Friday, March 26, 2010

माझे स्वयंपाकघरातले प्रयोग भाग अमुक अमुक....

एक केकची रेसिपी (ती पण खरी उधारवाली) काय टाकली आणि आता ही बया पण त्या इतर गृहिणींसारखी पदार्थांचे फ़ोटो आणि रेसिप्या देऊन छळणार की काय असं अजिबात वाटू देऊ नका आणि तरी त्या निदान पाककुशल असतात म्हणून पदरात काही बरं तरी पडतं.....काय आहे खादाडी राज्याचा प्रधान सेनापती (आपल्याला जाम आवडली बाबा ही उपमा.(आणि उपमा ऍज अ खाद्यपदार्थपण)...आले कंस, कंसातले कंस आणि सगळंच अष्टप्रधान मंडळ)) असो...हा तर काय खात आपलं सांगत होते...की या प्रधान सेनापतीचा मुक्काम सध्या इथेच जवळपास आहे आणि त्याचा मुक्काम इथे असला की तो खादाडी पोस्ट टाकून टाकून मारे जळवत असतो...(असं निषेध करणार्‍यांना वाटतं...) पण खरं असं आहे की तो बिचारा आठवणींवर कसंबसं उकडलेलं अन्न पोटात ढकलत असतो आणि आपण त्याने आधी खालेल्या खादाडीचा हेवा करत असतो...नाय बा हे काय पटल नाय....


ओरेगाव बाकी कसंही असलं तरी एक फ़ायदा म्हणजे इथं समदं फ़्रेश मिळतं..म्हणजे फ़ळं, भाज्या, खेकडे (ते तर सगळ्यांनाच माहितेत..) पण तरी आमचा जीव पापलेटसाठी घुसमटत होता...काय आहे तलापिया, सॅमन आणि गेला बाजार(बाजार म्हटलं तरी कोळणीच्या पाट्या आठवतात...) कोळंबी म्हटलं तरी आपले मुंबईसारखे मासे खाल्यासारखे वाटत नाही..इथली कोळंबीपण जराशी वेगळीच लागते...त्यामुळे पापलेटवर उडी पडणार हे तर साहजिकच आहे म्हणा आणि एकदाचं इथलं एक चायनीज दुकान मिळालं...आणि हिंदी-चीनी भाई भाई म्हणून आम्ही लगेचच गाडी तिथं वळवली....तर खरंच हिंदी-चिनी भाई भाई ऐक्य फ़्रोजन सेक्शनमधल्या पापलेटरुपाने जणू काही आमची वाटच पाहात होते...चला फ़्रोजन तर फ़्रोजन ’प्रॉडक्ट ऑफ़ इंडिया’ तर आहे...लगेच दोन्ही हातांनी माझ्या नवर्‍याने सगळाच बाजार उचलायला सुरुवात केली..एखादी कोळीण पुढ्यात असली तर काय खुश झाली असती याच्यावर असं मनात म्हणता म्हणता त्याला निव्वळ आपला फ़्रिजर छोटा आहे या कारणास्तव थांबवलं आणि तोही संपले की इथेच येऊ या बोलीवर थांबला....

आणि मग लगेच माझी मूळ सावंतवाडी गाव असणारी मैत्रीण आहे..अट्टल कोकणी रेसिपी हवी असली की मी तिचं डोकं खाते....तिच्या हुकमाबर तडक त्यातले काही पापलेट ओव्हन आणि काही तव्यात जाऊन पडले (आणि त्यानंतर लगेचच पोटात हे काय सांगायचं??) भरलं पापलेट मग ते भाजा नाहीतर तळा छानच लागतं नाही??...आणि सोबतीला कोळंबीचं कालवण आणि जीव शांत करायला सोलकढी...काय हवं अजून पोटोबा तृप्त करायला??

परमेश्वरावराच्या प्रथमावतारावर आमचं खूप प्रेम आहे..आणि असं अधेमधे आम्ही ते व्यक्तही करत असतो...शिवाय कुठच्याही रेस्टॉरंन्टमध्ये जा, काही करा, घरचं खाऊन लंबी ताणताना जे सूख मिळतं ते नक्की बाहेरच्या खाण्यात आहे का?? आता हे म्हणताना इथे आम्हाला बाहेर खाऊनही लंबी ताणता येईल असे पर्याय आहेत का अशी (कु)शंका मनात आल्यास सरळ एक मसाला नाहीतर मघई पान तोंडात टाका आणि विसरा ते सगळं...फ़ोटो कसे वाटले ते कळवायला विसरू नका....

तळ (आणि फ़ार्फ़ार important) टिप....चपात्या कर्टसी आई..नाहीतर कुणाच्या दाताखाली ती आधीची चपातीची पोस्ट अडकली असेल तर उगाच त्यांना आजचं शुक्रवारचं सामिष जेवण पचायचं नाही.....खरंतर त्या अनुभवावर म्हणायचं तर सगळेच प्रयोग आहेत स्वयंपाकघरातले..निदान एक चांगली स्वयंपाकीणकाकू (काका पण चालतील) मिळेपर्यंत. म्हणून या पोस्टचं नावही तसंच दिलंय...अरे बापरे...टिपेलाच इतकं....कुणी वाचकाने टिपेचा सूर नाही लावला म्हणजे बरं.....(माहित्येय जरा एकदमच पुअर पीजे होता...पण जरा वातावरण वाईच हलकं झालं असेल अशी आशा...)

37 comments:

 1. कंसांचा इतका सढळ हस्ते केलेला वापर देखोन आमचे मन सुखावले आहे हे सां न ल.. (कोलंबी (की पापलेट) चे फोटो बघून सुखावणं शक्य नसल्याने) ..

  ReplyDelete
 2. हा हा हा हेरंब...तसं तुझं पेटंटेड आहे पण इथेही नांदले बाबा सुखाने...अरे पण ती छोट्या वाटीत सोलकढी आहे नं तिला का उपेक्षित ठेवलेस??

  ReplyDelete
 3. अरे हो. ते लक्षातच आलं नाही. सोलकढीबद्दल नि..... षे..... ध !!!

  ReplyDelete
 4. मी अजून मासे खाल्ले नाहीत कधी..मला त्यांचा वास नाही आवडत पण असे हे फोटो पहायला आवडतात...छान काढलेस फोटो...अन पोळी पाहून मी म्हणारच होतो कि पोळ्या जमातायआत आता कि टीप वाचली ...मग काय बोलणार :(

  ReplyDelete
 5. अपर्णा, तू पण.... तो रोहन आधीच छळतोय.( आधीचे आठवून आठवून... हे मात्र खरे गं, बिचारा... :P ) मला सोलकढी धावेल जोरात... मात्र पापलेट दिसताहेत एकदम चटकदार... मग काय आज पुन्हा करायचा विचार झालेला दिसतोय... का ही आजचीच खादाडी आहे- म्हणजे आज पुन्हा बनवलेस का? दिनेशला सरप्राईज... :)

  ReplyDelete
 6. सागर मासे खाणारे जेवढे कमी तेवढे मासे आम्हाला जास्त मिळतील अशा दूssssssssरदृष्टीने मी कुणाला मासे खायचा आग्रह करत नाही...ही ही ही..पण फ़ोटो आवडले ना...बास....आणि बघ तुला झाली नं पोळीची आठवण...अरे आई आता परत गेली नं...तिची मी आणि तिच्या पोळ्यांची (अर्थात तिचा जावई) आठवणी अशा पोस्ट्सच्यावेळी तर अगदी दाटून येतात बघ....

  ReplyDelete
 7. अगं श्रीताई, तुला काय गं तू आपली नेहमीच छान छान पोस्ट्स मध्येच खिलवत असतेस ना इतर वेळी?? आणि कधी घेतेस मग किचनचा ताबा???आपलं पेटंटेड आहे ते...तुझ्या ताब्यात किचन आणि मग जेवणानंतर द्या लंबी ताणून...
  आज नाहीये पापलेट. हे फ़क्त रोहनच्या मागच्या एका पोस्टमध्ये पापलेट नव्हते नं म्हणून आठवलं मला त्यामुळे लिहिलं गेलंय...आणि छान काही केलं की फ़ोटो काढलेले असतात कारण पुन्हा तसंच सगळं जमून येईल असं नसतं..किंवा येत नाही म्हणुया हवं तर.....

  ReplyDelete
 8. निषेध मनापासून...!! काय हे अपर्णा??
  माझ्या सारख्या शुद्ध शाकाहारी माणसाच्या तोंडाला पाणी सुटल ते ताट बघून...
  Sssslluurrpp...

  ReplyDelete
 9. आला बिचारा आला ... :P भरून अलय मला एकदम... पोट नाही.. मन भरून आलय ... :D कित्ती काळजी तुम्हाला माझी. तिकडे हेरंब आणि इकडे तू... खादाडी वर समर्पित पोस्ट टाका... :) आत्ता जस्ट जेवून आलो आणि लगेच इकडे मोर्चा वळवला. आधी येणे म्हणजे बघून माझे मरण ... :)

  ReplyDelete
 10. अपर्णा,
  आधी एक मोठी कॉमेंट टाकली होती, पण ती पब्लिश झालीनाही, म्हणून ही लहानशी कॉमेंट..
  निषेध!!!! त्रिवार निषेध!!!!! आम्ही चक्क व्हेज जेवणावर आहोत गेली दहा दिवस. देव -दर्शन सुरु आहे नां म्हणुन. आता मुंबईला गेलो की परळच्या सावंतवाडिला सोमवारी हल्ला बोल......

  ReplyDelete
 11. कंसांचा इतका सढळ हस्ते केलेला वापर देखोन आमचे मन सुखावले आहे हे सां न ल.. (कोलंबी (की पापलेट) चे फोटो बघून सुखावणं शक्य नसल्याने) .....

  सोलकढीसाठी निषेध आहेच....
  पोळ्या पाहून तुला गाठणारच होते की काय गं गंडवतेस का आम्हाला म्हणून पण तेव्हढ्यात तुझी कबुली दिसली....

  ReplyDelete
 12. हे खादाडीचे पोस्ट वाचून आजकाल पोट भरत राव आमचे आता ;)
  त्यामुळे घरी कमी जेवण जाते आणि घरचे बोलतात कमी जेवतो म्हणून
  जाम चमचमीत झालीय पोस्ट :)

  ReplyDelete
 13. आई गं... काय पाणी सुटलंय तोंडाला !

  ReplyDelete
 14. य्ये अरे हे चाल्लंय काय ब्लॉगविश्वात? जिकडे जावं तिथे मासे.....???? सोडा रे सोडा त्या बिचार्यांना.  परवा मोनिजमध्ये जेवायला गेलो त्या पठ्यानं अख्खी भींतभरून माशांचा टॅंक बनवलाय (अर्थात केवळ बघण्याच्या माशांचा) ते बघून सानुनं विचारलं,"आई ते सगळे फ़ीश खातायत नां ते फ़ीश यातूनच घेतात का"? :) असो. एकूण सध्या माशांची टीआरपी वाढलेली दिसतेय.

  ReplyDelete
 15. अर्धी वाटी सोलकढी बघुन सुद्धा थंड वाटलं, पोळी सोडून बाकिच्या पदार्थांचा आम्हास काहीच फायदा नाही. पण फोटो छान आलाय.
  सोनाली

  ReplyDelete
 16. मावसाहार विरुध आहे मी,आज प्रथमच आले इथे.मुक्या प्राण्यांचा बळी जातो.नि माणूस मिटक्या मारत खातो.रक्ताच्या अश्रूना
  किंमत का नाही? मी अक्दा खतिखाना बसमधून पहिला होता .बकरीला कापत होते.बाजूलाच दुसरी उभी होती.बावारलेली,घाबरलेली...आणि..तिला घट्ट बिलगले होते तिचे बछडे...नंतर त्यांचा नंबर होता ना! कशाला माणुसकी म्हणायची?...Bharati

  ReplyDelete
 17. सुहास तुझं ते स्ल......र्प एकदम भारी आहे....

  ReplyDelete
 18. रोहन, बघ तुझी किती काळजी आहे ती माझिया मनाला म्हणून तुझं त्या दिवशी पापलेट राहिलं होतं ना ते इथे पाठवलं तुला...मला वाटलंच होतं तू निदान उकडलेलं तरी खाऊन ही पोस्ट वाचशील ते...आणि तुला माझा आणि हेरंबचा कट कसा वाटला??

  ReplyDelete
 19. महेंद्रकाका, सगळे जोशी-कुलकर्णी मासे खायला लागले आणि माशांचे भाव वाढले असं माझी आई म्हणते...ते असो पण तुम्ही मग नेहमी रेस्टॉरन्टमध्येच मासे खाता का??? घरचं खायचं असेल तर एकदा रोहणाच्या घरी हल्लाबोल करा ना?? (म्हणजे खादाडी ब्लॉग सुरु केल्याचा त्याला जास्त अभिमान वाटेल...)

  ReplyDelete
 20. तन्वी ती तळटीप टाकताना मला तुच आठवली होतीस...तशी भारी हुशार तायडी आहेस नं तू पण आणि ताई कॅटेगरीशी डिल करताना जन्म गेला नं या शेंडेफ़ळाचा....

  ReplyDelete
 21. विक्रम, आम्हाला तर इथे कुणाचीही खादाडी पोस्ट आली की जाम भूक लागते आणि मग आम्ही अगदी पिझ्झापासून सगळे हाय कॅल पदार्थ मनोभावे खाऊन वजनं वाढवतो..तुला मात्र फ़ायदा आहे खादाडी पोस्ट वाचल्या तरी वजन वाढणार नाही....

  ReplyDelete
 22. नॅकोबा, पाणी काय??? तुमचं घोडं कांदापोहे आणि इतर पदार्थांच्या पुढे गेलं की नाही?? खरं तर रेडिमेड मसाल्याच्या पाकिटावर वाचून एकदा नॉनव्हेज प्रयत्न करून पहा...जमेल आपसूक...

  ReplyDelete
 23. हा हा हा शिनू महेंद्रकाकांना मी दिलेलं उत्तर वाच...माशांचा टिआरपी खरंच वाढलाय...

  ReplyDelete
 24. अरे हो सोनाली, आता तिथे गरमी सुरू झालीय ना...मग सोलकढी तर हवीच....

  ReplyDelete
 25. अरेरे भारती,,नेमकं तुम्ही आलात या ब्लॉगवर आणि तुम्हाला न आवडणारा विषय पण तरी इतकं आवर्जुन लिहिल्याबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत....
  आणि राहता राहिला विषय मांसाहार करावा न करावा तर चांगलं काय, वाईट काय हे कळायच्या आधीच मांसाहारात पडलेल्या आम्ही या विषयावर न बोललेच बरं कारण आता सोडणं कठीण...पण कधी कधी मला वाटतं झाडांच रक्त पांढरं असलं तरी जीव तर त्यांच्यातही असतोच ना...आणि चला ते जाऊदे गायीचं दूध शाकाहारी की मांसाहारी...वासराच्या जीवाचं तोडून अगदी खरवस वगैरेही मोठ्या चवीने खाल्ले जातातच ना...इथे अमेरिकेत 'विगन' म्हणून शाकाहारी आहेत ते कुठलंही animal product खात नाहीत अगदी दूधही सोयाबीनचं. असो..पण म्हणून या विषयाची चिकित्सा करून खाण्यातला आनंद घालवत नाही..काही काही सवयी जुन्या आहेत त्या काहींनी सोडल्या, काही पाळताहेत....चालायचं....
  या ब्लॉगवरचे इतर काही विषय आपल्याला कदाचित आवडतील अशी अपेक्षा....

  ReplyDelete
 26. आनंद, जरा विकांताला बाहेर होते म्हणून एक एक करून प्रतिक्रिया पाहताना तुम्हाला उत्तर द्यायचं राहिलं...पण तुम्ही तिथे हैद्राबादी बिर्याणी चपता ना तेव्हा आमचा पण निषेध निषेध....त्रिवार निषेध...

  ReplyDelete
 27. इतकी चांगली पोस्ट माझ्या नजरेतून सुटली होती. भरलेलं पापलेट पाहून भरून आलं. बरोबर कोलंबी आणि त्या लुसलुशीत चपात्या. कांदा लिंबू नंतर कढी. वा वा अगदी पंच पक्वान्न. मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट फोटोंपापैकी एक.

  ReplyDelete
 28. वेगन लोकांबद्दल मला जाम कुतूहल वाटतं. कसे जगतात ना ते? माझा एक सहकारी होता. टॉम मिलर. ड्रिंक्स, कोल्डड्रिंक सोडाच कॉफी देखील नाही घ्यायचा. नॉनव्हेज नाही पण दुग्धजन्य पदार्थांपासून पण हा दूर असायचा. मला आधी असे लोकं असतात हे पण माहीत नव्हतं. बरं त्याची बायको सगळ्या प्रकारचं मीट खायची. मला प्रश्न पडायचा की ह्यांचं पटत कसं बुवा? हे म्हणजे दोन भिन्न ध्रुवावरचे लोक एका छता खाली नांदण्यासारखेच.

  ReplyDelete
 29. सिद्धार्थ तुझी कॉमेन्ट आणि त्याही दोन दोन पाहून मलाही भरून आलंय...
  आणि मुख्य ताटाचं कौतुक केल्यामुळे तर मूठभर मांस जास्त चढलंय...मला वाढायला फ़ार फ़ार आवडतं काश कोई बनाके देनेवाला/ली होती....

  विगन लोकांचं खरंच नवल आहे..पहिल्यांदी कुणी भेटला की शाकाहाराची त्यांची व्याख्या समजुन तोंडात बोट घालायला होतं..माझा एक गुजराथी (आणि अंडही न खाणारा) मित्र ऑफ़िसच्या पार्टीला त्याच्या विगन कलीगच्या पाठी उभा राहातो...त्याचं म्हणणं याने जर एखादा पदार्थ खाल्ला तर मी तो आरामात खाऊ शकतो....

  ReplyDelete
 30. सुरुवातीला छळणार नाही म्हणत विश्वासात घेतलत आणि पुढे ते फ़ोटो टाकुन पाठीत सुरा खुपसलात ..हे बरे नाही... :)...निषेध...

  ReplyDelete
 31. सुरुवातीला छळणार नाही म्हणत विश्वासात घेतलत आणि पुढे ते फ़ोटो टाकुन पाठीत सुरा खुपसलात ..हे बरे नाही... :)...निषेध...

  ReplyDelete
 32. हे पाठीत काय आम्ही तर पापलेटला पण अख्खा ठेवलाय...कुठे सुरा??? छ्या आमी नाय बा त्या गावचे....

  ReplyDelete
 33. हर हर शिवशंकरा, काय हे हत्याकांड! त्या बिचार्‍या माशांचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला की या माणसांनी! त्यांना चांगली बुद्धी दे रे बाबा (पक्षी: देव, ब्लागवाला भिसे बाबा नव्हे).. हेहेहे

  ReplyDelete
 34. संकेत गेले ते मासे...आता काय करणार सांग? तू तिथे एक मिंट मौन वगैरे पाळलस का??...आम्ही पडलो हाडाचे मांसाहारी....त्यामुळे अशी वाक्य ऐकूच येत नाहीत बघ....:)

  ReplyDelete
 35. प्रश्नच नाही. मी इकडे दोन मिनिटं शांत उभा होतो खाली मान घालून. नेटवरून दोन माशांचे फोटोही डाऊनलोड केले होते. त्यांना फुलं वाहिली. चार अश्रू ढाळले. एक छोटेखानी भाषणही केलं, ‘बंधूंनो आणि बंधूंच्या भगिनींनो, आज आपण येथे जमलो आहोत त्याला एक कारण आहे. आपले प्रिय श्री. पापलेटराव आणि श्रीमती कोळंबीताई आज आपल्यात नाहीत. त्याबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत’ वगैरे वगैरे... हीहीही

  ReplyDelete
 36. हा हा हा.....:) वाचून लोळालोळी....

  ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.