Wednesday, May 26, 2010

मुंबईतला ब्लॉगर्स मेळावा....

खरं तर हा विषय तसा आता ब्लॉगविश्वावर जुना पण काही ब्लॉगु-ब्लॉगिनींनी जरा सांगितलं म्हणून किंवा स्वतःलाही लिहायचं होतं पण तेव्हा वेळेत न लिहिता आल्यामुळे उशीरा का होईना...आणि तसंही अजुन मे संपला नाहीये मग काय हरकत आहे?? शिवाय बाकीच्यांचे लेख त्यांचे ते नंतर वाचतील पण माझा अनुभव मी स्वतः नंतर कसा आठवणार (आत्ताच सगळ्ळ सगळ्ळ आठवत नाहीये तर...) या आणि अशा अनेक कारणांमुळे शेवटी मीही माझे दोन पैसे या विषयावर खर्च करायचे ठरवले आहेत (ही या विषयावरची शेवटची पोस्ट असेल अशी आशा..)संदर्भासहित स्पष्टिकरण किंवा कारणे दाखवा नोटीस अशा विषयांवर मी जास्त चांगलं लिहु शकेन हे आतापर्यंत चाणाक्ष वाचकांच्या धेनात आलं असेलंच पण तरीबी हे फ़क्त नमनाचं वाटीभर तेल होतं याची कृ.नों.घ्या...

तर ९ मे २०१० नेमकं मायदेशात असणं आणि मेळावाही असणं हा जरी समसमा संयोग असला तरी तो तिथल्या तिथे साधण्याची कसरत साधताना मला नक्की काय काय करावं लागलं (in short किती लोकांना टोप्या घालाव्या लागल्या) हे सांगणं नमनानंतर तितकंच आवश्यक आहे...(त्याने इतरांच्या मेळावासंबंधी लेखांपेक्षा वेगळं काही वाचल्याचं समाधानही वाचकांना लाभेल ही आशा). सगळ्यात प्रथम म्हणजे तिथे हक्काच्या रविवारवर हक्क (so called प्रेमळ) दाखवणार्‍या प्रेमळ नातलग,मित्रमैत्रीणींची संख्या त्याच आठवड्यात अचानक वाढल्याचं ध्यानात आलं.आयला म्हणजे तुम्ही इतर दिवशी तुम्ही सुट्टी घेऊन मला भेटाच किंवा जेवायला बाहेर/घरी न्याच असा आग्रह नव्हता पण सगळे रविवारसाठी अडून बसल्याने जरा मोठा लोचा झाला होता.कारण मी ब्लॉग लिहिते हे त्यातल्या ९९.९९% लोकांना माहित नाही मग कुठे जायचं हे खरं सांगायचा मार्ग मीच बंद केला होता. पण प्रत्येकाला दुसर्‍या कुणाचं तरी नाव सांगुन आयत्यावेळी सुटका करुन घेतली. मुख्य प्रश्न होता मुलाला इतका वेळ एकट्याला आईकडे सोडायचा पण नशीब की आईला तसं फ़ार काही सांगावं लागलं नाही पण नेमकी तिलाच त्या दिवशी एक काम (तेही दादरलाच) निघालं आणि आता मेगा ब्लॉकमध्ये ही लवकर आली नाही तर काय या टांगणीत मी दुपारभर होते पण नशीबाने ती तीन वाजता परतली आणि मी तडक सुटलेच..उगाच कुणी घरी टपकलं तर मग सुटका कशी करायची याचा विचार केला नव्हता. आणि लवकर निघाले तरी फ़ायदा झाला कारण इतकं करुन मेगा ब्लॉकमुळे बरोबर वेळेवर म्हणजे पावणे पाचला पोहोचले..(मी रोहन आणि महेंद्रकाकांना थोडी लवकर येईन असं सांगितलं होतं...मग पंधरा मिन्ट तर पंधरा मिन्ट लवकरशी मतलब काय??)

आल्या आल्याच सचिनने बॅच दिला आणि मग एक एक करुन ओळखीच्या मंडळीशी खरा परिचय/गप्पा/खेचाखेची करायला सुरुवात झाली..तसंच एक शुद्धलेखनाच्या नियमासंबंधी छोटेखानी पुस्तकही देण्यात आले (त्यांची संख्या मर्यादित होती त्यामुळे कदाचित उशीरा येणार्‍यांना मिळालं नसेल) पण माझ्यासारख्या ब्लॉगर्सनी संग्रही ठेऊन वापरावं असंच पुस्तक आहे. त्याबद्द्ल विशेष आभार.

सोनाली आणि आर्यनमुळे खरं तर मी आणि शमिकाही पुढे बसलो. त्यातल्या त्यात फ़ायदा म्हणजे ती जागा पंख्याच्या खाली होती. पण तसं वर असल्यामुळे थोडं कमी उकडत होतं (किंवा सवय झाली असणार) मेळाव्याची सुरुवात कांचनच्या भाषणाने झाली..त्यातला मला लक्षात राहिलेला मुद्दा/सुचना म्हणजे ज्यांना दिर्घ बोलायचं आहे त्यांनी शेवटी परिचय करुन द्यावा..अरे काय डोकं चाललंय यार, यांना नक्कीच आणखी काही मेळाव्यांचे अनुभव असणार असा मी विचार करतच होते आणि मग एक एक करुन परिचयांना सुरुवात झाली. सोनालीचा नंबर तसा लवकर होता आणि आर्यनचा सत्कारही होता.सुरुवातीचे काही थोडक्यात असतानाच एकदम मग आपल्या वयाचा गैरवापर करत काही ज्येष्ठांनी लांबण लावायला सुरुवात केली आणि तेही स्वतःचा ब्लॉग सोडून भलत्याच विषयांवर..’तारतम्य’ हा शब्द मराठीत नक्की आहे का याची शंका यावी असं झालं...त्यात मग उगाच आपण पळून गेलो तर? म्हणून घाईघाईत माझ्या ब्लॉगचं नाव इ. सांगुन पटकन परत आले.

तितक्यात नेमकी वडा-कटलेटची फ़ेरी सुरु झाली. त्यामुळे (बहुतेक) लांबण लावणार्‍यांनाही पब्लिकने सहन केलं...(कारण टाळ्यांचा कडकडाट करायला हात तर रिकामी हवेत की नाहीत??) असो...मुख्य मुद्दा हा की हा अल्पोपहार (आणि तो अल्प नव्हता..पुरुन उरुन उरेल पेक्षा जास्त म्हणजे किती? तेवढा...), कार्यालय हा सर्व खर्च कुणा अनामिकाने केला होता ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे...

कटलेट हा मला त्यातला त्यात जास्त न भावणारा प्रकार आणि वड्यापेक्षा तर नाहीच नाही (पक्षी: पहा माझं वडापुराण) आणि वड्याची चव खरंच एकदम हटके होती. मग इतरांचं ऐकता ऐकता कॉफ़ी पानही झालं...कॉफ़ी अशी मसालेदार (म्हणजे तेच ते जायफ़ळ इ. घातली) प्यायची सवय गेलीय त्यामुळे थोड्यावेळाने पुन्हा कॉफ़ी झाली हे वेगळं सांगायला नकोच...

फ़क्त आता पुढच्या बाकावर बसण्याची सहनशक्ती संपत आली होती. रोहनने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग गळ्यात दिल्यामुळे तशी अडले होते (आणि त्यात त्यामुळे माझं दोन सेकंदाचं परिचयसत्र रेकॉर्ड झालं नाही ते अलाहिदा) पण मग संधी साधुन मागच्या बाकांवर आले आणि एकदाचं हुश्श केलं..आता हळुहळु काही नंतर आलेले परिचयाचे लोकही भेटले..चुरापावला शोधायला जास्त कष्ट पडले नाहीत त्याच्या टी-शर्टवरच वडा-पाव लिहिलं होतं. मैथिली पुढे जाऊन बसल्याने तिच्यासाठी पुन्हा दोन मिन्टं पुढे जाऊन आले..नशीब नाहीतर ती नंतर लवकर पळालीसुद्धा. माझ्या आधीच्या कल्पनेप्रमाणे जी ओळखीची मंडळी भेटणार होती तीच भेटली. म्हणजे आनंद पत्रे, सुहास,सागर,देवेंद्र तसंच काही नवीनही परिचय झाले सचिन,आनंद काळे, इ. पण जास्त कल्पना नसताना भेटून दिलखुलास गप्पा मारणारी व्यक्ती म्हणजे राजा शिवाजी डॉट कॉमचे मिलिंद वेर्लेकर. त्यांचा खास परिचय रोहनने करुन मग त्यांचं छोटेखानी भाषण ऐकल्यावर त्यांचं अभिनंदन/.आभारासाठी गेले तर आम्ही एकंदरित ब्लॉगविश्व संबंधी बर्‍याच गप्पा मारल्या आणि नंतर चक्क त्यांनी या ब्लॉगला भेट देऊन कमेन्टही दिलीय.म्हणजे वाटलं होतं तसे काही नवे ब्लॉग परिचय होणं हा एक चांगला भाग म्हणता येईल...काही ब्लॉगर्सनी त्यांच्या ब्लॉगबद्दल थोडक्यात पण रंजक माहिती दिली...महेंद्रकाकांशी कुणी स्पर्धाही करतंय हेही नव्याने कळलं...(आता दुसरं कोण असणार ते....रविंद्र कोष्टी सोडून..पण हे त्यांनी स्वतःच सांगितलंय बरं) आदमी अच्छा होगावाले हरेकृष्णजींशीसुद्धा बोलायला मिळालं..त्याचवेळी महेंद्रकाकांनी आग्रहाने वड्याची आणखी एक प्लेट हातात ठेवली..आता खुद्द पंतप्रधानांना नाही कसं म्हणणार मग त्या वड्याचंही चीज (पोटात घालुन) केलं...:)

सगळे परिचय झाल्यानंतर मग काही तांत्रिक गोष्टींवरही चर्चा झाली ज्यांचा उल्लेख इतरत्र सगळीकडे झालाय..माझं लक्ष होतं त्याकडे पण तोवर घरुन फ़ोनही यायला सुरुवात झाली होती..पण रोहनने आधीच आपण एकत्र जाऊया म्हणून सांगुन ठेवलं होतं मग परत एकदा आईकडे पटवापटवी केली आणि निवांत शमिकाशी गप्पा मारायला सुरुवात केली. एकंदरित वेळ चांगला गेला होता.परत जाताना वाकड्या वाकड्या वाटा करुन रोहनने शेवटी घरापर्यंत सोडणे हा तर अपेक्षेचा परमबिंदु म्हणायला हवा..

सत्तरपेक्षा जास्त ब्लॉगर्सची उपस्थिती आणि फ़क्त मुंबईच नाही तर पुणे, नाशिक अशी महाराष्ट्रातील अन्य शहरे त्याचप्रमाणे हैदाराबाद सारख्या महाराष्ट्राबाहेरचे ब्लॉगर्स आणि last but not the least अमेरिकेतूनही येणारे प्रतिनिधी आणखी काय हवं संमेलन रंगलं हे सांगायला? शेवटी या मेळाव्याचा मुख्य उद्देश ब्लॉगर्स, वाचक या सर्वांमधला स्नेह वाढवणे हा होता आणि त्यात आपण पुरेपुर यशस्वी झालो आहोत.

32 comments:

  1. मस्त लिहिलंयस.. हे शुद्धलेखनाच्या पुस्तकासंबंधी कुठल्याच ब्लॉगवर वाचलं नव्हतं. (म्हणजे वृत्तांत लिहिणारे सगळे ब्लॉगरु उशिरा आले होते की काय?? ;) )

    एकंदरीत बॅक-बेंचर्सनी फुल मजा केलीत तर :) .. सहीये.. !!

    मेळाव्यासंबंधीचा शेवटचा वृत्तांत वाचूनही तेवढीच मजा आली. पुन्हा सगळ्या (वृत्तांतांच्या) आठवणी जाग्या झाल्या.. !!

    ReplyDelete
  2. धन्यु रे हेरंब...तेवढं तुझा फ़ोन आला होता ते राहिलं बघ लिहायचं..झालं वय आता आणि कितीवेळा एडिट करु??
    अरे मराठी शुद्धलेखनाचा उल्लेख महेंद्रकाकांच्या पोश्टेत आहे नं?? शंतनु ओकचे आभार (आता नाव कळलं...{पुन्हा तेच किती एडिट करु} आणि हे कंस....ओ नो...)
    ही एक लिंक पण त्यांच्या कमेन्ट्स मधली देतेय बघ....
    http://mac.softpedia.com/get/Internet-Utilities/Marathi-Dictionary.shtml

    ReplyDelete
  3. ते शुद्ध लेखांच्या पुस्तक लिमिटेड होत...बर झाल लिहिलास...आवडल.... :)

    ReplyDelete
  4. अपर्णा, पुन्हा एकदा माझ्या हुकलेल्या मेळाव्याच्या वाचून व ऐकून जमवलेल्या आठवणी जाग्या झाल्या. तू फोनवर सांगितले होतेस पण काही काही तपशील पोस्टमधूनच कळले. मस्त गं. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. अपर्णा, महिनाभरात आत्ता प्रथम मला नीट ब्लॉग वाचायला सवड होते आहे ... त्यामुळे तुझ वृत्तांत माझ्यासाठी अगदी वेळेत आहे बघ :)

    मेळावा आणि वडे हुकल्याचं पुन्हा एकदा वाईट वाटातंय.

    ReplyDelete
  6. मेळाव्याचा अजून एक वृत्तांत भरत आलेल्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली! ... ;)
    जोक्स अपार्ट..एकदम वेगळा लिहिलाय वृत्तांत..मस्त वाटलं. सगळीकडे जे लिहिलं ते पुन्हा इकडे पण लिहितो...छ्या, थोडक्यात हुकला! :(

    ReplyDelete
  7. hi,

    Kashi aahes India tun aalaya pasun tu ekdam mast lihite aahe ... mala aawad le kuthe hi mala athavan yete aahe /bore hote aahe etc etc aale nahi. Sahi aahe keep it up ...
    me tuza bhatkanti wala pan blog vachala comment la vel milat nahi pan sagale vachat aste -Ashwini

    ReplyDelete
  8. मेळाव्याचा अजून एक वृत्तांत भरत आलेल्या जखमेवरची खपली पुन्हा निघाली! ... ;)
    जोक्स अपार्ट..एकदम वेगळा लिहिलाय वृत्तांत..मस्त वाटलं. सगळीकडे जे लिहिलं ते पुन्हा इकडे पण लिहितो...छ्या, थोडक्यात हुकला! :(

    +1...
    अपर्णा, मस्तच झालाय गं वृत्तांत...तूझा मात्र त्या extra वडा/कटलेट बद्दल निषेध :)

    रोहणा अरे लवकर ब्लॉगर्स ट्रेकचे आयोजन कर रे....

    ReplyDelete
  9. श्रीताई, तुला फ़ोनवर फ़ार डिटेल्स द्यायला त्या दोन सभ्य गृहस्थांनी मनाई केली होती गं...पण तरी मी वड्याचं सांगितलं होतंच तुला...तू यायला हवी होतीस असं मला फ़ार वाटत होतं...त्यानिमित्ताने आपणही भेटलो असतो...

    ReplyDelete
  10. ये हुई नं बात गौरी...अगं तू आली असतीस तर खास चॉकोलेट पण होतं गं माझ्याकडे....वड्याचं काय ते तुला कुठेही मिळतील...पण आता म्होरल्या टायमाला निदान भेट तरी होईल का माहित नाही....

    ReplyDelete
  11. @The Prophet थोडक्यात म्हणजे नेमका कसा या विषयावर आता एक पोस्ट टाकुन मोकळे व्हा...:)

    ReplyDelete
  12. अश्विनी फ़ारा दिवसांनी दिसतेयस....अगं आता काही दिवसांचा ब्रेक झाला म्हणून कदाचित चांगलं सुचतंय..पुन्हा 'जैसे थे' होईलच....आणि भटकंतीवरही तुझं स्वागत...तो माझा पहिला आणि खरं तर जास्त मनातला ब्लॉग आहे..ती पोस्ट तर मुंबईतच लिहुन झाली होती. इथे फ़क्त टाइप केली...

    ReplyDelete
  13. तन्वी तेच म्हटलं मी की कुणाच्या दातात अजुन वडा ,कसा अडकला नाही ते?? तरी मी कटलेट स्वतःहुन सोडला बरं...
    आणि रोहणाच्या ट्रेकचं सांगु का तुला तो तुम्हाला कुठल्याही चिखलाळलेल्या जंगलात नेऊन सोडून देणार आहे बघ...म्हणजे पुन्हा त्याच्या पाठी कुणी लागणार नाही....:)

    ReplyDelete
  14. सागरा, स्वारी(S O R R Y) अरे तुझ्या कमेन्टच्या उत्तराऐवजी काही भलतंच पेश्ट झालं होतं...
    आणि बाबा शुद्धलेखन शब्द तरी शुद्ध लिही रे..तुला मिळाली का प्रत की स्कॅन करुन पाठवावी लागेल??? :)

    ReplyDelete
  15. मला नाही वाटत की हा ब्लॉग मेळावा वृत्तांत शेवटचा आहे.. माझ्या ड्राफ्ट मध्ये आहे.. पण तो नक्कीच वाचल्या जाणार नाही ;-)

    बाकी तुझ्याशी गप्पा करुन मजा आली.. बॅकबेंचर्स....

    ReplyDelete
  16. Mast vruttant...Barr zale lihiles te...nahitar aamhi evadhya changalya post la mukalo asto...
    Aani ho ek sangu, Khoop aawadalis tu mala... :)
    phar gappa nahi marata aalya...pudhalya weli ithe yeshil tevha bhetuyaat aapan...

    ReplyDelete
  17. मस्त आहेत फोटो (आणि लेखही) :)

    रोहनजी ब्लॉगर्स ट्रेक आमचीही फर्माइश

    ReplyDelete
  18. इतक्या घाई गर्दी मधे पण तुम्ही आलात यातच खूप समाधान आहे. बरं रात्री चौथा अंक नाही लिहिला खादाडीचा. तोच गोमंतक मधला फिश करीचा.. :)

    ReplyDelete
  19. आनंद, अरे टाक नं अजुन मे संपायचा आहे...आणि ड्राफ़्टमध्ये ठेऊन काय करतोयस?? टाकलास तर आम्हाला आनंदच आहे...

    ReplyDelete
  20. मैथिली तू भेटल्यामुळे मला पण मजा आली...माझे कॉलेजमधले दिवस आठवले...पुढच्या वेळी वेळ ठेऊन ये...:)

    ReplyDelete
  21. प्रसाद तुझ्या "वडापाव" शर्टमुळे फ़ोटो जास्त चमकतोय...:) आणि ट्रेकचं मात्र तुला स्वतःलाच शोधावं लागेल मी आग्रह करणार नाही..:)

    ReplyDelete
  22. अरे काका, बस क्या?? आणि काय तुम्ही भांडाफ़ोड केलीत...मी तर फ़क्त वाकड्या वाकड्या वाटेने लिहेन..मग निवांतपणे लिहेन की खादाडीवर सुद्धा....आज वाचकांना फ़क्त वडा-कॉफ़ीची मेजवानी पुरे....:)

    ReplyDelete
  23. ये हुई ना बात..मस्त लिहाला आहेस वृतांत आनंद सोहळ्याचा...तुला भेटून खूप बर वाटला ग.
    त्या पुस्तीकेचा म्हणशील तर त्या मोजक्याच होत्या...परत माझ्या मनातील वडे भूक चाळवली बघ तुझ्या आग्रहाच्या प्लेटमुळे.. हरकत नाही..सगळे मुद्दे मांडलेस (एकतर्फी स्पर्धेचापण :D)
    पण काय हे तू एकही फोटू नाय काढलास आमच्यासोबत...कट्टी :(

    ReplyDelete
  24. सुहास, अरे तो सगळ्यांचा फ़ोटो काढला तेव्हाही तू वडेच खात होतास का?? आणि माझ्या कॅमेर्‍याने ज्याने फ़ोटो काढले त्यांनी तुला कव्हर नाही केले बघ....मी काय करणार...:)

    ReplyDelete
  25. अपर्णा,
    मला वाटलच होत तू ’त्या’ वक्त्याम्चा उल्लेख करणार, काय पकलो होतो ना आपण. मला तर अजुनही कांचनचा चेहेरा आठवतो आणि हसायला येतेय. धमाल आली मेळाव्याला.
    त्या तू दिलेल्या मातीचे मी आर्यनला काही प्राणी बनवून दाखवले पण चित्रातल्या प्राण्याम्शी काही साधर्म्य नसल्याने त्याला ओळखता नाही आली :)
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  26. ती पुस्तके सर्वांनाच मिळाली नाहीत ना... :) कशी आहेस तू??? सेट झाले का सर्व? मी कामावर पोचलोय आज. उदयापासून ब्लॉग्गिंग पुन्हा सुरू... :)

    तन्वी... ब्लोगर्स ट्रेक बद्दल १-२ दिवसात पोस्ट टाकतोय... :0

    ReplyDelete
  27. सोनाले, तुझ्यासाठी मी पुढच्या बाकांवर होते नाहीतर मागुन टाळ्यांची बरसातच व्हायची..पण धमाल आली...
    तुझ्याकडे प्राणी शिकायला मलाच यावं लागेल..मला एक पोळपाट लाटणं सोडलं तर काही जमत नाही मातीच्या गोळ्याचं..त्याबाबतीत मीच मातीचा गोळा आहे...

    ReplyDelete
  28. रोहन अरे सेट व्हायला हा आठवडा जावा लागेल...खरं तर भलत्यावेळी उठुन बसतो म्हणून ब्लॉगवर येते..तुझ्या पोस्टा येऊदेत...आपल्याला पुढच्या वेळेस बार्बेक्यु नेशनचा प्लान करावा लागेल बरं...आणि ट्रेक काय रे करशील..तू तसाही भटकायला तयार असतोच ना?? ने कुठेतरी चिखलात आणि लोळवुन आण सर्वांना....:)

    ReplyDelete
  29. >>>>>रोहणा..
    >>>>आणि ट्रेक काय रे करशील..तू तसाही भटकायला तयार असतोच ना?? ने कुठेतरी चिखलात आणि लोळवुन आण सर्वांना....:)

    अगं काय हे!! तो बरा नेईल आणि जाणारे काय लहान मुलं आहेत होय??? सगळ्यांना चिखलात जायचे की नाही, लोळायचे की नाही ते समजतेय असा निदान माझा तरी समज आहे ;)

    काही अपवाद सोडले तर सगळे ब्लॉगर्स निदान वयाची पंचविशी गाठलेले आहेत म्हणजे गद्धे पंचविशी ओलांडलेले... कोण नाय बा लोळनार...

    मला कल्पना आहे बरेचदा आपण एखादे कमेंट लिहीतो किंवा कमेंटला उत्तर देतो तेव्हा आपल्या मनात एक विचार असतो आणि वाचणाऱ्याला आपल्याला नेमके जे अभिप्रेत आहे ते समजत नाही... असेच काही माझे झाले आहे असे मी इथे मानतेय.. तरिही आम्ही नाय बा लोळनार :D :D

    ReplyDelete
  30. केवळ तेवढ्यासाठी पुन्हा या कपर्दिक ब्लॉगवर येऊन सल्ला दिल्याबद्द्ल अत्यंत आभारी तन्वीताई....

    ReplyDelete
  31. आज तुझ्या ब्लॉगवर ब-याच दिवसांनी आले. तशी ब-याच दिवसांनी आज ब-याच ब्लॉग्सवर जाते आहे. असो. तुझ्याशी जास्त बोलायला वेळ मिळाला नाही पण मायदेशी आल्यावर तू वेळ काढून मेळाव्याला आलीस, हे खूप बरं वाटलं. आता तुझा ब्लॉग वाचताना तुझा चेहेरा डोळ्यासमोर येतो. शब्दबंधला तू होतीस का? माझं या वेळेचंही हुकलंय.

    ReplyDelete
  32. कांचन, तुम्हा सर्वांची मेहनत होती आम्ही फ़क्त आस्वाद घेतला...:)
    शब्दबंधमध्ये शेवटच्या सत्रात (आणि शेवटचं अभिवाचन) होते...पुढच्यावेळी नक्की प्रयत्न कर...तोही एक छान अनुभव आहे...

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.