Wednesday, March 31, 2010

ब्लॉगवाचक...

ब्लॉग लिहायला घेतला की हळुहळु वाचकसंख्या वाढायला लागते..जितके नेमाने आपण लिहू लागतो तितकेच नित्यनियमाने काही लोक आपल्याला वाचकरूपाने भेटतात..प्रत्येक ब्लॉगसाठी अत्यावश्यक असलेली ही जात आणि स्वतः ब्लॉगरही याच जातीतला. निदान मी तरी...अरे आता आपण ब्लॉग करतो म्हणजे आपणही दुसर्‍या ब्लॉगर्सचं वाचायला हवं नं?? म्हणजे मी फ़क्त लिहिणार आणि तुम्ही वाचा या प्रकाराला आम्ही तरी लेखक म्हणतो आणि त्यांची पुस्तकं आम्ही विकत घेऊन वाचतो...(चकटफ़ू लिहितात ते ब्लॉगर अशी नवी व्याख्या आहे का??कोण रे ते ???)....तर अशाच ब्लॉगवाचन आणि ब्लॉगलेखनातून जाणवलेले काही ब्लॉगवाचकांचे प्रकार..


१. मित्र वाचक....साध्या शब्दात सांगायचं तर हे आपल्याला आधी ओळखत असणारे आणि तुमच्या ब्लॉगवरही येणारे दोस्त लोक. या लोकांचं एक बरं असतं, मैत्री असल्यामुळे ते तुमच्या ब्लॉगचे इमानी वाचक असतात आणि कुणीच काही म्हटलं नाही तर निदान यांचे कौतुकाचे दोन शब्द तरी असतात...काही काही ब्लॉगवर तर मित्रपरिवारांचाच इतका सुकाळ असतो की त्यापुढे मजसारखा पामर वाचक प्रतिक्रिया द्यायलाही कचरतो..उगाच त्यांचं चाललंय त्यात आपण कशाला ढवळाढवळ असंही वाटतं...दृष्ट लागावी असा मित्रपरिवार असणारा ब्लॉग आपलाही असावा असं सुरुवातीला मला वाटायचं पण नंतर आधीच्या मित्रमैत्रीणींना या विश्वात आणण्याचं तसं काही काम नाही हा एक प्लस पॉइंट माझ्यासारख्या ब्लॉगर्सना आहे असं त्याकडे सकारात्मक पाहायला मी शिकले..आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे वाचकांचा यापुढील प्रकार...


२. वाचक मित्र....मित्र वाचक आणि वाचक मित्र टायपायला चुकलेबिकले नाही...तर ते तसंच आहे..वाचक मित्र म्हणजे तुम्ही लिहित जाता, ते वाचत जातात आणि मुख्य म्हणजे प्रतिक्रिया देत जातात. कधी कधी तर प्रतिक्रियांमधुन तुम्ही दोन-तीन पेक्षा जास्तवेळा एकमेकांशी संवाद साधता आणि मग ब्लॉगर आणि वाचक यात एक वेगळी मैत्री निर्माण व्हायला लागते..प्रतिक्रियांमधुन बोलता बोलता कधी तुम्ही चॅट आणि बझ्झवर बोलायला लागता कळत नाही..एकाच देशात असलात तर मग फ़ोनाफ़ोनीपण सुरू होते हे असतात वाचक मित्र...म्हणजे मित्र झाला स्टार सारखं वाचक झाला मित्र...याचे तोट्यापेक्षा फ़ायदे जास्त आहेत....कारण त्यांना तुमच्या लेटेस्ट पोस्ट्स माहित असतात आणि त्यामुळे तुमचा संवाद खर्‍या अर्थाने सुसंवाद व्हायला सुरुवात होते....तोटा म्हणजे कधीतरी हाच सुसंवाद विवादातही रुपांतरीत होऊ शकतो पण तेवढी एक काळजी घेतली तर वाचक मित्रासारखा ब्लॉगरसाठी दुसरा मित्र नसावा....

३. धुमकेतू वाचक....हे वाचक आपल्यापैकी बर्‍याच जणांना अधुन-मधुन भेटत असतील..(म्हणजे धुमकेतुने कितीवेळा भेट द्यावी असं वाटतं??) हां तर एखाद्या दिवशी मेलबॉक्स उघडावी आणि एकाच व्यक्तीने अगदी जुन्या-पुराण्यापासून नव्यापर्यंत चार-पाच पोस्टवर एकदम कॉमेन्टून तुमची सकाळ प्रसन्न करून टाकावी ते हे वाचक...मीही त्यातली आहे कारण काही ब्लॉगावर नित्यनियमानं जाणं होत नाही आणि मग एखादा दिवशी एकदम छप्पर फ़ाडके कॉमेन्टून टाकण्यासारखं वाचायला मिळतं...मग पुन्हा बरेच दिवसांसाठी गायब असे हे वाचक खरं तर सर्वच ब्लॉगर्सना हवेहवेसे वाटत असतील नाही?? निदान मलातरी आवडतं बाबा सक्काळ सक्काळी असा एखादा धुमकेतू आलेला...

४. सडेतोड पण निनावी वाचक...थोडक्यात ऍनोनिमस...ही जात जरा कधीकधी डंखधारी असू शकते..पण निंदकाचे घर असावे शेजारी तसे असाही कानपिचक्या देणारा एखादा वाचक असावा असं वाटतं..पण जोवर त्यांच्या कॉमेन्ट्स आपण इतरांच्या ब्लॉगवर वाचतो तोस्तर...एकदा का हा गडी आपल्या ब्लॉगवर आला की कुठून आली ही पिडा असं वाटतं...तरी एक बरंय जे ब्लॉगर्स कॉमेन्ट्स अप्रुव्ह करुन मगच प्रदर्शित करतात ते निदान यांना लांबुनच घालवून देऊ शकतात पण माझ्यासारखे ब्लॉगर्स कुणी काही लिहिलं तरी ते तसंच ठेवतात...आजकाल ब्लॉगिंगचा प्रसार जास्त झालाय का माहित नाही पण निदान माझ्याकडे तरी निनावी माणसं फ़ार दिसत नाहीत...

५. गडबडीत असणारे वाचक...हे वाचक मला फ़ार आवडतात..एक म्हणजे बर्‍याचदा हे फ़क्त वाचक असतात. म्हणजे यांचा स्वतःचा ब्लॉग नसतो पण तरी यांना बर्‍याच जणांचे ब्लॉग वाचायचे असतात. मग त्यातही तुमची एखादी पोस्ट आवडली किंवा काही पटलं नाही तर अगदी इंग्रजी किंवा मिंग्लिशमध्येतरी ते एखादी ओळ तुमच्यासाठी लिहून जातील....नेहमीच यांच्याकडून हे होत नाही पण कधीतरी ते तुमचे वाचक म्हणून तुमच्या ब्लॉगसाठी इतकं तरी करतील म्हणून म्हणायचं गडबडीत असणारे वाचक...

६. परतफ़ेड वाचक....खरं तर हे वाचक म्हणजे दुसरे ब्लॉगरच असतात..काही वेळा नेमकं आपण म.ब्लॉ.नेटवर जायला आणि यांची एखादी पोस्ट तुम्हाला भुलवायला एकच गाठ पडते. मग तुम्ही अगदी आवर्जुन त्यांना प्रतिक्रिया लिहिता आणि मग त्याद्वारे तुमच्या ब्लॉगवर येऊन हे ब्लॉगरही तुमच्या ब्लॉगवर येऊन एखादी प्रतिक्रिया देतात..सुरुवात निव्वळ परतफ़ेडीने होते पण जर एकमेकांच्या ब्लॉगवरचे विषय नेमकेच एकमेकांना पटले की मग अजून एक, अजून एक करता हे वाचक आणि तुम्ही एकमेकांचे क्र.२ चे वाचकही बनतात..शेवटी मराठी ब्लॉग-विश्व म्हणजे”एकमेका सहाय करू अवघे लिहु ब्लॉगे’ आहेच की...मी नेहमी माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देणार्‍यांचे ब्लॉग किमान एकदा वाचून पाहाते आणि खरं तर त्यामुळे कित्येकवेळा मला असे अनेक छान छान ब्लॉग मिळतात जे मग नंतर कायम वाचले जातात..त्यामुळे ब्लॉगविश्चातली ही आणखी एक महत्वाची जात म्हणायला हरकत नाही..

७. मूक वाचक....सगळ्याच ब्लॉगवर आणि तेही मराठी ब्लॉगवर फ़ार मोठ्या संख्येने आढळणारा वाचकांचा प्रकार म्हणजे मूक वाचक...खरं तर कुठल्याही मराठी ब्लॉगवर जा, जर नियमितपणे लिहीणारा असेल तर ब्लॉग-हिट्स दहा-पंधरा हजार आरामात असतात तरी कित्येक पोस्ट्स कॉमेन्टवाचुन पडलेल्या असतात किंवा त्यावर फ़क्त क्र.१ आणि २ च्या वाचकांच्या प्रतिक्रिया असतात...नाही आवडलं तर तेही लिहावं पण काही तरी बोलावं की नाही असा प्रश्न पाडणारे हे सर्व वाचक...यांच्याशिवायही पान हलत नाही कारण लिहिलेलं कुणी वाचतंय ही भावनातरी यांच्यामुळे मिळते..पण जर हे सगळे जर एक एक करून बोलायला लागले तर मात्र संपुर्ण मराठी ब्लॉगिंग विश्व ढवळून निघेल...

मग राहिलंय का काही लिहायचं??? येऊ द्यात की प्रतिक्रियेत...

तळाच्या वरची टिप....ही पोस्ट वाचुन जर या ब्लॉगवरचे वरच्या सगळ्या प्रकारचे वाचक बोलायला लागले तर भरुन पावलं असं समजेन...


खरी तळटीप....याच पोस्टवरुन प्रेरणा घेऊन कुणी आता ब्लॉगर्सचे प्रकार पोस्ट लिहायला हरकत नाही...मी त्यासाठी महेंद्रकाका आणि हेरंबला टॅगतेय...आणि त्यांनी आणखी कुणाकुणाला शोधून आणि नवे नवे पोस्ट्स टॅग करून ही साखळी थोडी खेचावी अशी विनंती....

57 comments:

  1. मागची पोस्ट 'कालच्या प्रतिक्रियां' वर आणि आजची पोस्ट तर चक्क 'वाचकां' वर.. क्या बात है !! ब्लॉगवाचकांची एवढी काळजी यापूर्वी कोणी घेतली नसेल !! खरंच ...

    तुझ्या टॅगप्रमाणे लवकरच ब्लॉगर्सचे प्रकार लिहायला घेतो. अर्थात महेंद्रकाकांनी त्यांचा स्पीड थोडा स्लो केला तर. नाहीतर त्यांची पोस्ट आधीच आलेली असेल :P .. In any case मी हा धागा पुढे नेईनच :)

    ReplyDelete
  2. हेरंब ही पोस्ट कधीच लिहायचं मनात होतं पण राहिलं होतं...लिहिता लिहिता तुझा अजून "मांजा" मूड आहे हे लक्षात आलं म्हणून तो बदलावा यासाठी टॅग केलं आणि महेंद्रकाकांनाही लिहीलंय पण माहित नाही त्यांचा मार्च मूड संपला नसेल तर तुच लवकर लिहीशील...तुला कसे वाटले हे प्रकार???आणि हो यात काही भर नाही घातलीस...मला वाटलं होतं तुझ्याकडे जास्त माहिती मिळेल...(तू शंभरी गाठतोयस ना फ़ॉलोअर्सची म्हणून...)

    ReplyDelete
  3. लवकरच लिहितो.आज नसेन ओ एल .:)

    ReplyDelete
  4. धन्यवाद महेंद्रकाका...तुमच्या पोस्टची वाट पाहीन....तसंही हेरंबनेही हो म्हटलंय आता बघुया कोण पहिलं पोस्टतो...:)

    ReplyDelete
  5. हे..हे..हे... धुमकेतु वाचक... मस्त झालीये पोस्ट...

    ReplyDelete
  6. धूमकेतू वाचक मस्तच...अन बरच निरीक्षण केल आहेस तू...महेंद्र्काका व हेरंब लिहितीलच यावर तू पण लिहून पहा...

    ReplyDelete
  7. heheheh aata me kuthalya vachakat modate he baghat hote ...kadhi kadhi muk vachak aste kadhi dhumketu hehehe javu det ......... baki post ekdam sahi ha ......

    _Ashwini

    ReplyDelete
  8. धुमकेतू. . .लय भारी. . .चांगली झाली आहे पोस्ट!!!

    ReplyDelete
  9. धन्यवाद आनंद,सागर,आणि मनमौजी....ही पोस्ट जेव्हा मला एक धुमकेतू वाचक मिळाला तेव्हाच डोक्यात आली पण तरी प्रत्यक्षात लिहायला शेवटी आजचा मुहुर्त उजाडला..

    ReplyDelete
  10. अश्विनी, तू माझ्या ब्लॉगची तरी गडबडीत असणारी वाचक आहेस...निदान मला तरी तुझ्या कॉमेन्ट्समध्ये तू कामाच्या गडबडीत का होईना पण पोस्ट वाचुन पटकन प्रतिक्रिया देतेस असं वाटतं....

    ReplyDelete
  11. मी धूमकतू वाचक / लेखक बरं का :)

    मस्तच लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  12. धुमकेतू... आपलं गौरी धन्यवाद बरं का....:)
    लेखकांच्या कॅटेगरी येताहेत अजुन पण त्यातही हा अवतार हवाच....

    ReplyDelete
  13. वर्गीकरण पटलं अगदी. मी बरेचदा मूक वाचक किंवा परतफेड वाचक मोडमधे असतो. एखादी पोस्ट आवडली किंवा पटली तर नक्की कॉमेंट टाकतो.
    आरएसएस वाचक हा आणखी एक प्रकार सुचवावासा वाटतोय. हे लोक प्रत्यक्ष ब्लॉगवर न येता ब्लॉगच्या RSS फीड्स सबस्क्राईब करतात आणि गूगल रीडर किंवा इतर फीड रीडर्सच्या सहाय्याने वाचतात. आवडत्या ब्लॉग्जवर ताजंताजं काय आलंय ते बघून फारच आवडलं तर कॉमेंट टाकायला येतात.

    ReplyDelete
  14. वा... विचक्षणा मस्त केली आहेस... :) बहुदा सर्वच प्रकार समाविष्ट झाले आहेत.. मी स्वतः मोजक्या ब्लोग्सचा वाचक मित्र, अनेक ब्लोग्सचा धुमकेतू मित्र आणि चिक्कार ब्लोग्सचा मूक वाचक आहे... शेवटी प्रत्येक लेखक हा कोणा ना कोणाचा मूक वाचक असतोच ... :) काय बरोबर ना???

    ReplyDelete
  15. JaguarNac यांनी म्हणल्याप्रमाणे मी आपल्या ब्लॉगचा अद्रुष्य वाचक आहे. मी आपला ब्लॉग RSS Feed च्या माध्यमातून गूगल रीडर वर वाचतो.
    आपल्या सर्व पोस्ट मी वाचल्या आहेत पण प्रतिक्रीया मात्र १ च पोस्ट वर दिली.

    आपला,
    (वाचक) अनिकेत वैद्य.

    ReplyDelete
  16. अपर्णा,
    मला कुठल्या खोक्यात बसवशील मलाच माहीत नाही ! पण तसा मी धूमकेतूशी जवळीक सांभाळणारा म्हणावे लागेल की आणखीन कोणी ?...., पण तरीही नक्की माहीत नाही ! ज्या अर्थी इतक्या सुक्ष्मपणाने तू वाचकांचे वर्गीकरण केलॆ आहेस तेव्हा त्या त्या वर्गातील प्रमुख वाचकांची यादी तुझ्याकडॆ नक्की असणारच ना ! मग मिसालके तौर पर थोडी यादी दिलीस तर वर्गीकरणातॊल सुक्ष्म भेद समजायला बरे नाही का होणार ?

    लेख मात्र अफलातून आहे व विचार करायला लावणारा आहे. मला मात्र टॅगू बिगू नकोस कारण मी काही लेखकू नाही !!

    ReplyDelete
  17. छान वर्गीकरण केलयेस.. मी पण धुमकेतू वाचाकांमध्येच मोडतो.

    ReplyDelete
  18. ब्लॉग लिहिण्यास सुरवात केली तेंव्हा 'मित्र वाचक' या वर्गाने खूप साथ दिली नंतर 'वाचक मित्र' भेटत गेले त्यात काही 'धुमकेतू मित्र' हि होते आणि आहेत.
    हे 'निनावी'वाले प्रकरण कधी कधी खूप अस्वस्थ करते मला कोणीतरी जाणून बुजून असे करत आहे असे मनात येते माझ्या
    एवढे गडबडीत असतानाही प्रतिक्रिया देतात म्हणून 'गडबडीत असणारे वाचक' मला खूप आवडतात आणि शेवटचे 'मूक वाचक' यांच्याशिवाय आपल्याला करमतच नाही बुआ
    काहीही न बोलता खूप काही बोलून जाणारे म्हणजे 'मूक वाचक'
    आणि हि प्रतिक्रिया वाचून माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देऊन 'परतफेड' करायची इच्छा झालीच तर त्याला मी जबाबदार नाही बर का ;)

    ReplyDelete
  19. एकदम मस्त लिहिले आहेस.
    मला कळतच नाहिये मी कुठल्या प्रकारात बसते ते, एक Confused वाचक :)
    सोनाली

    ReplyDelete
  20. आरं तिच्या नॅकोबा त्ये आर.एस.एस.वाले राहुनच ग्येले बगा....खरं तर त्या फ़ीड प्रकारवालेही एक प्रकारचे मूकवाचकच आहेत पण त्यांना वेगळ्या प्रकारात घालायचं राहिलंच...आणि मुख्य यांच्यामुळे ब्लॉग हीट्स कमी होत असणार नाही का?? शिवाय आले तर आले कॉमेन्ट द्यायला नाहीतर विसरले की गेलं...

    ReplyDelete
  21. रोहन खरं तर तुझी प्रतिक्रिया डिट्टो माझी म्हणून याच ब्लॉगवर द्यायला हवी...विचक्षणा हा शब्दही कित्येक वर्षांनी ऐकल्यासारखा वाटतोय...चलं नुस्तं समुद्राचं वारं पिऊनही तुमचं डोक भन्नाट चालतं म्हणायचं राजे....

    ReplyDelete
  22. अनिकेत या पोस्टच्या निमित्ताने एखादा मूकवाचक स्वतःहून प्रगटेल असं स्वगत मी केलंच होतं आणि त्यानुसार आपण आलात...आता यापुढेही अदृष्य राहायचं का हे मी तुमच्यावरच सोडेन पण प्रत्येक ब्लॉगरला प्रतिक्रिया देणार्‍या वाचकांबद्दल कांकणभर प्रेम अधिक असतं हे मात्र मान्य करायला हवं..:)

    ReplyDelete
  23. हे काय पेठेकाका आता लेख लिहिल्यावर यादी पण मीच द्यायची का...बघा नं इथंच लोकं कशी घडाघडा स्वतःच मान्य करताहेत ती....आणि टॅगचं म्हणाल तर हा थोडा वेगळा टॅग आहे आणि मी तर आधीच टॅगलंय आता पुढे काय होतं ते त्यांच्यावर....
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.....

    ReplyDelete
  24. प्रीतम अरे मी असं ऐकलंय की तू ब्लॉग लिहायचास पण...तिथुनही अदृष्य होतोस त्याचं काय???

    ReplyDelete
  25. विक्रम मी आतापर्यंत वाचलेली एकदम वेगळी आणि मस्त प्रतिक्रिया...आता मी काय आणखी लिहू..मी मूक झाले....

    ReplyDelete
  26. सोनाली confused वाचक म्हणून पर खरं एक प्रकार करता आला असता पण त्यात मग तुला बसवता नसतं आलं...तशी तू बरीच सुसंबद्ध आहेस...(हे असे शब्द म्हणजे त्या रोहणाच्या विचक्षणाचा परिणाम असावा....)

    ReplyDelete
  27. विक्रम, मला वाटतं आज पहिलीच प्रतिक्रिया आहे म्हणजे स्वागत तर केलंच पाहिजे...मग क्रं ५ आणि ७ मधुन बाहेर यायचा विचार आहे का??

    ReplyDelete
  28. अपर्णा, वाचकांचे वर्गीकरण मस्तच गं..... :)

    ReplyDelete
  29. हम्म्म...कुठे गायब होतीस तू??? आता इतक्या उशीरा कॉमेन्ट ??? छ्या....धन्सं गं....

    ReplyDelete
  30. अपर्णा.. सध्या 'अरिमित्र विचक्षणा' या विषयावर वाचतो आहे मी... :) म्हणुन सुचले एकदम... :D

    ReplyDelete
  31. बाकी पोस्ट फक्कड झालीय, निरीक्षण खूप छान करतेस. मानला :)

    मी कुठे मोडतो, तूच सांग ग.

    ReplyDelete
  32. सुहास धन्यवाद...अरे पण तुला हे स्वतःला ठरवता यावं म्हणून तर ही पोस्ट लिहिलीय...

    ReplyDelete
  33. छान छान! वेगळा विषय आणि छान मांडणी.
    तू वाचकांचे आणखी काही प्रकार आहेत का? असा प्रश्न केला आहेस नां! तर तो प्रकार म्हणजे मॉकटेल वाचक (हे अर्थात तुझी पोस्ट वाचल्यानंतरच सुचलं). मी स्वत: अशीच आहे. कधी कधी अगदी रोज धुप घालायला निघाल्यासारखी झाडून सगळे ओळखिचे-अनोळखी ब्लॉग वाचून प्रतिक्रीयाही देत असते तर कधी कधी स्वत:सकट इतर कोणत्याही ब्लॉगवर आठवडे न आठवडे फ़िरकतही नाही. मूड बनविणारी पोस्ट असेल (आणि पोराचं इश्शी ममं निन्नी आटपलं असेल तर) सविस्तर प्रतिक्रीया (आत्ताही अशीच दूर्मिळ सुखावह घटिका आहे :) म्हणून तर हे इतकं सविस्तर टायपतीय). अशा रीतिनं तू उल्लेखलेल्या (ऍनॉनमस वगळून) सर्व प्रकारांचं मिक्श्चर असणारेही वाचक आहेत. (हे वाचक काही ब्लॉगवर सविस्तर प्रतिक्रीया देतात तर काही ठिकाणी आपल्या येण्याचा स्टॅम्प मारून जातात :))

    ReplyDelete
  34. शिनु अगं हे भेळेचं माझ्या मनात आलं होतं आणि लिहिता लिहिता कधी विरलं कळलंच नाही बघ....पण तुझं नामकरण मला आवडलं....मॉकटेल वाचक....यावेळी मुलांनी भलताच सपोर्ट केलेला दिसतोय..प्रतिक्रिया सविस्तर आणि खुमासदार....आभार...:)

    ReplyDelete
  35. चांगल निरीक्षण आणि छान मांडणी...आमच्या सारख्या वाचक वर्गासाठी एक पोस्ट बर वाटल (हो मी सुदधा ’ काय वाटेल ते ’ द्वारे एक वाचक म्हणूनच या ब्लॉगजगतात आलो होतो..पण मग इतर अनेक ब्लॉग वाचुन बदला :) घेण्यासाठी लिहायला सुरुवात केली...असो छान पोस्ट..
    -दवबिंदु (एक धुमकेतुसारखा वाचक मित्र )

    ReplyDelete
  36. देवेंद्र तुझं स्वतःबद्दलचं निरीक्षणही छान केलंस..धन्यवाद......

    ReplyDelete
  37. आपुण बी ज्यांचे ब्लॉग्ज आवडतात, त्यांची आर.एस.एस. फीड ग्रॅब करून ठेवलिय.. जरा काही वेगळं वाटलं (पोस्ट टायटल!) की हम खींचे चले आते हाँय़..! (हमरा हिन्दी जरा कच्चा हाँय!)

    बाकी ते धुमकेतू कॅटेगरीमंधी पण आपूण बसत आसन, पण सगळेच त्या कॅटेगरिचे म्हणून राह्यलेत, म्हणून जाऊ द्या म्हणलं! ;)

    पोस्ट एकदम झक्कास झालीय बरं तायडे...!

    - विशल्या!

    ReplyDelete
  38. आपकी प्रतिक्रियाने हमकु भी थोडा स्फ़ुरण चढेला है.....ठांकु ठांकु बरं विश्ल्या....पी.एल. मध्ये चांगली कार्य करतासा तुमी....

    ReplyDelete
  39. आजुन पी.एल. चालू नाही झालं.. आज जरा शिल्लकचा वेळ आहे, व अभ्यास करायचा तसा मूड नाहिये म्हणून बसलोय तुम्हा लोकांच्या पोस्टा वाचत!!!

    ReplyDelete
  40. मी सध्या तरी एक परतफेड वाचक....
    बाय द वे....वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा!

    ReplyDelete
  41. @The Prophet...ब्लॉगवर स्वागत..परतफ़ेडींमध्ये काही चांगलं वाचायला मिळालं असेल अशी अपेक्षा....परतफ़ेड कार्यक्रमात काही चांगले ब्लॉग मला मिळालेत त्याची आठवण आली....:)
    आपण आवर्जुन लिहिल्याबद्दल धन्यवाद...

    ReplyDelete
  42. मस्तं लेख! वाचकांचं अगदी अचूक वर्णन केलय.
    - निरंजन (आपला ५,६ आणि ७ ह्या विशेषणात बसणारा वाचक) :) .

    ReplyDelete
  43. निरंजन, पाचमध्ये नाही पण सहा आणि सात मध्ये मीही आहे तुमच्या....सेम पिंच....आणि प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  44. Tu kiti god lihites ga ! Mi hi ashach dhumaketu vachakanpaiki ek !N e ways Too good !

    ReplyDelete
  45. गो..ड?? इश...:) तू मला उगाच हरभर्‍याच्या झाडावर चढवतेयस, नम्रता....ब्लॉगवर स्वागत आणि हो धुमकेतू जास्त वेळा दर्शन द्यायला लागले की जास्त आवडतात :)

    ReplyDelete
  46. Na Vachak ha ajun ek prakar. nustich visit deun nighun jatat vachat kahich nahit

    ReplyDelete
  47. नवाचक??...हा प्रकार लक्षातचं नव्हता किंवा कदाचित मी येणारे प्रत्येकजण वाचणारे अर्थी वाचक असा विचार केल्यामुळे ते मागं पडलं...पण असेल काही लोकं चुकून येत असतील...गुगल बाबांची कृपा....नेमकं आपलं पान त्यांना शोधकामात मिळालं की मग न वाचता पुढे जात असतील...:)

    ReplyDelete
  48. अपर्णा

    सरदेसाईजवरून ‘गाणी आणि आठवणी’ अशी लिंक बघून आज प्रथमच तुझ्या ब्लॉगवर आलो. ‘तुझ़ से नाराज नहीं ऐ जिंदगी’ माझ्याही आवडत्या गाण्यांपैकी एक.

    नंतर इतरही बर्‍याच पोस्ट वाचल्या.

    शेवटी ब्लॉगवाचकांचे प्रकार वाचून याठिकाणीच कॉमेंट द्यावी असं ठरवलं.

    ब्लॉगला पहिल्यांदाच भेट देणारा वाचक हाही एक प्रकार म्हणता येईल का?

    मीही आवडत्या ब्लॉग्जचे rss feeds गूगल रीडरमध्ये टाकून ठेवलेत. त्यामुळं एका ठिकाणी सर्व updates बघायला मिळतात.

    आता तुझाही ब्लॉगही follow करेन.

    विवेक.

    ReplyDelete
  49. विवेक, ब्लॉगवर स्वागत आणि आवर्जुन लिहिल्याबद्दल धन्यवाद...ब्लॉगला पहिल्यांदा भेट देऊन प्रतिक्रिया देणारा वाचक असा एक प्रकार केला तर जास्त इंटरेस्टिंग होईल. हे पहिले वाचक आपल्या फ़ॉलोअर्समध्ये आले तर आणखी बहार काय?? आता नक्की यायचं या ब्लॉगवर...

    ReplyDelete
  50. एवढ्या प्रतिक्रिया आल्या लेखावर. (येणारच! चांगला झाला आहे ना लेख. पण कोणाबद्दल चांगलं बोलायचं म्हणजे आमच्या पोटात दुखायला लागतं. (ही गंमत आहे हो, खरं काही नाही (म्हणजे लेख चांगला झाला आहे ही गंमत नव्हे, आमच्या पोटात दुखतं ही गंमत..))) आता यातला कोण कुठल्या प्रकारचा वाचक आहे ते तुम्हीच सांगा बाय...

    ReplyDelete
  51. संकेत धन्यवाद...अरे तू sincere वाचक आहेस....नाही तर बरीच लोक वाचून जातात पण चांगल-वाईट काहीच म्हणत नाहीत...तू मात्र या विकांताला बऱ्याच प्रतिक्रिया देऊन वाचकाचा एक वेगळा प्रकारही असतो हे दाखवलं आहेस...:)

    ReplyDelete
  52. कसचं कसचं (इथे लाजणं अपेक्षित आहे. पण मला लाजता येत नाही, सो मी लाजलोय असं समज)... मग आता पोस्ट एडिट करून ‘नवाचक’ आणि ‘Sincere वाचक’ हे प्रकार अ‍ॅड करणार की काय? ;-)

    ReplyDelete
  53. नाही ते एडीट वगैरे काही नाही....आता नवे प्रकार फक्त प्रतिक्रियेमध्ये...तुला लिह्याची आहे का एक पोस्ट याच विषयावर?? मग माझा खो तुला अस समज...:)

    ReplyDelete
  54. पोस्ट चा विषय खरच अफलातून आहे . मस्त लिहिलंय .. मूक वाचक पण आता घडा घडा बोलायला लागतीलच..

    ReplyDelete
    Replies
    1. आभार मी मराठी...
      आपण या ब्लॉगचे मूक वाचक असाल तर मग आता प्रकट होणार असा अर्थ धरू का मी...:)

      Delete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.