Monday, July 6, 2009

ती आली, तिला पाहिले.....

२००७ मध्ये अधिवेशनाची स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवताना किंवा अगदी ह्या ब्लॉगचे नामकरण करताना कुणी म्हटले असते की बाई तू आताच काही महिन्यांमध्ये ह्या नावाचा इतिहास ज्या व्यक्तीशी संबंधीत सांगतेस ती अशी तुझ्याशी समोरासमोर ऊभी राहुन गप्पा करील, तर मी ती गोष्ट उडवून लावली असती. पण १ जुलै माझ्या आतापासुन कायम स्मरणात राहिल हे मात्र खरे.
म्हणजे झालं असं की या वर्षीचं बी.एम.एम.चं अधिवेशन आमच्या फ़िलाडेल्फ़ियात भरणार म्हणून आम्ही सर्वजण वेगवेगळ्या समित्यांवर काम करत होतो आणि कलावंतांचं खास स्वागत करणारा आमचा गट जेव्हा शेवटच्या मिंटींगला काम वाटप होत होतं तेव्हा ३० जूनला मेरिऑटला माझी ड्युटी होती. पण शेवटच्या क्षणी काही इतर कलांवंतांचे बेत बदलल्यामुळे तू १ तारखेला येशील का असं आमची लिडर मला फ़ोनवर विचारू लागली तेव्हा मी जरा विचारात पडले. कारण मग घरी माझ्या एक वर्षाच्या मुलाला कोण पाहणार, नवरा आयत्या वेळी ३०च्या ऐवजी १ ला राहु शकेल का अनेक प्रश्न. पण नवरोबाने सहकार्य केल्यामुळे मी १ ला जायला तयार झाले.
हॉटेलवर पोहोचले आणि त्या दिवशीच्या गेस्ट लिस्टवरचं एक नाव पाहिलं आणि दिल की धडकन एकदम तेज....मनात मोर नाचु लागला आणि चांदण्यात फ़िरवरणारा तो आवाज कानी घुमू लागला. अहो चक्क "आशा भोसले" हे नाव त्या यादीत होतं. हळुहळू एक एक कलावंत, ग्रॅंड स्पॉन्सर इ. इ. येत होते. त्यांचंही स्वागत करण्यात गम्मत होती. पण सगळीकडे आपला एकच प्रश्न "ती आली का?"
जरी लिस्टवर नाव असलं तरी अशा ठिकाणी स्वाभाविकपणे जे होतं तेच होईल असा साधारण अंदाज होता म्हणजे जी लोकं जरा जास्ती पुढे करणारी किंवा मोठ्या जागी काम करणारी असतात त्यांच्यापुढे आपण काय टिकणार?? पण असो.
आमचा स्वागतकक्ष आणि मेरिऑटचं फ़्रन्ट डेस्क यात तसं बरच अंतर होतं. म्हणजे ते हॉटेलच्या मुख्य दरवाजाला तर आम्ही लॉबीच्या दुसर्या टोकाला जिथे त्यांचं एस्कलेटर आणि एलेव्हेटरला जायचा रस्ता होता तिथं. साधारण दोनेकच्या सुमारास फ़्रन्ट डेस्कच्या इथे काही कामानिमित्त्त जाणं झालं तर काय अहो साक्षात आमची लहानपणापास्नंची गोड गळ्याची आराध्यदेवता समोर. तिला घेऊन येणारी व्यक्ती तिचं चेक इन करण्यासाठी पुढे होती आणि आशाजी तिथे उभ्या होत्या. प्रवासाने नक्कीच दमल्या असणार पण मला वाटतं एक चाहती म्हणून नमस्कार तर नक्कीच करावा. मी थांवले. नमस्कार करुन म्हणजे डोक्यात इतका गोंधळ चालु होता त्यावर ताबा मिळवायचा प्रयत्न करत त्यांच्याशी बोलु लागले की मला विश्वासच बसत नाहीये की आपण आता माझ्यासमोर उभ्या आहात. त्या तरीही माझ्याशी खूप छान हसल्या. माझ्या नशीबाने त्यांना मी आधी कुठे तरी भेटल्यासारखं वाटत होतं म्हणून त्या मला तो संदर्भ द्यायचा प्रयत्न करत होत्या...इतक्यात किरण त्यांच्या चाव्या घेऊन आल्यामुळे अर्थातच भेट संपली. आणि अशा प्रसंगी जे नेहमी होतं तेच म्हणजे कॅमेरा आणि वही दुसरीकडे. किरणकडे उगाच मस्का मारुन पाहिलं की अरे एक फ़ोटो काढला पाहिजे आणि माहितीतलं उत्तर अगं ती आता पाच तारखेपर्यंत इथेच आहे..असो...
आता मला फ़ोटो, स्वाक्षरी यासर्वांपेक्षा लक्षात राहिल ती शांतपणे हसुन माझ्याशी गप्पा मारणारी माझी लहानपणापासून गाण्यातुन शेवटी प्रत्यक्ष भेटलेली आशा....खरचं ती आली, तिला पाहिले आणि बास...मी धन्य झाले....

4 comments:

 1. तुला माहित्ये मी ग्रॅंड हयात मध्ये नोकरीला होते तेव्हा आमच्या इथे लता मंगेशकर यांचा वाढदिवस सेलिब्रेशन होते त्यांच्या अगदी जवळच्या ५०-६० लोकांबरोबर तेव्हा हॉटेलतर्फे त्यांना पुश्प गुच्छ मी दिला. मला अजुन त्यांचे ते हळुवार शब्द आठवतात, मी त्यांच्याशी बोलले त्यांना शुभेच्छा दिल्या. ज्यांच्या दर्शनासाठी लोक अक्षरश: जीवाचे रान करत असतील.

  ReplyDelete
 2. सही आहे सोनाली....मोठ्या माणसांना इतक्या जवळुन भेटायला मिळणं हे खरंच एकदम वेगळा अनुभव आहे...तू तर जास्तच नशीबवान आहेस...:)

  ReplyDelete
 3. २००७ चं कुठे, २००९ चं अधिवेशन फिलाडेल्फियामध्ये होतं! आणि तू त्यात स्वयंसेविका होतीस? अगं मीही त्याच अधिवेशनात स्वयंसेवक होतो! काय योगायोग! अर्थात मी काम फारसं केलं नाही, पण मिरवलं मात्र भरपूर.. ;-) माझ्या ऑर्कुटच्या प्रोफाईलमध्ये अनेक नामवंत मंडळींबरोबर काढलेले फोटो अपलोड करून मित्रमैत्रिणींना जळवण्याचं काम मात्र इमानेइतबारे पार पाडलं... ;-) अर्थात माझ्या स्वयंसेवक होण्यामागे Incentive होतं. नुसता प्रेक्षक म्हणून गेलो असतो तर जवळजवळ ५०० डॉलर्सचा खर्च झाला असता. पण स्वयंसेवकांना सगळं काही फुकट होतं ना! म्हणून आमचं नाव स्वयंसेवकांच्या यादीत... :-)

  ReplyDelete
 4. संकेत, अरे अधिवेशन २००९ लाच होतं. पोस्ट २००९ मधली आहे..पण आम्ही स्वयंसेवक म्हणून नावनोंदणी २००७ मध्ये केली होती....
  माहित नाही मला तू कुठल्या पद्धतीचा स्वयंसेवक होतास, आम्ही सगळे पदरचे पैसे घालूनच संमेलन आणि त्याआधीची कामे केली आहेत...असो....तुला नक्कीच मजा आली असेल...

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.