी हे गाणं ऐकलं की माझ्या त्या टीनएज मध्ये  जाते. प्रेमात पडायला तेव्हा आवडलं असतं का याचं उत्तर रिषी देतो आणि मोठं होऊन भव्य दिव्य काही करायची प्रेरणा पी. के. मिश्रा (आणि जो कुणी मूळ  तमिळ कवी असेल) यांचे शब्द आणि ए आर नावच्या तेव्हा नुकतचं येऊ घातलेल्या वादळ ही प्रेरणा घेऊन जातं. मी आपसूक गुणगुणते, 
                                  चांद तारोंको छुने की आशा 
                                  आसमानों मी उडने की आशा 

Thursday, June 12, 2014

उन्हाळ्याचं वर्तुळ

अजगरासारख्या सुस्तावलेल्या दुपारी चिंचेच्या झाडाखाली खाट सरकवून नदीवरून येणारा वारा खात पाय लांब करणे ही उन्हाळ्यातली माझी अत्युच्च आठवण आहे. खाटेवर जागा पकडणे ही एकमेव महत्वाची बाब. त्यासाठी जेवतानाच आधी विचार करून वेळेत किंवा खरं म्हणजे सगळी एकत्र जेवत असताना आपलं लवकर आटपणे आणि परसदारी भसाभस चूळ भरून मागच्या वाड्यात झपाझप जाऊन एकदा बूड टेकलं की मग आजूबाजूला हळूहळू जमणाऱ्या मोठ्या मंडळींच्या गप्पा ऐकत उन्ह सरायची वाट पहायची. 

त्या गप्पांमध्ये कळणारे आणि न कळणारे कितीतरी विषय चघळले जात. आईचे बाबा, म्हणजे माझे मी न पाहिलेले आजोबा, ही त्यांची सर्व मुले एकत्र जमली की गप्पांमध्ये येणारी हमखास व्यक्ती. त्यांना आई, मावश्या, मामाच काय पण  अख्खा गाव "दादा" म्हणे. मामांच्या ओटीवर त्यांचा तरुणपणातला फोटो आहे. दिसायला राजबिंडे आणि देश स्वतंत्र व्हायच्या आधीच्या काळापासून तेव्हाच्या काँग्रेसमध्ये. तेव्हा जयंतीबेन म्हणून काँग्रेसच्या सरचिटणीस होत्या त्यांच्या कार्यालयात काम केलेले. दादा गेले त्याच वर्षी नेहरू वारले असा दाखला आई नेहमी देते. तुरुंगवासही भोगला; पण त्याचा पुरावा घेऊन सरकारी सोयी उपटल्या नाहीत. फक्त एका मुलीचं लग्न पाहून संपलेल्या आयुष्याने या मुलांच्या आयुष्यात कष्टाची वर्तुळं वाढली हे काही वेगळं सांगायला नको. 

"त्या दुपारी" या म्हणजे दादा गेल्यानंतरच्या काळातल्या आणखी काही आठवणी ऐकून न कळत्या वयातही मनाला यातना व्ह्यायच्या. तेव्हा खरं सांगायचं तर आमची तेव्हाची परिस्थिती म्हणजे त्याकाळचे मध्यमवर्गीयच किंवा कदाचीत त्याहून एक पायरी खाली. चाळीतलं दोन खोल्यांचं घर, वर्षाला एक पावसाळी आणि एक उन्हाळी चप्पल, दिवाळीलाच काय ते नवीन कपडे (मध्ये कधीतरी कुणी कापड भेट म्हणून दिलं असलं तर एक  जादा फ्रॉक), शाळेत आणि बारावीपर्यंत जुनी पुस्तकं (आणि इंजिनीयरींगला रेंटवर मिळणारी) असे आमचेही दिवस. पण तरी त्या उन्हाळ्यात आमच्या आई-बाबा आणि नातेवाईक यांच्या होणाऱ्या गप्पा ऐकल्या की  आम्हाला आमची ती परिस्थिती खूप म्हणजे खूपच चांगली वाटायची. 

अखेर आमचीही ती परिस्थितीदेखील नाही म्हणता सुधरली. आमची तिघांची शिक्षणं होऊन थोडे कमवते झालो. मुंबईत चांगल्या ठिकाणी घर वगैरे तेव्हाही स्वप्नच होतं. चाकरमान्यासारखं उपनगरातून चर्चगेटपर्यंत आणि नंतर सिप्झ असे दोन्ही महात्रासदायक प्रवास सुरु झाले. माझ्या वयाच्या आसपासचीच असणारी आम्ही सगळीच भांवडं नोकरीच्या रामरगाड्यात अडकलो आणि मग "त्या दुपारी" फारसा गाजावाजा न करता  कुठेतरी गायब झाल्या. 

ऊन आता इकडेही तापायला लागलं आहे, आई-बाबा त्यांच्या नातवंडाना भेटायच्या निमित्ताने, फार दिवसांनी ,"त्या दुपारी" शनिवारी किंवा रविवारी येऊ पाहताहेत. पुन्हा जुने विषय रंगतात. फक्त आई आता दादांबद्दल बोलायच्या ऐवजी आम्ही आमच्या लहानपणी कसा दोन खोल्यात अभ्यास केला, त्याबद्दल बोलते. बाजुला खेळता खेळता मुलाने एका कानाने हे टिपलेलं असतं आणि तो निरागसपणे विचारतो,"आई, खरच?" त्याचा बदललेला चेहरा मला काही सांगू पाहतो. त्याला माझ्या तेव्हाच्या परिस्थितीबद्दल वाईट वाटत आहे, हे मला स्पष्ट दिसतं. त्याच्या डोळ्यात माझी मी पाहताना माझं "उन्हाळ्याचं वर्तुळ" नकळत पूर्ण होतं. 

Wednesday, May 21, 2014

भरून भरून ........

माझ्याबरोबर भगुबाईला असणारा एक मित्र गेले काही वर्षे त्याचं करीयर गुजरातमध्ये करतोय. बरेच दिवस त्याच्याशी प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण आमच्या batch मधल्या मुलांच्या त्या ग्रुपमधल्या मुलांना मी जितकं ओळखते, त्यावरून तरी त्याचं भविष्य तिथे उज्ज्वल असल्याशिवाय तो तिथे जाऊन स्थायिक वगैरे होणार नाही हे मला माहित आहे. तेव्हापासून गुजरात, तिथली इकोनॉमी इत्यादीबद्दल एक कुतूहल आहे आणि पुढचं कुतूहल अर्थातच ते नाव जे गेले कित्येक महिने सगळ्यांच्याच तोंडावर आहे. 
माझा राजकारणाचा अभ्यास तसा कमीच आहे आणि कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घ्यावा इतका आत्मविश्वास मला कुणाही पक्षाबद्दल आला नाही; कारण सगळीकडे कामसू आणि कामापुरते असे दोन्ही कार्यकर्ते पाहण्यात आले. मग कुणा पक्षाला चांगलं म्हणायचं हा संभ्रम होणारच. 
पण जेवढी माहिती "मोदी" या वलयाबद्दल मला वाचायला मिळाली आणि त्यांची जी काही online भाषणं मी ऐकलीत त्याने मला या व्यक्तीबद्दल आदर आहे. पक्ष म्हणून खरं प्रत्येक पक्षाने त्यांच्या त्यांच्या कमकुवत जागा जेव्हा जेव्हा त्यांना सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा दाखवून दिल्या आहेत. पण तरी खंबीर नेता मिळाला तर आपण बदल घडवून आणू शकतो असा आत्मविश्वास ज्या नेतृत्वाकडे असायला हवं ते मोदींकडे असेल असं त्यांना ऐकताना जाणवतं.
त्यांच्या मुंबईला केलेल्या भाषणात त्यांनी १८ ते २८ या वयाबद्दल आणि त्यावेळी संधी मिळाल्या नाहीत तर काय होऊ शकतं याबद्दल व्यक्त केलेले विचार मला दहाबारा वर्षांपूर्वी माझा माझ्या करियरशी सुरु असलेला धडा आठवून गेला आणि वाटलं खरच तेव्हाही असाच नेता असता तर? आणि आताचं त्यांचं निवडून आल्यानंतरचं भाषण, ज्यात ते हळवे झालेत, हे सगळं पाहिलं की आत कुठेतरी या व्यक्तीशी आपली नाळ जुळते आहे असं वाटतं. त्याचं कालचं भाषण मी दोनवेळा ऐकलं.  



रडणं म्हणजे एका वेगळ्या प्रकारे व्यक्त होणं. हे सगळ्यांनाच जमतं असं नाही. तेवढं भावूक होण्यासाठी आपला भूतकाळ कारणीभूत असतो असं मला वाटतं. तळागाळातून वर आलं की  ते जुने दिवस आठवणींच्या तळाशी असतात. त्या कधी डोकं वर काढतील सांगता येत नाही. अशावेळी  आसवांनी वाट मोकळी करून दिली तर त्यात त्या व्यक्तीचा कमकुवतपणा न दिसत त्याची सच्चाईच दिसते. बदलेले दिवस काळ अर्थातच दाखवेल आणि यातून काही न काही चांगलं हळूहळू का होईना नक्की घडेल. 

देशापासून इतक्या दूर असले की काही क्षणांची आर्तता जास्त जाणवते. भावना त्याच असतात फक्त आपण तिथे नसतो. आत्ता वाटलं म्हणून सगळं सोडून येता आलं असतं तर किती बरं असं वाटायचा हा क्षण मला धरून ठेवायचा नाहीये. मला काय बदलता येईल मला नक्की माहित नाही किंवा सांगायचं तर त्यांचा अजेंडा, प्लान इत्यादींबद्दल काही लिहावं अशी माझ्या अभ्यासाची व्याप्ती नाही. पण या क्षणी जर मला कुठे असायचं असेल तर ते माझ्या देशात हे सांगायला मात्र आज लिहायलाच हवं. तुम्ही कुठेही राहिलात तरी चांगल्या गोष्टी आपल्या देशात घडाव्यात असं तुम्हाला वाटणं साहजिक असतं किंवा काहीवेळा देशाबाहेर राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या देशात होणाऱ्या घटनांचा संदर्भ तुमच्या रोजच्या भावनांशी जास्त तीव्रतेने जोडता. त्यात जसं चुकीच्या घटनामुळे होणारा संताप असतो तसचं चांगल्या गोष्टीच कौतुकही असतं. 
मला आजकाल "अच्छे दिन आएंगे" हा वाक्प्रचार आवडतो आणि तसचं हे सगळं वातावरण अनुभवताना समोरचा सद्गदित झाला तस माझेही डोळे पाणावतात. भावनेच्या भरात कदाचित असंच लिहीतही राहीन ज्यात नक्की काय म्हणायचं आहे हेही वाहवून जाईल. आज सगळचं भरून भरून आलंय हेच खरं. 

Thursday, May 8, 2014

गाणी आणि आठवणी १६ - ऋतू हिरवा

हे गाणं माहित नाही असा मराठी गानप्रेमी विरळा. वेगवेगळ्या वेळी हे गाणं ऐकलं आणि प्रत्येक वेळी तितकंच भावलं. त्यामुळे या गाण्याची सलग आठवण नाही पण म्हणून त्याला गाणी आणि आठवणीमध्ये स्थान द्यायचं नाही हेही रूचत नाही. 
सगळ्यात पहिले जेव्हा ही कसेट बाजारात आली आणि ऐकली तेव्हाचा आशाताईचा स्वर आणि सुमधुर संगीताचा बाज भावला. यातला कोरसही तितकाच खास. श्रीधरजींचे आभार मानावे तितकेच कमी आणि शांता शेळके यांचेही. तेव्हा आम्ही वसईला राहत असताना वसई गावात एक होतकरू तरुणांचा गाण्याचा ग्रुप होता. मी त्या ग्रुपचं नाव विसरले आहे आणि आता त्यापैकी कुणी माझ्या संपर्कात नाही. पण त्यांनी एक स्थानिक गायकांना घेऊन एक गाण्याचा कार्यक्रम केला होता. त्यात बसवलेल्या अनेक गाण्यात हे गाणं सगळ्यात छान बसलं होतं. सहगायकांनी मूळ गाण्याच्या तोडीचा कोरस गायला होता. मला वाटतं त्या कार्यक्रमाची सांगता या गाण्यानी झाली होती. त्या रात्री तिथून निघताना मन हिरवं झालं होतं. त्यानंतर कधीही त्यातले कलावंत कुठे दिसले की त्यांनी गायलेलं ऋतू हिरवा आठवे. 

मग अमेरीकेत आल्यावर ताईने आठवणीने कसेट पाठवली आणि तो मोसम नेमका वसंत ऋतुचा होता. इस्ट कोस्टचा वसंत म्हणजे हिवाळ्यानंतरचा पाऊस पडून आलेल्या हिरवाईचा महोत्सव. त्यावेळी केलेल्या सगळ्या लॉंग ड्राईवला एकदा तरी हे गाणं ऐकून तल्लीन झालो नाही असं झालं नाही. 

आता आई बाबा आशाताईंचा नवीन अल्बम "साकार गांधार हा" घेऊन आलेत. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी लिहेन पण त्यानिमित्ताने आशाताईंचा या वयातही तरुण असणारा आवाज याचा आईबाबांबरोबर विषय झाला आणि पुन्हा एकदा आधीचा अल्बम म्हणून "ऋतू हिरवा"ची पुन्हा आठवण झाली. त्यांच्या जुन्या आवाजाची तुलना म्हणून नाही पण ऐकावसं वाटलं म्हणून. 
योगायोग म्हणजे आताच वसंत सुरु झाला आहे. तसा सदाहरित सुचीपर्णी वनाचा प्रदेश असला तरी हिवाळ्यात ती झाडं सोडली की बाजूला काड्या आणि रखरखाटच असतो. यंदा इतर वर्षांच्या तुलनेने इथे काय म्हणतात ते "स्प्रिंग चांगला आहे". आजूबाजूला हिरवाई पसरते आहे आणि नेमकं कानात ऋतू हिरवा वाजतंय. या सगळ्या भावना शब्दात पकडणं कठीण आहे. पण आईबाबांबरोबर कुठचा लांबचा प्रवास करून येताना हे गाणं त्याना तल्लीन होऊन ऐकताना पाहणं हीदेखील माझ्यासाठी सुखद आठवण आहे. या प्रवासात फक्त शांता शेळके यांचे शब्द असतात आणि आशाताईंचे आलाप. या गाण्याचा कोरस म्हणजे गाण्याचा प्राण आहे. जर मन कुठच्या कारणाने बेचैन झालं असेल तर मनाला शांत करायचा उपाय म्हणजे हे गाणं आहे. 

मला वाटतं हे गाणं माझ्यासाठी या आणि अशा बऱ्याच आठवणी निर्माण करत राहील. तरीही अधुऱ्या आठवणींची ही पोस्ट माझ्यासाठी खासच. 

Tuesday, April 15, 2014

कहानी में ट्विस्ट

माझ्या घरात दोन माकडं आहेत. ती घरामध्ये धांगडधिंगा घालत असतात आणि माझ्या डोक्याला काही न काही तरी खुराक लावून देत असतात. ती एकमेकांशी आणि आम्हा दोघांशी भांडतात,मज्जा करतात आणि काही वेळा शाळेतल्या त्यांच्या इतर मित्रांना त्रास देतात. तो त्रास आटोक्यात असेल तर ठीक पण नेहमीचं झालं की मग त्यांची टीचर एखादी नोट पाठवते. हे "लवलेटर" घरात आलं की त्या संध्याकाळी मग मी स्वतःशी विचार करते की आता यांना थोडा आवर घालायचं कसं शिकवायचं. मागे मोठं माकड हरवलं होतं ती गोष्ट तुम्ही वाचली आहे का? इकडेच आहे ती. त्यावेळी मी त्याला त्याच्या आवडत्या थॉमस इंजिनाची एक गोष्ट रचून सांगितली होती. त्यामुळे आता त्याला माझा फोन क्रमांक माहित आहे. म्हणजे त्याने पुन्हा हरवू नये पण अशी चुकामूक झालीच तर तो निदान आपला पत्ता कळवू शकेल. तेव्हा ती गोष्ट ब्लॉगवर टाकायची होती पण आज उद्या करता राहूनच गेली. 

सध्या लहान माकड फॉर्मात आलयं आणि वेळ आली आहे त्याच्यासाठी अशी एक गोष्ट तयार करायची तर ही त्या गोष्टीची गोष्ट. 

खर पाहिलं तर ही गोष्ट आपल्याला सर्वांनाच चांगली माहित आहे. माकड, उंदीर आणि मांजर तिघं मिळून खीर बनवतात आणि मांजरीताई एकटीच सगळी खीर संपवते. मग ती "मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी" म्हणताना बुडून जाते. माझ्या सुरुवातीच्या गोष्टीत मी मांजरीला बुडू दिलं नव्हतं कारण मित्र एकमेकांना मदत करतात आणि मित्रांकडे एकमेकांना वाचवायचा उपाय असतो असा काही नवा संदेश मला मुलांना द्यावासा वाटला. (शिवाय मारून टाकणे aka violence चा बागुलबुवा होताच) मग मागचे काही महिने ही गोष्ट आमची लाडकी झाली. जेवणात एक घास जास्ती खाणे किंवा नकळत नावडत्या भाज्या घशाखाली उतरवणे अशी कामं या गोष्टीने बिनबोभाट होऊ लागली. 

परवा या गोष्टीमध्ये सांगताना सुरुवातीलाच असं ठरलं की आज मांजर खीर नुसतीच राखत बसणार, अजिबात खाणार नाही. मग माकड आणि उंदीर गेले आंघोळ करायला आणि मांजर बसली आपली राखत. तेवढ्यात तिथे एक मोठ्ठा हत्ती आला (हत्ती मोठ्ठाच असतो पण माझं छोटं माकड, "हो? एवदा मोथा?" म्हणतं ते पाहण्यासाठी आणि एक घास घशात घालण्यासाठी असे बझवर्ड्स वापरणं जरुरीचं आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच) 

हत्ती म्हणाला," मांजरी ताई, मांजरी ताई मला खीर खायची आहे". मांजर म्हणाली, " अरे पण उंदीर आणि माकड आंघोळीला गेले आहेत तोपर्यंत कुणीच खीर खाणार नाही. मी बसलेय राखण करत. तुला दुसरं काही काम असेल तर ते करून ये." हत्तीने विचार केला या तिघांनी मिळून खीर केली आहे आणि ते ती आपल्याला पण देणार आहेत मग आपण ती फुकट घायची का? (इथे आमची घरची तल्लीन झालेली माकडं मान हलवून नाही वगैरे म्हणताहेत) तो जंगलात गेला आणि त्याला तिथे एक मोठं आंब्याचं झाड दिसलं (इकडे नेहमी न मिळणारे आंबे हे आमच्या घरातल्या तमाम माकडांचं अतिशय आवडतं फळ आहे विशेष नमूद करायला हवं) त्याने चौघांसाठी चार आंबे त्याच्या सोंडेने काढून घेतले आणि तो परत मांजरी खीर राखत बसली होती तिथे आला. 

तितक्यात माकड आणि उंदीर त्यांची आंघोळ आटपून आले आणि त्यांनी मांजरीसोबत हत्तीला पाहिलं. त्यांना पाहून मांजरी म्हणाली, "हे बघा आज आपल्याबरोबर कोण आलं आहे खीर खायला?" हत्ती म्हणाला," मी मांजरीकडे खीर मागितली तेव्हा ती मला म्हणाली की ती तुमच्यासाठी थांबली आहे. मला अशी शेयर करणारी मित्रमंडळी खूप आवडतात म्हणून मी पण तुमच्यासाठी एक गम्मत आणली आहे". असं म्हणून हत्तीने सगळ्यांना एक एक आंबा दिला. मग त्या चौघांनी मिळून खीर आणि आंबे असे दोन दोन डेझर्टस खाल्ले. 

मी - गोष्ट ?
दोन्ही माकडं - संपली… 
मी - मग आपल्याला आज नवीन काय कळलं?
मोठं माकड - नवीन फ्रेंड्स बरोबर शेयल कलायचं. 
मी - मस्त. आणि मित्रांबरोबर बोलताना ओरडून बोलायचं नाही. जर मांजरी सुरुवातीला हत्तीला ओरडून बोलली असती तर कदाचित हत्तीने तिला सोंडेने फेकून दिलं असतं आणि सगळी खीर खाल्ली असती पण मांजरी त्याच्याबरोबर चांगलं बोलली आणि म्हणून त्यांचा काय फायदा झाला? 
मोठं माकड - त्यांना दोन दोन डेझर्टस मिळाले. 
मी - म्हणून मित्रांबरोबर मग ते शाळेत असो शेजारी असो कुठेही असो कसं वागायचं?
लहान माकड - चांगलं वागायचं. 

चांगलं वागायचा हा धडा कितपत चालतो ते लवकरच कळेल. तोवर आम्ही माकड, उंदीर, मांजर आणि हत्ती अशी आमची नवीन गोष्ट वेळ पडेल तशी सांगत राहणार. कधी कधी कहानी  में ट्विस्ट फॉर्म्युला चालतो कधी नाही. देखते है यह कहानी कितना रंग लाती है? 

Monday, March 31, 2014

कशासाठी? स्वतःसाठी….

काही महिन्यापूर्वी ब्लॉगचे फॉलोअर्स अचानक वाढले असं लक्षात आलं. ज्या वेगाने या ब्लॉगवर लिहिलं जातं किंवा जे नेहमीचेच विषय इकडे मांडले जातात त्या मानाने हे खरं मला अपेक्षीत नसतं. एकुण फॉलोअर्स १९० च्या पुढे वगैरे म्हणजे, "अगं बाई, खरंच?" असं काहीसं. साधारण त्याचवेळी, एका ब्लॉगवाचकाची मेल आली, तुझ्या पोस्टचे अपडेट्स मराठीब्लॉग्स डॉट नेटवर दिसत नाहीत. त्या साईटवर तपासून पाहिलं तर त्यांनी माझा ब्लॉग काढून टाकला होता. त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील म्हणून त्यांना मेल करणे, ब्लॉग पुन्हा जोडून पहिले वगैरे करून पाहिलं पण एकदंरीत काही बदललं नाही. आणि त्यांच्याकडून मेलला उत्तर वगैरेदेखील नाही. 
मग विचार करत बसले की खरंच आपण ब्लॉग का लिहितो? व्यक्त व्हायचं साधन म्हणून की आणखी कशासाठी? आणखी काही (वाटलं तरी किंवा नाही वाटलं तरी) आपण काही करू शकणार नाही हे निदान माझ्या सद्यपरिस्थितीत माझं मला माहित आहे. मग ते कुणी वाचलं काय नाही काय मला व्यक्तिश: काय फरक पडतो? काहीच नाही. शिवाय माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला प्रत्येक प्रसंग काही मी ब्लॉगवर मांडणार नाही. पण जे मला खरंच लिहावंसं वाटतं ते लिहिलं गेलं तर त्यात फक्त वैयक्तिक स्वार्थ आहे. मला स्वतःला माझ्या जुन्या पोस्ट्स वाचायला आवडतात. मला जे डीटेल्स लक्षात राहिले नसते ते ब्लॉग पोस्टच्या निमित्ताने मला पुन्हा आठवतात. आता काय बदललंय हे उगाच लक्षात येतं. 
हा एक मागच्या पाच वर्षांचा किंवा आठवणीबद्दलचं बोलायचं तर मागच्या कित्येक वर्षांचा प्रवास माझा माझ्यासाठी नकळत लिहिला गेला. पुन्हा पुन्हा वाचताना त्याचा प्रवाह मला आवडतो हे लक्षात गेलं.  त्यामुळे अनियमित का होईना इथे लिहित रहावसं वाटणार. लिहिता लिहिता अनेक जणांनी ते वाचलं त्यातल्या काहींनी प्रतिक्रिया दिल्या आणि काहींनी कदाचित खिल्लीही उडवली असेल. त्याने या ब्लॉगिंगला काही फरक पडला नाही किंवा ते आवश्यक आहेच असं नाही. मग मराठीब्लॉग्स डॉट नेटचा लोगो इथे असला काय नसला काय, त्यांनी त्यांच्या साईटवर माझ्या पोस्ट्स टाकल्या काय नाहीत काय काहीच फरक पडत नाही. आज बरोबर पाच वर्षांनी माझ्या ब्लॉगच्या मुखपृष्ठावरून ते चिन्ह काढून टाकताना माझ्यासाठी ब्लॉगिंग किती बदललं  आहे हे लक्षात येतंय. 
थोडसं कडवट वाटणारं वरचं मनोगत आज सुरुवातीला लिहिलं कारण गुढीपाडव्याची सुरुवात कडूनिंबाचा पाला खाऊन होई मग नंतर दुपारच्या जेवणातलं श्रीखंड अधीक गोड लागे. 
वाचक, फॉलोअर्स आणि पोस्ट यांची आकडेमोड करायचं ब्लॉगच वय कधीच सरलंय. पण त्या बद्दलची कृतज्ञता तशीच आहे आणि तशीच राहील. आता इथून पुढे वर्षभर जे लिहिलं जाईल ते वाचकांना नक्की गोड लागेल अशी आशा. 


यंदाची गुढी आपल्यासाठी येणाऱ्या वर्षात काही सुखद बदल घेऊन येवो हीच सदिच्छा. 

Saturday, March 8, 2014

One Tough Mother

ती तेरा वर्षांची असताना  नाझी जर्मनीच्या तावडीतून सुटून मुक्त अमेरिकेत आलेलं हे कुटुंब. तिच्या बाबांनी इथेच पोर्टलँडमध्ये एक टोप्यांच्या व्यवसायात आपले पाय रोवले आणि यथावकाश एक छोटी कंपनी सुरु केली. त्यांच्या मृत्यूनंतर या मुलीच्या नवऱ्याने ही कंपनी पुढे सुरु  ठेवली पण त्यानंतर सहाच वर्षात अचानक वयाच्या फक्त ४७व्या वर्षी हृदयविकाराने तोही गेला, तेव्हा ती आता चाळीशीत असणारी ती वर उल्लेखलेली मुलगी, जिने कधी कुठल्याही  व्यवसाय क्षेत्रात आधी कधी पाऊल टाकले नव्हते आपल्या बाबांचा इतके वर्षांचा व्यवसाय हातात घेतला. 

तिची मुलं तेव्हा अनुक्रमे २१, १९ आणि १२ वर्षांची होती म्हणजे लहानगी नसली तरी अजून शाळा कॉलेजमधली, पालकांवर अवलंबून होती. या मुलांची ही one tough Mother हा सगळा व्यवसाय हातात घेते तेव्हा  आजूबाजूंच्या इतर भाकीतकर्त्यांनी आता ही  कंपनी बुडणार म्हणून चारीठाव सांगून झालं होतं. हेच कशाला तिने व्यवहार हातात घेतल्यापासून वर्षभरात बँकेनेही फक्त चौदा हजार डॉलर इतक्या शुल्लक रकमेवर कंपनी बुडीतखात्यात घालण्याचा सल्ला दिला होता. अशा सगळ्या परिस्थितीला न जुमानता शिवाय पतीनिधनाचं ताजं दुःख बाजूला ठेवून आपलं लक्ष आपल्या मोठ्या मुलाला हाताशी धरून नवीन रिटेल प्रॉडक्ट्स वाढवून आणि जाहिरात इत्यादी माध्यमातून कंपनीला नुसतंच तारलं नाही तर तिचं नाव उत्तर अमेरिका आणि अन्य देशात नावारूपाला आणलं. 

२००४ च्या सुमारास  कंपनीची  त्या वर्षीची वार्षिक विक्री १ बिलियन डॉलरपेक्षा जास्त होती. तिचं नाव निव्वळ व्यवसायामुळेच आहे असं  नाहीये. तिने अनेक ठिकाणी मदतीसाठी संस्था सुरु केल्या आहेत आणि त्यातल्या स्त्रियांसाठी असलेल्या संस्थाही भरपूर आहे. आपल्या भारतातही तिची "हर प्रोजेक्ट(Her project)" म्हणून एक संस्था आहे. तिचा यु ट्यूब विडिओ खाली आहे.



तिच्या बाबांनी पोर्टलँडजवळच्या नदीचं नाव ठेवलेली ही कंपनी आहे "कोलंबिया स्पोर्ट्सवेअर" आणि ही टफ मदर आहे "गर्ट बॉयल". दोन दिवसापूर्वी ही आई नव्वद वर्षांची झाली. तिचा वाढदिवस महिला दिनाच्या आसपास असणं यापेक्षा सुखद योगायोग तो काय?

गर्टच्या खात्यावर असलेली ही यादी पहिली तर तिच्याबद्दलचा आदर  नक्की दुणावेल. 

  • The SBA Outstanding Business Person Award for Oregon (1977)
  • The Oregon Chapter of Women’s Forum Woman of the Year Award (1987)
  • A Top 50 Woman Business Owner by Working Woman Magazine (1993-96)
  • Oregon Entrepreneur of the Year, Oregon Enterprise Forum (1994)
  • The Golden Plate Award, American Academy of Achievement (1998)
  • Awarded the Jimmy Huega “Can Do” Award (2003)
  • Member, Oregon Commemorative Coin Commission (2004)
  • Granted Portland, OR’s prestigious First Citizen Award (2005)
  • Women of Distinction Award, Marylhurst University (2008)
  • Small Business Association Impact Award (2009)
  • Outstanding Mother Award, National Mother’s Day Committee (2009)
  • Women of Achievement Award, Oregon Commission for Women (2009)

तळटीप:

आतापर्यंत माझ्या करीयरमध्ये consulting मध्ये असल्यामुळे वेगवेगळे क्लायंट्स आले आणि माझ्यासाठी आदराची नवनवीन स्थानं निर्माण होत गेली. या टफ मदरच्या एका मुख्य प्रोजेक्टवर काम करायची संधी मिळणं हे माझंच भाग्य. आता तिचा मुलगा मुख्य कारभार संभाळत असला तरी कार्यकारिणीवर असलेली ही आई मला बाजूलाच असलेल्या employee store मधल्या तिच्या One tough Mother या  पुस्तकामुळे आणि  येता जाता लावलेल्या तिच्या पोस्टरमुळे नेहमी दिसते. तिला तसं  पाहताना मला तिची पार्श्वभूमी जाणून घ्यावीशी वाटली. हे पुस्तक खर अजून माझ्या  विशलिस्टवरच आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गेले काही महिने मला तिच्याबद्दल वाटत असलेल्या भावनांना शब्दांत मांडता आलं की  नाही माहित नाही पण त्या निमित्ताने या वाचकांना एका स्त्रीच्या यशाची कहाणी वाचावीशी वाटली तरी ते या पोस्टचं यश मी समजेन. तिच्या पुस्तकाचा काही भाग अमेझॉनवर या लिंकवर आहे. 



Monday, February 10, 2014

अर्ध्यावरती डाव मोडला….

ती माझ्या आयुष्यात थोड्या काळासाठी आली आणि तिच्या एका छोट्या कृतीने  देता देता एक दिवस मला थोडक्यात पण महत्वाचे शिकवून गेली. आनंदी राहायला खूप पैशाची आणि अपेक्षांची गरज नसते हे तिच्या बरोबर जे काही संवाद झाले तेव्हा तेव्हा नेहमीच जाणवायचं. 

नवऱ्याला पुन्हा नोकरी लागली तेव्हाचा तिचा फुललेला चेहरा, आता स्वतःचा इन्शुरन्स घेऊ शकतो असं सांगून तिच्या छोट्या छोट्या अपेक्षा पूर्ण होताहेत याचं समाधान. मुलाला इकडच्या शाळेत पाठवण्यासाठीचा आनंद, मागे एका dog shelter मधून कुत्रा दत्तक घेतानाची घटना, मी तिला जेव्हाही पाहिलं तेव्हा ती तिच्या कुटुंबात सदैव रमलेली आई/बायको, सतत हसरा चेहरा आणि समोरच्याला मदत करायची तयारी. 

मागे तिने घर घेतलं त्यावेळी आता आम्ही भेटणार नाही असं मला वाटलं. अर्थात तिची एक मैत्रीण आम्ही राहायचो त्याच इमारतीत खालीच राहायची. शिवाय मुलाची शाळा तिने बदलली नव्हती त्यामुळे मी शाळेच्या वेळेत दिसत राहीन असं तिने घर घ्यायची बातमी दिली तेव्हाच सांगितलं. मग तिच्या सामानसुमान थोडं फार लागलं असावं त्यावेळी एक दिवस दुपारी माझ्याकडे येऊन तिने मला एक राजस्थानला मिळतं, एकाखाली एक चिमण्या लटकत असतात ते शोपीस दिलं. मला खात्री आहे ती मला, भारतीय व्यक्तीला काही तरी खास द्यायचं म्हणून कुठलं तरी खास दुकान शोधत हे घेऊन आली असणार. "This is for good luck" मला तिने देताना सांगितलं आणि त्याच्याबरोबर एक सुंदर कार्ड. तिच्या घरासाठी मीही एक गिफ्ट घेतलं होतं. यानंतर आमच्या वेळा जुळल्या तर पार्किंग लॉटमध्ये भेट होई आणि लवकरच आमचीदेखील त्या जागेतून हलायची वेळ झाली. मग पुन्हा एकदा निरोपाची बोलणी आणि शुभेच्छांची देवाणघेवाण. यावेळी मात्र भेटीगाठी कठीण हे साधारण माहित. 

अर्थात मनातून ती जाणं शक्य नव्हतं. तिने तिच्या मुलाची दिलेली काही पुस्तकं आणि वस्तू माझ्याकडे आहेत त्यांचा उल्लेख नेहमी त्यांच्या आठवणीने होतो. 

माझी एक मैत्रीण अजून तिथल्याच एका इमारतीत आहे म्हणून एकदा जाऊया, भेटूया असं करता करता मागचं वर्ष असचं गेलं. काल एका सुपरमार्केट मध्ये तिची ती मैत्रीण भेटली आणि सुरवातीला मी तिच्या मुलाची चौकशी केली, अजून तो याच शाळेत असेल तर मग एकदा भेट जमवावी का असं माझ्या मनात होतं आणि ती वाईट बातमी मला मिळाली. एका वाक्यात सांगायचं तर "ट्रेसी गेली." पुढे तिने जे काही सांगितलं ते मला ऐकू तरी आलं का मला आठवत नाही. अजून मी शब्द जुळवतेय. 

तिला दम्याचा त्रास होता हे मला आताच कळलं. अर्थात त्यावर जे काही उपचार केले जातात ते ती घेत असणार. ख्रिसमसच्या निमित्ताने डिस्नेला जायचा प्लान त्यांनी बनवला. तिकडे जायचं म्हणून सगळी तयारी करून तिला दगदग झाली  हे निमित्त की  ती लोकं तिथे गेल्यावर थोडं दाटलेलं हवामान होतं ते तिचं शरीर झेलू शकलं नाही? परामेडीक्स यायला दहा मिनिटं लागली त्यावेळी ऑक्सिजन कमी झाला त्याने ती त्या दम्याच्या attack मधून उठलीच नाही. डॉक्टरांनी दहाएक दिवस प्रयत्नांची शर्थ केली पण बहुतके तिच्या तिसरीत असलेल्या मुलाचीही नियतीला दया आली नाही ना? देता  देता एक दिवस देणाऱ्यालाच अवेळी घेऊन जाणारी ही जी कुठली शक्ती आहे, तिच्याकडे नक्कीच न्याय नाही. आज राहून राहून तिच्या लहानग्याचा चेहरा समोर येतोय आणि कसंतरीच वाटतं. एका आईच्या तळमळलेल्या आत्म्याला शांती मिळो हे नक्की कुठल्या तोंडाने बोलायचं? 

Friday, January 31, 2014

सौजन्य सप्ताह

मागच्या आठवड्यात मार्टिन लुथर किंग (ज्यू) दिन साजरा झाला. खरं तर माझा या घटनेशी अगदी सुट्टीपुरताही संबंध नाही. म्हणजे असणार होता पण नेमकं एका मोठ्या रिलीजचा भाग म्हणून काही महिने सगळ्या ऑफिशियल सुट्ट्या (अन)ऑफिशियली रद्द आहेत. त्यामुळे खरं शाळा बंद असल्यामुळे कसं करायचं या विचारात आणि मग नंतर त्याचं रुपांतर कुणी तरी एकाने ऑफिशियली सुट्टी घेण्यात झालं. प्रत्येकवेळी घरून काम करू द्यायला काय मी तिथला किंग आहे की काय? - इति अर्थातच अर्धांग. 

तर हे प्रकरण वाटलं तसं संपलं नव्हतं. आमचं (किंवा खरं तर मोठ्या मुलाचं) हे पाहिलं शालेय वर्ष असल्याने आम्ही बऱ्याच गोष्टी शिकतोय तर त्यातली ही एक सुट्टी किंवा घटना म्हणूया. सोमवारची शाळेची सुट्टी संपल्यावर शाळेच्या बाई ज्या खरं तर (अपेक्षेप्रमाणे) ई मेलवर कमीच असतात. त्यांचा भर मुख्य शिक्षणावर आहे हे मला आवडत उगाच रोज रोज मेलवर लिहून मुलगा अचानक हायस्कूलवासी होऊ शकणार आहे का? तर हे कधी तरी येणारं मेल, ज्यात एक सुंदर संदेश होता म्हणजे काय ते I was highly impressed वगैरेवाला. शाळेत 100 acts of kindness थोडक्यात "सौजन्य सप्ताह" साजरा होत होता आणि प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याने घरी काही चांगली कृती केल्यास त्याबद्दलची नोट शाळेच्या नेहमीच्या फोल्डरमध्ये पाठवायची. मग वर्गात ते हार्ट शेप्ड नोटवर लिहून वाचून दाखवणे आणि सर्वांच्या मिळून शंभर चांगल्या गोष्टी मुलांसमोर मांडणे. किती छान कल्पना. म्हणजे तुम्ही हे करा ते करा पेक्षा तुम्ही जे करताय  त्यातल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून त्या सारख्या सारख्या करून थोडं आणखी समंजस व्हा हे त्या गोष्टीच जास्त अवडंबर न माजवता केला जाणारा एक सुंदर प्रोजेक्ट. मला तर वर म्हटल्याप्रमाणे highly impressed च झालं. आणि आपण आपल्यातर्फे आपला खारीचा वाटा  पाठवायचा असं  मी मंगळवारी ऑफिसमधून निघताना ठरवलं. माझ्याकडे निदान दोन पूर्ण दिवस होते. 

इतरवेळी मुलांना रागावणे, मुलांना त्यांचं पोट भरलं हे आपल्या मापाने मोजून त्याप्रमाणे कोंबणे, मध्ये मध्ये त्यांच्या आवडीच्या कार्स इ. मुवीज सारख्या पहायच्या ऐवजी आपल्या राहिलेल्या matches पाहणे आणि त्यांना माझ्या लाडक्या खेळांची गोडी लागते का ते पाहणे अशी सध्याच्या पालकांनी करावयाची महत्वाची कामं आम्ही दोघं आठवणीने करत असतो. अर्थात यात मुलांचं कौतुकही  जमेल तसं सुरु असतच पण शाळेत जायला लागल्यावर तिथे थोडा भाव मारायला मिळाला की मुलांना तो हवा असतो हे साहजिक आहे त्यामुळे पालक म्हणून मिळालेली ही  संधी तशी गमवायची नव्हती. "मोटिवेशन हेल्प्स" हे मी कामाला लागल्यापासून मला जास्त जाणवलं आणि आजकालच्या पिढीला ते जन्मापासून हवं असेल तर त्यात काही गैर नाही. 

नेमकं मंगळवारी संध्याकाळी मुलाचा मूड जर यथा तथाच होता त्यामुळे शोधूनही मला काही लिहून पाठवण्याजोगं मिळालं नाही; पण अजून बुध आणि गुरुवार आहेत म्हणून मी शांत होते. मला उगाच ते जुळवून आणायचं नव्हतं. मग गुरुवारी अचानक चमत्कार झाला. (आई इकडे असती तर नक्की म्हणली असती "मी तुला सांगते न माझी सगळी चांगली कामं गुरुवारी होतात) आल्याआल्या चक्क त्याने सगळ्यांच्या चपला उचलून नेहमीच्या जागेवर ठेवून दिल्या, बाबाने मला मी घरात घुसल्याघुसल्या बातमी दिली. त्या दिवशी नेमकं मला खूप ट्राफिक लागलं म्हणून मी मनातून वैतागले होते आणि माझ्या पाठीने छोटा संप पुकारायला सुरुवार केली होती. पण अर्थात आधी ठरवलं होतं आपणही सौजन्य पाळायचं, त्यामुळे मी लगेच कौतुक केलं. मग मला बरं वाटत नाही म्हणून डिश वॉशर रिकामी करायला छोटे हात मदतीला आले, झालचं तर छोट्या भावाला एबीसी शिकवायचं आणखी एक पवित्र कार्य जेवल्यावर लगेच सुरु झालं. (मी लहान होतो तेव्हा तो नव्हता त्यामुळे मी तुम्हाला used to होतो पण माझा लहान भाऊ तुमच्यापेक्षा मला जास्त used to आहे हा एक इतक्यात जुना झालेला युक्तिवाद आहे आमच्याकडे. तो पुढे करून आणखी 100 acts of kindness करून घ्यावे का असा मीच विचार करतेय. ) 

कामाचा तडाखा पाहून  आता मी पडणारच होते म्हणजे शंभर गोष्टी आमच्याच घरून जाणार की काय. मी नोट पाठवायचं मनातल्या मनात विचार केला आणि त्या दिवशी बरं नव्हतं म्हणून विसरूनच गेले. गुरुवारी आमच्या घरी काही विशेष नोंद करण्यासारखं घडलं नाही. पण हे मी वेळेत नोट न पाठवल्याचं डिमोटिवेशन वाटून आज मात्र  लिहायलाच हवं असं मी म्हटलं  आणि त्या घर बांधणाऱ्या माकडाप्रमाणे विसरून गेले. 

शुक्रवारी सकाळी तरी लिहावं  नं? तर मी मुलांच्या ब्रेकफास्टमध्ये वेळ काढला आणि नंतर उशीर होतोय म्हणून जी पळाले ती आठच्या स्टेट्स मिटिंगमध्ये असताना मला माझा घरगुती स्टेट्स आठवला आणि एकदम जिवाचं पाणी झालं. म्हणजे विचार करा तिकडे शंभर गोष्टी लिहिल्या जाणार त्यात आपल्या मुलाचं काहीच नसेल तर त्याचं तोंड कसं होईल? कदाचित इतर मुलं चांगल्या गोष्टी करतात हे शाळेत कळून तो घरी आवर्जून चांगला वागला असेल आणि आता आपण हे साधं कळवण्याचं काम करू शकलो नाही म्हणजे संध्याकाळी त्याचा मूड काय होईल वगैरे विचाराने मला इतकं कसं तरी झालं की आणखी काही न सुचून मी शिक्षिकेच्या मूळ मेलला रिप्लाय करून आधी दिलगिरी व्यक्त करून त्याच्या सौजन्याने वागलेल्या कृती लिहून पाठवल्या. शुक्रवार तसाच गेला. माझी घालमेल काही जाईना मग मी आडून चौकशी करून पाहिली कसा झाला kindness विक वगैरे, तर नेमकं शुक्रवारी वर्गशिक्षिका आजारी असल्याचं कळलं. त्यामुळे आता आपला मेल बहुतेक केरात गेला तरी चालावा असा विचार करून मी स्वत:वरच वैतागून हात चोळत बसले. 

सोमवारी त्याच विचारात ऑफिसला गेले आणि दुपारी जेवताना स्वतःचे मेल तपासताना माझ्या आधीच्या मेलला उत्तर आलेलं दिसलं. हुश्श ! त्या दिवशी संध्याकाळी मुलाला थोडं confidently विचारताना आणि आम्ही कळवलेल्या त्याच्या चांगल्या गोष्टी त्याच्याच तोंडून ऐकताना मला घरच्या extended सौजन्य सप्ताहात त्याला नेहमीप्रमाणे वेठीशी न धरता उगीच जास्त चांगलं वागावंस वाटलं.