Sunday, November 17, 2013

ये सचमुच न मिलेगी दोबारा

ओरेगनमधला टिपिकल हिवाळी विकांत म्हणजे बाहेर सूर्य नाही, आदल्या दिवशी रात्री पडून गेलेल्या पावसामुळे आलेली थोडी जास्त थंडी आणि अशात अवेळी झोपलेली मुलं. अशावेळी काही तरी स्वतःचं पाहुया म्हणून पुन्हा एकदा जिंदगी न मिलेगी दोबारा सुरु करतोय. 

प्रथम पहिला तेव्हाही  आवडला होता पण दुसऱ्यांदा पाहताना थोडा जास्त मुरतोय. विशेष करून इम्रान अख्तरने त्याच्या वडिलांच्या कवितांचं त्याच्या आवाजात केलेलं सोनं. हा चित्रपट पाहताना आपण कुणाबरोबर पाहतोय वगैरे असं होत नाही. 

पिघले नीलम सा बेहता ये समा
नीली नीली सी खामोशिया 



घेऊन जातो तो आपल्याला कुठेतरी "बस एक तुम हो यहां" म्हणत असा कुठला तरी क्षण ज्याने जगायला उभारी दिली, असा कुठला तरी खास मित्र/मैत्रीण जिने त्यावेळी आपल्याला सावरलं. तू हे करू शकतेस म्हणून आपल्याला उठायला मदत केली, कुठलाही संबंध नसताना गुरूप्रमाणे पाठीवर दिलेले हात आणि त्या हाताच्या बळाने मग तशी जवळपास स्वतःची लढाई एकटीनेच लढलेले ते आणि आताचेही दिवस. बरोबर म्हणतोय न तो "अपने होने पे मुझको यकीन आ गया  
एक बात है  होटों तक है जो आयी नहीं
बस आंखो से है जानती
तुमसे कभी मुझसे कभी
कुछ लफ्ज है वो मांगती 

तो पाठीवर पडलेला गुरूचा हात कधीतरी मैत्रीमध्ये बदलला कळलं नाही.  त्याला वयाची बंधन नव्हती. तेव्हा कुठेतरी माझ्या कॉलेजमधले मार्क याविषयी चिंता करणाऱ्या मला, "तुझ्याकडे त्या मार्कांपेक्षा खूप चांगली गोष्ट आहे. ती म्हणजे भरपूर कष्ट करायची तयारी", हे सांगून मग माझ्याकडे आलेल्या पहिल्या संधीचं कौतुक त्यांच्या नजीकच्या लोकांकडे करून मला दिलेला आशीर्वाद. मग माझा मार्ग दूरचा पण तरी संबंध तेच. माझ्या वाढदिवसाला शुभेच्छांबरोबर माझा आवडीचा black forest त्यांच्या ऑफिसच्या मुलाबरोबर आठवणीने पाठवायचे ते दिवस. खर तर मी त्याला नेहमी "सर" म्हटलं तरी ९९ मध्ये मी त्यांच्या कंपनीमध्ये केलेलं एक प्रोजेक्टच्या वेळचे दिवस सोडले तर आमच्या इतरवेळच्या भेटी म्हणजे निव्वळ मैत्री. ते नाव दिलं नाही दिलं तरी त्यात अंतर आलं नाही.

जब जब दर्द का बादल छाया
जब गम का साया लहराया
जब आंसु पलकों तक आया
जब ये तनहा दिल घबराया
हम ने दिल को ये समझाया
दिल आखिर तू क्यों रोता है

माझ्या प्रत्येक मायदेशवारीत एकदा मी आले आहे हा फोन केला की माझा फोन  नंबर घेऊन जवळ जवळ रोज फोन करून माझी खुशाली घेणारा माझा हा मित्र. यावेळी मी भेटायला गेले तेव्हा नेमकं आणखी एक काम होतं.
"एकटी रिक्षाने कशाला जातेस? आता मुलं गेली की ऑफिस बंद करून मी येतो न तुला सोडायला. फक्त त्र्याऐशी होताहेत आता मला बघ गाडीमध्ये पोटातलं पाणीपण हलणार नाही."
"खरंच? माझे सत्तरीतले बाबापण मला आता थकल्यासारखे वाटतात. राहूदेत तुम्ही मी खरंच जाईन"
"अगं थांब गं. गणेश, आज तू कुलूप लावशील?  मी जरा  हिला स्टेशनला घेऊन जातो."

गाडीमध्ये अखंड बडबड, माझी, माझ्या नवऱ्याची, मुलांची चौकशी. मला कधी कधी अशी माणसं माझ्या आयुष्यात आली याचा हेवा वाटतो. म्हणजे बघा न एक साधं इंजिनियरिंगचं प्रोजेक्ट करणाऱ्या मुलीला एका मिडसाइज टेलीकॉम कंपनीच्या मालकाने इतकं महत्व का द्यावं?
त्यादिवशीच माझं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं कारण लागणारे सर्व कागद मी धांदरटपणे आणलेच नव्हते. मग पुन्हा ते पूर्ण करायची जबाबदारी घ्यायची  तयारी. का ही इतकी निस्वार्थी माणसं जीव लावतात?  त्यांच्याकडे आधीच इतकं आहे की  ठरवलं तरी मी काही करायची गरज नाही.
"सर नको तुम्ही. हे नाही झालं तरी चालेल. उगाच तुम्हाला माझ्यामुळे उशीर."
या ठिकाणी माझ्या शालेय जीवनातल्या खूप आठवणी आहेत. त्या रस्त्यांची वळणं मला माझ्या बालपणात घेऊन जातात. कस कळलं त्याला? गाडी उलट वळवायचं सोडून चल आज थोडं पुढे जाऊन येऊ म्हणून माझा मूक होकार गृहीत धरून आम्ही रस्त्याने पुढे जातोय. नवे बदल माझ्या लक्षात येतील न येतील म्हणून ते मला दाखवले जातात. मध्ये कुठेतरी त्यांच्या आवडत्या pattice वाल्याकडे खायला घाल, घरच्यांसाठी खाऊ आणि मग पुन्हा परत.
का करावसं वाटलं असेल त्याला हे सगळं? आमच्या त्या लॉंग ड्राइव्हला का मला त्याच्याही आयुष्यातले काही जुने प्रश्न, त्यासाठी त्याने केलेल्या तडजोडी मला सांगणं ?
"तू आजकाल परत गेलीस की तुझ्या मुलांमध्ये इतकी बिझी होतेस की  पूर्वीसारखे आपले फोन होत नाहीत, नाही?"
"तसं नाही वेस्ट कोस्ट म्हणजे जगाच्या मागे आहे त्यामुळे वेळेची सांगड घालायचं तंत्र जुळत नाही."
"ह्म्म. थांब मी स्टेशनजवळ गाडी घेतो."
"नको हा नवा उड्डाणपूल चांगला बांधलाय. मी इथून चालत जाईन. या वळणावरून तुम्हालापण बरं पडेल."
मी परत  आल्यावर आम्ही पुन्हा फेब्रुवारीत बोललो. मध्ये माझ्याकडे लक्ष प्रश्न आले आणि हे निवळलं की  फोन करू म्हणून मध्ये इतके महिने निघून गेले.
देवाघरून माझ्यासाठी खास आलेलं आणखी एक माणूस देव घेऊन गेला. त्याच्या माझ्यातला दुवा मीच होते. मला कोण कळवणार की तो गेला म्हणून?
ये जो गहरे सन्नाटे है
वक़्त ने सबको ही  बाटे है
थोडा गम है सबका किस्सा
थोडी धूप है सब का हिस्सा
आंख तेरी बेकार ही नम  है
हर पल एक नया मौसम है
क्यु तू  ऐसे पल खोता है
दिल आखिर तू क्यु रोता है 
एक स्वप्न म्हणून सुरु केलेल्या त्याच्या कंपनीचं कुलूप वयाच्या त्र्याऐशीव्या वर्षी देखील सकाळी साडेसातला स्वतःच उघडणारा हा माझा मित्र. आता मुलगा बाकीचे सगळे व्यवहार पाहतो पण ही factory हेच माझ सगळं काही आहे, माझे वर्षानुवर्ष साथ देणारे कामगार मला रोज पाहतात आणि त्यांना काही हवं नको असेल तर मीच ते बघू शकतो मुलाला तितका वेळ नसेल म्हणून रोज ऑफिसला येणारा माझा मित्र. या माझ्या मित्राला मी रडलेलं  चालेल का? याचा विचार मी करतेय. म्हणजे आईच्याच शब्दात सांगायचं तर ही  वेळ कुणालाच चुकली नाही, चुकणार नाही हे आपल्याला माहित आहे. वय झाल्यावर तर ते अपरिहार्य आहे. आपण रडत बसलेलं  आपल्या आवडत्या माणसाला आवडेल का याचा पण विचार केला पाहिजे. 

मी पुन्हा त्या जिंदगी न मिलेगी दोबाराकडे लक्ष देते… प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या वाटेने आलेला एकच विचार असतो 


दिलों  मे  तुम अपनी बेताबीयां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
नजर मे ख्वाबों की बिजलीया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम
जो अपनी आंखो में हैरानिया लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम 





Thursday, November 14, 2013

त्यांचाही बालदिन

माझ्याकडे अगदी मी शाळेत असल्यापासून लहान मुलांचा ओढा जास्त आहे. शेजारची बाळं आमच्या घरी सतरंजीवर टाकून त्यांच्याशी बोबडं बोलत खेळायला मला मजा वाटे. मग मी दहा वर्षांची असताना मला एक मावसबहीण झाली. मी स्वतः  माझ्या घरात शेंडेफळ असल्याने हे हक्काचं लहान भावंड मिळाल्याचा आनंद मी मनसोक्त घेतला. ती मावशी पण तशी जवळच्या गावात राहत असल्याने तेव्हा जास्तीत जास्त शनिवारी दुपारी शाळा सुटली  की चार आण्याचं हाफ तिकीट काढून जायचं आणि रविवारी दुपारी परत निघायचं असा एक पायंडाच पाडला होता. 


मग माझ्या भाचेकंपनी बरोबर ती चार साडेचार वर्षांची असेपर्यंत माझं लग्नही व्ह्यायचं होतं तोवर खूप मजा करून घेतली. आताही ती मला नावाने हाक मारतात म्हणून मावशी आत्यापेक्षा आमचं नातं जास्त जवळचं आहे. माझी मुलं त्यामानाने माझ्या रागाची देखील धनी होतात. म्हणजे आता हे लिहिताना मला असं लक्षात आलं की मला आवडलेल्या, मी खेळलेल्या इतर मुलांवर मी शक्यतो ओरडणे, रागवणे हे प्रकार सहसा केले नाहीत पण दिवसभरात एकदाही मी माझ्या मुलांवर रागावले नाही अस शक्यतो झालं नाही. असो खर मला आजच्या बालदिनी हे सगळं लिहायचंदेखील नव्हतं. 

गेले काही दिवस फिलिपिन्समधल्या टायफूनच्या बातम्या आपण वाचतोय. त्यासंदर्भात आज एक विस्तृत ईपत्र एच आरतर्फे आलं. त्यात तिकडच्या मुलांचा उल्लेख होता. त्यांचे जवळचे नातेवाईक हरवलेत, त्यांच्या शाळादेखील असून नसल्यागत झाल्यात आणि हे सर्व ज्या वयात त्यांना सामोरं जायला लागतंय म्हणजे खर तर नियतीने केलेला अन्यायच म्हणायला हवं. 
अर्थात निसर्गापुढे माणूस खुजाच. पण आजच्या बालदिनाच्या निमित्ताने आपण अशा काही मुलांना त्यांच्या उर्वरित भविष्याची तरतूद म्हणून काय करायला हव यासाठी त्या मेल मध्ये एक साईट होती तिची लिंक आहे  savethechildren.org
तुम्हाला आणखी काही साईट्स माहित असतील तर तर त्या नक्की कळवा. आजच्या बालदिनी आपण जसा आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तसाच याही मुलांचा करुया. 

आणि हो बालदिन म्हटलं म्हणजे आपल्या मुलांबरोबरची मजा तर घायलाच हवी. तुम्ही काय केलतं माहित नाही आम्ही आमच्या १४ च्या रात्री तिकडे आमच्या देशातला आमचा क्रिकेटचा देव, याच्या घरात जायला आम्हाला संधी मिळाली, ज्याला मागच्या रणजीमध्ये वानखेडेला पाहायला आम्हाला संधी मिळाली आणि आज तो त्याचा शेवटचा सामना खेळतोय , त्या सामन्यातली त्याची खेळी आमच्या मुलांबरोबर एन्जॉय केली. आमच्या बच्चेकंपनीने त्याचे पन्नास होताना केलेला जल्लोष. या लिटील मास्टरला माझ्या घरचे लिटील मास्टर्सपण खूप मिस करणार. 
बालदिनाच्या शुभेच्छा. 



Sunday, November 10, 2013

दिवाळी २०१३

एक एक वर्ष येतं जेव्हा प्रत्येक ठिकाणी युद्धभूमीसारखी कामं मागे लागतात. सध्या तरी मी फक्त दिवाळीबद्दल म्हणतेय हो.
या वर्षी माझ्या नव्या घरातली पहिली दिवाळी. खर तर आता पर्यंत निदान सातेक घरं बदलली. मग दिवाळीला ते घर चांगलं कस दिसेल याची तयारी देखील प्रत्येक ठिकाणच्या निदान पहिल्या दिवाळीला तरी  होते. त्यात आमच्या चाळणीत क्रिएटिव्हिटीचे एक दोन खडेही न आल्याने किती काही केलं तरी शेवटी फार उजेड पडणार नाही हे साधारण माहित असतं. यंदा तर आठवडाभर तीन वेळा बिघडलेला कंदील मार्गी लावेस्तो दिवाळीच्या शुक्रवारची मध्यरात्र उलटली. आणि तरी तो संपूर्ण विभाग बेटर हाफच्या ताब्यात आहे.
 
यंदा वर्षभर मित्रमंडळ घरी बोलावता आलं नाही म्हणून दुसरया दिवशी संध्याकाळी डझनभर पोरं, त्यांचे पालक आणि काही नवीन लग्न झालेले असा बराच उरक होता. कामांची यादी वाढत जात होती. तरी या वर्षी दोन्ही घरच्या आई मंडळींनी फराळ वेळेवर पोचावा म्हणून एक आठवडा आधीच पाठवला होता. पण मग त्यातले काही पदार्थ थोडे फार मोडले वगैरे तर ते आपणच खाऊ आणि पाहुण्यासाठी थोडं तरी फराळाचं कराव म्हणून ते मागे होतच.
 
दरवर्षी आणि वर्षातून मध्ये मध्ये मी चिवडा करते त्यामुळे ती कामगिरी आधीच फत्ते करून ठेवली होती. पण यावेळेस सासूबाईंनी येता येता एक मुगडाळीची चकली करायला दाखवून प्रेमाने सोऱ्या दिला होता. त्याच्या आठवण झाली आणि मग चकल्या करायचं ठरवलं.
 
मी आजतागायत माझ्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगात हा प्रयोग खरं तर विविध कारणांनी टाळत होते पण यंदा माहित नाही का पण मुलांना आवडतात आणि आजीच्या चकल्या प्रवासात तुटल्या म्हटल्यावर माझ्यातली आई जर जास्तच जोरात जागी झाली. आणि मग त्या असंख्य टिपा आठवत चकलीची पहिली batch केली. आपल्या चिमुकल्या दातांनी कुडुम कुडुम करत ती मोडून खाणाऱ्या माझ्या पिलांना खाताना पाहून मग  त्यांच्या घरी येणाऱ्या मित्रमंडळीसाठी पण थोड्या करूया असं माझं मीच ठरवलं. आणि मग त्या मंद आचेवर तळणाऱ्या चकल्यानी माझ्या दोन रात्री चकलीमय झाल्या. अर्थात ही कढई पुढच्या gasवर आली म्हटल्यावर असंख्य काम back burner वर गेली हे वेगळं सांगायला नकोच.
 
असो तर अगदी शेवटच्या घटकेपर्यंत घरच्या दिवाळीवर हात फिरवता फिरवता ब्लॉग बिचारा वाट पाहात राहिला. पण असं म्हटलंय न की देवदिवाळी पर्यंत शुभेच्छा दिल्या तरी चालतात म्हणून मी माझ्या सर्व प्रकट अप्रकट ब्लॉगवाचकांना दिवाळीच्या शुभेच्छा देते.
आणि आमच्या घराचा थोडा फार फराळ ठेवला आहे तुमचा इतक्यात संपला असेलच तेव्हा हा थोडा फराळ गोड मानून घ्याल अशी आशा.
 
ही दिवाळी आपण सर्वाना सुखसमाधानाची जावो आणि हे नवीन वर्ष आपणासाठी चागंल्या गोष्टी घेऊन येवो हीच कामना.

Sunday, October 13, 2013

औषध (न) लगे मजला

लहान बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तस्मात त्याचं पहिल्या आठवड्यातलं एबीसी विटामिनचं औषध पितानाचं तोंड त्यांनी आई बाबांचा छळवाद करण्यासाठी विधात्याने निर्माण केलेल्या पुढे येऊ घातलेल्या काही वर्षात, औषध नामे बाटल्यांचा खप किती आणि कशा प्रकारे होऊ शकतो याचा संकेत देण्याचं एक निमित्त आहे असं आमच्या थोरल्या चिरंजीवाच्या गेल्या पाच वर्षातल्या अनुभवावरून मी ठाम सांगू शकते. (बिलीव मी हे वाक्य या ब्लॉगवर लिहिलं गेलेलं सर्वात मोठं (आणि व्याकरणदृष्ट्या बरोबर) वाक्य असलं तरी इतर कुठल्याही वाक्यांपेक्षा जास्त खरं (आणि पारखलेलं) वाक्य आहे…)

नाही कळलं? शक्यता आहे.  नाही! वाक्याचा दोष नाही, त्यात एकवटलेल्या अर्थाने गोची केलीय. तर थोडं  सुसंगत सांगायचं  तर मूल  हॉस्पिटलमधून घरी आलं की  तिथून निघताना अत्यावश्यक लिस्टमध्ये एक एबीसी (की एबीसीडी) नामक एक विटामिनचा रोज एकदा दिला जाणारा डोस द्यायला डॉक्टर आवर्जून सांगतात. आईच्या दुधातून मिळू न शकणारी विटामिन्स त्यात असतात. आरुषच्या वेळी पहिल्यांदी पालक असल्यामुळे (दुसऱ्या वेळी पालक ए के ए दुसऱ्या  मुलाचं पालकत्व हा एक वेगळा विषय आहे पण दुसऱ्या  मुलाला वाढवताना जी आपसूक सहजता येते ते पाहता तो विषय पुढची पाच वर्षे तरी ब्लॉगवर येईल असं  वाटत नाही.) 
हा तर ते पहिल्यांदी पालक असल्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टी आम्ही जातीने पाहत असू तेव्हा हे औषध कसं  लागत असेल ते माझ्या नवर्याने (किंवा आमच्या बाबाने सोयीसाठी आपण त्याला बाबाच म्हणुया) हा तर आमच्या बाबाने चाखून पाहिलं आणि त्याच्या चेहरा (आणि कसनुसं होणारं अंग देखील) पाहण्यासारखा झाला आणि त्याला आरुषची दया आली. 
"अगं खुपच  याक्क लागतंय. डॉक्टरला दुसरा brand आहे का विचारूया का की प्रिस्क्रिप्शन घेयुया? तुला सांगतो हि लोकं  जेनेरिक मार्केट करतात पण…"
"अरे पण तो तर चांगला मिटक्या मारत खातोय की  आणि वर गायीसारखा रवंथ पण करतोय" मी बाळाचं बोळकं बघत माझ्या मताची पिंक टाकली. 
"अरे हो की." आमच्या बाबाची बरेचदा लेट  पेटते मुख्यत: फ्यामिली म्याटर असलं की  जर जास्तच. 
असो आम्ही काही जास्त जीवाला लावून घेतलं नाही पण खर तर हे  याक्क औषध रवंथ करून पिताना "मला औचद आवलतं" हे तो आम्हाला सांगू पाहतोय हे कळायला मला बरीच वर्षे लागली.

पहिलं वर्ष ते वर म्हटलेलं एबीसी द्यावंच लागतं आणि मग त्याचा नाद सुटतो. तर आरुषच्या वर्षाच्या वाढदिवशी त्याची आत्या भारतातून आमच्याकडे आली होती आणि सगळ्यांना आवडते म्हणून काजू कतलीचा भला मोठा बॉक्स तिने आणला होता. आम्ही बाळाला कौतुकाने काजू कतली भरवली आणि त्याचं थोंड हा हा म्हणता माकडासारखं लाल झालं त्याला अजून काही होतंय का हे कळायला मार्ग नव्हता म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने आम्हाला याला नट्स अलर्जी आहे तुम्ही हवं  तर वेगळी अलर्जी टेस्ट करू शकता किंवा तो दोन वर्षाचा झाल्यावर आपसूक जाते का ते बघा नाही तर बेनाड्रील किंवा तत्सम कुठलही ओवर द काउंटर औषध हाताशी ठेवा. त्या दिवशी बेनाड्रील पितानाचा त्याचा आनंदी चेहरा माझ्या लक्षात यायला हवा होता, पण तेच ते म्हटलं  न पहिल्यांदी पालक वगैरे वगैरे त्यामुळे या अलर्जी बाईंच्या आगमनाने मी जर खट्टू होते. दुसऱ्या  वर्षी ती अलर्जी काही गेली बिली नाही तर आता तर चुकून असं  काही खाल्लं तर त्याचा घसा सुजतो सुद्धा त्यामुळे अलर्जीचं औषध सावलीसारख ठेवावं की त्याला शर्टवर लेबल लावावं असा विचार माझ्या डोक्यात घोळायला लागला. तोस्तर त्याला येणाऱ्या दोन तीन शब्दात तो मला नेहमी ते औषध दाखवून उगाच द्यायला भाग पाडायचा प्रयत्न करे पण मी ते लपवून ठेवलं. 

त्यानंतर आम्ही त्याच्या दुसऱ्या वाढदिवशी भारतात गेलो तेव्हा ताईने त्याला सहज जीरागोळी दिली ती त्याने इतक्या आनंदाने खाल्ली की त्या वारीवरून परतताना माझ्या सामानात पावेक किलोतरी जीरागोळी होती. त्यावेळी मला रोज विटामीनची गोळी घेताना आरुष पाही आणि मग स्वतःच्याच मनाने त्याने माझी गोळी म्हणून त्या जीरागोळीचा वापर सुरु केला आणि एकदम माझ्या लक्षात आलं की साहेबांना एकंदरीत औषधाचे गोळी किंवा प्यायचे प्रकार आवडतात. 

त्याला आवडतात म्हणून की माहित नाही पण त्यानंतरच्या वर्षात नॉर्थवेस्ट मध्ये असलेल्या सदाहरित वनांच्या काही झाडांच्या अलर्जीने त्याच्या शरीराचा ताबा घेतला आणि महिनाकाठी एकदा असं सतत तीनेक महिने तो त्याने हैराण होता म्हणजे त्याचं शरीर आणि आमची मनं हैराण. पण त्यासाठी दिल्या जाणाऱ्या antibiotic प्यायला मिळतं म्हणून तो खूष आणि पुन्हा पुढच्या महिन्यात डॉक्टरकडे जायला आनंदाने तयार. शेवटी त्याच्या कानावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला एक प्रोसिजर पण करावी लागली. तेव्हा घरी परत आल्यावर डॉक्टरने औचद दिलंय याची खात्री करायला तो विसरला नाही.

तिसऱ्या वर्षापासून दाताच्या डॉक्टरची पण एक वारी झाली आणि तो खुशच झाला कारण आमच्या नळाच्या पाण्यात फ्लोराईड नाही म्हणून रोज रात्री दात घासले की प्यायचे फ्लोराईड drops दिले. त्यामुळे रात्री दात घासायचा आम्ही कधीच कंटाळा केला नाही हे वेगळं सांगायला नकोच. शिवाय तोवर ती नॉर्थवेस्ट वी अलर्जी पण थोडी तीव्र झाल्याने सकाळचा रतीब होताच. पाचव्या वर्षी फ्लोराईडचा डोस दुप्पट होतो त्यामुळे साहेब दुप्पट खुश. ही खुशी आपल्याला लहान भावापेक्षा जास्त औषध प्यायला मिळतं यासाठी तर होतीच पण त्या dropper ला मोजणीची रेषा आधीच्या डोसइतकीच होती त्यामुळे दोन वेळा "आ" करायला लागतो याचा आनंद जास्त असावा.  आता नवीन काही नको रे देव असं आम्ही म्हणायला काही अर्थ नव्हताच देव लहान मुलाचं आपल्या आधी ऐकतो हे मी पुराव्याने शाबित करू शकते.  

खर तर पहिल्या पाच वर्षात मूल आजारी पडणे हे स्वाभाविक आहे त्यामुळे आता पाच वर्षाचा झाला तेव्हा हुश करायचं मी ठरवलं होतं. त्याप्रमाणे या वर्षाचे गेले सगळे महिने तसे बरे गेलेही. त्या दिवशी शाळेतून अवेळी फोन आला आणि पुन्हा माझा ठोका चुकला. सगळी धावपळ करून नवऱ्याला पुढे पाठवून छोट्या ऋषांकला घेऊन मी हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा रडव्या तोंडाने मंकीबारवरून पडून हात मोडून पडलेलं माझं पोरगं औषध घेऊन येणाऱ्या नर्सला पाहून "आर यु रेडी टू टेक सम मेडिसीन?" असं विचारल्यावर रडं विसरून मोठा आ करून राहिला. त्याचं ते आनंदाने औषध घेणारं रूप पाहून मागच्या पाच वर्षाच्या आवडीने औषधं आणि तेही आम्ही विसरलो तर आम्हाला आठवण करून मागून मागून औषध घेणारे त्याच्याबरोबरचे प्रसंग मला नकळत आठवले आणि माझ्या डोळ्यातलं पाणीही एक क्षण वाहायचं थांबलं.     

Monday, September 9, 2013

मी आणि सण, थोडे सैरभैर विचार


आज गणेश चतुर्थी, मला लहानपणापासून आवडणारा सण.त्यावेळी न कळत्या वयात तो आजूबाजूला साजरा केला जाई तसाच आठवतोय. मग मोठं झाल्यावर आपण नक्की आस्तिक की नास्तिक या प्रश्नातही  गणेश चतुर्थी आली की एक वेगळाच उत्साह येतोच. 

आजचीच गोष्ट. करूया, नको, वेळ मिळेल का? असा सगळा विचार करतानाही सोमवारचे दोन तास निवांतपणे हाताशी आले. मागच्या आठवड्यात नारळ किसून फ्रीज करायचं काम करून ठेवलं  होतं म्हणजे बेटर हाफने कामातला आपला हिस्सा आपल्या सवडीने करून ठेवला होता. तसही सण  साजरा करायचा म्हणजे  हे अमकं तमकं अगदी अस्सच झालं पाहिजे इतका अट्टाहास नाही. त्यामुळे असा आधी खवलेला नारळ हाताशी असेल तर आम्हाला चालतं. 

एका बाजूला नारळ परतताना मन लावून गूळ चिरला आणि नारळ गुळाची गट्टी झाल्यावर त्यात थोडी वेलची पूड घालून ते मिश्रण एकीकडे निवत ठेवलं. या जानेवारीत निघता निघता आईने आठवणी दिलेलं मोदकाचं घरचं पीठ खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते बाहेर काढलं आणि उकड काढायची आईची टीप आठवत बसले. हम्म! दुप्पट पाणी की  अर्ध की समान? जामच गोंधळ उडाला तेव्हा अर्ध्याहून थोडं जास्त अस मधलं प्रमाण मोजून तुक्का मारायचं ठरवलं. मग एकदम लक्षात आलं की  हे आता जास्त रसमय होतंय आय मीन इंटरेस्टिंग. म्हणजे बघा मागच्या वीसेक मिनिटात मी माझी आई मोदक कसे करायची हा एक विचार सोडला तर आणखी कशाचाच विचार करत नाहीये. 

तर ती उकड काढताना उकळत्या पाण्यात थोडं  मीठ आणि तूप घालून मोदकाचं पीठ घातलं की  एक वाफ आणायची. आता हे थोडं हाताशी यायला अवकाश आहे तोवर आधीच सुरु केलेला वरण भाताचा कुकर बंद करून दुसरीकडे फ्लॉवरची भाजी निवडून फोडणी-बीडणी करून मंद आचेवर शिजत ठेवायची. 

आता पुन्हा आपलं  सगळं लक्ष मोदक उर्फ स्टार ऑफ द जेवण कडे. अर्थात अंदाजे घेतलेल्या उकडीचं तंत्र चुकल्यामुळे थोडं कोमट पाणी घालून पुन्हा मळून  घ्यायचं आणि मग पारीबाईंच्या मागे लागायचं. आज पारी करताना उकडीच्या भाकऱ्या करणारी मामी आठवली आणि पहिलीच पारी करताना ती तो उंडा हातावर गोल गोल करून मोठा करायची तसं केलं  आणि जी सुरेख पारी झाली की माझी मीच सुखावले, अर्थात तरी कळ्या जमणे ही पुढची एक अवघड पायरी होतीच. अगदी लक्ष देऊन केले त्या त्या मोदकांच्या पाऱ्या अगदी सुबक आल्या आणि काही रुसलेल्या. आमच्याकडे बाई हिचं लक्षच नाही असं म्हणणाऱ्या. 
नेहमी एकावेळी पाचपेक्षा जास्त मोदक केले नव्हते पण आज करायचा सूर चांगला लागल्याने बहुतेक गाडी चक्क अकरावर गेली. आणि मग ते शिजवताना पुन्हा काही गोंधळ होऊ नये म्हणून माझं बेकिंगचं अर्धवट ज्ञान वापरून भांड्याला आधी थोडं तेल लावून घेतलं. मोदक शिजताना नाममात्र फुलके करून घेतले त्यांनी मात्र काही फुलण्याचा चांगुलपणा दाखवला नाही. पण आज लक्ष अर्थात "स्टार ऑफ द" कडे असल्यामुळे ते नेहमीचं फ्रस्टेशन आलं नाही. 

मला अगदी पूर्वीपासून म्हणजे स्वयंपाकात खाण्याखेरीज गती नव्हती तेव्हापासून वाढायला फार आवडतं. आज नैवेद्याचं ताट वाढताना घड्याळाकडे लक्ष गेलं  आणि मग एकदम लक्षात आलं की गेले दीड तास आपण बाप्पाचा नैवेद्य, उकडीचे मोदक आणि एकंदरीत ताट पूर्ण असणे याखेरीज कुठलाही विचार केला नाही. 

मग मला जाणवलं की आज या निमित्ताने माझं खूप दिवस फक्त एकटीने थोडा वेळ मनन करणे (ध्यान करणे वगैरे माझ्या बाबतीत फारच उच्च वाटतं मला म्हणून मनन) राहिलं होतं, बहुतेक तसंच काही तरी झालं. हा एक छोटा दोन तासाचा सोहळा म्हणूया हवं तर मला माझ्याकडे थोड्यावेळासाठी का होईना घेऊन आला. 

आज बऱ्याच दिवसांनी एक पक्वान्न घरी मी मन लावून बनवलं आणि शेवटी देवाच्या नावाने ते आम्हीच खाणार. पण तो बनवायची कृती मला माझ्या पाककौशल्याकडे नव्याने पाहायला शिकवून गेली. हे सगळं आई कसं करते ते आठवून करताना मला मज आली आणि तिच्यातलं मल्टीटास्किंग माझ्यातही न कळत कसं मुरलंय हे मला कळून सुखावून गेली. 

मला वाटतं माझ्यासारखे अनेक जण असतील जे या निमिताने थोडी सजावट, एखादं  नवीन पक्वान्न करतील त्यावेळी त्यांच्या मनात दुसरा विचार असणार नाही आणि ती कृती पूर्ण झाल्यावरही मन प्रसन्न असेल. नेहमीच बाहेर जायचे छंद जोपासून मनाला ताजंतवानं करतात, आज घरातच थोडी आराधना आपल्या पद्धतीने करून तसचं ताजतवानं व्हावं. मग त्यासाठी मी आस्तिक आहे की  नास्तिक असा आर या पार प्रश्न पडण्यापेक्षा या अवस्थेला कुठलं नाव न देता आहे त्या स्थितीशी एकरूप व्हावंआणि तिची मजा लुटावी.  

आमच्या घरचं प्रसादाचं ताट कसं दिसतंय ते नक्की कळवा. 

गणपती बाप्पा मोरया.     

Tuesday, August 27, 2013

राम आणि शामची गोष्ट

ही गोष्ट आहे दोन मित्रांची. सोयीसाठी आपण त्यांना राम आणि शाम म्हणुया. राम आणि शाम एकत्र कॉलेजमध्ये शिकले. पैकी शाम एका छोट्या गावातून आला होता. त्याची शैक्षणिक प्रगती उत्तम असली तरी मुलाखतीसाठी इंग्रजीतून बोलायला सुरवात केली की त्याचे उच्चार, भाषा इत्यादीचा फरक लक्षात येई. त्यामुळे शेवटच्या वर्षात इतर मुलांची प्लेसमेंट झाली तरी याच्या पदरी मात्र निराशा. रामलादेखील कॅम्पस जॉब मिळाला आणि राम-शामची मैत्री तिथेच थिजल्यासारखी राहिली.
रामने सुरुवातीला काही काळ नोकरी करून मग उच्च शिक्षणासाठी परदेश गाठला. तिथे चांगल्या दोन डिग्र्या मिळवून आता हा उत्तम पदावर काम करतोय. परदेशी राहताना जितकं चांगलं राहता येईल, मोठा बंगला, त्याला स्विमिंग पूल, मोठी गाडी, सारखे सारखे इतर देशात कामासाठी प्रवास सगळं काही जोरदार सुरु. शिवाय देशात देखील स्वतःच्या गावी मोठा बंगला आणि तिकडेही नेमाने भेटी वगैरे. 
मागे फेसबुकच्या निमित्ताने त्याच्या batch चे जवळजवळ सर्वच परदेशी गेलेले मित्र भेटले पण शाम कुठे आहे याची  काहीच कल्पना नाही. मग एका भारत दौऱ्यात घराच्या काही कामाने जिल्ह्याच्या एका सरकारी कचेरीमध्ये जायचा योग आला. तिकडे आपला क्रमांक यायच्या आधीचा वेळ काढताना सहज म्हणून तिथली अधिकाऱ्यांची यादी वाचताना त्यातलं सगळ्यात वरचं नाव ओळखीचं वाटलं आणि पुन्हा वाचल्यावर खात्री पटली म्हणून बाहेरच्या शिपायाला या साहेबांना भेटता येईल का म्हणून विचारलं. अर्थात appointment नसल्यामुळे शिपाई नाहीच म्हणाला पण तरी एक प्रयत्न म्हणून आपलं कार्ड देऊन यांना तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप पाठवला. 
ते कार्ड घेऊन शिपाई वर जाताच त्याच क्षणात साहेब स्वतःच खाली आले. गेले कित्येक वर्षे न भेटलेले शाम आणि आपला राम एकमेकांना गळाभरून भेटले. आता तू जायचं नाही. माझ्याच बरोबर राहायचं , मला पण बंगला आहे शामचा आग्रह. कॉलेजमध्ये खर सारेच मध्यमवर्गीय पण रामने बरेचदा शामला मदत केली होती त्या दोघांची तेव्हा खूप छान मैत्री होती आणि आता इतक्या वर्षाने भेटल्यावर साहजिकच ही प्रतिक्रिया असणार.
मग रामला कळलं  की शामने कॅम्पस जॉब मिळाला नाही म्हणून खचून न जाता शासकीय परीक्षा आपल्या गुणांवर आणि काही विषय मराठीमध्ये घेऊन आता उच्चस्थानी नोकरी करून त्याच्यासारख्या लोकांसाठी काम करतोय. आता त्याच्याकडे सरकारी बंगला, दोन गाड्या आणि त्याच्यासाठी सिक्युरिटी वगैरे सर्व काही होतं.
दोन दिवसांनी शामला काही दिवसाच्या दौऱ्यावर जायचं होतं. रामला हे निमंत्रण मोडवेना शिवाय आपल्या देशातली सरकारी कामे कशी  चालतात हेही पाहायला मिळणार होतं. या काही दिवसांत रामने काही गावं, तिथले खेडूत आणि त्यांची परिस्थिती जवळून पहिली. सरकारी मदत तळागाळात पोहोचावी म्हणून शामने स्वतः काही महिन्यापूर्वी पाहणी करून ती मिळेल अशी सोय केली होती. त्याला पाहिल्यावर ही  लोकं अक्षरश: त्याच्या पायावर लोटांगण घालत होते. त्याला मनोमन दुवा देत होती. मोठ्या वयाच्या बायकादेखील, "मुलासारखा तू धावून आलास", वगैरे म्हणत होत्या. आपल्या आयुष्यात प्रथमच असं  काही पाहणारा राम त्यावेळी कॅम्पस जॉब मिळवून उर्वरित आयुष्यात आपण काय कमवलं याचा मनात विचार करत होता. 
 
त्या रात्री शामशी बोलताना तो म्हणाला माझं सगळं कमावलेलं घेऊन टाक आणि तुझी नोकरी मला दे.   शाम शांत होता. तो म्हणाला, हे बघ तू माझ्या बंगल्यावर आला नाहीस कारण तुला वेळ नव्हता पण आला असतास तरी फक्त मीच भेटलो असतो. कारण मी जिथे जिथे काम करतो तिथे एकही पैसा न खाता लोकांना मदत करतो शिवाय बरेच मंत्री-संत्री इत्यादीचं काही तरी वाकडं सुरु असतो ते बाहेर काढतो म्हणून सहा महिन्यापेक्षा जास्त एका जागी कुणी मला ठेवत नाही. लगेच बदली होते. माझी बायको कंटाळली आणि यंदा मुलीचं महत्वाचं वर्ष म्हणून दुसऱ्या शहरात राहते. त्यांच्यासाठी इथे शासकीय इतमामाने वापरायला गाडी आहे पण तीत बसायला कुणी नाही. बर हे जाउदे ही  सगळी मेहनत करायची महिन्याची कमाई बघ. त्याच्याकडचा  फक्त पन्नास हजाराचा पे चेक पाहून बराच वेळ त्या खोलीत कुणीच काही बोललं नाही. शेवटी शामनेच उतारा दिला, "हे बघ राम, तुला जर खरच मदत करायची आहे तर तू एक गाव दत्तक घे आणि तिथे सोई होतील हे मला पाहता येत का त्याचा मी प्रयत्न करेन."
 
राम त्याचा भारतदौरा पूर्ण करून पुन्हा परदेशी आला. पण यावेळी त्याच्या मनात पूर्वीसारखं आपल्याकडे हे नाही ते नाही असं काही नव्हतं, तर आपल्याला आता काय करता येईल याची दिशा त्याच्या मनाला मिळाली होती.
 
हा राम मला कामानिमिताने थोड्या काळासाठी भेटला आणि वर उल्लेखलेलं त्याने मला एकदा बोलताबोलता सांगितलं. या संपूर्ण खऱ्या कथेची नावं मात्र मी जाहीर करू शकत नाही. विशेष करून शामचं. आपल्याला असे अनेक शाम हवे आहेत पण म्हणून शामकडे बघून शिकणाऱ्या रामचं मुल्यही कमी होत नाही हे सांगायचा हा एक छोटा प्रयत्न.

Sunday, August 25, 2013

सुन्न

सात महिन्यांपूर्वी जेव्हा निर्भयाची बातमी चर्चेत आली,तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया म्हणजे स्वतःच्या अगतिक शरीराची लाज वाटणं. तरी एक वेडी आशा म्हणजे निदान आरोपींना जबरी शिक्षा होईल असं वाटलं होतं पण तसंही झालं नाही. रोज़ "तशा" ताज्या बातम्या येताहेतच. ही मुंबईतली बातमी वाचून पहिल्यांदाच स्वतःच्या भारतीय असण्याची शरम वाटतेय. 
आज इतक्या तत्परतेने आरोपींना पकडल्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन करावं तितकंच पुढे अंत बघू पाहणार्या न्याय-व्यवस्थेचं काय करायचं हाही प्रश्न आहेच. शिवाय मधल्यामध्ये इथून पुढे या घटनेशी संबंधीत शिंकलेल्या माशीलाही "ब्रेकिंग न्यूज़" म्हणून लोकांच्या समोर सारखं झळकवत आपापल्या चॅनलच्या तुंबड्या भरणार्यांनाही विसरून चालणार नाही. 
मागच्या महिन्यात कामाच्या जागी भेटलेला एक चेक नागरिक आणि त्याच्याशी झालेला सं(की नुसताच)वाद आठवतोय. 
"So what are you really proud of in current India? Is it because it has a rapist Capitol?"
याचं काही महिन्यांपूर्वीच एका दाक्षिणात्याशी विवाह झाला आहे आणि महाशय दिडेक आठवडा भारतात जाऊन आलेत यांचा ईथे उल्लेख व्हायला हवा.

त्याचा तो rapist Capitol चा उल्लेख झोंबून मी त्याच्याशी "it happens in all countries and may be the media highlights it only when a major case is solved by the cops. India is culturally so different I am not sure about Delhi but in Mumbai in my last visit, I travelled by public transport at night time and reached safely from one part of the town to other" हे आणि असं बरंच काही सांगून बाजू सावरायचा प्रयत्न केला होता.

कदाचीत माझ्या मुंबईबद्दल मला जरा जास्त विश्वास होता. कदाचीत मी बॅलाॅर्ड पिअरला ज्या गर्दुल्ल्यांच्या आजुबाजूनेे जावं लागे तो भाग तरीही "सेफ़ झोन" असावा किंवा त्यावेळी रस्त्यावर चालणारे इतर लोक फारच काळजीवाहू असावेत   किंवा तेव्हा सातला निघायची वेळ आता चार किंवा पाचवर आली असेल किंवा काय?
खरं सांगायचं तर इथून पुढे कुठल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली किंवा नाही तरी हे असं आमच्या मुंबईत दिवसाढवळ्या घडू शकतं हा एकच धक्का मला सुन्न करायला पुरेसा आहे. आज या देशाची नागरिक असण्याची शरम वाटतेय.