Saturday, May 29, 2010

गाणी आणि आठवणी ३ - तेजोमय नादब्रम्ह

ही आठवण खरं म्हणजे एका गाण्याची नाही तर अख्ख्या अल्बमची आहे...तो २००२ चा मार्च...उन्हाची काहिली मुंबईत वाढली होती आणि वर्षभराच्या नोकरीत एकही दिवसाची सुट्टी नाही, पुष्कळसे शनि-रवि ऑफ़िसके नाम,मध्यरात्री ऑफ़िस सोडणं याने कावायला झालं होतं..त्यामुळे कसंबसं P.M. ला पटवुन एका आठवड्याची सुट्टी मिळवली होती..माझा मावसभाऊ (तेव्हा सडाफ़टिंग) बंगळुरला असे त्याच्याकडे आई-बाबांबरोबर जायचं आणि मग उटी-म्हैसुर-कोडाई ची सहल असा साधासुधा बेत होता...
त्याच्याकडे माझ्याच आसपासच्या वयाचे त्याचे रुममेट्स; त्यामुळे आमची गट्टी जमली..त्यातल्या गाता गळा असणार्‍या मित्राने मला उ-म्है-को च्या चार दिवसांसाठी "तेजोमय नादब्रम्ह" दिली..त्याच्या प्लेअरसकट..तो पूर्ण उन्हाळा मी ती कॅसेट जगले.पुन्हा मुंबईला आल्यावर ती लगेच घेतली आणि त्यावर्षी किती जणांना गिफ़्ट म्हणूनही दिली..इतकं काय होतं किंवा आहे त्यात असं कधीच वाटलं नाही..
ऐकल्या क्षणापासुन जवळजवळ प्रत्येक गाणं आवडलं..श्रीधर फ़डकेंच्या संगीताला सुरेश वाडकर आणि आरती अंकलीकर-टिकेकर यांनी दिलेली योग्य साथ हेच नाहीये...याचं संगीत, वादकांची कमाल, बासुरी सारंच कसं अप्रतिम आहे...आजही त्यातली गाणी ऐकली की मी कर्नाटक टुरिझमच्या त्या बसमधल्या माझ्या उजवीकडच्या सीटच्या खिडकीत जाते..आम्ही साधारण हनिमुनच्या सिझनला गेलो होतो..त्यामुळे त्या बसमध्ये झाडून सारी हनिमुन कपल्स आणि माझ्या आई-बाबांसारखं एक नागपुरचं वयस्कर जोडपं..मी एकटीच "मुलगी"..खरं तर आमच्या ड्रायव्हर-गाईड सकट माझ्या अशा प्रकारे आई-बाबांबरोबर फ़िरण्याचं इतकं कौतुक होतं की सारी बसच मला "बेटी" म्हणे...मी कुठे परत यायला उशीर केला तरी सवलत असे...तरी थोडी-फ़ार मी एकटीने ती ट्रिप अनुभवली आणि त्यातही मला मजा आली...
कधीही ’तेजोमय’ लावली की माझ्या मनात बस वळणा वळणांनी जातेय आणि मी उलट-सुलट करुन ही गाणी ऐकतेय हेच दृष्य जगते. त्यातलं सगळ्यात लाडकं गाणं अर्थातच "मी राधिका", अगदी इतक्यात एका मैफ़िलीत आरतीजींना ते गाताना ऐकलं आणि पुन्हा उटीला पोहोचले इतकं ते नातं घट्ट आहे.
खरं तर मुंबईच्या टिपिकल कॉर्पोरेट जगाच्या पहिल्या अनुभवाने पिचलेल्या हळव्या मनाला आपल्याला या सर्व भावना आहेत हेही विसरायला झालं होतं याचं भान या राधिकेने मला दिलं...तर "छायेपरी ही नियती" या "दे साद दे हृदया" ने सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करायला लावलं...पण तरी "त्या गंधातुन मोहरली माझी कविता" हे "मी एक तुला फ़ुल दिले" मधलं साधं-सोप्पं वाक्यही त्या संगीताने भारावल्यासारखं वाटतं याचाही अनुभव आला.
बंगलोर,उटी, कोडाइला रस्त्यात कुठेही पाऊस भेटायचा..कुणाच्या आठवणीने आभाळ हळवं होतंय असं उगाच तेव्हा मला वाटायचं...आम्हा मुंबईच्या लोकांना तसंही फ़क्त मान्सुनचीच सवय.....त्या पावसाची हळवी आठवण "कधी रिमझिम आला ऋतु आला" या गाण्याने आता ओरेगावात पडणार्‍या वर्षभराच्या पावसातही होते...आणि त्यावर्षी तर मुंबईत परत आल्यावर पावसाची इतकी वाट पाहिली होती की जूनमध्ये तो आला तेव्हा आपसूक हेच गाणं ओठावर आलं....अजुनही पावसाबद्दलच्या आवडत्या मराठी गाण्यात हे गाणं माझं फ़ार लाडकं आहे...
खरं तर ही कॅसेट म्हणजे का कोण जाणे माझ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होऊन राहिलाय...जणु काही इतर कुठले उन्हाळे आलेच नाहीत..त्यावर्षी एकामागुन एक संकटं, प्रोजेक्टमुळे येणारी आजारपणं आणि बुरखेधारी कॉर्पोरेट जगाचा मला दिसलेला चेहरा या सर्वांची सुरुवात व्हायच्या आधी ही सुंदर गाणी माझ्या मनात घर करुन बसली..ते कठीण दिवस तरुन जायची शक्ती या गाण्यांनी तर मला दिली नसेल ना, असा विचार या वर्षीच्या मुंबईच्या वैशाख वणव्यातही माझ्या मनात आला आणि पुन्हा एकदा मनाने मी कोडाईच्या सरोवरातल्या होडीत बसले आणि "तुला पाहिले मी नदीच्या किनारी" आपोआप कानात गुणगुणायला लागले....

18 comments:

  1. एखादं गाणं असंच एखाद्या ऋतू बरोबर कोरिलेट होऊन जात, बिटल्स ची गाणी लागली की मला पाउस आठवतो. लहान असतांना एकदा री धो धो पाउस पडत असतांना ऐकली होती म्हणुन असेल कदाचित.
    लेख मस्त झालाय.

    ReplyDelete
  2. सही अल्बम आहे अपर्णा....
    या बद्दल काही माहीतचं नव्हतं.. ही पोस्ट वाचल्यावर नेटवर शोधुन डाऊनलोड केला... थँक्स ही पोस्ट शेअर केल्याबद्दल...
    (हा अल्बम येथुन डाऊनलोड करता येईल...
    http://www.esnips.com/web/TejomayNadbramha)

    ReplyDelete
  3. What U say is very correct.
    Sunder, Sumadhur ganeech manaat ghar karoon rahatat. Jagane susahya, sunder karatat.
    Thanks,
    Shashank

    ReplyDelete
  4. सुंदर पोस्ट.. शनिवारपासून लॅपटॉप बंद होता त्यामुळे कमेंटायला उशीर झाला.

    छान गाण्यांची आठवण करून दिलीस. "मी राधिका" हे माझंही प्रचंड आवडतं !!

    ReplyDelete
  5. महेंद्रकाका, अगदी खरंय..बरीचशी गाणी आपण एखाद्या विशिष्ट वेळी जास्त ऐकली असतील की आपसूक त्या आठवणीत घेऊन जातात..अगदी कुठेही ऐकली तरी..प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  6. गजानन, ब्लॉगवर आपलं स्वागत आणि आभार...हा संपुर्ण अल्बमच छान आहे...माझ्याकडे अजुनही कॅसेट आहे फ़क्त आता गाडीत कॅसेट प्लेयर नसतो ही रड आहे पण एम.पी.थ्री बनवुन ठेवेन...धन्यवाद..

    ReplyDelete
  7. शशांक, स्वागत आणि आभार...आपण म्हणता ते अगदी अनुभवलंय...पोस्टमध्ये आलंही थोडंफ़ार..

    ReplyDelete
  8. हेरंब, तुला लॅपटॉप बंद असलेल्या घरात पिंजर्‍यातल्या वाघासारखं फ़ेर्‍या मारताना पाहिल्याचा उगाच भास होतोय...ही ही...:) "मी राधिका" माझं ऑल टाइम फ़ेवरिट आहे....

    ReplyDelete
  9. "Mi Radhika" awesome gaane aahe...
    Mazehi te all time fav. aahe...

    ReplyDelete
  10. अपर्णा, अगं दोन दिवस नुसती पळापळ... ब्लॉग तर सोडच पण साधा लॅपटॉप उघडताही आला नाही. भरीतभर शोमू आणि नचिकेत चिडवत होतेच...:D, खूप खूप धन्यू गं. अगदी मागेच पडली होती ही गाणी. आज आता दिवसभर उट्टे काढतेच. :)

    ReplyDelete
  11. yupp मैथिली..त्या गाण्यात जादू आहे..

    ReplyDelete
  12. अगं भाग्यश्रीताई, मोठा विकांत म्हणजे चालायचं गं...:)
    आणि धन्यु काय?? शेवटी आपण सारे सुरांचे सांगाती..एकवेळ ब्लॉगशिवाय चालेल गं...पण गाण्याशिवाय कठीण होईल सगळं....आज ऐक सारी..वरती लिंक पण आहे बघ कमेन्ट्स मध्ये....

    ReplyDelete
  13. Mi Radhika sarkh gaan nahi g...ratri drop madhe bhar highway la gadi lagi ki mag tya ganyachi maja kahitari veglich yete yaar.....kajur te thane only in 3mins....

    ReplyDelete
  14. अश्विनी, मी पण हे गाणं जास्तीत जास्त गाडीत ऐकलंय...ड्राईव्हला धुंदी चढते तू म्हणतेस तसं....

    ReplyDelete
  15. अशी काही काही गाणी आयुष्याच्या एकेका टप्प्याशी जोडली जातात कायमची! मी ऐकली नाहीयेत ही गाणी, ऐकायला हवी!
    मुंबईतल्या अतिशय विस्कळित वेळापत्रकामुळे ब्लॉगवाचन अगदीच अनियमित झालंय, त्यामुळे उशीर!

    ReplyDelete
  16. बाबा, सकाळ्ळ सकाळी एकाच वाचकाच्या तीन-चार प्रतिक्रिया आल्या की दिवस छान जातो त्यामुळे हे उशीर वगैरे कुठे...लिहावंसं वाटलं त्यात सगळं आलं..
    मीही सध्या सुट्टीतला ब्लॉग्जचा बॅकलॉक भरून काढतेय त्यामुळे माझंही असंच सुरु आहे..
    गाणी नक्की ऐकुन पहा. आवडतील....

    ReplyDelete
  17. संगीत उत्तमच आहे आवाज तर अप्रतिम आहे त्यातील सर्वच गाणी सुंदर आहे, वेळ मजेत जातो ,महेशकाका

    ReplyDelete
  18. धन्यवाद, महेशकाका.

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.