Tuesday, June 7, 2011

गाणी आणि आठवणी ९ - रिमझिम रिमझिम...रुमझूम रूमझूम

नवीन गाणी रेडिओवर ऐकायची आणि चित्रहारमध्ये पाहायची..मग आवडली की स्वतःच गुणगुणायला शिकायचं..केबलवाल्याची (आणि त्या रात्री जागरणासाठी घरच्यांची) मर्जी झाली की मग पुसटसा चित्रपट पाहिला तर पाहिला...'१९४२ ए लव्ह स्टोरी' मी पाहिला असावा पण नीट आठवत नाही (आता कुठला चित्रपट मला नीट आठवतो या विषयावर पुना कवातरी)पण गाणी...अहाहा...पंचम पुन्हा एकदा बहरणार अशी आशा असलेली सगळीच एकापेक्षा एक भारी गाणी...

आता इथे डकवलाय तो फ़ोटी त्यादिवशी उन्नतीच्या फ़ेबुला पाहिला आणि एकदम वरळी सी-फ़ेसलाच जाऊन पोहोचले...

आमची इंजिनियरिंगची सुट्टी आणि पावसाळ्याची सुरुवात अशा कॉम्बोमधल्या दिवसांत माझ्या मैत्रिणीने (माझं गुणगुणणं असह्य होऊन बहुधा..:)) ही कॅसेट मला दिली होती..तेव्हा दादाने नुकताच एक वॉकमन मला घरी गाणी ऐकायला घेतला होता...त्यात सारखं लावून ऐकायचे...

त्या पावसाळ्यात मी त्याच मैत्रिणीच्या घरी दादरला चिक्कारवेळा राहिलेय..मग आधी तिच्या काकीच्या स्कुटीवरुन आणि काही दिवसांनी तिच्या बाबांनी तिला घेतलेल्या एम-एटीवरुन भगुभईवरुन दादरकडे सुसाट सुटलेलो आम्ही..मध्ये बांद्रयाला सुरेश वाडकरचं घर लागायचं तिथे तो दिसतो का म्हणून तिला थांबायला सांगायचे ते दिवस....(आता एकेरी बोलते कारण कॉलेजमध्ये आवडीचे कलाकार तो,ती च्या भाषेतच उल्लेखले जायचे) पार्कात थांबता यायचं नाही पण तरी जाता जाता एखादा जिमखान्याचा वडा टाकायला हरकत नसायचे ते दिवस...

पावसांत भिजून घरी गेलो की त्यांच्याकडे कामासाठी तिच्या लहानपणापासुन असणार्‍या बाईंना मस्का न मारता मिळालेला गरम चहा आणि त्याबरोबर काही...नाहीतर त्यांच्याकडे दुपारच्या जेवणावर होणारा एक हमखास पदार्थ म्हणजे कोथिंबिरीचा भगरा (कोथिंबिरीत बेसन घालून त्या करायच्या) आणि संध्याकाळी तिच्या आजीकडे सामिष जेवण...बटर चिकन करणारी आजी मिळाली म्हणून मी तिचा हेवा करायचे...:)

राहायचा बेत असेल त्या दुपारी हमखास वरळी सी-फ़ेसला जाणं व्हायचं.मी स्वतः एम-एटी चालवायला तिथेच शिकले...तिनंच शिकवलं....माझं लर्निंग लायसंस नसताना...मामा लोकांना कधीही आमचा संशय आला नाही..मग घरी आलो की पुन्हा बाहेर पाऊस आणि आत 'रिमझिम रिमझिम' ऐकत बाहेर पाऊस पडताना पाहायचे ते दिवस...तिच्या घरचा मुक्काम संपला की कधीकधी तिला पुन्हा माझ्या घरी राहायला (किंवा सोडायला) घेऊन जायचे...पण एकटं परत जायची वेळ आली की ट्रेनमध्ये गर्दीतही फ़ार एकटं वाटायचे...मग परत घरी पोहोचलं की पुन्हा बाहेरचा पाऊस बघताना "आर डी आता बघ कसा वर येतो" म्हणणारा दादा आणि तीच मैत्रीणीने दिलेली कॅसेट....

आताही गेले काही महिने सतत पाऊस पाहातेय..पण तो 'बादल की चादरे ओढे है वादिया' फ़िल इतके दिवस येत नव्हता तो या एका फ़ोटोने आला त्याबद्दलची ही छोटी आठवण....



फ़ोटो...मायाजालावरु साभार

17 comments:

  1. chaan. ata ithe puNyat puN masta paus suru zalay. tee cassette mazee atyanta avaDeechee...:_) aNe emala vaTata RD chee shevaTacheech , tyatalach RooTh na jana maza favorite ahe aNee "yaad karoge..." valee Ol eikalee kee tenva taree RD miss vayacha . .. ashach parallel aThaVanee mazya puNyat deccan gymkhana and around chya ahet, mee ajeekade rahayache aNee maitreen gharee yayachee . attasudhdha paus pahatana somehow tenva kay maja kelee hotee he ka aThavata ? ataahee kahee kamee maja nasatana.. koN jaNe.ata mulgee gharee bhijun alee (raincoat ahe ka? ya prashNach utaar "ahe" that does not mean she will wear it!:-)) kee tila aNee tichya maitreeneela khoTach oraDatana bahutek mala maze carefree divas aThavat asavet. ..

    ReplyDelete
  2. सुंदर लिहिलंयस.. रमून गेलीस अगदी आठवणीत.

    माझी १९४२ लव्ह स्टोरीची आठवण म्हणजे २ ताप असताना घरी हट्ट करून थेटरात जाऊन भावंडांबरोबर पाहिलेला चित्रपट. अनिल आणि (त्यावेळी) मनीषा प्रचंड आवडायचे म्हणून धडपडत गेलो. चित्रपट (माझ्या मते) टुक्कार पण गाणी आजही डोक्यात तेवढीच घोळतात. खास करून रिमझिम रिमझिम आणि एक लाडकी को देखा.. आर डी, यु आर अ ग्रेट सोल !!

    ReplyDelete
  3. अपर्णा,
    तुझी "रिमझिम, रिमझिम ची आठवण मस्तच आहे.तुझ्या आठवणीत तू क्षणभर आम्हा वाचकांना पण घेऊन गेलीस. :)
    "पण गाणी ? अहाहा !पंचम पुन्हा एकदा बहरणार ... वाचल्यावर तू पंचमची आठवण करून दिलीस.पंचमाचा हा तसा त्याच्या शेवटच्या उपेक्षित काळातील शेवटचा चित्रपट.पण विधू विनोद चोप्राने त्याच्या "परिंदा" नंतर त्याला "पंचम"हि काय चीज आहे हे माहित असल्यानेच त्याच्या कडे सोपविलेला नि निव्वळ संगीता मुळे गाजलेला असा हा एक सिनेमा.कुमार सानू "एक लडकी" मुळे घराघरात पोहोचला पण पंचमला त्याच्या शेवटच्या काळात एकूणच बॉलीवूडवाल्यांनी झिडकारल्या मुळे ,तो जास्त हर्ट झाला होता.त्या मुळे त्याने कविता कृष्णमूर्तीला घेऊन सुद्धा प्यार हुआ चुपके से नि रिम झिम रिम झिम , अशा सारखी अप्रतिम गाणी देऊन दाखविली नि हि दोन गाणी तुफान लोकप्रिय झाली. ह्या चित्रपटास अगदी त्या वर्षीचे संगीताचे फिल्म फेयर अवार्ड सुद्धा मिळाले. पण हे खूप कमी लोकांना माहित आहे कि त्या साठी कविता कृष्णमूर्तीला तब्बल १९ वर्षे वाट बघावी लागली कारण इतकी अप्रतिम व्होईस क्वालिटी असून सुद्धा ,हा चित्रपट प्रदर्शित होई पर्यंत ती केवळ लता नि आशाच्या साठी एक डबिंग कलाकार म्हणूनच काम करायची नव्हे तिला तेवढेच काम मिळायचे. खरे तर शास्त्रीय संगीताचे खूप चांगले शिक्षण झाले असून पण तिची हिंदी संगीतकारांनी इतपतच पोच ठेवली होती. निम्बुडा,मार डाला, डोला रे डोला हि खूप नंतरची गाणी होत...
    चल... लेख मस्त झालाय नि पुढच्याची आता वाट बघतोय... धन्यवाद.

    ReplyDelete
  4. रिमझिमच्या आठवणी मस्त आहेत...१९४२ ALS ची सर्वच गाणी एकदम मस्त आहेत.मुड एकदम फ़्रेश करतात.

    ReplyDelete
  5. वाह वाह... एकदम सुंदर गाणी आहेत १९४२ अ लव्ह स्टोरीची. पंचमदाचा हा शेवटचा सिनेमा. एक सो एक गाणी दिली आहेत त्यांना. कमेंट करता करता, हे गाण सुरु झालं देखील....रिमझिम, रिमझिम


    धन्स गं, दिल खुश कर दित्ता तुने !! :-)

    ReplyDelete
  6. स्मिता, आर डी असतानाचा हा शेवटचा चित्रपट आणि गाणी खरंच सर्वच छान आहेत. या चित्रपटासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं फ़िल्म-फ़ेअर मिळालं..ते गेल्यानंतर आलेल्या "घातक"ला पण त्यांचंच संगीत होतं.
    पावसाच्या किंवा स्पेसिफ़िकली मान्सुनच्या आठवणी पुन्हा पाऊस सुरु झाला की खरंच आपल्या सर्वांना मागं घेऊन जातात..साहजिकच आहे ते..
    आता माझा मुलगाही इथे चालताना कुठे डबकं दिसलं आणि त्यात जोरात उडी मारुन गेला की त्यालाही रागे भरताना मला पण मनात जाम हसायला येत असतं कारण त्यांच्या खोड्यांमधले आपण आपल्याला दिसत असतो ना?

    ReplyDelete
  7. हेरंब पिक्चर आणि तू हे कॉम्बो फ़ार जुनं आहे म्हणजे...माझं तसं गाण्यांच्या बाबतीत आहे...भा.पो.रे...:)

    ReplyDelete
  8. @mynacदादा, सर्वप्रथम ब्लॉगवर स्वागत. आपण जे विस्तृत लिहिलं आहे ते सारं हे लिहिताना माझ्या मनातही आलं होतं..कारण आर.डी. आणि १९४२ ला हे सगळं बॅकग्राउंड आहे आणि ते शेवटचं फ़िल्म-फ़ेअर. पोस्टमध्ये मुद्दाम लिहिलं नाही कारण तसं म्हटलं तर ही आठवणींची पोस्ट आहे पण आपल्या प्रतिक्रियेमुळे ते इथं मांडलं गेलं हे छान झालं...:) आभारी.

    ReplyDelete
  9. योगेश झाला नं मूड फ़्रेश...बस और क्या चाहिये??

    ReplyDelete
  10. सुझे दिल तो पंचमदा और कविताजीने खूश किया है....ही पोस्ट तर निमित्त केवळ....:)

    ReplyDelete
  11. सुझे दिल तो पंचमदा और कविताजीने खूश किया है....ही पोस्ट तर निमित्त केवळ....:)

    ReplyDelete
  12. पावसाळ्याच्या आठवणी मस्तच असतात. पाऊस आणि गाणे म्हणजे चित्रपट पडला तरी गाणे हिट. १९४२ लैई आवडला होता. त्यातली गाणी आणि मनीषा पण.

    ReplyDelete
  13. गाणी आणि आठवणी या रंगारंग कार्यक्रमातला सवरेत्कृष्ट कार्यक्रम माझ्यामते आजचा (हा) होता.. पावसाचं वर्णन, तू केलेली धूम मजा आणि त्यातल्या गाण्याच्या ओल्या आठवणी.. पोस्ट प्रचंड आवडली

    ReplyDelete
  14. आनंद हैदराबादला हरभऱ्याच झाड पण पावसात उगवतं का रे...:) हाबार्स...

    ReplyDelete
  15. हा हा सिद्धार्थ चित्रपट पडला तरी गाणी हिट..अगदी अगदी रे...मला तसंही गाणी ऐकायला जास्त आवडतात ...चित्रपट पाहण तेव्हा तरी नेहमीच नव्हत...:)

    ReplyDelete
  16. छान आठवणी आहेत रिमझीमच्या.... मला १९४२ मधील सगळीच गाणी आवडतात,प्रत्येक वेळी वेगवेगळ गाण सर्वात जास्त आवडणार वाटत ह्यातल... ... सध्यातरी बाहेर मुसळधार पाउस पडतोय आणि पीसीवर गाण चालू आहे.....
    "बजता है जलतरंग, टील की छत पे जब
    मोतियों जैसा जल बरसे..........."

    (*टील नक्की काय माहीत नाही आम्ही तरी हेच बोलतो :) )

    ReplyDelete
  17. देवेन अगदी असंच..प्रत्येकवेळी वेगळ गाणं आवडतं मला पण...:)
    "टील" मला पण माहित नाही...मी ते "पेड के छत पे जब" असं माझ्या सोयीने गाते..:)आणि पेडला कुठच छत असतं देव जाणे...:D

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.