Friday, February 26, 2010

या वेळचा खास मराठी भाषा दिवस..

उद्या २७ फ़ेब्रुवारी, जागतिक मराठी भाषा दिवस. खरं सांगते मला काही हा दिवस प्रत्येक वेळी लक्षात नव्हता आणि आपल्यापैकी बर्‍याच जणांना तो नसेल पण यावेळी दोन कारणांसाठी लक्षात आहे एक म्हणजे मराठी ब्लॉग लिहायला घेतला म्हणून आता मराठीविषयीच्या खास गोष्टींकडे आपसूक जास्त लक्ष ठेवलं जातं आणि दुसरं म्हणजे या मराठी भाषा दिवसाचं औचित्य साधुन सुप्रसिद्ध संगित दिग्दर्शक कौशल इनामदार आपलं मराठी अस्मितेचं गीताच्या ध्वनिमुद्रिकेचं प्रकाशन करणार आहेत यासाठी..

खरं तर म्हणजे बरंच आधी महाराष्ट्र दिनाला हे होणार होतं पण काही कारणाने हा प्रकल्प लांबला गेला. अमेरिकेत राहून याबद्द्ल सर्वप्रथम मला याविषयी कळलं ते कौशलने एका मराठी ऑरकुट कम्युनिटीवर याविषयी लिहिलं तेव्हा..त्यावेळी त्यात कमीत कमी २०$ किंवा ५०० रु. द्यावे असं आवाहन होतं..एक सर्वसामान्य भारतीय माणसाचा कुठल्याही ठिकाणी पैसे मागितले की आता त्याचं पुढे नक्की काय होईल हा प्रश्न माझ्या मनात आला. एकीकडे साईटवरचं त्याचं आवाहन जितकं सच्चं होतं तितकंच आपला पैसा योग्य मार्गी जाईल का हे नक्की करणंही महत्त्वाचं..
ती साईट नीट पाहताना लक्षात आलं त्याने अमेरिकेतला जो संपर्क दिला होता त्या व्यक्तीला म्हणजे सचिन प्रभुदेसाई याला बी.एम.एम. च्या निमित्ताने जरा जवळून ओळखायला लागलो होतो. मग एक दिवस सचिनला समोरुनच विचारलं की काय आहे हे सर्व. सचिन हाही परदेशात राहिला तरी अस्सल मराठीने आणि त्याच्या प्रभावी बोलण्याने आपलंसं करणारं एक व्यक्तिमत्व त्यामुळे त्याने जेव्हा या प्रकल्पाबद्दल आणि मुख्य हे लोकांकडूनच पैसे उभारण्याबद्दलची जी भूमिका मांडली त्याने क्षणाचा विचार न करता मी आपलं खारीचं योगदान या प्रकल्पाला दिलं..त्याने जी मला माहिती दिली त्यावरून हे पैसे निव्वळ स्वतःच्या कॉन्टॅक्ट्सवर जमवायला कौशलला कठिण नाही हे कळत होतं पण अशी वेड लागलेली माणसंच इतिहास घडवतात हेही खरं...
२०$ काय किंवा ५०० रु. काय सर्वसामान्य माणूस आपल्या एकावेळच्या बाहेर चांगल्या ठिकाणी जेवायला यापेक्षा जास्त पैसे उडवतो. एकदा ठरवुन नाही खाल्लं तरी आपण हे डोनेशन करु शकतो या अर्थाची मेलही त्यावेळी मी माझ्या काही संबंधीतांना केली होती..कारण मलाही या भूमिकेमागचा सच्चेपणा पटला होता.
जेव्हा ही सीडी पूर्वनियोजित तारखेला प्रकाशीत होऊ शकली नाही तेव्हा त्याबद्दलची दिलगीरी व्यक्त करणारी इ-मेल स्वतः कौशलनी सर्वांना पाठवली आहे..त्यानंतर जेव्हा सचिनकडे या गाण्याची पहिली अप्रकाशीत कॉपी आली तेव्हा त्याने त्याच्या गाडीत नेऊन आम्हाला ऐकवली. तो दिवसही आठवतो कारणे नेमकी कोजागिरी होती आणि आम्ही एका गेट-टुगेदर साठी भेटलो होतो. ती ऐकवताना खरं सचिनची एक प्रामाणिक भावना होती जी कौशलचीही असणार की तुम्ही जे काही पैशाचं योगदान देताहात त्यावर काम सुरू आहे. अतिशय सुंदर गीत आहे अगदी लिटिल चॅम्प मधल्या मुग्धा पासुन ते आताच्या आणि लिजेंड कॅटेगरीतल्या सर्व गायकांचे आवाज आहेत..फ़ायनल व्हर्जन ऐकायला खूप उत्सुक आहे.
ओरेगावात आल्यावर बदलेल्या पत्यांसंदर्भात जेव्हा कौशल बरोबर इमेल झाली तेव्हा न विचारता त्यांनी आता ही सीडी मराठी भाषा दिवशी म्हणजे २७ फ़ेब्रु. २०१० ला होईल म्हणून (न विचारता) कळवलं तेव्हापासुन मनातल्या मनात देवाला सांगत होते की मराठीसाठी जे काही हा माणूस इतकं खपून करतोय त्याला यश दे. इतके दिवसात आता वृत्तपत्रात वगैरे जेव्हा या सीडीची बातमी वाचते तेव्हा बरं वाटतंय की आता आणखी विलंब न होता ही सीडी उद्या प्रकाशीत होतेय आणि खर्‍या अर्थाने हा मराठी भाषा दिवस खास प्रकारे साजरा होणार आहे...
अनेक शुभेच्छा कौशल इनामदार यांना या प्रकल्पासाठी. सीडीच्या आमच्या कॉपीसाठी वाट पाहु आणि या ब्लॉगच्या सर्व वाचकांनाही मराठी भाषा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

17 comments:

  1. ग्रेट माणूस आहे हा..

    मराठी भाषा दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  2. धन्यवाद हेरंब...खरंच ग्रेट आहे तो....

    ReplyDelete
  3. मानले पाहिजे कौशलला. चला लवकरच आपल्याला सीडी ऐकायला मिळेल...
    मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!!

    ReplyDelete
  4. सीडीची मी पण वाट पाहातेय...तुलाही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा....

    ReplyDelete
  5. लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. 'मराठी दिन' शुभेच्छा!

    ReplyDelete
  6. धन्यवाद भुंगा...आपणांसही शुभेच्छा...

    ReplyDelete
  7. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  8. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  9. जागतिक मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

    ReplyDelete
  10. मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!!

    ReplyDelete
  11. धन्यवाद सुहास, मनमौजी, आनंद आणि देवेंद्र...आपणासही शुभेच्छा...

    ReplyDelete
  12. 'मराठी भाषा दिनाच्या' सर्वांना शुभेच्छा! जय महाराष्ट्र !!!!!

    ReplyDelete
  13. मराठी दिनाच्या शुभेच्छा..:)

    ReplyDelete
  14. धन्यवाद तन्वी आणि महेंद्रकाका...

    ReplyDelete
  15. अपर्णा,
    आपण आणि आपल्या मित्रांनी जे भरभरून कौतुक केलंय त्याने माझी मान विनम्रतेने झुकलीय. मी काही ग्रेट नाही. माझं कन्व्हिक्शनच होतं त्यामुळे मी ते केलं... पण माझ्या एका शब्दावर तुमच्यासारखे इतके मित्र धावून आले, त्या मित्रत्वाला सलाम! माझ्याबरोबर अनेक लोक या प्रकल्पासाठी खपले त्यांचं हे श्रेय आहे. हे मी फक्त विनयापोटी म्हणत नाहीये, अगदी मनापासून जे सत्य वाटत आहे, तेवढंच सांगतोय. मी सगळ्यांचा अत्यंत ऋणी आहे.

    आपल्या सीडीज्‌ मी मंदार जोगळेकर बरोबर अमेरीकेला याच आठवड्यात पाठवत आहे. सचिन प्रभुदेसाई त्या आपल्यापर्यंत पोहोचवेल. पुन्हा इथेही सचिन आणि मंदारसारखे मित्रच धावून आले!! सीडी मिळाली की त्यावरची प्रतिक्रिया नक्की कळवा!

    आपला,

    कौशल!

    ReplyDelete
  16. कौशल पहिल्या प्रथम ब्लॉगवर आवर्जुन लिहिल्याबद्दल मनापासून आभार...हा ब्लॉग इतके दिवस मनात असलेलं मांडायचं म्हणून सुरू केला आणि त्याप्रमाणे मराठी अस्मितेबद्दल लिहिलं... खरं तर आम्हीच इतकं छान गीत महाराष्ट्राला दिल्याबद्दल (आणि तेही सध्या सगळीकडे मराठीचं जे काही चाललंय त्या पार्श्वभुमीवर) आपले आभार मानायला हवेत...
    आजचा दिवस या ब्लॉगसाठी लकी आहे...
    you made my day...Thank you so much....

    ReplyDelete
  17. किती दिवस झाले मी लिहीणार होते..योगायोगाने माझ्या वाढदिवशीच मराठी अभिमान गीताची सीडी पोस्टाने मिळाली आणि आता त्याची पारायणं सुरु आहेत. संपुर्ण प्रोजेक्टला दाद द्यावी तितकी कमीच आहे. एक छोटेखानी अतिशय सुंदर डिझाईनवालं पुस्तक आहे ज्यात सगळी माहिती आणि या प्रकल्पात सहभागी झाल्यांची नावं आहेत. फ़क्त अभिमान गीतंच नव्हे तर इतर गाणीही श्रवणीय आणि वेगवेगळ्या मुडची आहेत...पुन्हा एकदा कौशलचे धन्यवाद..

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.