Tuesday, April 7, 2009

आवर्तन

हिवाळा सरतोय याच्या खुणा हळुहळु दिसू लागल्यात. चेरी जातीतील झाडांवरचे कोंब काही सांगु पाहताहेत. ही झाडे लवकरच फ़ुलांनी डवरुन जातील आणि मग फ़ुलांचा सडा खाली पाडून पुन्हा शिशिराची चाहुल लागेपर्यंत हिरवाई मिरवत राहतील. ऋतुंमधील बदल उत्तर गोलार्धात पुण्या-मुंबईपे़क्षा जास्त ठळकपणे जाणवतात म्हणुनही असेल कदाचीत प्रत्येक ऋतुंचे इथे लाडही बरेच होतात. शिवाय आपल्यासारखी सणा-वारांची रांगही नाही लागली पण सेलेब्रेशन तर हवे ना??

सगळ्यात पहिला बदल करतात ती दुकाने. साहजिकच आहे म्हणा. इथल्या (सध्या कोसळलेल्या) इकॉनॉमीचा पाया म्हणजे शॉपिंग. मग सुरुवात तिथुनच होते. हिवाळ्यातले पोलो नेक पद्धतीचे कपडे जाऊन दुकानातल्या मॉडेल्सना स्कर्ट, लाइट टॉप्स घातले जातात. सुपरमार्केट मध्ये वेगवेगळी फ़ुलांची रोपे आपला दिमाख दाखवायला लागतात. अंगणातल्या ट्युलिप, डॅफ़ोडिल्सच्या कंदातून हिरवे कोंब बाहेर आले की आठवडाभरात आसपासच्या जवळपास सर्व घराबाहेरची फ़ुलांची आरास पाहत वॉक कसा संपेल कळतही नाही. पक्षी, ससे लॉनवर दिसायला लागतात. इथे कोकीळ नसला तरी बाकीचे पक्षी सांगुन टाकतात वसंत आला, वसंत आला. सगळीकडे वेगळाच उत्साह येतो.
पण हळुहळु सुर्याचे ऊन अंग भाजुन काढतेय की काय असे वाटायला लागते. गो-या कातडीवाल्यांना टॅन करायला तर माझ्यासारख्यांना सनस्क्रीन मस्ट वाला उन्हाळा आला तरी वातावरणातला उत्साह कायम असतो. घराबाहेर किंवा पार्कमध्ये ग्रील करायचे कोण कौतुक. या दिवसात येणारी कणसं अगदी आपल्या मान्सुनची चववाली नसली तरी खायला मजा येते....अधेमधे पारा ४० से. च्या पुढे जातो तेव्हा ऑफ़िस, घर कुठेही असलं तरी एसीची साथ सोडवत नाही. रात्री पावणे नऊ - नऊ पर्यंत उजेडाचे राज्य असते त्यामुळे ऑफ़िसमधुन घरी आल्यावर थोडफ़ार काम आटपुन जवळच्या पार्कात खेळायलाही जाता येते. उन्हाळ्यातले तीन महिने जवळजवळ प्रत्येक विकेन्ड काही ना काही प्लान केले जाते. इथे उन्हाळ्यात आजुबाजुच्या जगाचं भान हरपून मजा करणारी माणसं पाहिली की समरसून आयुष्य जगणे म्हणजे काय ते हेच का असे उगीच वाटते.


मोठे दिवस कधी संपुच नये असं वाटत असतानाच पानांचे रंग हळुहळु बदलायला सुरूवात होते आणि गुलाबी गारवा वातावरणात जाणवायला लागतॊ. झाडांचे रंग इतके सुंदर असतात की नजर हटत नाही. सा-या आसमंतावर हेमंताचे रंग दिसायला लागतात. न्यु ईंग्लंडसारख्या भागात तर पर्वत रांगा आणि घळीत फ़िरताना तर निसर्गात केशरी रंगाच्याच छटा आहेत असा भास होतो.
सा-या सृष्टीला सचैल स्नान घालणारा पाऊस पुन्हा एकदा येतो आणि आपल्याबरोबर रंगाची ही उधळण घेऊन जातो. मागे उरतात शुष्क फ़ांद्या दाखवणारी झाडे. दिवस पुन्हा एकदा लहान होतात आणि हिवाळा आला हे सांगायला ज्योतिष्याची गरज लागत नाही.
कडाक्याची थंडी आणि सावळे दिवस असा थाट असला तरी रात्रभर कोसळून सकाळी सगळीकडे बर्फ़ाची चादर पसरलेला पांढरा शुभ्र दिवस आवडूनही जातो. शाळांना अचानक सुट्टी मिळाल्याने बच्चे कंपनी खुश होऊन स्नो मॅन बनवायला लागतात. उतारावर स्लेज चालवायची मजाही लुटता येते. अजुन तरबेज असाल तर अर्थातच स्किईंग आणि नसाल तर ट्युबिंग आहेच की.पण सतत शुन्याच्या खाली तापमानाचा नाही म्हटलं तरी कंटाळा येतो आणि पुरे झाली थंडी अशी कुरकुर चालु होते.... थंडी पुरती संपली पण नसते आणि ठिकठिकाणी फ़्लॉवर शो चालु होतात...मन कधीच वसंतात जाऊन पोहोचतं...ॠतुचं एक आवर्तन पूर्ण होतं.

9 comments:

  1. vasant-greeshma-varsha -shard hemant- shishir
    asa rutuncha kram asto.
    aaplya likhanat to lagat nahi .
    ugach lihayche mhanun lihu naka....

    ReplyDelete
  2. राहुल, मी सुरूवातीला उत्तर गोलार्धाचा उल्लेख केला आहे, प्रत्यक्षात तो उत्तर अमेरिका असा घेतला तरी चालण्यासारखा आहे. तिथे चारच ॠतु असतात. त्यांच्या कँलेंडरमध्येही तो उल्लेख असतो. पण आपल्या comment वरुन मला वाटतं मी त्यांची नावे english मध्येच दिली गेली असती तर आपल्यासारख्यांचा गोंधळ झाला नसता.
    पण राव कधी मनाला थोडं आठवणींमध्येही सोडून द्या...... असो!!
    आपल्या भेटीबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  3. वर्णन छान आहे.. फोटोही आवडले.. :-)

    हिवाळा ते हिवाळा असे आवर्तन का?

    ReplyDelete
  4. धन्यवाद दिपक. हिवाळ्यात मनाला वेध लागतात ना कोवळ्या दिवसांचे, म्हणुन असे विषय सुचतात. :)

    ReplyDelete
  5. तो फोटो भलताच सही आहे ... निसर्गाची किमया आणि काय... कसले वेगवेगळे रंग आणि छटा आहेत ना...

    ReplyDelete
  6. धन्यवाद रोहन... तो फ़ोटो इथे अमेरिकेतल्या चार ऋतुंमधले फ़ोटो एकत्र करुन केलेलं कोलाज आहे. रंगाची खरी उधळण आता म्हणजे ऑक्टोबर मध्ये पुन्हा सुरु होईल. त्यातला सर्वात जास्त रंग असलेला फ़ोटो आहे ना तसं....

    ReplyDelete
  7. छान आहे लेख. ‘अपूर्वाई’ ची आठवण झाली लेख वाचताना. अपूर्वाईमधले बरेचसे भाग विनोदी नाहीत, पण पूर्ण वाचून झाल्याशिवाय सोडवतही नाहीत. दिवसाची सुरुवात चांगली झाली माझी. :-)

    ReplyDelete
  8. संकेत इतकं "अपुर्वाई"च्या तोडीचं माझ्यासारखी ब्लॉगरतरी लिहु शकणार नाही...पण कदाचित त्याची छाप असू शकते...मी रोज पु.ल.भक्त म्हणजे जवळ जवळ रोज पु.ल. ऐकणारी आहे त्यामुळे त्यांचं बरेचदा विनोदात न बसणारं पण खूप काही सांगुन जाणारं लेखनही तितकंच मनात बसलय त्याचा परिणाम असावा.....:)
    धन्यवाद....मीही ही पोस्ट कितीतरी दिवसांनी वाचुन छान वाटतंय....:)

    ReplyDelete

मला ब्लॉगवर अपर्णा म्हणून संबोधलं तरी चालेल...आणि अरे-तुरे धावेल पण तरी आपल्याला पटत नसल्यास अहो-जाहोही ठिक आहे...ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप मोलाची आहे...आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.