Friday, August 24, 2012

खिडकीपासची चिमुरडी "तोत्तोचान"


पहिलीत शिकणारी एक छोटीशी जपानी मुलगी. तिच्या वयाला साजेशी खोडकर बरं का? शाळेच्या वर्गात तास सुरू असताना तिला मध्येच खिडकीतून दिसणारे बॅंडवाले आणि त्यांना हाक मारायची तिची सवय किंवा मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता?" असं विचारणं. परिणाम शाळेतून काढून टाकलं जाणं. कसं होणार आता असा विचार करता करता आपण तिच्याबरोबर पोहोचतो तिच्या नव्या शाळेत. हिची नवीन शाळा म्हणजे "तोमोई" कशी असेल आणि तिथे ही मुलगी नव्याने आपलं शालेय जीवन सुरू करताना आलेले अनुभव कसे असतील या पार्श्वभूमीवर जपानची एक आगळीवेगळी शाळा एक वेगळं विश्व घेऊन आपल्यासमोर येते. मूळ जपानी लेखिका "तेत्सुको कुरोयानागी" ही ती वर उल्लेखलेली पहिलीतली मुलगी "तोत्तोचान" आणि या सुंदर पुस्तकाचा तितकाच ओघवता अनुवाद आपल्यासाठी केलाय "चेतना सरदेशमुख गोसावी" यांनी. नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाने केवळ पन्नास रूपयात उपलब्ध करुन दिलेलं हे पुस्तक मूळ लेखिकेने म्हटल्याप्रमाणे अगदी ५ वर्षांच्या मूलांपासून ते १०३ वर्षांच्या लोकांपर्यंत अगदी सर्वांसाठीच आहे. 


पाच वर्षांच्या आपल्या चिमुरडीला नव्या शाळेत नेताना तिच्या आईबरोबर झालेल्या मजेदार संवादांनी हे पुस्तक सुरू होतं. बरं नव्या शाळेचं प्रयोजन अशासाठी की आधीच्या शाळेतून हिला काढून टाकलंय. त्यामुळे आईच्या जीवाची आपल्या मुलीचं कसं होणार याची घालमेल तर लेक मात्र काल गुप्तहेर व्हायचं ठरवलं होतं आणि आज मात्र तिकिट कलेक्टर व्हावं का या गहन विचारात. मध्येच तिच्या सुपीक डोक्यात तिच्या कल्पनेतली तिकिट विकणारी जी खरी गुप्तहेर असेल असं काहीसं झालं तरची कल्पना आणि शाळा यायच्या आधीपर्यंत हे सगळं डोक्यातून जाऊन त्याची जागा "रस्त्यावरून जाहिरात करत जाणारे बॅंडवाले" यांनी घेतलेली असते. हेच ते आधी उल्लेख केलेले बॅंडवाले. या बॅंडवाल्यामुळे खरं तर आईला तिचं आधीच्या शाळेतलं खिडकीतून बॅंडवाल्यांशी बोलणं न आठवलं तर नवलच. त्या शाळेतून काढलेल्या असंख्य कारणांपैकी हेही एकच. आपण तिच्या आईच्या घालमेलीत अडकलो असतानाच तिच्यासारखंच बाकीची छोटी मुलं कसंकसं डोकं चालवत असतील असा विचार करत खुदकन हसतो. वाचता वाचता हळूहळू आपणच तोत्तोचानच्या वयाचे होतो. म्हणजे काय हरकत आहे नं चित्र काढता काढता झेंडा काढायला जागा पुरली नाही कागदावरून डेस्कवरची जागा व्यापली तर किंवा तास सुरू असताना मध्येच चिमण्यांना "तुम्ही काय करता आहात?" म्हणून विचारणं. अगदी प्रत्यक्षात नसेल पण आपण पहिलीच्या वर्गात असताना हे असं सगळं भरकटायचं कदाचीत आपल्याही बाबतीत झालं असेल.

फ़क्त आपण एका टिपिकल शालेय जीवनाचा भाग होऊन राहिल्याने असं स्वच्छंदी मन नंतर कुठेतरी हरवून आपणही "क ला काना का" गिरवीत जे इतरांनी वर्षानुवर्षे शाळेत जाऊन केलं तेच करून नंतर मग तीच ती दहावी आणि पुढचं शिक्षण, नोकरी या चाकोरीत अडकलो असू. तोत्तोचानचं नशीब इतकं की तिला अशा शाळेतून काढून टाकण्यात आलं आणि त्याहीपुढे जाऊन म्हणायचं तर तिच्या देशात अशी एक शाळा होती जिथं पाठ्यपुस्तकमुक्त अभ्यासक्रम ठेऊन मुलांना मुक्त पद्धतीने आणि त्यांचं भावविश्व खुलेल असं वातावरण होतं.

दोन झाडांच्या खांबांचं गेट आणि आगगाडीच्या डब्ब्यांचे वर्ग असणारी शाळा कुणाला आवडणार नाही? शिवाय बाकीच्या शाळांपेक्षा वेगळं म्हणजे इथे दिवसाचे तास विषयावार ठरलेले नसत. सकाळी बाई त्या दिवसात काय काय करायचं त्याची यादी करुन मग मुलंच आपलं आपलं काय करायचं ते ठरवत. त्यामुळे एकाच वेळी कुणी निबंध लिहित असे तर कुणी गणित सोडवी. यामुळे शिक्षकांना मुलांचं निरीक्षण करता यायचं आणि त्यांचा विचार करायची पद्धत अधिक जवळून समजून त्यांना मार्गदर्शन करणं सोपं व्हायचं. तर मुलांच्या बाबतीत त्यांना आवडत्या विषयाने सुरूवात करायला आवडे आणि नावडत्या विषयासाठी अख्खा दिवस असे. त्यामुळे कसंबसं का होईना सगळं पूर्ण व्हायचं. सगळा अभ्यास स्वतंत्र करायची सवयही लागे आणि हवं तिथे शिक्षकांची मदतही घेता येई. त्यामुळे विद्यार्थी नुसतंच बसून ऐकताहेत असं नसायचं. 

शाळेच्या पहिल्याच दिवशी तोत्तोचानची ओळख यासुआकी यामामोतो नावाच्या एका मुलाशी झाली. त्याला पायाला आणि हाताला पोलिओ झाला होता. तोत्तोचानसाठी हे नवीन होतं. पण पहिल्याच दिवशी झालेला हा मित्र नंतर तिच्या मदतीमुळे आयुष्यात पहिलं आणि शेवटचं झाडावर चढतो तो प्रसंग पुस्तकात वाचताना आपण नकळत त्या दोन छोट्या मित्रांसाठी हळवं करतो. हाच यासुकीचान जातो तेव्हाचा तोत्तोचानचा भाबडेपणा आपल्याही गालावर अश्रू ओघळतो. 

शाळा म्हटली की आपल्या मनात अभ्यासाव्यतिरिक्त आणखी येतं ते म्हणजे शाळेत एकत्र खाल्ला जाणारा डब्बा. तोमोईचा नियम होता की रोज काहीतरी डोंगरावरचं आणि काहीतरी समुद्रातलं आणायचं. म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर धान्य किंवा भाज्या आणि प्रथिनं. किती सोप्या शब्दात हे कोबायशींनी मुलांना शिकवलं. शिवाय ते स्वतः आपल्या पत्नीबरोबर मुलानी काय आणलंय हे पाहायचे. त्यात एखाद्या मुलाकडे यातला एखादा प्रकार नसेल तर त्यांची पत्नी ती भर घालत असे. त्या कोबायशींबरोबर एक माशांच्या सुरळ्यांचं आणि एक बटाटाच्या कापांचं ताट घेऊन फ़िरत. त्याचप्रमाणे प्रत्येक घास बत्तीस वेळा चावून खायचं एक गाणंही त्यांनी बनवलं होतं. जे रोज गाऊन मग जपानीत कृतज्ञता व्यक्त करून हसतखेळत जेवणं व्हायची.

अशा या आगळ्यावेगळ्या शाळेतले तोत्तोचानचे अनुभव वाचणं आपल्याला तिच्या बालपणात घेऊन जातो. एकदा तोत्तोचानचा बटवा संडासात पडतो त्यावेळी तिला शांतपणे तो काढायची परवानगी द्यायचा प्रसंग असो किंवा तिला वीस पैसे देऊन एका भोंदूबाबाकडून आणलेल्या सालीचा प्रसंग असो, या शाळेने तिच्यासारख्या एका द्वाड ठरवलेल्या मुलीला तिचं मन सांभाळून घेऊन तिच्यावर केले जाणारे संस्कार आपसूक नजरेत भरतात. एका प्रसंगात मोठं झाल्यावर याच शाळेत शिकवायचं वचनही ती कोबायशींना देते.

छोट्या छोट्या गोष्टीतून या शाळेचे मुख्याध्यापक कोबायशी यांनी लहान मुलांशी कशी नाळ जोडली आहे याचा पदोपदी प्रत्यय येतो. लहान मुलांचं भाबडं जग तसंच ठेऊन त्यांना छोट्या छोट्या शिकवणूकी द्यायची पद्धत मुलांना कडक शिक्षा करणार्‍या इतर पद्धतींपेक्षा ती खूप वेगळी आहे हेही लक्षात येतं. उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्या मुलांना एकत्र पोहायच्या तलावावर कपड्यांचं बंधन न ठेवता पोहायचं स्वातंत्र्य देताना त्यांना एकमेकांच्या शरीरांकडे निकोपपणे पाहायचा दृष्टीकोन देणं हे फ़ारच कौतुकास्पद आहे. जसं यामुळे मुलामुलींच्या शरीरात काही विकृत कुतूहल असायचं टळू शकतं तसंच या शाळेत काही व्यंग असणारी मुलंही होती. त्यांना आपल्या शरीराची लाज वाटून न्यूनगंडही निर्माण होणार नाही हा भाव होता. आजकालच्या काळात एकंदरीत स्त्रियांवरील शारीरिक अत्याचाराच्या बातम्या वाचतो तेव्हा अशा व्यक्तींना जर अशा प्रकारचे संस्कार त्यांच्या लहानपणी झाले असते तर या गोष्टी टळू शकल्या असत्या का असं उगाच मनात येतं.

यातले अनुभव मुख्यतः तोत्तोचानचे असले तरीही तिच्यावरची कोबायशींची छाप आपल्याला दिसते. उन्हाळी सुट्टीमध्ये शाळेतल्याच सभागृहात तंबू उभारून सर्वांनी एकत्र केलेल्या गप्पांबद्दल वाचताना मुलांबरोबर मिसळायचं त्यांचं वेगळं तंत्र आपल्या नजरेत भरतं. संगीत कवायत अर्थात "युरिथमिक्स"चा शाळेच्या अभ्यासक्रमात समावेश करून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासास मदत करायची त्यांची कल्पनाही खूप मस्त आहे. क्रीडादिन साजरा करतानाचे त्यांचे काही खेळ म्हणजे "आईला शोधा", "माशांची शर्यत" खेळायला कोणाला मजा येणार नाही? आणि मग बक्षिस म्हणून भाज्या नेताना मूलं कंटाळली तर "तुम्ही स्वतःच्या कष्टाने या भाज्या मिळवल्यात आणि तुमच्याबरोबर घरच्यांसाठीसुद्धा जेवण मिळवलंय" असं सांगणारे कोबायशी आपल्यालाही मुख्याध्यापक म्हणून लाभले असते तर? असं मनात नक्कीच येतं. 

खरं तर या छोटेखानी पुस्तकातला प्रत्येक प्रसंग तुम्हाआम्हाला काही ना काही शिकवून जातो. लिहायचंच झालं तर त्यातल्या प्रत्येक प्रसंगाला साधारण समान स्थान द्यायला हवं. पहिली ते तिसरी या शालेय वर्षांत या मुलीने एवढ्या छोट्या वयात किती आगळेवेगळे अनुभव घेतलेत याचा हे पुस्तक वाचताना पदोपदी प्रत्यय येतो. तिचा रॉकी कुत्राही या पुस्तकातले एक महत्वाचे पात्र आहे. 

चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर दुर्दैवी शेवटाचा शाप घेऊन येतात का असं मला बरेचदा वाटतं. तो शेवट लिहून मला हे लिखाण उदासवाणं करायचं नाहीये. हे पुस्तक जेव्हा वाचलं जाईल तेव्हा ओघाने ते कळेलच. 

तूर्तास आपण सगळीजण हे लक्षात ठेऊया की जगाच्या पाठीवर लहान मुलांना त्यांच्या भावविश्वात रममाण करून त्यांना बाहेरच्या जगासाठी तयार करणारी एक शाळा होती. या शाळेचं नाव होतं "तोमोई" आणि तिथले मुख्याध्यापक होते "कोबायशी". हेच ते मुख्याध्यापक ज्यांनी तोत्तोचानच्या पहिल्या दिवशी "हं तुला तुझ्याबद्दल मला हवं ते सांग" असं म्हणून सकाळचे आठ ते दुपारची जेवणाची वेळ होईस्तो म्हणजे तब्बल चार तास तिची बडबड ऐकून मग "आजपासून तू या शाळेची विद्यार्थिनी झालीस हं" असं म्हटलं होतं. त्यांच्या या प्रसंगात ही शाळा निव्वळ तोत्तोचानचीच नाही तर वाचकांसाठीही त्यांचीच शाळा होते. अशी एक शाळा जिथे शिकायला मलातरी नक्कीच आवडलं असतं.


तळटीप - हा लेख मीमराठीच्या पुस्तक परिचय स्पर्धा २०१२ च्या निमित्ताने लिहिला आहे. मीमराठीच्या साईटवर येथेही तो उपलब्ध आहे.



24 comments:

  1. बायकोचं अतिशय आवडतं पुस्तक. मी वाचलं नाहीये अजून.

    ReplyDelete
    Replies
    1. मी पुस्तकाबद्दल बरंच वाचलं होतं पण वाचलं मात्र दोन वर्षापुर्वी हे पुस्तक मला माझ्या भावजींनी भेटीत दिलं तेव्हा..:)

      Delete
  2. Kharach khupach mast ahe te pustak..ekada wachala tari parat parat wachaw asa watat...

    ReplyDelete
    Replies
    1. आभार लिना. हे पुस्तक खरंच वारंवार वाचलं जातं.

      Delete
  3. Kharach mast ahe te pustak..ekada wachala tari parat parat wachaw asa watat.

    ReplyDelete
    Replies
    1. लिना अगदी खरं. परत परत वाचलं तरी तीच मजा येते... आभार गं.

      सॉरी ही कमेंट इंग्लिशमध्ये असल्याने पटकन दिसलीच नाही त्यामुळे उशीरा उत्तर देतेय...

      Delete
  4. Btw, post ekdam sahi zaliye.. Aavadal parikshan..

    ReplyDelete
  5. माझं लाडकं पुस्तक! :):)

    ReplyDelete
  6. या आधी देखील ह्या पुस्तकाबद्दल कुठल्या तरी पेपर मध्ये वाचलेले आठवले आणि आत्ता तू पोस्ट लिहली आहेस म्हणजे वाचलेच पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी छोटंसं पुस्तक आहे. नक्की वाच सिद्धार्थ.

      Delete
  7. खूप सुंदर पुस्तक परिचय आहे... नक्की वाचेन, म्हणजे वाचण्याची इच्छाच झालीये आता हे पुस्तक. :)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार गं इंद्रधनू. नक्की वाच. तुला आवडेल.

      Delete
  8. अजून पोस्ट वाचली ही नाहिये.. आज पोस्ट वाचण्या आधीच प्रतिसाद द्यावा अशा विषयावर लिहिलयेस तू.
    आज खर्‍या अर्थाने तुझा ब्लॉग समृद्ध झाला.
    माझ्यासाठी प्रत्येकाने मस्ट रिड पुस्तक आहे हे. आईला मी अनेकदा म्हणते की डी.एड , बी.एड च्या अभ्यासक्रमात हे पुस्तक असायलाच हवं!
    आता उरलेली प्रतिक्रिया पोस्ट वाचून देते :)

    ReplyDelete
    Replies
    1. अगं प्रिया मी लिहिते की पुस्तकांबद्दलही. फ़क्त आजकाल संसाराच्या पसार्‍यात खूप निवांत वाचन करायला मिळत नाही. ही पोस्ट म्हणशील तर दोन वर्षांपासून लिहायची ठरवलं होतं पण काही न काही कारणाने राहून गेलं. या मी मराठीच्या स्पर्धेच्या निमित्ताने शुक्रवारीच लिहिली. आणि अशी इंस्टंट प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार गं. :)

      Delete
    2. तू लिहितेस ते खर आहे पण आज ही पोस्ट पेशली तोत्तोचानसाठी आहे ना म्हणुन इतकी उस्फुर्त प्रतिक्रिया आली :)

      Delete
    3. अगं हो कळलं ते :) मी तुला उगीच गृहपाठ देत होते :P

      Delete
  9. अपर्णा पोस्ट नेहमीप्रमाणेच जमलिये.
    पण "तोमोई" या शब्दाचा अर्थ आणि शाळेचं structure या बद्दल लिहायचं राहून गेलंय :) तेवढंच प्रतिसादात किंवा पोस्ट मध्ये टाकून दे. मग या पोस्ट इतकी श्रीमंत पोस्ट मला तरी कुठेच सापडणार नाही.
    कोबायशींसारखे हाडाचे शिक्षक सगळ्यांना मिळाले तर जगात लाखो करोडो मंगेशकर नि तेंडुलकर पैदा होतील याची मला खात्री आहे.
    मी हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं तेंव्हा मी आठवीत होते. तेंव्हापासून आजतागायत हे पुस्तक अनेकदा वाचून झालय. तरीही त्याचा कंटाळा येत नाही. इथेच लेखिका आणि अनुवादिका जिंकतात.
    पुस्तक लाखमोलाचं आहेच पण तुझी पोस्टही त्याला न्याय दिईल अशी झालीये.
    हजार लाईक्स माझ्याकडून :)

    ReplyDelete
    Replies
    1. अगं सगळ्यात प्रथम एक कन्फ़ेशन आहे की मी ही पोस्ट सुट्टीवर जाणार म्हणून बर्‍याच घाईत लिहिली आहे.त्यामुळे "तोमोई"चा उल्लेख राहिला आहे असं वाटतं. पण शाळेला गाडीचे डब्बे आहेत हा उल्लेख थोडक्यात चौथ्या परिच्छेदात आला आहे. खरं सांगायचं तर हे पुस्तक परीक्षण लिहिण्यासाठी फ़ारच कठीण आहे असं मलाच नंतर वाटलं. कारण यातल्या सगळ्याच गोष्टी छोट्या छोट्या आणि काही न काही सांगणार॓या आहेत. यातले काही प्रसंग इतर देशांमधल्या शालेय अभ्यासक्रमातही आहेत हे तू पुस्तकाच्या सुरुवातीला वाचलं असेलच. आपल्या इथेही पाठ्यक्रमात ते यावेत असं मलाही वाटतं..बाकी तूही एक छोटी तोत्तोचानच होतीस का?? :P :D

      पुन्हा एकदा प्रतिक्रियेसाठी पेशल आभार.. :)

      Delete
    2. हाहा.:D नाही मी नव्हते छोटी तोत्तोचान. पण बघण्यात अनेक तोत्तोचान आल्यात. आणि त्यात आई शिक्षिका असल्याने तिच्या अनुभवात तर अनेक. तिच्याकडून आमच्या संपर्कातही. म्हणुनच जास्त जवळचं वाटतं बघ ते पुस्तक! :)

      Delete
    3. सेम पिंच. माझे पण आई-बाबा शिक्षकच त्यामुळे तू म्हणतेस तसे त्यांचे अनुभव ऐकणं माझ्याही बाबतीत सेम...

      Delete
  10. नक्कीच वाचेन हे पुस्तक...:) धन्यवाद अपर्णा...
    तुझे लिखाण नेहमीच आवडते...कारण अक्षरश संवाद असतात सहज सोपे वाचकाशी.

    ReplyDelete
    Replies
    1. श्रिया पुस्तक नक्की वाच आणि तुझ्या लेकीलाही वाचून दाखव :)
      अगं इतकं आवर्जून लिखाणाबद्द्दल लिहिलंस म्हणून खूप खूप आभार्स... :)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.