आज २२ एप्रिल २०११, म्हणजे यावर्षीचा जागतिक वसुंधरा दिवस...विसरला नाहीत ना?? दरवर्षी काहीतरी वेगळं असतंच जे या निमित्ताने केलं जातं..यावेळी मोगरा फ़ुललाच्या दिवाळी अंकात आलेला माझा लेख टाकतेय...माझ्यासाठी एक नवीन चंमतग सध्या बॅकडेटेड ऑर्डरनी येतेय...म्हणजे तसं ते सरप्राइज गिफ़्टच आहे पण काय झालं त्याचं कव्हर चुकुन आधी आलं आणि साहेब अजुन चायनाहून निघताहेत असं काही....कोण असेल "तो"?? त्याचं जाऊदे..हे आधीच्या "त्या"चं वाचा आणि नक्की विचार करा.... वसुंधरा दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा....
माझ्या वयाच्या मैत्रीणींप्रमाणेच ’तो’ कॉलेजजीवनात माझ्या आयुष्यात आला आणि मग सारं विश्व व्यापुन बसला. प्रोजेक्ट रिपोर्ट, लॅब सगळीकडे हवाहवासा वाटणारा..जेवढं त्याला समजुन घ्यायचं तितकाच आणखी गहिरा होत जाणारा....आजकाल तर ’तो’ शालेय जीवनातच आयुष्यात येतो असं ऐकतेय...आणि मग कॉलेजला जाईस्तोवर त्याच्या प्रेमात आकंठ बुडणं जरा जास्तीच होत असेल नाही?? असो तो विषय नव्हे...मी सध्या फ़क्त माझ्या-त्याच्या प्रेमाबद्दलच बोलावं म्हणते..
तर एकदा आयुष्यात आला आणि मग अविभाज्य अंगच होऊन बसला..कॉलेजमध्ये तरी भेटी कमी होत्या पण एकदा नोकरीला लागल्यावर मग काय राजरोसपणे, रोजचीच संगत पण तरी घरी तो नसे. मग शेवटी बरेच महिने पैसे साठवले, स्वतःची ऐपत वाढवली किंवा आणली म्हणा आणि मग एकदाची आई-वडिलांची त्याची घरीच गाठ घालुन दिली..म्हणण्यापेक्षा त्याला सरळ घरीच आणला..कंफ़ुज??? काही नाही स्वतःच्या पैशाने आणि मेहनतीने घरी माझा पहिला डेस्कटॉप बनवला.जीजुने थोडी मदत करुन मला ग्रॅंटरोडहून पार्ट्स आणायला मदत केली पण बाकी सगळं मी स्वतः करु शकले...त्यानंतर मग बर्याच गोष्टी घरी करता यायला लागल्या आणि घरच्यांनाही थोडं-फ़ार संगणकाची माहिती व्हायला मदत झाली...
पण नंतरच्या काळात मग हळूहळू घरचा त्याचा वापर कमी झाला, माझं परदेशी जाणं त्यामुळेही उपयोग कमी आणि तोपर्यंत इंटरनेटही अगदी घरगुती झालं नव्हतं आणि घरचेही थोडे-फ़ार या कामात आळशीच होते म्हणा; शिवाय थोडा जुना झाल्यामुळे त्याच्या तब्बेतीच्या तक्रारी सुरु झाल्या आणि मागच्या मायदेश दौर्यात माझा लाडका पीसी मला घराबाहेर काढावा लागला...त्यावेळी वेळ कमी असल्यामुळे मी मग सरळ संगणकाचा छोट्या उद्योगधंदा करणार्या मराठी मुलाला तो सांगेल त्या भावाने दिला आणि ते पैसे आधी ठरवल्याप्रमाणे एका ठिकाणी दिले. आता मागे वळून पाहताना मला वाटतं कदाचित या गोष्टीलाही मी थोडं थंड डोक्याने प्लान करु शकले असते. आजकाल तर लॅपटॉप आल्यामुळे ज्यांच्याकडे जुने संगणक आहेत त्यांना ते काढावेसेच वाटत असतील. पण ते करण्याआधी त्यांनी माझ्यासारखी दिरंगाई न करता थोडं आपल्यापरीने ते वर्क आऊट करावं यासाठी हा लेख प्रपंच.
मला सुचलेले काही उपयोग देतेय, त्यात भरही घालता येईल. पण त्याचा पूर्ण कचरा करायच्या ऐवजी थोडं वेगळं म्हणूनही याकडे पाहता येईल.
१. आपल्याला नेहमी वेगवेगळी सॉफ़्टवेअर शिकावीशी वाटतात आणि आरंभशूरपणे आपण ती आपल्या वापरातल्या संगणकावर ती टाकतो. नंतर मग आपला त्यातला रस संपला की आपण आता टाकलंय तर राहुदे म्हणून उगाच आपल्या संगणकातली जागा त्यासाठी खर्ची घालतो, त्याऐवजी अशी नवी सॉफ़्टवेअर किंवा आपल्याला कमी वेळा लागणारी सॉफ़्टवेअर या जुन्या संगणकात घातली तर जास्त बरं पडेल.
२. आपण एक्स्टर्नल हार्ड-ड्राइव्ह वापरतो पण तरी नेहमी तो काढा, लावा आठवणीने बॅक-अप घ्या असं आपल्याकडून होतंच असं नाही. तर रोजच्या रोज बॅक-अप घेण्यासाठी जुन्या संगणकाला विंडोज सर्व्हर म्हणून इन्स्टॉल केलं तर हे बॅक-अप घेणं सोपं जाईल. मायाजालावर थोडं शोधलंत तर हे करण्याच्या आणखी अभिनव कल्पनाही मिळतील.
३. जर सर्व्हर म्हणून नको असेल तर चक्क एखादी नवीन किंवा लिनक्स सारखी दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम टाकून ती शिकण्यासाठीही हा जुना संगणक खूप उपयोगी पडेल. आजकाल उबन्टुसारख्या ओ.एस. चकटफ़ु आहेत. त्याचा अशा प्रकारे लाभ घेता येईल.
४. कुठलंही नवं सॉफ़्टवेअर जुन्या संगणकात टाकून थोडं प्रॅक्टिस किंवा त्याच्या इन्स्टलेशन इ.बद्द्ल आत्मविश्वास येईपर्यंत जुन्या संगणकाचा वापर फ़ायद्याचा होऊ शकतो.अशाप्रकारे वापरातलं मशिन आपल्या प्रयोगापासुनल, अबाधीत ठेवता येईल
५. माझ्यासारखी लोकं जे स्वतःच्या मशिनवर गेम्स खेळणं पसंत करत नाहीत पण घरातल्या दुसर्या कुणाला ते खेळण्यात रस असेल तर त्यांच्यासाठी हे मशिन वरदानच ठरेल...
६. लहान मुलांना कुठल्या वयात संगणक द्यायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं पण जर द्यावाच लागत असेल तर तो खराब व्हायची (म्हणजे सुरुवात त्याचा कळफ़लक इ.) शक्यता जास्त. अशावेळी हे जुनं मशिन उपयोगी पडेल. शिवाय जर तुम्हाला एकदम कडक पॅरेन्टल कंट्रोल हवा असेल तर त्यात मायाजाल इ. सुविधा बंद केल्या तरी चालण्यासारखं आहे.
७. समजा जुन्या संगणकात काही प्रमुख खराबी असेल पण त्याचे इतर भाग सुरु असतील जसं त्याची स्क्रीन तर स्प्लीट स्क्रीनसाठी त्याचा वापर करता येतील. इतर चालु भागही जसं कळफ़लक, माउस इ. स्वतःला नको असेल तर माहितीतील दुसर्या कुणाला देता येईल.
८. चांगल की वाईट आपलं आपण ठरवावं पण डाउनलोड (उर्फ़ डा.लो.) करणं ही काळाची गरजच झालीय. पण याबरोबर आपल्या संगणकाला जंतुसंसर्ग (म्हणजेच व्हायरसचा हल्ला) होऊ शकतो हेही आपल्याला माहित असतं. अशावेळी हे जुनं मशिन वापरलं तर निदान वापरातला संगणक बंद ठेवण्याचं नुकसान आणि त्रास वाचवता येईल.
९. खरं तर या लिस्टमध्ये तो संगणक एखाद्या शाळेला किंवा गरजुला दान करावा हे पहिल्या क्रमांकावर यावं असं वाटू शकतं पण ते मी मुद्दामच टाळलंय आणि त्याला कारण म्हणजे जुनं मशिन म्हणजे खरं तर ते किती चालेल याचा तसा काही भरवसा नसतो त्यामुळे जिथे ते देणार त्यांनाच त्याच्यावर खर्च करायला लागु नये हा मुख्य उद्देश. त्याऐवजी अगदीच तुम्ही त्याचा काहीच वापर करु शकत नसाल तर मग जसं मी कुणा छोट्या उद्योजकाला थोडक्या किमतीत विकला तसं करुन येणार्या पैशात कुठे देणं वगैरे ठरवता येईल. आणि ते जास्त सोपं पण होईल.
आणखीही बरेच उपाय असतील जे आपणही सुचवू शकता आणि "त्या"चा कचरा करण्यापुर्वी त्यातला एखादा पर्याय नक्की वापराल अशी आशा.
ता.क.--- हा विषय आधीच डोक्यात होता आणि ज्यावेळी कामानिमित्ताने एक नवा कोरा डेल इंस्पिरॉन. इंटेलचा नवा प्रोसेसर, विडोज ७ इ.इ....आला तेव्हा आता त्याला सांभाळायचं की माझा स्वतःचा आयबीएम?? या त्रांगड्यात अर्थातच "कर्म ही ईश्वर" म्हणत आयबीएम ला थोडी विश्रांती देतेय. पुन्हा काढेन तेव्हा कदाचित तो जुना, हळू वाटेल आणि मग त्याचं असं काही करावसं वाटलं तर काय म्हणून पुन्हा विचार करायला सुरुवात केली आणि या लिखाणाचा जन्म झाला. आज ही पोस्ट ब्लॉगवर देतानाही वर उल्लेखल्याप्रमाणे "तो" येतोय...त्याच्या स्वागतासाठी कामाच्या टेबलवरची जागा रिकामी करताना कुणाला कशाप्रकारे तिलांजली द्यावी त्याचा विचार करते...वाचक नक्कीच नवे काही उपाय सुचवतील....:)