आपल्या लहानग्यांना मोठं होणं पाहण्यात आई-बाबांना काय सूख मिळतं हे तुला ती मोठी झाल्यावर कळेल असं माझे आई-बाबा नेहमी म्हणतात. माझ्या नशीबाने मी शेंडेफ़ळ असल्याने जास्त लाड तर झालेतच पण तरी मी तीनेक वर्षांची होईपर्यंत आईने नोकरी केली नव्हती...त्यामुळे मी तिची, आणि लाड केल्यामुळे बाबांची, थोडक्यात दोघांच्याही जास्त जवळ आहे. आणि ते शिक्षक असल्याने त्याच्या आमच्या सुट्ट्या पण एकत्र, धमाल करणे हे सगळं आमच्या नशीबात होतं.माझी मुलं मात्र आई-बाबांचा वेळ मिळणे याबाबतीत तेवढी सुदैवी नाहीत. त्यातला त्यात धाकटा...कारण तो नवव्या महिन्यात बाहेर पाळणाघरात गेलाय.
त्याला तिथे ठेवायच्या आधी आमची एक समोरासमोर मिटींग झाली होती...टोशाबरोबर...बारीक शरीरयष्टी, माझ्यापेक्षा थोडी जास्त उंची, थोडेसे पिकू लागलेले कुरळे ब्लॉंड केस आणि गोरी गोरी, हसरी..ती स्वतः एक आजी आहे हे कळल्यावर का कोण जाणे मला खूप बरं वाटलं होतं. म्हणजे आता अनुभवांती बाकीच्या सांभाळ करणार्या शिक्षिकाही खूप छान आहेत हे कळलं तरी ते पहिल्या प्रथमचं जे काही धाकधुक वगैरे वाटत असतं त्यावेळी तिचं आजी असणं मला उगीच धीर देऊन गेलं होतं..
मला स्वतःला "मम्मी" हा शब्द माझ्या मुलांनी मला म्हणावा असं वाटत नाही आणि आरुष माझ्याकडेच वाढला असल्याने तो "आई" बोलायला शिकला. पण ऋषांक नक्की हा शब्द शिकेल की नाही म्हणून मी त्यांच्या लिस्टवर तुमच्या भाषेतले काही शब्द यात "aai" हे मी आवर्जुन लिहिलं..त्यामुळे आमच्या पहिल्या संभाषणात तिने ते कसं बोलायचं हे माझ्याकडून शिकून घेतलं आणि त्यानंतर कधीही मला मुलांकडे संबोधताना तिचं ते "आय" मला ऐकायला फ़ार आवडायचं....
काही माणसं आपल्याला लगेच क्लिक होतात. त्याचं काही कारण नसतं..ती होतात... म्हणजे लाडक्या पुलंच्या भाषेत त्यांना रावसाहेब रांगडे असले तरी क्लिक झाले तसं मी प्रचंड घाई गडबडवाली असले तरी शांतपणे हसतमुख चेहर्याने काम करणारी टोशा मला क्लिक झाली. त्यावेळी तर माझे बाबा पण इथे होते आणि सुरुवातीला माझी "दो टकियों की नोकरी" आड आल्यामुळे बाळाबरोबर पाळणाघरात दोन दिवस दोन तास थांबायचं कामही त्यांनी केलं होतं..त्यावेळी त्यांनाही ती खूप चांगली वाटली..ती बाळाला छान सांभाळेल गं या बाबांच्या आधाराने मी तशी नाही म्हटलं तरी निश्चिंत झाले आणि मग आमचं एक रूटीन सुरू झालं..
त्यानंतर मागच्या ख्रिसमसला थोडे दिवस उरले होते.यावेळी सगळ्या शिक्षकांना काय द्यायचं याविषयी घरी चर्चा सुरू झाल्या आणि एके दिवशी सकाळी बाळाचा खाऊ फ़्रिजमध्ये ठेवताना टोशाने ती भयंकर बातमी मला दिली...तिला ब्रेस्ट कॅन्सर झालाय....बापरे मी गळूनच गेले....म्हणजे आतापर्यंत सगळीकडे याविषयीची माहिती वगैरे वाचली आहे मी...पण त्यादिवशी तिच्यासमोर अश्रु लपवताना फ़ार जड गेलं..घरी आल्यावर बाबांसमोर मी मला मोकळं केलं....बाबांनाही खूप वाईट वाटलं आणि मग त्यांनी मला सांगितलं जे कदाचित बरोबरही असेल की या देशात तर सगळं वैद्यकिय सुविधा इ. पाहताना ती नक्की बरी होणार.
ती बरी होणार हे मला माहित आहे...पण हे सगळं सहन करणं, त्या ट्रिटमेंट्सचे दुष्परिणाम हेही मला माहित आहे..त्याचबरोबर आणखी एक मुद्दा खर्च....म्हणजे कितीही चांगला इंश्युरन्स असला तरी त्यात बर्याच गोष्टीचा आउट ऑफ़ पॉकेट खर्च पाळणाघरात काम करणार्या व्यक्तीला कसा परवडेल याचा अंदाज घ्यायला मला कुणी मोठी अर्थतज्ञ असण्याची गरज नाहीये..मी तिला समोरून सांगितलं की कधीही काही हवं असेल तर नक्की सांग..आम्ही तुझ्या घरचेच आहोत आणि आमच्याही मुलाची तू आम्हाला आज्जीच वाटते...त्यानंतर आमच्या ख्रिसमस गिफ़्टमध्ये आम्ही टोशासाठी काय द्यायचं हे आम्हाला जास्त विचार करायला लागला नाही.
इकडे तिच्या किमो सुरू झाल्या आणि तिच्या पाळणाघरातल्या सुट्ट्या वाढायला लागल्या...एका छोट्या ब्रेकनंतर ती परत आली आणि तिचे मला आवडणारे कुरळे केस ज्याने दिले होते त्याने परत घ्यायला सुरूवात झाली.हे सगळं सुरू होतं तरी आपलं काम ती आनंदाने करत होती.ती त्या ब्रेकनंतर परत आली तेव्हा ऋषांक आणि त्याच्या वर्गातली मुलं तिच्या अवती भोवती अशी काही गुंगायला लागली की जणू काही ती तिला सांगत होती की वि मिस्ड यु...
मला माहित आहे की हे सगळं सुरू असताना तिला नक्की भावनिक सपोर्ट सिस्टीम हवा होता आणि तिची टीम या ठिकाणी ठाम उभी राहिली..डे केअरच्या डायरेक्टर आणि बर्याच इतर शिक्षिकांनी तिच्यासाठी आपले केस दान करून टाकले...आता मुलांनाही काही प्रश्न नसावा की ही एकटीच बाई केस नसल्यामुळे टोपी घालून का वावरतेय..यात आठ महिन्याची गरोदर असणारी माझी आणखी एक लाडकी शिक्षिका जेनेल पण होती..
तिच्या ट्रिटमेंटमुळे बिघडणारं अर्थकारण सावरण्यासाठी या छोट्या पाळणाघरातून एक खास कार्यक्रम राबवण्यात आला.."सायलेंट ऑक्शन" यातली प्रत्येक गोष्ट फ़क्त आमच्या ग्रुप मेलवर झाली. ज्याला जे वाटलं ते ते त्यांनी त्या ऑक्शनसाठी दिलं, त्यात आजुबाजुला घरगुती तत्वावर छोटे दागिने विकणार्यापासून ते घरी कुकी बेक करणार्या एखाद्या स्टे होम मॉमपासून सगळ्यांचा समावेश होता..सगळ्यात महत्वाचं होतं ते टोशाच्या लाडक्या ऋषांकसारख्याच अन्य मुलांचा.. त्यांनी मुलांचं एक खास क्रिएटिव्ह सेशन घेतलं होतं त्यात काढलेली चित्रं...या आणि अशा सगळ्या वस्तूचं एक सायलेंट ऑक्शन दोन दिवस चाललं.सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळात.
प्रत्येक वस्तुच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या कागदावर त्याची तुम्हाला परवडणारी किंमत आणि तुमचा इमेल आय डी. अशा प्रकारे एकावर एक किंमती मांडत जायच्या. वेळ संपेपर्यंत कितीही वेळा जाऊन तुम्ही आपली किंमत वाढवू शकता. दोन दिवसानंतर तुमची किंमत जास्त असेल तर तुम्हाला मेल येईल आणि ते पैसे भरून तुम्ही ती वस्तू घेऊन जायची.. याला सगळे पालक, शिक्षक, तिथले कर्मचारी यांनी इतका भरघोस प्रतिसाद दिला या सगळ्यांचे खारीचे वाटे मिळून पाच हजार डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम गोळा झाली.
निसर्गाने तिला जे दुःख दिलंय ते शारिरीक दृष्ट्या तिचं तिलाच पेलायचं आहे पण आपण तिला आर्थिक बळ देऊ शकतो हे सगळ्यांच्या एकजुटीमुळे सिद्ध झालं. आणि ही इतकी मोठी रक्कम उभारण्यात ज्या सर्वांचा हातभार ते इथे काम करणारे सारेच मध्यमवर्गीय..कुणी बिल गेट्स नाही.
आपल्याकडे "एकीचे बळ" किंवा "बूंद बूंद से बढता सागर" इ.इ. मी फ़क्त पुस्तकात वाचलं होतं. पण एका साध्या पाळणाघरात काम करण्यार्या व्यक्तीला वार्याच्या वेगाने मदत करणारी ही कम्युनिटी सिस्टीम पाहून मला खरंच इथल्या लोकांबद्दल प्रचंड आदर निर्माण झाला. पाश्चात्यांकडून शिकायचंच असेल तर हे मी माझ्यासाठी नक्कीच शिकेन. कारण काय आहे कदाचित आपण स्वतःहून खूप काही इच्छा असली तरी आपल्या वैयक्तिक अडचणींमुळे करू शकणार नाही याची जाणीव मलाही आहे. पण माझ्यासारखीच दहा डोकी एकत्र आली तर कुणा एकाला थोडीफ़ार मदत नक्कीच होऊ शकते आणि ती कशी याचं नियोजन त्या मेल थ्रेडवरून मला नक्कीच मिळालं..
मागच्या आठवड्यात या कॅन्सरसाठी शेवटचा सामना करायला टोशा सज्ज झाली आहे..तिला ज्या शुक्रवारी तिच्या सर्जरीसाठी गुड लक चिंतण्यात आलं नेमकं त्याचवेळी मी कामासाठी बाहेर होते पण तिने आठवणीने मला मेल केली मी फ़क्त आता जातेय आणि तुला मला प्रत्यक्ष बाय करता येत नाहीये...खरं सांगु त्यादिवशी मला रडू आलं नाही कारण मला माहित आहे की ही लढाई ती नक्की जिंकणार आहे...आणि केवळ तेवढ्यासाठी मी असं म्हणेन की तसंही देव-बिव नावाचं काही नसतंच..असला असता तर हे भोग अशा निरागस लोकांच्या वाट्याला आलेच नसते..असो..हे सगळं मी त्यासाठी लिहित नाहीये..
मला फ़क्त इतकंच म्हणायचं आहे की आपली आर्थिक ताकत खूप मोठी नसली म्हणून आपण आजारांचा सामना करुच शकत नाही असं नाहीये..आणि आपली स्वतःची सपोर्ट सिस्टिम जर आपण उभारू शकलो तर निदान एकाला तरी आपण निदान अशा मोठ्या आजारासाठी मदत नक्की करू शकतो आणि तेही त्याचा जास्त बाउ न करता...सगळं त्या सायलेंट ऑक्शनच्या वेळी झालं तसं खेळीमेळीने....
त्या सायलेंट ऑक्शनमध्ये माझा मुलगा आणि त्याच्या मित्रांनी काढलेलं,माझ्या सुदैवाने माझ्या घरातल्या भिंतीची शोभा वाढवणारं ,हे चित्र....माझ्यासाठी अनेक कारणांनी अमुल्य......सिंपली प्राइसलेस....