Saturday, June 21, 2014

गाणी आणि आठवणी १७ - दिल है छोटासा

मी डिप्लोमाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असताना  "रोजा" रिलीज झाला होता. तेव्हा चित्रहार पाहायचो, त्यावेळी पाण्यावरचे थेंब उडवणारी आणि दक्षिणेकडच्या प्रचंड हिरव्या परिसरात चित्रित केलेल्या या गाण्यावर आणि त्याच्या संगीतावर फिदा होऊन मी आणि माझी मैत्रीण दोघी हा चित्रपट पाहायला गेलो होतो. मी शिक्षण सुरु असताना बाहेर जाऊन चित्रपट पाहायचं प्रमाण फार कमी होतं. पैसे हा प्रश्न होताच पण घरात टीव्हीपण मी आठवीत वगैरे असताना आल्यामुळे असेल आवड पण नव्हती. त्यातून त्याकाळी शनिवारी येणारा मराठी आणि रविवारचा हिंदी असे दोन चित्रपट दाखवले जात, त्यात नेमके मी महा रडके किंवा (माझ्यासाठी) पकाऊ चित्रपट पहिले गेल्यामुळे हा तेव्हा नवा असलेला प्रांत मला तेव्हातरी विशेष मनात भरला नव्हता.

रोजाची गाणी आवडणे हे रोजा पाहण्याचं पहिलं कारण असू शकेल (आणि मैत्रिणीने स्वतःच तिकीट काढून "चल गं" म्हणून नेणं हे दुसरं). मला वाटतं सुरुवातीलाच हे गाणं आहे. आम्हा दोघीसारखीच मोठं होऊन कुणीतरी खास व्ह्यायची स्वप्नं पाहणारी ही मुलगी "रोजा" म्हणजे अभिनेत्री मधुबाला या चित्रपटात कसली मस्त दिसलीय. नंतर एक दोन चित्रपटानंतर कुठे गेली काय माहित? मला या गाण्याचं प्रत्येक कडवं आवडतं आणि त्या शब्दांना न्याय देणारं रेहमानचं संगीत. तो पण तेव्हा मोठं व्ह्यायचं स्वप्न पाहत असणार. त्याची मेहनत रोजाच्या प्रत्येक गाण्यात दिसते. काही गोष्टी पहिल्याच फटक्यात आवडतात (किंवा आवडत नाहीत) तसं रेहमान पहिल्याच गाण्यात आवडला. त्याच्या संगीताच्या, सुरावटींच्या प्रेमात माझी पिढी आकंठ बुडाली. पण सगळ्यात जास्त आवडला तो "रोजा"चा हिरो "अरविंद स्वामी". 

तो डॉक्टर आहे पण त्याला अभिनय आवडतो ही जादा माहिती कॉलेजमधल्या कुणाकडून तरी समजल्यावर, "अरे वा डॉक्टर चालेल नं भावी इंजिनीयर मुलीला", असं म्हणून वर्गातल्या सगळ्याच मुली त्याच्या प्रेमात. आधीचे सगळे क्रश विसरून परी यासम हा वाटणारा चित्रपटातला रिषी. मग त्याची वासिम खानबरोबरची बोलणी, पळून जायचा प्लान वगैरे मध्ये त्याला किती लागतं तरी "यार कसला दिसतो न तरी पण" आम्ही दोघी एकमेकींच्या कानात. मला वाटतं आमचं बजेट जास्त असतं तर कदाचित आम्ही हा चित्रपट बाहेर जाऊन पुन्हा एक दोनवेळा पहिला असता. शिवाय मुंबईच्या बॉम्बस्फोटाचे ताजे साक्षीदार म्हणून देखील हा चित्रपट आमच्यासाठी माईलस्टोन होता. 

त्या वयात हा "क्रश" जसा साहजिक होता तसचं "दिल है छोटासा" सारख्या गाण्यांनी भारावून जाणंही साहजिक होतं. माझ्या बाबांकडच्या कुटुंबात मी पहिली इंजिनियर. माझे दहावीचे मार्क मी बोर्डात वगैरे आले नसले तरी आमच्या घरात सगळ्यांना भारी कौतुक वाटण्याजोगे. मला बारावी मध्ये मुंबईत फ्री सीट मिळवण्याइतके मार्क्स मिळाले नाहीत आणि पेमेंट किंवा बाहेर जाउन शिकायची ऐपत नव्हती.तसं कागदावर जातीची सवलत पण होती पण त्यातही दोन टक्क्यांची स्पर्धा होतीच. 

असो बोलायची वस्तुस्थिती न पाहिलेल्या स्वप्नांचं काय होणार याची खात्री नसताना रोजाची स्वप्नं त्या वयात आपली वाटणं सहज होतं. 

तिला रिषीबरोबर लवकर लग्न न करता शिकायचं होतं शिवाय त्याने आपल्या बहिणीला नकार देऊन आपल्याला वरलं याचा राग होताच. मग ती त्याच्या प्रेमातही पडते आणि तो संकटात सापडल्यावर अगदी  राष्ट्रपतीकडे दाद मागायलाही जाते. दिसायला सुंदर, हळवी आणि करारी अशी मुलगी व्हावं असं मलाच काय माझ्याबरोबरीच्या बऱ्याच मुलींना वाटलं. मला वाटतं "मणिरत्नम" हे दाक्षिणात्य नावदेखील माझ्या पिढीला तेव्हा कळलं आणि लक्षात राहिलं. नंतर जेव्हा चित्रपट पहिले गेले तेव्हा हा कुणाचा वगैरे प्रश्न पडू लागले किंवा मणीरत्नम या नावाने बरेच चित्रपट आवर्जून पहिले गेले. अजूनही मी चित्रपट पाहण्यासाठी वेडी होत नाही किंवा मला कथा वगैरे लक्षात राहत नाहीत. पण रोजा पाहिल्यानंतर मला चित्रपट पहायचा जो काही रस निर्माण झाला त्याचं श्रेय चित्रहारमध्ये पाहिलेल्या आणि अतिशय आवडलेल्या या गाण्यात आहे. 

आजही मी हे गाणं ऐकलं की माझ्या त्या टीनएज मध्ये  जाते. प्रेमात पडायला तेव्हा आवडलं असतं का याचं उत्तर रिषी देतो आणि मोठं होऊन भव्य दिव्य काही करायची प्रेरणा पी. के. मिश्रा (आणि जो कुणी मूळ  तमिळ कवी असेल) यांचे शब्द आणि ए आर नावच्या तेव्हा नुकतचं येऊ घातलेल्या वादळ ही प्रेरणा घेऊन जातं. मी आपसूक गुणगुणते, 
                                  चांद तारोंको छुने की आशा 
                                  आसमानों मी उडने की आशा 

No comments:

Post a Comment

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.