खरं मला या पोस्टचं नाव hibernation द्यायचं होतं पण त्याचा मराठी अर्थ निष्क्रियता आहे हे पाहिल्यावर तो विचार रद्द केला. निष्क्रिय या शब्दा मध्ये जो ढिम्मपणा आहे तो मनात आणलं तरी प्रत्यक्षात आणणं कठीण इतके आपण परिस्थितीने बांधले असतो. माझं जाऊदे, माझ्या आसपासच्या सत्तरीतल्या पालक मंडळींना पाहिलं तर तर तेही नुसतेच बसून राहिलेत असं क्वचितच दिसतं.
तर असो. सांगायचा मूळ मुद्दा पूर्ण विसरायच्या आधी हेच म्हणायचं होतं की या वर्षी जसा छान वसंत आणि मग थोडा वाढीव उन्हाळा मिळाला, इथवर सगळं कसं चांगलं सुरु होतं. नुसतं विकेंड टू विकेंडच्या ज्या सगळ्या ट्रिपा केल्या त्याबद्दल लिहायचा पेशन्स असला तर हातून बरीच प्रवासवर्णनं लिहून झाली असती आणि त्यांची आठवण संग्रहीत राहिली असती. बघूया आता पुढच्या वर्षी या जुन्या ट्रिप्सबद्दल काही खरडता आलं तर.
पण मग पानगळती सुरु झाली आणि नेहमीचेच छोटे छोटे प्रश्नदेखील मोठे वाटू राहिले. उगीच होणारी चिडचिड स्वतःलाच त्रास देऊ लागली. ऑफिशियली हिवाळा एकवीस डिसेंबरनंतर येतो पण इकडे आधीच त्याचा इफेक्ट येऊ लागला.
त्या दिवशी एक अस्वल थंडीत झोपून राहतं आणि बाकीचे प्राणी त्याच्या गुहेत येऊन मज्जा करून जातात अशा अर्थाची एक बालगोष्ट वाचून झाल्यावर असंच आपण पण हायबरनेट करावं असा विचार मनात आला. थंडी इतकी कडाक्याची आहे की कामासाठी बाहेर पडूच नये, तिकडे कोणाचं काय सुरु असेल आपल्याला काय त्याचं, तिकडे कशाला आपल्याच घरात काही मज्जा सुरु असतील तरी आपण त्याचा भाग न बनता सरळ त्या अस्वलासारखं ढिम्म झोपून राहावं असं या थंडीने किंवा त्यामुळे येणारे आजार आणि इतर कटकटींमुळे झालंय. तरीदेखील एक उडी थोडं साऊथला मारून आलोय आणि मग पुन्हा आजारांची रांग मार्गी लावतोय. या परीस्थितीत एक मोठा आरामाचा कार्यक्रम तर हवाच.
अर्थात असं काहीही वाटलं तरी प्रत्यक्षात जास्तीत जास्त तासभर स्वतःच्या दुखण्यांना देऊन आपण सावरतो. हा थोड्या वेळचा चढ आहे पुन्हा उतारावर आपलीपण गाडी लागेल ही आशा असते आणि तसंही हायबरनेट करायची सोय नाही हे वास्तव आहेच.
आम्हाला शाळेत या दिवसात शनिवारी आमचे ड्रीलचे सर एक दो एक दो करायला लावायचे. आज ही पोस्ट लिहिताना जरा मागे ब्लॉगकडे लक्ष दिलं तेव्हा लक्षात आलं. या वर्षी महिन्यांची अनुक्रमणिका पहिली तर अगदीच एक दो, एक दो आहे एखादवेळेस तीन. बाकी, प्रकार बदल, वगैरे काही नाही. म्हणूनच सुरुवातीला लिहिताना ब्लॉग पण निष्क्रिय झालाय का असा विचार करत होते. पण या एक दो, एक दो मध्येच पुढे चालायचं बळ मिळेल असं वाटलं. छोटी छोटी पावलं का होईना पण हालचाल आहे. म्हणून हे स्वतःचं स्वतःला सांगणं की चले चलो.
उद्या दिनदर्शिका बदलायची तर त्याचं स्वागत निष्क्रिय शब्दाने करण्यापेक्षा "चले चलो". शुभेच्छा तर सर्वांसाठी आहेतच. Welcome 2015 आणि जाता जाता २०१४ मधल्या काही महत्वाच्या भटकंतीचं हे कोलाज.
सालाबादप्रमाणे वर्षाला एक पोस्ट टाकून आम्ही पण ब्लॉग Hibernation मध्ये जाण्यापासून वाचवला आहे ;-) म्हाराजाकं गार्हाणा घालूक हवो तर गजालवाडी पण एक दो एक करेल.
ReplyDeleteसहलींच्या फोटोचा कोलाज एक नंबर आणि हो नववर्षाभिनंदन!!!
हा हा हा सिद्ध :)
Deleteठांकु, ठांकु.
कोलाज मस्त
ReplyDeleteठांकु ठांकु मंदार. एकदम मनापासून ब्लॉग वाचल्याबद्दल आणि थोडे जास्तच आभार. वाचते रहो :)
Deleteवा !! खुप छान आवडल मला..
ReplyDeleteअसच एकदा ब्लॉग वाचताना मला आवडलेल्या काही ओळी खालि लिहत आहे...
अचानक दोन चिमुकले हात पाठीमागुन गळ्यात येतात आणि माझी आई वर्ल्डबेस्ट आहे असं मोठ्या डोळ्यानं कौतुकानं म्हणतात.…
वर्ल्ड बेस्ट आई होण्यासाठी नां गंमत म्हणजे कोणतीच पदवी लागत नाही. एका बाउल टोमेटो सूप, कधीतरी केलेली दोन मिनिट में तैय्यार मेगी , सरप्राईज म्हणत हातात ठेवलेलं चोकलेट आणि रोज झोपताना कुशीत घेउन सांगितलेली कैच्याकै गोष्ट, एव्हढ्या पाठबळावर वर्ल्डबेस्ट आई होता येतं .
इतक्या कमी क्वालीफिकेशानामध्ये मिळणारा हा जगातला अत्युच्च जॉब आहे. पुन्हा परतावा म्हणून मिळणारे आनंदाचे बोनस निराळेच …. हे सगळं घडत असत नां तेंव्हा गंमत म्हणजे तो दोन बोटं रितेपणा गायबच असतो… तात्पुरता का होई ना.. ...
Deleteआभार तेजस.
तू लिहिलेल्या ओळी खूप छान आहेत. कुठल्या ब्लॉगवर मिळाल्या त्या?