Wednesday, August 1, 2012

वातावरण...फ़ोडणीतला एक आवश्यक घटक....


मी मुंबईत नोकरी करत असताना कॉन्फ़रन्स कॉलवर माझा अमेरीकेतला क्लायन्ट नेहमी विचारायचा..."हौज द वेदर?"...त्याच्या एका प्रश्नापुढे माझ्या मनात तीन चार प्रश्नचिन्ह ...????...काय वेदर?? "कालच्या पेक्षा आज थोडं कमी गरम होतंय का हे (जास्त कामाने) गरम झालेल्या डोक्याला विचारते", असं म्हणू की "नाही रे..रोज रोज पांढरे कपडे काय घालायचे? उगाच कशाला "चांदनी ओ मेरी चांदनी" वाल्यांशी स्पर्धा? म्हणून आज थोडा लाइट क्रिम निवडलाय उन्हाशी मुकाबला करायला" असं सांगायचं? होता होता एक मुहुर्त काढून तोच आमच्या ऑफ़िसमध्ये येऊन गेला आणि मग पुन्हा कधीच त्याने मला हौज वेदर बिदर काही विचारलं नाही....म्हणजे हा विषय इतक्या सहजतेने संपेल असं मला निदान तेव्हातरी वाटलं होतं...पण नाही...

त्यानंतर अस्मादिकांचे चरणकमल पार उत्तर अमेरिकेच्या पश्चिमाध्य़ (हे मिडवेस्टचं माझं अतिप्रचंड मराठीकरण) भागात शिकागो नामे शहरी लागले आणि मे महिन्यातच मिशिगन लेकवरून येणार्‍या वार्‍यांनी डोक्यापासून पायापर्यंत एक शिरशिरी गेली...(बहुदा) तिथुनच सुरू झालं हे....उठसूठ वातावरण वातावरण या विषयावर बोलणं...

आईला पहिले फ़ोन केला तेव्हा खरं तर तिला काही हे माहित नव्हतं..तिने आपलं एक मोघम "कशी आहे अमेरीका?" असं काहीसं विचारलं आणि मी निदान पंधरा मिनिटं तरी इथलं (म्हणजे शिकागोमधलं) वातावरण या विषयावर तिचं डोकं पिकवलं.....त्यानंतर ती माझ्याकडे काही वर्षांनी माझ्याकडे आली तेव्हा तिच्या डोक्यावरचे केस इतके का पिकले(म्हणजे मी पिकवले...आतापर्यंत लोकं धान्य पिकवतात असं काहीसं माहीत होतं पण आमच्यात केस पण पिकवतात बरं?)  हे खरं तर माझ्या ध्यानात यायला हवं होतं नाही ...शिवाय परत जाताना पिकलेल्या केसांची संख्याही वाढली असणार....असो...

तर सांगायचं काय सुपातले जात्यात आलो आणि मग जात्यातल्यांनी जे केलं तेच मीही गेली कित्येक वर्षे मीही करतेय..

म्हणजे इतकी वर्षे मी म्हणायचे हे पाश्चात्य रोज रोज फ़क्त वेदर या एकाच विषयावर किती बोलतात नाही....म्हणजे क्लायन्ट वेगळा असला, तिथे कुणी नवीन टिम मेंबर आला की पहिले एक वेदर पुराण सांगितल्याशिवाय गाडी काही मूळ विषयाकडे येत नाही...नाही म्हणजे "टीम बिल्डींग" वगैरे ठीक आहे पण तरी मुंबईत राहून ते ऐकताना नेहमीच आश्चर्य वाटे की काय आहे काय बाबा हे वेदर प्रकरण.....म्हणजे आपल्या मराठीत वातावरण.....वरण या शब्दात फ़ोडणीचा भास आहे का माहीत नाही (कदाचित इतक्यात फ़ोडणीच्या वरणाची चटक लागलेला माझा लहान मुलगा कदाचीत या प्रश्नाचं उत्तर चांगलं देऊ शकेल पण असो आतापासून त्याला या वरणात नको...तो तिथे वरण-भातातल्या वरणातच बरा आहे) हां तर वरण या शब्दात फ़ोडणीचा भास आहे का माहित नाही, पण वातावरणाच्या गप्पा इतक्या चटकदार असू शकतात हे मला अमेरीकेतल्या काही महिन्यांतच कळलं...विशेष करून उन्हाळ्यातले मिशिगनवरून येणारे वारे नंतर फ़ॉल आणि विंटरमध्ये आपले आणखी बोचरे रंग दाखवून गेले तेव्हा तर वातावरणाची फ़ोडणी आणखीच गहिरी (की थंड) झाली....

अशाच वातावरणरूपी फ़ोडणी दिलेले काही मोजके अनुभव सांगायचे तर एक पोस्ट अपुरीच पडेल पण आता हा विषय आलाच आहे (म्हणजे तो येतोच...त्याला काही पर्याय नाही) तर मग थोडी फ़ोडणी आपणही दिली तर हाय काय आणि नाय काय??

हां तर ते शिकागो, तिथे तर अर्थातच वेदरमध्ये "विंडी इफ़ेक्ट" ह्म्म..तेच ते मिशिगन लेकची हवा-बिवा अशी फ़ोडणीतल्या जिर्‍यासारखी नेहमीच घुसते आणि मग आजचं तपमान पेक्षा "आजचं फ़िल्स लाइक"ला जास्त महत्व प्राप्त होतं...म्हणजे थोडं हिंगासारखं....टाकलंय का हे नक्की कळत नाही पण नाहीच टाकलं तर त्याचा इफ़ेक्ट नंतर कळेलच तसं काहीसं....हा प्रसंग कदाचीत अतिरेक वाटू शकेल पण एका अशाच बाहेर टक्क ऊन असणार्‍या दिवशी वेदर-बिदर न बघता मी पार्किंग लॉट ते एका हॉटेलची लॉबी हे अंतर हातमोजे न घालता पटकन जाऊया म्हणून गेले आणि हात अक्षरशः कडक होताहेत का असं वाटून लगेच लॉबीतल्या रिसेप्शनीस्टला सहज विचारलं कसं आहे वेदर आणि मग तिने ते फ़िल्स लाइक वगैरे फ़ोडणी देऊन जेव्हा मला "उणे वीस सेल्सियस"चा आकडा सांगितला तेव्हा मला तर आकडीच आली....अर्थात हे उणे मी लगेच कन्व्हर्ट केलंय अर्थात नाहीतर फ़ॅरनहीटमुळे आरामात ३२ म्हणजे खरं आपलं शून्य हा जागतिक गोंधळ आहेच. पण त्यानंतर पुन्हा कधीच थंडीत हातमोजे न घालायची चूक मी केली नाही.

मध्य भागात बर्‍याच फ़ोडण्या देऊन (की खाऊन) झाल्यावर आमचं इमान आम्ही जरा पूर्वेस आणलं म्हणजे हो तेच ते फ़िलीच्या आसपास...तिकडे आमचं आगमन झालं तेच एका प्रचंड स्नो स्टॉर्मच्या दिवशी...घ्या शिकागोच्या थंडीच्या जाचातून सुटणार वाटत असतानाच फ़ोर सिझन्स मध्ये अडकलो.. इथे म्हणजे चार ठळक ॠतू..जे तसे सगळीकडेच आहेत म्हणा. पण  म्हणजे ते येणार, यायच्या आधी, आल्यावर, जाताना आणि मध्येच नीट न आल्यामुळे याला चारने गुणून जे काही उत्तर येईल तितक्यांदा आम्ही वेदरच्या फ़ोडण्या देणार...आल्या आल्या शिकागोहून आल्याबद्दल कामावर आमचं हबिनंदन झाल्यावर लगोलग इथल्या(ही) विंटरचं कौतुक करण्यात माझा कामावरचा पहिला दिवस गेला होता..त्यानंतर "वेट अनटिल समर" म्हणून मग मध्ये एप्रिलचा पाऊस झाल्यावर उगवलेल्या ट्युलिप्स, डॅफ़ोडिल्सने स्प्रिंग आणि अर्थात स्प्रिंग अ‍ॅलर्जी (हो तोवर शरीरानेही इथल्या वातावरणाची फ़ोडणी जरा अम्मळ मनावरच घेतली होती) अशाप्रकारे फ़ोडणीत धने, मेथीदाणे झालंच तर तमालपत्र आणि तत्सम खडा मसालाही आणायला सुरूवात केली. 

समर म्हणजे तर हीट वेव्ह वगैरे आली की समरांगणच ते आणि तिकडे फ़्लोरिडातला हरिकेन सिझन आल्यामुळे इकडे येणारा वादळी पाऊस म्हणजे वातावरणाला फ़ोडणीच फ़ोडणी. हे असे तावून सुलाखून बाहेर पडलं की मग पानांवर रंगाची लाली आणणारा फ़ॉल...अहाहा! पण इथेही वातावरणाचं विशिष्ट गणित जुळलं नाही तर ते रंग नीट येत नाहीत किंवा लवकर गळून जातात इ.इ. बोलताना पुन्हा आहेच का आपलं ते वेदर...आणि मगची थंडी तर काय? तिथेच तर सगळे संवाद सुरू झाले होते नं? म्हणजे मागच्या वर्षी केले तरी पुन्हा करायचे नाहीत असं कुठे आहे? पुन्हा आहेच आपलं शेजारी, कामावर कुणी भेटला की पहिले हे पंधरा-वीस मिनिटं आजचं, कालचं, विकेंडचं आणि या सध्याच्या सिझनचं बोलणं (की बोलणंच बोलण). मूळ विषयाला बाजूला सारेल अशा मैफ़िली फ़क्त वेदर या विषयावरून होणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरजच नाही. 

हे फ़ोर सिझनच्या फ़ोडण्यांनी पोट भरलं नव्हतं म्हणून आम्ही वेस्टाला आपलं ते नॉर्थ वेस्टालाही संधी दिलीच. इथे खूप पाऊस पडतो अशा फ़ोडणीने सुरू झालेला माझा प्रवास इथे चारही सिझन्स पण आहेत गं..फ़क्त प्रत्येक वर्षी ते थोडे वेगळे असतात....या आणि अशा वाक्याने ज्याच्या त्याच्याशी बोलताना फ़ोडणीत येतातच. नुसताच पाऊस असं असेल असं उगा सुरूवातीला वाटलं होतं. पण ते वर उल्लेखलेल्यातलं फ़क्त तमालपत्र म्हणजे आपलं ते चरचरीत ऊन सोडलं तर फ़ोडणीचे सगळे घटक कुठे न कुठे तरी लागताच. 

ही फ़ोडणी कधी सकाळ थंड, रात्री अति थंड आणि दुपार निम थंड अशी मोहरी, जिरं, धने घेऊन येते तर कधी नुस्तंच मोहरी किंवा कधी त्यात थोडा खडा मसाला छोटं स्नो स्टॉर्म घेऊन हजर असतो. सध्या मला धन्याची प्रचंड गरज आहे(हे फ़ोडणीतलं उगाच श्लेष वगैरे नको हं) खरं तर तमालपत्रही चालेल पण यंदा ते आलंच तर एखादा विकेंडपुरता येईल असं चिन्ह दिसतंय....बरं हा सगळा संवाद ज्यांना कळलाय त्यांना मी कुठल्याही खादाडीवर बोलत नसून ही एक वेगळीच फ़ोडणी आहे याची कल्पना आलीच आहे..आणि वेदरबद्दल बोलायचं तर हे हवंच नं? 

ओरेगावातली मी न्युयॉर्कमधल्या माझ्या एका क्लायन्टकडे जाते तेव्हा ओरेगावचा पाऊस या विषयावर मी पंधरा मिनिटं आणि न्युयॉर्कमधलं कधीही बदलणारं आणि हडसनमुळे अम्मळ थंड असणारं वातावरण याबद्दल तो कितीही मिनिटं आत्मीयतेने बोलत राहतो....बरं तो आणि मी निदान कामानिमित्ताने याआधी आणि नंतर बोलणार आहोतच पण त्याच्या दोन क्युब पलिकडे बसलेला जॉन नंतर मला लंच टाइममध्ये कॅफ़ेटेरियाच्या लाइनमध्ये भेटतो तेव्हा आधी आमची तोंडओळख असल्याच्या अधिकाराने पुन्हा एकदा यावर्षी (न पडलेली) थंडी आणि मी आमच्याकडे मार्चपर्यंत पडलेला बर्फ़ या विषयावर कॅफ़ेच्या लाइनमध्ये बोलत राहतो..हे आटपून मी परत माझ्या ओरेगावात आले की मी इथे नसल्याने ताण पडलेली पाळणाघरातली मंडळी "हौ वॉज द वेदर? डीड यु मिस द रेन?" म्हणून माझं तिकडचं आणि मी तिथे असताना इथलं असं अपडेट देत राहतो..पुन्हा हीच टकळी शेजारणीकडे, जमलंच तर त्याचवेळी कुणीही फ़ोन केला तर तिकडे आणि सगळीकडे वाजत राहते...

म्हणजे आताच पहा नं? मुंबईतला पाऊस सुरू झाला असेल असा विचार करून काही वेगळं लिहायला बसले होते तोच वातावरणाच्या फ़ोडणीचा विचार मनात आला...

विचार कसला मोठी फ़ोडणीच बसलीय या पोस्टरूपाने वाचकांना..नाही का?? 

12 comments:

  1. अगदी अगदी अगदी... भारतात असताना "काय हे लॉक वेदरवर तासनतास बोलत राहतात" असं म्हणणारा मी इथे आल्यावर इथल्या वेदरवर चक्क पोस्ट लिहायला घेतो !!! काळजी नको... तुझी पोस्ट ही आल्यावर आता पुन्हा वेदरवर नवीन पोस्ट टाकून मी पकवणार नाही :)

    ReplyDelete
    Replies
    1. हेरंब, खरं सांगू का तू लिहिलंस तर मलाच वाचायला नक्की आवडेल...तुझ्या टिपीकल वटवट शैलीत...सो नक्की लिही....:)

      Delete
  2. मस्त लेख !

    'फिल्स लाईक' ने एकदम नॉस्टल्जिक केले ! :)

    ते येणार, यायच्या आधी, आल्यावर, जाताना आणि मध्येच न आल्याने >>>> तूफान :)

    ReplyDelete
    Replies
    1. नॉस्टॅल्जिक राफ़ा....:)

      एकंच विषय वेगवेगळ्या प्रकारे गुंतलाय नं म्हणून ते येणार, यायच्या आधी, आल्यावर, जाताना आणि मध्येच न आल्याने आणि हो ते चारने गूणायचं इसरायचं नाही... :P

      Delete
  3. "How was the weather???" ya fodanine mala chakkar yetey.... :D

    Hahahahahahaha!!!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स संतोष..

      म्हणून मी या पोस्टरूपी फ़ोडणी बसलीय असं म्हणून आधीच माझी बाजू सेफ़ करायचा प्रयत्न केलाय... ;)

      Delete
  4. Chan lihilas Aparna....i have been just joined the grp ... me from Dallas , Texas..... so how is the weather at u today??? Hehehe formal suruvaat ashich aste na??? so.....

    ReplyDelete
    Replies
    1. Welcome to the club and Blog Sampada...

      कधीकधी व्हर्च्युअल टीममुळे चार टाइम झोनची चार टाळकी जमली तर मिनिट्स ऑफ़ मिटिंगमध्ये फ़क्त वेदर फ़ोरकास्ट येईल नाही का...:)

      Delete
  5. म्हणजे इकडची लोकं जितक्या सहज भाजीपाल्याचे 'दर' विचारतात तशी तिकडची माणसे 'वेदर'बद्दल विचारतात तर ;-)

    बाकी वातावरणातल्या 'वरणा'चा आधार घेऊन ह्या पोस्टला पण खादडिचे लेबल लावायला हरकत नाही :D

    ReplyDelete
    Replies
    1. ’दर’ आणि ’वेदर’ हा हा हा.
      खादाडी पोस्ट लिहायचं तूच कबूल केलंस की सिद्धार्थ....:P

      Delete
  6. हाहाहा.. मस्त फोडणी दिली पोस्टला.. मिटींगच्या पहिल्या दहा मिनिटाचं गमक कळलं आता :D

    ReplyDelete
    Replies
    1. यस्स आनंद...ते हाय ते गमक....:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.