Monday, June 21, 2010

गाणी आणि आठवणी ४ - मी एकटीच माझी असते कधीकधी

काही गाणी आठवण्यासाठी ती मुद्दाम ऐकावीही लागत नाहीत.अशा गाण्यांनी मनाचा एकदा ठाव घेतला की यांचे शब्द अकस्मात आठवतात आणि जणु काही आपण ते गाणं त्या क्षणासाठी जगतो. माझ्यासाठी अशाच काही गाण्यांपैकी एक म्हणजे "मी एकटीच माझी असते कधी कधी".

हे गाणं मी प्रथम कधी ऐकलं ते खरंच आठवणार नाही पण शाळेतल्या न कळत्या वयात संध्याकाळी रेडिओवर सांजधारामध्ये हुरहुरत्या संध्याकाळीच ऐकलं असणार हे नक्की.
यातलं "गर्दीत भोवतीच्या नसते कधी कधी" हे खूप स्पर्शून गेलं होतं ते बारावीच्या निकालाच्यावेळी. माझ्या ग्रुपमधल्या सगळ्या मुली पीसीबीमध्ये सुस्थितीत असल्याने निर्धास्त होत्या आणि काहींना पैसे भरून खाजगी मेडिकल कॉलेजला जाता येईल याची खात्री. मला मात्र या सगळ्यात राहुन इतकं एकटं वाटत होतं की बस..आता पुढे काय पेक्षा जे ठरवलं होतं ते नाही याचं ते दुःख. मजा म्हणजे आता आठवलं तर त्याचं काहीच वाटत नाही. म्हणजे गेलं त्याचं वाईट वाटतं पण त्यानंतरही फ़ार काही वाईट झालं नाही. दुसरी रांग आणखी काय?? असो..पण तरी असे गर्दीत नसण्याचे प्रसंग येतच राहतात. अशावेळी मनाला एका वेगळ्याच शांत जागी नेऊन सोडण्याची करामत या गीताने माझ्यासाठी बर्‍याचदा केलीय.

मागच्या मायदेश दौर्‍यात मामाच्या घरी गेले होते...लहानपणीच्या मे आणि दिवाळीच्या सुट्टीत चार मावश्या, मामे-मावस भावंडं यांच्या गोतावळ्यात गप्पा मारत वाड्यातल्या चिंचेखाली बसलेलो आम्ही याचे भास त्यावेळी उगाच झाले आणि काय वाटत असेल या आजोबांच्या काळातील चिंचेला? असं एकटीच शांतपणे दुरून येणारा नदीच्या वार्‍याचा इवलुसा आवाज ऐकताना उगाच वाटुन गेलं...मन मागचं काहीबाही आठवत राहिलं आणि "होतात भास मजला नुसते कधी कधी" हे प्रत्यक्षात जगलं गेलं..या आणि अशा अनेक प्रसंगांच्यावेळी हेच गाणं आठवलं...

थोडे आणखी बिकट प्रसंग येतात, जुन्या जखमांवरची खपली काढली जाते, एखादा परिचय दूर जाताना दिसतो तेव्हा माहित असतं की काही ओळखी जन्मजन्मांतरीच्या नसतात किंवा हे आधीही घडलंय तरी "जखमा बुजुन गेल्या सार्‍या जुन्या तरीही, उसवीत जीवनाला बसते कधी कधी" असं होतंच. त्यावेळी या गाण्याचा आसरा वाटतो.

इथे अमेरिकेत तर अगदी प्रत्यक्षात एकटं असण्याचे प्रसंगच जास्त. त्यामुळे इथे आल्यापासुन तर हे गाणं खरं सांगायचं तर विसरायचे प्रसंग कमी. माझ्याकडे हे गाणं आता नाहीये. अजुनही पुर्वीसारखं जर रेडिओवर वगैरे लागलं तरंच ऐकलं जाणार पण स्वतः स्वतःलाच इतक्यांदा ते ऐकवलं गेलंय की प्रत्यक्ष न ऐकल्याची कमी भासत नाही. आठवणीत येऊन सारखं सारखं रुंजी घालणार माझं हे एक फ़ार लाडकं गीत आहे.

सुरेश भटांची ही गझल, श्रीकांत ठाकरे यांनी स्वरबद्ध केली आहे आणि निर्मला देवींचा स्वर या गाण्याला लाभला आहे.खाली पूर्ण गीत दिलं आहे.

मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी
 
येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी

जपते मनात माझ्या एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी

मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी

जखमा बुजून गेल्या सा‍र्‍या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी

12 comments:

  1. काय गं... अजून रमलेली दिसत नाहीस तिकडे... :)

    आठवणीतील गाणी मानून माह्याकडे मी एक अल्बम बनवलेला आहे..तो ऐकतो कधीकधी... :)

    ReplyDelete
  2. अपर्णा...हे गाण्याबद्दल प्रथमच ऐकतोय...तुझ्याकडे असेल तर सेन्डव.

    ReplyDelete
  3. एकदम हळुवार. अनेक गाण्यांतल्या ओळीओळींशी आठवणी जडलेल्या असतात. तसंच काहीसं झालंय तुझं.

    ReplyDelete
  4. रोहन, असंही नाहीये पण काही तसंच घडलं की अशी गाणीच सहारा असतात..

    ReplyDelete
  5. योगेश माझ्याकडे नाहीये आता पुढच्यावेळी रिदम हाऊसला वगैरे जाऊन शोधीन..

    ReplyDelete
  6. मी कधी एकल नाही ग हे गाण....पण तुझ्या भावना पोहोचल्या हं...

    ReplyDelete
  7. आठवणींशी निगडीत गाणी की गाण्यांशी निगडीत आठवणी इतके काहींशी आपले नाते घट्ट जुळलेले. " होतात भास मजला नुसते कधी कधी व जखमा बुजुन..." ही दोन्हीही गाणी ब~याच दिवसात ऐकलीच नाहीत. आता शोधतेच.
    अपर्णा, बरी आहेस नं?

    ReplyDelete
  8. आभारी देवेंद्र.

    ReplyDelete
  9. श्रीताई, अगं एकच गाणं किंवा खरं तर गझल आहे. आता पोस्टमध्ये पूर्ण दिली आहे.मला mp3 मिळाली नाही. आता पुढच्या मायदेश दौर्‍यात मिळालं तर. नक्की ऐक तुला आवडेल...अशी गाणी असावीत आपल्याबरोबर...मला ही लहानपणापासुन ऐकल्याबद्द्ल मला रेडिओ आणि माझे घरचे दोघांचं कौतुक करायला हवं.

    ReplyDelete
  10. प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण माणूस एकटा असलाकी हि गाणी आपलीच वाटतात ,प्रत्येकचे अनुभवपण वेगळे असतात ,महेशकाका

    ReplyDelete
  11. एकटेपणासाठी गाणी, पुस्तकं असे सोबती जरुर असावेत. धन्यवाद महेशकाका.

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.