"घोडा दहा वर्षांचा झाला तरी लोळतोय बघ" अशा प्रकारे प्रकट दिनाचा उद्धार होणारी माझी पिढी नसली तरी वाढदिवस ही काही साजरा वगैरे करायची घटना आहे किंवा नेमकं सांगायचं तर त्या निमित्ताने पार्टी नामक खर्च ड्यू असलाच पाहिजे हेही आमच्या बाबतीत फारसं झालं नाही. घरी आधी आईने आणि आता मुलांनी औक्षण केलं की त्या दिवसाच्या काय त्या भावना दाटून येतात आणि पुढच्याच क्षणाला लिस्टवरचं काम पुढ्यात येतं. त्यामुळे ते स्वीट सिक्स्टिन, झालचं तर एकविशी, पंचविशी शिवाय तिशी हे सगळे टप्पे म्हणायचे तर येणार होते त्या त्या वेळी आले.
तरी देखील माझ्या वयाच्या मैत्रिणींबरोबर बोलताना या वर्षात चाळीशी हा शब्द मधेच येउन जातो आणि मग इतक्यात होणाऱ्या काही बदलांकडे लक्ष जातं. अगदी मागचं दशक म्हटलं तरी वाघ मागे लागल्यासारखी कामं, करीयरचे टप्पे आणि त्या अनुषंगाने येणारं फ्रस्ट्रेशन आणि आनंद दोन्हीचा मोठा भाग होता. यातलं काही कमी झालं तर त्याची उणीव भासणार असं काहीसं. आणि मग मधेच कधीतरी अचानक ही पेस, ही धावाधाव कमी करायला हवी असं आतून कुठेतरी वाटायला लागलं. मी अगदी जुन्या पोस्ट मध्ये काळ्या जीभेचा उल्लेख झालाय तसं काही गोष्टी जुळून आल्या. नॉर्थ वेस्टला आधीच आलो होतो. इस्ट कोस्टपेक्षा इथे तसं निवांत कल्चर. धावपळीची नोकरी, प्रवास डिमांड केल्यामुळे तिला अलविदा आणि मग मध्ये केलेले कॉण्ट्रेक्ट जॉब्ज डिमांडिंग असले तरी त्याला अंत होता आणि मग आता करते ती निवांत म्हणणार नाही पण त्यातल्या त्यात मधल्या पेसवाली नोकरी मागच्या वर्षी साधारण याच वेळेस हातात आली.
आधीची थोडी मोठी पोजीशन सोडून ही घ्यावी का हा निर्णय का माहित नाही पण फार विचार न करता घेऊन टाकला. काय म्हणतात ते ट्राय करूया फार फार तर काय होईल काही महिन्यांनी पुन्हा दुसरी शोधावी लागली तर शोधू असं एकदा मनाशी म्हटल्याचं आठवतं. आता हे लिहिताना ते आठवलं की वयाच्या आधीच्या टप्प्यात ही "होईल ते होईल" वृत्ती नव्हती. काही तरी बदलतंय याची ही बहुतेक पहिली पायरी होती.
मागची काही वर्षे करियर सोडून काही करण्यासाठी वेळ द्यायला मिळाला नव्हता आता तो वेळ निर्माणही केला आणि सगळ्यात पहिले पोहायला शिकायचा वर्ग सुरु केला. पाण्यात पडले आहे आणि पोहण्यातला तरबेजपणा अजून सरावाने येईल पण श्रीगणेशा राहिला होता त्याला मार्गी लावलं. आणि हे फक्त माझ्यासाठीच असं नाही. मुलाला स्केटिंग शिकताना नवऱ्याला आवड आहे हे ओळखून त्यालाही प्रोत्साहन दिलं. म्हटलं तर "छोटी छोटी बातें" पण ही किती मोठा आनंद मिळवून देतात याचा अनुभव घ्यायला मी इतकी वर्षे का थांबले? बहुतेक ती जुनी म्हण,"वेळेपेक्षा आधी काही मिळत नाही", ही अशा प्रकारे खरी होत असावी.
वरचं पोहण्याचं उदाहरण दिलं तश्या छोटी छोटी बातें वाल्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे थोडा वर्क लाइफ़ balance आला आणि स्वतःसाठी diversion theorem मिळालं.
अर्थात याच छोट्या छोट्या आनंदात यायचे ते मिठाचे खडेही येतात. आजकाल पेशन्स आणि बऱ्याच घटनांकडे एकंदरीत सकारात्मक पहायचा चष्मा कुठून मिळाला हे मात्र लक्षात येत नाही. कधी तरी वाटतं ते तसं नसेल कदाचित घटना न पटणाऱ्या असल्या तरी immunity वाढली असावी. यामुळे काही गमती जमती घडतात.
माझ्या बाबतीत म्हणायचं तर माझ्या वयाच्या काही मैत्रिणीपेक्षा माझी मुलं तशी लहान आहे. त्याचा मला फायदा असा आहे की मला घरी लाईट मूडमध्ये राहणं महत्वाचं आहे. सोबतीला लहान मुलं असल्यामुळे त्यांच्याबरोबर अवखळ वागलं तर गोष्टी सहजपणे होतात. माझ्या अवतीभवतीचा टोन लाईट करणं हे मी बरेचदा पुर्वीही करायचे फक्त आता त्याची वारंवारता वाढली आहे. त्या दिवशी आमच्याकडच्या निवृत्त होणाऱ्या एकाला गुड बाय मेल करतानाचं त्याचं उत्तर फार आवडलं "You brought the much needed fun element to our team" फार फार तर दहा महिने मी त्याच्याबरोबर असेन आणि त्यानं दिलखुलासपणे असं म्हणणं हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आता practically बोलायचं तर अर्ध आयुष्य जवळ जवळ संपलं आणि आता मला कुणी मी कामात कणखर आहे म्हणण्यापेक्षा तू रोज इथे येतेस हे आम्हाला आवडत आणि तुझ्यामुळे टीमचा असाही फायदा होतो हे म्हणणं मला जास्त आवडलं. कुठल्या मोठ्या पदाला जाऊन खडूस डेमेजर होण्यापेक्षा हे छान नाही का? हा तो सकारात्मक दृष्टीकोण वेळ लागली पण येतोय आणि त्याने मी सुखावतेय.

मध्ये मध्ये स्त्री सुलभ होर्मोन्स आपलं काम करतात आणि मग होणाऱ्या मूड स्विंगचा त्रास माझ्या कुटुंबाला होत असणार. त्यांनी मला समजून घेणं यातून आमची मैत्री रंगतेय. आजवरच्या वाटेवर अनेक मित्र-मैत्रिणी आले आणि गेले आणि तरीही मैत्रीचं हे पर्व मला जास्त भावतंय. कदाचित या वयाची ती गरज असेल. दोन तीन पण मोजकेच लोकं मला खरं ओळखतात. बाकीच्यांनी त्या पातळीवर यायची गरज नाही हे मान्य केले आहे.
हे न संपणारं मनोगत मी आणखी उदाहरणं देऊन (अजून) बोरिंग करू शकते पण मला वाटतं आता जवळचं धूसर व्हायला लागलं तरी दुरचं स्पष्ट दिसतंय. ते आधी पाहिलं नाही याबद्दल पूर्ण समाधान नाही असं नाही म्हणणार पण त्या अज्ञानात नाही याचं समाधान आहे,

मागच्या आठवड्यात ब्लॉगलाही आणखी एक वर्ष पूर्ण झालं आणि ते साजरं केलं, नाही असं नाही फक्त ते ब्लॉगवर व्यक्त केलं नाही. मुलांचे पाचच्या पुढचे वाढदिवस कसे घरगुती साजरे करतात तसं. आजचा माझा वाढदिवस मात्र मी साजरा करतेय. ब्लॉगवर आणि प्रत्यक्षात सुद्धा. जे काही मागचे काही महिने सुरु आहे, जे शब्दात मांडणं कठीण आहे पण माझ्यासारखी कुणी ४० हा एक आकडा आहे म्हटलं तरी तो इतर दशकांपेक्षा वेगळा आहे हे अनुभवत असेल तर तिला मी जे लिहिलं नाही ते नक्की कळेल.
ही पोस्ट त्या हिमनगाचं टोक म्हणूया हवं तर पण इथून पुढे आकड्याचं भय वाटणार नाही. दूरचं नीट दिसतंय त्यामुळे जवळचे प्रश्न छोटे होतील. आताच वसंत आल्यामुळे आमच्या गावातलं धुकं दूर होतंय तसचं माझ्याही डोळ्यावरचं धुकं दूर होतंय. मला माझी मी सापडतेय आणि त्या पूर्वीपासून असलेल्या पण थोड्या वाढलेल्या अवखळपणाला गद्धेचाळीशी असं गोंडस नाव देऊन मी माझं हे खास दशक साजरं करण्यासाठी सिद्ध होतेय.
या माझ्या मलाच वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)
या माझ्या मलाच वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)