"बाबा चाराणे द्या ना..आवळासुपारी घ्यायची आहे"
"हे घे दोन चार आणे म्हणजे कंडक्टरकडे चिल्लर मागायला नको" - इति आई
"ए पावली पडली बघ तुझी." आणि मागुन जोरात खी खी खी...
"ते चाराणे मला दे नं. मी एशियाडवाले चाराणे जमवतेय."
आण्याचा हिशोब करण्याइतकी माझी पिढी जुनी नसली तरी शाळेत असल्यापासुन चार आणे आणि त्याच्या पटीत बराचसा हिशेब केला जायचा. "चाराणे" हा आमचा नेहमीचा शब्द...
काय काय नाही यायचं या छोट्या गोल नाण्यात? चाळीखाली उतरल्यावर रस्ता ओलांडला की एका चणेवाल्याचं दुकान होतं. चिमुकल्या मुठीतून चणेवाल्याला चाराणे दिले तेव्हा एक अख्खी भेळ आली होती. कदाचित माझ्या वयाकडे बघुन थोडी छोटी पुडी बनवली असेल त्याने पण चण्याच्या तर छोट्या दोन पुड्या यायच्या हे नक्की आठवतंय. मावशीकडे बसने जायचं तर चार आण्याचं अर्ध तिकिट काढलं की पोहोचलंच.साधारण एका विशिष्ट वयात स्टॅंप आणि नाणी गोळा करायचा छंद लागतो तसा मलाही लागला(आणि यथावकाश त्याची धुंदी उतरली) त्याची सुरुवातही चार आण्याच्या नाण्यानेच झाली होती.
माझी शाळा घरापासुन इतक्या जवळ होती की पहिली घंटा झाल्यावर निघालं तरी तिसरी घंटा होईपर्यंत पोहोचेन. मी जेवायला घरीच यायचे (त्यामुळे शाळेतच थांबुन डब्बा खाणार्या मुलांबद्दल एक कमालीचं आकर्षण मला होतं. जणु काही मधल्या सुट्टीत त्यांना कुठला जादुचा खाऊच मिळणार आहे...असो) तर त्याचा मुख्य तोटा हा होता की माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांना शाळेसाठी पैसे देणं हा प्रकार कधीच केला नाही. मी मात्र अध्येमध्ये बाबांना मस्का मारुन निदान चाराणे तरी द्या नं असं म्हणून कधीकाळी मिळालेल्या त्या पैशात चैन करुन घेई.
शाळेच्या बाहेर एक छोटं दुकान होतं. एक म्हातारे आजोबा ते सांभाळायचे. त्यांच्याकडे रावळगावच्या गोळ्या, खडखडे लाडु आणि असंच काही अडमतडम काचेच्या बरण्यांमधुन खुणावत असे. मुख्य आकर्षण आवळासुपारी, त्याखालोखाल तळलेली मूगडाळ आणि मग सिझनप्रमाणे बोरं इ.चा नंबर असे. अर्थात आमची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची होती की हे चाराणे आपल्यासाठी चैन आहे याची पूर्ण जाणीव तेव्हाही होती पण माझ्या बाबांना बहुधा त्यातुन बाकीच्या मुलांसारखं मधल्या सुट्टीत कधीतरी दुकानात जाऊन काहीतरी घ्यावंसं वाटतं हे कळलं असावं आणि आईच्या नकळत त्यांनी ती चैन मला करु दिली.
तर अशा बाबांना खूप मस्का मारुन मिळवलेल्या चार आण्यात मग शक्यतो आवळासुपारीच्या दोन पुड्या मी घेई. कारण त्यावेळी त्या पंधरा पैशाला एक आणि चार आण्याला दोन मिळत. अगदी पुरवून पुरवून खाल्ली तरी आठवडाभर सहज पुरत. त्याच चवीचा कंटाळा आला किंवा साध्या भाषेत थोडी चैन करायची असेल तर मग चार आण्याला तो दुकानदार त्याच्या कुठल्याशा मापाने तळलेली मुगाची डाळ देई ती घ्यायची. चैन कारण कितीशी डाळ असणार त्या छोट्याशा पुडीत? ती त्याच दिवशी संपे आणि आता पुन्हा चाराणे मिळवायचे म्हणजे बाबांना मस्का मारूनही काही फ़ायदा नसे कारण "कडकी" या शब्दाचा अर्थ फ़ार लहानपणीच कळायला लागला होता.
सिझनप्रमाणे शाळेच्या बाहेर बोरंवाल्याची गाडी यायची त्याची ती त्रिकोणी पुडीपण चार आण्यालाच मिळे. लाल जर्द रंगाची, मीठ घालुन सुकवलेली ती चणेबोरं अहाहा! त्या बोरांची चव आणि तो ती पुडी देईपर्यंत हातातलं नाणं गच्च पकडत दुसर्या हाताने "भैया थोडा चखने को देदो ना.." अशी विनवणी करायचे ते दिवस भैयाजीच्या "ले लो बिटिया" म्हणताना चार आण्यात मिळालेल्या पुडीतल्या चण्यापेक्षा हेच चणे जास्त मस्त लागायचे बहुधा.
माझी एक मावशी माझ्या घरापासुन तशी जवळ पण तरी बसने जायला लागायचं अशा अंतरावर राही.माझी मावसभावंडं वयाने माझ्या आसपासची. शिवाय मावसबहिण चौथीत असेपर्यंत काकांच्या बदल्यांमुळे ती महाराष्ट्राबाहेर राहायची आणि नंतर मग त्यांनी इथे कायमचा मुक्काम ठरवल्यामुळे माझ्यासाठी हे हक्काचं नात्याचं घर होतं. मी आणि ती मावसबहिण अजुन मैत्रीच्याच नात्यात जास्त आहोत. तेव्हा तर काय फ़ुलपंखी दिवस. प्रत्येक शनिवारची अर्ध्या दिवसाची शाळा संपली की आम्ही भेटलं पाहिजे असं वाटायचं पण प्रत्येक नाही तरी महिन्यातुन निदान दोनदा तरी भेटणं व्हायचं अपवाद परिक्षांचा सिझन. तर त्यांच्या घरी जायला हाफ़ तिकिटात असेपर्यंत तरी चार आण्याचं तिकिट लागायचं. त्यामुळे जाताना आई शक्यतो दोन्ही वेळचे सुट्टे पैसे द्यायची आणि येताना मावशीपण आठवणीने सुटे चाराणे आहेत का हे विचारुनच बस स्टॉपवर सोडायची. मावशीच्या घराजवळंच बाजार भरे. त्यामुळे आईने सांगितलं असेल तर चाराण्याचा मसाला उर्फ़ मिरच्या-कोथिंबीर येता येता घेतली की आईपण खूश आणि हे मी आठवणीने आणलं म्हणून मीही.
कधीतरी आई आम्हाला बचतीचं महत्व सांगतानाही उदाहरण म्हणून चार आणेच घ्यायची आणि म्हणायची तुमच्या पैसे जमा करायच्या डब्यात नुस्ते चार आणे जरी टाकले तरी हळुहळू किती रुपये जमा होत राहतील आणि मग आम्ही मनातल्या मांड्यात त्या अद्याप न टाकलेल्या चार आण्याच्या न झालेल्या रुपयाचं आम्ही काय काय करु शकु अशा विचारात आता चार आणेपण हातात नाही आहेत हे विसरुन जात असू. नंतर मग एकदा आम्हा तिघांसाठी तीन वेगवेगळे पैसे साठवायचे डब्बे आणले. त्यात माझा होता म्हातारीचा बूट आणि त्यात मग पाठीमागे वेगवेगळी चित्रं असलेली कितीतरी चार आण्याची नाणी मी टाकायचे. आणखी इतर नाणीही होती त्यात पण चार आणे सहजी टाकले जायचे कारण त्यातल्या त्यात ते परवडायचे. रुपया किंवा दोन रुपये आईकडेच खर्चासाठी जायचे. मध्ये मग एशियाड झालं त्यावेळी ती पाठीमागे वेगळा छाप असलेली नाणी काढली होती. माझा नाणं जमवायचा म्हातारीचा बूट आईकडे त्याच नाण्यासहित अजुन आहे त्यात मी टाकलेली नाणी तशीच आहेत.काय गम्मत आहे इतके मांडे खाऊनही त्या सेव्हिंगला हातच लावला गेला नाही बहुधा.
चार आण्यात मिळणार्या लिमलेट आणि रावळगावच्या गोळ्या तर आताही त्या चवी तोंडावर आणतील. कुणाकडून चुकुन चार आण्याचं नाणं पडलं तर ’पावली पडली बघ तुझी’ म्हणून खिदळायचंही तितकंच लक्षात आहे. माझ्या मामाच्या बाबतीत तर ते नेमकंच व्हायचं आणि आम्ही भाचे कंपनी त्याची पण थट्टा करायचो.
नंतर हळुहळु चाराण्याचा भाव कमीपण झाला. म्हणजे पुर्वीसारखं बसचं तिकिट किंवा गोळ्या-बिस्किटं चाराण्यात यायचं तसं बंदही झालं. पण तरी चाराण्याची आणखी एक ह्रद आठवण आहेच. माझ्या मामाचं गावं पालघर तालुक्यातलं एक छोटं खेडं. मला आठवतं तोवर त्या गावात पीठाची गिरणी पण नव्हती. मामी जात्यावरच दळायची. पूर्ण गावात किराणा, रॉकेल पासुन चणे-दाणे मिळायचं एकच दुकान होतं. मी सातवीत वगैरे असतानाची आठवण आहे ही.मामीने काहीतरी अडम तडम घ्यायला पाठवलं असावं कारण मुख्य किराणा मामा महिन्यात एकदा मनोरला जाऊन आणायचा. माझ्याआधी आदिवासी पाड्यातली एक बाई तिच्या छोट्या शेंबड्या मुलाला अंगावर घेऊन आली होती. "बाय चार आण्याचा गोडातेल दे गं" म्हणून एक काचेची बाटली पुढे केली आणि त्या दुकानवाल्या काकींनी तिची चौकशी करत कुठल्यातरी अगम्य मापाने साधारण एक चमचाभरच्या आसपास तेल तिच्या बाटलीत दिलं. त्यावेळी स्वयंपाकघरातलं विशेष कळत नसलं तरी इतक्याशा तेलात ती नक्की काय शिजवणार हा प्रश्न पडून तिची समस्या मी आईकडे मांडली होती.त्यावेळी आईने मला गावात आदिवासींकडे पैसे नसतात त्यामुळे ते आपल्यासारखं महिन्याचं रेशन भरु शकत नाही मग त्यादिवशी जे लागेल आणि पैसे असतील तसं थोडं थोडं घेऊन तो दिवस साजरा करतात हे समजावलं होतं. "गरीबांचं पोट म्हणजे हातावर कमावुन पानावर खायचं" हे आईचं एक वाक्य नेहमी ऐकायचे त्याचा प्रत्यक्ष अर्थ त्यावेळी कळला होता. त्यादिवशी आपण किती चांगलं आयुष्य जगतोय याचा साक्षात्कार झाला होता.
आज अचानक या आठवणी अशा निघण्याचं कारण म्हणजे काही महिन्यांपुर्वी वर्तमानपत्रात वाचलं की चार आण्याचं नाणं चलनातुन रद्द होणार आहे. हा २०११ चा जून चार आण्याच्या नाण्याचा शेवटचा महिना. कदाचित आतापर्यंत लोकांनी शेवटचे चार आणे कधी वापरले ते आठवायचंही सोडलं असेल .माझ्या मागच्या मायदेशवारीत रिक्षाचा प्रवास तर पन्नास पैशाच्या पटीत होता बहुतेक आणि इतर ठिकाणी तर नाण्यात काही केल्याचं आठवतही नाही.
तरीही आता चाराणे नसणार म्हटल्यावर हे वर म्हटलेले मिरच्या-कोथिंबीरीपासुन बसच्या तिकिटापर्यंतचे सारे व्यवहार डोळ्यासमोर उभे राहिले. मला अर्थकारणातलं विशेष कळत नाही पण तरी जेव्हा जेव्हा मी परदेशात अगदी एक एक सेंटही चलनात पाहते आणि माझ्या लहानपणीची एक एक नाणी अशी गळताना पाहाते तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकते असंच वाटतं. काय ते माहित नाही पण आत्ता या क्षणी मात्र मी जर कधी माझ्या मुलाबरोबर खेळतानाही सवयीने चाराण्याच्या व्यवहारात काही बोलले तर मात्र त्याला समजावताना पुन्हा एकदा आठवणींच्या गर्तेत जाणार हे नक्की.
आठवणींचा प्रवास मस्तच मांडला आहेस.
ReplyDeleteत्या आदिवासी बाईची गोष्ट वाचून कसंतरीच वाटलं :(
मस्तच लेख. माझ्याही शाळेच्या आठवणी अशाच आहेत. पण आठ आण्याशी निगडीत :)
ReplyDeleteमस्तच झालाय लेख...रावळगाव चॉकलेट,मला खुप आवडायच :D
ReplyDeleteमला मिळालेल पहिल बक्षीस पण चाराणेच होत :D
चाराण्याची बंगलोरची एक आठवण आहे. मी इथे आलो तेंव्हा हॉस्टेलला राहायचो. माझ्याकडे इस्त्री नसल्याने कपडे बाहेर इस्त्री करायला देत असे. एका जोडीला साडेतीन रुपये असा दर होता. एकदा त्या इस्त्रीवाल्याला मी ३ रुपये आणि चारण्याची दोन नाणी दिली. चाराण्याला काही मिळत नव्हते त्यामुळे जवळ असलेली चाराण्याची नाणी इस्त्रीवाल्याला देऊन संपवून टाकू असा विचार होता. त्याने चाराणे घेताना कुरकुर केली. कुणी घेत नाही म्हणत होता. नंतर एकदा त्याने सुट्टे पैसे परत देताना तीच नाणी मला दिली. पुढे ४-५ महिने तरी तीच नाणी इस्त्रीवाला आणि मी एकमेकांना न चुकता देत होतो. आज ही ती दोन नाणी माझ्याकडे आहेत. मला सुट्टे पैसे साठवून ठेवायची सवय असल्याने माझ्याकडे २०-२५ तरी नाणी असतील पण मी ती तशीच ठेवणार आहे. वेगवेगळ्या छापाची आहेत.
ReplyDeleteलहानपणी चाराण्यात जसा भरपुर खाऊ येत असे तश्याच मोठेपणी चाराण्यात खूप खूप आठवणी आल्या. ह्या पोस्टबद्दल धन्यवाद.
चार आण्यात आत्ता आत्तापर्यंत "किस्मी बार"च चोकलेट पण मिळायचं... आता त्याची किंमत वाढणार...:(
ReplyDeleteआणि माझ्या पिग्गी डब्यात अजूनपण चार आण्याची खूप नाणी आहेत... ती आता शोधून शोधून संपवावी लागणार... :(
नको ना जाऊस रे चार आण्या....
कोणी काहीही म्हणो.. आम्हाला हवा आहेस तू....
Aparna, char aNechain karayala purayache tya kaLatalya aThavaNee jagya zalya:-) chaan ahet tuze lekh. ajun don goshTee share karaNyasarakhya mhaNaje (1) apala vaDhadivas ekach divashee yeto (2) maza navara hee jithe jail tithe surya ( "ek changalee suree pahije") vikat gheto!!! I thought I was the only one who had a husband with such a starnge hobby!:-) tuza lekh vachun gammat vaTalee. keep writing...
ReplyDeleteअपर्णा तुझ्या ह्या लेखातून मी लहानपणात जाऊन पोहोचले.५पैसे,१०पैसे,४आणे ह्यांना घेऊन केलेल्या लहानपणीच्या लहान लहान चण्याबोरांच्या खरेद्या; आणि बचतीचे महत्व म्हणून जमवलेली हि नाणी एका श्रीराम आणि सीतेचे चित्र असलेल्या पत्र्याच्या डब्यात,ते पण आठवले.तुझ्या लहानपणच्या आठवणी सुरेख लिहिल्या आहेस शब्दात पकडणे कठीण असते पण मस्तच जमले आहे इथे तुला. डोळ्यापुढे चित्र उभे राहिले काही ठिकाणी.
ReplyDeleteआता जेव्हां मी माझ्या लेकीला बचतीचे महत्व पटवून एक piggybank आणून दिली आणि तिने इकडचा 1 cent त्यात टाकला तेव्हां तू म्हणतेस तसे खरच वाटले ग कि ह्या आपल्या ४ आण्याला सुद्धा चलनात ठेवले असते तर!ह्या लहान चलनाच्या भोवती आपले लहानपणचे विश्व कसे छान रेंगाळले होते न! किती कुतूहल असायचे जेव्हां ४ आण्याची बोरे घ्यायचे त्या पुडीत किती बोरे येणार हे माहित असायचे खरेतर,तरीही एक उत्सुकता असायची. तुझ्या पोस्टमुळे स्मृती परत जाग्या झाल्या!
आभारी हेरंब....ती बाई माझ्या डावीकडे उभी आणि त्यांचा तो संवाद मला फार लक्षात आहे रे....आणि हे लिहिताना मला पूर्वीपेक्षा जास्त कसंतरी झालं..वाईट याच वाटत की त्या गावात अजूनही यापेक्षा वाईट परिस्थीतीत जगणारे बरेच आदिवासी तसेच आहेत....रात्री कुठची तरी दारू पिऊन सगळं दु:ख त्यात बुडवताना त्यांचा जन्म असाच सरतो....:(
ReplyDeleteसाधक :)
ReplyDeleteयोगेश रावळगाव आता मिळतं का रे?? तुझ्या चार आण्याच्या बक्षिसाची पोस्ट मी पण वाचलीय....:)
ReplyDeleteसिद्धार्थ आठवणीच्या बाबतीतही तू म्हणजे "षटकारी" आहेस बाबा....:)
ReplyDeleteआणि ते शेवटच वाक्य
>> लहानपणी चाराण्यात जसा भरपुर खाऊ येत असे तश्याच मोठेपणी चाराण्यात खूप खूप आठवणी आल्या
मला कॉपून पोस्टमध्ये चिकटवावसं वाटतंय...
तुझ्या मोठ्या प्रतिक्रियेबद्दल मोठ्ठे आभार....:)
@पियू परी, ब्लॉगवर स्वागत....
ReplyDeleteचार आण्यात किस्मी यायचं हे मी पण कसं विसरले बरं?? आठवण करून दिलीस हे छान केलस...माझी चार आण्याची नाणी मी जपून ठेवणार आहे...:)
@S.V. तुझं नाव मला माहित नाही आहे पण ब्लॉग आवडल्याच कळवलस त्याबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत....:)
ReplyDeleteतुला या वर्षीच्या वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा ....:) आणि चाकुबद्दलची तुझी कमेंट माझा नवरा माझा ब्लॉग वाचत नाही म्हणून बरंय नाहीतर आणखी एक दोन येऊन पडतील घरात ...काही भरोसा नाही...
काय योगायोग आहेत ... ब्लॉगवाचकांकडून अस काही ऐकायला मिळालं की मस्त वाटत....वाचत राहा आणि प्रतिक्रिया देत रहा....
श्रिया, तुझ्या प्रतिक्रियांच मला फार कुतूहल असत आणि जेव्हापासून तू हा ब्लॉग वाचतेस त्यानंतर जेव्हा मी जुन्या आठवणी लिहिल्यात त्या त्या वेळी तुझ्या दीर्घ प्रतिक्रिया वाचून मला एक छोटी पोस्ट वाचायला मिळते...तुझ्याकडे पण आठवणीचा खजिना आहे असं दिसतंय....एक दिवस निवांत काढून लिहायला बसलं की सुचत...हा लेख मी कधीच लिहायला घेतला होता पण घरी इतकं काही सुरु होतं की नीट पूर्ण व्हायची वेळ शेवटी जून महिन्यातच आली....:)
ReplyDeleteआणि एक आरुष पण आजकाल एक एक सेंट त्याच्या पिगीबँकमध्ये टाकत असतो....माझा त्याच्या पिगीबँक वर डोळा आहे...(अगं पैशासाठी नाही दिसायला जाम गोड आहे ती...कधी तरी फोटू टाकेन..)
रच्याक, तू आणखी छान छान लिहावं म्हणून आभार नाही मानायचे असं मीच ठरवतेय....:)
सही रे अॅप्स !
ReplyDeleteमस्त बालपणात घेउन गेलीस !
या चाराण्यापाई मधल्या सुट्टीत रस्ता क्रॉस करुन खाउ आणायला जाताना स्कूटर ने उडवलं होतं.
तीन महिने प्लॅस्टरमध्ये पाय घेउन खेळत होतो.
तू सांगितलं होतं मला नाण्यांचे फोटु पाठ्वायला पण माझा लॅपटॉप उडाला ना त्यामुळे नही पाठवू शकलो.
मस्तच लिहिलयस हां !
त्या रावळगावच्या गोळ्या, हिरवी बडीशेप, बोरं, चिंचा परत सगळं आठवलं !! धन्यु गं !
हा हा हा दिप्स....चाराण्यापाई तुझा पाय प्लास्टरमध्ये गेला आणि आता चाराण्याचे फ़ोटो हवेत तर लॅपटॉपने टांग दिली..हे हे...अरे बरं झालं आठवण केलीस..खरं मी वर लिहायला हवं होतं पण जाऊदे आता प्रतिक्रियेमध्ये लिहिते..या पोस्टसाठी माझा आता चेन्नईत असणारा मित्र सेन्थिल याने लगोलग फ़ोटो पाठवले त्याबद्दल त्याचेही जाहिर आभार...त्याला नाणी जमा करायचा छंद आहे..माझ्या फ़ेबुला आहे तो....
ReplyDeleteआणि अरे ते हिरवी बडीशेप मी विसरले होते त्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यु....:)
आता या महिन्यात चाराण्याचा वापर शेवटचा....:(
पावलीचा वृत्तांन्त एकदम सहीच! बरेच ४आणे आठवून गेले.
ReplyDeleteभाजीवाल्या अण्णाकडे ४आण्यात मिरची+कोथिंबीर+आले+कडीपत्ता व ओल्या खोबर्याचा चांगला दोन इंच बाय दोन इंचाचा तुकडा मिळायचा. ओल्या हिरव्या चटणीची जय्यत तयारीच की. तोंपासु गं. :)
आदिवासी, बिल्डींगबांधकामावरील बिगारी कामगार, दगडफोडे, आणि बरेच इतर... सगळ्यांचेच पोट असे हातावरचेच. मन अपराधी अपराधी होते.
aparna, mee - Smita. google acct var user name (s.v.) tasach rahun gela.
ReplyDeleteश्रीताई भापो....खोबऱ्याचा तुकडा पण पावलीत यायचा हे नव्हत माहित किंवा मी आणेपर्यंत भाव वाढला असेल...:)
ReplyDeleteपण बघ न आता काही येत नाही पण नावालाही पाकिटात हे नाणं नसणार....
स्मिता, आता पुढच्यावेळी ब्लॉगवर S.V. पाहिलं की मला नक्की आठवेल..आभारी..:)
ReplyDeleteKhup chan lihilay
ReplyDeleteचाराण्यावरचा लेख मात्र बंद्या रुपयासारखा खणखणीत झालाय.. मस्त वाटलं वाचून...
ReplyDeleteनिशा आभारी..
ReplyDeleteआनंद, चौकार हाणलास की गड्या...:)
ReplyDeleteमाझे बाबा चार आण्याला पावली म्हणायचे. मला नेहमी चिडवायचे की" पावली पडली आहे का?" किंवा "तूझे चार आणे कमी आहेत का?"
ReplyDeleteमग मी पण उत्तर द्यायची,"छे! मी तर बंदा रूपय्या!"
>>"छे! मी तर बंदा रूपय्या!"
ReplyDeleteउत्तर एकदम खणखणीत...मग बाबा काय म्हणायचे??
निरपेक्ष प्रेम कठिण आहे नाही का? पण आईने तिच्या मुलामुलीवर केलेले प्रेम ? ते असतेच नाही का?
ReplyDeleteमीनल आपण ही कमेंट नक्की कुठल्या पोस्टसाठी टाकली असणार त्याचा विचार करतेय...:)
ReplyDelete