सप्टेंबर २००६ मधला एक विकांत....नुकतंच घर घेतलं होतं आणि माझ्या मैत्रीण कम्पुमधल्या आम्ही चौघी एकाच देशात होतो..त्यातली एक तर फक्त तीन महिन्यासाठी होती...दुसरी तळ्यात मळ्यात आणि बाकी आम्ही दोघी तशा थोड्या आधीपासून अमेरिकेत होतोच.......मध्ये २००३ पासून एकमेकींचा संपर्क फक्त मेल आणि कधी तरी फोनवर होता...त्यातल्या एकीच लग्न झालं होतं पण अजून तिचा नवरा प्रत्यक्ष भेटला नव्हतं...त्यातल्या त्यात मी फिली, एक डीसी आणि दुसऱ्या दोघी नवीन योर्कात असल्यामुळे मी मध्यस्थी म्हणून एक विकांत भेटूया असं ठरलं ...
कुणाचे ५० % ,कुणाचे आणखी किती करता सगळ्या १००% वर आल्या आणि त्या सप्टेंबरमध्ये भेटलो...एकच रात्र होती...त्यात जीवाची फिली करून रात्री दमून आल्यावर पण त्या वर उल्लेख केलेल्या मैत्रिणीच्या नवऱ्याला जाम उत्साह होता म्हणून त्यानेच केलेल्या कॉफीचे कप घेऊन मस्त बैठक मांडून गप्पाची मैफल रंगवली...
लग्न झाल्यानंतरचे दिवस, त्यातले प्रत्येकाचे प्रश्न, एक ना दोन किती तरी विषय...आम्हा सर्वात तो नवखा आहे असं अजिबात वाटलं नाही...आणि मग कुठली मराठी मंडळी जमली की विषय गाण्याकडे वळतोच तसं आमचही झालं..
आपलीच लोक म्हटल्यावर प्रत्येकानेच सूर लावले...त्या दिवशी खूप सुंदर सुंदर मराठी आणि फक्त मराठीच गाणी आम्ही आठवली ...जमतील ती गायली आणि मग अचानक त्याने मला बाबुजींच त्याचं सर्वात आवडतं गाणं घेऊया का म्हणून विचारलं...ते गीत होत "सखी मंद झाल्या तारका....."
हे गाणं माहित तर होतच, पण त्या दिवशी गाताना त्याची सगळी कडवी माझ्या पूर्ण लक्षात आहेत असं अचानक मलाच साक्षात्कार झाला.त्याला पण आश्चर्य वाटलं...त्या दिवशी फक्त सुरुवात केली की लगेच शब्द पुढे यायचे...खरच ती रात्र खूप वेगळी होती...ती दादही...त्यासाठी आपला आवाज उच्च कोटीचा असायला हवा असं काही नाही...बस ती एक मेहफिल असते जी जमून जाते...
त्या निमित्ताने एखादं गाणं आपल्याला नव्याने भेटतं तसंच झालं..यात खूप काही आलापी नाहीत पण तरी "आता तरी येशील का?" हा प्रश्न खूप व्याकुळपणे विचारला आहे असं वाटतं...पहिल्या तीन कडव्यात थोडी पार्श्वभूमी तयार करून मग शेवटच्या कडव्याला "बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी...पण सांग तू येशील का?" हे सूर चढतात तेव्हा त्या सखीचा हेवाच वाटतो....
खरं म्हणजे हेच काय बाबूजींच्या कुठल्याही गाण्याबद्दल काही बोलावे असं निदान माझं तरी काही कर्तृत्व नाही पण तरी या गाण्याची आठवण लिहावीशी वाटते ती त्या दिवशी सूर जुळलेल्या आम्हांसाठी..
काय योगायोग आहे माहित नाही...त्या दिवशी आय पॉडमधल्या मराठी फोल्डरमध्ये randomly ऐकताना नेमक हेच गाणं लागलं आणि चटकन तीच रात्र आठवली...ते ऐकताना मनात आलं या सप्टेंबरमध्ये पाच वर्ष होतील....
आता पाहिलं तर आम्ही पुन्हा एकदा वेगवेगळ्या देशात आहोत...त्या नंतर ती आणि तिचा नवरा आम्ही फक्त एकदा भेटलो..पुन्हा कधीच न भेटण्यासाठी...एक नातं न बोलता विरून गेलं...बाकीच्या मैत्रिणीही पुन्हा एकदा मेलामेलीत आल्या...माहित आहे मला आम्ही पुन्हा कधीच एकत्र भेटणार नाही....त्याला कारणंही वेगवेगळी असणार आहेत...पण नसलो भेटणार तरी एक गाणं आहे माझ्याकडे जे मला त्या नितांत सुंदर विकांताची, आणि एकत्र गायलेल्या गाण्याची सुंदर आठवण नेहमीच सोबतीला देणार आहे.......
मस्त !!!
ReplyDeleteकिती काय देतात न ही गाणी ...
अशी नसानसात भिनलेली... आठवणीत भिजलेली...क्षण सुरेल अन सुगंधित करणारी...मस्त सोबत... !!!
अन मस्त पोस्ट सुद्धा !!!
मस्तच !
ReplyDeleteआमच्याकडेही जेव्हा घरी गेट-टु असते तेव्हा कुणीतरी तबला, कुणीतरी पेटी घेऊन; आणि असंख्य उत्स्फूर्त गायक हजर असतात :)
आत्तापर्यंत एकही मैफल अशी नाही ज्यात हे गाणे आले नाही..
"..बस ती एक मेहफिल असते जी जमून जाते..." :)
सुंदर सुंदर सुंदर पोस्ट !! गाणं तर आवडतंच.. प्रश्नच नाही.. पण पोस्टही खूप प्रामाणिक, मनस्वी, हुरहूर लावणारी !!
ReplyDeleteसखी, ब्लॉगवर स्वागत...खरय गाणी आपल्याला किती काय देतात...या ब्लॉगवर आणखी अशा काही गाण्याच्या आठवणी आहेत...वेळ मिळाला की नक्की वाच ....फिर मिलेंगे...
ReplyDeleteशार्दुल, ब्लॉग वर स्वागत..मेहफिल जमली की आठवणीत जाते खरय न....
ReplyDeleteहेरंब बरोबर ओळखलस...हुरहुरच .....गाणं तर अर्थात नेहमीच आवडतं...
ReplyDeleteसुंदर ग अपर्णा...दिवसाची सुंदर सुरुवात...पण काय माहीत का घशात आवंढा आणि डोळ्यात पाणीच येतंय....मला रडायला काही कारणच लागत नाही बाबा !!!!!!! :'(
ReplyDeleteअपर्णा! खरंच अशा मेहफिलींची याद आयुष्यभर ताजीच असते नाही? गाणं यायलाच पाहिजे असा काहीही उपचार नसल्यामुळे ज्याम मजा येते असं वाटतं कधीकधी.सखी मंद झाल्या तारकावर छान लिहिलं आहेस! तुम्ही सगळ्या मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र भेटाव्यात ही सदिच्छा! शुभेच्छा! :)
ReplyDeleteअपर्णा किती ग सुंदर लिहिले आहेस! :) खरच काही आठवणी,काही गाणी लक्षात राहिलेल्या गप्पा,काही आवाज,आणि जमून गेलेल्या अश्या ह्या मैफिली!
ReplyDeleteफिरून परत जरी आल्या नाहीत कधी,तरी असा काही ठसा उमटून जातो मनावर कि आनंदाच्या ह्या क्षणांना कधीच हरवता येत नाही....सुरेख लेख!तुझा आवाज ऐकायची इच्छा आहे माझी....आणि तू गातेस हे नवीन कळले मस्तच.....भरवू कि एक मैफिल आपण पण! :)
काय ग अनघा...आता थांबल का रडू?? पुढच्या वेळी एखादं गमतीच गाणं आठवायला हवं. पण काय होतं माहिते, आठवणीत गेलेल्या गाण्यात कुठेतरी एक हळवेपण कायम सामावलेलं असतं का ग??
ReplyDeleteविनायकजी शुभेच्छाबद्दल खास आभार आणि प्रतिक्रियेबद्दलही...आपल्या मेहफिलीत गाणं यायला हव अस कुठे आहे.. खरय...:)
ReplyDeleteश्रिया सुरेल लेख हा शब्द मला जरा वर घेऊन गेलाय बघ...:) आणि गाण्याच म्हणशील तर कधी भेटणार आहेस सांग..सगळी एकत्र गाऊया...
ReplyDelete'सखी मन्द झाल्या तारका' पहिले 'मासिक गाणे' सदरात राम फाटकांनी भीमसेनजींकडून घेतलं होतं. ते पुणे आकाशवाणीज़वळ होतं, पण त्याची तबकडी बनली नाही. आता ते उपलब्ध आहे.
ReplyDeleteभीमसेन: http://www.youtube.com/watch?v=F2gldTrqThk
त्याची तबकडी सुधीर फडक्यांच्या आवाज़ात का निघाली, याचा फार खुलासा फाटकांच्या आत्मचरित्रात नाही. ते गाताना खर्जात भीमसेनजी किंचित शिथिल वा थकल्यासारखे वाटतात, पण तरी भीमसेनी ताकद या गाण्यात दिसतेच. इथे भीमसेन विरुद्ध बाबूजी तुलना करायचा हेतू नाही. दोघेही श्रेष्ठ कलाकार होतेच. पण बाबूजींनी या गाण्यात ज़रा जास्तच भाव ओतायचा प्रयत्न केला आहे, आणि म्हणून भीमसेनजींच्या आवाज़ात हे गाणं जास्त बहारदार आहे. बाबूजींची भाव व्यक्त करायची खास स्वत:ची पद्धत होती. ती ९०% वेळा यशस्वी होते. इथेही भीमसेनी प्रत नसती तर गाण्याबद्दल चांगलंच वाटलं असतं, आणि ते बाबूजींच्या आवाज़ात ऐकायला आवडतंही. पण त्याची भीमसेनी आवृत्ती ऐकल्यानन्तर बाबूजींच्या तबकडीतली मजा माझ्या, आणि इतर अनेकांच्याही, नज़रेत नक्कीच कमी होते.
'जेवताना एक घास कमी खा' सांगतात, त्याप्रमाणे गाण्यात भाव ओतताना थोडं हातचं राखण्याची किमया इथे भीमेसनजींना छान साधली आहे. या युक्तीचा परमोत्कर्ष दिसतो तो लताच्या गाण्यात. आज़ २८-सप्टेम्बर, म्हणजे तिचा जन्मदिवस.
प्रतिक्रियेबद्दल आभारी. पंडितजी आणि बाबूजी दोघ दिग्गज कलावंत आणि दोघाबद्दल तितकाच आदर आहे पण या गाण्याबद्दल बोलायचं तर मला स्वतःला मात्र बाबुजीच गायलेलं जास्त आवडल आहे..
ReplyDeleteआवराच !!!
ReplyDelete'सखी मन्द झाल्या तारका' या गाण्याची लय सप्तमात्रिक आहे, आणि त्या मात्रा (२-२-१-२) अशा पडतात. म्हणून 'सखि' (सखि-मं-द-झा) असं लिहायला हवं. संस्कृतात 'सखी'चं संबोधन एकवचन 'सखि' होत असलं, तरी मराठीत 'मैथिलि', 'नदि', 'नगरि' हे संबोधन वापरायची रीत नाही. मराठी कवी हवं ते स्वातंत्र्य घेण्याच्या नांवाखाली नको ते स्वातंत्र्य बेधडक घेतात.
ReplyDeletehttp://www.aathavanitli-gani.com/GenPages/Song.asp?Id=51020516554 - इथे 'सखि' अशी बरोबर नोन्द आहे.
अपर्णा ,गाण खुपच सुंदर आहे आणि आवडते ही तशीच पोस्ट झालीये ....तसही तुझ हे गाणी आणि आठवणी वाल सदर बेस्टच असते....
ReplyDelete>>>त्यासाठी आपला आवाज उच्च कोटीचा असायला हवा अस काही नाही ..बस ती एक मेहफिल जमून जाते ... पूर्ण सहमत
अपर्णा ,गाण खुपच सुंदर आहे आणि आवडते ही तशीच पोस्ट झालीये ....तसही तुझ हे गाणी आणि आठवणी वाल सदर बेस्टच असते....
ReplyDelete>>>त्यासाठी आपला आवाज उच्च कोटीचा असायला हवा अस काही नाही ..बस ती एक मेहफिल जमून जाते ... पूर्ण सहमत
देवेन गाण्यावर लहानपणापासून पोसलेय म्हटलस तरी चालेल म्हणून बहुदा हे सदर चांगलं होत असावं....:) तू बाबुजीची पोस्ट लिहिली होतीस त्याची आठवण झाली अर्थात तितका माझा अभ्यास नाही...आपण फक्त कानसेन...
ReplyDelete