Thursday, December 8, 2011

हुरहुर


तसं जायचं त्याचं अचानकच ठरलं; पण तो अख्खा आठवडा जाणार यापेक्षा धक्का बसला होता तो त्याचं ठिकाण कळल्यावर...फ़िलाडेल्फ़िया...दोन वर्षांपासून आम्हा दोघांपैकी कुणीतरी तिथं जायला हवं या मतावर एकमत होतं फ़क्त वेळ आणि अर्थात पैसा याचं गणित जमायला हवं होतं.माझं कामानिमित्त न्यु-जर्सीला जाणं होता होता वर्षही सरायला आलं आणि अचानक त्याचं जाणं ठरलं..नाव ऐकल्यावर खरं म्हणजे गलबलायलाच झालं.इतर कुठं जाणं असतं तर नको रे, टाळता येईल का बघ नं असं नक्की तोंडातून गेलं असतं...


पण ही जागा जोवर ते घर आहे तोवर तरी वाकुल्या दाखवणार....


मला अपेक्षा होती तसंच रात्रीच्या फ़्लाइटने उशीरा पोहोचलं तरी त्याचा फ़ोन आलाच...त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी जायच्या शेकडो रस्त्यांना आणि जीपीसच्या मार्गदर्शनाला न जुमानता तो त्याच रस्त्यानं जाईल अशी आशा होती..त्याची गाडी माझ्या घराच्या वळणावर आली आणि आम्ही बोलत होतो...


"मी कुठून जातोय माहित आहे का तुला?"


"हो....कसं आहे सगळं?" माझा गिळता आवंढा....


"सगळं तसंच आहे गं..काहीच फ़रक नाही..." तो....


"रो आणि डीनीसचं ख्रिसमसचं डेकोरेशनसुद्धा आणि कोपर्‍यावरच्या घराची मागच्या डेकला केलेली गोल गोल लाइटिंग, त्याच्या बाजुचे ते लायटिंगचे रेनडियर आणि फ़ुगवलेला चायनीज स्नो मॅनचा फ़ुगापण...बेट्टीला रात्री मध्येच लाइट लावायची सवय आहे नं...तिच्या वरच्या बेडरुमची लाइट सुरू आहे...." हे सगळं त्याने न बोलता मला एकदम दिसलं.......माझी मला पुन्हा मी माझ्या समोरच्या अंगणातल्या पायर्‍यावर बसलेली दिसू लागली...


"चल इथे बरेच पोलिस असणार आहेत..मी ठेवतो."


"ह्म्म्म" माझा हो आणि सुस्कारा एकदमच...


दुसर्‍या दिवशी त्याची संध्याकाळी तिथे वारी असणार ठाऊक होतं पण त्याआधीच मी माझ्या तिथल्या किचनमध्ये पोहोचले होते..किचन आणि सनरुम यांना जोडणार्‍या पायरीवर बसून मागच्या लॉनमधल्या खारी आणि ससे पाहायची माझ्या मुलाला सवय होती...त्याचं ते त्यावेळचं चिमुकलं ध्यान माझ्या समोर आलं...


"घर कसं आहे??" मी.


"चांगलं ठेवलंय" तो...


आणखीही बरंच काही बोललो आम्ही..सगळं घराबद्दलच...जणू ते घर म्हणजे आमच्या बोलण्यातली एक तिसरी आणि अत्यंत जवळची व्यक्ती...मला माहित नाही त्यातलं नक्की किती ऐकलं मी..पुन्हा खरंखुरं मागे गेल्यामुळे असेल घराला आपली आठवण येत असेल का असले प्रश्नही पडायला लागले..आणि ती बेचैनी आणखी वाढली फ़क्त....

आठवड्याच्या सगळ्या संध्याकाळी वार लागल्याप्रमाणे तो आमच्या एकएक जुन्या मित्रपरिवाराला भेटतोय..आणि मध्ये मध्ये माझेही फ़ोन..


मैत्रीण जणू माझ्या मनातलं जाणून मला मुद्दाम दुपारी फ़ोन करून म्हणालीही...


"बस हो गया अभी...आ जाओ नं वापस?? मुझे आपका वो घर बहुत याद आता है....."



आता वाटतं गेले दोन वर्षात नव्हतोच गेलो तेच बरं होतं....काळाची चाकं आपण उलट फ़िरवू शकत नाही याची जाणीव नव्हती त्यामुळे जे नाही त्याच्या वेदनेचा सल कमी होता........आता मात्र तो इथे नाही यापेक्षा तिथलं काय मनात कायमचं जाऊन बसलंय याचीच हुरहुर.........

12 comments:

  1. अगदी अगदी.. मलाही अगदी असंच आमचं डोंबिवलीचं घर बोलावतंय !

    ReplyDelete
  2. खरंय न हेरंब...फक्त तू डोंबिवलीला जाऊ शकणार आहेस... आमच्या बाबतीत ते शक्य करायला पडणारे सायास जरा जास्तच आहेत....बाकी तुझ्या शब्दाने मला उगाच धीर आला..:)

    ReplyDelete
  3. आत्ताच्या घराबद्दलही काही काळाने असच आपलेपण वाटेल :-)

    ReplyDelete
  4. ह्म्म्म्म... समजू शकतो... कालचक्र आहे गं हे, कधीच थांबणार नाही आणि उरणार त्या फक्त आठवणी :) :)

    ReplyDelete
  5. अपर्णा खरच हि'हुरहूर'जेव्हां वाटते न तेव्हां त्रास होतो आहे कि हे असे वाटणे फार काळ टिकणार नसल्याने ती पण जाणीव होत असते,आणि वाटते कि असे परत मागे जाणे थोड्या वेळ जुन्या जागेत मनाने रेंगाळणे अगदी न ठरवता आपसूकच घडते आहे,ह्यात काही चूक आहे का,ह्याने मनाला वाईट वाटते,काहीतरी हरवले आहे आता आपल्यासोबत नाही अशीही जाणीव होतेपण हि हुरहूर टाळता पण येत नाही ....:)
    तू खूप छान लिहिले आहेस.ओढ असते ग जुन्या जागेशी जवळीक आणि एक नाते.कुठेतरी खरेतर आपण उरलेलो असतो त्या जागेत.तिकडेच घुटमळतो त्यामुळे.मला तर माझ्या आजोळच्या घराची स्वप्न कधी पडतात,आणि ती संपूच नये असा वाटत उठावे लागते...स्वप्न हुरहूर निर्माण करतात पण मग स्वतःला समजवावे लागते.ह्या छान लेखाबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  6. सगळे काही 'प्लान के मुताबिक' झाले तर, साथ में सारा सोना लेके, मायकल के साथ सायकल पर, नव्या वर्षात आम्ही पण बंगळूरातून मुक्काम हलवू अशी लक्षणे आहेत. त्यामुळे तुझ्याइतकी हुरहूर कधी लागली नाही तरी तरी भविष्यात मी देखील 'थोडीशी हुरहूर' पोस्ट लिहेन अशी आशा आहे.

    ReplyDelete
  7. आल्या आल्या तुझी पोस्ट वाचतेय... काय गडबड गं ही? बाकी, आपण राहतो ती सारीच घरं आपल्या काळजात ’घर ’ करून राहतातच!थोडं डाव उजवं असतं म्हणा त्यातही... :) नुकतीच त्या माझ्या घरातून या माझ्या घरात परतलेय... हुरहूर आहेच! तूही जायचे होतेस गं... कदाचित जीव थोडा निवला असता...

    ReplyDelete
  8. सविता, खरं सांगायचं तर माझ्या सर्वात पहिल्या घरापासून ते आतापर्यंत बदललेल्या सहाच्या सहा आणि हे सातवं, सर्व घराबद्दल तितकाच आपलेपणा आहे...फक्त हे घर कदाचित आमचं स्वत:च आणि जास्त वर्ष राहिलेलं म्हणून जास्त प्रेम असेल अस साधारण वाटतं...

    ReplyDelete
  9. खरंय रे सुहास..आणि आठवणी तर निघणारच न ? निमित्त हवं..:)

    ReplyDelete
  10. श्रिया, ही पोस्ट लिहिताना मला खरच तुझी आठवण आली होती कारण तू पण आता घर बदलतेस न...तुझी प्रतिक्रिया इतकी छान आहे की त्याचीच एक छान पोस्ट होईल...खूप खूप आभार ग...

    ReplyDelete
  11. सिद्धार्थ, सबकुछ प्लान के मुताबिक होवो और हमको वो पोस्ट वाचने को मिलो...

    रही बात सोने की..तू उसकी फिक्कर नको करू रे इस्मैल्भई...हम अपनी सलीम फेकू की ग्यांग को भेजते है न वहा से..वो सोने को मेरे पास लाके देंगे ..तू सिर्फ मुविंग की फिक्कर कर रे...

    ReplyDelete
  12. कशी आहेस ग श्रीताई...तुझी कमेंट पाहून चांगलंही वाटतय आणि अस वाटतय की मी उगाच या पोस्टमुळे तुला भावूक नाही न केल...आताच आलीस तिथल्या घराचा निरोप घेऊन, इथल्या आठवणी तर आहेतच ......काळजी घे..

    तू म्हणतेस ते शंभर नंबरी आहे....ही घरं आपल्या काळजात "घर" करून राहतात...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.