Wednesday, June 9, 2010

मार्गे हायवे गोमांतक...

काही जागा अशा असतात की तिथे आपल्याला जायचं असतं; अगदी मनापासुन पण तरी प्रत्यक्ष जायचा मुहुर्त उजाडण्यासाठी कुणीतरी तिथे न्यावं लागतं...माझं आणि हायवे गोमांतकचं तसंच झालं. तसं ते माझ्या लिस्टवर जवळजवळ १९९५ पासुन आहे असं मी म्हटलं तर कुणीही हसेल पण तेव्हा मी आणि माझी शिवाजी पार्कमधली मैत्रीण खादाडी करायला जायचो तेव्हा तेव्हा एकदा हायवे गोमांतकला जाऊया म्हणायचो आणि तिची दुचाकी नेहमी एस.व्ही.रोड वगैरे अशी वेस्टात असल्याने नेहमीच नंतर जाऊया करुन राहिलं...पण शेवटी मुंबईच्या ब्लॉगर मेळाव्यानंतर बहुधा नशीबात तिथे जाणं(किंवा रोहनने तिथे घेऊन जाणं) लिहिलंच होतं त्याप्रमाणे गेलो...

झालं असं की मराठी ब्लॉगर्सचा मेळावा पार पाडल्यानंतर रोहन,शमिका,महेंद्रकाका आणि मी एकत्रच जाणार होतो आणि निघेनिघेस्तोवर रात्रीचे नऊ वाजले असावेत. त्यामुळे रात्रीच्या जेवणासाठी सगळी तयार होतो आणि नाहीतरी शिवाजी पार्कच्या इथे रोहनने गाडी ठेवली असल्याने तिथपर्यंत जायचे तर रस्त्यात गोमांतकमध्येच काही हादडुया असा विचार होता पण (नेहमीप्रमाणे) गोमांतकच्या बाहेरची रांग पाहुन तो विचार सोडला मग वाटलं की पार्काच्या इथे फ़्रॅंकी घ्यावी आणि गाडीतच जाता जाता खावी पण प्यायला पाणी,सरबतं घेतल्यावर फ़्रॅंकीही न घेता निघालो..रोहनच्या मनात अर्थातच हुकलेलं गोमांतक असावं त्यामुळे "जाऊया नं खायला" एवढं बोलुन शिताफ़ीने त्याने बांद्र्याच्या हायवे गोमांतकला गाडी लावली तेव्हा मानलं त्याला. एक म्हणजे इतकं पर्फ़ेक्ट लोकेशनसाठी आणि दुसरं त्या हायवेवरुन क्रॉस करण्याच्या सिग्नलला ज्या प्रकारे त्याने गाडी उजवीकडून मग मध्यभागी आणि मोठं डावं वळण घेऊन मागच्या गल्लीत घुसवली त्यासाठी...
अर्थातही इथेही रांग होती पण चार माणसांत वीस मिन्टं कशीही जातात. आमचा नंबर आल्यावर एक डीश अगदी मस्ट होती ती म्हणजे बोंबिल फ़्राय. शमिकाला कित्येक दिवस खायचे होते त्यामुळे पहिले आले ते खरपुस तळलेले चविष्ट ओले बोंबिल...त्यातलं तेल पाहायचं नाही...आमच्या थाळ्या यायच्या आत ते फ़स्तही झाले होते..त्यानंतर मग प्रत्येकाने आपापल्या आवडीप्रमाणे मत्स्याहाराचेच प्रकार मागवले. मला खरं सुरमईवर जीव आला होता पण ती ड्राय चांगली लागते म्हणून मग पापलेटचं कालवण मागवलं. मालवणी रेस्तरॉंमधली कालवणं तिरफ़ळ आणि नारळाच्या दुधाचं लेणं लेवुनच येतात हे वेगळं सांगायला नकोच. इथली चव आणि दादरच्या गोमांतकची चव मला साधारण सारखीच लागली. तांदळाची भाकरी, भात आणि सोलकढी आणखी काय हवं ताटात?? मला आठवतं एकदा जेवण आलं आणि सगळे इतके बिझी झाले की सगळ्या ताटांचे फ़ोटोपण काढले नाहीत.

आधीच भरपेट वडे-कटलेट (संदर्भ: ब्लॉगर मेळावा) खाऊन पोटं काही रिकामी नव्हती त्यामुळे कुठलंही गोड मागवायच्या भानगडीत पडलो नाही पण इतरवेळी खरवस मागवायला हरकत नाही...माझं आणि मालवणी जागांचं काहीतरी गमक आहे त्यामुळे इथे नेहमी मासेच खाल्ले जातात त्यामुळे इथल्या शाकाहारी मेन्युकडे फ़ार लक्ष जात नाही पण तरी अगदी मराठमोळे शाकाहारी पदार्थ जसं कोथिंबीर वडी, डाळींबी उसळ वगैरे इथेही असते त्यामुळे मालवणी खायचं तर हायवे गोमांतकलाही एकदा नक्की जायला हवं...आणि इतर महागड्या जागांपेक्षा इथले दर नक्कीच रिझनेबल असतात असा माझा अनुभव आहे.
जितका आनंद मेळाव्यात सगळ्यांना भेटून झाला त्यापेक्षा थोडा जास्त रात्रीच्या जेवणाने झाला असं त्यादिवशी वाटल...शेवटी खरंय की माणसाला खुश करण्याचा मार्ग त्याच्या पोटातुन जातो...आणि त्यातही माझ्या पोटातुन मासे गेले की मी जरा कांकणभर जास्तच खुश होते....मग केव्हा जाताय खुश व्हायला हायवे गोमांतकला???

Saturday, June 5, 2010

जागतिक पर्यावरण दिवस

आज म्हणजे पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. थोडी थोडकी नव्हे तर १९७३ पासुन हा दिवस युनायटेड नेशन्सनी पाळला आहे. तरी पर्यावरणाचा इतक्या वर्षांत झालेला र्‍हास पाहुन खरं तर शंका येते हे असे वेगवेगळे दिवस साजरे करुन आपण नक्की काय करतो....कदाचीत असं असेल की नाहीतर यापेक्षा अपरिमीत हानी झाली असती...(just to look at it positively)
या वर्षीची थीम आहे, "Many Species: One Planet, One Future" म्हणजे बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण हिरवी इकॉनामी कशी आणावी असं काही किंवा सगळ्या इतर सजीव,वनस्पती इ.ना जगवुन कसं एक हरित ग्रह किंवा एक भविष्य बनवायचं असं काहीसं...थोडं डोक्यावरुन जातंय माझ्या पण मोठे देश काहीतरी करत असतील असा एक भाबडा विचार करते...
मोठी लोकं काही करो न करो, आपण एक सर्वसामान्य नागरिक आणि या पर्यावरणाचे इतके वर्षांचे हानीकारक म्हणून निदान आता तरी जागं व्हावं हे मात्र सर्वांना पटेल..या वर्षी माझ्या मुलाच्या पाळणाघरात संपुर्ण आठवडा Reduce, Reuse and Recycle असा पाळला गेला...खरं एक कशाला सगळेच आठवडे का नाही असे पाळत असं मला आपलं वाटलं पण चला निदान सुरुवात तर आहे...
मुळात जितकं आपण कमी वापरु तितकं त्याचा कचरा कमी..जमेल तिथे हे तत्व पाळणं सोप्पं आहे...खोलीत गरज असतानाच दिवे,पंखे, एसी (एसी शक्य तितका टाळावा हेच उत्तम) आणि बाहेर पडताना वीजेची उपकरणी आठवणीने बंद करणे यात आपण कमी वापरण्याचं तत्व अमलात आणू शकतो. पाण्याचंही तेच. नळाची धार थोडी कमी करावी आणि पिण्यासाठीही पाण्यासारखा धर्म नाही असं असलं तरी पुर्वीचं तांब्या-भांडं तत्व जास्त चांगलं म्हणजे जेवढं हवं तेवढंच पाणी प्यालं जात आणि बाकी उष्टं नं झाल्यामुळे वाया जात नाही...कागदाचा कमी वापर हेही महत्वाचं..मोठ्या रेस्टॉरन्ट्समध्ये रुमाल असतात तिथे पुन्हा पेपर टिश्यु वापरायचं हमखास टाळता येईल. घरीही शक्यतो ओटा पुसायला इ. फ़डकी वापरलीत तर ती धुता येतात किंवा वाटल्यास टाकता येतात. त्यासाठी खास रोज पाच-सहा बाउन्टी कशाला वापरा? शाळेतल्या वह्यांमधल्या उरलेल्या पानांची रफ़ वही बनवणं हेही एक प्रकारे वापरातली एक वही कमी करण्यासाठी मदतच करतं...आता या कमी वापरात आपण फ़क्त वाचवतोय उगाच कंजुषी नाही तर वायफ़ळपणा टाळतोय..असे अनेक उपाय आहे Reduce साठीचे...
Reuse म्हणजे पुन्हा वापरणंही नेहमीच चांगलं. उदा. लहान मुलांना घरी चित्रकला इ. उद्योग करायला पाठकोरे कागद दिले तरी काम होतं. मुळात प्लास्टिकपिशव्या टाळाव्या पण आल्याच तर शक्य असल्यास मग एक-दोनदा त्याच वापराव्यात म्हणजे निदान थोडं गिल्टी फ़िलिंग कमी. माझी आई भाज्या धुतलेलं पाणी नेहमी कुंड्यांमध्ये झाडांना घालते. माझ्या लहानपणापासुन पाहिलेलं पुनर्वापराचं हे सगळ्यात सुंदर आणि सोपं तत्व आहे. तसंच सांडपाण्यावर बागा फ़ुलवणारी एक सोसायटीही मला माहित आहे. मोठ्या लेव्हलवर जमत असेल तर तोही प्रयोग करायला हरकत नाही.
Recycle करणं केव्हाही चांगलं पण त्यासाठीसुद्धा एनर्जी लागते म्हणून वरची दोन तत्व पाळून जे उरेल आणि शक्य असेल त्याचं रिसायकलिंग करणं हे उत्तम.म्हणजे ते वर म्हटलेले पाठकोरे कागद दोन्ही बाजुनी भरले की मग सुक्या कचर्‍यात टाकावे. नेहमीच ओला आणि सुका कचरा वेगळा करणं चांगलं. आता सगळीकडे तो वेगवेगळा उचलण्याची सोयही आहे. शिवाय एखाद्याचं मोठं घर, पाठी अंगण इ. असेल तर मग ओल्या कचर्‍याचं कंपोस्ट बनवुन त्याचं खत झाडांना वापरणं हेही खूप किफ़ायतशीर ठरु शकेल. अमेरिकेतील काही गावांत एखाद्या मोकळ्या ठिकाणी आपण स्वतः आपला असा कचरा नेऊन कंपोस्ट खताच्या खड्यात नेऊन टाकु शकतो आणि नंतर गरज पडेल तेव्हा तेच खत स्वतःच्या बागेसाठी फ़ुकट घेऊनही येऊ शकतो..खूपच अभिनव कल्पना आहे ही. त्याने रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण शुद्धीकरणासाठी मदतच होते...
खरं तर या विषयावर जेवढं मांडावं तेवढं कमी आहे..आणि असे एक दिवस साजरे करण्यापेक्षा आपल्या दैनंदिन जीवनाला हे वळण लावणं जास्त आवश्यक आहे. आपली नैतिक जबाबदारी म्हणून याचं भान आपण ठेऊया आणि आजच्या पर्यावरण दिवसापासून जमेल तितकं environmental freindly वागायचं ठरवुया.

Tuesday, June 1, 2010

जेटलॅगदेवाची व्रतकथा...

ऐका, ऐका, भाविक भक्तहो जेटलॅगची कहाणी...ही कहाणी वाचल्याने, ऐकल्याने काय होते? जर स्वतः जेटलॅगमध्ये असाल तर थोड्या टिपा आणि मानसिक आधार मिळतो; नसाल तर थोडी करमणूक होते...श्री जेटलॅगदेवाची नावे व रुपे अनेक आहेत.सर्व भूतांच्या ठिकाणी तो वेगवेगळ्या तास, दिवसांच्या रुपाने राहतो. भारतात चार-पाच दिवस, अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर एक आठवडा तर पूर्व किनार्‍यावर काही वेळा आठवड्यापेक्षा जास्त अशा विविध रुपांनी तो सगळीकडे वास्तव्य करुन असतो.त्याला नमस्कार असो. अशा या जेटलॅग देवाची ही कहाणी आहे..
उत्तर अमेरिका खंडात अमेरिका देशात असंच एक भारतीय कुटुंब राहात होतं. इतर कॉमन घरांसारखं एक गोंडस (पण तसं लबाड) बाळ त्यांच्याही घरात होतं.एकदा जेटलॅग देवांच्या मनात आलं आपण त्या कुटुंबाच्या घरात जावं त्याने त्या घरातल्या गृहिणीला थोडा आराम मिळेल, त्यांचं बाळ थोडं जास्त झोपेल आणि तिचा नवराही सगळेच झोपलेत या आनंदात आणखी थोडा जास्त आराम करील..म्हणून जेटलॅगदेवाने त्या घरच्या राजा-राणींच्या मनात शिरण्याची युक्ती केली आणि कंटाळ्याचे रुप घेतले. कंटाळाच तो कुणाला नाही लगेच दिसणार??
दरवाजातच त्यांना राजा-राणींचे आत्ताच ओळख झालेले एक मराठी जोडपं भेटलं.कंटाळ्याचे रुप असले तरी जेटलॅग देव तेजस्वी दिसत होता त्यामुळे या जोडप्याने त्याचे क्षेमकुशल विचारले. तेव्हा कंटाळ्यारुपी जेटलॅगदेवाने त्या जोडप्याने राजा-राणींची पूर्वकथा आणि जेटलॅगव्रताचा महिमा सांगितला. ही राजा-राणी काही वर्षांपुर्वी सारखं भटकत. मायदेशाच्या तसंच देशातल्याही मोठमोठ्या वार्‍या करत. हवाई, वेस्ट कोस्ट अशा लांब-लांब ठिकाणी जाऊन आलं की त्यांना जेटलॅग होई आणि मग काही दिवस ते निवांत आराम करत. अशावेळी घरचं ऑम्लेट-पावही त्यांना गोड लागे. जास्त भांड्याचा पसारा नाही की ग्रोसरीची कटकट नाही..त्यांचे दिवस कसे सुखात जात. पण आता युवराजांच्या आगमनाने त्यांना जेटलॅगव्रताचा विसर पडला आहे. सारखं घरकाम आणि ऑफ़िस यातच ते कष्टताहेत..त्यांना व्रताची आठवण करुन देण्यासाठी मी मुद्दाम येथे आलो आहे.
कंटाळ्याचे बोलणे ऐकुन त्या मराठी जोडप्याच्या मनातही खूप कंटाळा उत्पन्न झाला आणि लवकरच त्यांनी मायदेशाचं तिकिट तेही वन वे काढून आपला कंटाळा साजरा केला.त्यांनी जेटलॅगदेवाचं ऐकलं म्हणून त्यांना तिथे गेल्यावर भरपुर जेट्लॅग झाला आणि ते आरामाच्या पाठी लागले...घरच्यांनी आयतं करुन दिलेलं किंवा बाहेर जाऊन खादाडी करणं एवढंच काय त्यांना काम होतं...
इथे कंटाळा रुपात आलेल्या जेटलॅगदेवांना राजा-राणींनी ओळखलंच नाही. त्यामुळे त्यांनी साधी विचारपूसही केली नाही त्यामुळे त्यांनाच कंटाळून कंटाळारुपी जेटलॅगदेव निघून गेले. पण तरी युवराजांना नातलगांशी भेटवायला राजा-राणी मायदेशी गेले. जेटलॅगदेव आधीच रुसल्यामुळे, तिथे त्यांना इतकं उत्साही वाटलं की त्यांना जेटलॅग झालाच नाही. ते सगळीकडे भटकत राहिले.काय वाट्टेल ते, वाट्टेल तिथे खात राहिले आणि मजाच मजा केली. राणीला तर मध्ये अन्नातून विषबाधाही झाली तरी त्यांनी खादाडीचा हेका सोडला नाही..शेवटी त्यांचा परत जायचा दिवस उगवला. आता मात्र त्यांना आपले पुर्वीचे दिवस आठवले आणि त्यांना प्रचंड कंटाळा आला. पण परत येण्याखेरीज पर्याय नव्हता.
पण त्यांचे पुर्वीचे दिवस त्यांना आठवले म्हणून जेटलॅग देव त्यांना प्रसन्न झाले.परत अमेरिकेत आल्यावर आठवडा झाला तरी ते वेळी-अवेळी झोपू लागले. युवराजांनी तर पहाटे उठायचा कहरच लावला पण तरी घरचं ऑम्लेट-पाव गोड वाटु लागलं, थोडक्यात केलेल्या साबुदाण्याच्या खिचडीची गोडी अवीट झाली आणि मायदेशाहून फ़्रोजन करुन आणलेल्या आमरसाचे बाउलच्या बाउल रिते होऊ लागले..संध्याकाळी जेवता जेवता युवराज खुर्चीतच झोपू लागले. राणीला आराम मिळाला आणि या कहाणीसारख्या पोश्टा सुचू लागल्या. युवराजांना कधीही भूक लागु लागली आणि त्यांच्या खाण्याचे नखरे आहेत म्हणण्याचेही कमी झाले. राजांनीही तिन्ही-त्रिकाळ आराम करुन घेतला. आणि असे त्यांचे दिवस मोठ्या मजेत जाऊ लागले.
म्हणून म्हणते, उतु नये, मातु नये, दुरची आणि त्यातही मायदेशाची वारी करायला विसरु नये.जेटलॅग देवाचा महिमा पुरवतो भक्तांची कामना. अशी ही साता उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ-संपुर्ण...बोला जेटलॅगदेवांचा विजय असो...कंटाळा महाराज की जय...

वि.सु.....कुठल्याही व्रतकथेचा आधार हा निव्वळ योगायोग समजावा...किंवा अवेळी उठण्याचे परिणाम या कॅटेगरीत टाकुन मोकळे व्हावे..

Monday, May 31, 2010

फ़ुलोरा....देवबाप्पा देवबाप्पा

अगदी लहानपणापासुन सोबत करणारी गाणी खरं तर कायमच आपल्या लहानग्यांबरोबर असतात पण तरी जसं वय वर्षे दोन हा टप्पा पूर्ण होतो तसं झोपताना गाण्यांच्या ऐवजी गोष्टी किंवा मस्ती जास्त जवळची वाटते. पहिली दोन वर्षे आपल्या खांद्यावर, मांडीवर झोपताना शांत असणारं आपलं बाळ आता मोठं झालं हेच खरं...त्यामुळे फ़ुलोर्‍यातलं हे शेवटचं पुष्प. यानंतर कदाचित एखादं फ़ार जवळचं गाणं या ब्लॉगवर येईलही पण हा पुष्पगुच्छ घट्ट बांधुन ठेवायची वेळ आली आहे..गेले दोन दिवस गोष्टींवर झोपणारं माझं बाळ आता मोठं होतंय; त्यामुळे मागच्या वर्षभर जसं महिनाकाठी एक गाणं आमचं लाडकं असायचं तसं नसेल. त्यामुळे आता इथंच थांबलेलं बरं.
जाता जाता या महिन्यातलं नसलं तरी मोठं होता होता आमचं पिलु 'जय जय बापा' करताना असं काही मागणं मागत असेल का? असं वाटलं म्हणून हेच गाणं निवडलंय....

देवबाप्पा देवबाप्पा नवसाला पाव
खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव

झाडाला येऊ दे आईस्क्रिमचे तुरे
गोळ्यांच्या कळ्या अन चॉकलेटची फ़ुले
बिस्किटांच्या पानाला साखर पन लाव

झाडाला येऊ दे लाडू अन करंजी
रोज रोज खायला मिळेल मग ताजी
मधुनच येऊ दे बटर अन पाव

आईजवळ करणार नाही मी हट्ट
खाऊन खाऊन होईन मी खूप खूप लठ्ठ
झाडावर असू दे माझेच नाव

Saturday, May 29, 2010

गाणी आणि आठवणी ३ - तेजोमय नादब्रम्ह

ही आठवण खरं म्हणजे एका गाण्याची नाही तर अख्ख्या अल्बमची आहे...तो २००२ चा मार्च...उन्हाची काहिली मुंबईत वाढली होती आणि वर्षभराच्या नोकरीत एकही दिवसाची सुट्टी नाही, पुष्कळसे शनि-रवि ऑफ़िसके नाम,मध्यरात्री ऑफ़िस सोडणं याने कावायला झालं होतं..त्यामुळे कसंबसं P.M. ला पटवुन एका आठवड्याची सुट्टी मिळवली होती..माझा मावसभाऊ (तेव्हा सडाफ़टिंग) बंगळुरला असे त्याच्याकडे आई-बाबांबरोबर जायचं आणि मग उटी-म्हैसुर-कोडाई ची सहल असा साधासुधा बेत होता...
त्याच्याकडे माझ्याच आसपासच्या वयाचे त्याचे रुममेट्स; त्यामुळे आमची गट्टी जमली..त्यातल्या गाता गळा असणार्‍या मित्राने मला उ-म्है-को च्या चार दिवसांसाठी "तेजोमय नादब्रम्ह" दिली..त्याच्या प्लेअरसकट..तो पूर्ण उन्हाळा मी ती कॅसेट जगले.पुन्हा मुंबईला आल्यावर ती लगेच घेतली आणि त्यावर्षी किती जणांना गिफ़्ट म्हणूनही दिली..इतकं काय होतं किंवा आहे त्यात असं कधीच वाटलं नाही..
ऐकल्या क्षणापासुन जवळजवळ प्रत्येक गाणं आवडलं..श्रीधर फ़डकेंच्या संगीताला सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी दिलेली योग्य साथ हेच नाहीये...याचं संगीत, वादकांची कमाल, बासुरी सारंच कसं अप्रतिम आहे...आजही त्यातली गाणी ऐकली की मी कर्नाटक टुरिझमच्या त्या बसमधल्या माझ्या उजवीकडच्या सीटच्या खिडकीत जाते..आम्ही साधारण हनिमुनच्या सिझनला गेलो होतो..त्यामुळे त्या बसमध्ये झाडून सारी हनिमुन कपल्स आणि माझ्या आई-बाबांसारखं एक नागपुरचं वयस्कर जोडपं..मी एकटीच "मुलगी"..खरं तर आमच्या ड्रायव्हर-गाईड सकट माझ्या अशा प्रकारे आई-बाबांबरोबर फ़िरण्याचं इतकं कौतुक होतं की सारी बसच मला "बेटी" म्हणे...मी कुठे परत यायला उशीर केला तरी सवलत असे...तरी थोडी-फ़ार मी एकटीने ती ट्रिप अनुभवली आणि त्यातही मला मजा आली...
कधीही ’तेजोमय’ लावली की माझ्या मनात बस वळणा वळणांनी जातेय आणि मी उलट-सुलट करुन ही गाणी ऐकतेय हेच दृष्य जगते. त्यातलं सगळ्यात लाडकं गाणं अर्थातच "मी राधिका", अगदी इतक्यात एका मैफ़िलीत आरतीजींना ते गाताना ऐकलं आणि पुन्हा उटीला पोहोचले इतकं ते नातं घट्ट आहे.
खरं तर मुंबईच्या टिपिकल कॉर्पोरेट जगाच्या पहिल्या अनुभवाने पिचलेल्या हळव्या मनाला आपल्याला या सर्व भावना आहेत हेही विसरायला झालं होतं याचं भान या राधिकेने मला दिलं...तर "छायेपरी ही नियती" या "दे साद दे हृदया" ने सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करायला लावलं...पण तरी "त्या गंधातुन मोहरली माझी कविता" हे "मी एक तुला फ़ुल दिले" मधलं साधं-सोप्पं वाक्यही त्या संगीताने भारावल्यासारखं वाटतं याचाही अनुभव आला.
बंगलोर,उटी, कोडाइला रस्त्यात कुठेही पाऊस भेटायचा..कुणाच्या आठवणीने आभाळ हळवं होतंय असं उगाच तेव्हा मला वाटायचं...आम्हा मुंबईच्या लोकांना तसंही फ़क्त मान्सुनचीच सवय.....त्या पावसाची हळवी आठवण "कधी रिमझिम आला ऋतु आला" या गाण्याने आता ओरेगावात पडणार्‍या वर्षभराच्या पावसातही होते...आणि त्यावर्षी तर मुंबईत परत आल्यावर पावसाची इतकी वाट पाहिली होती की जूनमध्ये तो आला तेव्हा आपसूक हेच गाणं ओठावर आलं....अजुनही पावसाबद्दलच्या आवडत्या मराठी गाण्यात हे गाणं माझं फ़ार लाडकं आहे...
खरं तर ही कॅसेट म्हणजे का कोण जाणे माझ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होऊन राहिलाय...जणु काही इतर कुठले उन्हाळे आलेच नाहीत..त्यावर्षी एकामागुन एक संकटं, प्रोजेक्टमुळे येणारी आजारपणं आणि बुरखेधारी कॉर्पोरेट जगाचा मला दिसलेला चेहरा या सर्वांची सुरुवात व्हायच्या आधी ही सुंदर गाणी माझ्या मनात घर करुन बसली..ते कठीण दिवस तरुन जायची शक्ती या गाण्यांनी तर मला दिली नसेल ना, असा विचार या वर्षीच्या मुंबईच्या वैशाख वणव्यातही माझ्या मनात आला आणि पुन्हा एकदा मनाने मी कोडाईच्या सरोवरातल्या होडीत बसले आणि "तुला पाहिले मी नदीच्या किनारी" आपोआप कानात गुणगुणायला लागले....

Wednesday, May 26, 2010

मुंबईतला ब्लॉगर्स मेळावा....

खरं तर हा विषय तसा आता ब्लॉगविश्वावर जुना पण काही ब्लॉगु-ब्लॉगिनींनी जरा सांगितलं म्हणून किंवा स्वतःलाही लिहायचं होतं पण तेव्हा वेळेत न लिहिता आल्यामुळे उशीरा का होईना...आणि तसंही अजुन मे संपला नाहीये मग काय हरकत आहे?? शिवाय बाकीच्यांचे लेख त्यांचे ते नंतर वाचतील पण माझा अनुभव मी स्वतः नंतर कसा आठवणार (आत्ताच सगळ्ळ सगळ्ळ आठवत नाहीये तर...) या आणि अशा अनेक कारणांमुळे शेवटी मीही माझे दोन पैसे या विषयावर खर्च करायचे ठरवले आहेत (ही या विषयावरची शेवटची पोस्ट असेल अशी आशा..)संदर्भासहित स्पष्टिकरण किंवा कारणे दाखवा नोटीस अशा विषयांवर मी जास्त चांगलं लिहु शकेन हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या धेनात आलं असेलंच पण तरीबी हे फ़क्त नमनाचं वाटीभर तेल होतं याची कृ.नों.घ्या...

तर ९ मे २०१० नेमकं मायदेशात असणं आणि मेळावाही असणं हा जरी समसमा संयोग असला तरी तो तिथल्या तिथे साधण्याची कसरत साधताना मला नक्की काय काय करावं लागलं (in short किती लोकांना टोप्या घालाव्या लागल्या) हे सांगणं नमनानंतर तितकंच आवश्यक आहे...(त्याने इतरांच्या मेळावासंबंधी लेखांपेक्षा वेगळं काही वाचल्याचं समाधानही वाचकांना लाभेल ही आशा). सगळ्यात प्रथम म्हणजे तिथे हक्काच्या रविवारवर हक्क (so called प्रेमळ) दाखवणार्‍या प्रेमळ नातलग,मित्रमैत्रीणींची संख्या त्याच आठवड्यात अचानक वाढल्याचं ध्यानात आलं.आयला म्हणजे तुम्ही इतर दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन मला भेटाच किंवा जेवायला बाहेर/घरी न्याच असा आग्रह नव्हता पण सगळे रविवारसाठी अडून बसल्याने जरा मोठा लोचा झाला होता.कारण मी ब्लॉग लिहिते हे त्यातल्या ९९.९९% लोकांना माहित नाही मग कुठे जायचं हे खरं सांगायचा मार्ग मीच बंद केला होता. पण प्रत्येकाला दुसर्‍या कुणाचं तरी नाव सांगुन आयत्यावेळी सुटका करुन घेतली. मुख्य प्रश्न होता मुलाला इतका वेळ एकट्याला आईकडे सोडायचा पण नशीब की आईला तसं फ़ार काही सांगावं लागलं नाही पण नेमकी तिलाच त्या दिवशी एक काम (तेही दादरलाच) निघालं आणि आता मेगा ब्लॉकमध्ये ही लवकर आली नाही तर काय या टांगणीत मी दुपारभर होते पण नशीबाने ती तीन वाजता परतली आणि मी तडक सुटलेच..उगाच कुणी घरी टपकलं तर मग सुटका कशी करायची याचा विचार केला नव्हता. आणि लवकर निघाले तरी फ़ायदा झाला कारण इतकं करुन मेगा ब्लॉकमुळे बरोबर वेळेवर म्हणजे पावणे पाचला पोहोचले..(मी रोहन आणि महेंद्रकाकांना थोडी लवकर येईन असं सांगितलं होतं...मग पंधरा मिन्ट तर पंधरा मिन्ट लवकरशी मतलब काय??)

आल्या आल्याच सचिनने बॅच दिला आणि मग एक एक करुन ओळखीच्या मंडळीशी खरा परिचय/गप्पा/खेचाखेची करायला सुरुवात झाली..तसंच एक शुद्धलेखनाच्या नियमासंबंधी छोटेखानी पुस्तकही देण्यात आले (त्यांची संख्या मर्यादित होती त्यामुळे कदाचित उशीरा येणार्‍यांना मिळालं नसेल) पण माझ्यासारख्या ब्लॉगर्सनी संग्रही ठेऊन वापरावं असंच पुस्तक आहे. त्याबद्द्ल विशेष आभार.

सोनाली आणि आर्यनमुळे खरं तर मी आणि शमिकाही पुढे बसलो. त्यातल्या त्यात फ़ायदा म्हणजे ती जागा पंख्याच्या खाली होती. पण तसं वर असल्यामुळे थोडं कमी उकडत होतं (किंवा सवय झाली असणार) मेळाव्याची सुरुवात कांचनच्या भाषणाने झाली..त्यातला मला लक्षात राहिलेला मुद्दा/सुचना म्हणजे ज्यांना दिर्घ बोलायचं आहे त्यांनी शेवटी परिचय करुन द्यावा..अरे काय डोकं चाललंय यार, यांना नक्कीच आणखी काही मेळाव्यांचे अनुभव असणार असा मी विचार करतच होते आणि मग एक एक करुन परिचयांना सुरुवात झाली. सोनालीचा नंबर तसा लवकर होता आणि आर्यनचा सत्कारही होता.सुरुवातीचे काही थोडक्यात असतानाच एकदम मग आपल्या वयाचा गैरवापर करत काही ज्येष्ठांनी लांबण लावायला सुरुवात केली आणि तेही स्वतःचा ब्लॉग सोडून भलत्याच विषयांवर..’तारतम्य’ हा शब्द मराठीत नक्की आहे का याची शंका यावी असं झालं...त्यात मग उगाच आपण पळून गेलो तर? म्हणून घाईघाईत माझ्या ब्लॉगचं नाव इ. सांगुन पटकन परत आले.

तितक्यात नेमकी वडा-कटलेटची फ़ेरी सुरु झाली. त्यामुळे (बहुतेक) लांबण लावणार्‍यांनाही पब्लिकने सहन केलं...(कारण टाळ्यांचा कडकडाट करायला हात तर रिकामी हवेत की नाहीत??) असो...मुख्य मुद्दा हा की हा अल्पोपहार (आणि तो अल्प नव्हता..पुरुन उरुन उरेल पेक्षा जास्त म्हणजे किती? तेवढा...), कार्यालय हा सर्व खर्च कुणा अनामिकाने केला होता ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे...

कटलेट हा मला त्यातला त्यात जास्त न भावणारा प्रकार आणि वड्यापेक्षा तर नाहीच नाही (पक्षी: पहा माझं वडापुराण) आणि वड्याची चव खरंच एकदम हटके होती. मग इतरांचं ऐकता ऐकता कॉफ़ी पानही झालं...कॉफ़ी अशी मसालेदार (म्हणजे तेच ते जायफ़ळ इ. घातली) प्यायची सवय गेलीय त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा कॉफ़ी झाली हे वेगळं सांगायला नकोच...

फ़क्त आता पुढच्या बाकावर बसण्याची सहनशक्ती संपत आली होती. रोहनने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग गळ्यात दिल्यामुळे तशी अडले होते (आणि त्यात त्यामुळे माझं दोन सेकंदाचं परिचयसत्र रेकॉर्ड झालं नाही ते अलाहिदा) पण मग संधी साधुन मागच्या बाकांवर आले आणि एकदाचं हुश्श केलं..आता हळुहळु काही नंतर आलेले परिचयाचे लोकही भेटले..चुरापावला शोधायला जास्त कष्ट पडले नाहीत त्याच्या टी-शर्टवरच वडा-पाव लिहिलं होतं. मैथिली पुढे जाऊन बसल्याने तिच्यासाठी पुन्हा दोन मिन्टं पुढे जाऊन आले..नशीब नाहीतर ती नंतर लवकर पळालीसुद्धा. माझ्या आधीच्या कल्पनेप्रमाणे जी ओळखीची मंडळी भेटणार होती तीच भेटली. म्हणजे आनंद पत्रे, सुहास,सागर,देवेंद्र तसंच काही नवीनही परिचय झाले सचिन,आनंद काळे, इ. पण जास्त कल्पना नसताना भेटून दिलखुलास गप्पा मारणारी व्यक्ती म्हणजे राजा शिवाजी डॉट कॉमचे मिलिंद वेर्लेकर. त्यांचा खास परिचय रोहनने करुन मग त्यांचं छोटेखानी भाषण ऐकल्यावर त्यांचं अभिनंदन/.आभारासाठी गेले तर आम्ही एकंदरित ब्लॉगविश्व संबंधी बर्‍याच गप्पा मारल्या आणि नंतर चक्क त्यांनी या ब्लॉगला भेट देऊन कमेन्टही दिलीय.म्हणजे वाटलं होतं तसे काही नवे ब्लॉग परिचय होणं हा एक चांगला भाग म्हणता येईल...काही ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉगबद्दल थोडक्यात पण रंजक माहिती दिली...महेंद्रकाकांशी कुणी स्पर्धाही करतंय हेही नव्याने कळलं...(आता दुसरं कोण असणार ते....रविंद्र कोष्टी सोडून..पण हे त्यांनी स्वतःच सांगितलंय बरं) आदमी अच्छा होगावाले हरेकृष्णजींशीसुद्धा बोलायला मिळालं..त्याचवेळी महेंद्रकाकांनी आग्रहाने वड्याची आणखी एक प्लेट हातात ठेवली..आता खुद्द पंतप्रधानांना नाही कसं म्हणणार मग त्या वड्याचंही चीज (पोटात घालुन) केलं...:)

सगळे परिचय झाल्यानंतर मग काही तांत्रिक गोष्टींवरही चर्चा झाली ज्यांचा उल्लेख इतरत्र सगळीकडे झालाय..माझं लक्ष होतं त्याकडे पण तोवर घरुन फ़ोनही यायला सुरुवात झाली होती..पण रोहनने आधीच आपण एकत्र जाऊया म्हणून सांगुन ठेवलं होतं मग परत एकदा आईकडे पटवापटवी केली आणि निवांत शमिकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. एकंदरित वेळ चांगला गेला होता.परत जाताना वाकड्या वाकड्या वाटा करुन रोहनने शेवटी घरापर्यंत सोडणे हा तर अपेक्षेचा परमबिंदु म्हणायला हवा..

सत्तरपेक्षा जास्त ब्लॉगर्सची उपस्थिती आणि फ़क्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक अशी महाराष्ट्रातील अन्य शहरे त्याचप्रमाणे हैदाराबाद सारख्या महाराष्ट्राबाहेरचे ब्लॉगर्स आणि last but not the least अमेरिकेतूनही येणारे प्रतिनिधी आणखी काय हवं संमेलन रंगलं हे सांगायला? शेवटी या मेळाव्याचा मुख्य उद्देश ब्लॉगर्स, वाचक या सर्वांमधला स्नेह वाढवणे हा होता आणि त्यात आपण पुरेपुर यशस्वी झालो आहोत.

Monday, May 24, 2010

देवाच्या घरात....

खरं तर परत आल्यावर काय लिहु? हा प्रश्न नव्हता पण पहिलं काय लिहु हा जास्त मोठा प्रश्न होता..ठरवलं होतं की ब्लॉगमीटबद्दल लिहावं पण ती ब्लॉगविश्ववरची जुनीच बातमी असणार असा विचार केला आणि शिवाय चुकून पहिलंच वटवट्याच्या पोस्टवरची गरमागरम चर्चा वाचुन आता या विषयाचंच हे काय झालं असं काहीसं मनात आलं..त्यामुळे सगळे विचार सोडून मनाला आठवणींच्या चार आठवड्यात सोडून दिलं...


धोपट मानाने जे काही चार आठवड्यात करता येईल ते पुरेपुर करुन घेतलं..(सगळ्यात महत्त्वाचं मुलाला आईकडे भाचरांच्या जीवावर सोडून) आणि तेच ते सर्व कुणी कायम मुंबईकर असल्यावर करेल त्याच कॅटेगरीतलं...पण जास्त न ठरवता एक छानच गोष्ट झाली तिचाच उल्लेख नमनाला व्हायला हवा म्हणून ही छोटुकली पोस्ट...

तर जायचं होतं आमच्या अमेरिकेत ओळख झालेल्या एका मैत्रीणीकडे..ती आत्ताच उसातून परत मायदेशात आली. तिचं नंबर दोनचं लेकरु झालं त्याचवेळी आम्ही आमचं बस्तान ओरेगावात हलवल्याने भेटही झाली नव्हती आणि अगदी खरं कारण म्हणजे ही ब्रांद्र्यात सचिनची शेजारीण हे ओळख झाल्यादिवसापासुन माहित झालं होतं...आधी तिच्या लग्नाच्यावेळी मायदेश भेट नव्हती नाहीतर रिसेप्शनलाच क्रिकेटच्या देवाला पाहायचा योग होता..पण ते नाही तर आमच्यासाठी चला तिला भेटता लगे हातो साहित्य सहवासातील ती प्रसिद्ध इमारत आणि निदान ते दारही पाहु असं असणं साहजिकच होत म्हणा...

शेवटचा आठवडा आला तरी दोघांनाही वेळ मिळत नव्हता..शिवाय जायचं तर आरुषला घेऊनच त्यामुळे मुहुर्त शोधायला होत नव्हता.शेवटी परतीच्या अगदी दोन दिवस आधी म्हणजे गुरुवारी काय तो एकदाचा मुहुर्त मिळाला. नवरा आणि मुलगा एका ठिकाणाहुन आणि मी दुसर्‍या असं दुपारी पोहोचायचं ठरलं त्याप्रमाणे आमच्या मैत्रीणीबरोबर ठरवलंही..नशीब की तिलाही आयत्यावेळी आलेलं चालणार होतं. दोन वाजता उषःकालच्या खाली नावाच्या पाटीवर माझ्या मैत्रीणीच्या शेजारी आणि वरच्या मजल्यावर सचिनची आई आणि भाऊ अशी नावं पाहुन पत्ता मैत्रीणीचा शोधतेय हेही विसरले...असो.

लिफ़्टने वर गेले तर त्या मजल्यावर तिन्ही दरवाजे मिळून एकच घंटी पाहुन आमचा मागचा संवाद आठवला आणि माझी सरकारी ट्युबलाईट पेटली. मागेच तिच्या आई-बाबांनी शेजाऱचा फ़्लॅट घेऊन त्यांच्या घराला जोडला हे ती म्हणाली होती. अर्थात त्यावेळी माळ्यावर किती फ़्लॅट्स आणि मग हा घेतला तो कुणाचा असल्या चांभारचौकशा केल्या नव्हता. पण ही घंटा दाबताना साधारण कळलंच.

घरात आल्यावर जरा इतर गप्पा झाल्यावर मग काढलाच विषय तिच्या आईकडे आणि मग सारंच चित्र स्पष्ट झालं. त्यांच्या शेजारी राहणारा आपला क्रिकेटचा देव सचिन आता तिथे राहत नाही; त्यांचा फ़्लॅट जोडून आता हा एकच मोठा फ़्लॅट त्यांनी बनवला आहे. तिथे एक बेडरुम, बाथरुम आणि दुसर्‍या बेडरुममध्ये टि.व्ही. आणि म्युझिक रुम आणि बाकी घर जोडून मोठा दिवाणखाना असं आता या मजल्यावर देशपांड्यांचं एकच कुटुंब आहे.

खरं तर दाखवल्याशिवाय कुणाच्या घरातल्या खोल्या उगाच जाऊन पाहायचं माझ्यासारखंच कुणीही टाळेल पण त्यादिवशी बाथरुममध्ये जाताना सचिनच्या बाजुच्या प्रत्येक खोल्यांमध्ये उगाच डोकावुन यावसं वाटलं..याचं ठिकाणी त्याची बालपावलं चालता चालता, हळुहळु शाळेत जाता जाता क्रिकेटच्या मैदानात घट्ट झाली असतील असं वाटुन उगाच भरुन आलं...अरे हे घर पुर्वी कसं असेल याचीही उगाच टोचणी...अर्थात कुणी आपल्या लहानपणीच्या घराचं काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आणि सगळीकडेच भावुक का व्हायचं??...त्याचा भाऊ अद्यापही वरच्या माळ्यावर राहतो आणि इथेही तो येतो असंही बोलता-बोलता कळलं..गप्पा संपल्या वेळही वाढत होता तसं हळुहळु निघालो..

तिथुन निघताना बाहेरच्या प्रचंड गरमीतही साहित्य सहवासाच्या गेटबाहेर पडेपर्यंत जरा जास्तच गार वाटत होतं. संगमरवरी गाभार्‍यातुन बाहेर पडल्यासारखं.....