Tuesday, November 29, 2011

एक छोटासा अगोड प्रवास....

नमनाचं फ़ॅट एकदम काढून टाकायचं असेल तर ही कहाणी आहे मला गेले काही महिने झालेल्या एका तात्पुरत्या मधुमेहाची. मागच्या वर्षी  काही महिने खरं तर या ब्लॉगच्या नियमित वाचकांना खादाडी पोस्टा वाढल्याचं लक्षात आलं असेल, काहीवेळा अतिरेकच होता. एक म्हणजे आधीच आळशासारखं कधीतरी ब्लॉगवर लिहायचं आणि मग कधी काळी कुठे कुठे खाल्या गेलेल्या खादाडी आठवणी आळवत बसायचं..हे काय गौडबंगाल आहे याचा कदाचित काहींना संशयही आलाही असेल..असो आता वेळ आली आहे ती थोडं खरं मांडायची.


गोडबंगाल वगैरे काही नव्हतं...असलंच तर अगोड, बाळा मी काय खाऊ या प्रश्नाने भरलेले काही महिने....’मधुमेह’ हा एकच शब्द..इतके दिवस ’भारत आता मधुमेहाची राजधानी आहे’ वगैरे फ़क्त ऐकलं होतं. ते संकट जेव्हा असं समोर उभं ठाकलं तेव्हा अगदी खरं सांगायचं तर मी गळपाटलेच....एकीकडे नव्या बाळाच्या चाहुलीची आनंदाची बातमी येऊन काही महिने झाले होते आणि आता आवडेल ते सग्गळं सग्गळं मनसोक्त खायचं या विचारात असतानाच दुसर्‍या त्रिसत्रातच रक्तचाचणी "जेस्टेशनल डायबेटिस" असल्याचं दाखवतेय म्हणजे आता बाळ वेळेवर आलं तर निदान सहा महिन्याचं तरी वास्तव्य करणारा हा आजार. शिवाय आयुष्यभर कायमचा टाइप २ मधुमेह व्हायची भिती. पण आता "आलिया भोगासी" म्हणून सामोरं तर जायलाच हवं. या माझ्या प्रवासाची ही छोटीशी कहाणी. कुणालातरी त्यातून थोडीफ़ार माहिती मिळाली तर फ़ायदा व्हावा म्हणून.

जेस्टेशनल डायबेटीस हा बायकांना (आणि त्यातही आशियाई वंशाच्या बायकांमध्ये जास्त आढळणारा) गरोदरपणी होणारा एक प्रकारचा मधुमेह आहे. मधुमेह म्हटलं की चला आता साखर बंद आणि तुमच्या अमेरिकेत सगळं शुगर फ़्री मिळतं ना? इतकं सोप नाही हे जेव्हा माझी पहिली डाएटिशीयन बरोबर चर्चा झाली आणि लक्षात आलं.

परदेशात या (आणि जनरलीच) आजाराबाबतीत जागरुकता जास्त आहे. सर्वप्रथम इंश्युरन्सतर्फ़े एक रक्तातली साखर मोजायचं एक यंत्र हातात आलं आणि एका नर्सने ते कसं वापरायचं हे शिकवलं. एका छोट्या लॅन्सेटने थोडंसं भोक पाडून मग रक्ताचा एक थेंब त्या यंत्राच्या स्ट्रीपवर टाकला की काही सेकंदात यंत्र साखर मोजुन ती दाखवते. मला दिवसातून चार वेळा हे करावं लागे आणि आठवड्यातून एकदा ते नर्सला कळवावं लागे. म्हणजे मुख्य डॉक्टरला दाखवून त्याप्रमाणे औषधोपचार ठरवले जात. त्याचप्रमाणे एक डायटीशीयन तुम्हाला तुमच्या शारिरीक गरजांनुसार डाएट ठरवून देते. त्यात मुख्य मोजणी असते ती कर्बोदकांची (carbohydrates) कारण ती खाल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर अवाजवी वाढू शकते. म्हणून मग ठरवून दिलेल्या मोजणीप्रमाणे जर ते खाल्ले गेले तर मग थोड्या-फ़ार गोळ्यांनी तुमचं काम भागतं.

पण प्रेगन्सी जसजशी पुढे जात तसतसं हॉर्मोन्सही आपलं काम जोमाने करतात आणि मग फ़क्त डाएट सांभाळलं तरी साखर वाढतेच..मग अशा परिस्थितीत काही वेळा इन्सुलिनची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. मलाही शेवटचे दोन महिने दिवसाला तीन वेळा इन्सुलिन घ्यावं लागलंय..मी खरं तर याआधी कधीच स्वतः स्वतःला (आणि तेही असं नियमाने) इंजेक्शन देईन असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं..पण यावेळी बहुधा सर्वच अनुभव घ्यायचं लिहिलं होतं. सारखं आपण कुठे नं कुठेतरी टोचतो असं उगाच वाटे पण नंतर सवय झाली.शंभरपेक्षा जास्त इंजेक्शन्सतरी या काळात मी स्वतःला टोचलीत.हे इंजेक्शन कसं टोचायचं तेही नर्स शिकवते.

इन्सुलिन घ्यावं लागलं तर रक्तमोजणी अवश्य करावी कारण इन्सुलिनमुळे एकदम साखर कमी होऊनही धोका जाणवू शकतो त्यामुळे जवळ काहीतरी गोड, कार्बवालं ठेवावं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण वेळ आली तसं नर्सेस आणि डॉक्टरनी खूप छान समजावलं. त्यामुळे मानसिक दडपण कमी व्हायला मदत झाली. माझी आता हाय रिस्क प्रेगन्सी असल्यामुळे नेहमीच्या गायनॅकऐवजी मला पेरिनेटॉलॉजिस्ट चेक करायची. गेले काही महिने ती माझी मैत्रीणच झाली होती. कितीही कामात असली तरी ती माझ्याशी भरभरुन बोलायची. तिची मुलं आता कॉलेजला होती पण माझ्या दोन वर्षाच्या मुलाची ती आवर्जून चौकशी करायची आणि शिवाय मी त्या भागातही नवीन होते त्यामुळे आसपासच्या भागाच्या टिप्स, माझं घरुन काम करणं अशा बर्‍याच विषयांवर आम्ही गप्पा मारायचो. शिवाय माझ्या इतर काही गोष्टी ठीक नव्हत्या तेव्हाचा तिचा चेहरा आणि नंतर गाडी रुळावर आणल्यानंतरच्या तिच्या प्रतिक्रिया हे सगळं इतकं पर्सनल झालं होतं की काहीवेळा मला वाटायचं हिची मी एकटीच पेशंट असावी.एकंदरित ही डॉक्टरची व्हिसीट तशी वाळवंटातली हिरवळ होती.

आहाराबद्द्ल महत्वाचं बोलायचं तर एकाच वेळी भरपूर खायच्या ऐवजी न्याहारी, स्नॅक, दुपारचं जेवण, स्नॅक, रात्रीचं जेवण आणि पुन्हा एकदा स्नॅक असं खायला हवं आणि फ़ूड लेबल्स वाचायची सवय अगदी रोजचं गणपती स्तोत्र म्हटल्यासारखी अंगिकारली तर बरं. त्यातही पाहायचं ते कार्ब कंटेन्ट. १५ ग्रॅम म्हणजे १ कार्ब असं पकडलं तर मला सकाळी न्याहारीला २ कार्ब, त्यानंतर न्याहारीला १ कार्ब, जेवताना ३ कार्ब, दुपारच्या न्याहारीला १ किंवा २ कार्ब, रात्रीच्या जेवणाला ३ कार्ब आणि झोपायच्या आधी २ कार्ब इतकं खायची परवानगी होती. त्यासाठी मला एक-दोन पॉकेट बुक्स दिली होती ज्यात पदार्थांचे न्युट्रिशलनल कंटेट होते. नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ दोन-चार वेळा पाहिल्यावर मग जास्त पुस्तकात पाहायची गरज पडली नाही पण हाताशी असलेलं बरं. कार्ब कंट्रोल मध्ये खाल्ले की कितीही प्रथिनं जसं अंडी,मासे,चिकन आणि नॉन स्टार्ची भाज्या, चीज खायला परवानगी असं साधारण वेळापत्रक. असं वाचताना वाटतं, बरं आहे की मग राहा आता चरत.

पण जेव्हा हे प्रत्यक्ष मी आचरणात आणलं तेव्हा लक्षात आलं की माझ्या आवडीचे किंवा सवयीचे कितीतरी पदार्थ खायचं प्रमाण एकदम कमी झालं होतं..दोनच चपात्या, फ़ळ कमी किंवा दिवसाला एक छोटं वगैरे, शिवाय भात बंद किंवा अगदी कमी हे माझ्याच्यानं कठीण वाटत होतं..शेवटी माझ्या जिभेला देशी जेवणाची चटक आणि अगदी डाळींपासून सगळीकडे असणारे कार्ब माझे वैरी झाले होते...हे सगळं नीट सांभाळण्यात माझं वजन दोनेक महिने वाढलंच नव्हतं आणि मग जेव्हा ते डॉक्टरच्या लक्षात आलं तेव्हा मग पुन्हा डाएट बदल आणि काय जास्त खायचं याबद्दल एक चर्चा.

याचं एक उदा. देते समजा मला पोळ्या खायच्या असतील तर मध्यम आकाराच्या पोळीला १ कार्ब असा अंदाज घेतला तर मी (फ़क्त) दोन पोळ्या, उसळ असेल तर अक्षरशः मोजणीचा अर्धा कप उसळ (कारण उसळीमध्ये प्रथिनांबरोबर कर्बोदकंही भरपुर असतात) आणि फ़रसबी सारखी भाजी, सॅलड असं खाऊ शकते. आणि खात असल्यास हवी तितकी चिकन,अंडी इ. पण रोज रोज मांसाहार करायला आवडलंही पाहिजे आणि त्याचाही थोडा-फ़ार पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी यात भात अजिबात घेतला नाहीये. कारण एक म्हणजे भातात जास्त कार्ब असतात त्यामुळे एका पोळीच्या बदल्यात फ़क्त अर्धा कप शिजलेला भात (ते बाजारातले मोजणीचे कप आणून हे मोजून पाहिलं तर कळेल एक छोटी मूद अर्धा कपाची म्हणावी) हे म्हणजे जवळजवळ उपाशी राहिल्यासारखं होणार. हे सगळं सविस्तर सांगायचं कारण म्हणजे मोजून-मापून खायचं आणि तेही पोटात एक जीव वाढत असताना म्हणजे काय कसरत आहे याची थोडीफ़ार कल्पना यावी म्हणून.

मला फ़ळं खायला फ़ार आवडतात पण फ़ळांमधली साखर पाहता ज्या दिवशी चिकन-बिकन खाऊन पोट फ़ुल्ल असेल त्यादिवशी मधल्या वेळचं खाणं म्हणून एखादं छोट्यात छोटं फ़ळ खायची संधी मी साधून घेई. त्यातही सफ़रचंदासारखी फ़ळं कारण त्यातल्या त्यात त्यांचा अलाउन्स जास्त आहे. नाहीतर बेरी वर्गातली फ़ळं म्हणजे जास्तीत जास्त अर्धा कप वगैरे म्हणजे दाताखाली तरी आली का ते पहावं लागेल. शिवाय आता फ़ळं खातोच आहोत तर एकदम साखर वाढू नये म्हणून सोबतीला चीज किंवा सुकामेवा खायचा म्हणजे मग ते साखर वाढणं थोडं लांबतं.

असो. चीजचा विषय आलाच आहे म्हणून सांगते एक कप दुधात १५ ग्रॅमतरी कार्ब असतात म्हणजे सकाळच्या न्याहारीला एक कप दूध घेतलं तर एक कार्बवाली पावाची स्लाइस आणि त्याला कुठलंही प्रोटीन लावुन जसं पीनट बटर, आल्मंड बटर वगैरे किंवा सरळ अंडी. त्याऐवजी एका चीज स्लाइसमध्ये कार्ब अगदीच नगण्य असतात म्हणजे सरळ एक मस्त चीज-टोस्ट खायचा आणि दूध नंतर स्नॅकला वगैरे टाकायचं असं मी बरेचदा करी. मधल्या वेळातही चीज खा असा सल्ला माझ्या डॉक्टरने मला दिला होता. पण हे नुस्तं चीज खायचं मला जाम जीवावर यायचं शिवाय आता इतकं फ़ॅट खाऊन जेव्हा मधुमेह संपेल तेव्हाच कोलेस्टेरॉलचा राक्षस पुढ्यात येईल ही पण एक भिती. इथे तसं थोडीफ़ार लाईट, फ़ॅट-फ़्री चीज मिळतात त्यातले अनेक प्रकार मग मी प्रत्येक वेळी ट्राय केले. त्यातली काही आवडली, काही शिक्षा म्हणून खाल्ली पण निदान त्याने माझी साखर आटोक्यात राहिली आणि वजन न वाढायचा प्रश्नही निकालात निघाला.

तरीही पोटापेक्षा खूपदा जिभेच्या चोचल्यांनी मात करायचे प्रसंग यायचे आणि तसंही पोटात एक जीव आहे म्हटल्यावर ते होणारच तेव्हा काही वेळी मी चक्क चीट केलंय किंवा मग पाककृती ट्विस्ट केल्यात. म्हणजे पाव-भाजी खायची होती म्हणून मग बटाट्याऐवजी फ़्लॉवर घातला आणि अगदी थोडासा बटाटा माझ्या भाजीमध्ये घालून मग बाकीच्यांसाठी नेहमीप्रमाणे बटाटावाली पावभाजी बनवली. मी मात्र एकच पाव खाल्ला. त्यादिवशी बाजुला सॅलड जरा जास्त घेतलं थोडं चीजही खाल्लं. मग साखरोबा प्रसन्न झाले. पण नेहमीच ही युक्ती खपत नसे. समोसा खायच्या अतीव इच्छेसाठी मी एकदा जेवताना चक्क चपाती/भात असं कुठलंही कार्ब न खाता फ़क्त ग्रील चिकन सॅलडबरोबर खाऊन मग नंतर चारच्या चहाला एक अख्खा समोसा समाधानाने पोटात ढकलला होता. खाण्यासाठी वाट्टेल ते म्हणतात ते यालाच का असं त्यादिवशी मला वाटलं.

चॉकलेटही असंच मोजून-मापून स्नॅक म्हणून थोडं फ़ार पोटात ढकलंलय.मग एकदा चॉकलेटच्या आयलमध्ये बराच वेळ काढून माझ्या कार्ब काउन्टमध्ये बसेल असं डार्कमधलं ८५% डार्क चॉकोलेट मिळालं लिन्टचं. त्यात कार्ब अगदी कमी आणि तब्येतीलाही ते चांगलं. त्यामुळे मग लिन्टचं पाकिट प्रत्येकवेळी माझ्या कार्टमध्ये असे. चिप्सही खाव्याशा वाटत. इथे मिळणार्‍या ब्लु कॉर्न चिप्स एकावेळी दहा वगैरे खाल्या तर चालू शकतात शिवाय त्यांची काही पाकिटं फ़्लॅक्ससीड्स फ़्लेवरची असली तर आणखी चांगलं. सोबतीला ऍव्होकाडो घेई म्हणजे मग पोटभरी होई. आवडीच्या खाण्याची निदान चव मिळावी म्हणून या दिवसात काही प्रकार घरी करणे किंवा दुसर्‍या काही चालण्याजोग्या पळवाटा शोधण्याचंही काम केलं आणि अधेमधे सगळे खाद्यप्रकार थोडेफ़ार का होईना खाल्ले.

कधी कधी फ़ार कंटाळा यायचा, वाटायचं साधं पोळी-भाजी, वरण-भात इतकंही खायला होऊ नये पण मग अशावेळी आपल्यापेक्षा जास्त असाध्य आजार किंवा ज्यांना कायमचा मधुमेह असेल त्यांचं काय असा काहीतरी विचार करुन मनाचं समाधानही करुन घेतलं आहे.शेवटी मानसिक आरोग्य राखणंही खूप महत्त्वाचं आहे. या महिन्यांमध्ये काही अति कटू प्रसंगही आले आणि त्यांचा सामना करताना जितकी मला माझ्या बेटर हाफ़ची मदत झाली तितकीच माझी अवस्था माहित असणार्‍या माझ्या मित्र-मैत्रीणींचीही झाली.नकळत का होईना पण बझवर माझ्याशी गप्पा मारणार्‍यां मैत्रीनेही आधार दिला.

माझे शेवटचे महिने आणि सणासुदीचे दिवस एकत्र आले होते. म्हणजे अगदी नवरात्रापासून ते इथली हॅलोविन (त्यात तर चॉकोलेट, कॅंडीचा कहर असतो) नंतर दिवाळी आणि शेवटी ख्रिसमस..यावेळी जिभेवर नियंत्रण ठेवणे म्हणजे माझ्यासाठी पराकोटीचे झाले होते..दोघांच्याही घरुन आलेल्या फ़राळापैकी बराचसा मी चाखला पण नाही..कारण शेवटी माझ्याहीपेक्षा पोटातल्या जीवाला त्या वाढीव साखरेचा त्रास होऊ नये ही भावना होती आणि त्याच भावनेने जीभेवर मात केली.

आई होणं हे काय असतं हे दुसर्‍यांदा वेगळ्या तर्‍हेने अनुभवलं.मला आठवतं मी अगदी नवरात्रात कोंबडी ओव्हनमध्ये ग्रील केल्याचे फ़ोटो बझवर टाकून बर्‍याच जणांचे बोल खाल्ले होते..पण अर्थातच त्यावेळी हे सत्य मी कुणाला सांगू इच्छित नव्हते की मी यापेक्षा जास्त काही खाऊही शकत नाही आणि नाहीतर उपाशीही राहू शकत नाही.ती प्लेट ज्यांनी नीट पाहिली आहे त्यात फ़क्त कोंबडी आणि सॅलडचं दिसेल..पोळी/भात काही नाही..हे असं सगळं सांगत राहिले तर मला वाटतं ही पोस्ट कधी पूर्णच होणार नाही.

पण या काही महिन्यांत जी वेळ माझ्यावर आली ती कुणावर आल्यास थोडं फ़ार माझ्या अनुभवाने कुणाला फ़ायदा झाला तर बरं म्हणून बरेच दिवस विचार करुन मी हे सगळं लिहितेय. माझा मुलगा आणखी काही दिवसांनी वर्षाचा होईल आणि सध्यातरी सारं सुरळीत आहे. पण जसं आपण आपल्या प्रिय व्यक्तींच्या फ़क्त आठवणींवर जगू शकत नाही तसंच खाण्याच्याही आठवणींवर जगणं कठिण असतं हे या काही महिन्यांत मला कळलं. खूप काही दिव्यातुन गेले नाही पण हा अनुभव बरंच काही शिकवून गेला. यापुढेही खाण्यावरचं प्रेम तसंच राहिल, पण सगळंच थोडं नियंत्रणात आणलं तर मला पुढे होणारा धोका टळू शकतो हेही कळलं. त्यादृष्टीने प्रयत्नही राहतील. काही सवयी अशाच सुटल्या आहेत म्हणजे बिनसाखरेचा चहा कधी प्यायला लागले ते कळलंच नाही. गोड वस्तुंसाठीही पर्याय किंवा कमी प्रमाण, पीठ लावून तळलेल्या वस्तू कमी खाणे किंवा मग प्रथिनं, कोशिंबीरींचा समावेश आता आपसूक झालाय. तसंच जमेल तसे योगासनं, नियमितपणे चालण्यासारखा व्यायाम या काही गोष्टी आहेत ज्यांनी मदतच होते.

हे मूल होता होता मी बरीच बदललेय. खाण्याबद्दलच्या माझ्या संकल्पनांना वेगळा आकार आलाय. अजूनही ब्लॉगवर खाद्य आठवणी येत राहतील पण तरी ते महिना-पंधरा दिवसातून कधीतरी केलेलं चिटिंग असेल. बरेच दिवस "उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म." हे जे काही वाचायचे त्याचा अर्थ अगदी सुस्पष्ट होतोय.एका अगोड प्रवासाचा शेवट गोड करता येईल अशी आशा.



तळटीप: "डायबेटीस अवेअरनेस मंथ"च्या शेवटच्या आठवड्यात हा लेख प्रसिद्ध करताना सहानुभूती मिळवणे हा उद्देश नाही.मला तेव्हाही ती नको होती. हवं होतं फ़क्त मार्गदर्शन. या विषयावर कुणाला जर माझी मदत मिळू शकणार असेल तर नक्की करेन. आपण माझ्या aparna.blogspot@gmail.com या आय डी वर संपर्क साधा.


Tuesday, November 22, 2011

शिस्त

रोज दिवसभरात निदान एक फ़ेरी पाळणाघराकडे असते. कधी मुलांना सोडायला तर कधी परत आणायला. अंतर तसं फ़क्त दोन मैल आहे आणि रस्ता म्हणावा तर रहदारीचा म्हणावा तर शांत.अर्ध्या मैलावर झेरॉक्स कंपनीचा कॅम्पस लागतो त्यामुळे कंपनीच्या वेळाप्रमाणे थोड्या-फ़ार गाड्या असतात. घरातून निघाल्यापासून एकही सिग्नल नाही. फ़क्त एका चौकावर जिथे आम्हाला पाळणाघराकडे जाताना उजवीकडे वळायचं असतं तिथे एक फ़ोर वे स्टॉप साइन. परतीच्या वेळी त्याच स्टॉपवरुन डावीकडचं वळण घेतलं की ३५ च्या लिमिटचा सरळ रस्ता आणि मग मैलभराच्या अंतराने घराचं वळण. हा रस्ता, हा स्टॉप इतका सरावाचा झालाय की मला वाटतं जेव्हा मी ही जागा सोडून दुसरीकडे कुठे जाईन तेव्हा मध्येच हा रस्ता माझ्या स्वप्नात येईल.

मला स्वतःला स्टॉपवर नियमाप्रमाणे चारी चाकं पूर्ण थांबली की मगच निघायची सवय आहे पण इथे या निवांत रस्त्यावर अध्येमध्ये घसरत घसरत थांबल्यासारखं करुन निघणारं कुणीतरी दिसतंच आणि मजा वाटते. तसं जास्तीत जास्त एक मिनिट वाचत असेल पण तरी ते होतंच. त्यापेक्षाही मजा येते ती समोरासमोर येणार्‍या गाड्याची निव्वळ स्टॉपवर पहिला नंबर थांबण्यासाठीची धडपड. तेवढ्यातल्या तेवढ्यात थोडं तरी जास्त जोरात पेडलवर पाय पडतो ते कळतंच. मग आधी तू का मी मध्ये कुणी चुकीच्या नंबराने पहिले निघालं की सहसा कुणी हॉर्न मारत नाही पण त्या क्षणाचं साक्षिदार होण्यात गम्मत आहे. उगाच एकटं गाणी ऐकत चालवतोय त्यात डोक्यात थोडासा विचारांचा किडा सोबत देतो.

आज नेमकं मुख्य रस्त्यावर आल्यावर स्टॉप नजरेत भरला तसंच नजरेत भरली ती डोक्यावर लाल-निळ्या दिव्यांचा मुकुट घेऊन फ़िरणारी पोलीसाची गाडी. शांतपणे थांबून तो मला जायचं होतं तसं डावीकडे वळला. त्याला जसं मी पाहिलं तसंच माझ्या आधी नंतर येणार्‍या गाड्यांनंही दुरुन पाहिलं असणार.

पोलिसाची गाडी गेली; पण इतरवेळी सरपटत पुढे येणार्‍या गाडीवानांना थोड्यावेळासाठी का होईना पण शिस्त लावून गेली. चारी चाकं थांबवून मग निघणारी आज मी एकटीच नव्हते....
 
image courtsey internet

Monday, November 14, 2011

स्पर्श

आज चौदा नोव्हेंबर...बालदिनाच्या निमित्ताने मोठ्या वाचकांसाठी ही एक लघुकथा.कुणाच्याही प्रत्यक्ष आयुष्यात असा प्रसंग घडू नये हीच अपेक्षा.


_______________________________________________________________________
’आता कुठे बारा वर्षांची तर होतेय.इतकी काय घाई आहे तिला मोबाईल घेऊन द्यायची?’

’अगं, पण जग कुठे चाललंय पाहतेस नं? शिवाय आपल्या आय.टी मधल्या नोकर्‍या.किती बिझी असतो आपणही? ही कुठे अडकली, मुंबईत काय झालं तर निदान संपर्कात तर राहता येईल न?’

’अरे पण तिचं वय?’

’वय-बिय काही नाही.बदलते वक्त के साथ बदलो असं लग्नाआधी कोण म्हणायचं?’ हे संभाषण आता आपलं सासुबाईंपासून वेगळा संसार थाटण्याकडे वळणार असं दिसताच शीतलने आवरंतं घेतलं..’बरं
बघूया', असं समीरला म्हणताना तिला एकदम सानियाचं बाळरुप आठवलं.

खरं तर लग्न झाल्या झाल्या दोघांच्या घरच्या सल्ल्याला न जुमानता चांगली पाच वर्षे थांबून मग जेव्हा मूल व्हायचा निर्णय घेतला तेव्हा निर्सगाने आणखी दोन वर्षे त्यांना थांबायला लावलं त्यावेळीच सगळं सोडून घरी बसायचं असं शीतलने ठरवलं होतं.पण जेव्हा तेव्हा आपल्या लॅपटॉपपुढे बसायची सवय म्हणा किंवा आधीच मोठं कर्ज काढून घर घेतल्याचा खर्चाचा बोजा आता एक बाळ घरात आल्यावर आणखी वाढणार म्हणून म्हणा, बाळंतपणाची रजा थोडी थोडी करुन नऊ महिने वाढवून शेवटी सानियाला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला गेलाच.

कामावरचा ’तो’ दिवस शीतलला पाळणाघरात वारंवार केलेल्या फ़ोनखेरीज आणखी काही केल्याचं आठवतही नसेल. हळूहळू जसजसे महिने उलटत गेले तसं शीतलपेक्षा सानियालाच पाळणाघराची सवय झाली. तिथल्या काकी खरंच खूप जीव लावायचा. तरीही घरी परत आल्यावर मात्र आई आई करणार्‍या सानियाशी खेळताना, तिचा अभ्यास घेताना शीतलचा दिवसभराचा शीण कुठे पळून गेला तेच कळायचं नाही.समीरही जमेल तेव्हा लवकर ऑफ़िसातून येऊन माय-लेकींबरोबर वेळ द्यायचा. महिन्यातले इयर एंडिंगचे दिवस सोडले तर इतर दिवशी त्याला ते जमायचंही. एक मनाला लागलेली थोडी टोचणी सोडली तर सगळं काही नियमीतपणे सुरु होतं.

सानियाच्या जन्माआधी टीम-मेंबर म्हणून काम करणार्‍या शीतलच्या ऑफ़िसमधल्या जबाबदा‍र्‍याही आता वाढायला सुरुवात झाली होती. सुरुवातीपासून इतरांना मदत करायचा तिचा गुण हेरुन टीम-लीडचं काम तर तिच्याकडे आलं होतंच. हळूहळू जास्तीत जास्त प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे टास्क्स तिच्याकडे यायला लागले होते. मनातून ती या प्रगतीबद्द्ल सुखावत होती आणि एकीकडे कामाच्या जागचा संध्याकाळचा एक-एक तास वाढत होता.

समीरचंही काही वेगळं विश्व नव्हतं.तोही ऑफ़िशीयली प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळाल्यापासून
 घरी आल्यावरही कुठच्या दुसर्‍या देशातल्या वेळेप्रमाणे कॉन्फ़रन्स कॉल्स, सकाळी लवकर उठून घरुनच प्रेझेंटेशनची तयारी या आणि अशा न संपणार्‍या कारणांमुळे कायम कामाला जुंपला गेलेला असे. त्याला एक काय ती रविवारची सकाळ थोडी-फ़ार मिळायची त्यात अख्खा आठवड्याचं साचलेलं ऐकायचं की राहिलेली झोप पुरी करायची या द्विधा मनस्थितीत समोरच्याने बोललेलं कळायचं तरी का देव जाणे. नुस्तं हम्म, अच्छा, असं का यातले सुचतील ते शब्द टाकून तो मोकळा व्हायचा.

शीतल आणि समीर असे कामात आकंठ बुडल्याने,संध्याकाळी सानियाबरोबर वेळ द्यायचा म्हणून स्वयंपाक-पाणी करणार्‍या रखमाला आता मी येईपर्यंत थांबशील का म्हणून विचारलं गेलं. तिला घरचे पाश नव्हते आणि सानियाही तशी काही उपद्रवी कार्टी नव्हती म्हणून बाईंची अडचण समजून  ती समजुतीने थांबायची. घरात असेपर्यंत जमेल ती कामं उरकत बाईंना आल्या आल्या काही करायला लागू
नये म्हणून हात चालवायची. बाई आपल्याला नोकरांसारखं वागवत नाहीत ही भावना तर होतीच.

पण कुठेतरी काहीतरी कमी जाणवायला लागली होती. आई घरी उशीरा येते हे आतापर्यंत सानियाच्या अंगवळणी पडलं होतं. त्यामुळे शाळेतून  घरी आल्यावर आपला अभ्यास करुन ती सरळ टि.व्ही. नाहीतर गेम्समध्ये रमायला लागली.आतापर्यंत शाळेतला पहिला नंबर तिने सोडला नव्हता म्हणून तिच्या अभ्यास सोडून इतर गोष्टींवर घरातले तिला कुणी आधीपासूनच काही बोलत नसत. आई आली की, ’
सानू  बेटा, चल पटकन जेऊया’, असं म्हणताच ताडकन उठून तिच्याबरोबर जेवायला यायची आणि नेमकं त्याचवेळी आईच्याही नंतर थांबलेल्या कुणा कलिगचा ऑफ़िसमधून  फ़ोन आला की तिचं ते कंटाळवाणं बोलणं ऐकत जेवून  उठून गेलं तरी आईला पत्ताच नसायचा. मग नंतर तर तिने सरळ रखमाला मला खूप भूक लागलीय असं सांगून आधी जेवायला सुरुवात केली. शीतलला वाटलं आपण लेट येतो म्हणून पोर कशाला उपाशी ठेवा. तिने रोज आल्यावर सानू नीट जेवलीय याची चौकशी करायला सुरुवात केली.

समीरला खरं तर आपल्याला अनेक शंका विचारुन माहिती करुन घेणार्‍या लेकीबरोबर रात्री काहीतरी गोड खात बाल्कनीत बसून गप्पा मारायला खूप आवडायचं.पण त्याच्या कामाचं रुटीन पाहून सानियानेच बाल्कनीत बसायचा त्यांचा शिरस्ता मोडून टाकला. ती सरळ आपल्या पांघरुणात शिरुन आवडीचं पुस्तक वाचत बसे. आजकाल या पुस्तकांतील पात्रांशीच तिच्या काल्पनिक गप्पा रंगत. आणि ती तन्मयतेने वाचतेय असं आपल्या मनाचं समाधान करुन समीर पुन्हा आपलं लॅपटॉपमध्ये डोकं घाले. रात्रीची जेवणं होताना आणि जेवणं झाल्यावर या तिघांच्या किलबिलीने इतरवेळी गजबजणारं घर आताशा पिलं उडाली की रिकामी झालेल्या घरट्याप्रमाणे शांत होऊन गेलं. रखमाची ’निघते बाई’ हे अंतिम वाक्य.

असं असलं तरी रात्री झोपताना एकमेकांशी बोलण्याची सवय शीतल आणि समीरमध्ये कायम होती. दोघं एकाच क्षेत्रातली असल्याने आपण खूप बोलू शकतो हे त्यांना वाटे आणि त्यात काही चूक नव्हतं. फ़क्त आपण आजकाल फ़क्त एकमेकांच्या डेड-लाइन्स, ऑफ़िस पॉलिटिक्स, अप्रेजल,टेक्नॉलॉजी याच विषयांवर बोलतो हे मात्र त्यांच्या लक्षात येत नसत. अर्धाएक तास किंवा काहीवेळा त्यापेक्षा कमी वेळ बोलता बोलता एकजण हूं हूं करत झोपला की दुसराही झोपून जाई आणि मग सकाळची तारेवर कसरत करता करता काल आपण काही बोललो होतो याची आठवणही येणार नाही इतक्या चपळाईने दिवसाची कामं त्या दोघांचा कब्जा घेई.गाण्याच्या क्लाससाठी निघून गेलेली सानु दोघांच्या दृष्टीने काहीतरी शिकतेय, आपण तिच्यासाठी म्हणून हा सगळा रामरगाडा चालवतोय. ती पुढे जावी हेच आपल्या मनात आहे म्हणून स्वतःची समजुत मनातल्या मनात कधीतरी काढली जाई इतकंच.

त्यातंच सानियाचा बारावा वाढदिवस आला. नेमका रविवार असल्याने यावेळी तिच्यासाठी सुटी काढली नाही याचा सल नव्हता.

’सानिया, चल पार्टीसाठी चायना गार्डनमध्ये जाऊया. येताना फ़्लोट खाऊया. यावेळी तुझ्यासाठी मस्त ब्रॅंडेड जीन्स घ्यायची अगदी तुझ्या आवडीच्या स्टाइलसकट’, बोलताना खूप एक्साइट झालेल्या समीरला सानियाचा थंड चेहरा पाहून, कागदावर छान दिसलेल्या प्रोजेक्ट प्लानला टिम-मेंबरनी डेड लाइनची तारीख पाहून  दिलेला प्रतिसाद आठवला. आता थोडं टीम स्पिरीट वर आणलं पाहिजे...’गाइज, ऑन अवर लास्ट असाइनमेंट विथ द सेम क्लायंट....’ मनात आलेल्या वाक्याने  तो दचकलाच...बापरे...’ओके बेटा, बरं मग तू सांग. काय करायचं यावेळी..मस्त रविवार पण आहे..बोल.’ ’बाबा, मला सेलफ़ोन हवाय. वर्गात सगळ्यांकडे आहे..’ तिला काही उत्तर द्यायच्या आत शीतलला आपल्याला विचारायला हवं हे लक्षात घेऊन समीर शब्दांची जुळवाजुळव करत बसला. अर्थात अप्रेजलला टीम-मेंबरना हाताळायची सवय झालेल्या समीरला सानियाला पार्टीसाठी पटवणं फ़ार कठीण नव्हतं.टोलवाटोलवी हा प्रोजेक्ट मॅनेजरचा गूण घरच्या प्रोजेक्ट्ससाठी पण कामाला येतो हे त्याला माहितही होतं.

शेवटी पार्टी करुन, फ़्लोट खाऊन परत येताना चौपाटीवर फ़िरुन घरी येईपर्यंत सानिया गाडीत झोपूनही गेली होती. त्यानंतर मग रात्री शीतलबरोबर वरचा संवाद रंगला होता.

खरं म्हणजे आता सेलफ़ोनला वयाची अट आणि आर्थिक अडचण ही दोन्ही कारणं राहिली नाहीत हे शीतललाही कळत होतं पण तरी शाळेपासून लेकीच्या हातात तो यावा असं तिला मनापासून वाटत नव्हतं..पण कसंतरी करुन समीरने तिला पटवलंच...हो म्हणायच्या ऐवजी "प्रोजेक्ट मॅनेजर कुठला" असं ती त्याला म्हणाली तेव्हा तोच जास्त हसला होता. बाकी काही नाही पण अचानक संपर्क साधायला सेलफ़ोन हवा या एकाच कारणावर दोघांचं एकमत झालं होतं.शिवाय तू संध्याकाळी लवकर येत नाहीस त्यावेळी एखादा गमतीशीर मेसेज पाठवून तिचा मूड बनवू शकशील, तुमचं कम्युनिकेशन वाढेल, आई-मुलींमध्ये कसं मैत्रीचं नातं हवं, असली मुलामा देणारी कारणंही समीरने दिली होतीच.

सेलफ़ोन आल्यामुळे सानियाला घरात संध्याकाळी एकटं असतानाचा वेळ आता थोडा बरा जायला लागला.शिवाय आईपण सारखे सारखे मेसेजेस करायची.बाबाही कधीकधी तिचा जुना काढलेला फ़ोटो किंवा एखाद्या पुस्तकातलं छान वाक्य पाठवायचा.आई-बाबांशी पुन्हा एकदा मैत्री वाढत होती.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळेत मैत्रीणींमध्ये उगीच थोडा खाली गेलेला तिचा भाव पुन्हा एकदा जैसे थे वर आला होता.आता कसं सगळ्यांशी टेक्नॉलॉजीने बोलता येऊ लागलं.आधी तसंही घरचा फ़ोन होता पण आता टाइमपास एसेमेस..शुभेच्छा सगळं मोबाइलवर. आणि मधल्या सुट्टीत त्याबद्दलची चर्चा. शाळेत अर्थात फ़ोन वापरायला बंदी होती. पण व्हायब्रेटमोडमध्ये असलं की कुणाला कळतंय.

आताच दिवाळीची सुट्टी संपली होती आणि शाळेच्या स्नेहसंमेलनाची तयारी सुरु झाली होती.बाईंनी सुरेल आवाज असलेल्या सानियाला गायनात निवडलं होतं. त्यासाठी रोज शाळा सुटल्यावर एक तास सराव असे. तीन राउंडमधून एकामागे एक बाद होणारे स्पर्धक पाहून सानियाला थोडं टेंशन आलं होतं. पण तिसर्‍या राउंडला जे तीन विद्यार्थी उरले त्यात सानियाचा नंबर होता. आई-बाबाला ही बातमी तिने 
शाळेतूनच एसेमेस करुन दिली. आई-बाबांचं जवळजवळ लगेच "कॉन्गो सानू" आलं आणि तिला हसू आलं.आता आई-बाबा इथे हवे होते असं तिला वाटलं. पण आज घरी गेल्यावर बोलू असा विचार करुन ती मैत्रीणींच्या गप्पांमध्ये सहभागी झाली. त्या शुक्रवारी नेमकं रिलीजमुळे बाबाला ऑफ़िसमध्येच राहावं लागलं आणि आईलाही एका कलिगला लवकर घरी जायचं होतं म्हणून नेहमीपेक्षा उशीर होणार होता.

आई-बाबा सारखे तिला चिअर-अप करणारे मेसेज पाठवत होते आणि तितकीच सानिया अस्वस्थ होत होती. खरं तर इतकी आनंदाची बातमी असूनही तिला जेवावंसं पण वाटत नव्हतं. रखमाला बेबीचं काहीतरी बिनसलंय कळत होतं पण काय करायचं हे न सुचल्याने ती आपली कामं आवरत होती. कंटाळून सानिया आपल्या रुममध्ये जाऊन पडली आणि शीतल घरात शिरली. ’आज बेबीचं चित्त ठिकाणावर नाही’ हे रखमाचं वाक्य तिच्या डोक्यात शिरलं पण आठवडाभरच्या कामाच्या कटकटीने दमलेल्या तिला हा विषय सुरु करायचा नव्हता. शिवाय आज समीरही येणार नव्हता. सानियाच्या दरवाज्याचं दार थोडं ढकलुन पाहिलं तर ती बिछान्यावर झोपलेली दिसली म्हणून तिला उगाच उठवायलाही तिला जीवावर आलं. गाण्याच्या क्लाससाठी सकाळी उठायचं असतं रोज... झोपूदे...असं मनातल्या मनात म्हणून तिनं आपलं पान घेतलं. चार घास घशाखाली गेल्यावर झोपेने तिचाही ताबा घेतला.

समीरचा शनिवारही ऑफ़िसमध्ये जाणार होता म्हणून सानियाला तिचे शनिवारचे सगळे क्लासेस इ.ला न्यायची जबाबदारी शीतलवरच होती. त्या सगळ्या गडबडीत गाण्याच्या स्पर्धेचा विषय राहूनच गेला. रविवारी सकाळी समीर आल्यानंतर मग खास मटणाचा बेत आणि मग लगेच येणार्‍या सोमवारची तयारी करणार्‍या आपल्या आई-बाबांकडे पाहुन त्यांच्याशी काही बोलायचा सानियाचा मूड गेला.पुढच्या शुक्रवारी संध्याकाळच्या कार्यक्रमात तिचं गाणं होतं. हा आठवडा तयारीसाठीचा शेवटचा आठवडा होता.

खरं तर गाणं हा सानियाचा प्राण होता.गाणं आवडतं म्हणून कारेकरबाईंच्या सकाळच्या बॅचला जायचा शिरस्ता तिने आजतागायत कधीच मोडला नव्हता. बाईंबरोबर "सा" लावला की कसं प्रसन्न वाटे. वेगवगळे राग समजावून सांगायची त्यांची हातोटी तिला फ़ार आवडे. त्यांनी शिकवलेल्या सुरांचा पगडा इतका जबरदस्त असे की संध्याकाळी पुन्हा घरी रियाजाला बस म्हणून सांगायला कुणी नसे तरी तिची ती तानपुरा लावुन बसे आणि सकाळची उजळणी करी.

हा आठवडा मात्र ती सकाळी घराबाहेर पडे पण बाईंकडे जायच्या ऐवजी एका बागेत जाऊन नुस्ती बसुन राही आणि आई-बाबा कामावर जायच्या वेळेच्या हिशेबाने ते गेले की घरी परते. संध्याकाळी सरावासाठी पण ती थांबत नसे. बाईंनी याबद्दल विचारलं तर माझ्या गाण्याच्या बाई माझी स्पेशल प्रॅक्टिस घेताहेत म्हणुन चक्क थाप मारली होती.

"hey how is practice " शेवटी गुरुवारी आईचा एसेमेस आला तेव्हा निदान तिला हे माहित आहे असं वाटुन सानियाला थोडं बरं वाटलं. बाबाने तर अख्खा आठवड्यात तिचं गाणं या विषयावर चकार शब्द काढला नव्हता.

"ya ok" बसं आईला इतकंच रिप्लाय करुन सानिया मात्र सेलवर चक्क एक गेम खेळत बसली.

शेवटी शुक्रवार उजाडला. आज संध्याकाळी आई-बाबा आपला कार्यक्रम पाहायला य़ेणार नाहीत याची तिला जवळजवळ खात्रीच होती.गायचाही तिचा बिल्कुल मूड नव्हता.

"Sanu, I am into middle of a work problem" असा आईचा दुपारी आलेला संदेश पाहून सानियाचा उरलासुरला उत्साहही गळाला होता.

पूर्ण आठवडा मूड ठीक नसलेल्या आपल्या मैत्रीणीचं आज काहीतरी जास्त बिनसलंय हे तिच्याबरोबर शाळेत कायम असणार्‍या अर्चनानं ताडलं होतं.पण तरी तिला सरळ विचारुन तिला वाईट वाटावं असंही तिला वाटत नव्हतं. शिवाय वाढदिवसाच्या गिफ़्टचा विषय निघाला होता तेव्हा पटकन सानिया म्हणाली होती तेही तिच्या लक्षात होतं..."मोबाइल न घेऊन सांगतात कुणाला? त्यांना माझ्याशी बोलायला वेळ कुठे आहे?" हे असं याआधी कधी ती आपल्या आई-बाबांबद्द्ल बोलली नव्हती. त्यामुळे उगाच जखमेवर मीठ नको म्हणून ती दुसर्‍याच कुठल्या विषयावर आणि कार्यक्रमांबद्दल तिच्याबरोबर बोलुन तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत होती.

सानियाला मात्र आजुबाजुला बाकीचे पालक पाहुन कसंतरी व्हायला लागलं. शेवटी तिने आईला सरळ बाथरुममध्ये जाऊन फ़ोन लावला तर नुसती रिंग वाजत राहिली. सानियाचे डोळे पाण्याने भरले. तरी तिने घाईघाईत "aai, where are you?" असा मेसेजही करून ठेवला. कॉल आणि मेसेज दोन्हींपैकी एकाचं तरी उत्तर येईल म्हणून थोडावेळ बाथरुममध्येच ती थांबली.

अखेर पाच-दहा मिनिटांनी अर्चनाच्या हाकेने तिला फ़ोन बॅगमध्ये ठेऊन बाहेर यावंच लागलं. गाण्यासाठी निवडलेल्या तीन स्पर्धकांनी स्टेजमागे यावे असा इशारा माइकवरुन देण्यात आला होता. अर्चनाला सानियाचा पडलेला चेहरा पाहवेना. काय करायचं तेही कळत नव्हतं.

आता निर्धाराने स्टेजमागे जायचंच नाही असा निर्णय घेऊन सानिया गर्दीत जायला लागली. इतका वेळ आपल्या बरोबर असलेली सानिया कुठे दिसत नाही म्हणून अर्चनाने थोडंफ़ार शोधलं पण ती दिसतच नाही हे पाहून शेवटचा पर्याय म्हणून गाण्याच्या बाईंनाच सांगायला ती सरळ शिक्षक उभे होते तिथं गेली. बाईंना खरं म्हणजे जास्त काही सांगावं लागलंच नाही. सानियाचा मूड जसा तिच्या प्रिय मैत्रीणीने ओळखला होता तसंच आपल्या लाडक्या विद्यार्थीनीचं काय चाललंय हे बाईंच्याही नजरेत आलं होतं. म्हणून जास्त चर्चा न करता त्यांनी हॉलमध्ये सानियाला शोधलंच. "चल, मी तिला समजावते", असं म्हणून बाईंनी सानियाला शोधून स्टेजमागे नेलंही.

बाईंबरोबर खोटं बोलायची ही पहिलीच वेळ. सानियाला तर रडूच कोसळलं. बाईही कावर्‍या-बावर्‍या झाल्या.तिला एका खुर्चीत बसवून कुणाला तरी पाणी आणायला त्यांनी पाठवलं आणि शब्दांची जुळवाजुळव करु लागल्या.सानियाचं इतके दिवसाचं साचलेपण तिच्या नाका-डोळ्यावाटे सतत वाहू लागलं. नाकाचा शेंडा लाल, कानाच्या पाळ्या लाल, आणि सारखी मुसमुसणार्‍या तिला बाईंना पाहावत नव्हतं. इवल्याशा वयात किती हा कोंडमारा असं त्यांच्या मनात येतंय तोच सानियाची आई शीतल अर्चनाबरोबर धावत धावत तिथे आली.

आईला बघून सानिया आईकडे झेपावली.तिचे पटापटा मुके घेत आईच्याही डोळ्यांना धारा लागल्या. तिला घट्ट जवळ घेत आजूबाजूच्यांची पर्वा न करता शीतलने चक्क सानियाची काही न विचारता माफ़ी मागितली. बाईं सानियाला शोधायला गेल्या तेव्हा अर्चनाने सानियाच्या आईला पुन्हा फ़ोन लावला होता आणि परिस्थितीची कल्पना दिली होती.

'पिलू, आईने तुझ्याकडे किती दिवस पाहिलंच नाही नं? इतके दिवस फ़क्त एसेमेसवरुनच तुझी खबरबात घेत राहिले आणि तुला प्रत्यक्ष जवळ घ्यायला मात्र मला वेळच मिळाला नाही नं? एकदाही घरी तुझं गाणं गाऊन घेतलं नाही...इतकं छान स्पर्धेत गाणारं माझं पिलू पण माझ्यासाठी मात्र मागच्या बाकावर उभं करुन ठेवलेल्या मुलासारखं मी तुला शिक्षा दिली...माफ़ कर गं मला राणी प्लीज...."

आईला अचानक पाहून  आणि त्याहीपेक्षा गेले कित्येक दिवस हरवलेला तिचा स्पर्श मिळताच सर्व काही मिळाल्यासारखे वाटणार्‍या सानियाला स्पर्धेआधीच पदक जिंकल्याचा आनंद झाला होता.अजूनही तिचे डोळे भरुन येत होते पण ते आपल्या आईला कन्फ़ेस करताना पाहून.

या सर्व ताणाताणीत या स्पर्धेत जरी तिची चुरशी झाली नाही तरी यापुढच्या प्रत्येक वाटचालीत तिची आई तिच्याबरोबर प्रत्यक्ष असणार होती हे समाधान खूप होतं आणि अति कामाने यंत्र झालेल्या शीतल आणि समीरसाठी मात्र नियतीने काही कठोर घडण्याच्या आत घेतलेल्या छोट्या परीक्षेतच शंभर टक्क्यांनी उत्तीर्ण व्हायचं होतं....एका छोट्या यंत्रापेक्षा स्पर्शाची ताकत त्यांना या प्रसंगातून पुरेपूर
कळली होती.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये आई आणि टीन-एज मुली याबद्दल एक लेख वाचला होता. त्यात ज्यांचे आईबरोबर प्रत्यक्ष संपर्क आहेत आणि ज्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरायचं प्रमाण जास्त आहे या दोन्ही गटांमधलं परीक्षांमधलं यश याबद्दलचे आकडे दिले होते. त्यातली तफ़ावत पाहून त्यातल्या मुद्द्यांच्या आधारे हा विषय कथारुपाने मांडायचा हा एक प्रयत्न...दिवाळी अंकामधल्या प्रतिक्रियांनी खूप छान वाटतंय. ब्लॉग वाचकांनाही ही कथा आवडेल अशी आशा आहे.....



पूर्वप्रसिद्धी - मोगरा फ़ुलला दिवाळी अंक २०११

Saturday, November 5, 2011

एक ओला दिवस

आठवडाभराच्या पावसाने खरं म्हणजे पाऊस या शब्दाचाच कंटाळा येतोय. पण तरी शनिवारच्या सकाळी रात्रभर बरसून दमलेला पाऊस थांबतो आणि हवा मस्त कुंद होते. पाऊस नसतो पण तरी दिवस कालच्या पावसामुळे ओलाच वाटतो. अशावेळी बाहेर छोटा वॉक करायला मला फ़ार आवडतं. थोडा थंड पण तरी फ़ार शहारणार नाही असा वारा वाहात असतो आणि उजवीकडून खाली जाणार्‍या वळणावरुन तो केसांना मागे टाकत पुढे जात असतो. हा वारा क्षणार्धात मला बोरीवलीच्या नॅशनल पार्कच्या गेटशी पोहोचवतो.

आठवडाभर सकाळी उठायचा कंटाळा केला तरी रविवारी सकाळी साडे-सातला गेटवरची हाळी आली की सहालाच जाग येई आणि खिडकीतून पाहिलं की रात्री झालेल्या पावसाच्या आठवणींनी उगवलेली सकाळ दिसे.ही सकाळ माझ्यासाठी तेव्हा खूप खास असे.ज्यांच्याबरोबर मी जंगल वाचायला शिकले, पक्षी ओळखायला शिकले त्यांना माझ्यासाठी थांबायला लागु नये म्हणून मी नेहमी वेळेच्या आधीच पोहोचे. त्यावेळी रेग्युलरली इरेग्युलर असणारी मंडळी आमच्यातही होतीच. पण तरी एकदा गेटवर पोहोचलं की थांबायला लागलं तरी चाले मला.

आता थोड्याच वेळात एकदा का आत गेलो की सिलोंडा किंवा कान्हेरी कुठेही जायचं ठरलं तरी आपणासाठी काही तरी खास असणार आहे याची जाणीव बहुदा माझा पेंशंस वाढवायला मदत करत असावी.

असे किती शनिवार किंवा रविवार याआधी आले होते जेव्हा गेटवर भेटून मग आत दिशा न ठरवता आम्ही भटकलो होतो.त्यातही पावसाळ्यात तर आधी पाहिलेल्या जागा हिरवाई वाढल्यामुळे वेगळ्या वाटायच्या. एकदा का डावीकडच्या नदीतली डॅबचिक, मूर हेन, खंड्या, बगळे ही यादी संपली की कधी कधी चिटपाखरुही दिसायचं नाही.पण शोधायचं ते वेड काही कमी होत नव्हतं. पुढच्या वेळी जास्त प्रयत्न करुयात असं वाटायचं. कधी अचानक एखादी मिक्स हंटिंग पार्टी दिसे आणि मटका लागल्याचा आनंद होई. मग ग्रुपमध्ये असणारा एक्सपर्ट सॅकचे बंद जास्त टाईट करत माझ्यासारख्या नवख्यांना साग्रसंगीत माहिती पुरवी. माहितीचा हा खजिना असाच आपल्यासमोर यावा असं वाटण्याचे ते दिवस.

पावसामुळे आलेला थंडावा आणि बाजुला वाहणार्‍या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज हे खूप मायावी आहे. अशा वातावरणात जो फ़िरला आहे त्याला माझं म्हणणं नक्की पटेल. आपण त्या तंद्रीत नक्की किती चाललो हे पायांनाही जाणवत नाही. दमणूक म्हणजे काय रे भाऊ हे पार घरी पोहोचल्याशिवाय कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या आठवणींनी केलेला कब्जा वर्षानुवर्षांसाठी तसाच राहतो.

अगदी आजचा ओला दिवस मिळाला आणि मी चालायला सुरुवात केली तेव्हा तोच वारा तसाच वाहातोय आणि जणु काही मी नॅशनल पार्कच्या गेटवरुन त्या कुंद वातावरणात चालायला सुरुवात करते. मनात हाच विचार की आज काय दिसणार बरं? मी चालतेय यांत्रिकपणे आणि ते वळण, ती उतरण संपल्यासंपल्या जणु काही माझ्यासाठीच केशरी शालु नेसलेला एक मेपल माझ्यासमोर येतो आणि तंद्री भंग पावते. भानावर यायलाही वेळच लागतो कारण मन पूर्ण मागे अडकलं असतं.

अरेच्च्या,फ़ॉल सुरु झाला नाही? मागच्या वर्षी नाही म्हटलं तरी बाळ पाउलांमुळे या साजशृंगाराकडे अम्मळ लक्ष गेलंच नव्हतं पण यावेळी मात्र इथे सुरु झालेली रंगपंचमी लक्ष वेधुन घेतेय. जायला हवं एकदा सिनिक ड्राइव्हला. कसे असतील बरं नॉर्थ-वेस्टमधले रंग?? आजुबाजुला तर उधळण भराला आलीय. कुठे पूर्ण पिवळा बहर तर कुठे लालम लाल पण जास्त मोहवुन घेतं ते आत्ताच रंगायला सुरु केलेले शेंदरी मेपल.


सृष्टीने हळदीकुंकवाची शिंपडण करावी तसे हे हिरव्यात उगवलेले थोडे फ़िकट शेंदरी रंगातले मेपल. अगदी एकांडा उभा असला तरी लक्ष वेधुन घेतो आणि अख्खी रांग असली तर पाहायलाच नको.
सध्या नेहमी ये-जा होते त्या जवळजवळ सगळ्याच रस्त्यावर रंगांची मस्त उधळण सुरु झालीय.काही ठिकाणी नव्या वस्त्या करताना बहुदा एकाच वेळी अशी झाडं लावली जातात त्यामुळे ती सारी एकाच वेळी रंगात येतात..तिथे जणु काही सृष्टी साजशृंगार करुन सजणाची वाट पाहात असते आणि पाऊसही तिला भेटायला आतुरतेने येतो. आता हळुहळु जास्त वेळ अंधार असण्याचे दिवस येताहेत पण त्याआधी रंगांची मजा घ्यायचे हे दिवस. पावसाने हैराण केलं तरी जमेच्या खात्यात रंगांकडे पाहिलं की मस्त वाटतं.

वारा मला नेऊ पाहात होता माझ्या नॅशनल पार्कात पण हे सृष्टीचे रंग मला नादात राहुनही भानावर यायला मदत करताहेत.कधीतरी वर्तमानातही जगायला हवं नाही या ओल्या दिवसाच्या निमित्ताने.......:)